अमेरिकेत काय चाललंय? - कौमुदी वाळिंबे



कोरोनाचा फटका सर्वाधिक बसला आहे तो अमेरिकेला. तिथे लाखाहून 
अधिक लोकांचा बळी गेलाय. कोरोना आणि लॉकडाऊन हाताळणी याविरोधात 
तिथल्या अनेक राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरलेत. या पार्श्वभूमीवर 
अमेरिकेत राहणार्‍या एका पत्रकाराने नोंदवलेली निरिक्षणं.

फेब्रुवारीच्या मध्यावर माझी एक भारतवारी आटपून मी बॉस्टनला परतले तेव्हा विमानतळावर आपली जोरदार परीक्षा घेतली जाईल, गेलाबाजार कुणीतरी टेंपरेचर गन कपाळावर रोखून त्या कसोटीवर उतरले तरच प्रवेश देईल, असं वाटलं होतं. तसं काहीही झालं नाही. वातावरण सुशेगाद होतं. ‘ही भायेल्ली भानगड आपल्यात नाही फारशी, अगदीच कंट्रोलमध्ये आहे सारं’ असा ठाम आत्मविश्वास राष्ट्राध्यक्ष सर्वांना वाटत होते. काही थोडे चिंतातुर जंतू सामाजिक वळवळ करू लागले होते, पण ते आपलं कुठेतरी कोपर्‍यात. टीव्हीवर बाहेरच्या जगातली धावपळ हळूहळू वेग पकडू लागली तेव्हा मग मार्चच्या सुरुवातीला देशभरात त्या भीतीने पकड घ्यायला सुरुवात केली. सुरुवात अर्थातच किनार्‍यावरच्या राज्यांतून झाली. आमचं मॅसेच्युसेट्स त्यातलंच एक.

१५ मार्चच्या सुमारास एका स्टँड-अप कॉमेडी शोला जायचं आम्हां काही मित्रमंडळींचं ठरलं होतं, तर नव्या साथीच्या शंकेने आठवडाभर आधीच आयोजकांनी तो शो रद्द केल्याचं कळवलं. आमच्यासाठी कोविडकाळाचा बिगुल वाजला तो त्या दिवशी. तिथून पुढे सुरू झाला साथीचा भडका आणि माहितीचा, त्याहून मोठा असा मतमतांचा, महापूर. एका बाजूला साथ आणि अकल्पित/अनियोजित परिणामांच्या लाटा आयुष्यावर लोटल्या आणि त्यात ठोस वैद्यकीय-शास्त्रीय माहितीचा आधार इतका तुटपुंजा पडत गेलेला दिसला, की माणसं आपापल्या कलानुसार कोणत्यातरी आणि कोणत्याही माहितीच्या आधारे मतांचे खांब उभे करू लागली. मुळात, आजूबाजूला खरंच गहजब उडालाय की एक साधी फ्लूसारखी साथ आलीय, हे ठरत होतं तुम्ही कोणतं टीव्ही चॅनल बघता यावर. जगबुडी आलीच, असं सीएनएन बघणार्‍याला वाटत होतं. तर, काय ते अवडंबर माजवलंय या नतद्रष्ट विरोधकांनी, असं मत फॉक्सच्या प्रेक्षकांचं होत होतं.

एक क्षणही साथीचं हे संकट अ-राजकीय दृष्टीने पाहिलं गेलं असं वाटलेलं नाही. परिस्थिती दिङमूढ करणारी आहे हे खरं. सर्वसत्ताधीशाच्या थाटात मिरवणार्‍या, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्के इतकीसुध्दा लोकसंख्या नसलेल्या देशात साथीचे सर्वाधिक बळी गेलेत. आणखीही जातील. तीन महिन्यांपूर्वी सुस्थितीत असणारी अर्थव्यवस्था आज, शतकभरात पाहिली नाही अशा बेरोजगारीच्या आणि मंदीच्या गर्तेत गेली आहे. एक बरंय, की इथे अमेरिकेत सर्व प्रकारची विश्वसनीय आकडेवारी सहसा उपलब्ध असते. त्यामुळे घडून गेलेल्या, घडत असलेल्या उत्पाताचा अंदाज लागू शकतो. पण घडलं ते तेवढ्या प्रमाणात का घडलं याचं निश्चित विश्लेषण कोणाजवळ नाही (खरंतर इतक्या लगेच असणंही कठीण आहे), पुढे काय/कसं होईल याचाही नीटसा मार्ग आज माहीत नाही. आणि विपरीत परिस्थितीच्या रेट्यामुळे की काय, काही काळ- कदाचित काही महिने- थांबून मग मत बनवण्याची उसंत उरलेली दिसत नाही.

रोटी, कपडा, मकान यापलीकडे माणसाला जगायला एक कथानक (नॅरेटिव्ह/संभाषित) लागतं - कळेल असं सुटसुटीत कथानक. त्यातच संकट, अडीअडचणींवर मात करण्याचं बळ सापडू शकतं. आजच्या अघटिताने इथल्या सामान्य माणसाच्या मनात असल्या-नसल्या त्या कथानकालाच हादरा दिला आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ नक्की कशात हा प्रश्न बर्‍याच जणांना सतावणार, तर शट-डाऊनपासून ‘स्वातंत्र्य मिळावं’ अशी चिथावणी थेट ‘वरूनच’ मिळाल्यावर अगदी शस्त्रसज्ज होत अनेकजण जोरदार निदर्शनं करणार. त्यातच हे निवडणूक वर्ष. त्यामुळे लोकांच्या मनातली कथा आपल्याला हवी तशी वळावी म्हणून कडोविकडीचे प्रयत्न होणार. इतर वेळीही तसं कठीणच म्हणायचं, पण विशेषतः या वर्षी वस्तुस्थितीचं एकसंध चित्र लोकांसमोर उभं राहणं अशक्य वाटतंय. कळत-नकळत डोळ्यांवर चढवलेल्या चष्म्याचं अस्तित्वच विसरायला लावणारा काळ साथीच्या लोंढ्यात अंगावर आदळला आहे. बहुतेकांची अवस्था एक हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीतल्या आंधळ्यांसारखी झाली आहे. चष्मा असून आंधळे, की चष्मा असल्यामुळे आंधळे?... हाती लागेल ते वास्तव, परस्परविरोधी भासमान वास्तवांचा गदारोळ!

या सगळ्या गोंधळभरल्या वातावरणात दोन-तीन गोष्टींमध्ये काही प्रमाणात तरी निश्चितता दिसते. मुख्य म्हणजे बहुतांश लोकांनी वैद्यकीय-शास्त्रीय सल्ला धुडकावून लावलेला नाही; अगदी, ‘कोविड-१९ साथ हे डेमोक्रॅट्सचं ट्रंपविरोधी कारस्थान आहे,’ असं पटू शकणार्‍या गटानेही. उदाहरणार्थ, आमचे इथले सख्खे शेजारी राजकीयदृष्ट्या पक्के ट्रंपियन आहेत. वयस्कर जोडपं आहे. हे आजी-आजोबा साथ ‘मानणार’ तरी की नाही, याची मला किंचित काळजीच वाटत होती. प्रत्यक्षात त्या दोघांनी सोशल डिस्टन्सिंगचं कडकडीत पालन केलं आहे. तशीच गत हातात बंदुका घेऊन निदर्शनं करणारांची. तोंडाला मास्क लावून सुरक्षित अंतरावरुन निदर्शनं करणारे त्यांच्यातही दिसत होते. आणि मधले काही दिवस हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या मागणीत एकदम झर्रकन वाढ झाल्याच्या बातम्या आल्या तरी ते घेऊन लोकांनी सरसकट हाराकिरी केल्याचं आढळलेलं नाही.
दुसरी निश्चित गोष्ट आहे, ‘फ्री इकॉनॉमी’ असलेल्या अमेरिकेत नजिकच्या काळात आर्थिक वाद पेटण्याची. टाळेबंदीच्या संकटाने जवळपास ५०% किंवा त्याहून थोडे जास्तच छोटे उद्योग कायमचे बंद होतील अशी भयावह शक्यता आहे, यात रिटेल क्षेत्रही आलं. एकीकडे अ‍ॅमेझॉन आणि वॉलमार्टच्या धंद्याला या तिमाहीत चांगली बरकत आली. त्यामुळे देशाच्या काही भागात तरी बड्या कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होते की काय, अशी शंका अनेकांना सतावायला लागली आहे. या जोडीलाच लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या आणि त्या बळावर बलाढ्य होत गेलेल्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या कंपन्या. एकीकडे या कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीकडे शेअर बाजार डोळे लावून आहे, तर दुसरीकडे उद्योगधंदा बुडालेल्या लाखोजणांचा रोष वाढवायला तेवढं एकच कारणही पुरेसं आहे. विरोधाभास म्हणजे त्या लाखोतलेच कित्येकजण या बड्या कंपन्यांचे ग्राहक असणार, त्यांना पर्यायच नसेल.

आणि तिसरा मुद्दा आहे तो लोकांच्या ऐतिहासिक ठरू शकणार्‍या प्रतिसादाचा. कंगाली, भूक, अनिश्चितता याचा सामना लोक फार काळ धीरोदात्तपणे करु शकतील अशी अपेक्षा धरणं अवघड आहे. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे अध्यक्षीय निवडणुकीचं हे वर्ष. वरकरणी न दिसणार्‍या असंतोषाच्या लाटेवर स्वार होऊन ट्रंप मागची निवडणूक जिंकले होते. आताचा असंतोष तर अजिबातच छुपा नाही. आणि आश्चर्य म्हणजे तरीही निवडणुकीचं पारडं कोणत्याही एका पक्षाकडे झुकलेलं नाही. साथीचा सामना करण्यात देश/सरकार कितपत यशस्वी ठरत आहे, याबद्दल लोकांची आत्ताची मतं त्यांच्या निवडीच्या पक्षानुसार असल्याचं वेगवेगळ्या पाहण्यांमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे यापुढच्या काळात कोणत्याही बाजूने पारडं झुकलं तरी त्याची नोंद ऐतिहासिक म्हणूनच केली जाईल.

एकमेकांवर परिणाम करू शकणारे असे अनेक मुद्दे एकमेकांना छेद देतात तेव्हा याला ‘अनागोंदी’ असंच म्हणावं लागतं. गेल्या काही काळात संशोधनक्षेत्रात ‘सायन्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी’ ही एक संकल्पना मूळ धरते आहे. कोणतीही समग्र गोष्ट तिच्या तुकड्या-तुकड्यांच्या बेरजेपेक्षा कायमच अधिक भरते, असं ही संकल्पना सांगते. त्याचाच आधार घेऊन बोलायचं, तर अनेक आघाड्यांवरच्या तुकड्या-तुकड्यातून निर्माण होणार्‍या अनागोंदीपेक्षा अंतिमतः जगाला आणखी मोठ्या अनागोंदीला तोंड द्यावं लागू शकतं.

केवळ अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगाला विचार करायचा आहे, की आता पुढे काय? या प्रश्नाचं सर्वसमावेशक, एकच एक उत्तर नाही. प्रत्येकाला यावर वैयक्तिक/स्थानिक तोडगे शोधावे लागतील. त्यातून समोर येईल ती आपल्या सर्वांची मिळून कोविड-समस्येवरची एक प्रतिक्रिया, एक ठोस प्रतिसाद.
आणि कोविड-समस्येनंतरची समस्या ही आहे, की हा प्रतिसाद कसा असेल हे आज नेमकेपणाने कुणीच सांगू शकत नाहीये. टाळेबंदीचा ज्वर ओसरतो आहे, कसोटी बाकी आहे.

 कौमुदी वाळिंबे
kaumudee.valimbe@gmail.com



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८