क्वारंटाईन - राजेंद्रसिंह बेदी




हिमालयाच्या पायथ्याशी लवंडलेल्या मैदानावर पसरून प्रत्येक गोष्ट धूसर करणाऱ्या धुक्याप्रमाणे प्लेगच्या भीतीने चहूकडे आपला अंमल प्रस्थापित केला होता. शहरातील लहान मुलंदेखील त्याचं नाव ऐकून थरथर कापत होती.
प्लेग धोकादायक होताच, पण क्वारंटाईन त्यापेक्षाही भयंकर होतं. लोक प्लेगपेक्षा क्वारंटाईनमुळे जास्त चिंताग्रस्त होते. आणि याच कारणाने आरोग्य विभागाने शहरातील उंदरांपासून बचाव करण्याचं शिक्षण देण्यासाठी जाहिराती छापून  घरांच्या दरवाजावर, रस्त्यांवर लावल्या होत्या, त्यावर  ना उंदीर, ना प्लेगया शीर्षकात भर घालूनना उंदीर, ना प्लेग, ना क्वारंटाईनअसं लिहिलं होतं.

क्वारंटाईनबद्दल लोकांच्या मनात भीती होती. एक डॉक्टर म्हणून मी ठामपणे सांगतो, की शहरात प्लेगपेक्षा क्वारंटाईनमुळे जास्त मृत्यू झाले आहेत. खरं म्हणजे, क्वारंटाईन हा काही आजार नाही. ती अशी एक मोठी जागा असते, जिथे हवेमुळे फैलावणाऱ्या रोगराईच्या दिवसांत रोग अधिक पसरू नये म्हणून रुग्णांना धडधाकट माणसांपासून कायद्याने वेगळं करून आणून ठेवतात. क्वारंटाईनमध्ये बर्याच डॉक्टर आणि नर्सेसची व्यवस्था केली गेली होती. तरी देखील तिथे मोठ्या संख्येने रुग्ण असल्याने प्रत्येकाकडे वेगवेगळं, नीट लक्ष देता येत नव्हतं. आपापले नातलग सोबत नसल्याने अनेकांचा धीर सुटत चालल्याचं मी पाहिलं. कित्येकजण तर आपल्या आसपास एक एक करून माणसं मरताना पाहून मरण्याआधीच मेले. अनेकदा तर असं झालं, की किरकोळ आजारी असलेले लोक तिथल्या वातावरणामुळे मरून गेले. मृतांची संख्या अधिक असल्याने त्यांचे अंत्यसंस्कारही खास क्वारंटाईन पद्धतीने होत असत. शेकडो प्रेतांना मेलेल्या कुत्र्यांप्रमाणे खेचून नेऊन त्यांचा एक ढीग केला जाई आणि कोणत्याही धार्मिक सोपस्कारांविना पेट्रोल टाकून जाळून टाकलं जाई. संध्याकाळच्या वेळी त्या आगीच्या ज्वाळा बघून इतर रुग्णांना वाटे जणू जगाला आग लागली आहे.

क्वारंटाईनमध्ये अधिक मृत्यू होण्याचं आणखी एक कारण होतं. आजाराची लक्षणं दिसताच रुग्णाला बळजबरीने क्वारंटाईनमध्ये नेलं जात होतं. त्यामुळे लोक आपला आजार लपवू लागले होते. प्रत्येक डॉक्टरला रोगी आढळताच त्याची माहिती सरकारला देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोक डॉक्टरकडून उपचार देखील करून घेत नव्हते. एखाद्या घरातून काळीज चिरणाऱ्या रडण्याच्या आवाजासहित प्रेत बाहेर निघे तेव्हाच त्या घराला प्लेगने विळखा घातल्याचं समजे.

त्या दिवसांत मी एक डॉक्टर म्हणून क्वारंटाईनमध्ये काम करत होतो. प्लेगची भीती मलाही वाटत होती. संध्याकाळी घरी आल्यावर मी खूप वेळ कारबॉलिक साबणाने हात धुवत बसे. आणि जंतुनाशक पाण्याने गुळण्या करत असे. किंवा पोटाला भाजेल अशी गरम कॉफी नाहीतर ब्रँडी पीत असे. पण त्यामुळे माझी झोप गायब झाली होती. डोळे खाजण्याचा त्रास सुरू झाला होता. कित्येक वेळा आजाराच्या भीतीने मी उलटी होण्याचं औषध घेऊन पोट साफ केलं. उकळती कॉफी किंवा ब्रँडी पिऊन पोटात जाळ झाला आणि त्याच्या वाफा मेंदूपर्यंत पोहोचल्या, की एखाद्या बेभान माणसाप्रमाणे मनात भलतेसलते विचार यायला लागायचे. घश्यात जरा खवखवलं तरी वाटायचं, माझ्या शरीरात प्लेगची लक्षणं दिसू लागली आहेत... उफ्फ!  मी देखील या जीवघेण्या आजाराला बळी पडणार... प्लेग! आणि मग... क्वारंटाईन!

त्याच दरम्यान माझ्या गल्लीत साफसफाई करणारा विल्यम भागव माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, “बाबूजी, काय सांगू, आज आपल्या भागातून ॅम्बु वीस आणि एक आजाऱ्यांना घेऊन गेली.”
एकवीस ? ...अॅम्ब्युलंसमधून...?”  मी आश्चर्यचकित होऊन विचारलं.

हो...वीस आणि एक... कॉनटीनमध्ये (क्वारंटाईन) नेणार त्यांना ... आता ते बिचारे कधी परत येणार नाहीत?”
चौकशी केल्यावर मला समजलं, की विल्यम रात्री तीन वाजता उठतो. अर्धा पाव दारू ढोसतो. आणि गल्लीत रोगजंतूंचा प्रसार होऊ नये म्हणून आदेशानुसार चुना शिंपडायला सुरुवात करतो. विल्यमने तो रात्री तीन वाजता का उठतो त्याचं आणखी एक कारण सांगितलं. त्याला बाजारात पडलेली प्रेतं एका ठिकाणी जमा करायची असतात. आणि तो काम करतो त्या भागातील जे लोक रोगाच्या भीतीने घराबाहेर पडत नाहीत त्यांची छोटी-मोठी कामं देखील तो करतो. विल्यम आजाराला जराही घाबरत नव्हता. त्याला वाटायचं, मरण येणारच असेल तर तो कुठेही गेला तरी वाचू शकत नाही.

त्या दिवसांत कोणी कुणाच्या जवळ फिरकतही नसे. पण विल्यम डोक्याला आणि तोंडाला मुंडासं बांधून अगदी मन लावून लोकांची सेवा करत असे. तो फारसा शिकलेला नव्हता, तरी आपल्या अनुभवाच्या जोरावर तो एखाद्या कसलेल्या वक्त्याप्रमाणे लोकांना या आजारापासून बचाव करण्याच्या युक्त्या सांगत असे. सर्वसाधारण स्वच्छता, चुन्याचं शिंपण आणि घरातून बाहेर निघण्याचा सल्ला देत असे. एक दिवस तो लोकांना भरपूर दारू पिण्याचा सल्ला देतानाही मी पाहिलं. त्या दिवशी तो माझ्याकडे आल्यावर मी त्याला विचारलं, “विल्यम, तुला प्लेगची भीती वाटत नाही?”

नाही, बाबूजी... वेळ आल्याशिवाय मृत्यू माझ्या केसालाही हात लावू शकणार नाही. तुम्ही इतके मोठे डॉक्टर आहात, हजारो लोकांना तुम्ही आजारातून बरं केलंत, पण माझी वेळ आली तर तुमचं औषधपाणी काही कामाचं नसेल... हो, बाबूजी ... तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मी स्पष्टच सांगतो आहे...” आणि मग विषय बदलत म्हणाला, “कॉनटीनबद्दल काहीतरी सांगा, बाबूजी, कॉनटीन...”

तिथे क्वारंटाईनमध्ये हजारो लागण झालेले आले आहेत. आम्ही त्यांच्यावर शक्य ते उपचार करतो आहोत. पण कुठपर्यंत? ... माझ्याबरोबर काम करणारे देखील जास्तवेळ तिथे राहायला घाबरत आहेत. भीतीने त्यांच्या घशाला कोरड पडते. पण तुझ्याप्रमाणे कुणीही सेवा करत नाहीये... कुणीही तुझ्याप्रमाणे जीव पणाला लावून काम करत नाहीये... विल्यम, जीझस तुझं भलं करो.”

विल्यमने मान खाली घातली. आणि चेहऱ्यावरून मुंडाश्याचं एक टोक बाजूला करून दारूमुळे लाल झालेला चेहरा दाखवत तो म्हणाला, “बाबूजी ! .. माझी लायकी ती काय. माझ्यामुळे कुणाचं भलं झालं, हा माझा निकम्मा देह कुणाच्या कामी आला, तर त्याहून दुसरी भाग्याची गोष्ट कोणती?... बाबूजी... आपल्या भागात प्रचाराला येणारे मोठे पाद्रीबाबा म्हणतात, ईश्वर येशू- मसीहाची हीच शिकवण आहे, की आजारी माणसाच्या मदतीसाठी तुमच्या जीवाची बाजी लावा... ते मला पटतं.”

मला विल्यमच्या हिंमतीला दाद द्यावीशी वाटली. पण माझ्या भावना दाटून आल्यामुळे मी बोलू शकलो नाही. त्याची प्रामाणिक आस्था आणि सार्थक जीवन बघून माझ्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. मी मनाशी ठरवलं, की, आज क्वारंटाईनमध्ये अगदी मन लावून काम करायचं, आणि जास्तीत जास्त रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना आराम पडावा म्हणून प्राण पणाला लावायचे. पण ठरवणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप अंतर असतं. क्वारंटाईनमध्ये पोहोचल्यावर तेथील रुग्णांची भयानक अवस्था पाहिली, त्यांच्या तोंडाचा दुर्गंध माझ्या नाकात शिरला आणि माझ्या जीवाचा थरकाप झाला. मी विल्यमप्रमाणे काम करण्याची हिंमत गोळा करूच शकलो नाही.

तरी देखील त्या दिवशी मी विल्यमच्या मदतीने क्वारंटाईनमध्ये बरंच काम केलं. रोग्यांच्या अगदी जवळ राहून करण्याचं काम मी विल्यमकडून करून घेतलं. ते त्याने विनातक्रार केलं. मी स्वतः रूग्णांपासून लांबच राहत होतो. कारण मी मरणाला खूप घाबरत होतो आणि त्यापेक्षाही क्वारंटाईनला.
मग विल्यम मृत्यू आणि क्वारंटाईन, दोन्हींपेक्षा वर होता का ?

त्या दिवशी क्वारंटाईनमध्ये जवळपास चारशे रुग्ण दाखल झाले. आणि साधारण अडीचशे जणांचा मृत्यूने घास घेतला.
मी बऱ्या रुग्णांना बरं केलं याचं श्रेय विल्यमच्या हिंमतीलाच द्यायला हवं. रुग्णांच्या तब्ब्येतीतील सुधारणांची ताजी माहिती देणारा चार्ट चीफ मेडिकल ऑफिसरच्या खोलीत लावलेला होता, त्यात मी उपचार करत असलेल्या रुग्णांच्या तब्ब्येतीची रेषा सर्वात चांगली प्रगती दाखवत होती. मी दररोज काहीतरी कारण काढून त्या खोलीत जात असे, आणि ती रेषा शंभर टक्क्यांकडे जाताना बघून मनोमन खूश होत असे.

एक दिवस मी जरा जास्तच ब्रँडी प्यायलो. माझ्या छातीत धडधडायला लागलं. नाडी घोड्याप्रमाणे दौडू लागली. आणि मी एखाद्या वेड्याप्रमाणे इकडे तिकडे धावू लागलो. मला शंका आली, की प्लेगच्या जंतूंनी अखेर मला गाठलंय आणि आता लवकरच माझ्या गळ्याशी किंवा जांघेत गाठी येणार. मी हैराण झालो, अस्वस्थ झालो. त्या दिवशी मला क्वारंटाईनमधून पळून जावंसं वाटलं. तिथे मी होतो तोपर्यंत भीतीने कापत होतो. त्या दिवशी मला विल्यम फक्त दोनदाच दिसला.

दुपारच्या वेळी मी त्याला एका रुग्णाला मिठी मारताना बघितलं. तो अतिशय प्रेमाने त्याच्या हातांना थोपटत होता. तो रुग्ण होती नव्हती ती सर्व ताकद गोळा करून म्हणाला, “भाई, अल्लाह मालिक है... खुदाने शत्रूलादेखील या जागी आणू नये. माझ्या दोन मुली...”

विल्यम त्याचं वाक्य तोडत म्हणाला, “त्या ईश्वर येशू-मसीहाचे आभार मान... तुझी तब्ब्येत तर बरी दिसते आहे...”
हां भाई, करम है ऊपरवाले का... आधीपेक्षा बरा आहे मी आता. जर मी क्वारंटाईन...”
तो हे बोलत असतानाच त्याच्या नसा ताणल्या गेल्या. त्याच्या तोंडातून कफ आला. डोळे थिजल्यासारखे झाले. कित्येक झटके आले. आणि जो रुग्ण एका क्षणापूर्वी त्याच्या स्वतःसकट सर्वांना बरा झालेला वाटत होता, तो कायमचा शांत झाला. विल्यमला त्याच्या मृत्यूचं अतीव दुःख झालं. त्याच्या मरणावर बाकी कोण अश्रू ढळणार होतं?...त्याच्या जवळचं कुणी तिथे असतं तर त्याने दु:खाने आकांत केला असता. एक विल्यमच सगळ्यांचा नातेवाईक होता. सगळ्यांबद्दल त्याच्या मनात करुणा होती. तो सगळ्यांसाठीच रडायचा, मनातल्या मनात कुढायचा. एक दिवस त्याने समस्त मानवजातीच्या गुन्ह्यांची भरपाई म्हणून मोठ्या विनम्रतेने स्वतःला येशूसमोर उभंही केलं.

त्या दिवशी संध्याकाळी विल्यम माझ्याकडे पळत पळत आला. त्याला धाप लागली होती. तो विव्हळत होता. म्हणाला, “बाबूजी, हे कॉनटीन म्हणजे नरक आहे नरक. पाद्रीबाबा अशाच प्रकारे आमच्यासमोर नरकाचं चित्र उभं करायचे.”
मी म्हणालो, “खरंच आहे, हे नरकापेक्षा देखील भयानक आहे....मी तर इथून पळून कसं जाता येईल हे बघतो आहे. माझी तब्ब्येत आज खूप बिघडली आहे.”
बाबूजी.. आज एक रुग्ण आजाराच्या भीतीने बेशुद्ध पडला. तो मेला असं समजून कुणीतरी प्रेताच्या ढिगाऱ्यावर टाकला. जेव्हा पेट्रोल शिंपडलं गेलं आणि आगीने सगळ्या प्रेतांना वेढलं तेव्हा  मी त्याला आगीत हातपाय मारताना बघितलं. मी पुढे होऊन त्याला वाचवलं. बाबूजी, त्याला खूप भाजलं होतं. त्याला बाहेर काढताना माझाही उजवा हात भाजला. आता यापेक्षा वाईट काय घडू शकतं?”
मी विल्यमचा हात पाहिला. त्यावर भाजल्याच्या जखमा दिसत होत्या. त्या पाहून मी शहारलो. मी विचारलं, “पण तो माणूस वाचला का?”
बाबूजी.. तो सज्जन माणूस होता. त्याच्या सज्जनपणाचा त्याला काही फायदा झाला नाही. पण इतक्या वेदनेत देखील त्याने माझे आभार मानले.”
आणि बाबूजी...” त्याने आपलं बोलणं सुरूच ठेवलं. “त्या नंतर काही वेळाने तो इतका तडफडला, इतका तडफडला, की आजवर मी कुणाला असं मरताना बघितलं नाही... त्या नंतर तो मेला. त्याला मी या वेदना भोगण्यासाठीच वाचवलं असं मला वाटलं. आणि तो वाचलाही नाही. आत्ता मी त्याला पुन्हा त्या ढिगात फेकून आलो आहे.”
त्यानंतर विल्यम काही बोलू शकला नाही. वेदना भणभण करत होती, त्यात मध्येमध्ये अडखळत तो म्हणाला, “तुम्हाला माहिती आहे... तो कशाने मेला?...प्लेगने नाही... कॉनटीनने मेला तो, कॉनटीनने. आपल्या आसपासच्या रुग्णांचे चाललेले हाल... त्यांचं ओरडणं... सतत त्याच्या कानावर पडत होतं. आयांचा आक्रोश, बायका-मुलांचं टाहो फोडणं, रात्री घुबडंदेखील आवाज करायला घाबरतील असं भयानक वातावरण त्याच्या अवतीभोवती होतं. त्याला तिथे यमराजाची चाहूल लागली होती. त्या धसक्याने तो मेला.”
त्या दिवशी मी आजारपणाच्या शंकेमुळे क्वारंटाईनमध्ये गेलो नाही. दुसरं महत्वाचं काम असल्याचं कारण पुढे केलं. पण मला खूप अपराधी वाटत होतं. कारण मी गेलो असतो तर एखाद्या गरीब रुग्णाला फायदा झाला असता. पण माझ्या मनाला, मेंदूला ग्रासून राहिलेल्या भीतीने माझे पाय जणू साखळदंडाने बांधून ठेवले होते. रात्री झोपताना मला बातमी समजली, की क्वारंटाईनमध्ये आज जवळपास पाचशे नवे रुग्ण आले होते. 
मी अगदी कढत कॉफी पिऊन झोपणारच होतो. तेवढ्यात दाराशी विल्यमचा आवाज आला. नोकराने दरवाजा उघडला. विल्यम धापा टाकत आत आला. म्हणाला, “बाबूजी, माझी बायको आजारी पडली आहे... तिच्या गळ्याजवळ गाठी आल्या आहेत... कसंही करा आणि तिला वाचवा... तिच्या अंगावर पिणारा दीड वर्षाचा मुलगा आहे... तोही मरून जाईल.”
मी त्याच्याशी सहानुभूतीने बोलण्याऐवजी वैतागून म्हटलं, “आधीच का आला नाहीस?... आजारपण आत्ता आलंय का?”
सकाळी थोडा ताप होता... मी क्वारंटाईनमध्ये गेलो तेव्हा
अच्छा...म्हणजे घरात ती आजारी होती ... तरीही तू क्वारंटाईनमध्ये गेलास?”
जी बाबूजी.... ” विल्यम कापत्या आवाजात म्हणाला, “तिला अगदी किरकोळ ताप होता. बाकी काही होत नव्हतं. शिवाय माझे दोन्ही भाऊ घरातच होते....आणि शेकडो रुग्ण क्वारंटाईनमध्ये अगतिक...”
तू उगीच अती मेहरबान होऊन रोगाला घरी घेऊन आलास ना?...मी तुला सांगत होतो, रुग्णांच्या इतकं जवळ जाऊ नकोस म्हणून...मी केवळ यासाठी आज कामावर गेलो नाही. यात तुझी चूक आहे. आता मी काय करणार? ...तुझ्या धाडसाची शिक्षा तुला मिळायलाच हवी. शहरात शेकडो रुग्ण आहेत, तिथे...”
विल्यम हात जोडत म्हणाला, “पण ईश्वर येशू मसीहा...”
चल हट... मोठा आलाय येशूची दुहाई देणारा... तू जाणूनबुजून आगीत हात घातलास... आता त्याची शिक्षा भोग... मी इतक्या रात्री तुला काही मदत करू शकत नाही...”
पण पाद्रीबाबा...”
जा मग त्यांच्याकडे. बघ त्यांच्याच्याने काही होतं का?”

विल्यम खाली मान घालून तिथून निघून गेला. अर्ध्या तासानंतर माझा राग शांत झाला. मग मला माझीच लाज वाटली. विल्यमची माफी मागून मन लावून त्याच्या बायकोवर उपचार करणं हीच माझ्यासाठी योग्य शिक्षा होती. मी घाईघाईने कपडे बदलले आणि धावतपळत विल्यमच्या घरी गेलो. तिथे पोहोचल्यावर दिसलं, की विल्यमचे दोन्ही छोटे भाऊ आपल्या वहिनीला चारपाईवर झोपवून बाहेर काढत होते.
मी विल्यमला सामोरं जात विचारलं, “हिला कुठे नेताय?”
विल्यमने सावकाश उत्तर दिलं, “कोनटीनमध्ये.”
आता तुला क्वारंटाईन म्हणजे नरक वाटत नाही?”
तुम्ही यायला नकार दिलात... बाबूजी... मग दुसरा काय इलाज होता? मी विचार केला, तिथे डॉक्टरची मदत मिळेल आणि मी इतर रूग्णांबरोबर हिच्याकडेही लक्ष देईन.”
ती चारपाई खाली ठेवा. अजूनही तुझ्या डोक्यात बाकीच्या रुग्णांचाच विचार चालू आहे? मूर्ख...”
त्यांनी चारपाई आत ठेवली. मी माझ्याजवळचं रामबाण औषध विल्यमच्या बायकोला दिलं. आणि मग मी माझ्या अदृश्य शत्रूविरुद्ध लढू लागलो. विल्यमच्या बायकोने डोळे उघडले.
विल्यम कापत्या आवाजात मला म्हणाला, “बाबूजी, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.”
मी म्हणालो, “मी मगाशी वागलो त्याची मला लाज वाटतेय, विल्यम. येशू तुझ्या सेवेची बक्षिसी म्हणून तुझ्या बायकोला बरं करो.”
त्याच वेळी माझ्या लपलेल्या शत्रूने आपलं अंतिम हत्यार बाहेर काढलं. विल्यमच्या बायकोचे ओठ थरथरू लागले. नाडी मंद झाली. माझा छुपा शत्रू इतरवेळी जिंकायचा तसंच आताही त्याने माझ्यावर मात केली. मी शरमेने मान खाली घालत म्हटलं, “विल्यम, तू कमनशिबी आहेस...बघ तुला तुझ्या सेवेचं हे असं बक्षीस मिळालंय.”
विल्यम धाय मोकलून रडू लागला.
ते दृश्य हृदयद्रावक होतं. विल्यमने आपल्या रडणार्या मुलाला आईपासून वेगळं केलं आणि मला मोठ्या नम्रतेने निरोप दिला.

मला वाटलं होतं, की विल्यम आपल्या अंधःकारमय आयुष्यात आता दुसऱ्या कुणाचा विचार करणार नाही. पण दुसर्याच दिवशी मी त्याला अधिक रुग्णांची सेवा करताना पाहिलं. त्याने शेकडो घरांतल्या मुलांना वाचवलं... त्यापुढे आपल्या जीवाची जराही तमा बाळगली नाही. मी देखील विल्यमचं अनुकरण करत तत्परतेने काम केलं. क्वारंटाईन आणि हॉस्पिटलची कामं झाली की मी माझ्या रिकाम्या वेळात शहरातील गरीब भागातील नाल्यांच्या काठावरच्या, घाणीमुळे रोगराई होणाऱ्या घरांमधल्या लोकांकडे लक्ष द्यायला  सुरवात केली.
आता वातावरण रोगजंतूंपासून पुरतं मुक्त झालं होतं. शहर जवळ जवळ धुवून काढण्यात आलं होतं. उंदीर नावाला देखील उरलेले नव्हते. संपूर्ण शहरात एखाददुसरी केस आढळत होती. त्या रूग्णाकडे लगेचच लक्ष दिल्यामुळे आजार वाढण्याचा धोका उरला नव्हता. 

शहरातील व्यवहार नियमित सुरु झाले. शाळा, कॉलेज आणि कार्यालयं सुरू झाली.
माझ्या अगदी लक्षात आलेली एक गोष्ट, म्हणजे  बाजारातून जाताना चहूबाजूंनी लोक माझ्याकडे बोटं दाखवत होते. उपकारभरल्या नजरेने माझ्याकडे बघत होते. पेपरमध्ये माझ्या फोटोसहित माझ्यावर स्तुतीसुमनं उधळली गेली. अशा चौफेर कौतुकामुळे माझ्या मनात अहंकार निर्माण झाला.

शेवटी एक मोठी सभा झाली. त्यात शहरातील मोठ्या धनाढ्यांना, डॉक्टर्सना निमंत्रित करण्यात आलं. नगरविकास मंत्री या सभेचे अध्यक्ष होते. मला अध्यक्षांच्या शेजारी बसवण्यात आलं. कारण ती सभा माझ्या सन्मानार्थच आयोजित करण्यात आली होती. हारांच्या ओझ्याने माझी मान वाकत होती. मला प्रतिष्ठित व्यक्ती झाल्यासारखं वाटत होतं. गर्वाने मी इकडे तिकडे पाहत होतो... “मोठ्या निष्ठेने मानवजातीची सेवा केल्याबद्दल कमिटी अतीव कृतज्ञतेने एक छोटीशी रक्कम म्हणून एक हजार रुपयांची थैली मला अर्पण करत होती.” 
सर्व उपस्थितांनी माझ्या सर्व सहकार्यांची आणि खासकरून माझी प्रशंसा केली आणि म्हटलं, की या संकटाच्या काळात माझ्या कठीण परिश्रमांमुळे किती लोकांचे प्राण वाचले त्याची मोजदाद करणं शक्य नाही. मी दिवस-रात्र पाहता आपलं जीवन म्हणजे राष्ट्राचे प्राण मानले. आपलं धन ही समाजाची संपत्ती मानली आणि मृत्यूच्या नरकात शिरून मरणाऱ्या रुग्णांना अमृत पाजलं.

माझ्या चीफ मेडिकल ऑफिसरने टेबलाच्या उजव्या बाजूला उभं राहून हातात एक छडी घेतली. आणि उपस्थित लोकांना चार्टवरील रेषा दाखवली. त्यावर दररोजचा रिपोर्ट नोंदवलेला  होता. दररोज किती रुग्ण दाखल झाले, किती मृत्यू पावले आणि किती बरे झाले याचे आकडे नोंदवलेले होते. शेवटी त्यांनी तो दिवस देखील दाखवला, ज्या दिवशी माझ्या निगराणीत चोपन्न रुग्ण ठेवले गेले होते. आणि ते सगळे बरे होऊन आपल्या घरी परतले होते. याचा अर्थ १०० टक्के  यश प्राप्त झालं होतं. चार्टवरील रेषा सर्वोच्च स्थानावर पोहोचलेली होती.
त्यानंतर चीफ मेडिकल ऑफिसरने आपल्या भाषणात माझ्या हिंमतीला दाद दिली, माझी खूप स्तुती केली. आणि जाहीर केलं, की माझ्या सन्मानार्थ मला लेफ्टनंट कर्नल म्हणून प्रमोशन देण्यात येत आहे.
हॉल टाळ्यांच्या गजराने दुमदुमला. त्याच गजरात मी गर्वाने माझी मान वर केली. अध्यक्ष महाशय आणि इतर मान्यवरांचे आभार मानून एक लंबंचौडं भाषण दिलं. त्यात मी इतर मुद्द्यांसोबत हे देखील सांगितलं, की केवळ हॉस्पिटल आणि क्वारंटाईनकडेच नव्हे, तर गरीब भागातील घरांवरही आमचं लक्ष होतं. त्या लोकांना रोगापासून स्वतःचा बचाव करणं शक्य नव्हतं. त्यांच्यातलेच सर्वाधिक लोक या जीवघेण्या रोगाला बळी पडले. मी आणि माझ्या सहकार्यांनी रोगनिर्मितीच्या जागा शोधल्या आणि रोगाला समूळ नष्ट करण्याकडे लक्ष केंद्रित केलं. क्वारंटाईन आणि हॉस्पिटलची कामं संपवून आम्ही अनेक रात्री अशा भयानक वस्त्यांमध्ये काढल्या.
त्या सभेनंतर मी एका लेफ्टनंट कर्नलच्या रुबाबात, हारांच्या ओझ्याने वाकलेल्या अवस्थेत आणि एक हजार रुपयांची किरकोळ रक्कम खिशात घालून घरी पोहोचलो, तेव्हा मला एका कोपऱ्यातून हळूच एक आवाज ऐकू आला.

बाबूजी, खूप खूप शुभेच्छा.”
मला शुभेच्छा देताना विल्यमने आपल्या हातातील तोच तो जुना झाडू बाजूला ठेवला आणि दोन्ही हातांनी आपलं मुंडासं सोडलं. मी बघतच राहिलो.
तुम हो...? विल्यम भाई !” मी त्याला म्हटलं, “दुनिया तुला नको ओळखू दे, पण मी ओळखतो...तुझा येशू ओळखतो... पाद्रीबाबांचा एकमेवाद्वितीय शिष्य... तुझ्यावर ईश्वराची कृपा होवो.”
त्यावेळी माझ्या घशाला कोरड पडली. विल्यमच्या मरायला टेकलेल्या बायकोचा आणि त्याच्या मुलाचा चेहरा माझ्या नजरेसमोर तरळला. गळ्यातील हारांच्या ओझ्याखाली माझी मान मोडेल की काय असं वाटायला लागलं. पैशांच्या थैलीच्या ओझ्याने माझा खिसा फाटू लागला. इतका मानसन्मान प्राप्त होऊन देखील मी माझ्या नजरेत स्वतःला तुच्छ वाटू लागलो.




                                                                                                                                        राजेंद्रसिंह बेदी
अनुवाद -चंद्रकांत भोंजाळ
९८६७८१२८९८ 
(सदर कथा राजकमल प्रकाशन दिल्ली यांच्या 
सौजन्याने बेदी समग्र-खंड  मधून घेतलेली आहे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८