सात स्थलांतरित मजूर आणि बाराशे किलोमीटर - विनोद कापरी





मार्चच्या अखेरीस देशात टाळेबंदी लागली आणि शहरांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांचं पेकाट मोडलं. हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही अशा अवस्थेत हजारो कामगार नाईलाजाने चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या गावांकडे परतू लागलेअशाच सात मजुरांच्या एका गटाबरोबर माजी पत्रकार आणि चित्रपट दिग्दर्शक विनोद कापरी यांनी १२०० किलोमीटरचा प्रवास केला. कोणत्या हिंमतीवर त्या मजुरांनी एवढं अंतर काटलं? त्यांच्यावर कोणती परिस्थिती ओढवली?

विनोद कापरी माजी पत्रकार आणि चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक आहेत. २०१८ साली आलेल्यापिहूया पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक ही त्यांची विशेष ओळख. त्यांनी एप्रिल महिन्यात सात स्थलांतरित कामगारांसह उत्तरप्रदेशमधील गाझियाबादपासून बिहारमधील सहरसापर्यंत सात दिवस, सात रात्री प्रवास केला. त्या जिकिरीच्या प्रवासाबद्दल त्यांनी सांगितलेल्या काही आठवणी. 

-----

१३ एप्रिलला मीट्विटरवर ३०-४० स्थलांतरित कामगारांविषयी एक पोस्ट पाहिली. ते सगळे अन्न-पैशाविना गाझियाबादच्या लोणी परिसरात अडकले होते. मी त्यांच्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यासाठी मदत केली. पण तीन-चार दिवसांनी त्यांनी मला परत कॉल केला; ते परत कंगाल झाले होते. वारंवार असे हात पसरायला त्यांना लाज वाटत होती, पण त्यांचाही नाइलाज होता. मदत म्हणून मिळालेलं अन्नधान्य दुसऱ्यांदाही संपलं, तेव्हा मात्र ते त्यांच्या गावी, सहरसाला परत जाण्याचा काही मार्ग आहे का, असं विचारायला लागले. ते धोकादायक होतं. मी त्यांना तसं सांगितलं. पण अशा स्थितीत राहण्यापेक्षा वाटेत मरण पत्करायची त्यांची तयारी होती. मी २७ तारखेला त्यांना फोन केला तेव्हा कळलं, की त्यांच्यापैकी सात जण गावी जाण्यासाठी हातात सायकली घेऊन निघाले होते. मी गुगलवर सहरसापर्यंतचं अंतर पाहिलं. ते ,२०० किलोमीटर होतं. मी हादरलो! त्यांच्या प्रवासाच्या नोंदी करायलाच हव्यात असं मला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि माझी टीम आमच्या गाडीने निघालो. आम्हाला ते संभळजवळ भेटले.

-----

हे सात जण निघाले त्याच दिवशी त्यांना पोलिसांनी मारहाण केली आणि परत जायला सांगितलं. पण त्यांनी पर्यायी मार्गाचा आधार घेतला. त्यांच्यापैकी एकजण बराच टेक-सॅव्ही होता. त्यानेगुगल अर्थ ॅपवापरून एक पायवाट शोधून काढली.
त्याच रात्री त्यांनी गंगा नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. काही मच्छिमारांनी त्यांना पाहिलं आणि नदी किती खोल आहे याची काही कल्पना तरी आहे का, असं विचारलं. पण ते ऐकायला तयार नाहीत हे पाहिल्यावर मच्छिमारांनी त्यांना सकाळपर्यंत थांबा, सकाळी पलिकडे सोडतो, असं सांगितलं. तसंही, त्यांच्याकडे सायकली होत्या, त्या घेऊन पोहत नदी पार करणं त्यांना शक्यच झालं नसतं.
त्यांच्या सायकली हा आणखी वेगळाच मुद्दा होता. त्यांनी आपापल्या घरच्यांकडून पैसे मागवून घेऊन त्या जुन्या सायकली विकत घेतल्या होत्या. आधीच त्या मोडकळीला आलेल्या, वाटेत सारख्या नादुरुस्त होत होत्या. मग दुरुस्त करून देणारा कोणीतरी सापडेपर्यंत त्यांना कित्येक किलोमीटर त्या हातात धरून चालत जावं लागायचं.

-----

जेवण हा या काफिल्यासमोरचा मुख्य प्रश्न होता. त्यांच्याकडे पैसे नव्हते. फक्त थोडे चणे आणि सातू होतं. टाळेबंदीमुळे सगळी हॉटेल्स बंद होती. एखादं किराणा दुकान दिसलं तर आम्ही तिथे ब्रेड-बटर घ्यायचो. किंवा फळवाल्याकडून केळी विकत घ्यायचो. त्यांनी वाटेत कुठेही आंघोळी केल्या नाहीत. सातजण एकदम आंघोळ करत असताना कुणाचंही लक्ष गेलं असतं, मग पोलीसांनी येऊन पुन्हा मारहाण केली असती, अशी त्यांना भीती वाटत होती. उकाडा आणि घाम यामुळे आंघोळ करावीशी तर वाटत होती, पण ते शक्य नव्हतं. रात्री उघड्यावर झोपल्यावर डास, किडे यांचा त्रास व्हायचा.

-----

लखनऊ येईस्तोवर त्यांना अक्षरशः नको नको झालं होतं. खांदे पार गळून गेले होते. एका ट्रकचालकाला त्यांची दया आली. त्याने जवळपास ३० किलोमीटर त्यांना ट्रकमधून नेलं. तिथून पुढे त्यांनी परत सायकली दामटल्या. पुन्हा एका ट्रकचालकाने त्यांना गोरखपूरपर्यंत म्हणजे जवळपास १०० किलोमीटरची लिफ्ट दिली. त्यामुळे त्यांचे कष्ट बरेच कमी झाले.

ते बिहारच्या सीमेवर पोहोचले. अजूनही त्यांचं गाव ३५० किलोमीटर लांब होतं. तिथे कोरोनाच्या लक्षणांसाठी त्यांची तपासणी करण्यात आली. मग बिहार पोलिसांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि बसने त्यांना त्यांच्या गावालगतच्या विलगीकरण केंद्रात पाठवलं. बिहार सरकारने ही एक चांगली गोष्ट केली आहे. गावांलगत विलगीकरण केंद्रं उभी केली आहेत. गावकऱ्यांना त्या-त्या केंद्रात ठेवलं जातं.

-----

गावात पोहचल्यावर हे सातही जण अतिशय भावुक झाले होते, की काय सांगू! सगळे आनंदाने ओरडत होते. मी त्यांच्यासोबत होतोच. ते आंघोळ करायचे ते तळं, त्यांचं मंदिर, मक्याची शेतं, सगळं ते मला दाखवत होते. त्यांचं गाव फार सुंदर होतं. बस विलगीकरण केंद्राकडे निघाली तसे त्यांच्या घरचे लोक रडत पाठीमागे धावत होते. विलगीकरणापूर्वी ते अगदी थोडावेळ घरच्यांना भेटले. पण आता गावात परतल्यामुळे ते खूप निवांत झाले होते. मी आणि माझी टीम रात्री गावातच राहिलो. त्यांच्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो होतो. एकूण प्रवासाचा शेवट चांगला झाला. पण तसा तो होईल की नाही, याबद्दल पूर्ण प्रवासभर माझ्या मनात शंका होती. असे चालत-सायकलने निघालेले कित्येक मजूर रस्त्यातच कोसळले, मेले, अपघातांत सापडले, अशा बऱ्याच बातम्या मी वाचल्या होत्या. टाळेबंदीमुळे रस्त्यावर वाहतूक कमी होती, त्यामुळे ट्रक खूप वेगाने धावत होते. या मजुरांपैकी कुणीही अति थकल्याने खाली कोसळू नये, भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे त्यांच्या सायकलींचा तोल जाऊ नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होतो.

-----

ट्रकचालकाने लिफ्ट देऊन १०० किलोमीटर अंतर कमी केलं तेव्हा हे सातही जण खूप आनंदात होते. आम्ही रात्री एकत्र जेवलो. मग त्यांनी आम्हाला भोजपुरी गाणी म्हणून दाखवली. ती सुरेख रात्र मी कधीच विसरणार नाही. आणि शेवटी मी त्यांच्या गावातून निघालो, तेव्हा त्यांच्यापैकी तिघांना रडू आलं. आम्ही कायम एकमेकांच्या संपर्कात राहण्याचं ठरवलं आहे.

-----

मी या कामासाठी बाहेर पडलो तेव्हा मला याची उत्सुकता होती, की लोक असा कसा एवढा अचाट निर्णय घेतात? मला हे धाडसी लोक कोण आहेत हे पाहायचं होतं. त्यांचं जवळून निरीक्षण करायचं होतं. या प्रवासामुळे कष्टकऱ्यांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णतः बदलला आहे.




सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला रस्त्यात वाईट लोकांपेक्षा चांगले लोक जास्त भेटले. प्रवासाची आठवण म्हणून पोलिसांनी स्थलांतरितांना केलेली मारहाणच मी लक्षात ठेवणार का? नाही. त्या कामगारांकडून पंक्चरचे ३० रुपये घ्यायलाही नकार देणारा मनुष्य माझ्या कायम लक्षात राहील. एक मिठाई दुकानदार, त्यादिवशी फक्त चहा विकत होता, पण आमच्याबद्दल समजल्यावर त्याने आम्हाला सामोसे करून खायला दिले, तो माझ्या चांगला लक्षात राहील. आणि अर्थातच मोठा वैयक्तिक धोका पत्करून या सायकलस्वारांना ट्रकमधून न्यायला तयार झालेल्या ट्रक ड्रायव्हर्सना हॅट्स ऑफ! पोलिसांनी त्यांना पकडलं असतं तर त्यांना २०,००० रु दंड भरावा लागला असता. त्यांचे ट्रकसुद्धा जप्त केले गेले असते. तरीही त्यांना कामगारांची कथा समजल्यावर त्यांचं मन द्रवलं आणि ते धोका पत्करायला तयार झाले. या जगात वाईटापेक्षा चांगल्या गोष्टी अधिक आहेत, हेच खरं.


-विनोद कापरी 
(विनोद कापरी यांनी या प्रवासाबद्दलआऊटलूक’ 
साप्ताहिकाशी साधलेल्या संवादाचा हा संपादित भाग 
हॅलो महाराष्ट्र या वेबपोर्टलवर पूर्वप्रकाशित झाला आहे
तो वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल हॅलो महाराष्ट्रच्या 
टीमचे आभार. मुक्त अनुवाद - जयश्री देसाई)




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८