लॉकडाऊनमुळे कोरोना नष्ट होत नाही - डॉ. जयप्रकाश मुलियील




ज्यावेळी देशात कोरोनाचे ५०० रुग्ण होते, त्यावेळी कडकडीत लॉकडाऊन जाहीर झाला. आज रुग्णांची संख्या दीड लाखाच्या जवळपास चालली आहे. तेव्हा लॉकडाऊन उठवला जातो आहे. जनतेच्या मनात याबाबत अनेक प्रश्न आहेत. नामवंत साथतज्ज्ञ डॉ. जयप्रकाश मुलियील यांच्याशी बोलून त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं समजून घेण्याचा हा प्रयत्न






लॉकडाऊनमुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटेल आणि देशातून कोरोना नष्ट होईल? 

या समजाला काहीही वैज्ञानिक आधार नाही. देशात एकदा का संसर्ग सुरू झाला की केवळ लॉकडाऊनने तो नष्ट करता येणार नाही. मुळात याच्या संसर्गाची लक्षणे दिसून येत नाहीत. एका रुग्णामागे अनेक लक्षण नसलेले लोक असू शकतात. आणि ते या विषाणूचा प्रादूर्भाव करू शकतात. एक आठवडा लक्षणे आढळली नाहीत,अशा काळातच ते लागण करू शकतात. प्रसार अगदीच स्थानिक असेल तरच केवळ लॉकडाऊनचा उपयोग होईल. आता तो सर्वत्र पसरलेला आहे. आणि आपण बाहेर जाणे रोखू शकत नाही. दैनंदिन वस्तूंसाठी बाहेर जावेच लागते. त्यामुळे प्रसार शून्यावर आणणे जवळजवळ अशक्य आहे.


तपासणी का करायची?

कोव्हिडसारखी लक्षणे असलेले किती लोक आणि प्रत्यक्षात बाधित असलेले रुग्ण किती हे स्पष्ट समजावे यासाठी तपासण्या करायच्या. तथाकथित रुग्णास केवळ तशी लक्षणे आहेत की त्याला कोव्हिडची बाधा झाली आहे, हे समजण्यासाठी. तसं केलं की मग प्रत्यक्ष बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींविषयी काळजी घेता येते. त्याच्या कुटुंबातील सर्वच त्याच्या संपर्कात आलेले असतात. सध्या लक्षणं दिसत नसली तरी आज ना उद्या त्यांना बाधा होऊ शकते, हे गृहीत धरलं पाहिजे.

एखाद्या व्यक्तीत प्रतिकारक्षमता आहे का, ती किती आहे, हे तपासण्याचीही एक पद्धत आहे. त्याने रोगाचे निदान होत नाही. पण ती व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली की नाही, हे समजते. रक्तात lgG हा घटक विकसित झालेला असल्यास प्रतिकारक्षमता येते. या तपासणीने समाजातील किती लोकांना विषाणूची लागण होऊन गेली आणि ते प्रतिकारक्षम बनले, हे समजते. त्या संख्येनुसार रुग्णांचं प्रमाण कमी होते.

आज चिनी पद्धतीच्या तपासण्या होतात. भारतातील कित्येक प्रयोगशाळा अजून विकसित तपासण्यांच्या शोधात आहेत. पण बऱ्या वेळा लक्षणेच दिसत नसल्याने आपल्याला बाधा झाल्याचे कळत नाही. तपासणी केल्यावर किती प्रसार झाला, हे समजू शकतं. त्यावरून पुढे प्रतिकारक्षम व्यक्तींची संख्या समजू शकते.

मला स्वतःला विषाणूची बाधा होऊन गेली आहे आणि मी lgG पॉझिटिव्ह बनलो तर मला आनंदच होईल. कारण, त्यामुळे मला घरात कैदी बनून राहायची गरज नाही. मी कुठेही जाऊ शकतो, अगदी कोरोनाच्या रुग्णालाही बेलाशक भेटू शकतो. मला काहीच होणार नाही. कारण माझ्यात प्रतिकारक घटक तयार झालेले आहेत. गोवरासारखे. एकदा झाला की तो पुन्हा होत नाही. तेव्हा प्रतिकारशक्ती महत्त्वाची. तपासण्यातून याविषयी माहिती उपलब्ध होते. अशा खात्रीशीर तपासणीपद्धती भारतात विकसित होतील, याविषयी माझ्या मनात शंका नाही.


सामुदायिक प्रतिकारशक्ती म्हणजे काय?

२५ मार्चला भारतात ५०० रुग्ण होते, तेव्हापासून आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. आता रुग्णसंख्या एक लाखावर जाऊन पोहोचली असून तीन हजारहून जास्त दगावले आहेत. तेव्हा लॉकडाऊनमुळे प्रसार थांबला असे कसे म्हणता येईल? लॉकडाऊनमुळे प्रसार थांबत नाही, त्याच्या वेगाचा आलेख सपाट होतो. टाळेबंदी केली नसती तर तर या आलेखामध्ये आपल्याला उंचच्या उंच मनोरे दिसले असते. तो आलेख वर जाईल आणि तीन महिन्यांनी खाली येईल. लॉकडाऊनमुळे त्याची प्रसाराची गती मंद होते. लॉकडाऊन किती काळ केला यावरून तो मनोरा व्हायला तीन महिने लागतील की सहा लागतील की नऊ हे ठरेल. पण लागण होणाऱ्या एकूण संख्येत फरक पडणार नाही. अपेक्षित रुग्णसंख्या गाठेपर्यंत त्याचा प्रसार होतच राहणार. यालाच सामुदायिक प्रतिकारशक्ती, म्हणजेच हर्ड इम्युनिटी म्हणतात. ती गाठेपर्यंत प्रसार होतच राहणार. सर्वांनी एकाच वेळी आहारी पडायच्या ऐवजी आपण त्यांना आजारी पडण्यास सवड देतो! पण प्रसार चालूच असतो. त्यामुळे एकाच वेळी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांचे प्रमाण आपल्याला मर्यादित ठेवता येते. रोगाने अत्युच्च टोक गाठून तो खाली येईपर्यंत गंभीर रुग्णांचे प्रमाण एकच राहणार. पण सगळेच एका वेळी आजारी पडले नसल्याने रुग्णालयात फार गर्दी होणार नाही. लागणीचा काळ तीन महिने असला काय आणि सहा - हलक्या, तीव्र आणि गंभीर लागण झालेल्यांची संख्या दोन्ही काळात कायमच राहणार.

मृत्यूचे मोठे प्रमाण टाळून सामुदायिक प्रतिकारशक्ती गाठता येईल का?

माझ्या माहितीनुसार ८० टक्के मृत्यू ६० वर्षांच्या वरील व्यक्तींचे आहेत आणि असतील. तेव्हा ६० वरील वयोगटाची जास्त काळजी घ्यावी लागेल. सगळ्या देशाला बंद करून ठेवण्याऐवजी त्यांनी स्वतः घरातच राहायचे ठरवल्यास त्यांना लागण व्हायचं कारण नाही. त्यांना रुग्णालयात जावं लागणार नाही. जे आजारी पडतील त्यांना न्यावंच लागेल, पण किमान विनाकारण गर्दी होणार नाही. तरुण मंडळी कामासाठी बाहेर जातील आणि त्यांना लागण होईल. पण ती खूपच सौम्य असेल. काही गंभीर होतील, काहींचा मृत्यू होईल. पण हॉस्पिटल्सची सर्व सुविधा उपलब्ध असल्याने त्यांची जगण्याची शक्यता जास्त असेल.

ज्येष्ठांना काही त्याग करावा लागेल. त्यांना घरी राहावे लागेल. मुलाबाळांपासून चार हात लांब राहावे लागेल. आज आपण एका अतिशय मोठ्या संकटातून जात आहोत. त्यावर मात करण्यासाठी काही उपाययोजना तर केलीच पाहिजे. पण फार लोक मृत्युमुखी पडू देता आपल्याला सामुदायिक प्रतिकारशक्ती मिळवता येईल. मृत्यूचं प्रमाण कमीत कमी ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज तरी आपल्या देशात आपण ते कमी ठेवण्यात यश मिळवलं आहेच.

या विषाणूने सगळ्या जगालाच विळखा घातला आहे. तरुणांचं लोकसंख्येतलं जास्त प्रमाण हे भारताचं एकमेव शक्तिस्थान आहे. देशात ९२ टक्के लोक ६० वर्षांखालील आहेत. ते वयस्कांची काळजी घेऊ शकतात. एकदा का सामुदायिक प्रतिकारशक्ती गाठली की हे वयस्कही बाहेर पडून सामाजिक जीवनात सहभागी होऊ शकतात. हे इतके साधे आहे, यावर ऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही. मी त्यांच्या मताचा आदर करतो. पण मी आशावादी तर आहेच, पण माझा माझ्या विज्ञानाच्या आधारे हे मत मांडतो आहे.

सामुदायिक प्रतिकारशक्ती संपूर्ण समाजाचेच संरक्षक कवच असते. मी कित्येक विषाणूंच्या बाबतीत हे पाहिले आहे. लोकांना हे समजायला काहीसे अवघड जाते. प्रत्येक व्यक्तीला लागण होईल, तसतसा या विषाणूचा प्रादूर्भाव सपाट होत जातो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.


सामुदायिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी आवश्यक लागण किती?

युरोपच्या मानाने भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने सामुदायिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी किती जणांना लागण व्हावी लागेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण शहरात ६० टक्क्यांच्या आसपास लागण गृहीत धरता येईल.

केरळने संपर्क शोधण्यासाठी अतिशय आक्रमक मोहीम राबवली. आणि विषाणूचा प्रसार रोखण्यात महत्त्वाची कामगिरी केली. त्यांचे प्रयत्न अतिशय शिस्तबद्ध होते. त्यांनी जनतेचे सहकार्य घेतले. सरकार आणि जनता यांच्यात चांगला संवाद होता आणि आहे. वास्तवावर आधारीत मोहीम त्यांनी राबवली. अशा रोगराईत रुग्णांकडे पाहायचा दृष्टीकोन चांगला नसतो. केरळने अत्यंत आत्मीयतेने रुग्णांची काळजी घेतली. पण आता लॉकडाऊन काढल्यानंतर तिथे विषाणू परत येईल का, हा चिंता करायला लावणारा प्रश्न आहे. त्यामुळे केरळने देशातल्या इतर भागापासून अलग राहायला हवे. बाहेरून फार लोक राज्यात येऊ देता कामा नयेत.


लॉकडाऊनचे परिणाम आणि नंतर

लॉकडाऊनमुळे कष्टकरी-गरीबांना खूपच त्रास भोगावा लागला. पुरेशी सूचना देता केलेल्या लॉकडाऊनमुळे हे झाले. न्यू झीलंडमध्येही भारतासोबतच म्हणजे २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. पण त्यांच्या पंतप्रधानांनी तीन दिवसांची मुदत दिली होती. चारदोन तासांची मुदत दिल्यास दुकानात गर्दी होते आणि त्याने विषाणूच्या प्रसारास मदतच होते. लॉकडाऊन असूनही संख्या का वाढते आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचं कारण आपल्या भूमिकेत सातत्य नाही, हेही आहे. विषाणू नियंत्रणाबरोबरच लोकांच्या हालअपेष्टा वाढणार नाहीत, यावरही कटाक्ष असला पाहिजे.

लॉकडाऊन खुला केल्यानंतर रुग्णसंख्या वाढणार, याविषयी माझ्या मनात शंका नाही. त्यासाठी काही दिवस लागतील. सरकार त्याने बावरून जाणार नाही, अशी आशा करतो. ते अपेक्षितच आहे. लॉकडाऊनने रोग नष्ट केलेला नाही. त्याचे प्रमाण कमी होत जाईल, हे ध्यानात घेतले पाहिजे. गर्दी करू नका, अंतर ठेवा याबाबतीत जनतेचे शिक्षण केले पाहिजे. काही रुग्ण असणार, काहींना मृत्यू येणार. दोनतीन मृत्यू झाले की लॉकडाऊनची मागणी केली जाणार.

रुग्णालयात खाटांची संख्या वाढवली पाहिजे. तेथे जास्त गर्दी होणार नाही, याची तजवीज केली पाहिजे. खूप विचार करून त्याचे नियोजन केले पाहिजे. संध्याकाळी रुग्णसंख्या वाढली आणि लगेच लॉकडाऊन जाहीर केला, असे रुग्णालयांच्या व्यवस्थेबाबतीत करून चालणार नाही. नीट नियोजन हवे.

या सर्व प्रक्रियेत जनतेला सोबत घेतले पाहिजे. लॉकडाऊन काढले की साथ वाढलेली दिसणार. त्यावेळी ज्येष्ठांपर्यंत हा संदेश पोहोचवला पाहिजे की शिथीलता दिली असली तरी ती तुमच्यासाठी नाही. बाहेर जाऊ नका; कुटुंबातील इतरांपासून शक्य तितके लांब राहा.

काही केले तरी रुग्णांची संख्या शून्यावर येणार नाही. केरळमध्ये काही ठिकाणी शून्यावरून परत एखाददुसरा रुग्ण दिसला आहे. लक्षणं नसतानाही लागण असू शकते, हे ध्यानात घेणं महत्त्वाचं आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर काही काळाने लागण दिसू लागली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही.
या रोगाचं मार्गक्रमण ठरलेलं आहे. तो ६० टक्के लोकांना होणारच. त्यापैकी दोन अडीच टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागणार. त्यातील काहींचा मृत्यू होईल. या प्रक्रियेतून आपल्याला जावंच लागणार. लॉकडाऊन करा, किंवा कमी लोकांना बाहेर येऊ द्या,  विषाणू त्याचं काम करणार. त्यावर औषध आणि लस येईपर्यंत आपण त्या बाबतीत काहीच करू शकत नाही.

दरम्यानच्या काळात आपण डोकं ठिकणावर ठेवून देश वाचवला पाहिजे. सुमारे . टक्के लोक आपल्यातून गेलेले आपल्याला पाहावं लागेल. हा टक्का लहान दिसतो; पण आपण आपली लोकसंख्या मोठी असल्याने तो जास्त वाटतो. पण तसाही नैसर्गिक कारणांनी सुमारे दहा लाख लोकांना मृत्यू येतच असतो. लॉकडाऊनमुळे काही प्रमाणाक आळा घातला जाईल, हे खरं. पण एका खुरट्या घरात सहा-आठ जणांनी बाहेर जाता कसं राहायचं? तेव्हा लॉकडाऊन उठवून ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याने मृत्यूवर मात करायचा प्रयत्न केला पाहिजे.


सार्वजनिक आरोग्य व्यवस्था

आपण आपल्या जनतेच्या सुरक्षितततेच्या बाबत नेहमीच जागरूक असतो. त्यासाठीच संरक्षणावर इतका खर्च करत असतो. पण मृत्यू असाही येतो, हे आपण पाहात आहोत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी, तेथील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यासाठी या अनुभवातून शिकले पाहिजे. मुख्यतः शत्रू बाहेर नसून अशा विषाणूतच दडलेला असतो, हे ध्यानात घेतले पाहिजे.


भाषांतर: उदय नारकर
संपादक, जीवनमार्ग
(डॉ. जयप्रकाश मुलियिल हे देशातील एक नामवंत साथतज्ञ 
आहेतसरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक समितीवरही 
ते काम करत आहेतफ्रंटलाईनच्या -२२ मेच्या अंकात 
प्रकाशित झालेल्या त्यांच्या दीर्घ मुलाखतीचा संपादित अंश.)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८