गांधीजी आणि मी - उत्पल व. बा.




मी : मृत्यू. मृत्यूचा विचार केलाच पाहिजे.
गांधीजी : काय रे? काय झालं? आणि असं खिडकीतून बाहेर बघत का बोलतोयस?
मी : बाहेर पाहिलं की मृत्यू नाही दिसत तुम्हांला? असा पसरलेला जाणवत नाही?
गांधीजी : हं. अतीव शांततेमुळे?
मी : शांततेमागच्या कारणामुळे.
गांधीजी : राइट.
मी : माणूस श्रेष्ठ आहे असं तुम्हांला वाटतं? किंवा माणसाला तो श्रेष्ठ आहे असं मानून त्याला जगवण्याचा अट्टाहास केला पाहिजे असं वाटतं तुम्हांला? विशेषतः माणूस संकटकाळात जे वागतो ते पाहता?
गांधीजी : फिलॉसॉफिकल.
मी : आय थिंक एव्हरीथिंग इज फिलॉसॉफिकल.   
गांधीजी : तुला जर उद्या कोरोनाची बाधा झाली तर डॉक्टरांकडे जाशीलच ना?
मी : हो, जाईन. कारण जगण्याच्या इच्छेपायी मी मजबूर आहे.
गांधीजी : मग प्रश्न कुठे येतो?
मी : प्रश्न असा की जे झालं आहे ते स्वीकारणं अधिक सामर्थ्याचं आहे की कसं? सर्व्हाइव्ह व्हावं ही माझी आदिम प्रेरणा आहेच, पण मी, म्हणजे माझ्या प्रजातीनं, सर्व्हायव्हलला बेकार ताणलंय.
गांधीजी : आणि ते बरोबर आहे की चूक असा प्रश्न पडतोय तुला?
मी : कदाचित हो.
गांधीजी : पण आता हा प्रश्न गैरलागू नाही का?
मी : म्हणजे?
गांधीजी : म्हणजे मृत्यू हे वास्तव असलं तरी त्यावर विजय मिळवायचा प्रयत्न करत राहणं हेही एक वास्तवच आहे. आणि ते काही आजचं नाही. शेकडो वर्षांपासूनचं आहे.
मी : हं
गांधीजी : पण मृत्यूचा विचार केला पाहिजे हे मला मान्य आहे. सत्याग्रही तर मृत्यूसाठी तयार असतोच.
मी : आणि समोर हिटलर असेल तर मृत्यू अटळच असतो. म्हणजेच तुमचा पराभव अटळ असतो.
गांधीजी : पराभव?
मी : हो.
गांधीजी : मृत्यू म्हणजे पराभव? आत्मबल जागृत झालेला माणूस जर शोषित म्हणून जगण्यापेक्षा सत्याग्रहाच्या मार्गाने विरोध करत मरण पत्करत असेल तर तो पराभव कसा? तो मृत्यूची निवडच करतोय. पण शोषित म्हणून नव्हे. गुलामीतलं सर्व्हायवल नाकारणारा जागृत माणूस म्हणून. मग समोर हिटलर असो की अजून कुणी...
मी : नाऊ दॅट्स फिलॉसॉफिकल.
गांधीजी : नो. दॅट्स फिलॉसॉफी इन अ‍ॅक्शन.

..................


गांधीजी : इतक्या तावातावाने फोनवर कुणाशी बोलत होतास?
मी : कोण? मी?
गांधीजी : बरा आहेस ना? इथे दुसरं कोण आहे? तुझ्याशीच बोलतोय मी.
मी : हां, हो...ते मी एका मुलीशी बोलत होतो. 
गांधीजी : ओके. कशाबद्दल? नाही म्हणजे तू अधूनमधून चांगलाच एक्साइट होत होतास म्हणून विचारलं.
मी : काही नाही. विशेष काही नाही.
गांधीजी : ओह, डू यू नॉट वॉन्ट टू टॉक अबाउट इट?
मी : नाही नाही...तसं नाही.
गांधीजी :बरं. पण माहौल काही ठीक दिसत नाही.
मी : ती एक मैत्रीण आहे. सोशल मीडियावर रीसर्च प्रोजेक्ट चाललाय तिचा. तिला काही मुद्दे डिस्कस करायचे होते.
गांधीजी : तुझ्याबरोबर?
मी : तुम्हांला वाटतं तितका निकम्मा नाहीये बरं मी...
गांधीजी : चांगलंय की चांगलंय...झाली का मग चर्चा?
मी : हो
गांधीजी : काय निष्कर्ष काढलात?
मी : सोशल मीडिया हे कार्बोहायड्रेटसारखं झालंय बर्‍याचजणांसाठी. फार काळ लांब राहता येत नाही त्यापासून.
गांधीजी : ओके. आणि?
मी : आणि काय? नेहमीचं...मित्र जास्त जोडले की शत्रू जास्त निर्माण झाले, सामाजिक बंधुभाव वाढला किती आणि बिघडला किती वगैरे...
गांधीजी : हं. अँड द रोड अहेड?
मी : म्हणजे?
गांधीजी : म्हणजे विश्लेषण झालं. पुढे काय?
मी : पुढे काय? काही नाही. आम्हांला विश्लेषण चांगलं जमतं. तेवढंच करतो पुन्हा पुन्हा. गावाकडे लोक कशी शेती करतात, तशी आम्ही चर्चा करतो, विश्लेषण करतो.
गांधीजी : पण मग त्या न्यायाने विश्लेषणातूनही काहीतरी उगवत असणार ना.
मी : उगवतं ना... 
गांधीजी : काय?
मी : हेच की हे असंच चालणार. आपण काय करू शकत नाही फार.
गांधीजी : हे डेंजर आहे.
मी : हो.
गांधीजी : अरे, पण मग तुमची विश्लेषणाची जमीन तरी तपासून बघा.
मी : कशासाठी?
गांधीजी : म्हणजे ती नापीक झालीय का हे तरी कळेल.
तरी कळेल.

.............


गांधीजी : चेहरा भकास दिसतोय. ऑल ओके?
मी : काल रात्री उशीरा झोपलो. आणि झोपही नीट लागलीच नाही.
गांधीजी : काम करत होतास? की फेसबुक? कुणी वैचारिक एनकाऊंटर केलं की काय तुझं?
मी : तुम्ही हल्ली आधीपेक्षा जास्त टोचून बोलताय. हॅव यू नोटिस्ड इट?
गांधीजी : अलीकडे आधीपेक्षा जास्त आहारी गेला आहेस फेसबुकच्या. हॅव यू नोटिस्ड इट?
मी : हं...
गांधीजी : बरं, आता काय झालं ते सांग.
मी : तसं तुमचं निरीक्षण बरोबर आहे.
गांधीजी : देअर इट इज. फेसबुकनेच झोपेची माती केली ना?
मी : इन अ वे, हो.
गांधीजी : कुणाशी चर्चा चालली होती? कुणी हिंदुत्ववादी?
मी : येस! आणि एकदम घनघोर हिंदुत्ववादी...गोडसेवादी खरं तर. पण तुम्ही कसं ओळखलंत?
गांधीजी : वा! हे न ओळखायला तुला काय मी आज ओळ्खतोय?
मी : हां... ते आहेच.
गांधीजी : बरं तू कॉफी घेणार का?
मी : घेऊया की. पण काय हो...
गांधीजी : काय?
मी : तुम्ही मला चर्चेचा तपशील नाही विचारलात.
गांधीजी : कमाल करतोस.
मी : काय?
गांधीजी : अरे कॉफी कशी करायची ते मला माहीत आहे. त्यासाठी या तपशीलाची काय आवश्यकता?
मी : कळलं मला.
गांधीजी : काय कळलं?
मी : हाऊ नॉट टू स्पॉइल कॉफी.
गांधीजी : देअर यू आर...


-उत्पल व. बा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८