भाकरी नसेल तर कुकर केक खा! - मुकेश माचकर




लॉकडाऊनमुळे जेव्हा देशातला कष्टकरी होरपळला जात होता
अन्न-पाणी-पैशाविना मैलोनमैलचालत 'आपल्या घरी पोहचण्याच्या धडपडीत होता
तेव्हा आपला मध्यमवर्ग खाण्या-पिण्याची मौज करण्यात मश्गुल होता
ब्रेड नसेल तर केक खा म्हणणाऱ्या फ्रान्सच्या राणीचेच आपण वंशज आहोत की काय?


नमस्कार,

मी शुगरा 'स्वयंपाक विथ शुगरा' या आपल्या चॅनेलवर तुमचं स्वागत करते आहे अं अं अं चॅनेल बदलू नका हे तुमचं लाडकं 'स्वयंपाक विथ शर्करा' चॅनेलच आहे आणि मी तुमची आवडती होम शेफ शेफ शर्कराच आहे, पण आपल्या या चॅनेलला आता यल्लम्मा शुगर कंपनीची स्पॉन्सरशिप मिळाली आहे त्यामुळे आता चॅनेलचं नाव बदलून स्वयंपाक विथ शुगराअसं झालेलं आहे आणि अर्थातच इथून पुढे माझं नामकरणही शुगरा असं झालेलं आहे (त्यांनी यल्लम्मा नाव ठेवण्याचा आग्रह धरला नाही हे नशीब, असं कॅमेऱ्यामागून शुगरादेवींचे पतीदेव म्हणतात, शुगरा त्यावर हसते, लाडिक रागावते) लॉकडाऊनमध्ये सगळ्या उद्योग-व्यवसायांवर मंदीचं सावट असताना आपल्या चॅनेलला तुमचा जो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, त्यामुळेच आपल्या चॅनेलला इतकी मोठी स्पॉन्सरशिप मिळाली आहे आणि लग्नानंतर दहा वर्षांनी मला नाव बदलण्याची संधीही मिळाली आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खूप मनापासून आभार

आणि हो, आजचा हा कार्यक्रम लाइव्ह आहे बरं का चला तर मग वळूयात 'स्वयंपाक विथ शुगरा लाइव्हमध्ये आजच्या रेसिपीकडे ही रेसिपी आहे कुकर केकची. तुम्ही म्हणाला शर्करा आय मीन शुगरा, कुकर केक फार जुना झाला आता, आम्ही खूप वर्षं बनवतोय कुकर केक. चॅनेलवरची तुझी रेसिपीच पाच वर्षांपूर्वीची आहे. तीच पाहून शिकलो की आम्ही कुकर केक अगदी बरोबर आहे तुमचं, पण हा कुकर केक लॉकडाऊन स्पेशल कुकर केक आहे टाळेबंदीच्या काळात तुमच्या घरातलं बरंचसं सामान संपलेलं असेल, किराणा माल पुरेसा मिळत नसेल, खाली उतरणं शक्य नसेल, पण केक खाण्याची तीव्र इच्छा मनात दाटली असेल. अशा वेळी हा केक तुमच्या शुगर क्रेव्हिंग्जची शांती करायला फार उपयोगी आहे. तुमच्याकडे अंडी नसतील, हरकत नाही, यीस्ट नसेल तरी हरकत नाही, ओव्हन नसेल, तरी नो प्रॉब्लेम, केक तो बनेगाही बनेगा! बायदवे, मी लॉकडाऊन स्पेशल रेसिपीजमध्ये नुकतीच पीठ आंबवता, खायचा सोडा वापरता झटपट ढोकळा बनवण्याची रेसिपीही शेअर केली आहे, ती तुम्ही पाहिलीत का? आणि फक्त केळी आणि चॉकलेटचे तुकडे वापरून हेल्दी बनाना आइस्क्रीम बनवलंय, तो व्हिडिओही पाहायला विसरू नका. मुळात माझे नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ असे मिस करायचे नसतील तर आपलं हे चॅनेल तुम्ही आताच सबस्क्राइब करा आणि शेजारचा बेल आयकन म्हणजे घंटीचं बटणही दाबा. म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन अगदी ताबडतोब मिळेल.

चला तर मग वळूयात आजच्या या रेसिपीकडे. आधी आपण एकीकडे कुकर तापायला ठेवू या. ओव्हन प्री हीट करतात ना, तसाच. प्रेक्षकहो, लॉकडाऊनचा काळ जसजसा वाढत चाललाय तसतसा तुमच्यापुढे रोज काय करायचं, घरातल्यांना काय नवा पदार्थ करून वाढायचा, असा प्रश्न निर्माण होतोय. सेम तोच प्रश्न मला, आमच्या टीमलाही पडतो. तुम्हा सर्वांना कमीत कमी साहित्यात चमचमीत रेसिपीज बनवायला शिकवणं हे आमच्यासाठीही चॅलेंजच आहे. कारण, आमच्याकडेही किराणा, भाज्या मर्यादित प्रमाणातच उपलब्ध आहेत. त्यामुळे मी लवकरच बिनाअंड्याची बुर्जी, बिना कांद्याची कांदाभजी आणि विना आंब्याचा आमरसही बनवून दाखवेन, असं आमचे हे मला गमतीत म्हणतात. मी त्यांचं हे चॅलेंज स्वीकारलंय. लवकरच मी फ्रीजमध्ये ठेवताही गारेगार आइस्क्रीम कशी बनवायची, याचीही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे.

आपला कुकर आता चांगला तापला आहे. आता आपण केकचं बॅटर बनवायला घेऊ या. आधी घ्यायचं आहे दही. मग मैदा. मी नेहमी सांगते तसा तो चाळून घ्यायचा कायम. शिवाय आपल्याला लागणार आहे तीन चमचे साखर
अरे हो, एक सांगायला विसरलेच. आजच्या लाइव्ह शोमध्ये आम्ही एक आणखी विशेष उपक्रम राबवायचं ठरवलंय. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही व्हॉट्सअॅप कॉल करायचा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारायचे, मी ही रेसिपी बनवताना तुमच्या प्रश्नांची लाइव्ह उत्तरं देणार आहे हा नंबर आपल्या मित्रांच्या, फॅमिलीच्या ग्रूप्समध्ये फॉरवर्ड करायलाही हरकत नाही, जेणेकरून त्या सगळ्यांनाही आपल्या या रेसिपीचा आनंद लुटता येईल कॉल करणार्यांमधून काही भाग्यवान विजेत्याची निवड करण्यात येणार असून त्यांना लॉकडाऊन संपल्यावर यल्लम्मा शुगरकडून पाच किलो साखरेच्या पिशव्या भेट मिळणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन रेसिपीसारख्या या विनासाखरेच्या रिकाम्या पिशव्या नसतील, त्यांच्यात साखर असेल पाच किलो! (मनसोक्त हसते)

चला तर मग वळू या आपल्या आजच्या रेसिपीकडे आणि वाट पाहू या पहिल्या कॉलरच्या फोनची.
मैद्याच्या गुठळ्या होऊ देता आपल्याला तो नीट मिक्स करून घ्यायचा आहे. रेसिपीतल्या सगळ्या घटकांचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर वाचता येईल, त्यामुळे आता फक्त रेसिपीच्या स्टेप्स समजून घ्या

(फोनघंटीचा आवाज. स्क्रीनवर प्रतिमा उमटते. एक कॉलेजवयीन मुलगा दिसतो.)

मुलगा : नमस्कार शर्कराताई
नमस्कार, पण, यापुढे ही स्पॉन्सरशिप सुरू आहे तोपर्यंत शुगरा म्हणायचं बरं का बेटा मला
मुलगा : ओह सॉरी, लक्षात नाही राहिलं मी तुमच्या रेसिपीज पाहून स्वयंपाक करायला शिकलो आहे
अरे वा, किती छान!
मुलगा : आताच फॅमिली ग्रूपवर तुमचा फोन नंबर आला लगेच फोन केला आज मी चिंचगुळाची आमटी बनवतोय नेमकं आता लक्षात आलं की घरातली चिंचच संपली आहे, बाकीची सगळी तयारी झाली आहे. आता मी काय करायला हवं?
अरे, अगदी सोपं आहे, घरात कोकमं असतील तर ती चिंचेप्रमाणेच भिजत घालून वापर आमटीत. तीही नसतील तर टोमॅटो वापर आणि तेही नसतील तर आमचूर आहे का ते पाहा आणि काहीच नसेल तर नेहमीसारखी आमटी करून गॅस बंद केल्यावर तिच्यात लिंबू पीळ.
मुलगा : थँक यू शुगराताई
माझं नवं नाव लक्षात ठेवल्याबद्दल तुझेही आभार.

(फोन कट होतो.)

आता वळूयात आपल्या रेसिपीकडे. आधी आपण दही आणि साखर मिक्स करून घेणार आहोत, त्यात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. मग मैदा टाकायचाय. तोही मिक्स करून घ्यायचाय. दोन चमचे तेलही टाकायचंय यात. आता त्यात पाव टीस्पून बेकिंग सोडा, पाव टीस्पून बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे इसेन्स तुमच्याकडे नसला, तरी काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही सुगंधी पदार्थ किंवा अर्क वापरू शकता, तुम्हीच खाणार आहात, त्यामुळे वेलची किंवा दालचिनीचाही सुगंधापुरता वापर करू शकता

(फोनघंटी वाजते. स्क्रीनवर एका गरीब स्त्रीचा चेहरा दिसतो)

हां बोला ताई?
ताई : इधर खाना मिलतै क्या?
खाना मिलता नहीं, खाना बनाने कू सिखाती है मै तुम्हाला कुणी नंबर दिला हा?
ताई : मेरे मरद के फोन पे ये नंबर आया, कुछ खाने का नंबर है बोला भेजनेवाला आमच्याकडं दोन दिवसांपासून काहीच खायाला नही ताई तुम कुच मदद कर सकती क्या? दो दिन से बच्चे भूखे है मेरे
अहो, मला तुमची परिस्थिती समजू शकते, पण हा चॅनेल रेसिपीचा चॅनेल आहे, इथे मी वेगवेगळे पदार्थ शिकवते बनवायला आता लॉकडाऊनच्या काळात लोकांकडे किराणासामान नाहीये, भाज्या नाहीयेत, मग कमीत कमी साहित्यातून रेसिपी बनवायला शिकवतेय मी
ताई : ऐसा क्या, भौत अच्छा काम है माझ्याकडंबी ह्यातलं काहीच नहीये मेरे कू भी सिखाओ ना
हो हो, तुम्हीही शिका ना, कुकर केक शिकवतेय मी कुकर आहे ना तुमच्याकडे?
ताई : कुकर तो है, लेकिन दालचावल काहीच नाहीये
(हसून) काही हरकत नाही. आपल्याला केक बनवायचाय त्यामुळे डाळ-तांदळाची गरजच नाही.
ताई : (डोळे विस्फारून) तो ऐसे कुकर में अपने आप बन जाता है क्या केक?
नाही हो, तुमच्याकडे साखर असली पाहिजे, मैदा असला पाहिजे, दही असलं पाहिजे
ताई : इत्ता सब रैता तो कमसे कम चाय तो बनाके पीते हमलोगा ह्ये सगळं काही नाही ताई
अहो मग तुमच्याकडे आहे तरी काय?
ताई : पानी है, मसाला है, नमक है, बाकी कांदा, बटाटा, आटा, तेल वगैरे काही नाही ताई
अरे बापरे, व्हेरी सॉरी, पण मग तुम्ही कुकर केक कसा बनवू शकणार तुमच्याकडे यीस्ट नाही, मी समजू शकते, तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल, मी समजू शकते, तुमच्याकडे ओव्हन नसेल, हेही मी समजू शकते. पण तुमच्याकडे मैदा नाही, दही नाही, तर मग कुकर केक कसा बनवता येईल तुम्हाला? तुम्ही दोन मिनिटं होल्डवर राहाल का प्लीज.

(हसून प्रेक्षकांकडे वळून

प्रेक्षकहो, आपल्या चॅनेलची लोकप्रियता किती आहे ते पाहिलंत ना? ज्यांच्याकडे भरपूर किराणा आहे, भाजीपाला आहे, चिकन-मटण मिळतंय, ते आपल्या चॅनेलवरून जुन्या रेसिपी शोधून काढून लॉकडाऊनची पिकनिक साजरी करतायत रोज नवनवीन रेसिपी बनवतायत आणि मला त्यांचे फोटो पाठवतायत दे आर हॅविंग सो मच फन इन ट्रबल्ड टाइम्स ज्यांच्याकडे किराणा कमी आहे, ते लॉकडाऊन रेसिपी पाहून कमी साहित्यात त्या बनवतायत आपण लॉकडाऊनमध्ये अडकलो आहोत, उद्या काय होणार हे माहिती नाही, नोकऱ्या जातायत, रोजगार जातायत, पगार कापले जातायत, हा काळ परीक्षा पाहणारा आहे, कठीण आहे अशावेळी वेगवेगळ्या रेसिपी बनवून आपण मनाला काहीतरी विरंगुळा देताय, आपलं मानसिक स्वास्थ्य कायम राखताय, हे फार कौतुकास्पद आहे. कारण, प्रतिकारशक्ती टिकवून ठेवायची असेल तर मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणं फार आवश्यक आहे आणि आज या ताईंच्या फोनमुळे आपण हेही पाहतोय की ज्यांच्याकडे कसलाच शिधा उरलेला नाही, ज्यांच्या पोटात दोन दिवसांपासून अन्नाचा कणही गेलेला नाही, त्यांनाही आपल्या चॅनेलवर यावंसं वाटतंय फक्त पाणी, मीठ आणि मसाल्यांतून काही बनवता येतं का, हे जाणून घेण्यासाठी त्यांना आपल्याच चॅनेलचा आधार वाटतोय काय म्हणावं या प्रेमाला आणि विश्वासाला मी नतमस्तक आहे तुमच्यासमोर या तुमच्या प्रेमाने आणि विश्वासानेच आपलं चॅनेल मराठीतलं नंबर वन यूट्यूब रेसिपी चॅनेल बनलंय

(पुन्हा फोनवरच्या ताईंकडे वळून)

ताई, तुमच्यासाठी आत्ता तरी माझ्याकडे काही रेसिपी नाही. पण, मी तुम्हाला वचन देते, पाण्यात मीठमसाला कालवून बिनातेलाची फोडणी कशी देतात आणि विनाकणकेच्या चपात्या बनवून त्यांच्याशी ते कसं खाता येतं, याचा शोध मी नक्की घेईन आणि तुमच्यासाठी ती रेसिपी लवकरात लवकर नक्की बनवून दाखवेन. मात्र, ती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राइब करून कोपर्यातलं घंटीचं बटण दाबायला विसरू नका. आपल्या या चॅनेलवर कॉल केलात त्याबद्दल धन्यवाद. आजच्या भाग्यवान कॉलर्समध्ये तुमची निवड झाली तर पाच किलो साखर तुमच्याकडे नक्की पोहोचेल. त्यानंतर तुम्ही हिस्टरीमध्ये जाऊन आजची ही कुकर केकची रेसिपी शोधून काढा आणि ती नक्की ट्राय करा, कशी झाली ते मला आवर्जून कळवा. धन्यवाद.

(फोन कट करण्याची खूण करते, हुश्श असा सुस्कारा सोडते आणि पुढच्या रेसिपीकडे वळते)
-मुकेश माचकर
mamnji@gmail.com


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८