जनहीत पत्रकारितेला टाळं? - जयदेव डोळे
प्रातिनिधिक चित्र |
आपत्तीचा काळ जसा सरकारची आणि समाजाची परीक्षा बघतो, तशीच पत्रकारितेचीही. या आपत्काळातून समाज सुखरूप पार व्हावा यासाठी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचं काम पत्रकारितेने करणं अपेक्षित असतं. टाळेबंदी काळात प्रत्यक्षात काय दिसलं?
२३ मेची संध्याकाळ. जगाकडे नीट बघायला सांगणारी एक मराठी वृत्तवाहिनी ‘मराठी वार्ताविश्वात प्रथमच’ असा दावा करणारी एक बातमी दाखवतेय. एक बहाद्दूर बातमीदार कोरोनायुद्धात योद्धे कसे काम करतात ते दाखवायला थेट कोरोना वॉर्डात जायच्या तयारीला लागलाय. एका इस्पितळात त्याला या लढाईतली कवचादी आवरणं चढवली जाताहेत. आधी पायात, मग अंगावर, मग डोक्यावर. कडेकोट बंदोबस्त करून काही डॉक्टरांच्या सोबतीने तो त्या वॉर्डात धावतं वर्णन करत निघालाय. त्याचा कॅमेरा, कॅमेरामन, माईक यांनासुद्धा कवच पांघरलंय. एकेका रुग्णापाशी जाऊन हा बहाद्दूर योद्धा, ‘कोठून आलात? कसं वाटतंय? कधी बाधा झाली? उपचार अन् व्यवस्था बरीय ना?’, असे प्रश्न विचारतोय. रुग्णांची ओळख पटू नये म्हणून त्यांचे चेहरे धूसर केले जाताहेत. तेवढ्यात आपला कोरोनायोद्धा एका तरुणाकडे ‘काय बाळा!’ असे वात्सल्ययुक्त उद्गार काढत पोचतोय आणि जुन्या सवयीनुसार त्याचं नाव विचारतोय. तेही बिचारा नाव सांगतोय! संपादन करणारी तंत्रज्ञ मंडळी या ज्येष्ठाची बातमी संपादित कशी करायची या पेचात पडून ती प्रक्षेपितही करताहेत. डॉक्टर्स, परिचारिका, सेवक यांनाही बोलतं करून हा बहाद्दूर आपला परिचय देऊन वॉर्डातून बाहेर पडतोय. ‘बहुधा प्रथमच’ असं सावधपणे वार्तांकनाचं वर्णन करून ही बहाद्दुरी तो एकदाची संपवतोय. काही मिनिटांच्या माहितीसाठी या बहाद्दराने, त्याच्या कॅमेरामनने आणि कदाचित त्याच्यासोबत माहिती देणाऱ्या डॉक्टर्सनीही वापरलेली पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स टाकून द्यावी लागली असणार. या किटची टंचाई आहे, हे खरं. पण बातमीच्या साहसासाठी तेवढा त्याग नको का करायला?
या बातमीत केवढा थरार, केवढं साहस आहे, असं बातमी दाखवताना या वृत्तवाहिनीला वाटत होतं. पण प्रत्यक्षात एखाद्या संग्रहालयात जाताना आतली गंमत प्रथमच दाखवायला मिळत असल्याच्या अत्यंत गांभीर्यशून्य, थिल्लर व उल्लू आविर्भावात हा सारा वार्तांकनाचा थाट पार पडला. अडकून पडलेल्या कामगारांसाठी रेल्वे सोडल्या जाणार अशी बातमी देतानाचा ‘सर्वप्रथम आम्हीच’चा अहंकारही तसाच.
आपल्या बातम्यांचा प्रेक्षक वाढावा अन् आपल्या नाविन्यपूर्ण पद्धतीची वाहवा व्हावी म्हणून बातमीदारांना विचित्र वेषांतरं करायला लावणारी पत्रकारिता गेल्या काही वर्षांत बोकाळलीय. तिचाच हा नमुना. हास्यास्पद अन् केविलवाणा! मूळ प्रश्न असा की आजकाल पत्रकारांना साधी-सरळ समाजाच्या जिव्हाळ्याची, कोणताही छुपा अजेंडा नसलेली, माहितीपूर्ण खरीखुरी पत्रकारिता करताच येईनाशी झाली आहे का?
पत्रकारितेची कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर अशी दुभागणी केली तर काय दिसतं? २४ मार्च २०२० पूर्वी ‘इंडियन एक्स्प्रेस’ सोडता चार वृत्तपत्रं प्रत्येकी सात मिनिटांत वाचून संपायची. आताच्या कोरोनाग्रस्त वर्तमानात ती त्याहीपेक्षा कमी वेळेत वाचून संपतात. कारण मजकुराचा नीरसपणा व प्रचारकी आशयाचा भडिमार. मध्यंतरी सरकार स्थापन होणं, जाणं, पुन्हा वेगळं सरकार सत्तारुढ होणं, हा जरासा रोमांचकारी घटितांचा क्रम अंगावर चालून आला, तेवढाच काय तो विरंगुळा. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! या सत्तांतरांचं वार्तांकन माझा एक पत्रकार विद्यार्थी सुधीर सूर्यवंशी याने त्याच्या बेरोजगारीच्या अवस्थेत (त्याचं इंग्रजी वृत्तपत्र तोटा होऊ लागल्याने पाडव्याला बंद पडलं.) एक न्यूजपोर्टल चालवून केलं, तसं एकाही वाहिनीने व वृत्तपत्राने केलं नाही. का? एक तर त्याचा काही अजेंडा नव्हता; दुसरं, तो आता स्वतंत्र, स्वायत्त अन् स्वाभिमानी पत्रकार होता. त्या घडामोडीवरचं त्याचं पुस्तक डिजिटल रूपात बाजारात दाखल झालंय. त्यातून समजतंय, की हे आपण वाचत आलेल्या पाच-सहा वृत्तपत्रांनी आणि ढिगभर वाहिन्यांनी कसं काय नाही सांगितलं?
कोरोनापूर्व व कोरोनोत्तर अशी दुभागणी करता करता मूळच्या विभाजनाकडे बोट करावंच लागेल. भाजप-मोदी-संघनिष्ठ माध्यमं आणि तशी नसलेली माध्यमं हे ते विभाजन. ‘कळविण्यास अत्यंत वाईट वाटते की...’ अशी सुरुवात करणंही आता शिळं वाटतं इतकी ही दुभागणी गेली पाच वर्षं अंगवळणी पडलीय. ‘फाळणीनंतरचे सर्वांत मोठे स्थलांतर’ असं वर्णन मोठ्या दिमाखात करणाऱ्यांना मे महिन्याची एक तारीख उजाडायला लागावी ते समजायला? ‘सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग!’ हा माझा या स्थलांतरितांच्या लोंढ्यांवरचा लेख ३१ मार्च रोजी कोलाज डॉट इन या मंचावर उमटला. मी काही हिंडता फिरता पत्रकार नाही. (लेखासोबत बसेसना लगडून जाणाऱ्या श्रमिकांचं छायाचित्रही संपादकांनी उमटवलं.) मात्र तमाम वाहिन्यांना या श्रमिकांविषयी पुळका कधी आला? कोरोनाच्या त्याच त्या बातम्या देऊन कंटाळा आल्यावर मे दिन साजरा न होताच देशभर असा श्रमिकांचा फैलाव होऊ लागला, तेव्हा. हा विषाणूचा फैलाव तर होताच, विषमतेचा फैलाव पाहून प्रक्षोभ होऊ नये म्हणून त्यांच्या वार्ता दिल्या जाऊ लागल्या; असा संशय का नाही घ्यायचा? आजकाल पत्रकारांना शंका, संशय येत नाही. प्रेक्षक अन् वाचक हेच फार शंकेखोर संशयी बनलेत. पत्रकारिता सत्तेला प्रश्न विचारायचं काम करते हा प्राचीन समज अजून अमेरिकेत रूढ आहे. भारताने मात्र असे अंधसमज २०१४ पासूनच्या काळात कायमचे टाकून दिले. कारण ‘हे काय, चारच तासांची लॉकडाऊनसाठीची मुदत?’ असा हडसून खडसून विचारायचा प्रश्न पत्रकारांच्याच डोक्यात आला नाही, मग वाचकांच्या अन् प्रेक्षकांच्या डोक्यात कसा येईल? एककल्ली नेतृत्व, विचारविनिमयाचा संस्कार नाही, अहंकार व घमेंडखोरी यांनी बरबटलेली कार्यशैली आणि सत्ता आलीय म्हणजे शहाणपणही आलं, असा सर्वज्ञतेचा भास गेली पाच-सहा वर्षं पत्रकारांना प्रश्नच पडू देत नाहीय. ‘हे आमचं असंय, घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर फुटा’ असा तिचा तुच्छतावाद आहे. पत्रकार असा आयतं काही घेत नसतो. प्राचीन काळी भारतीय पत्रकार पडताळणी, खातरजमा, शहानिशा, खरेखोटे असं बरंच काही करायचे. मगच हाती आलेली माहिती लोकांपर्यंत जाऊ द्यायचे. आता ट्विटर अन् यु ट्यूब आदी उडते गालीचे माहिती अथवा मत घेऊन लोकांपर्यंत थेट जातात. पत्रकारांना पार बेदखल करून टाकलंय त्यांनी!
दुर्घटना, दुराचार, दुर्व्यहार यांत पत्रकारांना बातमी दिसते. सुघटितांमध्ये काही सांगण्यासारखं नसतं. तो तर जीवनक्रम. तो भंगतो तेव्हा बातमी होते. हा अर्थातच प्राचीन व मध्ययुगीन काळाचा नियम. २०१४ पासून आरंभलेल्या नवनिर्माण युगात ‘पॉझिटिव्ह’ घटनाक्रमांवर भर देत जावा अशी प्रेमळ दटावणी माध्यमांच्या मालकांना मिळू लागली. साहजिकच कोव्हिड-१९ मध्ये पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण खूप असल्याने पत्रकारांनी त्यात रुची घेतली. पाहता पाहता वृत्तपत्रांचं प्रत्येक पृष्ठ कोरोनामय होऊन गेलं आणि वृत्तवाहिन्यांचं प्रत्येक मिनिट कोरोनासंपन्न. बातमीदारांनी साचे तयार केले : आरोग्य खातं, आरोग्यमंत्री, सरकारी दवाखाने, रुग्ण, उपचार, फवारण्या, शुद्धीकरण, तोंडपट्ट्या, देह से दूरी, घरात राहण्याची सक्ती, या सक्तीचा भंग, त्याची छायाचित्रं, बाजारातील गर्दी, दुकानांपुढे रांगा, डॉक्टरांचे सल्ले, नोकरशाहांचे आदेश, असं फिरून फिरून तेच ते.
आपली पत्रकारिता किती घटनाकेंद्री आहे अन् घडामोडींवाचून तिचं पानही हलत नाही हे या तीन महिन्यांत स्पष्ट झालं. पत्रकारांनाही घटना, घडामोडी रुचतात. त्यात विचार, विश्लेषण, मीमांसा यांना जागा नसते. त्यामुळे डोक्याला तापही नसतो. घटना व प्रसंग यासह त्यांच्या प्रक्रियाही महत्त्वाच्या असतात याचा विसर बहुतेक पत्रकार-बातमीदार यांना पडलेला आहे. का आणि कसं या प्रश्नांनी प्रक्रियांच्या किल्ल्या सापडतात. कित्येक गुपितं व रहस्यं उकलली जातात. परंतु अवघी मराठी पत्रकारिता इकडची तिकडची प्रतिबिंबं दाखवणारे आरसे होऊन गेली. सरकारी घोषणा, नेत्यांची भाषणं, नोकरशहांची लहर यांची प्रतिध्वनी बनून गेली. सरकारी बोटाला धरून चालू लागली. स्वतंत्र मतं आणि स्वयंशोधित वार्ता यांचं अचूक विलगीकरण केलं गेलं. घरात राहण्याची सक्ती करणारी आवाहनं छापताना दाटीवाटीच्या वस्त्यांत अन् शहरांच्या जुन्या भागात राहणारी माणसं त्याचं पालन कसं करतील याचा प्रश्न कोणाही बातमीदाराला मार्च व एप्रिलच्या १५ दिवसांत पडला नाही. माणसं रस्त्यांवर का दिसताहेत आणि वाहनं का पळवत आहेत याची मीमांसा त्यांनी बेफिकिरी, बेशिस्त अशी केली. त्यासाठी गैरवर्तनाच्या काही बातम्याही छापल्या. रोज कमाई करणाऱ्यांच्या घरात किती दिवसांचा किराणा असतो याची सरासरी कोणीही देऊ शकलं नाही. घराघरांमधून मतदार आणायची जबाबदारी असलेले ते पन्नास प्रमुख आणि बूथ प्रमुख यावेळी कसे अदृश्य झाले हाही सवाल कुठे ऐकू आला नाही. कसा येईल? नोकरी नसती का गेली!
बातम्यांचाही संसर्ग असतो. त्यानुसार जंतुनाशकं फवारणारी डोकेबाज निर्मिती एका पाठोपाठ सचित्र अवतरली. मग व्हेंटिलेटर्सच्या बातम्यांची लांबण लागली. मग पीपीई किट, एन् नाईण्टी फाईव्ह तोंडपट्टी, सॅनिटायझर्स, अलगीकरण कक्ष; मग कोरोना वॉरिअर्सची युद्धसदृश्य कवतिकं आणि शेवटी संख्या, संख्या आणि संख्या यांनी फुगत चाललेली इस्पितळं! आमच्या औरंगाबादेत तर सुरुवातीचे १५ दिवस ‘सारी’ या फुफ्फुसांच्या एका अनावस्थेचेच रुग्ण खूप वाढल्याच्या बातम्या सर्वांनी दिल्या. लक्षणं सारखी अन् उपचारही तेच. या ‘सारी’चा पदर एकाएकी आखडला. आता तो लुप्त झालाय. कोव्हिड-१९ने असं काही गूढ आव्हान दिलं, की आरोग्यवार्ता हाताळणार्या चार तरुण बातमीदारांनी थेट वॉर्डात जाऊन रुग्णसेवेच्या बातम्या देणं चढाओढीने सुरू केलं. त्यातला एक त्याच्या आईसह बाधित निघाला. उरलेले चाचणी देऊन नाबाधित निघाले आणि घरातून वार्तांकन करू लागले. माझे विद्यार्थी असल्यामुळे दोघांना मी रागे भरलं व ताळ्यावर आणलं. तरीही हे वार्तांकन पराक्रम, साहस, जोखीम यांत गणलं जातंय हे आणखी धोकादायक. म्हणजे कोरोनापूर्व काळात अशी जोखीम घेऊन कोणी ना सरकारी कारभार चिवडला, ना कोण्या अधिकार्याची कुलंगडी बाहेर काढली. सारे निवांत, सहकारी तत्त्वावर आणि आपापल्या हितसंबंधांचं वार्तांकन करत होते. कोरोनापूर्व काळातलं माध्यमांमधलं ‘देवेन्द्रदल’ आजही कार्यरत आहे. इतकी निष्ठा, इतका बटबटीत पक्षपात पत्रकारितेने कधीही नव्हता बघितला. मान्य आहे, की २०१८ पासून मंदी, महागाई आणि बेकारी यांनी वैतागलेला समाज माध्यमांत काय घडतंय ते जाणू इच्छिणार नाही. पगारकपात, मनुष्यबळ कपात, खर्चात कपात अशा वातावरणात कोणता पत्रकार मालक वा संपादक यांना ओलांडून सरकारला अडचणीत आणणारं वार्तांकन करेल? पण हा झाला अर्थव्यवस्थेचा परिणाम. केवळ राजकीय दबाव आणि मुस्कटदाबी यातून गेली सहा वर्षं मराठी पत्रकारिता जी कोमेजली, कुजली ती पुन्हा कोरोनातून कशी फुलून येईल? संकटांतून संधी साधणाऱ्या मानवसमूहात कष्टकरी, श्रमिक मोडत नसतो. पत्रकार एक श्रमिक. तो आधीच बेजार झालेला. त्यात हे विषाणूचं वार्तांकन. सत्ताधाऱ्यांना आपलं यश आणि आशावाद फुलवून हवा होता. माध्यमांना आपली कातडी वाचवायची होती. मधल्या मध्ये पत्रकार बिचारा वर्तमानाची फोटोकॉपी करत राहिला. झापडं लावलेल्या (टांग्याच्या) घोड्यासारखी त्याची धाव राहिली. खोलात शिरायचं नाही की आडव्यात जायचं नाही! वाकड्या बोटाने तूप काढायची म्हण इतिहासजमा झाली. आता तूप गरम व पातळ स्थितीत समोर येत राहतं. हवं तेवढं ताटात ओतून घ्यायचं.
मोदींवर टीका करायची, पण फडणवीसांना झाकायचं. सरकारवर झोड उठवायची, पण भाजपबद्दल एकही वाक्य उच्चारायचं नाही. प्रशासकीय बेजबाबदारपणा मांडायचा, मात्र खाजगीकरणाचं धोरण तपासायचं नाही. भ्रष्टाचार फक्त काँग्रेस पक्षच करतो असं पसरवायचं आणि विकासाचं प्रत्येक सरकारी काम राष्ट्रसेवेचं प्रतीक म्हणून सादर करायचं. याला पत्रकारिता म्हणतात का?
बहुतेक मराठी वृत्तपत्रं व वृत्तवाहिन्या यांत कामगार वार्ताक्षेत्र, औद्योगिक वार्ताक्षेत्र नाही आणि त्यासाठी स्वतंत्र बातमीदारही नाहीत. त्यामुळे असंघटित कामगार असतो कुठे, कसा, किती कमावतो व राहतो कसा याची खबरच कोणाला नाही. तो लॉकडाऊनच्या काळात सैरभैर झाला तेव्हा कुठे त्याचं एवढं प्रचंड अस्तित्व जगाला दिसलं. अशावेळी सर्वांनी केलं काय? एका बाजूला उद्योजकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या अन् दुसरीकडे कामगार नेत्यांच्या. झाली यांची जबाबदारी. ना जागतिकीकरण-उदारीकरण-खाजगीकरण यांचा अभ्यास, ना उत्पादनाचं क्षेत्र कशावर चालतं याबाबतची जिज्ञासा; या अवस्थेत कशा कशा बातम्या आल्या हे केवढे थोर उपकार झाले त्या असंघटित श्रमिकांवर! शेतीला या कॉर्पोरेट वृत्तपत्रांत कसंबसं एखादं पान मिळतं. त्यासाठी ना कोणी संपादक, ना कृषीतज्ज्ञ वार्ताहरांची फौज. ग्रामीण वार्ताहरांवर सारं क्षेत्र सोपवून दिलेलं. त्या वार्ताहरांना शेतीव्यवस्थेची जुजबी माहिती असते. परंतु अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे अशी सरकारी आश्वासनं मिळूनही श्रमिक उपाशीपोटी का राहिले आणि का गावोगावी परतले याची कारणं त्यांच्यापाशी नाहीत. रेशन दुकानांमध्ये धान्यसाठी आहे का, तो गरजूंना मिळतोय का, किती मिळतोय, कोणत्या दर्जाचा मिळतोय याच्या बातम्याच कोणी देईना. मध्येच घरपोच दूध, भाजी, किराणा मिळेल अशा बातम्या येऊ लागल्या. सोबतीला ना फोन क्रमांक, ना दुकानांचे पत्ते, ना येण्याजाण्याच्या मार्गांचा खुलासा. अक्षरश: नोकरशाही कागदी घोडे नाचवते तसे घोडे हे बातमीदार नाचवत राहिले. बरं, घरपोच भाजीपाला-किराणा व्यवस्था प्राप्त करण्याचा खर्च कोणाला किती परवडणार याचीही काही खबरबात नाही. निव्वळ पोस्टमन होऊन बसला साऱ्या बातमीदारांचा.
कोरोनाच्या काळात कारकुनी पत्रकारिता प्रचंड वाढली. बातमीदारांना हिंडण्या-फिरण्याचा परवाना असूनही एकानेसुद्धा शासकीय ‘राष्ट्रसेवेला बाधा’ पोचेल अशी बातमी दिली नाही. सांभाळून घ्या, असं तमाम सरकारी अधिकार्यांचं आर्जव असे आणि पाहून घेऊ, अशी सत्ताधारी पक्ष कार्यकर्त्यांची धमकी. आधीच मालकांनी कणा मोडून टाकल्यावर सत्याचं दर्शन करायला शिल्लक हिम्मत तर लागेल! लाचखोरी घटली, गुन्हेगारी कमी झाली, दारूचे बार्स रिकामे झाले, विवाह साध्या पद्धतीने व मोजक्यांच्या साक्षीने होऊ लागले, घरोघरी डिजिटल शिक्षण सुरू झालं आणि पत्ते, कॅरम, सोंगट्या या देशी खेळांना सुगी आली अशा बातम्या कदाचित ‘पॉझिटिव्ह’ पैलुमुळे झळकू लागल्या. अनेक वेबिनार पार पडले. काही बातम्या त्यांच्याशी झाल्या. पुस्तक वाचन, छंद जोपासणं, बागकाम, स्वयंपाक, यू ट्यूबवर व्हिडिओ यांचा तर इतका ओंगळवाणा अतिरेक झाला की बस्स! लॉकडाऊनची झळ पोचलेल्यांची बातमीच नाही. ज्यांचं रिकामपण कल्पक होऊन आलं त्यांच्या बातम्याच बातम्या! दारूची दुकानं सुरू करण्याचा आचरट अन् वावदूक निर्णय कोणत्या दबावामुळे घ्यावा लागला, हे वाचकांना कधीही कळणार नाही. कारण दारू रिचवणार्यांमध्ये पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी तांदळाचा मोठा साठा मोकळा केल्याच्या बातमीवर पी. साईनाथ यांनी टिप्पणी केलीय. ती बातमी अक्षरश: तशीच डोळ्यांआड करण्यात आली. आमच्या जालन्याचे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे मोदींच्या मंत्रिमंडळात ग्राहकसेवा, अन्न व सार्वजनिक वितरण खात्याचे राज्यमंत्री आहेत. इतकं महत्त्वाचं खातं असूनही दानवे वस्तूंच्या तुटवड्यासंदर्भात किती वेळा पत्रकारांशी बोलले, काय बोलले, रेशनिंगविषयी ते काय निर्णय घेत होते याची दखल कोणी घेतलीय? का बरं त्यांना पत्रकार सांभाळून घेत राहिले?
अदृश्य विषाणूचं दृश्य रूपातलं वृत्त आणि वृत्तकथन एखाद्या घडामोडीसारखं बघितलं गेलं हा तर पत्रकारितेच्या बधीरपणाचा कळस. विषाणू आला विमानांमधून. मात्र काही सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रक्रियांनी त्याला हातपाय पसरायला मुभा मिळाली. दारिद्य्र, रस्त्यावरचे व्यवसाय, छोटी घरं, या घरात राहणार्या माणसांची भरपूर संख्या, अल्पशिक्षण आणि अफवा व अर्धसत्यं यांचा बाजार या प्रक्रिया कोरोनाच्या हैदोसामागे आहेत. त्या अजून फार लक्षात आलेल्या नाहीत. नगररचना, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, राजकारण, अर्थव्यवस्था अशा कित्येक बाजूही या संसर्गाच्या प्रसारणाला कारण आहेत. पण या बाजूही अभ्यासनीय असतात हे माध्यमांच्या मालकांना समजत नाही. संपादक तर हुकमाचे ताबेदार. ते तसे म्हणून पत्रकार कमालीचे पाट्याटाकू अन् पोटवाढू. या विषाणूमुळे आपण काय शिकलो असं पत्रकारितेला विचारलंच कोणी तर ती तेव्हाही म्हणेल, कोणता अजेंडा मी घेऊ हाती? काही बातमीदारांनी आपापल्या परीने खूप गरीबांना मदत मिळवून दिली, अडचणींमधून अनेकांची सुटका केली. पण हा भाग झाला वैयक्तिक चांगुलपणाचा. व्यावसायिक पत्रकार म्हणून करण्यासारखं खूप होतं, ती संधी आपल्या पत्रकारितेने पुन्हा एकदा गमावली.
-जयदेव डोळे
jaidevdole@yahoo.com
jaidevdole@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा