संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी
अनुभव दिवाळी २०२० च्या अंकातून,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यशैली आणि संघाच्या स्वयंसेवकांचं विचारविश्व हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. संघाच्या स्थानिक वर्तुळात चार दशकं डोळसपणे वावरलेल्या एका सजग व्यक्तीला मागे वळून पाहताना या दोहोंबद्दल काय वाटतं ?
बाहेर धो धो पाऊस पडत आहे. दाटून आलेली संध्याकाळ आणखीच दाटून आली आहे असं वाटून राहिलं आहे. मला उशीर झाला आहे... अर्धामुर्धा भिजलेला मी पेंडशांच्या वाड्यात वरच्या हॉलमध्ये जाणारे लाकडी जिने धडधड चढतो. हॉलमधून येणारा पद्याचा आवाज क्रमश: मोठा होत जातो, त्याच क्रमाने मला उशीर झाल्यामुळे आलेलं ओशाळेपण हलकंसं वाढत जातं... दारात चपलांच्या रांगा लागलेल्या आहेत. भिजलेल्या छत्र्यांसाठी बादली ठेवलेली आहे. राज भागवत चपलांच्या रांगांपाशी उभा आहे. मी चपला ओळीत काढतो की नाही यावर त्याचं लक्ष आहे. त्याच्याकडे मी पाहत नाही, पण त्याच्या नजरेचं मला भान आहे... मी चपला बरोबर काढतो. आत शिरताना त्याची-माझी नजरानजर होते. त्याचा चेहरा तसाच गंभीर राहतो... तो हेच काम आणखी किती वर्षं करणार, असं मला क्षणभर वाटून जातं... मी हॉलमध्ये शिरतो. पद्याचं दुसरं कडवं संपत आलं आहे- ‘क्योंकि मेरी देह मिट्टीसे बनी है । क्यों न उसके प्रेम में पलता रहूँ । मातृ मंदिर का समर्पित दीप मैं ॥’... हे मला आवडणारं गीत आहे... संघाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव सुरू आहे.
चाळीस-एक वर्षांपूर्वी मुलांच्या आयुष्यात शाळा-कॉलेजच्या व्यतिरिक्त काही स्टेशनं ठरलेली असत. त्यातलं एक स्टेशन सार्वजनिक कामांत भाग घेण्याचं असे. मग ते पूर, भूकंप आला तर कपडे वा धान्य गोळा करण्याचं काम असेल; सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घेण्याचं असेल, विविध व्याख्यानमाला आयोजित करण्याचं असेल किंवा अशा एखाद्या कार्यक्रमात नुसतंच पुढे जाऊन बसण्याचं असेल. मी शाळेत असताना माझं नेमकं असं काही ठरलेलं नव्हतं. घरात आणि गावात वातावरण होतं म्हणून माझा संघाशी प्रथम संबंध आला. पुढच्या ३०-४० वर्षांत आलेले संबंधित अनुभव संमिश्र होते. राष्ट्रप्रेम, धर्म, अभिमान, समाजसेवा यांच्या कल्लोळात हरवून गेलेले अनेकजण आसपास दिसत होते, भेटत होते. मी त्यांच्यातला एक झालो नाही. त्या अनुभवातून स्वतःचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
संघाचं कोणतंही काम असो, भान हरपून त्यात सहभागी होणारे अनेकजण सुरुवातीपासूनच माझ्या अवतीभोवती होते. मला मात्र भान हरपून आयुष्यभर एक काही करावं असा आपला स्वभाव नाही, हेच खूप उशिरा ध्यानात आलं. काही कामांमध्ये सतत भान ठेवून असणं हीच एक मोठी अडचण असू शकते, हे तेव्हा कळायचं नाही. त्यामुळे संघाच्या कामात माझं सतत आत-बाहेर चालू असे आणि त्यातही समोर येणार्या उपक्रमांकडे निव्वळ भक्तिभावाने पाहणंही होत नसे. एकदा एका समर्पित वक्त्यांचं अगदी हृदयातून आलेलं बौद्धिक संपल्यावर मी माझ्या तार्किक विचारानुसार एक टिप्पणी केली. तसं शेजारी बसलेल्या संदीप देशपांड्याने म्हटलंदेखील- “लेका, तू काठावर बसून पुस्तक वाचून आम्हाला पोहायला शिकवणार!” त्याचं बरोबरच होतं. पुस्तकात रमणारा मी माणसांचं काम करणार्या व्यवस्थेत नकळत ढकलला गेलो होतो. गाव लहान होतं. माझे काका संघाचे प्रचारक होते. मोठे चुलतभाऊ कायम संघाच्या गोतावळ्यात असत. खेळ, माणसांची सवय आणि आवड, मग संघटनेचं काम, अशा त्यांच्या व्यवस्थित लागलेल्या चक्राच्या पहिल्या टप्प्यात मी कुठे तरी होतो.
संघाच्या शाखेत मधूनच कधी तरी काही विशेष वाटणारी, झब्बा-लेंगा घातलेली माणसं कुठून तरी यायची आणि कुठे तरी जाण्याच्या आधी तरुण मुलांना देश, धर्म यांबद्दल काही सांगून जायची. त्या वयात मला देश ही फारच मोठी गोष्ट असेलसं वाटायचं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा काळ जाणतेपणाने पाहिलेली माणसं मोठ्या संख्येने आजूबाजूला होती. त्यांच्या मनातल्या त्या काळाच्या आठवणी पुसट झाल्या असल्या तरी नाहीशा झालेल्या नव्हत्या. “गांधीना मी अस्से पहिले आहे!” समीर फणसेची आई तिचा हात पुढे करून सांगे. तिचं माहेर गिरगावचं होतं. चौपाटीवरच्या सभांना ती आपल्या दोन वेण्या पुढे घेऊन शाळेच्या गणवेशात बसलेली मला तेव्हाही दिसे. पाठ्यपुस्तकांतही स्वातंत्र्यलढ्याविषयी प्राधान्याने लिहिलेलं असे; पण आम्हाला त्यातलं देशप्रेम परीक्षेपुरतं माहीत होतं. या संदर्भात शाळेतील एक किस्सा आठवतो. त्या वेळी वसंत पोतदार शाळाशाळांमधून क्रांतिकारकांच्या कथा सादर करायचे. एकदा ते आमच्या शाळेत आले होते. मी तेव्हा आठवीत होतो. ते आवेशात सावरकरांबद्दल काही सांगता सांगता म्हणाले, “स्वातंत्र्यवीर म्हणजे वक्ता दशसहवस्रेषु!”... (किंवा अशाच अर्थाचं काही)... “त्यांचं भाषण मी या या कानाने ऐकले आहे,” असं म्हणून त्यांनी स्वत:चा एक कान पकडला. मागून आरोळी आली, “दुसरा कान बहिरा होता काय?” दुसर्या दिवशी पहिल्याच तासाला शिपाई कागद घेऊन वर्गात आला आणि त्याकडे पाहत त्याने ‘सतीश आपटे!’ असा पुकारा केला. स्वारी उभी राहिली, तसं शिपाई म्हणाला, “मुख्याध्यापकांनी बोलावले आहे.” या तुलनेत संघात देशभक्ती ही गंभीर गोष्ट होती. पेंडशांच्या वाड्यात सावरकर दोन दिवस राहायला होते असं आम्ही ऐकून होतो. अशा अनेक गोष्टी तेव्हा आम्ही ऐकून होतो. त्यांचा मनावर प्रभाव असे.
वर म्हटलं त्या देश, समाज, धर्म असं काही सांगणार्यांची नावं अण्णा, अप्पा वा तात्या अशी काही असत. ते संघटनेचं पूर्णवेळ काम करत. म्हणजे नेमकं काय करत याची मला उत्सुकता असे. ते सांगत असलेल्या धर्माचा धार्मिकतेशी काही संबंध नसायचा. (संघ परिवारातल्या काही लोकांनी गंध लावून टीव्हीवर येणं हे गेल्या पंधरा-एक वर्षांत सुरू झालेलं आहे.) शाखेतल्या कुणी अशा मंडळींपैकी कोणा तात्यांचा उल्लेख केला की त्या बोलणार्या माणसाचं पद आणि वय पाहून त्याला कोणते तात्या अपेक्षित असावेत याचा अंदाज बांधावा लागायचा. काही वर्षांत मला ते जमू लागलं. अशा अण्णांना, तात्यांना आणायला-सोडायला स्टेशनवर वा स्टँडवर जाणं हे तसं प्रतिष्ठेचं काम असे. ते काम बर्यापैकी योजलेलं असे. एकदा संदीपकडे ते काम आलं. तो ते काम संपवून आला आणि संध्याकाळी मैदानात प्रार्थना झाल्यावर म्हणाला, “आज बहुधा गडबड झाली...” त्याच्या चेहर्यावर गोंधळ होता. “...मी तात्यांना लोकलने ठाण्याला सोडलं. उतरल्यावर ते म्हणाले, माझं फर्स्टक्लासचं तिकीट का नाही काढलं?” मी विचारलं, “गर्दी होती का?” तो म्हणाला, “नाही.” हा प्रसंग मी विसरलो नाही. संघटनेच्या चौकटीतली अहंकारी मनुष्यस्वभावाची मला दिसलेली ही पहिली चुणूक होती.
असे काही काही प्रसंग मनात टिपले जात असत. वाढत्या वयासोबत त्यांवर अधिकाधिक विचार होत असे. रविवारी संघाची शाखा सकाळी लागायची. त्यासाठी झोपलेल्या मुलांना जागं करून आणण्याची जबाबदारी असायची. ते काम काही काळ मीदेखील केलं. इतर काहीजण क्रांतिकारकांच्या निष्ठेने ते काम करत. माझ्या दृष्टीने ते केवळ एक सार्वजनिक काम होतं. एकदा मी माझ्या यादीतल्या एकाला रविवारी पहाटे हाका मारल्या, तर त्याच्या वडिलांनी दार उघडलं आणि ते म्हणाले, “त्याचा बारावीचा अभ्यास असतो. रात्री उशिरापर्यंत तो जागा असतो. उगाच हाक मारत जाऊ नकोस.” हे खरंच होतं. शहरी समाजमनाचा हा थेट अनुभव होता. त्यात कुठलाही पुस्तकीपणा नव्हता. अशा काही अनुभवांनी नकळत लक्षात यायला लागलं, की आपल्या आसपासच्या मानवी समूहाला एका मर्यादेपर्यंत सामाजिक मन असतं; पण प्रत्येकाला स्वतःचे काही वैयक्तिक प्रश्न असतात आणि प्रसंगानुरूप प्रत्येकाचे प्राधान्यक्रम वेगळे असू शकतात. अर्थात तेव्हा या शब्दांत हे समजत नव्हतं. काहीजण देशासाठी बोलावल्यावरही येत नाहीत हे तेव्हा खटकायचं, कारण आसपास तेच बोललं जायचं. मात्र, देशासाठी म्हणजे नेमकं कशासाठी हे कुणीच स्पष्टपणे सांगत नसत. आमची शाखा जिथे लागायची त्याच्या जवळच रोहिदास समाजाची वस्ती होती. त्यांची घरं स्वच्छ असत. त्यांचं देऊळदेखील वेगळं होतं. शाखेतल्या काहीजणांचा त्या वस्तीत परिचय होता; पण तिथलं कुणी कधी आमच्या शाखेत आलं नाही. त्यांना आणण्याचे पुसटसे प्रयत्न झाले, पण तेवढेच. शाखेतल्या अधिकारीवर्गालाही त्याचं फारसं काही वाटत नसे. हिंदू समाजाला एक करण्याचा विडा उचललेल्या या संघटनेच्या झेंड्याखाली अखेर थोडेबहुत समसंस्कारी लोकच तेवढे परत सायंकाळी एकत्र येत असत. (आज त्यात काहीसा बदल झाला आहे.)
सत्तर आणि ऐंशीच्या दशकात गावातून दरवर्षी कोणी ना कोणी प्रचारक म्हणून जात. त्यांना निरोप देण्याचा समारंभ एकदम भारलेला असे. जणू ते युद्धाला निघाले आहेत असा भाव सार्या वातावरणात असे. त्यांच्या गुणगायनाची भाषणं होत. ते देशासाठी आपल्या आयुष्याची काही वर्षं देणार म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव असे. काहींच्या मनात आपण प्रचारक म्हणून जाऊ शकत नसल्याची खंतही असे. पूर्णवेळ कार्यकर्ता ही मानसिक अवस्था आहे, असं आबा जोशीने एकदा बोलून दाखवलं होतं. तो प्राध्यापक होता. पण आमच्या वयाच्या मुलांना हे कळणं अवघडच होतं. प्रचारक म्हणून जाणारे हे लोक बर्याचदा कुठल्या तरी क्षेत्रातले उच्चशिक्षित असत. त्यामुळे त्यांचा त्याग अधोरेखित होत असे. संघटनेच्या कामात न पडता त्यांनी त्यांच्याच क्षेत्रात काम केलं असतं तर कदाचित देशाची अधिक चांगली सेवा झाली असती, असं नंतर वाटायला लागलं. इतरही काहीजणांना हे वाटलं असण्याची शक्यता होतीच, पण कुणी कधी तसं उघड बोलून दाखवत नसे. प्रत्यक्ष कृतीबरोबरच आपण करत असलेल्या कामाचा दिवसरात्र विचार करणं हे खरं मोठेपणाचं लक्षण. पण बहुधा प्रचारकांच्या त्यागालाच जास्त महत्त्व असे. संघटनेला त्यांचा ब्रँड अम्बॅसडरसारखा उपयोग होई. काही वर्षं प्रचारक म्हणून यशस्वीरीत्या काम केलेल्या एका जवळच्या व्यक्तीला मी एकदा त्याने प्रचारक म्हणून जायचं कारण विचारलं. तो म्हणाला, “ते दिवस अवघड होते. मला कुठलं तरी यश हवं होतं.” संघटनेमध्येदेखील प्रत्येकाची युद्धभूमी वेगळी असते, फक्त ती निवडता आली पाहिजे.
अशा प्रचारकांचं काम संघटना वाढवण्याचं असतं; पण त्यांची समजूत ते देशाचं काम करत आहेत अशी असे. ते अगदी चूक होतं असं नव्हे, पण हा वळसा मारून घेतलेला घास होता. देशासाठीच काम करायचं तर इतरही अनेक मार्ग होते, पण ते भारलेल्या कार्यकर्त्यांच्या ध्यानातच येत नसे. त्यामुळे निष्ठाभावनेला महत्त्व असे. नुकताच मला कुणी पन्नास प्रचारकांचा एकत्र घेतलेला एक जुना फोटो पाठवला आहे. त्याखाली जी टीप दिली आहे त्याची सुरुवात ‘देशासाठी कर्तृत्वाचे, सर्वस्वाचे दान हवे’ या कवितेच्या ओळीने होते. त्याखाली प्रचारकांची महती व माहिती आहे आणि शेवट ‘तेरा वैभव अमर रहे माँ, हम चार दिन रहे न रहे’ या ओळीने होते. संघटना आणि देश यांच्यात प्रत्यक्षात सातासमुद्रापेक्षा जास्त अंतर होतं, पण हे अंतर संघाने मोठ्या खुबीने मिटवलं होतं. देश म्हणजे आपली संघटना, संघटना म्हणजे त्याच्या शीर्षस्थानावर बसलेली व्यक्ती. ती काही हुकुमशहा नव्हती, पण संघटनेचं प्रतीक होती. सर्व व्यक्ती स्खलनशील आहेत, असं म्हणतानाच स्वयंसेवकांच्या मनात त्या शीर्षस्थानावरच्या व्यक्तीविषयी भक्तिपूर्ण आदर निर्माण केला जाई. हे एखाद्या व्यावसायिक कंपनीसारखं होतं. विशेषतः गुरुजींविषयी हे पूर्ण खरं होतं.
गुरुजींना मी एकदाच पाहिलं. त्यांच्या निधनानंतरचा काळ मी अनुभवला. त्यांच्याविषयीची मला असलेली माहिती ऐकीव असली तरी विश्वासार्ह आहे. यज्ञकुंडात हवन करतानाचं त्यांचं योग्यासारखं चित्र, त्यांची दाढी आणि धोतर म्हणजे गांधीजींच्याच वेषाची कर्मठ आवृत्ती होती. वास्तविक संघात दाढी न ठेवण्याचा नियम आहे; मात्र गुरुजी त्याला अपवाद होते. त्यांच्या दाढीचा जनमानसावर प्रभाव पडत असे. ‘ध्यान लावलं की ते जमिनीपासून काही इंच वर जात’ असं ऐकलं होतं. हेच मला अनेक वर्षांनी परत कुणी तरी सांगितलं, तेव्हा मला राहवलं नाही. मी विचारून टाकलं, “पण देशासाठी त्याचा काय उपयोग?” त्या व्यक्तीचा गोंधळलेला चेहरा पाहून मला फार मजा आली.
गुरुजींचं विचारधन आणि समग्र चिंतनाचे खंड अनेक ठिकाणी दिसत. ते वाचून संघटना वाढली नव्हती. त्या खंडांच्या वाचनाची थोडी थट्टाही होत असे, पण सर्वांनी भक्तीने ते घरात ठेवलेले असत. अलेक्झांडर पोप या इंग्लिश कवीची ‘ओड टु सॉलिट्युड’ ही कविता गुरुजींची आवडती होती. त्यातल्या ‘दस अनसीन लेट मी लिव्ह, अनसीन, अननोन/ दस अनलॅमेंटेड लेट मी डाय / स्टील फ्रॉम द वर्ल्ड अँड नॉट अ स्टोन / टेल व्हेअर आय लाय’ या ओळी महत्त्वाच्या. पण कुणी त्या लक्षात घेत होतं का, माहिती नाही. स. ह. देशपांड्यांनी गुरुजींबद्दल निरीक्षण मांडलं होतं, की ‘त्यांचा एक पाय कायम ऐहिक जगाच्या बाहेर असे.’ या निरीक्षणात आक्षेप घेण्यासारखं काही मला वाटत नाही. ‘आय वॉन्ट टु बी फेमस बट अननोन’ असे एडवर्ड डेगास या चित्रकाराचे उद्गार वाचले तेव्हा गुरुजीच डोळ्यांसमोर आले. त्यांचं निधन होऊन ४५ वर्षं होऊन गेली, पण अजून त्यांच्याविषयी भक्तिभाव आहे. त्यांच्याविषयीच्या पद्यांचं अजून गायन होत असतं. या भक्तिभावासंदर्भातला आणखी एक मार्मिक प्रसंग आठवतो. काही वर्षांपूर्वी ज्याला पिक्चर बायोग्राफी म्हणतात असं गुरुजींच्या छायाचित्रांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. कुणी ते राज ठाकर्यांकडे अभिप्रायासाठी नेलं. त्याआधी राज ठाकर्यांनी बाळासाहेब ठाकर्यांवरचं अशाच प्रकारचं देखणं पुस्तक काढलं होतं. राज ठाकर्यांनी ते पुस्तक पाहिलं आणि ते म्हणाले, “कुणी बनवलं हे? बहुतेक छायाचित्रांत गुरुजी जेवताहेत!” गुरुजींना अशी व्यक्तिपूजा नको होती. ‘मैं नहीं तू ही!’ (स्वतःपेक्षा दुसर्याला महत्त्व द्यावं) हे त्यांचं ब्रीद होतं. मात्र, हे वाक्य अर्थहीन ठरावं असं त्यांच्यामागे घडत गेलं आणि त्याचं ‘सिर्फ मैं ही!’मध्ये रूपांतर झालं. बाळासाहेब देवरसांनी ही व्यक्तिपूजा बंद केली.
कोणत्याही व्यक्तीविषयी अशी टोकाची भक्ती असणार्या लोकांचा मला उबग येई. दि. वि. गोखले आणि त्यांच्या मित्रमंडळींनी गुरुजींशी प्रतिवाद केला असं मी ऐकून होतो. त्यांचं मला आकर्षण वाटायचं. शिवाय दि. वि. गोखले माझे आवडते लेखक होते. अशा प्रकारच्या विचारधारेचं इतरही काही लेखन वाचलं गेलं. उदा. स. ह. देशपांड्यांचा ‘संघाच्या इतिहासातला एक अल्पज्ञात अध्याय’ हा लेख. त्याने माझ्या मनातल्या द्वंद्वाला जागा मिळाल्यासारखं वाटलं.
एकदा दामूअण्णा दाते बौद्धिक देत होते. (बौद्धिक घेणारीही वेगळी मंडळी होती.) ते दिसायला देखणे होते. त्यांची वाणी सहज आणि प्रवाही होती. त्यांचं बोलणं ऐकणार्याला ताजं करणारं होतं. त्यांच्या बोलण्यात बर्याचदा ताजे, आंंतरराष्ट्रीय संदर्भ असत. तर, तेव्हा इराणच्या शहाला नुकतंच पदच्युत व्हावं लागलं होतं. त्याचे उद्गार त्यांनी उद्धृत केले, “राजा पहलवी शहाने विमानातून उतरताना म्हटले, जगातले पाच राजे कधीच नाहीसे होणार नाहीत. चार पत्त्यांतले व मी पाचवा!” हे उच्चारताना त्यांचा स्वर बाणेदार झाला होता. त्यांनी हे उद्गार कुठल्या संदर्भात ऐकवले ते आठवत नाही. कदाचित नेतृत्व वा राज्य करण्याची इच्छा या संदर्भात ते बोलत असावेत. बौद्धिक संपल्यावर मी त्या उद्गारांवर तरंगत बाहेर आलो. बाहेर अनंतराव देवकुळे बसले होते. त्यांचं वय बरंच झालं होतं. ८०च्या घरात असावेत; पण तरतरीत होते. त्यांनी विचारलं, “काय, दामूअण्णांनी विमानातून फिरवून आणलं की नाही?” त्यांच्या या प्रश्नानिशी माझं उडलेलं विमान जमिनीवर आलं. जाता जाता आणखी एक. स. ह. देशपांड्यांनी केलेलं तरुण अनंतरावांचं वर्णन मी वाचलं होतं. त्यांनी लिहिलं होतं, ‘तो वाकुल्या दाखवी, चेष्टा करी, विदुषकी करी, मध्येच खोटा गंभीरपणा धारण करी आणि पुढच्याच वाक्यात तो मुखवटा फेकून हशाच हशा पिकवी आणि या सगळ्यातून सहजतेने एखाद्या भावनेला खोल स्पर्शून जाई. शिशू तर अनंतावर जीव टाकत. तो जणू काही त्यांचा ‘पाइड पायपर’ होता. अनंता धावतोय, चालतोय, थबकतोय, पुन्हा पळतोय आणि शिशूंची फौजच्या फौज त्याच्या मागे, पुढे, भोवती गदारोळ करत रिंगण घालतेय हे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर अजून येतं.’ असो.
या संदर्भातला आणखी एक प्रसंग आठवतो. एकदा शिवराय तेलंग आम्हा चौदा-पंधरा वर्षांच्या पोरांसमोर बौद्धिकाचं निमित्त करून काहीबाही बोलत होते. ते नुसतेच ब्रँड अम्बॅसडर नव्हते. ते चित्रकार होते. त्यांच्याकडे गोष्टी सांगण्याची कला होती. अचानक त्यांनी आव्हान दिलं, “दोन मिनिटांत कोण गोष्ट सांगेल?” मागून आवाज आला, “मी सांगतो.” मी मागे वळून पाहिलं तर सुधीर रानडे उठत होता. त्याने समोर येऊन गोष्ट सांगायला सुरुवात केली, तसं तेलंगांनी त्याला थांबवलं. आपलं घड्याळ लावलं. गड्याने जिब्रानच्या बोधकथा असतात तशी एक कथा सांगितली. कथा संपली तेव्हा तेलंगांच्या चेहर्यावर हलकंसं स्मित होतं. घड्याळाकडे पाहत ते म्हणाले, “लौकर संपली. पावणे दोन मिनिटं!” आज ती बोधकथा आठवत नाही, पण त्यांचं ते आव्हान देणं आणि कुणी तरी ते स्वीकारणं यातलं छोटंसं नाट्य मनात घर करून राहिलं आहे.
तेलंगांचं ‘कोटि कोटि देव माझे कोटि त्यांना वंदना’ हे पुस्तक माझ्या संग्रहात अनेक वर्षं आहे. त्यात गुरुजींवर बर्यापैकी मजकूर आहे; पण त्यांच्याशी संबंध आलेल्या अनेक कार्यकर्त्यांवर लिहितानाही ते रमले आहेत. मी ते पुस्तक पहिल्यांदा चाळलं तेव्हा त्यात एका लेखाच्या सुरुवातीस चक्क थॉमस कार्लाइलचं एक इंग्रजी वचन दिलेलं होतं. संघाच्या वातावरणात, अधिकार्यांच्या भाषणात, त्यांच्या लिखाणात पाश्चात्त्य विचारवंताचा उल्लेख सहसा केला जात नसे. त्या तुलनेत ही बाब मला आश्चर्यचकित करणारी होती.
संघाच्या वातावरणात आणि संस्कारक्षम वयात मनाची अशी घुसळण सुरू असे. उलटसुलट अनुभव स्वतःशीच पडताळून पाहिले जात. माझ्या अवतीभोवतीच्या अनेकांसाठी संघटित समाज हे भविष्यात प्राप्त करण्याचं ध्येय होतं. त्याचबरोबर त्यांना समाजमान्यता मिळवण्यासारख्या गोष्टीचीही आस असे. मला त्यांच्यातला ‘मी’ नको वाटे. महत्त्वाचं म्हणजे काहींनी असा ‘मी’पणा लपवण्यापेक्षा तो आडवळणाने प्रकट करण्याचं कौशल्य हस्तगत केलं होतं. बहुतेकांना ‘देशभक्ती’ नावाचं भान हरपवणारं टॉनिक लागू पडलेलं असे. माझ्या आसपासच्या समाजाचंच प्रतिबिंब त्यात उमटलं होतं.
मी यातल्या कुठल्याही साच्यात बसत नव्हतो. मला या स्थानिक सूर्य-चंद्र-तार्यांचा हळूहळू कंटाळा येऊ लागला. संघाचे सार्वजनिक कार्यक्रम देखील त्यांच्या सहानुभूती असलेल्या लोकांसमोर होत. तेच तेच कार्यक्रम त्याच त्याच लोकांसमोर एकाच पद्धतीने करण्यात काय साधत होतं हे मला समजत नसे. परिणामत:, माझा अधिक वेळ संघाच्या वाचनालयात जाऊ लागला. वाचनालयात अर्थातच संघसाहित्य प्राधान्याने असे. ‘एकता’ या मासिकाचे अंक तिथे भार्याने बाइंड करून ठेवलेले होते. कोणीही त्याकडे ढुंकूनही पाहत नसे. कधी सायंकाळी तिथे ठराविक लोक जमत. ‘विवेक’ साप्ताहिक श्रद्धेने चाळलं जाई. तरुण भारत व इतर वृत्तपत्रांची टिंगल उडवली जाई. कोणी तरी खिडकीतून चहा-भजी मागवे. भजी खात खात संघाच्याच काही अधिकार्यांची आणि इतर विचारधारांचीही काही वेळ निरागस चेष्टा चाले.
अशा वातावरणात इथे मी सोळा-सतराव्या वर्षी मोजकी पण उत्कृष्ट पुस्तकं वाचली. धर्म, देश व राष्ट्र या संकल्पनांचं शाखेच्या मैदानावर निर्माण झालेलं प्राथमिक कुतूहल शमवण्याचं काम या ग्रंथालयाने केलं. तिथे ‘इस्त्राइल, छळाकडून बळाकडे’ हे पुस्तक होतं. त्याचे लेखक ना. ह. पालकर यांचा संघात बराच बोलबाला होता. त्यांनी गुरुजी आणि हेडगेवारांची चरित्रंही लिहिली. लेखक संघटनेचा सदस्य असल्याच्या मर्यादा दोन्ही चरित्रांच्या लेखनाला पडल्या आहेत, पण धनंजय कीरांच्या तोडीचा हा चरित्रकार आहे. ग्रंथालयात फाळणीविषयक काही साहित्य होतं. हो. वी. शेषाद्री यांचं ‘द स्टोरी ऑफ पार्टिशन’ होतं. ते वाचून मी त्या विषयाचा पाठपुरावा केला आणि त्या पुस्तकाच्या विरोधी मतावर येऊन पोचलो. ज. द. जोगळेकरांचं ‘निधर्मी राष्ट्रवादाचे शिल्पकार’ हे पुस्तकही मी तिथे वाचलं. विषय, लिखाणातला नेमकेपणा, शैली या दृष्टीने हे अप्रतिम पुस्तक आहे. आजही मी ते अध्येमध्ये चाळतो. तिथे पडलेल्या काही पुस्तिका मी जपून ठेवल्या आहेत. त्यात द. बा. ठेंगडीची शिवछत्रपतींच्या कार्याचं विवेचन करणारी एक पुस्तिका होती. त्यातलं निवेदन निधर्मी अंगाने जाणारं आहे. ते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि नरहर कुरंदकरांच्या विवेचनाला समांतर आहे.
तिथल्या ग्रंथपालाबरोबर माझी मैत्री झाली. माझा वाचनाचा नाद पाहून त्याने शांतपणे एक दिवस ग. ना. जोशींच्या ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास’चा पहिला खंड माझ्यासमोर ठेवला. त्यातलं सारं मला नवीनच होतं. चाळता चाळता त्यात अरिस्टॉटलचं ‘शहाणपणा म्हणजे दोन टोकांच्या मूर्खपणाचा सुवर्णमध्य होय’ हे वाक्य वाचलं. कुठल्याही संकल्पनेच्या स्पष्टतेची, व्याख्येची आस असणार्या मला ते भारीच वाटलं. संघात अशी सुस्पष्टता मला कधी दिसलीच नाही. तिथे सारं धूसर असे.
खरं तर हे वाचनालय वाढवणं शक्य होतं. व्याख्यानमाला वा पर्यावरण जागृतीसारख्या आनुषंगिक गोष्टी वाचनालयाला धरून चालवणं शक्य होतं. माझ्या बुद्धीला ते दिसत होतं. पण कुठलीही नवीन कल्पना केवळ सुचवून थांबता येत नाही; ती आपल्यालाच पुढे घेऊन जावी लागते आणि राबवावी लागते. हे कौशल्य म्हणजे संघाच्या कामाचा आत्मा होता. पण ते क्षेत्र माझं नव्हतं. मी अभ्यास आणि वाचन यांत रमू लागलो; पण हळूहळू माझ्या वाढत जाणार्या कुतूहलाला हे वाचनालय अपुरं पडू लागलं आणि काही काळातच ‘क्युरिऑसिटी किल्ड द कॅट’ हे वचन प्रत्यक्षात आलं.
रोजचा संघाचा संपर्क संपून तो ठराविक कार्यक्रमाला जाण्याइतपतच राहिला. सोळा-सतराव्या वर्षापर्यंत संचलनाचं आकर्षण असे. संचलन आमच्या गावातल्या रेल्वे लायनीच्या पलीकडे पश्चिमेला सुरू होई आणि चाळीस-एक मिनिटांनी पूर्वभागात येऊन संपे. घोषाच्या तालावरचं हे संचलन बर्याच प्रमाणात रेखीव असे. खांद्यावर दंड घेऊन मी नुसताच चालतो आहे, यापेक्षा घोषातलं एखादं वाद्य मी वाजवतो आहे, असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर बर्याचदा आलं. मांगल्य निर्माण करणारे हंसध्वनीचे स्वर बासरीतून काढताना ते आपल्या ओठांपेक्षा नाजूक वाद्य आहे हे ध्यानात यायला मला अजिबात वेळ लागला नाही. पणव म्हणजे मोठा ढोल असे, ज्याच्या ठेक्यावर सारी वाद्यं मेळ धरत, पण तोे मला बिनडोक वाटे. वार्यावर स्वार होत, चेतना निर्माण करत, खाली-वर-मागे-पुढे होणारे चेतकाचे स्वर बिगुलातून काढायला मला फार आवडलं असतं; पण ते वाद्य हातातही पकडायची माझी छाती झाली नाही. ड्रम वाजवणं मात्र मला जमू लागलं होतं; पण ते शिकवणारा काही कारणाने येईनासा झाला आणि ते सारं राहूनच गेलं. संचलनातल्या अनेक गोष्टी मी संचलनात भाग घ्यायचं सोडल्यावर माझ्या लक्षात आल्या. अनेक मोठी माणसं संचलन फार काही गांभीर्याने घेत नसत. वर्गात लॉरेल आणि हार्डीच्या गोष्टी सांगून पोटभर हसवणारे वेळापुरे मास्तर संचलनात शिस्तीत चालतील हे अशक्यच होतं. ते चालता चालता खांद्यावरचा दंड काही क्षण मानेत पकडून दोन्ही हातांनी तंबाखू मळत आणि शेजार्यालाही देत. संचलन संपलं की मी आणि संदीप रमत-गमत परत यायचो. त्या वेळी त्याचा दंड खांद्यावर विसावलेला असे आणि मी माझा दंड रस्त्यावरच्या कुत्र्यांना हूल देण्यासाठी फिरवत असे.
संघाचे बंदिस्त सभागृहामधले कार्यक्रम आणखी बंदिस्त वाटत. त्यांचं ठरीव स्वरूप मला सहन करावं लागत असे. ध्वज लावण्यापासून ते तो उतरवेपर्यंत सगळा घटनाक्रम लागलेला असे. कार्यक्रमालाही तेच तेच चेहरे दिसायचे. फक्त कुणाचे डोक्यावरचे केस विरळ होत चाललेले, तर कुणाला चष्मा लागलेला, एवढाच काय तो बदल. वक्ता काय बोलणार हेही ठरलेलं असे. एकदा मी एकाला म्हटलं, “अरे, दर वेळेला तेच तेच किती ऐकायचं?” तो म्हणाला, “जे सांगितलेलं आहे ते जोपयर्ंंत होत नाही तोपर्यंत तेच परत सांगावं लागणार! वेगळं काय सांगणार?” शेवटी काय व्हायला हवं हे ऐकणं हाच एक कार्यक्रम झाला. संघाची काही गीतं मला स्पर्श करून जात. ती गीतं संस्कृतप्रचुर असत. ‘संघ सरिता बह रही है’ या गीताच्या कडव्यात ‘शुष्क मरुभू शेष क्यों फिर ताप भीषण सह रही है?’ हा प्रश्न अगदी तळमळीने विचारल्यासारखा वाटे. त्यातल्या ‘श’चे वेगवेगळे उच्चार व ‘जन्हु की जंघा बिदारी जान्हवी फिर चल पड़ी है’ यातल्या ‘ज’ व ‘न्ह’चे उच्चार मोह घालत. पण यात एक चूक होती. गंगेला पिऊन टाकलेल्या जन्हू ऋषीने तिला जंघेतून मुक्त न करता स्वत:च्या कानातून मुक्त केलं होतं. अत्यंत भावणारं गीत म्हणतानादेखील माझं बौद्धिक मन असं जागं असे. बरीच गीतं ठराविक वळणाची असत. हिंदू, हिमालय, गंगा, महासागर, संस्कृती, राष्ट्र व समाज या शब्दांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जोड्या जमवून अनेक गीतं तयार होत. यांचे कवी कोण असत हे कधीच समजत नसे. त्यातलं ‘यह कल कल छल छल बहती क्या कहती गंगाधारा’ हे मला अजूनही आवडतं. शंभरजणांनी एकत्र म्हणताना ते गंगेच्या लहरींसारखा परिणाम साधे. मी गंगा गोमुखापासून ते कोलकत्यापर्यंत अनेक ठिकाणी पाहिली. ती पाहताना प्रत्येक वेळी या गीताचा अनाहत नाद ऐकू येतो.
गीतगायन झाल्यानंतर स्वयंसेवकांना पद्यातून गद्यात आणण्यासाठी बोधपट नावाचा प्रकार असे. ती जबाबदारी घेतलेला स्वयंसेवक समोर येऊन चार-पाच वाक्यं अत्यंत निर्विकारपणेे बोलून जाई. आज त्यातला एकही बोधपट माझ्या लक्षात नाही. तेव्हाचे माझे मित्र आजही ते तोंडपाठ म्हणून दाखवतात- ‘विजय निश्चित है, क्योकि धर्म के साथ श्री भगवान और उनके साथ विजय रहती है। तो फिर हृदयाकाशसे लेकर जगदाकाश तक भारतमाता की ध्वनी ललकार कर उठो और कार्य पूर्ण करके ही रहो।’ झोपेतून उठवलं तरी हे आम्ही म्हणू शकतो, असंही ते म्हणतात. या बोधपटात कुणावर विजय अपेक्षित होता ते मला अजूनही कळलेलं नाही.
बोधपट म्हणणार्याने इतकं निराकार बोलल्यावर पुढच्या प्रमुख वक्त्याला मोकळीकच असे. काही सन्माननीय अपवाद वगळता बोलण्याचं कौशल्य असलेला वक्ता रामायण, महाभारत, पुराणं, इतिहास, भूगोल, राजकारण, धर्म, वेद, विज्ञान यांच्यातल्या सीमा पार पुसून टाकून त्या सार्यांची चविष्ट पण माझं पोट न भरणारी एक विलक्षण भेळ तयार करे. कार्यक्रम संपल्यावर जे एकमेकांना भेटणं होई त्यात प्रामाणिक, मोकळा बंधुभाव दिसे. कार्यकर्ते तेवढ्यासाठी कार्यक्रमाला येतात असं वाटे. तयार स्वयंसेवक वक्त्याचं भाषण संपता संपता येत. ही युक्ती आचरणात आणायला मी फार काळ घेतला नाही. हळूहळू मला त्याचाही कंटाळा आला.
तरीही एकाच गावात राहून संघातल्या व्यक्तींना पूर्ण टाळणं अशक्यच होतं. त्यातल्या अनेकांच्या निरागसतेबद्दल माझ्या मनात ओलावा होता. त्यांनाही ठाऊक होतं, की याला सारखं वेगळं, नवीन काही तरी लागतं. अनेक वर्षांनी नागालँडच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याच्या धडपडीत त्यांनी मला सामील करून घेतलं. त्या नागालँड दौर्यादरम्यान मी अत्यंत ‘श्रद्धावान’ स्वयंसेवक पाहिले. त्यांत फक्त पुरुष नव्हते, तर राष्ट्र सेविका समितीमधून आलेली नीता बर्वेसारखी मुलगीदेखील होती. फिजिओथेरपीचं शिक्षण घेतलेली ही तरुण मुलगी तीन-चार वर्षांपासून नागालँडच्या मिसलुमी नावाच्या हजारभर वस्तीच्या खेड्यात राहत होती. ती खेड्यातल्या लोकांना औषधं देऊन त्यांचे लहानसहान आजार बरे करायची, बायकांची बाळंतपणं करायची. सलाइन लावणं, इंजक्शनं देणं सारं तिने शिकून घेतलं होतं. दिमापूरमध्ये उदय सोनटक्केच्या खोलीवर गेलो. तिथे अगदी जेमतेम सामान होतं. त्याच्याकडे संघवाङ्मय औषधालाही नव्हतं. तो खेड्यांमधे फिरत वेगवेगळ्या निमित्ताने संबंध निर्माण करत राही, त्यांना संघटनेशी जोडत राही. क्वचितच स्वत:च्या खोलीवर येई.
गोहाटीच्या संघ कार्यालयात मधुकर लिमये भेटले. अमर चित्रकथांचं ईशान्य भारतातल्या वनवासी भाषांमध्ये भाषांतर करून त्या प्रकाशित करण्यात त्यांचा वाटा होता. बंगाली, आसामी भाषा त्यांना अस्खलित येत. फाळणीपासून संघाचे प्रचारक म्हणून ते आसाममध्ये होते. त्यांचं ‘खट्टी मिठी यादें’ हे पुस्तक म्हणजे मन प्रसन्न करणारं लेखन आहे. पुस्तकात त्यांनी कठीण प्रसंगांपासून ते अगदी रोजच्या घटनांपर्यंत, तसंच अनेक मोठ्या अधिकार्यांपासून ते कार्यालयातल्या स्वयंपाक करणार्या व्यक्तींबद्दल सारख्याच आत्मीयतेने लिहिलं आहे. हे लेखन मार्गदर्शनपर आहे, पण माझाच मार्ग खरा असा आग्रह नाही. दुसर्याला अक्कल शिकवण्याचा मोह नाही, देशभक्तीचा आवेश नाही. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी लिहिलं आहे, ‘( यह लिखने में) उस काल का एक अकर्ता प्रत्यक्षदर्शी इतनीही मेरी भूमिका है । अंततोगत्वा यह लेखन स्वान्त:सुखाय मात्र है।” ५६ वर्षं कार्यकर्ता असलेल्याने स्वत:ला सहजपणे अकर्ता म्हणवून घेणं हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे केवळ म्हणवून घेतलेलं नाही, तर ते लेखनातून प्रकट झालेलं आहे. संघटनेत आल्यामुळे समाजाच्या अगदी तळात असलेल्या व्यक्तींची वैयक्तिक प्रगती कशी झाली त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. तसंच, प्रशिक्षण वर्गात चोर्या करणार्या मुलांबद्दल, कार्यकर्त्यांच्या व अधिकार्यांच्या वैयक्तिक रुसव्या-फुगव्यावर, अहंकारावरही त्यांनी लिहिलं आहे.
संघटन हा स्वभाव असणारी अशी माणसं ‘संघटनेसाठी संघटन’ हे ब्रीदवाक्य असणार्या या संस्थेत दुर्मिळ होती. धुमकेतूसारखी ती मध्येच भेटत. संघटनेच्या भानाची काठी हातात आडवी पकडून तर्क आणि प्रेम यांच्यामधल्या सीमारेषेच्या तारेवर त्यांचा प्रवास चालू असे.
अशा माणसांची श्रद्धा मला हलवून सोडे. या संदर्भात रवींद्रनाथांनी सांगितलेली बर्ट्रांड रसेलच्या संबंधातली एक आठवण आहे. एकदा दोघंजण सकाळी केंब्रिज विश्वविद्यालयाच्या परिसरात फिरत असताना जवळच्या चर्चमधून प्रार्थनेचे धीरगंभीर स्वर ऐकू आले. रवींद्रनाथांनी प्रार्थना ऐकण्यासाठी आत जाण्याचं सुचवलं, तसा रसेलने नकार दिला. म्हणाला, “आतले प्रार्थनेचे स्वर, तिथल्या हवेत दरवळणारा सुगंध, रंगीत नक्षीदार काचा या सर्व गोष्टी माझ्या मनात अशा भावना उत्पन्न करतात ज्यांना माझी बुद्धी मान्यता देत नाही.” नागालँडच्या दौर्यात माझ्या बाबतीत असंच काहीसं झालं आणि अशी श्रद्धा ठेवून आपल्याला काही करणं शक्य नाही, हेदेखील अधिक प्रकर्षाने जाणवलं. तिथून पुढे मी संघवर्तुळापासून अधिकच दूर होत गेलो.
एकेकाळच्या आमच्या लहान गावाचं आता शहरात रूपांतर झालं आहे. सकाळी आठ ते संध्याकाळी सात असा एकेकाळी नोकरीचा वेळ ठरलेला असे, आता तो अनिश्चित झाला आहे. कुटुंबं लहान होत चालली आहेत. आर्थिक उदारीकरणाने मध्यमवर्गीय आकांक्षांत लक्षात येण्याजोगा फरक पडला आहे. परिणामत:, आजकाल सायंकाळच्या वेळी बर्याचदा आमच्या मैदानावर संघ शाखा क्वचितच लागलेली दिसते. गावातल्या इतर मैदानांतल्या शाखांचीही परिस्थिती वेगळी नाही. माझं गाव सोडलं तर इतर ठिकाणची परिस्थिती एका मर्यादेपलीकडे समजावी अशा संघवर्तुळात मी कधीच नव्हतो. अशा परिस्थितीचा प्रचारक संस्थेवरही परिणाम होणार हे उघड आहे. गेल्या २० वर्षांत क्वचितच एखादा कार्यकर्ता गावातून पूर्णवेळ म्हणून बाहेर पडला आहे.
आज ‘आपली संघटना म्हणजेच देश’ या विश्वासाची परिणती ‘इतर विचारधारा, संघटना देशद्रोही आहेत’ असं कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे वाटण्यात होत आहे. कुठल्याही विषयाच्या निरपेक्ष ज्ञानावर संघ परिवाराचा कधीच भर नव्हता. ज्ञान हे शेवटी सत्याचा शोध घेण्याच्या इच्छेतून येतं, कुठल्याही आज्ञेतून नाही. मात्र, संघात सारा भर ‘संघटन में शक्ति है’ या ब्रीदवाक्यावर आहे. शक्ती असेल तर सत्य वाकवता येतं, हा अहंकार यात दिसतो. संघाच्या मातृभूमीच्या प्रार्थनेतदेखील शक्तीचीच आराधना आहे. विवक्षित क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती अशा अधिकारमय वातावरणात काम करायला तयार होत नाहीत हे आपण गेल्या चार-पाच वर्षांत पाहिलं.
आज जवळपास ८० टक्के भारतावर संघ परिवाराची सत्ता आहे. सत्ता आल्यावर ज्याला ‘नेम ड्रॉपिंग’ असं म्हणतात तशा प्रकारे केंद्रीय नेत्यांच्या नावाचा वापर सुरू झालेला मी अगदी आमच्या गावातही अनुभवला. राजकीय सत्ताकेंद्राजवळ राहायला प्रत्येकाला आवडतं. हे सारं कुठपर्यंत जाईल हे आज सांगता येत नाही. संघ परिवाराच्या नजीकच्या भविष्याबद्दल मला कुतूहल आहे. असं कुतूहल जन्मापासूनच माझ्यावर स्वार झालेलं आहे. त्यात आंधळी श्रद्धा तर नाहीच, पण ते कोरडंही नाही. आर्थर कोस्लरच्या शब्दांत सांगायचं झालं, तर ‘धिस गॉड ऑल्सो हॅज ऑल द पोटेन्शियल टु फेल’ असं कुंपणावर बसलेल्या मला वाटू लागलं आहे. मुख्य म्हणजे ‘इज देअर एनी गॉड दॅट डज नॉट फेल?’ असा प्रश्नही पडू लागला आहे.
गेल्या चार दशकांत संघाच्या वर्तुळात फिरता फिरता मी गावातल्या त्याच्या केंद्रस्थानापासून किती लांब आलो याचा विचार करताना माझं मलाच हसू येतं. सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे कुतूहल आणि वाचनाची आवड असलेला एक मुलगा शाळकरी वयात सार्वजनिक संघटनेच्या कामात नकळत पडल्यावर त्याला जे अनुभव आले, काळानुसार त्याच्या दृष्टिकोनात, आकलनात जे बदल झाले, तसंच संघ परिवारातला एक शक्तिमान घटक ठामपणे राजकीय सत्तेत आल्यावर त्याला ज्या गोष्टींची चाहूल लागली त्याची ही नोंद आहे.
- रवींद्र कुलकर्णी
------------------------------------------------------------------------
आपल्या आसपास घडणाऱ्या पण आपल्या विचारविश्वाचा भाग नसणाऱ्या घडामोडी समजून घ्याव्यात, त्या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करावा, आपल्या म्हणण्यापल्याडचे काही दृष्टिकोन समजून घ्यावेत, आपल्याला न दिसणारं जग जाणून घ्यावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच 'अनुभव' मासिकाचा दर महिन्याचा अंक म्हणजे आपला भवताल, आपला समाज समजून घेण्यासाठीची धडपड असते. अनुभव'च्या परिवाराचा एक भाग बनून तुम्हीही या प्रवासात सामील होऊ शकता.'अनुभव'चे वर्गणीदार बना
Interesting! I wondered though if the analysis presented here would not be equally true/valid for each and every "organized" group, political, social or religious. In Western literature, there is this notion of growing up that includes a mock for, a disenchantment about the people and/or groups loved/respected during the earlier stages of one's growth. The article gives that feel, universally applicable to individuals/institutions, not only to the author's attitude to "sangha".
उत्तर द्याहटवाMay be, one day one wd get to read a similar write-up about the claustrophobia that one of the G-21 ( I am not sure about the number, sorry!) felt in the "congress-y" culture.
उत्तर द्याहटवाOr, may be, it is not the (intellectual) fashion yet. One would have to wait a little longer!?!
Or equally possible that such iconoclastic articles by one of the dissenting, rebelling leaders is already available, and I have not read it.
And, my second post about the claustrophobia and iconoclasm? Where did it disappear?!?
उत्तर द्याहटवाआम्हाला इंग्रजी येत नाही, त्यामुळे सर्व डोक्यावरुन गेले आहे,
हटवासारांष तरी मराठी मधे देत जा.