टेनिस क्रिकेटचं अज्ञात विश्व: तुषार कलबुर्गी


क्रिकेटच्या मुख्य धारेत प्रवेश मिळू न शकलेल्यांनी गेल्या काही वर्षांत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. व्यवस्थेविरुद्ध जणू बंड पुकारत उभारलेल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अज्ञात, पण थरारक विश्वाचा फेरफटका.


भारतातली बहुतेक मुलं लहानपणापासून क्रिकेट खेळतात. ज्यांच्यात विशेष कौशल्य असतं, ती कधी ना कधी भारताकडून खेळायचं असं स्वप्न बाळगून असतात. पण साऱ्यांचीच स्वप्नं पुरी होत नाहीत. मग अंगात हुनर अन्‌‍ खेळण्याची जिगर असलेले हे खेळाडू काय करतात?

क्रिकेटच्या मुख्य धारेत प्रवेश मिळू न शकलेल्यांनी गेल्या काही वर्षांत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. व्यवस्थेविरुद्ध जणू बंड पुकारत उभारलेल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अज्ञात, पण थरारक विश्वाचा फेरफटका.

 दोन मातब्बर संघांचा क्रिकेट सामना सुरू आहे. 30-35 हजार प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरलंय. सामना रात्रीचा असल्यामुळे चारही बाजूंनी दिव्यांचा झगमगाट आहे. सामना एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाला शेवटच्या षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइकला सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळख असलेला फलंदाज. दोन सणसणीत षट्‌‍कार ठोकून तो सामना 3 चेंडूंत 10 धावा असा आवाक्यात आणतो. नंतर तितक्याच ताकदीचा फटका मारतो; पण सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक झेप मारून अप्रतिम झेल घेतो आणि फलंदाजी करणारा संघ हरतो. जिंकलं-हरलं कोणीही असलं तरी हजारो प्रेक्षकांना ‘काँटे की टक्कर' पाहायला मिळाल्याचं समाधान मिळालेलं असतं..

हे वर्णन कुठल्याही आंतरराष्ट्रीय सामन्याचं किंवा आयपीएलचं असू शकतं. गेला बाजार रणजी सामन्याचं तर नक्कीच. पण हा सामना ना आंतरराष्ट्रीय होता, ना आयपीएल, ना रणजी. मग 35 हजार प्रेक्षक अशा कुठल्या सामन्यासाठी जमले होते?

हा होता टेनिस क्रिकेटच्या विश्वात नावाजलेल्या ‘रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी'चा अंतिम सामना. आमनेसामने होते टेनिस क्रिकेटचे भारतातील दोन मातब्बर संघ, प्रतीक इलेव्हन आणि रायगड. टेनिस क्रिकेट म्हणजे टेनिस बॉलने खेळलं जाणारं क्रिकेट. या टेनिस क्रिकेटबाबत आपल्यापैकी बहुतेकांची पाटी कोरी आहे, पण आपल्या दृष्टीआड टेनिस क्रिकेटची समांतर आणि तितकीच थरारक सृष्टी आहे.

पूर्वी गल्लीपुरतं मर्यादित असणारं टेनिस क्रिकेट गेल्या काही वर्षांत प्रचंड विस्तारलंय. देशात आणि परदेशांत अनेक ठिकाणी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात. मुंबईमध्ये सुप्रीमो चषक, स्व. रतनबुवा चषक, पुण्यातल्या ग्रामीण भागातली जुन्नर प्रिमियर लीग, रत्नागिरीमध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, गोव्यात सांगे प्रिमियर लीग, भोपाळमध्ये स्व. आलोक महेश्वरी ट्रॉफी, कर्नाटकात उडुपी प्रिमियर लीग या त्यातल्या काही नावाजलेल्या स्पर्धा. भारतात इतरही ठिकाणी अशा स्पर्धा सर्रास होऊ लागल्या आहेत. या स्पर्धांमध्ये विजेत्या संघांना लाखो रुपयांची बक्षिसं असतात. फक्त शहरांमध्येच नव्हे, तर गावांतही या सामन्यांना खचाखच गर्दी असते. शिवाय यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून या स्पर्धांचं लाइव्ह प्रक्षेपणही होतं. त्यासाठी अनेक कॅमेरे लावलेले असतात. व्यावसायिक कॉमेंटेटर सामन्यांमध्ये रंगत आणतात. लाइव्ह आणि रिप्लेसाठी मोठाले एलईडी स्क्रीन असतात. आयपीएलसारखेचकॅमेरे असलेले स्टम्प्स या स्पर्धांमध्येही पाहायला मिळतात. सामने शिस्तबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी प्रोफेशनल अम्पायर्स आणि स्कोररही असतात. पाहायला येणारे लोक क्रिकेटप्रेमी आणि हौशी असतातच; पण आयपीएलहून याचं वेगळेपण म्हणजे हा थरार आणि चुरस पाहायला कोणतंही तिकीट नसतं. या क्रिकेटकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक ओढले जाण्याचं मुख्य कारण हेच आहे. टेनिस क्रिकेट खेळणं आणि बघणंही सामान्य लोकांना परवडतं.

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या प्रतीक इलेव्हन आणि रायगडसारखे संघ आमनेसामने असतील तर माहोल वेगळाच असतो. या दोन संघांनी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बहुतांश सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांची कामगिरी पाहून टेनिस क्रिकेटचा वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या दुबईतल्या स्पर्धेसाठी त्यांना बोलावलं गेलं आहे. यूट्युबवर त्यांचा खेळ पाहून कतारच्या स्पर्धेचं ही त्यांना निमंत्रण आलं. हे निमंत्रण सार्थ ठरवत या दोन्ही संघांनी वेगवेगळ्या वर्षी दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं आहे. या संघांमधल्या अनेकांनी टेनिस क्रिकेटच्या जिवावर आपले हलाखीचे दिवस संपवले. घरं घेतली, दुकानं थाटली, व्यवसाय उभारले. एका आयुष्यात टेनिस क्रिकेटच्या जोरावर त्यांनी स्वत:चे दिवस पालटून टाकले. 

काय आहे हे टेनिस क्रिकेटचं जग? कुठून आले हे खेळाडू? कसे तयार झाले संघ? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल.

1983मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला आणि आपल्याकडे क्रिकेटचा ज्वर वाढला. गल्ल्यागल्ल्यांमध्ये मुलं क्रिकेट खेळू लागली. पालकांना आपली पोरं कपिल देव-सुनील गावस्कर व्हायला पाहिजेत, अशी स्वप्नं पडू लागली. क्रिकेट प्रशिक्षणाच्या ॲकॅडमी सुरू झाल्या. पण हे सगळं असलं तरी एक मुख्य अडथळा होता. क्रिकेट खेळणं चांगलंच खर्चिक होतं. बॅट-लेदर बॉल महाग. त्यात लेदर बॉल चांगलाच टणक. वेगाने येणारा बॉल लागला तर माणूस रक्तबंबाळच व्हायचा. म्हणजे पॅड, हॅन्डग्लोव्ह्‌‍ज आणि हेल्मेटशिवाय लेदर बॉलने खेळणं अशक्य. म्हणजे तोही खर्च आला. यावर पर्याय म्हणून सामान्य लोक रबर आणि लॉन टेनिसच्या चेंडूवर क्रिकेट खेळू लागले. साहजिकच मुंबईत याचं प्रमाण जास्त होतं.

सुरुवातीला स्पर्धात्मक मुख्य धारेतील क्रिकेटकडे जाण्याचा रस्ता टेनिस बॉल क्रिकेटमधूनच जात असे. आधी टेनिस बॉलवर सराव करायचा आणि मग लेदर बॉलकडे वळायचं, असा शिरस्ता. पण खेळणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड वाढलं. मुख्य धारेचं क्रिकेट कितीजणांना सामावून घेणार हा प्रश्‍न तयार झाला. त्यामुळे स्पर्धा वाढली. मुख्य क्रिकेटमध्ये आपल्याला स्थान मिळत नाही हे लक्षात आल्यावर टेनिस क्रिकेटच्याच स्पर्धा भरवल्या जाऊ लागल्या. आधी मुंबईतल्या एकेका विभागापुरते छोटे छोटे सामने होत. हळूहळू वेगवेगळे संघ तयार होऊन त्यांच्यामध्ये स्पर्धांना सुरुवात झाली. मुंबईतल्या क्रिकेट मंडळांनी छोट्या-मोठ्या स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली.

टेनिस क्रिकेटमध्ये एक काळ गाजवणाऱ्या मुंबईच्या राहुल इलेव्हनचे चंद्रकांत शिंदे सांगतात, “जोपर्यंत वन-डे क्रिकेट सुरू झालं नव्हतं, तोपर्यंत मुंबईत टेनिस क्रिकेटच्याही दोन-दोन इनिंग्जच्या स्पर्धा व्हायच्या. वन-डे सुरू झाल्यानंतर 30-30 ओव्हरचे सामने सुरू झाले. पण या स्पर्धांच्या पारितोषिकाची रक्कम दोन ते पाच हजार रुपये होती. तेव्हा सगळा हौसेचा मामला होता.”

तेव्हा या स्पर्धांचं प्रमाणही मर्यादित होतं. रविवारी, क्वचित शनिवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशीच हे सामने व्हायचे. मात्र, या हौशी स्पर्धांमुळे मुंबईत टेनिस क्रिकेटचे चांगले संघ तयार झाले. मॅचलेस, राहुल इलेव्हन, अमृत हे त्या वेळचे मुंबईतले गाजलेले संघ. वयाच्या 41व्या आयपीएलमध्ये पदार्पण करून अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेणारा प्रवीण तांबे हा मुळात टेनिस क्रिकेटच्या मॅचलेस संघाचा खेळाडू. पुढे तो मुंबईच्या संघाकडून रणजीमध्येही खेळला. अर्थात, टेनिस क्रिकेटमधून मुख्य क्रिकेटमध्ये प्रवेश मिळण्याचं असं उदाहरण विरळाच. पण त्यामुळेच टेनिस क्रिकेटने आपलं समांतर जग तयार केलं. एका अर्थाने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचं बंडच.

चेंबूरमध्ये लॉरेन्स ऊर्फ बाबा रॉड्रिग्ज यांनी 1986पासून टेनिस क्रिकेटची रात्रीची प्रकाशझोतातली स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. त्या स्पर्धेला अनिल कपूर, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती वगैरेंना आमंत्रित करण्यात आलं होतं. ही स्पर्धा टेनिस क्रिकेटला वळण देणारी ठरली. पहिल्या दोन वर्षी विजेत्या संघांना पाच हजारांचं बक्षीस होतं; पण दोन वर्षांनंतर या स्पर्धेने विजेत्यांना एक लाख रुपये आणि स्पर्धेच्या मानकऱ्याला हीरोहोंडा जाहीर करून गल्ली क्रिकेटविश्वात खळबळ माजवली. मिथुन चक्रवर्तीने या स्पर्धेला लाख रुपयांचं प्रायोजकत्व दिलं होतं. त्याच वर्षी राज कपूर यांचं निधन झाल्यामुळे स्पर्धेला ‘राज कपूर मेमोरियल ट्रॉफी' असं नाव दिलं गेलं. पुढे या स्पर्धेला क्रिकेट जगतातले दिग्गज कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर वगैरेंनी हजेरी लावली. लवकरच ही स्पर्धा टेनिस क्रिकेटचा ‘आशिया कप' म्हणून ओळखली जाऊ लागली. टेनिस क्रिकेटमधले प्रसिद्ध समालोचक हरेश पंड्या सांगतात, “राज कपूर ट्रॉफी सुरू व्हायच्या आधी विजेत्यांना किरकोळ बक्षीस असायचं; पण या स्पर्धेनंतर बक्षिसाच्या रकमा हळहळू वाढू लागल्या. तिथून टेनिस क्रिकेटचं जग बदललं.”

मुंबईत या घडामोडी घडत होत्या तेव्हा पुण्यामध्येही अशा छोट्या-मोठ्या स्पर्धा भरवायला सुरुवात झाली होती. सनी इलेव्हन, शायनिंग स्टार, डायमंड वगैरे संघ या स्पर्धांमध्ये गाजत होते. सनी इलेव्हन या संघाचे संस्थापक जयंत भोसले यांनी चार दशकांहून अधिक काळ सर्व प्रकारचं क्रिकेट पाहिलेलं आहे. ते सांगतात, “डेक्कन आणि पी.वाय.सी.च्या मैदानावर टेनिस खेळून जुने झालेले बॉल ग्राऊंड्समन गोळा करायचे. ते बॉल आम्ही त्यांच्याकडून 50 पैशाला, रुपयाला खरेदी करायचो. त्या बॉलवर आम्ही क्रिकेट खेळायचो. घोरपडे पेठेतल्या ‘हनुमान व्यायाम मंडळा'ने या बॉलवर पहिली फुलपीच क्रिकेट टूर्नामेंट भरवली होती. या स्पर्धांचं लोण हळहळू वाढत गेलं. टेनिस क्रिकेटचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन एम.आर.आय. कंपनीने थोडं जास्त वजन असलेला आणि जास्त ट्रॅव्हल होणारा बॉल काढला.”

विषय निघालाच आहे, तर पुढे जाण्याआधी टेनिस क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉल आणि बॅटबद्दलही थोडं सांगायला हवं. टेनिस बॉलवर थोडी लव असते. त्यामुळे सुरुवातीची काही षटकं गोलंदाजांना मदत होते. बॉल स्पिन होतो. फलंदाजाने कितीही ताकदीने फटका मारला तरी कापसामुळे चेंडू लांब जात नाही. त्यामुळे उंचावरून फटका मारला गेला तर फलंदाज सीमारेषेजवळ झेलबाद होण्याची शक्यता असते. सुरुवातीची काही षटकं संपल्यानंतर त्यावरचा कापूस निघून जातो आणि बॉल जास्त ट्रॅव्हल होऊ लागतो. फटके लांब लांब जातात. त्याचा फायदा फलंदाजांना होतो. स्पर्धा वाढू लागल्यावर बॅट-बॉलमध्ये सुधारणा-प्रमाणीकरण सुरू झालं. खेळाच्या गरजेनुसार बॉलमध्ये बदल झाले, तसे बॅटमध्येही झाले. पूर्वी टेनिस क्रिकेटसाठी नेहमीच्याच जड बॅट वापरल्या जायच्या. लेदर बॉल क्रिकेटमध्ये बॅटचं वजन 1.2 किंवा 1.3 किलो असतं; पण टेनिस बॉलला एवढी जड बॅट आवश्यक नसते. टेनिस बॉल शक्यतो बॅटच्या खालच्या भागातून टोलवला जातो. त्यामुळे हा हिटिंग पॉइंट सोडून बॅटच्या वरच्या भागातली जाडी अनावश्यक ठरते. म्हणून वरच्या भागातलं लाकूड खाचा करून काढण्याची कल्पना पुढे आली. त्यातून बॅट 200 ते 300 ग्रॅमने हलकी झाली. अशी खाचा केलेली बॅट तुटू नये म्हणून ती विशिष्ट तापमानात तापवली जाते. याला बॅट बॅलन्स करणं म्हणतात. टेनिस क्रिकेट पावसाळ्यातही खेळलं जात असल्यामुळे त्यासाठी आणखी वेगळ्या बॅट वापरल्या जातात. पावसात लाकूड खराब होऊ नये म्हणून बॅटला ऑईलपेंटही लावला जातो. टेनिस क्रिकेट आता फक्त गल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, हे यावरून कळावं.

तर आपण बोलत होतो पुण्यातल्या संघांबद्दल. पुण्यामध्ये जयंत भोसले यांनी 1978 साली ‘सनी इलेव्हन' या संघाची सुरुवात केली होती. हे नाव त्यांनी अर्थातच सुनील गावस्कर यांच्या ‘सनी' या टोपणनावावरून ठेवलं. या संघाने वीस वर्षांहून अधिक काळ टेनिस क्रिकेटवर वर्चस्व गाजवलं. त्यानंतर पुण्यामध्ये कॅम्प बॉईज्‌‍, सूर्या, टार्गेट वगैरे असे बरेच हौशी क्रिकेट संघ उदयाला आले. जयंत भोसले सांगतात, “मला क्रिकेटचं इतकं वेड होतं, की दिवसभर क्रिकेट खेळायला मिळणार नाही म्हणून मी पूर्ण वेळच्या नोकऱ्या नाकारल्या. पेपरचा व्यवसाय सुरू केला. तेव्हा स्पर्धांसाठी एंट्री फी असायची. तीही आम्हाला स्वतःच्या खिशातून भरायला लागायची. दोन-पाच हजार बक्षीस असायचं. प्रत्येकाला वाटण्या यायच्या तेवढ्यातून आमचा खर्च कसाबसा भागायचा.”

साधारण 2000च्या आसपास पुण्यातल्या चांगल्या संघांचे काही खेळाडू एकत्र आले. टेनिस क्रिकेटमध्ये काही तरी भन्नाट करायचं या ध्येयाने त्यांनी ‘डिंगडाँग' नावाचा संघ सुरू केला. या संघाने पुढे टेनिस क्रिकेटच्या जगावर अक्षरशः राज्य केलं. प्रशांत चौधरी, मारुती वळगुडे, नितीन देवगिरीकर, सचिन गाडे, राहुल भोंडवे हे संघाचे मुख्य खेळाडू. पुढे विशाल कांबळे, संदीप जगताप, अफजल शेख, मारुती वैराट, संदेश पार्टे, अविनाश रामगुडे, अमोल परदेशी, सुनील गुंजाळ, सचिन राठोड, श्रीकांत देसाई वगैरे सामील झाले. हे पुण्यातल्या चारही कोपऱ्यांतले चांगले खेळाडू होते. हा संघ बांधण्याचं काम प्रशांत चौधरी यांनी केलं. हे सगळे खेळाडू सामान्य घरांतले होते. कोणी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करायचा, कोणी रिक्षा चालवायचा, तर कोणी ड्रायव्हर होता. सगळ्यांमध्ये क्रिकेटची खुमखुमी होती. मात्र, मुख्य धारेतल्या क्रिकेटपर्यंत त्यांचे हात पोहोचू शकत नव्हते. यातल्या काही खेळाडूंनी लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपलं नशीब अजमावून बघितलेलं होतं. ‘डिंगडाँग'चे जुने खेळाडू अफजल शेख यांचं उदाहरण पाहा. त्यांचे वडील पीएमटीमध्ये कामाला होते. ते पीएमटीकडून क्रिकेट खेळायचे. त्यामुळे अफजल यांनाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. ते सांगतात, “शाळेच्या टीमकडून मी लेदर बॉल क्रिकेट खेळायला लागलो. बॅटिंग आणि विकेटकीपिंगही चांगली करायचो. महाराष्ट्र अंडर नाइन्टीनच्या सिलेक्शनपर्यंत गेलो. साधारण 300 खेळाडू या सिलेक्शनसाठी आले होते. पहिल्याच सिलेक्शनमध्ये माझं नाव फायनल 30च्या स्क्वाडमध्ये आलं; पण अंतिम 15 जणांमध्ये निवड झाली नाही. मी पुन्हा प्रयत्न केला; पण पुन्हा तेच. पहिल्या तिसांत नाव आलं, पण पुढे नंबर लागला नाही. असं चार वेळा घडलं. माझी इच्छा उडाली. मी माझं किट एका होतकरू मित्राला देऊन टाकलं आणि लेदर बॉलला कायमचा अलविदा केला.”

‘डिंगडाँग'च्या संदेश पार्टे यांचीही कथा अशीच. “मी महाराष्ट्र संघाच्या सिलेक्शनच्या मॅचेस खेळलो. चांगला परफॉर्मन्स दिला. फायनल 30च्या स्क्वाडमध्ये लागलो; पण शेवटच्या 15 जणांमध्ये नाव नव्हतं. मी स्वतःला समजावलं, असतील माझ्यापेक्षा चांगले खेळाडू. पुन्हा सिलेक्शनच्या मॅचेस खेळलो. पुन्हा तेच. शेवटी मी या वेळेस सिलेक्शन करणाऱ्यांना कारण विचारलं, तर ते म्हणाले, ‘तू स्टँडर्ड क्रिकेट खेळतो का? आडव्या बॅटचा प्लेअर आहेस तू!' मग मी तो नाद सोडला.” 

अशा खेळाडूंमधून डिंगडाँग संघ सुरू झाला. जिथे जातील त्या स्पर्धा जिंकण्याचा त्यांनी धडाकाच लावला. त्यातून ‘डिंगडाँग'चं नाव गाजू लागलं. टेनिस क्रिकेट अनौपचारिक असल्यामुळे त्यामध्ये अजूनही विक्रमांची नोंद ठेवण्याची पद्धत नाही. अन्यथा, ‘डिंगडाँग'ने रचलेले एकेक विक्रम अचंबित करणारे आहेत. उदाहरणार्थ, ‘डिंगडाँग'ने सलग 97 सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पुण्यामधील प्रतिष्ठित ‘रमणबाग चषक'मध्ये 6 चेंडूंत 6 षट्‌‍कार मारणारा आणि 16 षटकांच्या सामन्यात शतक ठोकणारा पहिला खेळाडू होता ‘डिंगडाँग'चा विशाल कांबळे. अशा विक्रमांमुळे ‘डिंगडाँग'चा दबदबा वाढत गेला. हा संघ 2000 सालानंतर मुंबईच्या मातब्बर संघांना हरवू लागला.

आणि त्याच वेळी टेनिस क्रिकेटमध्ये आणखी एक वळण आलं. ‘डिंगडाँग'च्या संघाला पॅकर मिळाला. पॅकर म्हणजे स्पॉन्सर. या नावामागेही एक गोष्ट आहे. केरी पॅकर या ऑस्ट्रेलियन उद्योजकाने 1977 मध्ये आपल्या चॅनेलला आंतरराष्ट्रीय सामन्याच्या प्रक्षेपणाचे हक्क नाकारले म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्ससोबत करार करून ‘वर्ल्ड क्रिकेट सिरीज' नावाची स्पर्धा सुरू केली होती. थोडक्यात, तेही प्रस्थापितांविरुद्धचं बंडच होतं. त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्येही स्पॉन्सरला पॅकर म्हटलं जाऊ लागलं.

तर ‘डिंगडाँग'ला अधूनमधून पॅकर्स मिळू लागले; तरीही अडचणी होत्याच. कधी पॅकर्स पूर्ण पैसे द्यायचे नाहीत, तर कधी टांगच मारायचे. सगळे खेळाडू सामान्य घरांतले. त्यांना प्रत्येक वेळी स्पर्धेची एंट्री फी भरणं शक्य नसायचं. त्यामुळे पुण्याबाहेरच्या मोजक्याच स्पर्धा त्यांना खेळता यायच्या. तेव्हा बक्षीस पाच-दहा हजार रुपयांचं असायचं आणि सामना जिंकल्यानंतरच पैसे मिळायचे. हरले तर खिशातलेच पैसे जायचे. संदेश पार्टे सांगतात, “आम्ही सगळेच काही तरी काम करून क्रिकेट खेळणारे. त्यामुळे क्रिकेट खेळणं बंद करून कामधंद्याकडे लक्ष द्यायला हवं, असं एकीकडे सतत वाटत असायचं, एवढी वाईट परिस्थिती होती.”

पण 2005मध्ये या संघाला एका पॅकरच्या स्वरूपात संजीवनी मिळाली. संदेश पार्टे सांगतात, “मी कामाला होतो, त्या प्रतीक असोसिएट्सचे मालक मोहन घारे माझी विचारपूस करायचे. आम्ही गरीब घरांतली पोरं क्रिकेटसाठी खूप पळापळ करतो हे त्यांना कळत होतं. त्यांनी आमच्या संघाला स्पॉन्सरशिप देऊ केली. तोवर स्पर्धेला गेलं की जे मिळेल ते खाऊन आम्ही खेळायचो. कधी कधी नुसत्या वडापाववरही भागवावं लागायचं. मात्र, मोहन घारे यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि आग्रह धरला, की कुठेही गेलात तरी चांगलंचुंगलं खात जा. त्यांनी आम्हाला फोर व्हीलर दिली, चांगले कपडे दिले, ब्रॅण्डेड शूज दिले. प्रत्येक

स्पर्धेची एंट्री फी भरायची तयारी दाखवली. तेव्हापासून आमचे हलाखीचे दिवस संपले. त्यामुळे 2006पासून आम्ही ‘डिंगडाँग'ऐवजी ‘प्रतीक इलेव्हन' या नावाने खेळायला लागलो.”

ही स्पॉन्सरशिप मिळाल्या मिळाल्या टीम तुळजापूरला खेळायला गेली. विजेत्या संघाला 51 हजार रुपयांचं बक्षीस होतं. दमदार खेळामुळे ‘प्रतीक इलेव्हन'ची एवढी दहशत तयार झाली होती की बाकीचे संघ त्यांच्यासोबत खेळायला तयारच होत नव्हते. त्या वेळी संघाचे स्पॉन्सर मोहन घारेही सोबत होते. तेव्हा त्यांना ‘प्रतीक इलेव्हन'ची ताकद प्रत्यक्ष बघायला मिळाली. अखेर दोन चांगले संघ एकत्र होऊन ‘प्रतीक इलेव्हन'विरुद्ध खेळले. तो सामनाही ‘प्रतीक'ने सहज जिंकला. स्पॉन्सरने हे प्रत्यक्षात पाहिलं आणि त्यामुळे स्पॉन्सरशिप आणखी पक्की झाली.

त्यानंतर ‘प्रतीक इलेव्हन'चा संघ सातत्याने जिंकतच राहिला. क्वचितच सामने चुरशीचे व्हायचे. त्या वेळी मुंबईत प्रसिद्ध असलेल्या ‘राहुल इलेव्हन'चे चंद्रकांत शिंदे सांगतात, “सुरुवातीला आम्ही ‘डिंगडाँग'ला हरवलं; पण एकदा जिंकायला सुरुवात केल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ते आमच्या विरुद्ध सलग जिंकत राहिले.”

सलग दोन वर्षं स्पर्धा जिंकून ‘प्रतीक इलेव्हन'चं नाव सर्वदूर झालं होतं, पण अजूनही एका स्पर्धेला ते गेले नव्हते. रायगड जिल्ह्यामधल्या चिरले गावची स्पर्धा मोठी प्रसिद्ध होती. त्या वेळी या स्पर्धेत विजेत्या संघाला दोन लाख 22 हजार रुपयांचं रोख बक्षीस होतं, पण त्याची एंट्री फी होती 22 हजार रुपये. त्यामुळे या स्पर्धेला जायचं की नाही याबद्दल संघात काचकूच सुरू होती. अफजल शेख सांगतात, “एके दिवशी स्वतःहून या टूर्नामेंटच्या आयोजकांचा फोन आला. तुमची टीम देताय की नाही?” म्हटलं, “एंट्री फी जास्तय.” तर ते म्हणाले,“एंट्री फी देऊ नका. फक्त तुमची टीम घेऊन खेळायला या. आमच्याकडच्या लोकांना तुमचा खेळ बघायचाय.”

चिरलेला जायचं ठरल्यामुळे संघामध्ये उत्साह होता, पण मोठ्या स्पर्धेचं दडपणही होतं. आठवडाभर आधीपासूनच प्लॅनिंग सुरू झालं. कारण ही त्यांच्या आयुष्यातली सर्वांत मोठी आणि सर्वांत जास्त रोख बक्षीस असलेली स्पर्धा होती. स्पर्धेच्या दिवशी संघ वेळेआधीच पोहोचला. मैदानावर कोणीच नव्हतं. पण जशी सामन्याची वेळ झाली तशी गर्दी वाढत गेली. अफजल शेख सांगतात, “मॅचला आतापर्यंत एवढं पब्लिक आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. मैदानाबाहेर दीड-दोनशे फोर व्हिलर लागल्या होत्या. सामन्याच्या आधी धाकधूक वाढली होती. टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय आम्ही घेतला.” आपल्या भेदक गोलंदाजीने ‘प्रतीक इलेव्हन'च्या संघाने प्रतिस्पर्ध्यांना

40 धावांमध्येच रोखलं. फलंदाजीला पहिल्या चार षटकांमध्ये 40 धावा करत सामना सहज जिंकला. पुढेही असेच सामने जिंकत चिरलेची स्पर्धा त्यांनी आपल्या नावावर केली. संदेश पार्टे सांगतात, “त्या वेळेस प्रत्येकाच्या वाटणीला 20-20 हजार रुपये आले. तेव्हा पहिल्यांदा असं वाटलं, की आपण क्रिकेटमध्येच काही तरी चांगलं करू शकतो. तेव्हापासून आम्ही घरीही पैसे द्यायला लागलो.”

तिथून पुढे टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांचं प्रमाण आणि बक्षिसांच्या रकमाही वाढत गेल्या. स्पर्धांना होणारी गर्दी बघून राजकारणी-उद्योजक लोकांना यामध्ये रस वाटू लागला. त्यांनी बक्षिसांच्या रकमांसाठी स्पॉन्सरशिप देऊ केली. पूर्वी छोटा मांडव आणि एक भोंगा एवढंच स्पर्धेचं स्वरूप असायचं. हळूहळू रात्रीच्या स्पर्धा होऊ लागल्या. पूर्वी सामन्यांना क्रिकेट खेळणारंच कोणी तरी पंचगिरी करायचं, पण आता त्याची जागा व्यावसायिक पंचांनी घेतली. मांडव भव्यदिव्य झाले. पाच-दहा-पंधरा हजारांच्या बक्षिसांची जागा आता 50 हजार, एक-दोन लाख रुपयांनी घेतली. सामनावीराला आणि स्पर्धेच्या मानकऱ्याला दुचाकी वगैरे मिळू लागली. जास्त रकमांच्या बक्षिसांमुळे स्पर्धा जिंकण्याची ईर्ष्या वाढली. हळूहळू या स्पर्धांना व्यवसायाचं स्वरूप येऊ लागलं. “आमचं नशीब चांगलं. आम्ही खेळायला सुरुवात केल्यावर योगायोगाने टेनिस क्रिकेटमध्ये पैसा यायला लागला होता.” असं संदेश पार्टे सांगतात.

‘प्रतीक इलेव्हन' फॉर्मात होता. अशातच त्यांना एक हिरा येऊन मिळाला- कृष्णा सातपुते! कृष्णाला कोणी ‘टेनिस क्रिकेटचा सचिन तेंडुलकर' म्हणतं, तर कोणी ब्रॅण्ड अम्बॅसडर. कोणी तर टेनिस क्रिकेटचा देव म्हणायलाही मागेपुढे पाहत नाही. 39 वर्षांचा कृष्णा टेनिस क्रिकेटविश्वात बहुतेक सर्वांत जास्त प्रसिद्धी मिळालेला खेळाडू असेल. जाईल त्या स्पर्धेत त्याच्याभोवती प्रेक्षकांचा गराडा पडतो. सेल्फी घेण्यासाठी, हात मिळवण्यासाठी लोक उत्सुक असतात. आतापर्यंत त्याने स्पर्धेचा मानकरी म्हणून 20 दुचाकी आणि दोन चारचाकी मिळवल्या आहेत. शिवाय इतर वस्तू आणि रोख बक्षिसं वेगळीच. 2023मध्ये होऊ घातलेल्या सहा देशांच्या टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे.

कृष्णाचा जन्म सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या ढवळस गावचा. वडील रेल्वेमध्ये जमादार म्हणून कामाला होते. त्याच्या वडिलांची कुर्डुवाडी स्टेशनला बदली झाली. कुर्डुवाडीमधल्या ग्राऊंडवर कृष्णा मोठ्या मुलांचं क्रिकेट बघत बसायचा, आलेला बॉल द्यायचा, असं करत करत कृष्णा त्यांच्यात खेळू लागला. त्याच्या बॅटिंगची हटके स्टाईल बघून त्याच्या संघातले खेळाडू चक्रावून गेले. थोड्या दिवसांनी तो त्यांच्या संघातला स्टार बॅट्समन बनला. कृष्णाच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. वडील घरात काम करताना पडले आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे कोमात गेले. पुढे त्यांचं निधन झालं. अंथरुणाला खिळलेल्या आईला हा धक्का सहन झाला नाही आणि काही दिवसांनी आईही गेली. त्या वेळेस कृष्णा जेमतेम 21 वर्षांचा होता. लग्न झालं होतं. आईच्या आजारपणात झालेल्या दवाखान्याच्या खर्चामुळे कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. ते फेडण्यासाठी त्याने पडेल ते काम केलं. सिमेंटची पोती उचल, फरशी कटिंगचं काम कर. पण अशी अनेक संकटं कृष्णाच्या आयुष्यात आली, पण तो क्रिकेटला घट्ट चिकटून राहिला.

एकदा इंदापूर तालुक्यात एक स्पर्धा होती. तिथे कृष्णाचा संघ आणि प्रतीक इलेव्हन आमनेसामने आले. त्या सामन्यात कृष्णाने 50 धावा काढल्या. तेव्हाच ‘प्रतीक इलेव्हन'चं कृष्णाकडे लक्ष गेलं. त्यांनी कृष्णाला संघात येण्याची ऑफर दिली. नंतर आणखी एका स्पर्धेत संदेश पार्टे आणि कृष्णा एकत्र खेळले. 10 षटकांमध्ये 108 धावांचं आव्हान होतं. ते संदेश आणि कृष्णाने मिळून सहज पार केलं. तेव्हा कृष्णा इथून पुढे ‘प्रतीक'कडून खेळणार यावर शिक्कामोर्तब झालं. तेव्हापासून ‘प्रतीक'चा संघ आणखी भक्कम आणि अभेद्य झाला.

पुढे आणखी एक वेगवान बॉलर संघाला येऊन मिळाला- विजय पावले! ‘रफ्तार का राजा' म्हणून टेनिस क्रिकेटविश्वात त्याची ओळख आहे. भले भले बॅट्समन त्याच्यासमोर नांगी टाकतात. क्रिकेटविश्वातले प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा सोशल मीडियावर टेनिस क्रिकेट फॉलो करतात. विजय बॅट्समनची दाणादाण उडवतानाचा एक व्हिडिओ त्यांनी पाहिला आणि त्याला आपली कॉमेंट्री देऊन त्यांनी हा व्हिडिओ नव्याने पब्लिश केला. ‘हिले डुले.. तो स्टंप को हिला के रख देगा ये.. विजय के सामने किसी की एक ना चली.. ये विजय आपकी टीम में है तो आपकी विजय पक्की..” अशी दिलखुलास दाद त्यांनी विजयला दिली आहे.

विजयचा जन्म सांगली जिल्ह्यामधल्या बत्तीसशिराळ्याचा. कुटुंब शेतमजुरी करणारं. पण विजयला क्रिकेटची तुफान आवड. गावातल्या एका संघाकडून तो खेळू लागला. त्याची बॉलिंग बघून त्याला कोकणात वगैरे खेळण्यासाठी बोलावणं आलं. नंतर पुण्याचे दौरे झाले. ‘प्रतीक इलेव्हन'ने त्याची गोलंदाजी पहिली आणि संघाकडून खेळण्याची ऑफर दिली. संदेश पार्टे सांगतात, “एकदा नाइटची स्पर्धा होती आणि विजय आमच्याविरुद्ध होता. त्याची यॉर्कर बॉलिंग आमच्यापैकी कोणालाच झेपली नाही.” त्यानंतर ‘प्रतीक'ने विजयला आपल्यात सामावून घेतलं.

विजयने आपलं नशीब लेदर बॉल क्रिकेमध्येही अजमावून बघितलं आहे. तो दिल्लीच्या पेस बॉलिंग अकादमीच्या कॅम्पला गेला होता. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्येही त्याने बॉलिंग केली. लेदरच्या अनेक स्पर्धा तो खेळला; पण पुढे त्याला संधी मिळाली नाही. मग तो टेनिस क्रिकेटमध्ये स्थिरावला. आज तो टेनिस क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट बॉलर मानला जातो. त्याने टेनिस क्रिकेटच्या जोरावर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं. कोल्हापूरला त्याचं पार्टनरशिपमध्ये स्पोर्ट्सवेअरचं दुकान आहे.

‘प्रतीक इलेव्हन'ची टीम अशा रीतीने फुलत गेली, बदलतही गेली. काही जुने खेळाडू खेळायचे थांबले. योगेश पेणकर, एजाज कुरेशी, अभिजित दुधे, मुकेश गोयल, पंकज जाधव वगैरे असे काही नवीन खेळाडू आले. संघ नाव कमावत राहिला. भरपूर पैसेही कमावत राहिला. आता बरेच संघ ‘आयकॉन प्लेअर' म्हणून ‘प्रतीक'च्या एकेका खेळाडूला मानधन देऊन आपल्या संघाकडून खेळायला बोलावतात. अशा आयकॉन प्लेअर्सना 5 ते 20 हजार रुपये मानधन मिळतं. आयकॉन पद्धतीसोबत स्पॉन्सर पद्धतही वाढू लागली आहे. एखादा हौशी क्रिकेटप्रेमी किंवा राजकारणी स्वत:चं नाव चमकवून घेण्यासाठी खेळाडू निवडून एक नवी टीम तयार करतो. त्या टीमचा सगळा खर्च करतो आणि आपल्या मर्जीचं नाव त्या टीमला देतो. उदाहरणार्थ सिद्धिविनायक संघ (प्रतीक इलेव्हन). अशा पॅकर्समुळे खेळाडूंना आणखी पैसा मिळू लागला.

टेनिस क्रिकेट भारताबरोबरच पाकिस्तान, बांगला देश, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीतही खेळलं जातं. दुबईमध्ये ‘अरब प्रिमियर लीग' नावाची स्पर्धा भरते. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश वगैरे देशांतले चांगले खेळाडू तिथे खेळतात. संदेश पार्टे सांगतात, “पहिल्यांदा माझ्या मुंबईच्या एका मित्राने मला या स्पर्धेबद्दल सांगितलं. मी पासपोर्ट काढला आणि लगेच दुबईला एका संघाकडून खेळायला गेलो.”

2016ला ‘टेन प्रिमियर लीग' नावाची टेनिस क्रिकेटच्या इतिहासातली सर्वांत मोठी स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजामध्ये भरवण्यात आली. ‘गली से स्टेडियम तक' ही या स्पर्धेची थीम होती. यात 16 संघ होते. प्रत्येक संघाला प्रायोजक. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगला देश या देशांतल्या चांगल्या खेळाडूंना, संघांना बोलावून ही स्पर्धा भरवली गेली. विजेत्या संघाला 20 लाख रोख रक्कम. शिवाय दुबईमध्ये राहण्याचा, प्रवासाचा खर्च प्रायोजकांचा. पहिल्याच वर्षी ही स्पर्धा ‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्डकप' म्हणून प्रसिद्धी झाली. या स्पर्धेला आयोजकांनी ‘प्रतीक'च्या संघाला खास निमंत्रण दिलं होतं.

संदेश पार्टे सांगतात, “आम्ही सुरुवातीला नुसतं बेभान होऊन क्रिकेट खेळायचो. काही स्वप्नंच नव्हती आम्हाला. पण शारजाच्या ऐतिहासिक मैदानावर पाऊल ठेवलं तेव्हा आपण क्रिकेटमध्ये काहीतरी मिळवल्याचं फीलिंग आलं. ज्या मैदानाने अनेक आंतरराष्ट्रीय सामने पाहिले, त्या मैदानावर आपण खेळतोय याच्यासारखा अभिमानाचा क्षण दुसरा नव्हता.”

भारतात अधिराज्य गाजवणारा हा संघ शारजा मैदानावरही वरचढ ठरला. या संघाने स्पर्धेची फायनल गाठली. फायनलला स्पर्धेचा ब्रॅण्ड अम्बॅसडर वीरेंद्र सेहवागची उपस्थिती होती. फायनलमध्ये ‘प्रतीक'च्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला 60 धावांतच रोखलं. कृष्णा सातपुतेने ओपनिंगला येऊन पहिल्याच तीन चेंडूंत तीन चौकार मारून सामन्याचा निकाल स्पष्ट केला. पुढे हा सामना ‘प्रतीक'ने सात षट्‌‍कांतच खिशात घातला. अफजल शेख सांगतात, “सेहवाग यांच्या हातून टेन प्रिमियर लीगची ट्रॉफी मिळणं हा आयुष्यातला सर्वोच्च आनंद होता.”

पुढे ‘प्रतीक'ला कतारच्या ‘हनान प्रिमियर लीग'ला बोलवण्यात आलं. या संघाने तिथेही स्पर्धा जिंकली. संघाचं नाव आता आशिया खंडाच्या टेनिस क्रिकेटविश्वात दुमदुमू लागलं. त्याबद्दल बोलताना अफजल शेख भावुक होतात. “लेदरबॉल क्रिकेट सोडलं तरी टेनिस क्रिकेट तुफान खेळत होतो. पोटापाण्यासाठी रिक्षा चालवायचो, पण कमाईकडे फारसं लक्ष नव्हतं. बाविसाव्या वर्षी लग्न झालं. एकदा पत्नीला नवीन कपडे हवे होतो. पण माझ्या खिशात पैसे नव्हते. फार वाईट वाटलं. मनात आलं, काय करतोय आपण क्रिकेट खेळून? पण आज मागे वळून बघताना असं वाटतं, की टेनिस क्रिकेटने आपल्याला भरपूर काही दिलं. सुरुवातीला हलाखीत दिवस काढले, पण नंतर बरकत झाली. आज माझ्या मालकीच्या सात रिक्षा आहेत.”

अफजल शेख यांच्याप्रमाणेच टेनिस क्रिकेटच्या जोरावर अनेकांनी आपापली आयुष्यं बदलली. कुणाचे स्वतःचे स्पोर्ट्सवेअर कपड्यांचे व्यवसाय आहेत. कृष्णा सातपुतेचा के. एस. नावाचा बॅटचा ब्रॅण्ड आहे. त्याच्या बॅट परदेशांत जातात. 

“भारतामध्ये टेनिस क्रिकेटविश्वात सर्वांत जास्त यशस्वी टीम म्हणजे प्रतीक!” असे उद्गार टेनिस क्रिकेटचे प्रसिद्ध समालोचक हरेश पंड्या काढतात. बराच काळ ‘प्रतीक इलेव्हन' देशाच्या टेनिस क्रिकेट जगात अभेद्य राहिला. पण शेवटी नवे खेळाडू उदयाला येत राहतात, नवे संघ पुढे येतात. तसाच सध्याचा चमकणारा तारा आहे ‘रायगड'. त्या संघाची चुणूक पहिल्यांदा बघायला मिळाली ती गोव्याच्या एका स्पर्धेत. या स्पर्धेत ‘प्रतीक'चा रायगडशी सामना होता. ‘प्रतीक'ने पहिल्यांदा फलंदाजी करत आठ षटकांमध्ये 98 धावांचा डोंगर उभारला. सहसा ‘प्रतीक इलेव्हन'चे सामने एकतर्फीच होत. त्यातून हा तर नवखा संघ. प्रेक्षकांना वाटत होतं, प्रतीक या संघाला सहजी नामोहरम करेल; पण घडलं वेगळंच. ‘रायगड'तर्फे ओपनिंगला थॉमस डायस हा खेळाडू आला. पहिल्याच चेंडूला षट्कार मारत त्याने फटकेबाजी सुरू केली. सोबतचे एकेक फलंदाज बाद होत गेले, पण तरीही थॉमसचा आक्रमक खेळ कमी झाला नाही. अवघ्या 19 चेंडूंत त्याने अर्धशतक झळकवलं. शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची गरज होती. समोर होता ‘प्रतीक'चा अनुभवी गोलंदाज अविनाश रामगुडे. थॉमसने दोन षटकार खेचत सामना 1 चेंडू 3 धावा अशा दोलायमान स्थितीत आणून ठेवला, पण यॉर्कर चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात थॉमस झेलबाद झाला आणि ‘प्रतीक'ला निसटता विजय मिळाला. पण या सामन्यामुळे टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावर ‘रायगड'चा उदय झाला होता.

रायगड संघाने पाहता पाहता ‘प्रतीक इलेव्हन'ची मक्तेदारी मोडून काढली. गेल्या चार-पाच वर्षांच्या काळात भारतातल्या सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धा ‘रायगड'ने आपल्या नावावर केल्या आहेत. मुंबई, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक, बंगाल या सर्व ठिकाणी जाऊन स्पर्धा जिंकल्या आहेत. ‘प्रतीक'विरुद्धचे बहुतेक सामने ‘रायगड'ने खिशात घातले आहेत. एवढंच नव्हे, तर ‘प्रतीक इलेव्हन'प्रमाणेच भारताबाहेरच्या स्पर्धाही जिंकल्या आहेत. 2020 सालच्या ‘टेन प्रिमियर लीग'च्या विजेतेपदावर त्यांनी मोहोर उमटवली. कतारची स्पर्धाही जिंकली. त्यामुळेच रायगड हा टेनिस क्रिकेटमधला आजचा सर्वांत दमदार संघ मानला जातो.

पनवेलमधल्या नीलेश परदेशी, योगेश पवार आणि अंकुर सिंग या खेळाडूंनी रायगड संघ सुरू केला. योगेश पवार रणजीमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू, नीलेश परदेशी रायगड अंडर नाइन्टीनचा कर्णधार आणि अंकुर सिंग मुंबईला लेदरबॉल क्रिकेटमध्ये आपलं नशीब अजमावायला आलेला. एकदा अंकुर सिंग आणि नीलेश मुंबईच्या मॅचलेस संघाकडून आणि योगेश पवार खोपोलीच्या एका संघाकडून आमनेसामने होते. त्या तिघांनी सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्यानंतरच तिघांनी एकत्र येऊन रायगड संघ सुरू केला. चांगले खेळाडू शोधले. थॉमस डायस, प्रथमेश पवार, जीवित म्हात्रे, विश्वजित ठाकूर, बिलाल राजपूत, संदीप पाटील, बंटी पटेल, अजित मोहिते, सुनील चावरी अशा एक से एक खेळाडूंची भक्कम टीम बनवली. पुढे आणखी खेळाडू वाढून 20 जणांचा स्क्वाड बनला.

रायगड संघाची सुरुवात करणारे खेळाडू नीलेश परदेशी आता संघाचे व्यवस्थापक आहेत. सुरुवातीच्या स्ट्रगलबद्दल ते सांगतात, “आम्ही स्पर्धेसाठी पहिल्यांदा मुंबईला गेलो. पहिला सामना जिंकलो, पण दुसऱ्या सामन्यात आम्हाला गाशा गुंडाळावा लागला. पण त्या निमित्ताने आम्हाला मुंबईचं टेनिस क्रिकेट कळालं. आम्ही सर्व क्रिकेटमधले किडे होतो. आम्ही हार मानणार नव्हतो. सराव चालू ठेवला आणि पुन्हा तोच संघ घेऊन आणखी एक स्पर्धा खेळलो. ती स्पर्धा आम्ही जिंकली, आणि मग जिंकतच गेलो.” ‘रायगड'लाही सुरुवातीला स्पॉन्सर मिळण्यात अडचणी आल्या. कुठल्याही स्पर्धेला स्वखर्चानेच जावं लागायचं. पण मुंबईला येऊन जसजसे ते मॅचलेस, राहुल इलेव्हन, बंड्या बॉईज, अमृत वगैरे नावाजलेल्या संघांना हरवू लागले, तशा स्पॉन्सरशिप्स त्यांच्याकडे चालत येऊ लागल्या.

‘प्रतीक'च्या कृष्णा सातपुतेसारखा ‘रायगड'चा स्टार खेळाडू थॉमस डायस. ‘रायगड'चे बहुतांश खेळाडू लेदर बॉलकडून टेनिस क्रिकेटकडे वळलेले. पण थॉमस मुंबईमध्ये हलक्या बॉलने अंडरआर्म क्रिकेट खेळायचा. वयाच्या 34व्या वर्षी त्याने फुलपीच टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच्या नजाकतपूर्ण, आक्रमक परंतु संयमी फलंदाजीमुळे तो अल्पावधीत स्टार बनला. टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा सातपुतेनंतर कोणाचं नाव घेतलं जातं असेल तर ते थॉमसचं.

थॉमसलाही कृष्णासारखंच खडतर परिस्थितीतून जावं लागलं. त्याचा जन्म दहिसरचा. 1992 चा वर्ल्डकप पाहिला तेव्हापासून डोक्यात क्रिकेटचा किडा घुसला, पण तो गल्ली क्रिकेटपुरताच. घरच्या परिस्थितीमुळे त्याला आठवीतच शाळा सोडावी लागली. लिव्हरच्या आजारामुळे वडिलांचा मृत्यू झालेला. त्यामुळे घरची जबाबदारी येऊन पडली. पोटापाण्यासाठी त्याने अनेक कामं केली. स्पॉटबॉय, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत सुपरवायझर वगैरे. आईला तीव्र डायबेटीस. त्यातच बहिणीला कर्करोगाचं निदान झालं. उपचारांचा खर्च काही लाखांत होता. त्याच्यासमोर कर्ज काढण्याशिवाय पर्याय नव्हता. कर्जाखाली तो पुरता दबला गेला; पण या सगळ्या अडचणी घेरून असतानाही थॉमसने क्रिकेट खेळणं थांबवलं नाही. त्याची बॅटिंग बघून एका लोकल संघाने त्याला फुलपीच स्पर्धा खेळायला बोलावलं. त्या स्पर्धेत धुवांधार बॅटिंग करत तो स्पर्धेचा मानकरी ठरला. त्याच स्पर्धेत त्याची रायगड संघाशी ओळख झाली आणि त्याचं नशीब बदलून गेलं.

थॉमस म्हणतो, “रायगड संघात मी एकदम फिट बसलो. माझी बॅटिंग चांगली होऊ लागली. मला चांगले पैसेही मिळू लागले. मी शेवटची नोकरी करत होतो तेव्हा मला 17 हजार पगार होता. त्यापेक्षा जास्त पैसे क्रिकेटमधून मिळू लागल्यावर मी नोकरी सोडून पूर्णवेळ खेळू लागलो. क्रिकेटनेच मला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढलं.” थॉमसचा आज स्पोर्ट्‌‍स वेअर कपड्यांचा आणि बॅटचा व्यवसाय आहे. शिवाय विराट स्पोर्ट्‌‍स वेअर कंपनीचा तो ब्रँड अम्बॅसडर आहे.

प्रतीक इलेव्हन आणि रायगड हे संघ टेनिस क्रिकेटमध्ये चमकत असतानाच यूट्युबने लाइव्हचं फीचर दिलं. बहुतेक सामने कॅमेऱ्यासमोर होऊ लागले. त्यामुळे टेनिस क्रिकेट आरपार बदललं. ऑनलाइन प्रेक्षक वाढला. प्रतीक इलेव्हन आणि रायगडचे सामने सर्वांत जास्त पाहिले जाऊ लागले. त्यातही रायगड आघाडीवर. ‘रायगड'ची कामगिरी बघून त्यांना कतारमधील प्रतिष्ठेच्या ‘हनान प्रिमियर लीग'चं बोलावणं आलं. तिथेही रायगड फायनलला पोहोचला. फायनलला समोर होता ‘प्रतीक इलेव्हन'चा संघ. ‘प्रतीक'ने सहा षटकांत 53 धावांचं आव्हान ‘रायगड'समोर ठेवलं. त्या आव्हानाचा पाठलाग करत शेवटच्या चार चेंडूंमध्ये चार धावा असा सामना येऊन ठेपला. तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अष्टपैलू विश्वजित ठाकूरने षटकार ठोकून परदेशी भूमीवर ‘रायगड'ला पहिलं विजेतेपद मिळवून दिलं.

पुढे ‘रायगड'च्या संघासाठी आणखी गौरवाचे क्षण येणार होते. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजकांनी एकदा ‘रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र' आणि त्याच्या पुढच्या वर्षी ‘रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया' असे प्रदर्शनीय सामने सलग दोन वर्षं भरवले. या दोन्ही सामन्यांना 50 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी गर्दी केली. या जबरदस्त कामगिरीमुळे ‘टेन प्रिमियर लीग'च्या टेनिस क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेत

‘रायगड'ला बोलावलं गेलं. तिथेही ‘रायगड'ने अंतिम फेरीत धडक मारली. शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना विश्वजित ठाकूरने झुंजार बॉलिंग केली आणि केवळ सात धावा देऊन विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दुबईच्या मातीवरची ही स्पर्धा ‘रायगड'च्या संघासाठी अनेक अर्थांनी विशेष ठरली. त्या स्पर्धेत सर्वांत जास्त धावा ठोकलेल्या थॉमसने बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावला. अष्टपैलू कामगिरी करत विश्वजित ठाकूर स्पर्धेचा मानकरी ठरला आणि योगेश पवारने स्पर्धेत सर्वांत जास्त षट्‌‍कार ठोकण्याचा पराक्रम केला.  

‘टेन प्रिमियर लीग'मध्ये भारतातून टेनिस क्रिकेटर येतात तसे पाकिस्तानातूनही येतात. भारत-पाकिस्तान सामन्यांची लोकप्रियता माहीत असल्यामुळे आयोजकांनी भारत विरुद्ध पाकिस्तान असा प्रदर्शनीय सामना भरवला. भारतीय संघात रायगड संघाच्या चार खेळाडूंचा समावेश होता. भारतीय संघाचं नेतृत्वही ‘रायगड'च्या अंकुर सिंगने केलं. दहा षटकांच्या सामन्यात थॉमस डायसने सर्वांत जास्त 25 धावांची आतषबाजी केली. विश्वजित ठाकूर आणि अंकुर सिंग यांनी किफायती बॉलिंग करत प्रत्येकी 3-3 विकेट्‌‍स घेतल्या. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 10 षटकांमध्ये 86 धावांचं आव्हान दिलं. बदल्यात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 41 धावांमध्येच गारद झाला. या सामन्याला यूट्युबवर विक्रमी 39 लाख प्रेक्षकांची व्ह्युुवरशिप मिळाली.

रायगडचे नीलेश परदेशी सांगतात, “टेन प्रिमियर लीग जिंकल्यावर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. एवढी वर्षं टेनिस क्रिकेट खेळलो त्याचं फळ मिळालं, क्रिकेट खेळण्याचं सार्थक झालं असं वाटलं.” अंकुर सिंग म्हणतो, “भारत विरुद्ध पाकिस्तान प्रदर्शनीय सामन्यात भारताचं नेतृत्व करणं आणि भारतीय संघासाठी तीन विकेट घेणं माझ्या आयुष्यातली सर्वोच्च अभिमानाची गोष्ट होती.”

थोडक्यात, टेनिस क्रिकेटने सनी इलेव्हन, प्रतीक इलेव्हन, रायगड अशा संघांना उंची मिळवून दिली आहे आणि या संघांनी टेनिस क्रिकेटला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे. उद्या आणखीही अनेक उत्तमोत्तम खेळाडू तयार होतील. त्यांचे नवे संघ बनतील. लेदरबॉल क्रिकेटच्या मुख्य धारेत प्रवेश न मिळालेल्या अशा किती तरी गुणी खेळाडूंनी तोडीस तोड क्रिकेट खेळत टेनिस क्रिकेटलाच मुख्य धारा बनवलं आहे. भारतातल्या क्रिकेटवेड्या प्रेक्षकांनी लेदरबॉल क्रिकेटइतकंच या समांतर क्रिकेटकडे लक्ष द्यावं अशी वेळ आता नक्कीच आली आहे.

______________________________________________

मी जुन्नरमध्ये एका स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरणासाठी गेलो, तेव्हा मी पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा बघत होतो. तिथली गर्दी पाहून मी आश्चर्यचकित झालो. एवढे लोक टेनिस क्रिकेट खेळतात आणि या खेळावर प्रेम करतात हे मला तेव्हा कळलं. या खेळाडूंचा दर्जा बघूनही मी थक्क झालो. तुफान फलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण. लेदरबॉल टी-ट्वेंटी आणि वन-डे स्पर्धांना नवे होतकरू खेळाडू मिळण्याच्या दृष्टीने टेनिस क्रिकेटकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं.   

- चंदू बोर्डे, भारतीय संघाचे कर्णधार व बीसीसीआय निवड समितीचे माजी अध्यक्ष 

 जवळपास सगळ्याच क्रिकेटर्सची सुरुवात टेनिस क्रिकेटने होत असते. महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, केदार जाधव हे खेळाडू तर टेनिस क्रिकेट खेळतच डेव्हलप झालेले आहेत. टेनिस क्रिकेट हे क्रिकेटचं मूळ आहे. 

- सुनंदन लेले, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार

स्पर्धा आयोजक

टेनिस क्रिकेट व्यावसायिक आणि भव्य करण्यात आयोजकांचाही वाटा आहे. मुंबईतल्या ‘राज कपूर मेमोरियल ट्रॉफी'पासून टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये बक्षिसांच्या रकमा वाढू लागल्या. ही स्पर्धा लॉरेन्स ऊर्फ बाबा रॉड्रिग्ज यांनी सुरू केली होती. मुंबईचा ‘सुप्रीमो चषक' आणि ‘रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी' या गेल्या काही वर्षांत सर्वाधिक गर्दी खेचणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धा ठरल्या आहेत. आमदार संजय पोतनीस आणि आमदार अनिल परब हे सुप्रीमो चषक स्पर्धेचं आयोजन करतात, तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजक दीपक पवार आणि प्रायोजक सध्या मंत्री असलेले उदय सामंत आहेत. मूळचे पुण्याचे असलेले आणि दुबईत स्थायिक झालेले उद्योजक आरीफ खान शारजाह मैदानावर ‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्डकप' म्हणवल्या जाणाऱ्या ‘टेन प्रिमियर लीग' या स्पर्धेचं आयोजन करतात.

 व्यावसायिक कॉमेंटेटर

पूर्वी टेनिस क्रिकेटमध्ये चांगला बोलू शकणारा एखादा खेळाडू समालोचन करायचा, पण आता व्यावसायिक समालोचकांशिवाय स्पर्धांचं आयोजन होत नाही. हरेश पंड्या हे टेनिस क्रिकेटमधले नावाजलेले हिंदी समालोचक. त्यांना ‘व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट' म्हटलं जातं. तसंच चंद्रकांत शेटे, नरेश ढोमे, दीपक मंडले हे मराठीतले काही प्रसिद्ध समालोचक. यांनी टेनिस क्रिकेट समालोचनामध्ये मराठी बाज आणला. कुणाल दाते हेही टेनिस क्रिकेटमध्ये अल्पावधीत प्रसिद्ध पावलेले समालोचक. अस्खलित समालोचनामुळे त्यांची स्टार मराठी वाहिनीवर आयपीएल आणि प्रो कबड्डी लीग या स्पर्धांच्या मराठी समालोचनासाठी निवड केली. अर्थात, हे समालोचक व्यावसायिक झाले ते नंतर, सुरुवातीला टेनिस क्रिकेट समालोचनामध्ये कोणतंही भविष्य दिसत नसताना यांनी केवळ हौसेपोटी समालोचन सुरू केलं होतं, हे विसरता कामा नये.

(या लेखासाठी दीपक मंडले, जयंत भोसले, हरेश पंड्या, चंद्रकांत शिंदे यांची मदत झाली.)

तुषार कलबुर्गी

74481 49036

tusharkalburgi31@gmail.com


  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८