निर्भय वायर : नितीन ब्रह्मे
अनुभव दिवाळी २०२१ कॉर्पोरेट आणि सत्ताधारी या दोघांच्याही नियंत्रणापासून मुक्त , फक्त वाचकांप्रती जबाबदारी मानणारं समांतर आणि परिणामकारक माध्यम आजही उभं राहू शकतं , हे ‘ द वायर ’ या न्यूज पोर्टलने सिद्ध करून दाखवलं आहे . पत्रकारितेतली नवी वाट चालणार् या या प्रयोगाची गोष्ट . २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट . टाइम्स ऑफ इंडिया सोडल्यावर वेगळं काहीतरी करावं , असं वाटत होतं . बरेच दिवस डोक्यात घोळणारा विषय अभ्यासावा म्हणून मी काश्मीरला गेलो होतो . तिथले पत्रकार कसं काम करतात , हे मला बघायचं होतं . तिथून परतताना दिल्लीत मुक्काम होता . दिल्लीतल्या काही चांगल्या पत्रकारांना भेटावं , पुढे काय करता येऊ शकतं याची दिशा मिळवण्याचा प्रयत्न करावा , असं मनात होतं . म्हणून काही पत्रकारांना मेसेज टाकले . ‘ द वायर ’ या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांनी लगेचच भेटायची वेळ दिली . ‘ वायर ’ सुरू होऊन दोनच वर्षं झाली होती , पण देशभरातले माझ्यासारखे अनेक पत्रकार पत्रकारितेची मूल्यं जपणारा वेगळा प्रयोग म्हणून या वेब पोर्टलकडे लक्ष ठेवून होते . त्यावेळचे भाजप अध्यक्ष अमित श...