रन आऊट : प्रदीप चंपानेरकर

अनुभव दिवाळी २०२१

         मोबाईलवर बराच वेळ रिंग होत होती. घाईघाईत घेतला. फोन प्रकाशचाच होता.

हॅलो आलोक, द न्यूज इज रिअली नॉट गुड. जयंत इज सर्टनली सिंकिंग. मी काही औषधं दिली आहेत. त्यांनी काही जादू केली, तर ठीक, अदरवाइज इट्स अ लॉस्ट केस.”

आता काय करणार, प्रकाश? जे होईल ते होईल.”

बरीच रात्र झाली होती. बेचैनीतच झोपलो.

 कुठे तरी अनोळखी प्रदेशात मी.. धूसर वातावरण. कुणीतरी मला हाका मारत होतं. आवाज तर संदीपचा होता. मागे वळून पाहिलं, तर संदीपच होता. पन्नास वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेला माझा भाऊ मला म्हणत होता, ‘जयंत शेवटच्या घटका मोजतोय. त्याला भेट, पण काही विचारू नकोस. जे घडलं, ते घडलं. आता शेवटच्या क्षणी त्याच्या जीवाची तगमग नको होऊ देऊस..’ माझ्या मनात आलं, होता तसाच आहे की हा. दुसर्याची काळजी करणारा. मी त्याला म्हटलं, ‘त्याला नाही विचारणार. पण मग तू तरी सांग काय झालं होतं त्यादिवशी. रन आऊटच्या वेळी घडलं होतं तसंच झालं होतं ना त्यादिवशीही?’

 ...खडबडून जागा झालो. काहीच सुचत नव्हतं. परत झोपायचा प्रयत्न केला, पण झोप उडाली होती. काहीतरी खुडबुड करत बसलो. नेहमीप्रमाणे सात वाजताविविध भारतीवरभूले बिसरे गीतसुरू झालं. का कुणास ठाऊक, त्या सकाळी एका मागोमाग तलत मेहमूदची गाणी लागत होती. “चल दिया कारवाँ, लूट गये हम यहाँ...” कानावर पडलं. जयंतचं आवडतं गाणं. मनात चमकून गेलं, ‘जयंत..?’ पण त्या शक्यतेकडे दुर्लक्ष केलं. प्रकाश म्हटला आहे ना, औषधं दिली आहेत म्हणून.. मग तसं काही झालं नसेल. पाठोपाठ, “जिंदगी देनेवाले सुन, तेरी दुनिया से दिल भर गया...” लागलं. आता मात्र, जयंत तीव्रतेने मनात घोळू लागला.

तेवढ्यात फोन वाजला. प्रकाशचाच होता. “आय अॅम व्हेरी सॉरी, आलोक. इट्स ऑल ओव्हर. जे काही शक्य होतं ते सर्व केलं आपण.” प्रकाश अगतिकतेने बोलत होता.

जयंत गेल्याची फॅक्ट बाजूला ठेवून मन झर्रकन पन्नास वर्षं मागे गेलं. इतकी वर्षं मनात गाडून ठेवलेली ती घटना उफाळून वर आली. पण लगेच मनात विचार आला, जयंत गेल्याच्या दिवशी त्या घटनेची आठवण नकोच. स्मरणात ठेवाव्या अशाही गोष्टी आहेत की जयंत संदर्भातल्या.

तलत... बावन्न वर्षांपूर्वी जयंतकडून मला मिळालेली मौलिक देन. तो हळुवार, मुलायम आवाज. त्या कंप असलेल्या रेशमी आवाजाने हृदयातील, मनातील सुखदु:खाच्या भावनांच्या तारा छेडल्या जाणार. ते आर्त स्वर. जयंतची ती देन पुढे माझ्याकडे बहरत गेली. त्याच्याकडे तरी तेवढ्या तीव्रतेने तलत राहिला का ते माहीत नाही; पण मला तलत व्यापत गेला. आणि आज तलतचा तो संयमित आक्रोश आणि जयंतचं शेवटाच्या प्रवासाकडे निघणं एकाच वेळी चालू होतं. त्यांचा संयोग जुळून आला होता.

जयंत म्हणजे नखशिखांतरोमँटिकमाणूस. भलत्या स्वप्नांच्या दुनियेत बुडालेला.

खूप वर्षांपूर्वीची घटना. सार्या जगासाठी तो दिवस विस्मयचकित करणारा होता. चंद्रावर मानवाचं पहिलं पाऊल पडलं होतं. मी कॉलेज आटोपून बाहेर पडत होतो. पाहतो तर समोरच्या कँटीनमध्ये जयंत बसलेला. हातात सिगरेट. चेहर्यावर आनंद ओसंडून वाहात होता. नेहमीची अधीरता होतीच. काही तरी विशेष सांगायचं असलं की, तो असाच अधीर असायचा. “आज काय विशेष जयंत? इथे कसा?” मी आश्चर्याने विचारलं. त्यावर मी जणू मूर्खांच्या नंदनवनात वावरतोय, अशा आविर्भावात म्हणाला, “बस, आहेस कुठे तू? आपला पुढचा चहा-वडा चंद्रावर घ्यायचा आपण! नील आर्मस्ट्राँग आता तिथे चंद्रावर बर्गर खात बसला आहे. हा.. हा.. तुला माहीत नसेल, म्हटलं सांगू.”

माझ्या खरंच डोक्यात नव्हतं ते.

इट्स अॅन अचिव्हमेंट फॉर द मॅनकाईंड आलोक...” असं इंग्रजी तोडून जयंत स्वप्नाच्या प्रदेशात शिरला. “माझं एक स्वप्न आहे अलोक. तू आणि मी दोघंच चंद्रावर जायचं. जाताना फक्त रेकॉर्डप्लेयर आणि तलतच्या ढीगभर रेकॉर्ड्स न्यायच्या. मनसोक्त ऐकायच्या. एका मागोमाग एक. पुन्हा पुन्हा लावायच्या. तो काळोख, ती नीरव शांतता. आजूबाजूला कोणी नाही... काय मजा येईल!” बोलता बोलता जयंत त्याच्याकाळोखीचंद्रावर पोचला होता. जणू कँटीनमध्ये बसलेल्या जयंतचं दुसरं पाऊल चंद्रावरच पडणार होतं, असा चेहर्यावर आविर्भाव!

जयंतला तलतने असं झपाटलेलं होतं. पण झपाटून जाणं हा त्याचा स्वभावच असल्याने त्याची अनेक विषयांत मुशाफिरी चालायची. त्यांचा आनंद तो रसिकतेने भरभरून घ्यायचा आणि आम्हालाही आस्वाद घेणं शिकवायचा. तलतसारखी अनेक रोपटी त्याने आमच्या ओल्या मेंदूमध्ये रुजवली. प्रत्येक रोपट्याचं अवकाश कसं विशाल असू शकतं, हेही त्याने आम्हाला दाखवलं होतं. ही रोपटी सिने-संगीताची होती, इंग्रजी भाषेची होती, वाचनाची होती. चित्रपटाची होती. पाच-सहा वर्षांच्या काळात त्याने ही किमया करून टाकली होती.

मी आणि माझा मोठा भाऊ संदीप. दोघंही जयंतच्या झपाटलेपणाने झपाटून गेलो होतो. संदीप माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठा, पण तो माझ्यासाठी भावापेक्षा बरंच काही होता. मित्र, मार्गदर्शक, ‘रोल मॉडेलसगळंच. जयंत हा संदीपचा जवळचा मित्र. त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा. दोघं शाळेच्या क्रिकेट टीममध्ये एकत्र खेळले आणि त्यांची मैत्री जमली. संदीप लहान असूनही जयंतला त्याच्याशिवाय करमत नसे. तो घरी येत असे. आणि घरी आला की माझ्यातही रमत असे.

क्रिकेट जयंतचा आवडता खेळ. चांगला खेळायचा तो. पण त्याच्यासाठी हा खेळबॅट-बॉलपुरता मर्यादित नव्हता. ‘स्ट्रॅटेजी’, ‘गेम प्लॅनअसे शब्द असायचे त्याच्या तोंडी. समोरच्या खेळाडूचे कच्चे दुवे शोधण्याकडे त्याचं जास्त लक्ष असायचं. शाळेत नवा विद्यार्थी असूनही त्याने टीमचं कर्णधारपद मिळवलं होतं. त्यावर्षी त्याने शाळेलाहॅरिस-शिल्डही मिळवून दिलं होतं. पण फायनल मॅचमध्ये घडलेली एक घटना मला खटकली.

संदीप अठ्ठेचाळीस धावांवर एकदम सेट झालेला. जयंत नुकताच फलंदाजीला आलेला. तो एक फटका मारतो आणि रन घेण्यासाठी कॉल देतो. संदीपनकोअशी हाताने खूण करतो, तरीही जयंत त्याला धावण्यास भरीस पाडतो. पण फिल्डर चपळाईने बॉलिंग एंडला थ्रो करतो आहे, असं पाहून जयंत स्वत:च्या क्रीजमध्ये माघारी फिरतो. संदीप मधल्यामध्ये रन आऊट..! अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. सरतेशेवटी मॅच आणि शिल्ड जिंकल्याने संदीपचं रन आऊट होणं, फार महत्त्वाचं राहत नाही. पण माझ्या मनात ती रुखरुख लागून राहिली.

पुढे जयंत उत्तम मार्कांनी एस.एस.सी. पास झाला आणि सायन्सला गेला. खरंतर मराठी, इंग्रजी साहित्याच्या वेडामुळे तो आर्ट्सला जाणार होता. संदीपला त्याने तसं सांगितलंही होतं. त्यामुळे तो अचानक सायन्सला कसा गेला, हे आम्हाला कळेना.

कॉलेज सुरू झाल्यावर जयंत तिकडे रमेना. क्रिकेट खेळण्याचा त्याचा उत्साहही मावळला होता. आता जयंत पुढच्या विषयात रमू लागला होता. सिनेमांचे मॅटिनी शोज, संगीतकार, गीतकार, गायक, दिलीप कुमारसारखे अभिनेते अशा अनेकांमध्ये तो बुडाला होता. चांगला सिनेमा म्हटलं की, चांगली स्टोरी, हृदयस्पर्शी प्रसंग, थोडं नाट्य एवढ्यावर तो थांबत नसे. सिनेमाची पटकथा, संवाद, फोटोग्राफी, क्लोजअप्स, मिड शॉट्स, लाँग शॉट्स, एडिटिंग, संगीत, पार्श्वसंगीत अशा सगळ्या बाजूंवर त्याचं रसग्रहण चाले.

कलाकारांच्या अभिनयाची चिकित्साही काटेकोर. फेशीयल एक्सप्रेशन, नजरेतली फेक, कन्ट्रोल्ड मूव्हमेंट... असे शब्द त्याच्या तोंडी असायचे. चित्रपट संगीत म्हटलं की, ठराविक संगीतकार, ठराविक गाणी एवढंच नव्हे, तर गायक आणि संगीतकारांच्या वेगळ्याच, अस्सल आणि अनवट गाण्यांबद्दल तो बोलायचा. तलतसाठीच्या भारावलेपणाबाबत तर बोलायलाच नको. जयंतचं चित्रपटवेड हिंदी सिनेमापुरतं मर्यादित नव्हतं. क्लासिक इंग्रजी चित्रपटांच्या अभ्यासापर्यंत ते पोचलं होतं. सर्व वेळ बोलणं याबद्दलच.

शिवाय अनेक मराठी, इंग्रजी पुस्तकांची त्याची पारायणं चालायची. त्या त्या लेखकांची, त्यांच्या लेखनातील वैशिष्ट्यं समजून घेण्याचाही अभ्यास चालायचा. या सगळ्यात त्याचंसायन्सबाजूला पडलं होतं.

जयंत आमच्या घरी यायचा आणि वेडावून टाकणारं बरंच काही सांगायचा. तो आलेला मला आवडायचा. आईलाही त्यांचं येणं रुचायचं, त्याचं भारावलेपण प्रभावित करायचं. आपल्या संदीपला चांगला मित्र आहे, याचं तिला समाधानही होतं आणि अप्रूपही.

पण जयंत सरळ प्राणी नव्हता. त्याला सायन्सपासून सुटका करून घ्यायची असावी. त्यामुळे त्याने इंटर सायन्सच्या परीक्षेत एक पेपर जाणूनबुजून चुकवला. ‘संदीपने परीक्षेचं टाईमटेबल चुकीचं लिहून घेतलं’, असं बेधडक खोटं घरी सांगितलं. त्याच्या घरची एक वेगळीच स्टोरी होती. आईने दुसरं लग्न केलं होतं. आई आणि हा सावत्र वडलांकडे रहायचे. हा त्या सावत्र वडलांना म्हणाला, ‘आर्ट्सला जातो.’ वडील म्हणाले, ‘स्वत:चे पैसे स्वत: कमव आणि काहीही कर. मी आता तुझ्यासाठी काही करणार नाही...’

वडलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जयंत मोकाटच सुटला. आपल्या छंदांमध्ये तो जास्तच रमू लागला. ते रमणं मनापासूनएन्जॉयकरायला लागला. रात्रंदिवस छंदांची चैन! कॉलेज-शिक्षण वगैरे सगळं सोडूनच दिलं त्याने. त्याच्याकडे व्यक्तिमत्त्व होतं, इंग्रजीची साथ होती आणि डोक्यात कल्पनांचा सुकाळ होता. या कल्पनांच्या जोरावर तो कुठले कुठले व्यवसाय करण्याच्या विचारात होता. संदीप त्याला सबूरीचा सल्ला देत होता. शिक्षण सोडू नकोस, असं सांगू पाहत होता. पण जयंत कुणाचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.

तू जयंतशी बोलअसा लकडा मी संदीपकडे लावला तेव्हाती वेळ टळून गेली आहेएवढंच तो मला म्हणाला. “जयंतकडे चांगल्या आयडियाज आहेत. चांगला धंदा करेल तो. साहित्याची आसक्ती तो वाचनाच्या माध्यमातून पुरी करत राहील. इंग्रजी साहित्याचा पाठपुरावा तो एका प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे, असं म्हणतोय...” संदीप म्हणाला.

संदीपलाही कळत होतं की या बोलण्यात काही अर्थ नाही. पण तो मैत्रीला जागत होता.

दिवस, महिने सरत होते. जयंतचं आमच्या घरी येणं-जाणं, बाहेर भेटणं चालू होतं. आता तो आणखी वेगळ्या विषयावर भारावून बोलू लागला होता. व्यवसायाची नवी कल्पना, नवा काँटॅक्ट, उंच भरार्या अशा विषयांत तो स्वप्नाळूपणे बोले. शिक्षणाचा विषय निघाला की, कोणता तरी भन्नाट कोर्स करतोय, असं नव्या उत्साहाने सांगत असे. पण लगेच त्याचं बोलणं व्यवसायावर येत असे. एखाद्या नव्या खुळाने त्याच्या डोक्याचा ताबा घेतलेला असायचा. मग त्याचे इमले बांधायला सुरुवात व्हायची. पण थोड्या दिवसांनी त्याला नवं काहीतरी गवसायचं. पहिली कल्पना क्षुल्लक वाटू लागायची. मग पुन्हा नव्या कल्पनेचे इमले बांधणं सुरू. त्याचं कोणतंही खूळ साधंसुधं, लहानसहान नसायचं. भव्यदिव्य स्वप्न असायचं.

असंच एकदा जयंत, संदीप आणि मी भेटलो होतो. जयंत कोणत्या तरी नव्या कल्पनेने फुलला होता. ते स्वप्न आमच्यापर्यंत कधी पोचवतो असं त्याला झालं होतं. कॅफेमध्ये लागलेल्या गाण्यात मी गुंग होतो. तो वैतागला.

अरे, गाणी कसला ऐकतोस? मी काय सांगतो, ते ऐक. जमिनीपासून दहा फूट उडशील!” जयंतचा नवा रोमँटिसिझम सुरू.

एक जबरदस्तकाँटॅक्टमिळाला आहे. तेच प्रपोजल करतोय सध्या.”

संदीपला हे आधीच सांगून झालं असावं. तो म्हणाला, “शेवटी भेटले वाटतं पंजवानी.”

नाही, अजून नाही. बट इट इज एक्स्पेक्टेड एनी मोमेंट...”

संदीप गप्प. मी मात्र उत्साहाने म्हटलं, “मोठा काँटॅक्ट दिसतोय...”

जयंत डोळे मिटून काही विचार करत असावा. त्याचं स्वप्नरंजन पुढे जात असावं. चेहर्यावर आता स्वप्नांच्या लाटा फसफसून उसळी घेत असण्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. किती सांगू, न किती नको! म्हणाला, “इट विल बी अ ड्रीम प्रपोजल फॉर मिस्टर पंजवानी. ही विल जस्ट जंप ओव्हर इट! मी त्याला सांगणार आहे, अ वीक मोअर... अदरवाईज अदर पार्टी इज इन वेटिंग. बट आय वाँट यू टू...”

मी कौतुकाने म्हटलं, “अरे वा! म्हणजे दुसरी पार्टी तयार आहे..”

आता जयंतच्या चेहर्यावर त्याचं ते खास हलकंसं स्मित दिसलं. ओठावर ओठ दाबत, मान डावीकडून उजवीकडे हलवत म्हणाला, “लहान आहेस तू. संदीप अंडरस्टँड्स. दीज आर प्रेशर टॅक्टिक्ट्स. पंजवानी विल बज. तो लोभी पैसेवाला आहे.”

पुढे म्हणाला, “सहा महिन्यांत चहा इकडे नाही प्यायचा. ‘ताजमध्ये, नाहीतरगे-लॉर्ड्समध्ये!”

पुढे स्वप्न चालूच... वास्तविक, तो हे काही आम्हाला सांगत नव्हता. त्याच्या स्वप्नरंजनाला त्याच्यासाठी शब्दरूप देत होता एवढंच. जयंतचं स्वप्नरंजन आटोपल्यावर संदीपने तीन कटिंग चहाचं बिल भरलं. जयंत स्वप्नातच. आपणताजचं बिल भरतोय असं स्वप्न बघत असताना या क्षुल्लक बिलाकडे कोण बघणार..

पंजवानीने जयंतला जोखलं असणार. त्याने जयंतला झुलवत ठेवलं. जयंतने बांधलेले इमले कोसळले. मग त्याने एकामराठी पंजवानीला पटवला. तो मराठी माणूस जयंतच्या प्रपोजलवर खुश होता. त्याने त्याच्या परीने त्या प्रोजेक्टवर पैसे लावले. काम सुरू केलं. जयंतही उत्साहाने काम करू लागला.

पण, दरम्यान जयंतला प्रफुल्ला भेटली. जयंतचं प्रोजेक्टवरचं लक्ष उडालं. ‘मराठी पंजवानीमधल्यामध्ये रन आऊट..!

प्रफुल्ला... संदीपची कॉलेजमधली मैत्रीण. उत्साही, थोडी इनोसंट, स्मार्ट, भरभरून बोलायची. जयंतचं वाचन, त्याचं ज्ञान, त्याची वेडं यांनी भारावली गेली. कधी ते दोघं, तर कधी आम्ही चौघं फिरायला जायचो. गप्पा व्हायच्या. एकदा असेच आम्ही चौघं एका युरोपियन स्टाइलच्या इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. जयंतचं प्रफुल्लावर इम्प्रेशन मारणं फुल स्विंगमध्ये होतं. सिनेमाचा विषय. प्रफुल्ला प्रफुल्लित होऊन बोलायला लागली,

देव आनंद काय ग्रेट अॅक्टर आहे ना? तीन देवियाँ, ज्वेल थीफमध्ये काय अॅक्टिंग केली आहे. जबरदस्त.”

जयंतने तिला थांबवलं आणि स्वत: सुटला, “ही इज अ चॉकलेट हिरो, नॉट अॅन अॅक्टर. त्यातल्या त्यातगाईड’.. पण तेही विजय आनंद डायरेक्टर असल्याने.. ॅक्टिंगमध्ये दिलीप कुमार, आणि फक्त दिलीप कुमार. आणि...”

जयंत बोलत होता. त्याचा चेहरा आता फुलला होता, डोळ्यात चमक होती. त्याच्या बोलण्यात एक स्टाईल होती. प्रफुल्ला हरखून गेली होती. विस्फारलेल्या नजरेने ती त्याच्याकडे पाहत होती. त्याचं बोलणं तिला ऐकू येत होतं का? शंकाच होती.

हँडसम, रसिक, ज्ञानी जयंतच्या प्रेमात प्रफुल्ला आकंठ बुडली नसती तरच नवल होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं. पण जयंतकडे उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. ‘प्रफुल्ला हवं तर माहेरीच राहील काही महिने; मात्र लग्न लगेच करायचं...’ असा आग्रह प्रफुल्लाच्या घरच्यांनी धरला. जयंतला दुसरा मार्गच राहिला नाही. त्याने मान्यता दिली. तो स्वत:च्या कुटुंबापासून दुरावलेला असल्याने त्याच्या घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे जयंतच्या बाजूने लग्नाला मी आणि संदीप एवढेच उपस्थित राहणार होतो.

तोसिक्रेटलग्नप्रसंग तसा मजेशीरच होता. मी आणि संदीप प्रफुल्लाच्या घरी पोचलो. तेव्हा त्या नवख्या घरात एकटा पडलेला जयंत आमची चातकासारखी वाट बघत होता. दोघांच्या डोक्याला मुंडावळ्या. जयंत आणि प्रफुल्ला; दोघांचं ते दृश्य बघून मी मनात हसत होतो. जयंत बावीस वर्षांचा, तर प्रफुल्ला वीस. माझ्या नजरेत तरी ते आमच्यासारखे पोरवयाचेच होते. आम्ही शिरल्या शिरल्याच जयंतने संदीपला बाजूला घेतलं. ते दोघे बराच वेळ बोलत होते. मी लांब उभा होतो, पण संदीप त्याला आश्वस्त करताना, धीर देताना दिसत होता. तिकडे लग्नविधीला बसण्यासाठी आतून हाका येत होत्या.

लग्नविधी सुरू झाले. भटजींनी विचारलं, “आंतरपाट कोण धरणार?” आंतरपाट धरायला तिथे होतं कोण? मी आणि संदीपच. अशा रीतीने पोरखेळातलं हे लग्न आटोपलं. नवरीचा आणि तिच्या घरच्यांचा निरोप घेऊन नवरदेवाला सोबत घेऊन आम्ही आमच्याच घरी आलो.

काही महिन्यानंतरची गोष्ट. संदीपला ट्रेकिंगला जाण्याचा छंद जडला होता. एका छोट्या ग्रुपशी तो जोडला गेला होता. एका रविवारी लोणावळ्याजवळनागफणीम्हणजेचड्युक्स नोजचा ट्रेक करण्याचं ठरलं. संदीप धरून चौघं जाणार होते. पण एकजण गळाला. आता चौथा कोण यावर उरलेले तिघं आमच्या घरी चर्चा करत होते. तेव्हा नेमका जयंत घरी होता. त्याने त्या ट्रेकला यायचा हट्ट धरला. ‘आता नको, नंतर पाहू’, असं म्हणून टाळायचा प्रयत्न संदीप करत होता. पण जयंत ऐकेना आणि ग्रुपमधील मित्रांपुढे संदीपला बोलता येईना. भीड पडली. मुळात स्वभावच तसा.

जयंतला ट्रेकिंगचा वगैरे अनुभव नव्हता. त्यामुळेजयंत, ट्रेकिंग करणं हे कष्टाचं असतं. तुला जराही अनुभव नाही. आणि ड्युक्स नोज ही काही फिरायला जाण्याची जागा नाही,” असं म्हणत राहिला. मात्र, जयंतचा उत्साह उफाळून आला होता. म्हणाला, “अनुभव घेतला तरच अनुभव मिळणार ना? आणि जिकडे कठीण चढ असेल तिथे तुम्ही पुढे जा, मी बसून राहीन. पुढे नाही येणार.” संदीपला आता पर्यायच राहिला नाही.

अखेरीस ठरल्याप्रमाणे संदीप, अविनाश, प्रमोद आणि जयंत असे चौघं सर्व तयारीनिशी गेले.

 ..आणि दुपारी चार वाजता फोन वाजला.

अविनाशचा होता. तो चाचरत चाचरत बोलत होता. संदीपचा अॅक्सिडेंट झालाय म्हणाला. मी सुन्न झालो. त्याने स्पष्ट सांगितलं नाही; पण मनात पाल चुकचुकलीच. लोणावळ्याच्या हॉस्पिटलवर या, एवढंच तो म्हणाला.

पूर्ण बधीर अवस्थेत कसाबसा लोणावळ्याच्या हॉस्पिटलवर पोचलो. पोलीस कॉन्स्टेबल, डॉक्टर वाटच पाहत होते. आत गेलो. एका मृतदेहावरची पांढरी चादर बाजूला केली गेली. आमचा संदीपच होता तो. भयानक शांतता होती त्या शवागृहात. मी संपूर्णपणे थिजलो होतो.

संदीपला घेऊन घरी आलो. सारं काही अचानक घडल्याने सगळे भेदरून गेले होते. आईची वाचाच बंद झाली होती. वडील भ्रमिष्टासारखे वागत होते. लोक मला येऊन भेटत होते आणि हे सगळं कसं झालं, असं विचारत होते. मधूनच कोणी जयंतविषयी विचारणा करत होतं..

पण जयंत होता कुठे? एकदा कधीतरी तो आणि प्रफुल्ला घोळक्यात आले, भेट घेतल्यासारखं केलं आणि गेले ते गेलेच. जयंतचं वागणं समजण्यापलीकडचं होतं.

घरी जरा ठीकठाक झाल्यावर मी संदीपच्या अॅक्सिडेंटचा माग घ्यायचं ठरवलं. संदीपच्या ग्रुपमधल्या अविनाश आणि प्रमोद यांना गाठलं.

काय घडलं नेमकं, अविनाश?” त्याला थेट प्रश्न विचारला. “संदीप चांगला ट्रेकर होता. त्यामुळे त्याचा अपघात होऊ शकतो हे स्वीकारणं आम्हाला खूपच जड जातंय.”

अविनाश आणि प्रमोदच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. पुष्कळ प्रयासाने त्यांनी मनावर ताबा मिळवला. जे काही घडलं, ते तपशीलात सांगितलंः

लोणावळा स्टेशनवर चहा झाला. तिथून पुढे निघाले. गप्पा मारत ट्रेकिंग चालू झालं. मग चढ सुरू झाला. चढता चढता पाऊस लागला. तरीही चौघं नेटाने चढत होते. संदीप जयंतला सांभाळत होता. त्याच्याकडे त्याचं विशेष लक्ष होतं. पाऊस वाढला, धुकंही होतं. बर्यापैकी चढ चढल्यानंतर सर्व थांबले. पाऊस कमी झाल्यावर पुन्हा सुरू. पण निसरडं होतं. सर्व पुन्हा थांबले. जयंतसाठी हा सर्व नवा अनुभव होता. एकंदर वातावरणामुळे तो उत्तेजित झाला होता. पुढच्या लेव्हलला एकस्पॉटत्याला प्रलोभनात टाकत होता. सर्वांना सांगत होता, ‘जाऊ!’ पण बाकी तिघांनी सबूरीची भूमिका घेतली. सर्वांना जयंतची काळजी होती. पण जयंतच पुढे जायला उत्सुक होता. सगळे नको म्हणत होते.

अखेरीसथोडं पुढे नेऊन आणतो’, असं म्हणत संदीप जयंतला घेऊन निघाला. उरलेले दोघं विरोध करत राहिले. अखेरीस, ‘जा, पण लगेच परत या’, असं म्हणून वाट पाहत बसले. ते दोघं नजरेआड झाल्यानंतर थोड्याच वेळात अविनाश आणि प्रमोदला पुसटसा आवाज ऐकू आला. आवाज जयंतचा होता. तो संदीपची मदत मागत असावा. आणि काही मिनिटांत अंधुकशी, हलकीशी किंकाळी ऐकू आली. अविनाश व प्रमोद तातडीने वर गेले. बघतात, तर जयंत एका दरीच्या टोकाशी चिकटून उभा होता. भांबावलेला. थरथरत. शब्द फुटत नव्हते त्याच्या तोंडातून. फक्त खुणेने मदतीची याचना करत होता. संदीप कुठेच दिसत नव्हता..

पुढे गावकर्यांची मदत, संदीपचा निष्प्राण देह, इस्पितळ, पोलीस आणि नंतरचे सोपस्कार...

दरम्यानच्या काळात पोलिसांनी अविनाश व प्रमोद यांचा जबाब घेतला. पण माझ्या सूचनेनुसार त्यांनीसंदीप एकटा पुढे गेला होताअसं सांगून टाकलं. आणि जयंतची पुढची संकटं टळली. जयंत सुटला खरा, पण संदीपला रन आऊट करूनच. 

संदीपचं जाणं मला बधीर करून गेलं. एकप्रकारे, कायमचं अपंग करून गेलं. मी कदाचित जास्त जबाबदार झालो असेन, पण त्याच्या जाण्याने शरीराचा कोणता तरी हिस्सा गमावल्याची भावना कायमची मनात राहिली. काळ हीच सर्व विपरितावर एकमेव मात्रा आहे, असं म्हटलं जातं. त्यानुसार काही काळानंतर आमच्याही घराचा दिनक्रम सुरू झाला. माझाही झाला. मी शिकलो, मार्गी लागलो. पण शरीराचा, मनाचा एक हिस्सा नसल्याची भावना संपली नाही.

संदीप जाऊन पन्नास वर्षं झाली आज. आता जयंतही गेला. या पन्नास वर्षांत जयंतचं काय झालं?

नाही म्हटलं तरी, आमच्या घरी दबक्या कुजबुजत्या आवाजात संदीपच्या अपघाताचा ठपका जयंतवर ठेवला जात होता. त्याला कुणी तसं कधी म्हटलं नाही, पण पाहता पाहता जयंत आमच्या घरापासून तुटला. त्याने स्वत:हून अंतर राखलं. आणि मीही. पण त्याच्याविषयी कुठून कुठून कळत रहायचं. जयंत गाळात अडकत चाललाय एवढंच त्यातून लक्षात यायचं. व्यवसायाच्या बाबतीतली जयंतची स्वप्न भंग पावणं, आणि नव्या कल्पनांना अंकुर फुटणं हे चालूच राहिलं. या स्वप्नाळूपणातून तो प्रफुल्लाला काहीच देऊ शकला नाही. ना घर, ना संसार, ना मूलबाळ. त्यातून तिने जयंतपासून अलग होण्याचं ठरवलं. निर्णय घेण्यापूर्वी ती गुपचूप येऊन मला भेटली. तिने जे काही सांगितलं ते धक्कादायकच होतं.

ती म्हणाली, “लग्नानंतर आठ महिन्यांनी आम्ही भाड्याची खोली घेतली. माझ्या बाबांनीच थोडी मदत केली. आम्ही संसार सुरू केला खरा, पण बाबांनी थाटून दिलेला संसार पुढे चालवायला पैसे कुठून आणायचे? जयंत नेटाने काहीच करत नाही. सर्व अर्धवट. ‘काँटॅक्ट्स-काँटॅक्ट्सम्हणत राहतो, आणि बस वाचत बसतो. आळसाला वाचनाच्या बुरख्यात लपेटून टाकतो. बाबांनी नोकरी पायाशी आणली, तर म्हणतो, ‘मी अशी खर्डेघाशी करणार नाही. माझ्या कल्पनांना केव्हातरी फळ येईलच.’ बस.. या न त्या कल्पनांच्या जगात राहतो तो फक्त.”

दारूचं व्यसन वगैरे...” मी जरा भीतभीतच विचारलं.

नाही.. तसं नाही. कधी कधी घेतो, एवढंच.”

मग, संधी का नाही देत तू प्रफुल्ला त्याला?”

पुष्कळ दिली आलोक. खोलीचं भाडं थकलं. बाबांनी दिलं, पुन्हा पुन्हा दिलं. नंतर त्यांनीही हात टेकले. खोली सोडावी लागली. मग हा कॉट बेसिसवर राहायला गेला. मी पुन्हा माहेरी. गेली दोन वर्षं मी माहेरी राहतीये.”

ती बोलत होती. डोळ्यांत अश्रू... पण त्यात विखारही होता.

मी विचारलं, “मग त्याचं म्हणणं काय आहे शेवटी?”

तुला सांगितलं तर तू विश्वास ठेवणार नाहीस... सेपरेट व्हायचा निर्णय खरं तर त्याचा आहे, माझा नाही.”

काय सांगतेस?”

जयंतचं म्हणणं आहे, की त्याच्याकाँटॅक्ट्सना मी भेटावं. म्हणजे कामं लवकर पुढे जातील. मी दोनदा गेलेही. पण मला त्यांची नजर बरी नाही वाटली. नंतर मी नकार दिला. सत्यस्थिती सांगितली तर त्याचा विश्वास बसत नाही. म्हणतो, ‘तो माणूस असा नाहीच. तुलाच माझ्याबरोबर राहायची इच्छा दिसत नाही. तू तुझ्या घरीच राहा, आपण अधूनमधून भेटत जाऊ. तुझा निर्णय बदलला तर मला कळव...” त्याला नकार कळवण्यापेक्षा वेगळा पर्याय त्याने माझ्यापुढे ठेवलेलाच नाही.”

प्रफुल्ला निघून गेली. मी स्तिमीत झालो होतो. काहीच बोलू शकत नव्हतो. मनात आलं... ‘प्रफुल्लाही रन-आऊट?’

प्रफुल्ला आयुष्यातून निघून गेल्यावर जयंत खराखुरा निराधार झाला होता. पण स्वप्नांच्या बळावर जगत होता आणि त्याच्याकडे असलेल्या वाचन, चित्रपट, संगीत अशा गोष्टींनी ठासून भरलेल्या सांस्कृतिक पोतडीच्या बळावर स्वप्नं विकण्याचा प्रयत्न करत होता. कधी दुसर्यांना रन आऊट करत होता... तर कधी स्वत:च रन-आऊट होत होता.

संदीप गेल्यानंतर दहा-बारा वर्षांनी स्वत:हून भेटायला आला. झाल्या प्रकाराबद्दल चकार शब्द न काढता स्वत:ची स्वप्नं सांगत राहिला. ‘नव्या पंजवानींविषयी बोलत राहिला. ‘पंजवानी-आणिपंजवानी-यांनी त्याला कशी टोपी घातली, याचं दु:ख व्यक्त करत राहिला. एकाने याच्याकडून मोठी प्रलोभनं दाखवून, आश्वासनं देऊन याने लिहिलेली दोन चित्रपट कथानकं काढून घेतली. नंतरतू कोण, मी ओळखत नाहीम्हणत ऑफिसचा दरवाजा याच्यासाठी बंद केला. याने आणलेल्या ऑर्डर्सपंजवानी-ने डायरेक्ट सप्लाय करण्यास सुरुवात केली. याच्या हातावर कॉन्टॅक्ट देण्यासाठीचे दहा हजार रुपये टेकवले. फसगत झाल्याचं कळल्यानंतर जयंत ते पैसेही न घेता बाहेर पडला. मी मनात म्हटलं, शेवटी यालाहीरन आऊटकरणारे महाभाग भेटले तर...!

निघताना त्याने माझ्याकडे पैसे मागितले. मी दिले. दोघांनीही खोटं खोटं नाटक चालू ठेवलं. मी प्रभावित झाल्यासारखं दाखवलं आणि त्यानेही- मला प्रभावित केल्यासारखं दाखवलं. वास्तविक, दोघांनाही माहीत होतं, की ही भूतदयेपोटी केलेली मदत आहे.

पुढे हीनाटकंवारंवार होत राहिली. वर्षानुवर्षं... मध्येच तो काही वर्षं गायब व्हायचा. पुन्हा छोटे-मोठेपंजवानीत्याच्या आयुष्यात यायचे. शेवटी त्याला म्हटलं, “थांबव हे. पुष्कळ वर्षं दोघांनी नाटकं केली, आतापंजवानीथांबव. तुझ्या जगण्याची सोय करतो. दर महिन्याला त्यासाठी पैसे देतो.” सर्व स्वाभिमान बाजूस ठेवून, अप्रत्यक्षपणे झालेला अपमान गिळूनऑफरत्याने मान्य केली.

पण अपमान गिळल्याचं, स्वाभिमान बाजूला ठेवण्याचंही नाटक होतं का? खरं तर, मनातून तो इतका उतरला होता की, त्याच्याविषयी असे काही विचार आले, तरी ते मी झटकून टाकत होतो. मी त्याच्यासाठी जे करत होतो ते केवळ माणुसकीपोटी आणि हो, त्याच्याकडून पूर्वी मिळालेल्या प्रगल्भ करणार्या दृष्टिकोनाविषयी कृतज्ञ राहण्याच्या भावनेपोटी!

शेवटच्या काळात तो कुठे पेइंग गेस्ट म्हणून राहात होता. ते कुटुंब खुश होतं त्याच्यावर. त्यांच्याकडून आदर मिळवला होता त्याने. हीच तर त्याची खुबी होती. त्या बळावरच तो एकाकी दिवस काढत असावा. नंतर त्याची तब्येत खंगत चालल्याचं कळलं. त्या कुटुंबाच्या मदतीने मी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं. प्रकाशनेही माझ्या शब्दाखातर उपचार केले. पण...

अंत्यसंस्कार उरकण्याच्या दृष्टीने आवश्यक ती ओळखपत्रंही त्याच्याकडे नव्हती. मग प्रकाशच्या मदतीने कसेबसे अंत्यसंस्कार उरकले. आम्ही दोघंच होतो. नि:शब्द झालो होतो.

तिथे उभं असताना मनात काही गोष्टींचं गूढ ढवळलं जात होतं. पंचेचाळीस वर्षं एकांतातलं रोमँटिक जीवन जयंत कसा जगला असेल? त्याचारोमँटिसिझमविपन्नावस्थेतल्या जगण्याने जळून खाक कसा झाला नाही? संदीप गेला, मी मनाने दुरावलो, कुटुंबाने टाकला, प्रफुल्लाही सोडून गेली. अशा परिस्थितीत त्याच त्या लकबी वापरून तो विदीर्ण, छिन्नविच्छिन्न मनोवस्थेला कसा सामोरा गेला असेल?

एका बाजूला त्याच्या जगण्याचं गूढ आणि दुसर्या बाजूला संदीपच्या मृत्यूचं गूढ...

गूढ का? माझ्यापुढे कल्पनांची दोन चित्रं सतत येत राहतात...

एक... संदीपचा तोल जाता जाता निसरड्यात पाय घसरतो. तो पडतो.

दोन... जयंतला स्वत:ला सांभाळणं जड जात असतं. तो संदीपकडे मदत मागतो. संदीप जीव धोक्यात घालून त्याला मदतीचा हात देतो. एका जागी त्याला स्थिर करता करता स्वत: अडचणीच्या अवस्थेत सापडतो. जयंत त्याला मदतीचा हात देण्याऐवजी स्वत:च्याक्रीजमध्ये सुरक्षित राहणं पसंत करतो. संदीपरन आऊटहोतो. क्रिकेटच्या मॅचमधील रन आऊट असो, परीक्षेचं टाइमटेबल चुकवणं असो की, ‘नागफणीचा कडा असो... सर्वच वेळी जयंतकडून अवसानघात झाला का?

स्मशानातून घरी जाता जाता असं विचारचक्र सुरू. त्या विचारचक्रातच अडकून झोपी गेलो.

आलोक, आलोक... मागून हाका येत होत्या. क्षीण आवाजातल्या होत्या. मागे वळून पाहिलं, चक्क जयंतच होता. मला पूर्वीसारखा आनंद झाला. मग नागफणी आठवलं, आनंद आखडता घेतला. जयंत थांबला. म्हणाला, कबुली द्यायचीय. तू रंगवलेलं दुसरं चित्र बरोबर आहे. पण समजून घे, आफ्टरऑल इट्स ह्युमन सायकॉलॉजी अँड ह्युमन टेंडन्सी. जगणं, प्रथम स्वतःचा बचाव ही सर्व प्राणिमात्रांची बेसिक इंस्टिंक्ट असते. आय अॅम द प्रॉडक्ट ऑफ दॅट इंस्टिंक्ट आणि म्हणून संदीप माझ्याकडून तीनदा रन आऊट झाला असेल. पण शेवटचा रन आऊट मला भस्मसात करून गेला. संदीप मृत्यू होऊन संपला, मी जिवंतपणात असंख्य वेळा मेलो आहे. आताचा हा माझा मृत्यू ही केवळ औपचारिकता आहे. शेवटचं एक सांगतो, संदीप वॉज नॉट द प्रॉडक्ट ऑफ धिस बेसिक इंस्टिंक्ट. ही वॉज एक्स्ट्रा ऑर्डिनरी, वेल अहेड ऑफ वुई ऑल... तो खूपच पुढचा होता. पण तू निर्धास्त राहा. मी इथे त्याला नाही गाठणार. मग रन आऊटचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आणि अवसानघाताचाही..

या वेळी खडबडून जागा झालो नाही. शांत झालो होतो. गूढ संपलं होतं. मनातली खळबळ, द्वंद्व सर्व शांत झालं होतं.

कुणी देऊ शकणार नाही असं बरंच काही जयंतने मला माझ्या घडत्या वयात दिलं होतं, आणि पुन्हा कधी मिळू शकणार नाही असं बरंच काही तो हिसकावूनही घेऊन गेला होता. पण असं का घडतं, हे समजून घेण्याची दृष्टीही तो नुकताच देऊन गेला होता.

प्रदीप चंपानेरकर

------------------------------------------------------------------

अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

अनुभव दिवाळी अंक खरेदीसाठी लिंक : https://www.bookganga.com/R/8FG5W

अनुभव दिवाळी अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://anubhavmasik.myinstamojo.com/.../anubhav-diwali-2021

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८