शेतकरी आंदोलन आखों देखी : विवेक कोरडे

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या शेती कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकर्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू केलं त्याला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात नऊ महिने होताहेत. इतका दीर्घकाळ चाललेलं हे देशातलं पहिलंच आंदोलन असावं. या आंदोलनाचा आखों देखा हाल समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्या कार्यकर्त्यांचा अनुभव. या आंदोलनाचं वेगळेपण सांगणारा. शेतकर्यांच्या चिकाटीला सलाम करणारा.


चौकाचौकात उभे राहिलेले पोलीस दिसू लागले आणि सिंघू बॉर्डर जवळ आल्याची खूण पटली. गेले आठ महिने पंजाब-हरयाणामधील शेतकरी सिंघू बॉर्डरवर धरणं धरून बसले आहेत. त्या शेतकर्यांना आणि जमल्यास त्यांच्या नेत्यांना भेटण्याच्या उद्देशाने ११ जुलै २०२१ रोजी काही कार्यकर्त्यांसह आम्ही दिल्लीहून निघालो. शेतकरी आंदोलन जवळून पाहण्यास मिळेल या विचारांत २८ किलोमीटर अंतर कारने कधी कापलं ते समजलंच नाही. आंदोलन स्थानाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी लावलेल्या अडथळ्यांमुळे बंद. काही तर उखडून टाकलेले. बराच वेळ रस्ता शोधायचा प्रयत्न करूनही आंदोलन स्थान सापडत नव्हतं. शेवटी एका नाक्यावर उभ्या असलेल्या पोलिसांनाच विचारलं. त्यांनी दाखवलेल्या दिशेने लांबवर जाऊन वळसा घेतला आणि अचानक समोर दिसलेल्या राहुट्यांनी आपण योग्य जागी पोहोचल्याची खात्री पटली.

शिस्तबद्धता आणि दिलदारपणा

आंदोलनाच्या ठिकाणी बलविर सिंग रजेवाल नेतृत्व करतात. ते कुठे असतील, असं विचारल्यावर एका शेतकर्याने थोड्याशा अंतरावर असलेल्या एका गजबजलेल्या ठिकाणाकडे बोट दाखवलं. गाडीतून खाली उतरताच कडक उन्हाची आणि उष्ण हवेची जाणीव झाली. अकराच वाजले होते, पण तिथलं तापमान ४० अंश सेल्शिअस तरी असावं, असं वाटत होतं. एका छोट्याशा गल्लीतून आत शिरलो. उजव्या हाताला दोन टेबलांवर पीपीई किट घालून दोन डॉक्टर्स रुग्णांना तपासत होते. समोर पन्नासेक लोक आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करत होते. कुठेही गडबड नाही. एक जण सार्यांची नावं लिहून रुग्णांची यादी बनवत होता. त्यालाच रोज किती लोक औषध घ्यायला येतात, असं विचारलं. रोज ५० ते ६० रुग्ण, असं त्याचं उत्तर होतं.

परत जाताना डॉक्टर्सना भेटू, असं ठरवून पुढे गेलो. एका छोट्याशा राहुटीत बलबिर सिंग रजेवाल १०-१५ लोकांबरोबर नाष्टा करत होते. मुंबईहून काही लोक भेटायला आले आहेत, म्हटल्यावर त्यांनी कुणाला तरी आम्हाला आत बसवून नाष्टा देण्यास सांगितलं. आम्ही खाऊन-पिऊन गेलो असल्याने नाष्टा नको म्हटलं, पण तरीही आग्रह सुरूच राहिला. तितक्यात एक जण एका मोठ्या ट्रेमध्ये दीड-दोनशे रवा-बेसनाचे लाडू वाटत आला. आग्रहाने सर्वांना लाडू दिले गेले. लाडू कशाबद्दल, असं विचारल्यावरआनेवाले लेके आते हैं सबके लियेअसं उत्तर मिळालं.

इथे दर दोन-तीन दिवसांनी नवीन जत्थे येतात. जणू आंदोलनासाठी नव्हे, तर उत्सवाला आले असावेत, असा उत्साह आणि आत्मविश्वास त्यांच्यात असतो. आपल्या हक्कासाठी जीव झोकून देत आंदोलन छेडताना पूर्ण ताकदीनिशी छेडायचं, पण तसं करताना आपल्यातली माणुसकी गमवायची नाही, जीवनेच्छा आटू द्यायची नाही, तक्रारीचा वाकडा सूर न लावता, येणार्या प्रत्येक आव्हानात्मक क्षणाचं हसर्या चेहर्याने स्वागत करायचं, हा खास पंजाबी नि उत्तर भारतीय गुण. तोच इथेसुद्धा अनुभवायला मिळाला.

थोड्याच वेळात रजेवालजी स्वतः आले. उन्हाने रापलेला चेहरा, पण चेहर्यावर थकव्याचा लवलेश नाही. उत्साह तरुणाला लाजवेल असा. कोण, कुठले चौकशी झाली. ‘चलो, अंदर बैठके बात करेंगेअसं म्हणून शेजारच्या जागेत घेऊन गेले. पाच-सहा पायर्या चढून वर जावं लागलं. आत जाण्यासाठी दरवाज्याऐवजी एक जाडसर पडदा होता. तो बाजूला करून आत जाताच एसीची बर्यापैकी गार हवा सुखावून गेली. आत गडद हिरव्या रंगाची माफक सजावट आणि त्याच रंगाचा गालिचा. बसल्याबरोबर आधीइन्हे मिठा खिलावोचा आदेश आणि त्याची तत्परतेने पूर्तता. एकदम ताजी आणि बरीचशी गोड बर्फी. ओळखीचा कार्यक्रम आटोपताच रजेवाल यांनी केंद्राने बनवलेले कायदे कसे शेतकरी विरोधी आणि भांडवलदारांचा फायदा करणारे आहेत, हे सांगितलं. ते बोलत असतानाच वीज गेली. पण लगेचच जनरेटर सुरू झाला. शेतकरी किती तयारीने आलेत, हे लक्षात आलं.

अविश्वसनीय निर्धार

बोलण्याच्या ओघात रजेवाल यांनी इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘पंजाब हा लढवय्यांचा प्रांत आहे. मोगल, ब्रिटिश या सार्यांच्या विरोधात आमचा प्रांत प्राणपणाने लढला. स्वातंत्र्य आंदोलनात सर्वात जास्त कुर्बानी पंजाबने दिली. आम्ही जे लढे दिले त्यांत आम्ही एकतर विजयी झालो वा आम्ही मरण पत्करलं. त्याच निर्धाराने येथे आलो आहोत. ‘यहाँ ऐसे हजारो लोग हैं, जो कहते हैं की, यहाँ से हमारी लाश जायेगी, या किसानविरोधी तीन कानून जायेंगे!’

हा निर्धार आम्हाला प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होता. रजेवाल हे एक अभ्यासू नेते आहेत. बोलता बोलता त्यांनी नोम चॉम्सकी यांनी नुकतेच केलेलंइंडियन फार्मर्स शूड बी प्राउड ऑफ व्हॉट दे आर डुइंग. आय थिंक धिस मुव्हमेंट इज बेकन ऑफ लाइट फॉर द वर्ल्ड इन डार्क टाइम्सहे वक्तव्य उच्चारले.

राजकारणातील सार्या घडामोडींकडे आंदोलनातील अन्य नेत्यांचंही बारीक लक्ष असल्याचा प्रत्यय आला. आमच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते होते. महाराष्ट्राने पंजाब सरकारप्रमाणे नव्याने केलेल्या सुधारित कृषी कायद्याबाबत नाराजी व्यक्त करून ही गोष्ट एकप्रकारे केंद्राने केलेल्या कायद्याचं समर्थन असल्याचं एका तरुण नेत्याने ठासून सांगितलं. तसंच शरद पवार यांनी कायद्यात सुधारणा करून हे कायदे मान्य करावेत, असं म्हटल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. शरद पवारांचं वक्तव्य प्रसारमाध्यमांनीतोडमरोडकरछापल्याचं राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने सांगितल्यावरफिर आप शरद पवारजी से यह कहने को कहो, की उनका किसान आंदोलन को समर्थन हैअसं म्हणत त्या नेत्यानेतोडमरोडकरम्हणणार्याला पेचात टाकलं.

आर या पार लढ्याचा निश्चय

कुलदीप सिंग आणि हरविंदर सिंग लाखोवाल हे दोन तरुण नेते आम्हाला आग्रहाने त्यांच्या राहुटीत घेऊन गेले. जाताना त्यातल्या एकाने मलाकभी पंजाब आये होअसा प्रश्न केला. कटखरखला इथल्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधीला वंदन करायला तीनदा आलो होतो, हे सांगितल्यावर गडी खूश. त्याचं गाव कटखरखलापासून आठ किलोमीटर अंतरावर. ३०० एकर जमीन. इथे बॉर्डरवर आंदोलनासाठी दाखल झाल्यापासून तो फारसा घरी गेलेलाच नाही. कितीही कष्ट पडले तरी चालतील, पण कायदे रद्द केल्याशिवाय घरी जाणार नाही, असं तो पुन्हा पुन्हा सांगत होता. त्यांचीही राहुटी वातानुकूलित. पुन्हा मिठाईचा आग्रह झाला. उत्तम कॉफी दिली. बोलणं आटोपतानावाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फतेहअसं प्रत्येक वेळी बोलत होता. आंदोलनात केवळ पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिसतात, असं म्हटल्यावर त्यानेतसं नाही, सार्या देशातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातूनही अनेक शेतकरी येत-जात असतात’, असं आवर्जून सांगितलं. महाराष्ट्रातील शेतकरी संघटना संयुक्त कृती समितीत आहेत, असंही तो म्हणाला.

आंदोलनातील सहकार

हे आंदोलन केवळ दलालांचं आहे’, असा आरोप सरकार करत आहे. त्यावर तुमचं म्हणणं काय असं विचारल्यावर दुसरा शेतकरी त्वेषाने म्हणाला, ‘जर आम्ही दलाल आहोत तर सरकार आमच्याशी बोलणी का करतं? निवडणूक येऊ दे, यांना जनता काय असते, ते दाखवून देऊ.’ सध्या पंजाब आणि हरियाणात भाजपच्या नेत्यांना गावांमध्ये येऊ दिलं जात नाही, अशी पूरक माहितीही त्याने आम्हाला पुरवली.

ती छोटी सभा आटोपल्यावर टिकैत आम्हाला त्यांच्या राहुटीत घेऊन गेले. आत बैठक घेण्याची व्यवस्था होती. आमच्यातील एका मुलीला बसायला खुर्ची नव्हती. आणखी खुर्ची येईपर्यंत टिकैत काहीच बोलत नव्हते. कुणी महिला उभी असलेली त्यांना आवडत नसल्याचं म्हणाले. ‘बेटी, थक गई हो तो अंदर जाके आराम करोअसा प्रेमळ सल्ला. पुन्हा मिठाई. सर्वांना थंड पाण्याच्या बाटल्या आणि पाणी पिण्याचा आग्रह.

२२ जुलै रोजी संसदेवर शेतकरी मोर्चाने जातील, असं टिकैत यांनी सांगितलं. पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरीही संसदेवर जाणारच हे त्यांनी निसंदिग्धपणे स्पष्ट केलं. (टिकैत म्हणाले होते, तसे २२ जुलै रोजी आंदोलक शेतकरी मोर्चाने गेले, पण संसदेऐवजी त्यांना जंतर-मंतर परिसरात आंदोलनाची परवानगी दिली गेली.) ‘आमचं आंदोलन हे अराजकीय आंदोलन आहे. या आंदोलनाला जे राजकीय पक्ष समर्थन देतील, त्यांचे आम्ही आभारी असू पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला आम्ही आमचा मंच वापरू देणार नाही’, ही गोष्ट त्यांनी पुन्हा आवर्जून सांगितली.

आंदोलनात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान नाही, मंच मिळणार नाही, असं टिकैत म्हणाले, त्याचा प्रत्यय आम्हाला लगेचच आला. आम्हाला जेवण देण्यासाठी दोन कार्यकर्ते लंगरकडे नेत असताना आम्हाला सभेत चाललेल्या भाषणाचा आवाज आला. जेवण नंतर घेऊ असं म्हणत आम्ही तेथे पोहोचलो. पाच-सातशे शेतकरी मोठ्या मंडपात बसले होते. कुणी तरी शेतकरी नेता आवेशाने बोलत होता. आमच्यातील राष्ट्रवादीचा उत्साही कार्यकर्ता त्यांच्या पक्षाच्या माजी आमदार आल्याचं सांगायला रुबाबात मंचावर चढला. त्याला काय सांगितलं गेलं माहीत नाही, पण तो गेल्या पावली खाली आला. काही वेळातच या सभेची व्यवस्था पाहणारा कार्यकर्ता आमच्याजवळ आला. तो आम्हा सर्वांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समजत असावा. त्याने पाठिंबा देण्यास आल्याबद्दल आभार मानले. पण राजकीय पक्षांच्या नेत्यांना मंचावर बसवत नसल्याचं किंवा भाषणही करू देत नसल्याचं नम्रपणे सांगितलं. त्यामुळे तिथे थांबणं योग्य नाही, असं लक्षात आल्याने नेते मंडळी उठली.

आंदोलकांचा ठाम निर्धार

वाटेतील एका लंगरमध्ये आम्ही भोजन उरकलं. वाढणारे आग्रहाने वाढत होते. शेतकर्यांचं अगत्य काय असतं, त्याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत होता. मुद्दाम एका साध्या दिसणार्या शेतकर्याला हे आंदोलन कशासाठी आहे, असं विचारलं. त्याने अगदी थोडक्यात त्यांच्या मागण्या काय आहेत व त्या का आहेत, हे मुद्देसूदपणे मांडलं. इतकंच नव्हे, तर इथले बहुतेक शेतकरी तुम्हाला माझ्याइतक्याच सुस्पष्टपणे सांगू शकतील,’ असंही तो म्हणाला. त्यातून येथे आलेला शेतकरी सजग आहे, त्याची कोणाही दिशाभूल केलेली नाही, त्याला कोणाही बहकवलेलं नाही. किंबहुना, हा शेतकरी अगदी विचारपूर्वक आंदोलनात सामील झाला आहे, हे कळत होतं. जो थोडा काळ आम्ही सिंघू आणि गाझीपूर बॉर्डरवर थांबलो त्याने काही गोष्टी मनावर बिंबल्या गेल्या.

आंदोलनाला सात महिने उलटून गेले असताना आणि सरकार मागे हटेल असं दिसत नसतानाही शेतकर्यांचा निर्धार कायम आहे. आणि तो कायम ठेवण्यासाठी त्यांचे नेते त्यांच्याबरोबरीने ठाण मांडून बसले आहेत.

अन्य आंदोलनांमध्ये जसे हाल होतात, तसे हाल करून न घेता, शेतकरी तेथील थंडी, वारा, ऊन, पाऊस सहन करत जितक्या आनंदात राहता येईल, तितक्या आनंदाने राहत आहेत आणि कितीही काळ राहण्याच्या तयारीत आहेत.

या आंदोलनाला परदेशातून पैसा येतो असं म्हटलं जात आहे, ते शेतकर्यांना मान्यच आहे. त्यामागची वस्तुस्थिती अशी आहे की, शेतकर्यांची परदेशांत स्थायिक असलेली मुलं आंदोलक शेतकर्यांना काही कमी पडू देत नाहीयेत. त्यात लपवालपवी करण्याची गरज आहे, असंही शेतकर्यांना वाटत नाहीये.

या ठिकाणी सार्या गोष्टी शिस्तीने चालतात. स्वच्छतागृहं, स्नानगृहं, स्वयंपाकाची जागा, भांडीकुंडी अशा सार्याच गोष्टी अत्यंत स्वच्छ होत्या. रस्त्यावर कोठेही घाण नव्हती.

हे शेतकरी आणि त्यांचे नेते लढवय्ये आहेतच. पण त्याचबरोबर आंदोलनाबाबत त्यांनी एक निश्चित रणनीती आखली आहे. हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही.

आंदोलकांमध्ये परस्पर सहकार्य असल्याने व आंदोलनात आलेल्या शेतकर्यांची काळजी गावांतील अन्य लोक घेत असल्याने शेतकरी निर्धास्तपणे येथे येऊन राहत आहेत.

महिला आंदोलकांची संख्याही मोठी आढळली. महिलाही येथे येऊन राहत असतात.



सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नेते आणि आंदोलक केवळ एकत्र राहत नाहीत, तर एकत्रच अन्न शिजवतात आणि एकत्रच खातात. त्या अर्थाने हे शेतकरी आंदोलन एकोप्याचं प्रतीकही आहे.


या सार्या गोष्टींमुळे गेल्या सहा-सात वर्षांत झालेल्या आंदोलनातील हे एक मोठं आणि अधिक काळ चाललेलं आंदोलन आहे. या आंदोलनाला यश मिळेल की नाही, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. पण दबावतंत्राचा वापर करून आम्ही म्हणतो ते मान्य केलंच पाहिजे, असं वर्तन करणार्या सरकारला या आंदोलनाने लोकशक्ती म्हणजे काय असते, याचा प्रत्यय आणून दिला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची आज पंजाब आणि हरियाणात केविलवाणी अवस्था झाली आहे. या आंदोलनात उत्तर प्रदेशातूनही शेतकरी कमी प्रमाणात का असेना, सामील झाले आहेत. या राज्यांतल्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांना अन्य भाषा समजत नसल्या तरी मतांची भाषा कळते. त्या भाषेत जेव्हा शेतकरी बोलतील, तेव्हा सरकारचं डोकं ठिकाणावर येईल, असं उत्तर प्रदेशचे शेतकरी मानून आहेत.

लोकशाही राज्यव्यवस्थेत कायदे लोकांसाठी बनतात. लोकविरोधी कायदे टिकत नसतात, ही गोष्ट या आंदोलनाने सिद्ध केली, तर ते आंदोलनाचं मोठंच यश म्हणावं लागेल.

 डॉ. विवेक कोरडे


 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८