मराठीचे मारेकरी कोण ? : सुहास कुलकर्णी
मराठीचे मारेकरी कोण ? : सुहास कुलकर्णी पुण्या-मुंबईत कोणतीही दोन माणसं एकत्र भेटली, की गप्पांमध्ये त्यांचं एका विषयावर एकमत असतं. इंग्रजी-हिंदीचं आक्रमण पाहता मराठी भाषेचं काही खरं नाही, असं त्यांना वाटत असतं. मराठी भाषा टिकेल का असा प्रश्न त्यांच्या मनात उमटत असतो आणि मराठीचा र्हास होणार याविषयी खात्री असते. आपली भाषा धोक्यात आहे या जाणीवेने असे लोक अस्वस्थ होतात नि मराठी वाचवायच्या मागे लागतात. इंग्रजी-हिंदी या भाषांमुळे मराठीची पीछेहाट होते आहे, असं अनेकांना वाटत असल्यामुळे एकमेकांशी नि परभाषिकांशी मराठीत बोलून किंवा दुकानांच्या पाट्या मराठीत लावून मराठी टिकेल असं त्यांना वाटून जातं. पुण्याची हवा गेले काही दिवस बदलली आहे. ट्रॅफिक जॅम, चिंचोळे रस्ते, रिक्षावाल्यांची अरेरावी, पीएमटीची अवस्था, फ्लॅटसच्या वाढत्या किमती, महागडं होत चाललेलं शिक्षण, राजकारणातला भंपकपणा, क्रिकेटमधलं फिक्सिंग असे सर्व विषय पुण्याच्या हवेतून गायब झाले आहेत. सध्या ज्याच्यात्याच्या तोंडी 'मराठी पाट्यां'चा विषय आहे. मराठी पाट्यांवर सर्वत्र एवढी चर्चा आहे की, त्यातून पुणेकरांना मराठी भाषेच्या भवितव्याची