ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे : सुहास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे : सुहास कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे यांचा आज पहिला स्मृतिदिन. डुम्बरे यांचं व्यक्तिमत्त्व आणि पत्रकारितेतील त्यांचं योगदान उलगडून दाखवणारा युनिक फीचर्सचे संपादक सुहास कुलकर्णी यांचा लेख.
कोरोनाच्या महालाटेत जी माणसं अचानक हे जग सोडून गेली, त्यातले एक सदा डुम्बरे. खरं पाहता त्यांची तब्येत उत्तम होती, ते आरोग्याची नीट काळजीही घेत, रोज घाम निघेपर्यंत भरपूर चालत. खाणंपिणंही अगदी संयमित. पण तरीही कोव्हिडने त्यांच्यावर मात केली आणि पृथ्वीवरील एक भला माणूस कमी झाला.
दोनच वर्षांपूर्वी डुम्बरेंनी वयाची सत्तरी गाठली होती आणि त्यांच्या मित्रांनी एका छोटेखानी समारंभात त्यांचं कौतुक वगैरे केलं होतं. अर्थात, डुम्बरेंमधे उत्साह, उर्जा आणि चैतन्य इतकं काठोकाठ भरलेलं होतं, की वयाच्या या आकड्याचा नि त्यांच्या वागण्या-बोलण्याचा जवळपास काही संबंध नव्हता. कारण ते जसे चाळिशीत होते, तसेच त्याही दिवशी होते. उमदे, उत्साही आणि मनमोकळे. वयासोबत माणूस अधिकाधिक स्थिर आणि प्रगल्भ होत जातो असं म्हटलं जातं. पण मी बघतोय तेव्हापासून डुम्बरे विचारांनी स्थिर आणि बुद्धीने प्रगल्भच होते. चंचलपणाचा आणि उथळपणाचा आरोप त्यांच्यावर त्यांचे शत्रूही (कुणी असतील तर) करू शकणार नाहीत, असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच माझ्यासारखे कित्येक लोक त्यांच्याशी कायमचे जोडले गेले असणार.
मला आठवतंय, १९९० साली त्यांची-माझी पहिली भेट झाली. तेव्हा आम्ही ‘युनिक फीचर्स’मधले मित्र पत्रकारितेत स्वतंत्र वाट तयार करण्यासाठी धडपडत होतो आणि चांगलं काम करण्याची संधी देतील अशा संपादकांना भेटत होतो. भेटत अनेकांना होतो; त्यांच्यासोबत कामही करत होतो, पण पहिल्या एक-दोन भेटींतच ‘यांच्यासोबत काम करायला पाहिजे’ असं ज्यांच्याबद्दल वाटून गेलं होतं त्यात डुम्बरे एक होते. तेव्हा ते नव्यानेच सुरू झालेल्या ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक बनले होते.
आमची भेट झाली तेव्हा ते चाळीसेक वर्षांचे होते, पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात प्रौढपणा असल्याने तेव्हा आम्हाला ते बरेच मोठे वाटले होते. आम्ही पोरं तेव्हा गद्धेपंचविशीत होतो आणि आमच्यापेक्षा पाच-सात वर्षांनी मोठी माणसंही आम्हाला वयस्करच वाटायची! पण ते सोडा. डुम्बरे वयापेक्षा मोठे वाटण्यामागे एक कारण होतं. त्या काळी वर्तमानपत्रांची सूत्रं आजच्यासारखी तरुण मंडळींकडे नव्हती. दैनिकांच्या संपादकपदी एकजात वयस्कर मंडळीच असायची. किमान ती दिसायची तरी तशी. डोक्यावर टक्कल असलेली किंवा केस पिकलेली, डोळ्यांवर जाड भिंगांचे काळ्या फ्रेमचे चष्मे लावलेली. पंचवीस-तीस वर्षं तेच ते काम करून थकलेली आणि सगळ्या जगाचं (आणि शहाणपणाचं) ओझं आपणच वाहत असल्याची भावना बाळगणारी ही माणसं तेव्हा आम्हाला बर्याच आधीच्या पिढीची वाटायची. डुम्बरे दिसायला या कॅटेगरीतले नसले तरी ते ‘संपादक’ असल्यामुळे आम्हाला त्याच गटातले वाटले असणार.
‘साप्ताहिक’ सकाळचे संपादक बनण्यापूर्वी ते ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक होते आणि त्याआधी तेव्हा प्रतिष्ठित मानल्या जाणार्या सकाळच्या रविवार पुरवणीचेही संपादक होते. या अर्थाने ते ‘सकाळ’मधील ज्येष्ठ पत्रकार होते. पण त्यांची भेट होईपर्यंत आम्ही कुणी त्यांचं फारसं वाचलेलं वगैरे नव्हतं. त्यांची संपादकपदाची कारकीर्दही माहिती नव्हती. मुळात आम्ही ‘युनिक’मधील बहुतेक मित्र पुण्याबाहेरून शिक्षण-करियरसाठी आलेलो होतो. तोवर आमचा पुण्याशी आणि त्यामुळे ‘सकाळ’शी फारसा संबंध नव्हता. मी तर लहानपणापासून केवळ (तळवलकरांच्या) ‘महाराष्ट्र टाइम्स’चाच वाचक असल्याने ‘सकाळ’ फार गंभीरपणे घेत नसे.
या सार्या अनभिज्ञतेमुळे ‘सकाळ’बद्दल मनात फार दडपण नसायचं. पण डुम्बरेंशी एक-दोन भेटी झाल्यानंतर त्यांच्यासोबत थोडंफार काम सुरू झालं, आणि का कुणास ठाऊक, त्यांना भेटायला जायचं म्हटलं की मनावर दडपण यायचं. खरं तर ते स्वभावाने अगदी प्रेमळ, आस्थेने विचारपूस करणारे. वयातील आणि अनुभवातील अंतराची जाणीव होऊ न देणारे. त्यांच्या वागण्या-वावरण्यातही अगदी सहजता असे, पण त्यांचं बोलणं एकदम थेट असे. विचारात स्पष्टता असे. नजरेनेच ते आपली समज जोखताहेत असं त्यांच्याशी बोलताना वाटे. कधी कधी तर त्यांची दृष्टी आपले डोळे आणि मेंदू भेदून पलीकडे बघते आहे असा भास होई. त्यामुळे त्यांच्याशी काही बोलायचं म्हटलं की जीभ रेटत नसे. आपल्याकडून काही चुकीचं बोललं जाईल का, आगळीक होईल का, त्यांनी प्रश्न विचारला तर नेमकेपणाने बोलता येईल का, असं मनात दडून बसलेलं असे. त्यामुळे त्यांना भेटायला जायचं म्हणजे पूर्ण तयारीनिशीच, असं समीकरण बनून गेलं होतं. त्यातून संबंधात एक प्रकारचं अवघडलेपण होतं. पण त्यांच्यासारख्या ‘नो-नॉन्सेन्स’ संपादकासोबत काम करायचं तर ती पूर्वअटच होती.
त्यांनी आम्हाला सुरुवातीला सोपे विषय लिहायला दिले. मग मुलाखतींवर आधारित लेख लिहायला सांगितले. मग थोड्या दिवसांनी मोठे लेख, नंतर आठ-दहा पानांच्या मोठ्या कव्हरस्टोरीजही ते छापू लागले. आणि मग थेट दिवाळी अंकात मोठे रिपोर्ताजही. ‘एकत्र काम करणं’ नावाचा हा टप्पा सुरू झाल्यानंतर त्यांच्यासोबतचा अवघडलेपणा जसा विरघळूनच गेला. संबंधात सहजता आली. डुम्बरेंमधील संपादक आणि माणूस उमगू लागला.
डुम्बरे तरुण पत्रकारांना संधी आणि प्रोत्साहन देणारे संपादक होते. आमच्यासारख्या तरुण मंडळींनी सुचवलेले विषय ते ऐकून घेत, चांगल्या कल्पना उचलून धरत, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी खोलवर काम करावं यासाठी उद्युक्त करत. तयार झालेले लेख ते उत्साहाने छापत. आम्ही कुठे कमी पडलो, की ‘यू शुड डू धिस’ नि ‘यू शुड डू दॅट’ असं इंग्रजीत बोलत. ‘आय एक्स्पेक्ट मच मोअर फ्रॉम यू’ असं त्यांनी म्हटलं की समजावं, आपली उडी कमी पडलीये.
डुम्बरे जसे काम करून ‘घेण्या’बाबत काटेकोर होते तसेच ते ‘देण्या’बाबतही दिलदार होते. उदाहरणार्थ, सुरुवातीच्या काळात लेखांवर लेखक म्हणून कुणा व्यक्तीचं नाव छापण्याऐवजी ‘युनिक फीचर्स’ असा उल्लेख असावा, असा आमचा आग्रह असे. ‘हा काय आग्रह?’ असा चिडचिडा प्रश्न तेव्हा बहुतेक संपादकांच्या चेहर्यावर उमटे. मराठी पत्रकारितेच्या इतिहासात तोवर अशी मागणी कुणी केलेली नसावी. त्यामुळे लेखावर संस्थेचं नाव कसं द्यायचं असा प्रश्न त्यांना पडे. ‘आम्ही टीम जर्नालिझम करतो. एकेकट्याने लेख लिहीत नाही. मिळून माहिती मिळवतो, मिळून लिहितो’, असं आम्ही सांगत असू. त्यावर संपादक म्हणत, “वाटल्यास आम्ही तुम्हा सगळ्यांची नावं छापतो, पण संस्थेचं नाव छापणार नाही.” आम्ही खट्टू होत असू. याला अपवाद म्हणजे सदा डुम्बरे! युनिक फीचर्सच्या टीम जर्नालिझमची ‘कन्सेप्ट’ पटल्यानंतर संस्थेच्या नावाने लेख छापण्यात त्यांनी कधीही कुचराई केली नाही. एवढंच काय, ‘सकाळ’मध्ये येणार्या ‘साप्ताहिका’च्या जाहिरातींमध्येही ते स्पष्टपणे लेखक म्हणून युनिक फीचर्सचा उल्लेख करत. आमची आणि आमच्या कामाची ओळख ठसवण्यात त्याचा आम्हाला खूपच उपयोग झाला होता. तरुण मंडळींच्या नव्या कल्पना समजून घेणारे आणि त्यासाठी संकेत बाजूला ठेवू शकणारे संपादक किती सापडतील?
डुम्बरेंच्या या उमद्या स्वभावामुळे १९९० पासून डुम्बरे निवृत्त होईपर्यंत म्हणजे २००९ पर्यंत आम्ही त्यांच्यासोबत चिक्कार काम केलं. या वीस वर्षांच्या काळात आम्हाला पत्रकारितेत जे जे करावंसं वाटत होतं, ते ते डुम्बरे यांनी करू दिलं. ‘साप्ताहिक सकाळ’चा दिवाळी अंक तेव्हा मोठा प्रतिष्ठित मानला जायचा. मराठीतले मोठे लेखक-पत्रकार त्यात लिहीत. आम्हा मंडळींच्या नव्या प्रयोगांनाही त्यांनी त्यात मानाने जागा दिली. १९९२-९३ पासून आम्ही मुंबईचं अंधारं जग प्रकाशात आणण्यासाठी धडपडत होतो. भेंडीबाजार, धारावी, आग्रीपाडा, कोळीवाडा अशा ठिकाणी चार-चार महिने मुक्काम ठोकून शोधाशोध करण्याचं काम सुरू होतं. हे विषय काही वाचकप्रिय नव्हते की कुणा मोठ्या लेखकाने लिहिलेले नव्हते. शिवाय थोडीथोडकी नव्हे तर अंकाची पंधरा-वीस पानं ते खायचे. पण तरीही डुम्बरेंनी ते सर्व लेख सलग सहा-सात वर्षं ‘साप्ताहिक’मध्ये छापले. अगत्याने आणि अग्रक्रमाने. या लेखांमुळे मुंबईतल्या जगण्याशी झगडा करणार्या वस्त्यांबद्दल, माणसांबद्दल नवी दृष्टी मिळाली, असं वाचक आम्हाला सांगतात तेव्हा ही लेखमाला उचलून धरणार्या डुम्बरेंकडेही त्याचं श्रेय जातं याची जाणीव मनात असते.
‘साप्ताहिक’ हे खरं तर मध्यमवर्गीय वाचकांचं व्यासपीठ; पण डुम्बरे हे काही वाचकाला निव्वळ रिझवणारे संपादक नव्हते. वाचकांना सजग करणं, त्यांच्या विचार-व्यवहारांच्या पलीकडचं दाखवणं, त्यांच्या संवेदनशीलतेला साद घालणं ही त्यांच्या कामाची शैली. त्यांना स्वत:ला कष्टकर्यांच्या जगण्याबद्दल आस्था आणि सामाजिक प्रश्नांविषयी कणव असल्यामुळे ते या शोधलेखांच्या पाठीशी उभे राहिले असणार. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या वाढत्या पसार्याचा अर्थ शोधणारे ‘युनिक’चे शोधलेखही डुम्बरेंनी असेच अगत्याने छापले. (पुढे त्यांत आणखी लेखांची भर पडून ‘देवाच्या नावाने’ हे पुस्तक झालं.) बाकीच्या नैमित्तिक लेखांचं तर सोडाच, पण निव्वळ शोधलेख आणि रिपोर्ताज प्रकारचं चिक्कार काम आम्ही डुम्बरेंसोबत केलं. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांना भिडण्याची आच त्यांना असल्यामुळेच हे होऊ शकलं.
डुम्बरेंसोबत काम करणं हीदेखील अनुभवण्याची आणि मजा घेण्याची गोष्ट. त्यांच्याशी कामानिमित्ताने गाठीभेटी होत, विषयांवर-विषयांपलीकडे गप्पा-चर्चा होत. काय करायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे असं ब्रेनस्टॉर्मिंग होई. या उपक्रमाचा ड्रायव्हिंग फोर्स अर्थातच डुम्बरे असत. त्यांच्याकडे जायचं आणि मीटिंग करायची म्हटलं की पाऊण एक तास लागणारच. ‘साप्ताहिक’चा अंक छापायला गेलेला असेल आणि संपादकसाहेब जरा निवांत असतील, तर मग बातच वेगळी. कोणता विषय कसा हाताळायला हवा, भारतातील चांगली नियतकालिकं त्या विषयाकडे कसं पाहतात, इंग्लंड-अमेरिकेतील गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स, लंडन टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्टसारखी मंडळी काम कसं करतात, असा रीतसर वर्गच ते अशा वेळी लावणार. मध्ये मध्ये सफाईदार इंग्रजी. ‘व्हेन आय वॉज इन लंडन...’ अशी प्रस्तावना करून तिथल्या संपादकांशी झालेल्या चर्चा सांगणार. ‘यू शुड अंडरस्टँड धिस अँड वर्क ऑन इट’ असं म्हणत आणखी चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करणार. फॉर्मात असले की त्यांची देहबोली बदलून जाई. बोलण्याच्या ओघात त्यांचा हात कपाळावरून केसांमध्ये झपकन सरके आणि मग ‘हं’ असा प्रश्नार्थक हुंकार नक्की येई. या हुंकाराचा अर्थ- ‘इंटरेस्टिंग आहे, समजतंय ना?’ असा असे. हा एकपात्री कार्यक्रम पाहण्यासारखा असे. या कार्यक्रमाचे अगदी साप्ताहिक नसले, तरी मासिक प्रयोग मला नक्कीच पाहायला-अनुभवायला मिळाले.
डुम्बरे जसे बोलायला आणि विचारप्रवृत्त करायला उत्सुक असत, तसंच ते दुसर्याचं ऐकूनही घेत. बोलता बोलता ‘तुला काय वाटतं?’ असं विचारत आणि आपण बोलायला लागल्यावर शांतपणे ऐकून घेत. सुरुवाती-सुरुवातीला दडपणामुळे त्यांच्याशी तुटकपणे बोललं जायचं. पण त्यांच्यासोबत काम करून जसा सरावलो, तशी मलाही शिंगं फुटू लागली. बहुतेक बाबतींत एकमतच असल्याने मतभेद होण्याचे प्रसंग कमी येत. पण अशा संवादामुळे सहमतीच्या अवकाशात मुद्दे एक्सप्लोअर करण्याची संधी मिळे. त्यांच्यासोबत विचारांचं असं आदान-प्रदान करणं ही गोष्ट माझ्या पत्रकारी शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यातून माझी दृष्टी विकसित व्हायला नक्कीच उपयोग झाला.
मतभेदांचा एरिया कमी असला तरी कधी कधी तसे प्रसंगही येत. एक प्रसंग आठवतोय. त्या काळी (म्हणजे १९९० ते १९९६) केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांची कारकीर्द अखिल भारतात गाजत होती. १९९१ पासूनच्या देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी आचारसंहिता अत्यंत कठोरपणे राबवून निवडणुकांतील गैरप्रकारांना मोठाच आळा घातला होता. कुठे कुठे त्याचा अतिरेकही होत होता, पण सामान्य जनता शेषन यांच्यावर जाम खूष होती. वृत्तपत्रादी माध्यमांतही त्यांचं जोरदार कौतुक सुरू होतं. एकदा या विषयावर आमचं बोलणं चालू होतं. निवडणुकांमधील पैशाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे आणि निवडणुका ‘क्लीन’ होत असल्यामुळे शेषन हे लोकशाहीला पूरक काम करत आहेत, असं डुम्बरेंचं म्हणणं होतं. मलाही ते मान्य होतं. पण भारताची लोकशाही एवढी गुंतागुंतीची आहे, की एखाद्या माणसाने असं ‘अँग्री ओल्ड मॅन’ बनून व्यवस्थेला शिस्त लावण्याचा उपक्रम काही कामाचा नाही, असं माझं म्हणणं होतं. शिवाय, निवडणुकीच्या नाड्या नोकरशहाच्या हाती देण्यात आणि देशाच्या लोकशाहीला स्वच्छ करण्याची जबाबदारी एकाच माणसावर टाकण्यात धोका आहे, असंही वाटत होतं. मला आठवतंय, त्या दिवशी मी आणि डुम्बरे दोन टोकांवर उभे होतो.
त्या दिवशी मी त्यांना म्हटलं, “या विषयाची दुसरी बाजूही लिहायला हवी...’ एरवी संपादक हा प्राणी स्वत:च्या विचारांच्या विरोधातले लेख छापण्यास उत्सुक नसतो. राजकीय मतांच्या बाबतीत तर नसतोच नसतो. शिवाय त्या-त्या नियतकालिकाची काही एक ‘एडिटोरियल पॉलिसी’ असते. त्यात न बसणारे लेख संपादक नाकारतही असतात. अगदीच कुणी नामवंत लेखक, विचारवंत वगैरे असेल किंवा ‘वरून’ दबाव/सूचना असेल तरच विरोधी विचारांचे लेख छापले जातात. आम्ही यातले कुणीच नव्हतो; पण तरीही डुम्बरेंनी आमच्यापैकी कुणी तरी या विषयावर लिहिलेला लेख मोकळेपणाने छापला. खरं तर त्यांनी तो लेख छापला नसता तर काहीही बिघडलं नसतं. आम्ही त्यांच्यापुढे वयाने आणि अनुभवाने इतके लहान होतो, की दुसर्या दिवशी तो विषय आम्ही विसरूनही गेलो असतो. पण डुम्बरेंनी मतभेद असूनही तो लेख छापला. माणसात मुळात उमदेपणा असेल तरच असं घडू शकतं.
तो काळ राजकीयदृष्ट्या फार अस्वस्थतेचा आणि अस्थिरतेचा होता. कोणत्याच राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळत नव्हतं अणि देशभर प्रादेशिक पक्षांचा बोलबाला होता. पण तो ‘गुगलपूर्व’ काळ असल्यामुळे या प्रादेशिक पक्षांबद्दल कुणालाच फारसं काही माहीत नव्हतं. अनेक पक्षांची नावंही पहिल्यांदाच कळत होती. मी डुम्बरेंना म्हटलं, “मी या पक्षांबद्दल भरपूर वाचतोय. इंग्रजीत जिकडे-तिकडे लिहिलं जातंय. मराठीत मात्र ते कुणी लिहीत नाहीये. काँग्रेस आणि भाजपची एकूण परिस्थिती पाहता देशात दहा-वीस वर्षं तरी प्रादेशिक पक्ष राहणार. आपल्या वाचकांना आपण राजकारणातील या नव्या प्रवाहाची ओळख करून दिली पाहिजे. मला आवडेल लिहायला त्याबद्दल.”
डुम्बरे हे उत्सुक आणि उत्साही संपादक. त्यांना ही कल्पना आवडली. सदर लिहू इच्छिणारा जेमतेम तिशीतला पत्रकार हा विषय पेलू शकतो का, हा प्रश्न त्यांना पडला की नाही माहीत नाही, पण त्यांनी विश्वास टाकला खरा. १९९८ आणि १९९९ अशा लागोपाठ दोन लोकसभा निवडणुका झाल्या. सगळं राजकारण प्रादेशिक पक्षांभोवतीच फिरत होतं. त्या दोन वर्षांत (ते स्वत: राजकीय विषयांचे जाणकार असूनही स्वत: न लिहिता) त्यांनी मला सलग लिहू दिलं. काश्मीरपासून अरुणाचलपर्यंत आणि गुजरातपासून केरळपर्यंत अनेक राज्यांतील राजकीय-सामाजिक पदर आणि त्यातील गुंतागुंत त्या वेळी लिहिता आली. देशातील ही घडामोड लक्षणीय आहे हे ओळखून त्याला एवढी जागा आणि एवढं महत्त्व देण्याचं भान ज्या थोड्या संपादकांकडे होतं, त्यात डुम्बरे होतेच होते.
या राजकीय सदरामुळे माझा स्वत:चा देशभरातील प्रादेशिक राजकारणाचा अभ्यास झालाच, शिवाय सलग दोन वर्षं राजकीय सदर चालवण्यातून आत्मविश्वासही बळावला. माझं अकॅडमिक शिक्षण राज्यशास्त्रातलं होतं हे खरं; पण डुम्बरेंमुळे माझ्यातून एक राजकीय पत्रकार तयार झाला. मग पुढेही राजकीय लिखाणाचा हा कार्यक्रम चालू राहिला. निवडणूक लोकसभेची असो की महाराष्ट्राची किंवा देशातल्या कोणत्याही राज्याची, डुम्बरे मला बोलावणार आणि लिहायला सांगणार, असं सुरूच राहिलं. २००९ साली ते निवृत्त होईपर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या लिखाणाची जबाबदारी त्यांनी माझ्यावरच सोपवली होती. दहा एक वर्षं हा सिलसिला इतका सरावाचा झाला होता, की निवडणुकीच्या अलीकडे राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोग जसे तयारीला लागतात, तसा मीही आपसूक अभ्यासाच्या आणि लिखाणाच्या मागे लागायचो. कारण एकच- विश्वास टाकण्याची डुम्बरेंची पद्धत!
विश्वास टाकणं हे जसं डुम्बरेंचं वैशिष्ट्य होतं, तसंच पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्याचाही त्यांच्यात विशेष गुण होता. हे प्रोत्साहन देणं नुसतं ‘आगे बढ़ो’ असं कोरडं बोलण्यापुरतं नव्हतं. विश्वास टाकणं, पुढच्याच्या क्षमता वाढवणं आणि त्याला दोन पावलं पुढे नेणं असं सारं ते एकाच वेळी करत. हे सारं माझ्या बाबतीत घडलेलं असल्यामुळे मी ते छातीठोकपणे सांगू शकतो. पण एक दिवस त्यांनी मला एक-दोन नाही, एकदम दहा पायर्या वर ढकलायचं ठरवलं. कसं ते सांगतो.
एक दिवस त्यांचा फोन आला. म्हणाले, “येऊन जा. एक महत्त्वाचं काम तुला सांगायचंय.” मला वाटलं, साहेबांच्या डोक्यात काही तरी विषय शिजला असेल! मी गेलो. केबिनमध्ये ते माझी वाटच पाहत होते. त्यांनी मला एक जाडजूड बाड दाखवलं आणि ते म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षांत मी लिहिलेले लेख आहेत हे. आय वाँट यू टु एडिट धिस. या लेखांचं पुस्तक करायचंय. यू विल बी द एडिटर. हे पुस्तक कसं करायचं, कुठले लेख पुस्तकात घ्यायचे, कुठले काढून ठेवायचे, लेखांचा क्रम काय ठेवायचा, विभाग कसे करायचे, सगळं तू ठरवायचं. मेक अ गुड बुक आऊट ऑफ इट.” मी अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. ते मला त्यांच्या पुस्तकाचा संपादक बनवू पाहत होते. त्याआधी मी पुस्तकांच्या संपादनाचं काम केलं होतं खरं, पण डुम्बरे हे त्या काळी पुण्यातले महत्त्वाचे संपादक होते. त्यांच्या पुस्तकाचं संपादन करणं माझ्या स्वप्नातही नव्हतं. त्यांच्या ऑफरने मी खूष झालो. मी होकार दिला. माझ्या हातात बाड सोपवताना ते म्हणाले, “इट्स युवर बेबी नाऊ.” पाठोपाठ त्यांनी पुढचा धक्का दिला. म्हणाले, ‘या पुस्तकाला तू प्रस्तावनाही लिहायची आहेस.’ आता मात्र मी हबकलो. आपल्यापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी मोठ्या आणि तिपटीहून अधिक अनुभवी माणसाच्या पुस्तकाला आपण कशी लिहिणार प्रस्तावना? मी त्यांना तसं म्हटलंही. त्यावर ते म्हणाले, “त्याचं दडपण घेऊ नकोस. पुढची पिढी माझं लिखाण कसं जोखते हे मला पाहायचंय. त्यामुळे पुढच्या पिढीचा प्रतिनिधी बनून तुला काय वाटतं ते तू लिही. फरगेट दॅट सीनियॉरिटी वगैरे. गिव्ह युवर बेस्ट.” सगळा सरळ मामला.
मी अर्थातच मेहनत करून त्या पुस्तकाचं संपादन केलं. पुस्तक वाचण्याच्या दृष्टीने आकर्षक व्हावं म्हणून काय काय केलं. पुस्तकाला एक रीतसर प्रस्तावना लिहिली. ती अर्थातच माझी पहिली प्रस्तावना होती. पुस्तकाचं नावंही मीच ठरवलं. पुस्तक त्यांचं होतं आणि निर्णय मी घेत होतो; तरीही त्याबद्दल ते एका अक्षराने बोलले नाहीत. उलट, माझ्या मेहनतीला त्यांनी दाद दिली. पुस्तक छापून आल्यावर पहिली प्रत-प्रेमाने लिहिलेल्या दोन ओळी आणि सहीनिशी मला खास बोलावून दिली. अर्थातच ‘सर्टिफिकेट’ समजून ती प्रत मी माझ्याजवळ जपून ठेवली आहे.
त्या काळी डुम्बरेंच्या नावाला प्रतिष्ठा होती. ते मराठी वृत्तपत्रसृष्टीतले तेव्हाचे महत्त्वाचे पत्रकार होते. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्रातील कोणत्याही नामवंत विचारवंताने आनंदाने प्रस्तावना लिहून दिली असती. ते डुम्बरेंच्या प्रतिष्ठेलाही धरून झालं असतं. पण तसं न करता त्यांनी एका तरुण सोबत्याकडून प्रस्तावना लिहून घेण्याची जोखीम घेतली. अशी जोखीम कधी कुणी घेतं काय? पण डुम्बरे या बाबतीत लखलखीत अपवाद ठरले. त्यांच्या स्वभावातील उमदेपणाला प्रयोगशीलतेची जोड असल्यामुळेच ते असं काही करू शकले. शिवाय, पुढच्या पिढीला प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील गुणांना पैलू पाडण्याची असोशीही त्यामागे असणार.
त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्याचा मला आलेला आणखी एक अनुभव सांगायलाच हवा. जागतिकीकरणाच्या प्रवाहात सामील होऊन तेव्हा दहा वर्षांचा पहिला टप्पा पूर्ण होत आला होता. तेवढ्या काळात आपल्या समाजात बरेच मोठे बदल घडून येत होते. मध्यमवर्गाचा आकार वाढत चालला होता आणि त्याच्यात मूलभूत असा बदलही होत होता. जात, धर्म, संस्कृती, अस्मिता, अर्थव्यवस्था आणि एकूणच समाज व्यवहार यावरही काही एक परिणाम जाणवत होता. या सार्याबद्दल एखादा मोठा लेख लिहावा असं वाटत होतं. या सार्या घडामोडींबद्दल मी एक टिपण तयार केलं आणि विचारार्थ डुम्बरेंना दिलं. त्यांना म्हटलं, “मी या विषयावर लिहावं म्हणतोय. दिवाळी अंकासाठी विचार कराल का?’ ते म्हणाले, ‘तू लिही. लेख उत्तम झाला तर दिवाळी अंकात छापू.’ लेख उत्तम होण्याची पूर्वअट स्वत:चा कस लावणारी होती.
मग मी माझ्यात जेवढी केवढी शक्ती होती ती लावून मोठाच्या मोठा लेख लिहिला. ठाकून-ठोकून पक्का मजबूत केला. डुम्बरेंना वाचायला दिला. आतून पाकपुक होत होती. ‘साप्ताहिक’च्या दिवाळी अंकात त्यावेळचे सर्व मोठे लेखक लिहीत. थोरामोठ्यांच्या मुलाखती असत. त्यांच्यासोबतीने आपला लेख छापून यावा असं मनोमन वाटत होतं; पण डुम्बरेंच्या चाळणीतून तो पास होईल का, अशी भीतीही वाटत होती. एक दिवस त्यांचा फोन आला : “यू हॅव डन अ गुड जॉब! वेलरिटन आर्टिकल. आपण घेऊयात हा लेख दिवाळी अंकात.”
विशेष म्हणजे लेख स्वीकारून डुम्बरेंनी तो कुठे तरी कोपर्यात छापला नाही, अग्रक्रमाने छापला. शिवाय दिवाळी अंकाच्या प्रत्येक जाहिरातीत ठसठशीतपणे नावानिशी या लेखाचा उल्लेख केला. त्या एका लेखामुळे ‘साला मैं तो साहब बन गया!’
गंमत म्हणजे त्या वर्षानंतर सलग आठ वर्षं (म्हणजे २००१ ते २००८) ‘साप्ताहिक’च्या दिवाळी अंकात माझे दीर्घ लेख येत राहिले. थीम तीच. हे लेख मोठे म्हणजे बरेच मोठे असत. दिवाळी अंकाची पंधरा-वीस पानं. एकाच (तेही तरुण) लेखकाची एवढी पानं छापणं म्हणजे कोणत्याही संपादकाच्या जिवावर येणारी गोष्ट; पण मराठीतला कोणताही प्रतिष्ठित दिवाळी अंक एवढा मोठा निबंध छापण्याच्या भानगडीत पडत नसताना डुम्बरेंनी आनंदाने आणि उत्साहाने हे लेख छापले. त्या लेखांना ते लेख म्हणायचे नाहीत, ‘एसे’ म्हणायचे. निबंध! ‘हा एसे फॉर्म चांगला आहे. तो आपण डेव्हलप करायला पाहिजे,’ असं त्यांचं म्हणणं असे. म्हणजे हे लेख छापून डुम्बरे एकाच वेळेस माझ्यातल्या लेखकाला आणि पत्रकारितेतल्या एका फॉर्मला डेव्हलप करू पाहत होते.
इथे ओघाने डुम्बरेंचा आणखी एक विशेष सांगायलाच हवा. ‘युनिक फीचर्स’तर्फे आम्ही २००० सालापासून ‘अनुभव’ मासिक सुरू केलं. त्या वर्षीपासून ‘अनुभव’चा दिवाळी अंकही सुरू झाला. या अंकाचा मी संपादक होतो. पण ‘साप्ताहिक’च्या दिवाळी अंकात दुसर्या एका दिवाळी अंकाच्या संपादकाचा लेख का छापायचा, असा प्रश्न त्यांच्या मनात कधी आला नाही. मीही एरवी संपादक म्हणून विचार करत आणि वावरत असलो, तरी डुम्बरेंपुढे उभा राहिलो की मी त्यांचा आज्ञाधारक लेखक बनून जात असे. त्यांचं म्हणणं, त्यांचे निर्णय फायनल! ते निवृत्त झाल्यानंतरही या नात्यात फरक पडला नाही. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला संधी दिली आणि एकेक पायरी वर चढवलं, याची कृतज्ञता कायमची मनात असल्यामुळे या नात्यात फरक पडणं अशक्य होतं.
डुम्बरे ‘साप्ताहिक’चे २१ वर्षं संपादक होते. त्या दोन दशकांच्या काळात त्यांनी ‘साप्ताहिक सकाळ’ला एका उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी आपल्या वैयक्तिक संपर्कातून मराठीतील अनेक नामवंत लेखक-अभ्यासकांना ‘साप्ताहिक’साठी लिहितं केलं. अंक आशयदृष्ट्या दर्जेदार केल्यामुळेही ही गोष्ट प्रत्यक्षात आली. त्यांनी अनेक दुर्लक्षित कामं आणि प्रश्न समाजासमोर आणले, त्याचप्रमाणे नव्याने लिहू लागलेल्यांनाही ‘साप्ताहिक’चं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.
सुरुवातीची एक-दोन वर्षं सोडली तर बाकीची सर्व वर्षं मी त्यांच्यासोबत या ना त्या प्रकारे काम करत होतो. या सर्व काळात आपण एका चांगल्या संपादकासोबत काम करत आहोत आणि या काम करण्यातून आपलीही वाढ होत आहे, असा कायम फील होता. ते विचार कसा करतात, विषयांची निवड कशी करतात, विषयांना आकार कसा देतात, वाचकांना समृद्ध करण्यासाठी फॉर्म कसा निवडतात, या आणि अशा कित्येक गोष्टी समजून घेता आल्या. ते तसं पाहता गंभीर प्रकृतीचे गृहस्थ होते. त्यांना विचारांची नीटशी बैठक होती. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडणीचा त्यांना आवाका होता. ते मराठी संपादक असले तरी त्यांचं विचारविश्व मराठी समाजापुरतं मर्यादित नव्हतं. जगात काय घडतंय, त्याबाबत विचारवंत काय म्हणत आहेत, अभ्यासक काय सांगत आहेत, जागतिक पातळीवर कोणत्या अहवालात काय निष्पन्न झालंय अशा कित्येक गोष्टींवर त्यांची सतत नजर असे. जगात जे चाललंय त्याचा आपल्याशी संबंध काय आणि कसा आहे हे समजून घेऊन वाचकाला सांगण्याचं कामही ते करत. त्यासाठी त्यांनी जसं त्या त्या विषयातल्या लेखकांकडून लिहून घेतलं, तसंच स्वत:ही भरपूर लिहिलं. पर्यावरण-शहर नियोजन-पर्यायी विकास आणि समाजसुधारक, प्रबोधनकार नि नवविचार हे त्यांचे विशेष आवडते विषय. पण त्यांचा मूळ आस्थेचा विषय आपला समाज सर्वार्थाने निरोगी कसा राहील, हा. त्यामुळे सगळ्याच बाबत नवा, पर्यायी विचार काय असू शकतो याच्याबाबत ते अखंड शोधात असत. जागतिकीकरणाचे आणि खासगीकरणाचे आपल्या समाजव्यवहारांवर होत असलेले परिणाम, राजकारणाचा घसरता स्तर, साहित्य-नाटक-कला या क्षेत्रांत आलेला बाजारबुणगेपणा, गरिबांचे नि कष्टकरींचे प्रश्न परिघाबाहेर फेकले जाणं, नद्या-जंगलं-धरणं-प्रदूषण अशा प्रश्नांबाबत शासनसंस्थेची बेफिकिरी या विषयांवर त्यांचं काहीएक म्हणणं होतं. त्यावर त्यांनी विपुल प्रमाणात लिहिलंही. त्या त्या वेळी केलेलं हे लिखाण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणारं आहे.
संपादकाला दररोजच्या घटना-घडामोडींना प्रतिसाद द्यावा लागतो. हाती आलेल्या माहितीवर प्रक्रिया करून वाचकाशी जमेल तसा संवाद करावा लागतो. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत जग पूर्वीपेक्षा जवळ आल्याने आपल्याला येऊन धडकणार्या घटनांचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळे जग समजून घेणं ही मोठी थकवणारी गोष्ट बनली आहे. तुमच्यावर माहितीचा असा काही मारा होत असतो, की त्यामुळे संपादक त्यातच अडकून बसतो. हे सारं डुम्बरेंबाबतही झालेलं असणार. पण तरीही डुम्बरेंंनी आपले आस्थाविषय टिकवून ठेवले आणि त्यावर ते लिहित राहिले, लिहून घेत राहिले.
त्यांचं स्वत:चं लिखाण अगदी नेटकं होतं. गोळीबंद. फाफटपसारा अजिबात नाही. त्यांची शैलीही वैशिष्ट्यपूर्ण. ओघवती आणि नेमकी. एकामागून एक वाक्यं येणार... पूर्ण विचारांती. जोरकसपणे उलगडणारी. एरवी जे शब्द आणि संज्ञा वापरायला लोक कचरतात, ती परिभाषा डुम्बरे सहजपणे आणि सढळपणे वापरत- तेही लेखन जड होऊ न देता. त्यामुळे त्यांचं लिखाण जसं वाचनीय आणि आकर्षक असे, तसंच मुद्द्याला थेट हात घालणारंही असे. त्यांच्या लिखाणात एक उत्स्फूर्तपणा असे व त्यामुळे वाचकही वाचत राही. त्यांच्या लिखाणात वाचकाला ठामपणे काही सांगण्याचा निश्चय असे; पण ते आक्रमक बनत नसे. वाचकाचा सदसद्विवेक जागा करण्याची त्यांची शैली होती. ते हे सहजी करत, कारण त्यांच्या विचारांत स्पष्टता होती. जे वाटतं ते स्पष्टपणे साधार सांगण्याचं धाडस त्यांच्यात होतं. त्यांची एकूणात पाच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत : आरसपानी, प्रतिबिंब, दशकवेध, देणारं झाड आणि सदा सर्वदा. त्याशिवाय त्यांनी संपादन केलेलं पुस्तक : करके देखो. त्यातील दशकवेध, करके देखो व देणारं झाड या पुस्तकांशी मी संपादक या नात्याने थेटपणे जोडलेला असल्यामुळेच वर सांगितलेली लेखन वैशिष्ट्यं मी अगदी जवळून अनुभवली आहेत.
डुम्बरेंंची पाच-सहा पुस्तकं प्रकाशित झालेली असली, तरी ती पुस्तकं म्हणजे लेखसंग्रह आहेत. खरंतर त्यांचा आवाका आणि अनुभव एवढा होता, की त्यांनी आपल्या आस्थाविषयांवर पुस्तकं कशी लिहिली नाहीत याचं आश्चर्य वाटतं. पण त्यांच्या संपादनकाळात त्यांनी ज्या लेखकांना-अभ्यासकांना ‘साप्ताहिक’साठी लिहितं केलं, त्यांची मात्र अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे यांची पुस्तकं त्याची उत्तम उदाहरणं ठरावीत. ही पुस्तकं म्हणजे ‘तुकाराम दर्शन’ आणि ‘लोकमान्य ते महात्मा’. ‘साप्ताहिक’ मध्ये दीर्घकाळ चाललेल्या दोन लेखमालांमधून हे दोन उत्तम ग्रंथ तयार झाले. विशेष म्हणजे या लेखमाला वाचकप्रियही होत्या. त्या वाचण्यासाठी वाचक आवर्जून ‘साप्ताहिक’ घेत. एरवी वैचारिक साहित्य वाचण्याबाबत आपल्याकडे एकुणात आनंदच आहे. पण या पार्श्वभूमीवर डुम्बरेंनी आपल्या ६४ पानी साप्ताहिकात दर आठवड्याला ८-१० पानं अशा विषयांना देणं महत्त्वाचं होतं. लेखक आणि संपादकाचे आस्थाविषय एक असले आणि संपादकाचा आपल्या वाचकांवर (आणि स्वत:वर) विश्वास असला, तर कसं चांगलं काम होतं याचं या लेखमाला उत्तम उदाहरण होत्या. ‘अर्धी मुंबई’ हे पुस्तक ज्या लेखमालेतून बनलं तेही असंच एक उदाहरण. त्यांनी प्रकाशात आणलेल्या अशा लेखमालांमध्ये डुम्बरे लेखकाइतकेच रमलेले असल्याचं स्पष्ट आठवतं.
अशा एक ना अनेक कल्पना प्रत्यक्षात आणण्यात ते आयुष्यभर गुंतल्यामुळे त्यांना स्वत:च्या आवडीच्या विषयांवर लिहायचा अवसर मिळाला नसणार. दैनंदिन कामाच्या रगाड्यातून मोकळं झाल्यानंतर त्यांनी असं लिखाणकाम केलंही. ते जाण्यापूर्वी महिना-दोन महिने त्यांची भेट झाली, तेव्हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासावर विश्लेषणात्मक लिहिण्याचं त्यांनी मनावर घेतलं होतं. पण त्या आधीच कोरोनाने त्यांना गाठलं. असो.
डुम्बरेंबद्दल असं म्हटलं जातं, की ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक म्हणून काम करून पुण्यात आल्यानंतर ते खरं तर ‘सकाळ’च्या मुख्य आवृत्तीचे संपादक व्हायचे होते. पण कुठल्या कुठल्या कारणांमुळे तसं होऊ शकलं नाही. ते संपादक का होऊ शकले नाहीत, हा गॉसिपचा विषय असल्यामुळे त्या प्रांतात जायला नको. ते ‘सकाळ’ऐवजी ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक बनले. फील्डवरचा माणूस असल्याने त्यांना ‘साप्ताहिक’चं संपादक बनण्यात खरं तर रस नव्हता म्हणे. पण ‘साप्ताहिक’चं संपादकपद स्वीकारल्यानंतर त्यांनी या अंकाचं स्वरूप आणि बाज पूर्ण बदलला. मी ते अंक बघितलेले नाहीत, पण डुम्बरे संपादक होण्यापूर्वी ‘साप्ताहिक’च्या मुखपृष्ठावर एखाद्या स्त्रीचा चेहरा असे, असं म्हणतात. अंकाचं स्वरूपही जुन्या पद्धतीच्या कौटुंबिक साप्ताहिकाप्रमाणे होतं. डुम्बरेंनी ‘साप्ताहिक’चा चेहरामोहरा बदलून टाकला आणि अंकाला आधुनिक रूप दिलं. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जो नवा मध्यमवर्ग उदयास येत होता, त्याला ‘केटर’ करणारा अंक काढायला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे त्यांना निश्चित असा वाचकवर्ग मिळाला आणि खपही चिक्कार वाढला. दर आठवड्याला ४०-५० हजार अंक त्या काळी खपत असे. तेव्हा महाराष्ट्रात ‘साप्ताहिक सकाळ’, ‘लोकप्रभा’ व ‘चित्रलेखा’ ही तीन साप्ताहिकं प्रामुख्याने खपत. या तीनही अंकांचा बाज वेगवेगळा होता; पण त्यावेळच्या अभिजनवर्गाची मान्यता प्रामुख्याने ‘साप्ताहिक’लाच होती. जनांचा आणि अभिजनांचा एकाच वेळी पाठिंबा लाभलेलं हे अपवादात्मक उदाहरण असावं.
मुख्य धारेतलं नियतकालिक असल्याने डुम्बरेंनाही अंकात खेळ, पर्यटन, राशिभविष्य, रेसिपीज असं काय काय छापावं लागत असे. व्यावसायिक कारणांसाठी त्यांनाही गणपती, दसरा नि दिवाळी साजरी करावी लागे आणि लाडू विशेषांक, मेंदी विशेषांक काढावे लागत. आपद्धर्म म्हणूनच ते हे विषय हाताळत असणार. पण त्यांचं वेगळेपण म्हणजे आमचा पिंड माहीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला कधी या कामांना जुंपलं नाही. या विषयांतही चांगलं काय करता येईल, असा ते आपला आपला प्रयत्न करायचे. ही थोडीफार बंधनं सोडली तर बाकी ‘साप्ताहिक’चा अंक त्यांनी स्वतःच्या मर्जीने काढला. त्यांनी सुरू केलेला आणि भरपूर लोकाश्रय मिळालेला एक उपक्रम म्हणजे कथा स्पर्धा आणि दुसरा उपक्रम म्हणजे ‘साप्ताहिक’च्या वर्धापनदिनाचा जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला वर्षामागून वर्षं अलोट गर्दी होत असे आणि महिना-दोन महिने या कार्यक्रमातील भाषण पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरत असे. तब्बल वीस वर्षं हा उपक्रम डुम्बरेंनी आपल्या खास शैलीत चालवला.
आधी म्हटल्याप्रमाणे डुम्बरे हे मराठी नियतकालिकाचे संपादक असले, तरी त्यांचा वर्ल्ड व्ह्यू आणि संपर्क व्यापक होता. त्यामुळे विविध क्षेत्रांत मोलाचं काम करणार्या नामवंतांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्याची वहिवाट त्यांनी तयार केली. अनंतमूर्ती, वासुदेवन नायर यांच्यासारखे साहित्यिक; दिलीप पाडगावकर, पी. साईनाथसारखे पत्रकार; अनिल अगरवाल, सुनीता नारायण, अभय बंग, वंदना शिवा यांच्यासारखे अभ्यासू कार्यकर्ते; योगेंद्र यादव, रामचंद्र गुहा, वसंत गोवारीकर यांच्यासारखे अभ्यासक-तज्ज्ञ; नानी पालखीवाला, राजा रामण्णा, जावेद अख्तर यांच्यासारखे एकेका क्षेत्रातले दिग्गज, असे ‘एकसे एक’ लोक डुम्बरेंनी पुण्यात भाषणासाठी आणले. ‘सकाळ’चं नाव आणि डुम्बरेंचं पर्सनल स्टेचर यामुळे ही माणसं पुण्यात आली आणि नेमक्या कळीच्या विषयावर बोलती झाली. हा कळीचा विषय ठरवण्यात अर्थातच डुम्बरेंचा वाटा मोठा असे. नुसती सेलब्रिटी माणसं आणून गर्दी गोळा करण्यापेक्षा समकालीन महत्त्वाचे विषय सार्वजनिक चर्चाविश्वात आणण्यात त्यांना अधिक रस होता. यातील बहुतेक लोक निव्वळ सभा गाजवणारे फर्डे वक्ते नव्हते. आपापली आयुष्यं एकेका विषयात घालवलेली ही ‘डिव्होटेड’ माणसं होती. डुम्बरेंनी केलेली निवड पुणेकरांनाही मोठी पसंत पडे. त्यामुळे वक्ता नामवंत असो-नसो, कार्यक्रम सुरू होण्याआधी हजारभर लोक खुर्च्या पकडून बसलेले असत. या कार्यक्रमांनी पुण्यातल्या जाहीर व्याख्यानांच्या संकल्पनेला एक वेगळी उंची गाठून दिली. एक स्टँडर्ड सेट करून दिलं.
डुम्बरेंनी ‘साप्ताहिक सकाळ’ला असं दर्जेदार व्यासपीठ बनवलं, ज्यातून एखादं नियतकालिक बाजारशरण न बनता कसं रुजू शकतं आणि फुलू शकतं हे पुढे आलं. या अर्थाने ते ‘सकाळ’चे संपादक बनून दैनिकाच्या धबडग्यात अडकले नाहीत हे बरंच झालं, असं म्हणावंसं वाटतं. त्यांच्यामुळे एका सभ्य, सजग आणि आस्वादक साप्ताहिकाचं रूप मराठी वाचकांना पाहता आलं. ‘मटा म्हणजे तळवलकर’ असं जे एक रूढ सूत्र वाचकांच्या मनावर कोरलं गेलं होतं, तसंच पुणेकरांच्या मनात ‘साप्ताहिक म्हणजे डुम्बरे’ असं समीकरण तयार झालं होतं. एखाद्या संपादकाची याहून मोठी कमाई काय असते?
डुम्बरेंची पत्रकारितेची कारकीर्द बघून कुणाच्याही मनात येईल, की माध्यम क्षेत्रात वाचकांच्या अनुनयाची आणि उथळीकरणाची प्रक्रिया वेगात असताना त्याच्या अजिबात आहारी न जाता त्यांनी स्वत:ची स्वतंत्र वाट कशी शोधली? व्यावसायिक माध्यमसंस्थेत काम करत असूनही स्वत:च्या कामाचा ठसा ते कसा उमटवू शकले? मुख्य दैनिकापेक्षा तुलनेने कमी महत्त्वाच्या साप्ताहिकाभोवती एवढं वलय कसं निर्माण करू शकले?
खरं तर डुम्बरे पुणे जिल्ह्यातल्या दूरवरच्या ओतूर नावाच्या बारीकशा गावातले. त्यांच्या घराण्याचा दूरदूरपर्यंत पत्रकारितेशी काहीएक संबंध नाही. पण शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येत गेला. (तेव्हाच्या) पुण्यातलं पोषक वातावरण, रानडे इन्स्टिट्यूटचा (त्या काळचा) दर्जा आणि प्रभाकर पाध्ये, श्री. ग. मुणगेकर यांच्यासारखे शिक्षक यांच्यामुळे त्यांचा वैचारिक पिंड घडला. पुढे मुणगेकरांच्या सांगण्यावरून ते ‘सकाळ’मध्ये आले आणि थेट मुणगेकरांसोबत काम करायची संधी त्यांना मिळाली. थोडीथोडकी नाही, चांगली दहा-बारा वर्षं. तीही करियरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात. त्यातून डुम्बरेंवर ‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्या लोकाभिमुख पत्रकारितेचा आणि मुणगेकरांच्या रूपाने तयार झालेल्या ‘सकाळ स्कूल’चा संस्कार झाला असणार. ‘स्वतंत्र’ पत्रकारितेचं बीज तिथेच त्यांच्यात रुजलं असणार.
‘सकाळ’ सुरुवातीला निव्वळ पुण्यापुरतं निघणारं दैनिक होतं. पुण्याचं मुखपत्र बनणं हेच त्याचं उद्दिष्ट्य होतं. पुढे त्याच्या मुंबई, कोल्हापूर वगैरे आवृत्त्या निघाल्या; पण तरीही या दैनिकाचं स्वरूप स्थानिकच होतं. असं असतानाही डुम्बरेंचा वर्ल्ड व्ह्यू एवढा व्यापक कसा, असा प्रश्न कुणालाही पडावा. त्याचं उत्तरही पाध्ये-परुळेकर-मुणगेकर यांच्यामध्येच आहे. पाध्ये हे प्रचंड वाचन असलेले विद्ववान गृहस्थ. जागतिक विचार-व्यवहारांचा उत्तम अभ्यास असलेले विचारी संपादक. दुसरीकडे, परुळेकर-मुणगेकर हे संपादकही व्यापक दृष्टी असलेले. परुळेकर त्या काळी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून शिकून आलेले. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असलेले. त्यांच्या संपादककाळात ‘सकाळ’चे परदेशात लंडन-न्यूयॉर्कपासून कोलंबो-काठमांडूपर्यंत वार्ताहर होते म्हणतात. ते ‘सकाळ’सारख्या स्थानिक दैनिकाचे संस्थापक-संपादक असले, तरी त्यांचा वावर राष्ट्रीय पातळीवर होता. प्रेस कौन्सिल, इंडियन न्यूजपेपर सोसायटी, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन वगैरे राष्ट्रीय संस्थांचे ते अध्यक्ष होते. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या संस्थापकांपैकी ते एक होते. मुणगेकरही इकनॉमिक टाइम्स, हिंदुस्थान टाइम्स, स्टेट्समन वगैरे दैनिकांत नियमित लिहीत. त्यांचंही वाचन चौफेर आणि विस्तृत होतं. इंग्लंड-अमेरिकेतून प्रकाशित होणारी नियतकालिकं आणि इंग्रजी पुस्तकांवर त्यांचा पिंड पोसलेला होता. परुळेकरांची पत्रकारी दृष्टी आत्मसात करून मुणगेकरांनी ‘सकाळ’ पुढे नेला. अशा मुणगेकरांचा सहवास डुम्बरेंना लाभला. त्यातून डुम्बरेंचाही वर्ल्ड व्ह्यू विकसित व्हायला आणि विस्तारायला मदत झाली असणार. एरवी पत्रकार जमातीचं वाचन यथातथाच. कामापुरतं आणि आपल्या अवतीभवतीचं. पण मी बघतोय तेव्हापासून डुम्बरेंच्या तोंडी देशी-विदेशी दैनिकं आणि नियतकालिकांचे संदर्भ ऐकत आलोय. त्यांचं मुख्य प्रेमप्रकरण वॉशिंग्टन पोस्टसोबत. लंडन टाइम्स, गार्डियन, बीबीसी वगैरे उप-प्रेमप्रकरणं. पुण्यातल्या एका मराठी साप्ताहिकाच्या संपादकाचा जगभरातल्या या उठाठेवींशी काय संबंध? पण ‘थिंक ग्लोबली, अॅक्ट लोकली’ असं ब्रीदवाक्य ज्या पिढीने आत्मसात केलं, त्याचे ते प्रतिनिधी असल्यानेच ते असे बनू शकले असणार.
डुम्बरेंचा वर्ल्ड व्ह्यू, वाचन आणि आवाका मोठा असल्यामुळे त्यांना सर्वकाळ बाहेरून ऑफर्स येत राहिल्या. गोविंद तळवलकरांनी त्यांना ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये बोलावलं, तर माधव गडकरींनी ‘लोकसत्ता’त. ‘लोकमत’ही त्यांच्या मागे होतं म्हणतात. पण डुम्बरेंनी ‘सकाळ’ची कास मोडली नाही आणि दैनिकाचं संपादकपद न मिळूनही ‘साप्ताहिक’मार्फत मुणगेकरांचा वारसा चालवला. आपल्या वाचनाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी ‘साप्ताहिक’ला महत्त्व मिळवून दिलं, स्वत:चे महाराष्ट्रातील व देशातील संपर्क ‘साप्ताहिक’ला जोडून दिले. त्यांचं इंग्रजी मोठं सफाईदार नि शैलीदार. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरच्या कर्तबगार लेखक, अभ्यासक, चळवळे, विचारवंत यांच्याशी सहज संवाद साधण्यात त्यांना कधी अडचण आली नाही. परुळेकर-मुणगेकरांप्रमाणे डुम्बरेंचाही देशभर वावर असल्यामुळे त्यांचा संपर्कही मोठा राहिला. ज्यांच्याशी आधी काही संबंध नव्हता, ती माणसं संपर्कात आली की त्यांच्याशी गाठीच बांधल्या जाणार. अशी कित्येक माणसं ते स्वत:शी आणि पर्यायाने ‘साप्ताहिक’शी जोडत गेले.
बर्याचदा असं दिसतं, की माणूस ज्या दैनिकाचा किंवा नियतकालिकाचा संपादक असतो, त्यातून तो स्वत:चं महत्त्व तयार करत असतो. म्हणजे ब्रँड दैनिक असतं आणि संपादक लाभार्थी. डुम्बरेंच्या बाबत उलट झालं. ‘साप्ताहिक’ला डुम्बरेंच्या संपर्काचा आणि ओळखीचा उपयोग झाला! ‘साप्ताहिक’मुळे ते मोठे झाले नाहीत, त्यांनी ‘साप्ताहिक’चा ब्रँड तयार केला. ते असेपर्यंत हा ब्रँड जन-महाजनांना आकर्षिक करत राहिला. डुम्बरे निवृत्त झाल्यानंतर माझाही ‘साप्ताहिक’शी संबंध राहिला नाही. डुम्बरे नसलेल्या ‘साप्ताहिक’मध्ये काही लिहावंसंच वाटलं नाही!
एरवी संपादक मंडळी निवृत्त झाल्यावर त्यांच्या आयुष्यात मोठीच पोकळी तयार होते. पण डुम्बरे ‘सकाळ’मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावर काडीइतकाही परिणाम झाला नाही. आपल्या हातात अधिकार नाही अशी हताशा त्यांच्या बोलण्यात एका अक्षरानेही नव्हती. ते आपल्या वाचनात आणि उद्योगात मग्न राहिले. कुठल्या कुठल्या समारंभांना जाऊन भाषणं देत राहिले. वाचून-अभ्यास करून चर्चासत्रांमध्ये वगैरे व्याख्यानं देत राहिले. ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेत व इतरांची भाषणं ऐकून घेत. ‘तू अमुक-तमुकच्या भाषणाला नव्हतास. यू मिस्ड इट’ अशी तक्रारही माझ्याकडे करत. अशा भाषणांना तू यायला पाहिजे, सार्वजनिक वावर वाढवायला पाहिजे, अशी सूचना करत.
संपादक असताना आणि नसतानाही ते अनेक संस्थांशी-उपक्रमांशी जोडलेले होते. उदाहरणार्थ, लोकविज्ञान, शं. वा. किर्लोस्कर प्रतिष्ठान, प्रभाकर व कमल पाध्ये प्रतिष्ठान, विद्या बाळांचं निरामय पब्लिक ट्रस्ट, अनिल अवचटांचं मुक्तांगण, परिसर... शिवाय ‘रानडे इन्स्टिट्यूट’ आणि ‘इंडसर्च’ या संस्थांशीही त्यांचं नातं होतं. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ते आताआतापर्यंत शिकवायला जात होते. मध्ये पाच वर्षं ते भारतीय जैन संघटनेशीही संचालक या नात्याने जोडले गेले होते. त्यांचं थोडंफार लिखाणही चालू होतं. चांगले प्रयोग-प्रयत्न-प्रकल्प दिसले तर त्याबद्दल ते उत्स्फूर्तपणे लिहित. कुणी विचारलं-सांगितलं तर दिवाळी अंकांमध्येही ते लिहित. निवृत्तीनंतर त्यांची दोन पुस्तकंही प्रकाशित झाली. आधी म्हटल्याप्रमाणे पुढच्या एक-दोन लिखाण प्रकल्पांत जाण्याचा वायदाही त्यांनी केला होता. एवढ्या सार्या गोष्टींत ते गुंतलेले असल्याने ते कधीही भेटले की ते पूर्वीसारखेच उत्साहात बोलायला लागायचे.
ते मनाने इतके मोकळे होते की त्यांच्याशी संवाद व्हायला एका वाक्याचीही प्रस्तावना लागत नसे. त्यामुळे ते सगळ्यांशी सहज मिसळून जात. इतरांच्या कामाबद्दल त्यांना अगत्य असे. ते त्या कामाचं इतक्या अचूक शब्दांत वर्णन करत, की त्या कामात गुंतलेल्यालाही त्याबद्दल इतकं नेमकं बोलणं सुचू शकणार नाही. मला आठवतं, युनिक फीचर्सच्या पहिल्या-दुसर्या वर्धापनदिनाला विजय तेंडुलकरांपासून मुकुंदराव किर्लोस्कर, कुमार केतकर, दिनकर गांगल, दया पवार, बाबा आढाव, विद्या बाळ, निखिल वागळे असे बरेचजण आलेले होते. त्यांच्या दडपणामुळे आम्ही पोरं बोलताना चाचपडत होतो; पण त्या कार्यक्रमात डुम्बरेंनी आमच्या प्रयत्नांचं इतकं नेमकं वर्णन केलं होतं, की त्यामुळे आम्ही चकितच झालो.
आणखी एक उदाहरण. मी अलीकडेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं एक चरित्र लिहिलं. ते पुस्तक त्यांना आवडलं, आणि म्हणून त्याचं परीक्षण करणारा एक लेख त्यांनी लिहिला. तो लेख वाचताना पुस्तक लिहिण्यासाठी आपण घेतलेल्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटलं. अॅप्रिशिएट करणं किती मनापासून असावं याचं ते उदाहरणच जसं. त्यांच्या या स्वभावामुळे ते सगळ्यांचे मित्र बनू शकले असणार.
त्यांच्या स्वभावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कुणाबद्दलही तक्रार नसे. ते कुणाहीबद्दल वाईटसाईट बोलत नसत. अगदी ज्यांच्यामुळे त्यांना त्रास झाला असेल त्यांच्याबद्दलही. नकारात्मकता जणू त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हती. माणसांमधल्या दोषांपेक्षा त्यांच्यातल्या गुणांना ते जास्त महत्त्व देत. एखाद्याबद्दल आपण काही बोललो, तर त्यावर ते संकोची हसत, ते तो विषय टाळण्यासाठी. पण त्यांना भावलेल्या माणसावर, कामावर किंवा पुस्तकावर मात्र भरभरून बोलत.
माणसं मोठ्या पदांवर गेली, मोठ्या वर्तुळात वावरायला लागली की अनेकदा त्यांचे पाय जमिनीवरून उचलले जातात. डुम्बरेंच्या बाबत असं झालं नाही. आपल्या आसपासच्या माणसांची सोबत मनात ठेवूनच ते वावरत राहिले. माझ्या वाट्याला आलेला एक छोटासा अनुभव सांगतो. माझ्या पत्रकारितेची सुरुवात ‘किर्लोस्कर’ मासिकातून झालीय हे त्यांच्या मनाच्या कोपर्यात कायम होतं. जेव्हा त्यांनी ‘शंवाकीय’ हे शंकरराव किर्लोस्कर यांचं आत्मचरित्र पुर्नप्रकाशित केलं, तेव्हा त्या पुस्तकाच्या पहिल्या प्रतींतील एक प्रत त्यांनी मला भेट दिली. नुसती नाही... पहिल्या पानावर त्यांनी सहीनिशी लिहिलं होतं- ‘तुझ्या ‘किर्लोस्कर’ दिवसांच्या आठवणीप्रीत्यर्थ सस्नेह.’ त्यांचे गुरुजी प्रभाकर पाध्ये यांचं निवडक साहित्य त्यांनी त्यांच्या ट्रस्टच्या वतीने प्रकाशित केलं, तेव्हाही ‘तुझ्या संग्रहात हे पुस्तक असायला हवं. तुला या लिखाणाचं महत्त्व कळू शकतं,’ असं म्हणत त्यांनी पुस्तकाची प्रत आवर्जून दिली होती. अशी अनेक उदाहरणं.
‘आपल्या’ माणसांबद्दल त्यांच्या मनात कशी भावना असते हेही सांगण्यासारखं. विशिष्ट ठिकाणचं विड्याचं पान खाणं हा त्यांचा वीकपॉइंट. जेवायला जायचं नि ठरलेल्या पानवाल्याकडून पान घ्यायचं, हा रिवाज. आनंदाचा भाग. एकदा त्यांच्यासोबत जेवायला गेलो. जेवणानंतर आपोआपच ठरलेल्या पानवाल्याकडे गेलो. पण ते म्हणाले, “तुम्ही घ्या. मला नको.” मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, “काय झालं? पान नको? असं कसं?” तर म्हणाले, “पान खाणं सोडलं.” म्हटलं “का?” तर काही बोलले नाहीत. नंतर कुणाकडून कळलं, की आमच्या एका कॉमन पानप्रेमी मित्राचे वडील गेल्यानंतर त्याने पान खाणं सोडलं, म्हणून यांनीही सोडून दिलं. याला म्हणतात सहवेदना आणि सहअनुभूती. आपल्या माणसांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा हा नमुना (तोही मूकपणे!) डुम्बरे मनाने कसे होते हे सांगणारा.
डुम्बरेंबद्दल असं सांगण्यासारखं खूप आहे, पण एक-दोन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगतो नि थांबतो. गेल्या वर्षी ‘देणारं झाड’ हे त्यांचं पुस्तक आमच्या ‘समकालीन’तर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकाचं काम चालू असतानाची ही गोष्ट. हे पुस्तक व्यक्तिचित्रात्मक आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींवर महत्त्वाचे लेख असले, तरी ते प्रसंगोपात्त लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांची एकत्र बांधणी कशी करायची हे कळत नव्हतं. ही सगळी माणसं समाजाला काही तरी देणारी आहेत, म्हणून पुस्तकाचं नाव ‘देणारं झाड’ असावं, असं मी सुचवलं. पण तरीही पुस्तकाचं शीर्षक आणि ही माणसं यांना जोडणारं सूत्र सापडलं नव्हतं. डुम्बरेंना ही घालमेल सांगितली. ते म्हणाले. “थांब जरा, विचार करतो.” वेगवेगळ्या गटांत विभागलेल्या माणसांची यादी त्यांना देऊन ठेवली होती. दोन दिवसांनी त्या यादीतील विभागांना त्यांनी नावं लिहून पाठवली. विभागांची नावं होती- भूमी, मूळ, खोड, शाखा. शीर्षकातील ‘झाड’ या शब्दाला जोडून त्यांनी ही नावं सुचवली होती. मी खूष झालो. प्रश्न तर सुटला होताच, पण त्यांनी शोधलेलं उत्तर पुस्तकाला पूर्ण नवं परिमाण देणारं होतं. त्यांच्या कुशाग्र संपादकीय बुद्धीचं आणि कौशल्याचं दर्शन या प्रसंगात घडलं.
जाता जाता एक शेवटची गोष्ट. गंमतच म्हणा ना! डुम्बरे निवृत्त झाल्यानंतर एका कार्यक्रमानिमित्त त्यांना घेऊन उस्मानाबादला गेलो होतो. सात-आठ तासांचा प्रवास. गप्पा चालू होत्या. एक ना अनेक विषय. त्यांना माझ्या अभ्यासाच्या विषयात रस होता. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळ आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अनुषंगाने बोलणं सुरू झालं. बरीच घनगंभीर चर्चा करत आम्ही उस्मानाबादेत पोचलो. दुसर्या दिवशी कार्यक्रम करून पुण्याला परतायला निघालो. लागोपाठ प्रवास करत असल्याने कंटाळा आला. गप्पाही आटल्या. गाडीतल्या गाण्यांच्या कॅसेट्सही ऐकून संपल्या. वेळ कसा घालवायचा कळेना. शरीरं आंबून गेली होती. रात्रीचे अकरा-बारा वाजले होते. आमच्या ड्रायव्हर मित्राच्या हे लक्षात आलं. तो चाचरत म्हणाला, “साहेब, माझ्याकडे एक कॅसेट आहे. तुम्हाला चालणार नाही म्हणून लावली नव्हती. म्हणत असाल तर लावतो!” म्हटलं, “लाव!”
ती दादा कोंडक्यांच्या एका जाहीर भाषणाची कॅसेट होती. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसेनेच्या कुठल्या तरी कार्यक्रमाची. त्यात थोडं राजकीय होतं; बाकी सगळं शिवराळ, द्य्वर्थी, असभ्य, अशिष्ट, अश्लील... सभेतले लोक वेड लागल्यासारखे खिदळत होते, टाळ्या पिटत होते, चित्कारत होते. आम्ही तो दंगा ऐकून घेत होतो, पण वेळ बरा जात असल्याने गप्प बसलो होतो. भाषण संपल्यानंतर डुम्बरे हताशपणे म्हणाले, “आपल्या राजकीय संस्कृतीचा स्तर काय आहे हे यातून कळतं.” ही त्यांची गंभीर संपादकीय टिप्पणी! मग लगेच तितक्याच गंभीरपणे म्हणाले, “अदरवाइज इट्स गुड एंटरटेन्मेंट”. आणि आम्ही हसत सुटलो. कालच्या कार्यक्रमात गंभीरपणे महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल बोलणारे डुम्बरे आणि आज दादा कोंडके यांच्या भाषणाला ‘गुड एंटरटेन्मेंट’ म्हणणारे डुम्बरे एकच आहेत, हे बघून गंमत वाटली होती. डुम्बरे हे असे साधेसुधे गृहस्थ होते. तुमच्या-आमच्यासारखेच विरोधाभासांसह जगणारे. एकाच वेळी ते समाजाबद्दल निराशही असत आणि आशावादीही. चाललंय ते चांगलं चाललेलं नाही असं ते म्हणत असत, पण तेव्हाच ते चांगल्याचा शोधही घेत असत. त्यांची दृष्टी कसलेल्या पत्रकाराची नि संपादकाची असल्यामुळे ते इतरांपेक्षा थोडे पुढे असत, एवढाच काय तो फरक.
‘जॉयनिंग द डॉट्स’ म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांना जोडून त्यातून एक समग्र चित्र बघणं आणि दाखवणं. ही गोष्ट करायला मला आवडते, असं डुम्बरे नेहमी म्हणत. हीच गोष्ट डुम्बरेंच्या व्यक्तिमत्त्वाला लावून पाहिली आणि त्यातले वेगवेगळे बिंदू जोडून बघितले, तर डुम्बरे मला साधारण असे दिसले.
- सुहास कुलकर्णी
suhas.kulkarni@uniquefeatures.in
• अनुभव जानेवारी २०२२च्या अंकाची पीडीएफ खरेदी करण्यासाठी लिंक : https://bit.ly/3HXUGXT
• अनुभव छापील अंकाची वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://bit.ly/3JASplA
• अनुभवच्या पीडीएफ अंकाची वार्षिक वर्गणी भरण्यासाठी लिंक : https://bit.ly/34GWmXn
• अनुभव मासिकातील इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या : https://bit.ly/36zs3lP
• PDF अंक वार्षिक - ₹ ४००
• अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर :
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० ।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा