जगण्याचे आर्त असेही.. - आनंद अवधानी । अनुभव दिवाळी २०११


स्वतःची ओळख, भोवतालाचं भान हरवून बसलेले, गलिच्छ आणि लाजिरवाणं जीणं जगणारे रस्त्यावरचे मनोरुग्ण. सार्‍या जाणीवाच शून्य झालेल्या या माणसांकडे समाजही भावनाशून्यपणेच पाहात असतो. अशा मनोरुग्णांना पुन्हा ‘माणसात’ आणण्याचा एक जाणता प्रयत्न डॉ. भरत व डॉ. स्मिता वाटवानी हे मनोविकारतज्ज्ञ दांपत्य करत आहे. कर्जतजवळ ‘श्रद्धा’ ही संस्था उभी करून मानसिक रुग्णांवर उपचारापासून त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहचवण्यासाठी चालवलेल्या अथक कार्याचा, आपल्या संवेदनांना साद घालणारा परिचय. 

‘अ‍ॅम्ब्युलन्स’ म्हटलं की अंगावर काटा येतो. शक्यतो या वाहनाचा आणि आपला कधीही संबंध येऊ नये असं वाटतं. कारण या वाहनातून प्रवास करणं म्हणजे आपले आप्त अत्यवस्थ असणं किंवा स्वतः आपणच. आपल्याला हे दोन्ही नको असतं. पण आजचा अ‍ॅम्ब्युलन्समधून चालू असलेला प्रवास अगदी वेगळ्याच कारणासाठी होत होता.
अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसलो तेव्हापासूनच कातरलेपणाची भावना मनात सुरू झाली. समोरचा रस्ता, दुकानांच्या पाट्या, वाहनांची गर्दी हे सारं नेहमीच्या परिचयाचं होतं, पण अ‍ॅम्ब्युलन्समधून पाहताना सगळं अगदीच वेगळं भासत होतं. अ‍ॅम्ब्युलन्सकडे पाहिलं की रस्त्यावरचे लोक बाजूला होत मार्ग मोकळा करून देत होती. ही अ‍ॅम्ब्युलन्स ‘श्रद्धा’ या संस्थेची होती. अ‍ॅम्ब्युलन्सवर लिहिलं होतं-
‘भारतातल्या रस्त्यांवरून फिरणार्‍या निराधार मनोरुग्णांसाठी’.
काही महिन्यांपूर्वी ‘श्रद्धा’च्या कामाविषयी माहिती समजली तेव्हा हादरून गेलो होतो. मानसिक आजार असणं, त्यावर पुरेसे उपचार उपलब्ध नसणं, त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी काम करणं वगैरे गोष्टी तशा सर्वपरिचित आहेत. थोड्याफार तपशिलाच्या फरकानं त्या गोष्टी समाजात असायच्याच, असंही वाटत होतं. पण ‘श्रद्धा’चं काम समजलं तेव्हा मात्र खडबडून जाग आल्यासारखं झालं.
आपण कोणत्याही मोठ्या शहरात रस्त्याच्या कडेला बसलेली माणसं पाहतो. वाढलेले केस, वाढलेली दाढी, मळून काळे झालेले कपडे, शून्यात हरवलेली नजर आणि अस्ताव्यस्त झालेलं व्यक्तिमत्त्व. नेहमीच स्वतःच्या व्यापात असलेले आपण मात्र ही माणसं कोण असावीत याचा विचार करण्याच्या भानगडीत पडत नाही. खरं सांगायचं तर आपल्यासाठी रस्त्यावर पडलेले अनाहूत दगड नि अन्य सटर फटर वस्तू आणि ही माणसं सारं काही सारखंच असतं. त्यातूनही चुकून विचार केला गेला तर कधी आपल्याला ते भिकारी वाटतात तर कधी दारुडे वाटतात; पण यातली बरीच माणसं प्रत्यक्षात दोन्हीही नसतात. ते असतात मनोरुग्ण.
‘श्रद्धा’ ही संस्था गेली अनेक वर्षं अशा व्यक्तींसाठी काम करते. रस्त्याच्या कडेला ‘पडलेली’ ही माणसं उचलून आपल्या केंद्रात आणायची, त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक उपचार करायचे, त्यांना बोलतं करून त्यांच्या घरचे, गावचे पत्ते मिळवायचे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या कुटुंबात नेऊन सोडायचं, असं ‘श्रद्धा’च्या कामाचं स्वरूप आहे. रस्त्यावरच्या मनोरुग्णांच्या प्रश्नाची तीव्रता आणि भयावहता पाहता या कामाचं सामाजिक मोल खूप मोठं आहे.
डॉ. भरत आणि डॉ. स्मिता वाटवानी या मनोविकारतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर जोडप्याने सुरू केलेलं आणि चालवलेलं हे काम आहे. सायकॅट्रिस्ट म्हणून आपला व्यवसाय व्यवस्थित चालू असलेले हे दोघे या कामाकडं कसे वळले याची कहाणी मोठी विदारक आहे.

१९८८च्या सुमाराची गोष्ट आहे. बोरिवलीच्या एका रेस्टॉरंटमध्ये आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वाटवानी पती-पत्नी जेवायला गेले होते. तिथे बसलेले असताना रस्त्याच्या दुसर्‍या बाजूच्या फुटपाथवर एक व्यक्ती बसलेली त्यांना दिसली. त्या व्यक्तीचे हावभाव पाहिल्यावर डॉक्टर वाटवानींच्या लगेच लक्षात आलं की ही व्यक्ती मनोरुग्ण आहे. ते जरा अस्वस्थ झाले. रेस्टॉरंटमधल्या त्या आनंदी मूडमध्येही त्यांच्यातला डॉक्टर त्यांना स्वस्थ बसू देईना. पण काय करावं हेही कळत नव्हतं. त्यांची नजर न राहवून पुन्हा पुन्हा त्या माणसाकडे वळत होती. अर्थात हे अगदी थोडा वेळ. कारण त्यानंतर जे काही घडलं ते डोळ्यांवर विश्वास बसू नये असं होतं.
अचानकपणे त्या माणसाने जवळची नारळाची करवंटी उचलून गटारात बुडवली आणि ते घाण पाणी तो चक्क पिऊ लागला. मग मात्र आपण काय करतो आहोत हे कळण्याच्या आत तो रुग्ण बसला होता तिथे डॉक्टर पोचले. त्याला उचलून त्यांनी आपल्या गाडीत बसवलं आणि त्यांच्या खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केलं. त्याच्यावर लगेचच उपचार चालू केले. तो स्क्रिझोफ्रेनिक रुग्ण होता. काही दिवसांत त्याच्यात सुधारणा दिसू लागली. तो जरा जरा बोलू लागला. त्याने ज्या वेळेला सांगितलं की तो बी.एस्सी.पर्यंत शिकलेला आहे, तेव्हा डॉक्टरांना खरा धक्का बसला. उच्च शिक्षण घेतलेला माणूससुद्धा केवळ मानसिक आजारामुळे रस्त्यावर येऊ शकतो? इतकं गलिच्छ आणि लाजिरवाणं आयुष्य त्याच्या वाट्याला येतं? हा रुग्ण आंध्र प्रदेशमधल्या सधन कुटुंबातला होता. त्याचे वडील तिथल्या जिल्हा परिषदेत अधिकारपदावर होते. अशा घरातल्या मुलाची ही अवस्था होऊ शकते? मेडिकलच्या पुस्तकात मानसिक आजाराच्या दुष्परिणामांची यादी असते; पण हा प्रकार त्या यादीपलीकडचा तर होताच, पण समजण्या-पलीकडचाही होता. तोपर्यंत मनोरुग्णांच्या अनेक केसेस हाताळलेले डॉक्टर सुन्नपणाच्या पुढची अवस्था अनुभवत होते. शारीरिक आजाराप्रमाणेच मानसिक आजारही होत असतात आणि त्यावर उपचार करायचे असतात, एवढंच त्यांना शास्त्राने शिकवलं होतं; पण त्या आजाराचं हे असं हिडीस रूप त्यांना पहिल्यांदाच दिसत होतं. या मनोरुग्णाकडून घरचा पत्ता मिळवून त्यांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला. ते अक्षरशः पळत आले. वडील आणि मुलाचं ते मिलन पाहिल्यानंतर डॉक्टरांना या प्रकारच्या कामाची एक अंधुक वाट दिसू लागली. आपल्या नर्सिंग होममधली एक कॉट त्यांनी अशा अभागी रुग्णांसाठी ठेवली. त्यानंतर रस्त्याच्या कडेचे मनोरुग्ण जाणीवपूर्वक उचलले जाऊ लागले, त्यांना अ‍ॅडमिट केलं जाऊ लागलं आणि ते बरे झाल्यावर त्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाशी जोडलं जाऊ लागलं. डॉक्टर या भेटींना ‘री-युनियन’ म्हणतात. ‘श्रद्धा’च्या कामाची सुरुवात झाली ती अशी.


आपली खासगी प्रॅक्टिस सांभाळत एकामागोमाग एक मनोरुग्ण रस्त्यावरून उचलून त्यांना बरं करणं हा डॉक्टरांच्या रूटीनचा भाग झाला. त्यासाठी शक्य तेवढा वेळ ते देऊ लागले. स्वतःच्या उत्पन्नातून पैसे खर्च करू लागले. या दरम्यानच आणखी एक घटना घडली. डॉक्टरांच्या एका पेशंटच्या मुलाला त्यांच्या कामाची माहिती कळली. तो त्यांना म्हणाला, “आमचे जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे एक प्राध्यापक असेच रस्त्यावर गेली काही वर्षं फिरत आहेत. तुम्ही त्यांना का नाही बरं करत?” डॉक्टरांसाठी हा आणखी मोठा धक्का होता. जे.जे.सारख्या एवढ्या नामांकित आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महाविद्यालयातील प्राध्यापकाची ही स्थिती होऊ शकते? सामाजिक वास्तव प्रखर असतं, असं बोलणं वेगळं आणि त्याचा दाह एखाद्या प्राध्यापकाला अशा प्रकारे सहन करावा लागणं वेगळं. आपल्या विद्यार्थ्यांना कलेचे आणि सौंदर्यशास्त्राचे धडे देणारा प्राध्यापक गटाराच्या आणि उकिरड्याच्या सहवासात दिवस कंठतो आहे ही कल्पनासुद्धा किती भयानक आहे! जे.जे. कला महाविद्यालय आणि जहांगीर आर्ट गॅलरी या दोन्हीच्या परिसरात रस्त्याच्या कडेला फिरत असलेल्या त्या प्राध्यापकाला डॉक्टरांनी आपल्या नर्सिंग होममध्ये आणलं व त्याच्यावर उपचार केले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अगदी काही आठवड्यांत त्या प्राध्यापकांची मनःस्थिती सुधारली. पण आता खरा प्रश्न पुढे होता. कारण मधल्या काळात त्या प्राध्यापकाची नोकरी गेली होती. त्या कामीही डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती सर्व प्राध्यापकांनी डॉक्टरांना केली. पुढचे सहा महिने डॉक्टर त्यासाठी मंत्रालयात हेलपाटे मारत होते. तत्कालीन शिक्षण सचिव कुमुद बन्सल यांना हा विषय समजून सांगण्यात यश आलं. अखेर पूर्ण बरे झालेले प्राध्यापक महाविद्यालयात त्याच पदावर रुजू झाले.

‘श्रद्धा’च्या कामामध्ये सर्वांत मौल्यवान असलेली बाब म्हणजे हे ‘री-युनियन’च आहे. मानसिक आजारामुळे बिघडलेली रुग्णांच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणणं औषधोपचारांमुळे शक्य आहे; पण त्या व्यक्तींना पुन्हा त्यांच्या मूळ कुटुंबात, त्यांच्या ‘आपल्या’ माणसांत नेऊन सोडणं हे अधिक महत्त्वाचं आहे. ‘श्रद्धा’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत दीड हजार लोकांना पुन्हा त्यांच्या कुटुंबांशी जोडलं आहे.
आजचा अ‍ॅम्ब्युलन्समधून चालू असलेला आमचा प्रवासही अशाच दोन री-युनियन्ससाठी होता.
अ‍ॅम्ब्युलन्स एव्हाना सोलापूरच्या रस्त्याला लागली होती.  ड्रायव्हिंग करत असलेले विक्रम शेलार हे ‘श्रद्धा’चे पूर्णवेळ कार्यकर्ते. ते आणि त्यांची पत्नी अशा दोघांनीही या कामाला वाहून घेतलं आहे. रस्त्यावरचे मनोरुग्ण उचलून आणण्यापासून ते त्यांची री-युनियन घडवून आणेपर्यंत सर्व कामं ते करतात. आज सोलापूरच्या दोन मनोरुग्णांना त्यांच्या घरी सोडायचं होतं. मागच्या सीटवर महेंद्रभाई या ‘श्रद्धा’च्या आणखी एका कार्यकर्त्यासमवेत ते दोघं बसलेले होते. डोळ्यांत थोडीशी उत्सुकता, पण चेहरे पूर्ण कोरे. कदाचित हा मानसिक आजाराचा परिणाम असेल.
‘तुमचं नाव काय?” त्यातल्या एकाला विचारलं.
“रझा शब्बीर सय्यद.” शांत उत्तर.
“वय किती असेल?”
“बहुतेक तीस वर्षं.”
“पूर्वी काय काम करत होता?”
“सोलापुरात फळं विकत होतो”
“रोज किती पैसे मिळत होते?”
“शंभर रुपये.”
“मग मुंबईच्या रस्त्यावर कसे गेलात?”
“माहीत नाही”
“किती काळ रस्त्यावर होता?”
“माहीत नाही”
“घरी कोण असतं?”
“अम्मीजान, अब्बाजान, भाईजान.”
“इतक्या काळाने आज घरी जाणार... काय वाटतंय?”
“काही नाही.”
मानसिक आजारातून नुकत्याच उठलेल्या रुग्णाशी अधिक बोलणं योग्य नसतं. मी शेलारांकडे वळून पाहिलं. तो सांगत आहे ती सगळी माहिती खरी असेल की नाही हे त्याच्या घरी पोचल्यावरच कळेल, असं शेलारांचं म्हणणं होतं.
“तुमचं नाव काय?” आता दुसर्‍याला प्रश्न.
“प्रभाकर सरवदे.” डोळ्यांत वेडी झाक.
“वय किती?”
“माहीत नाही”
“शिक्षण किती झालं?”
“दुसरीपर्यंत.”
“सोलापुरात कुठे राहता?”
“रविवार पेठ, जोशी गल्ली.”
“मनावर परिणाम कशामुळे झाला?”
“मला काही झालं नाही. मी मुंबईत स्टेशनजवळ हुबारलो होतो तर या लोकांनी पकडून नेलं.”
“लग्न झालंय का?”
“हो, झालंय; पण बायको सोडून दिली.”
“का सोडली?”
“दुसर्‍याबरोबर संबंध ठेवायला लागली.”
“मुलं कुठे असतात?”
“माहीत नाही.”
“आता घरी जाऊन काय करणार?”
“मोलमजुरी करणार.”
त्याचं बोलणं झाल्यावर महेंद्रभाई सांगतात, “तो अजून पूर्ण बरा नाही. आम्ही त्याला मुंबईतून नाही तर हैद्राबादच्या रस्त्यावरुन उचलला आहे; पण ते त्याच्या लक्षात नाही. तो सोलापूरहून हैद्राबादला कसा पोचला हे मात्र कळायला मार्ग नाही.”
कुठलाही खाचखळगा, कुठलंही वळण नसल्यामुळे गाडी एका सरळ रेषेत चालली होती, पण मन मात्र पुरतं सैरभैर झालं होतं. हे दोन न शिकलेले मनोरुग्ण सोलापुरात पोचतील तेव्हा काय होईल? त्यांच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल? ते यांना स्वीकारतील का? मुळात या दोघांना घरचे पत्ते सापडतील का? आणि नाहीच सापडले तर पुढे काय? वादळात सापडलेली नौका दिशाहीन झाली की नावाडी भ्रमिष्ट होतात असं वाचलं होतं. या दोघांच्या जीवनाचं आणखी काय वेगळं झालं होतं? अ‍ॅम्ब्युलन्समधल्या प्रवासाचा ताण काय असतो याचा अनुभव येत होता.
गाडीत पुन्हा शांतता पसरली आणि डॉक्टर वाटवानींबरोबर झालेलं बोलणं आठवू लागलं. जे.जे. महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचं पुनर्वसन केल्यानंतर त्यांनी कामाची व्याप्ती वाढवली. या रुग्णांसाठी दहिसरला एक स्वतंत्र जागा घेतली. त्यामुळे एकाहून अधिक रुग्णांवर एका वेळी उपचार करणं शक्य झालं. कार्यकर्त्यांची आणि कर्मचार्‍यांची टीम त्यासाठी तयार केली. यथाशक्ती आपण या क्षेत्रात काम करत राहायचं, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला.
दहिसरचं काम व्यवस्थित चालू असताना या कामाला पूर्ण नवं परिमाण देणारी एक घटना घडली. तोपर्यंत बाबा आमटे आणि त्यांचं कुष्ठरोग्यांसाठीचं कार्य याविषयी डॉक्टर फक्त ऐकून होते. एकदा विशेष वेळ काढून त्यांनी थेट ‘आनंदवन’ गाठलं. तिथे विकास आमटे यांनी त्यांना सगळं काम दाखवलं. ते पाहून डॉक्टर नतमस्तक झाले; पण त्यांची बाबांना भेटण्याची इच्छा अपुरी राहिली. कारण त्या वेळी (२००४) बाबा हेमलकशाला डॉ. प्रकाश आमटे यांच्या सहवासात होते. मुंबईहून इतके लांब आलोच आहोत तर आणखी ३०० कि.मी. प्रवास करून बाबांना भेटूनच जावं असा निर्णय त्यांनी घेतला.
आनंदवन ते हेमलकसा हा रस्ता बर्‍यापैकी सुनसान आणि निर्मनुष्य आहे. गाडीत डॉक्टरांबरोबर त्यांचे मित्र आणि काही सहकारी होते. अतिशय शांतपणे प्रवास चालू असताना त्यांचं लक्ष अचानक रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका मनोरुग्णाकडे गेलं. धक्कादायक बाब म्हणजे त्याचे हात आणि पाय साखळ्यांनी बांधलेले होते. डॉक्टरांनी गाडी थांबवली. त्यांचे कार्यकर्ते खाली उतरले. त्या मनोरुग्णाला सोबत चलण्यासाठी त्यांनी विनंती केली; पण तो काही केल्या ऐकेना. डॉक्टरांनी विचार केला, की आपण मुंबईपासून खूप दूर परक्या प्रदेशात आलो आहोत. इथे त्याला सोबत घेऊनही आपण लगेच उपचार करू शकणार नाही. कार्यकर्ते पुन्हा गाडीत बसले. पुढचा प्रवास सुरू झाला.
काही अंतर पुढे गेल्यावर डॉक्टरांची अस्वस्थता वाढली. इतक्या विराण प्रदेशात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत तो बिचारा काय करेल, ही भावना त्यांना बैचेन करू लागली. त्यांनी गाडी मागे वळवली. तो होता तिथे ते पोचले. या वेळेला ते स्वतः गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्याला गाडीत बसायला राजी केलं. पण हात-पाय बांधलेले असल्यामुळे त्याचं सारं मलमूत्र विसर्जन त्या कपड्यांतच झालं होतं. त्यामुळे त्याचे सर्व कपडे काढून टाकले आणि गाडीतली एक चादर त्याच्या अंगाभोवती गुंडाळली. त्याला गाडीत बसवल्यावर आधी गाडीच्या सर्व काचा उघडल्या. कारण त्याच्या अंगाला अशक्य दुर्गंधी सुटली होती.
डॉक्टर हेमलकशाला प्रथमच जात होते. सोबत अशा प्रकारचा मनोरूग्ण उचलून आणल्याची तिथे काय प्रतिक्रिया उमटेल याचा त्यांना अंदाज येत नव्हता. मनात थोडी धास्ती निर्माण झाली होती. गाडी हेमलकशाला पोचली तेव्हा सूर्यास्त होऊन गेला होता. नुकतीच ओपीडी संपवलेले प्रकाश आमटे थकून बसले होते. डॉक्टरांनी तिथे पोचताच स्वतःची ओळख सांगितली. मनोरुग्णांसाठी आपण करत असलेलं काम सांगितलं. सोबत आणलेला मनोरुग्ण दाखवला. त्याच्या हातापायांतल्या साखळ्या तोडण्याची विनंती केली.
प्रकाश आमटे यांनी थकवा झटकून हातात छिन्नी आणि हातोडा घेतला. त्या रुग्णाच्या शरीरावर घाव बसता कामा नये आणि साखळ्या तर तुटल्या पाहिजेत, अशा बेतानं त्यांनी काम सुरू केलं. पूर्ण साखळ्या निघायला तब्बल दीड तास गेला. डॉक्टरांनी एकदाचा निःश्‍वास सोडला. समोर हे सारं दृश्य पाहत स्वतः बाबा आमटे पहुडले होते.
दुसर्‍या दिवशीची सकाळ काही वेगळीच होती. पहाटे उठून पाहतात तो डॉक्टरांना समोर बाबा दिसले. अस्वस्थतेमुळे ते रात्रभर झोपले नव्हते. त्या मनोरुग्णाच्या साखळ्या बाबांनी आपल्या पायात घालून घेतलेल्या डॉक्टरांना दिसल्या. इतक्या विराण जंगलात तो माणूस इतके दिवस कसा राहत असेल याची सहवेदना अनुभवण्यासाठी ते साखळ्या बांधलेल्या पायांनी चालून पाहत होते. डॉक्टर वाटवानींना अजिबातच न झेपणारं काही तरी समोर घडत होतं. बाबा आमटे या व्यक्तीचा उल्लेख ‘थोर समाजसेवक’ असा का केला जातो, याचा जिवंत अनुभव ते घेत होते. त्या प्रसंगानंतर दोघांमधील अंतर गळून पडलं आणि मोकळा संवाद सुरू झाला.
मुंबईतले सर्व कार्यक्रम बदलून पुढचे दोन दिवस डॉक्टर हेमलकशातच राहिले. बाबा आणि प्रकाश यांच्याशी त्यांचं भरभरून बोलणं झालं. बाबांच्या आईला स्क्रिझोफ्रेनिया झाला होता आणि त्या मनोरुग्ण होत्या, त्यामुळे मनोरुग्णांसाठी काम सुरू करण्याची बाबांची इच्छा होती; पण नंतर कुष्ठरोग्यांसाठीच्या कामाचा पसारा वाढल्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. ते स्वप्न वाटवानी यांनी पूर्ण करावं अशी इच्छा बाबांनी व्यक्त केली.

हेमलकशाहून डॉक्टर मुंबईला परतले ते एक झपाटलेपण घेऊनच. आपलं काम अनेक पटींनी, अनेक अंगांनी वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तोपर्यंत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करत असलेल्या कामाला बाबांच्या प्रेरणेमुळे मोठं बळ मिळालं. त्यामुळे आता पुढची वाट निश्‍चित असली तरी खडतर होती. काम वाढवण्यात अनेक अडचणी होत्या. मुख्य अडचण होती ती जागेची. मुंबईसारख्या शहरात मोठी जागा मिळवणं हे अशक्यप्राय होतं. डॉक्टरांनी त्यांच्या हितचिंतकांपुढे, मित्रांपुढे आणि कार्यकर्त्यांपुढे ही अडचण मांडली. चर्चा केल्या. अनेक पर्यायांचा विचार केला. शेवटी मुंबईबाहेर काम सुरू करण्याचा निर्णय झाला व त्याप्रमाणे जागेचा शोध सुरू झाला. अखेर कर्जत स्टेशनपासून तीन ते चार कि.मी. अंतरावर अशी जागा मिळाली. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी वेळ दवडला नाही. शक्य तेवढ्या वेगानं पैशांची जमवाजमव करून जागेचा ताबा घेतला आणि प्रकल्प सुरू केला. त्या परिसराला नाव दिलं, ‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटर’. या केंद्राचं उद्घाटन २००६ साली डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते झालं.
केंद्राला भेट द्यायला कर्जतला गेलो तेव्हा सोबत कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी सुनील आपटे होते. खरं तर त्यांच्यामुळेच या कामाची माहिती समजली होती.
‘वेलकम टु अवर सेंटर, सर.’ अत्यंत विनम्रपणे शंतनू सरंगी आमचं स्वागत करत होते. शंतनू हे ओरिसाहून आलेले. पूर्वी सामाजिक आणि राजकीय कामाची पार्श्वभूमी असलेले. आता इथे ‘श्रद्धा’मध्ये राहून पूर्णवेळ काम करतात. धिप्पाड शरीरयष्टी, करारी चेहरा आणि बोलण्यामध्ये कमालीचा ठामपणा. केंद्राचा परिसर दाखवण्यासाठी आणि कामाची माहिती देण्यासाठी दिवसभर ते बरोबर राहिले. उडिया आणि इंग्रजी या दोन भाषा त्यांना येतात. तोडकंमोडकं हिंदीसुद्धा.
डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे केंद्र आहे. छोटी छोटी पाच-सहा बैठी बांधकामं आहेत. काही भागात शेती केली जाते. नुकतीच सुरू केलेली गोशाळा आहे. बदकांचा सर्वत्र मुक्त वावर आहे. जाणवण्यासारखी बाब म्हणजे संपूर्ण परिसरात कमालीचा साधेपणा आहे. केंद्राच्या उभारणीतही आणि कार्यकर्त्यांच्या वागण्यातही.

‘आपण पुरुषांच्या वॉर्डपासून सुरुवात करू’ असं एका कार्यकर्त्याने सुचवल्यावर आधी छातीत धडकी भरली. याचं कारण अर्थातच हिंदी चित्रपट. अनेक चित्रपटांत मनोरुग्णांच्या संस्थांमध्ये इतस्ततः फिरणारे, चाळे करणारे, आक्रमक झालेले मनोरुग्ण दाखवले जातात. त्यांना दोरीनं बांधून ठेवलेलं असतं. काहीजण पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात वगैरे. हे सगळं क्षणात आठवलं.
प्रत्येक खोलीत सात-आठ पलंग. त्यावरचे मनोरुग्ण... कोणी पहुडलेले, कोणी बसलेले, कोणी येरझारा घालणारे; पण आम्ही जाताच सगळे सावरले. पहिला मनोरुग्ण बंगाली. एक कार्यकर्ता त्याच्याशी बंगालीत बोलला. मग तो हात जोडून उभा राहिला. नाव विचारल्यावर सुदीप, शरद, रवींद्र, उमेश, विक्रम अशी पाच-सहा नावं त्याने भराभर सांगितली. त्यामुळे त्याचं खरं नाव कळू शकलं नाही. आणखी एकजण पुढे आला आणि म्हणाला, मी मोठा पत्रकार आहे. वेबसाइटसाठी लिहीत होतो. तिसरा म्हणाला, मला इथून सोडायला सांगा ना. चौथा काही केल्या अक्षर बोलला नाही. नुसता पाहत राहिला. पाचवा मूकबधिरच होता. सहावा अखंड बोलत होता, पण समोरच्याशी नाही तर स्वतःशीच. इतर कोणाकडे तो पाहतही नव्हता. असे एक ना अनेक प्रकार. पण सगळ्यांच्या नजरेत जाणवलं ते एक प्रकारचं भकासपण. त्यांना कदाचित काही तरी सांगायचं होतं पण ते  सांगता येत नव्हतं.
आम्ही तिथून बाहेर पडल्यावर पुरुषांच्या वॉर्डचा जाळीचा दरवाजा बंद झाला. समोरच्या दालनात संस्थेच्या कामाचा परिचय करून देणारी फिल्म पाहण्यासाठी बसलो. अनेक पेशंट्सचे रस्त्यावर सापडलेले असतानाचे फोटो आणि पूर्ण बरे झाल्यानंतरचे फोटो दाखवले जात होते. आधीच्या फोटोंत कोणत्या अँगलने या इसमाला माणूस म्हणावं इतक्या भयानक अवस्थेतले, तर नंतरच्या फोटोंत इतके नॉर्मल की सहज हस्तांदोलन करून आपल्याशी बोलू लागतील असं वाटावं असे. दोन्ही फोटो एकाच व्यक्तीचे आहेत हे सांगूनही पटणार नाही इतकं अंतर.
स्त्री-पुरुषांच्या अशा फोटोंनंतर पुढे फिल्ममध्ये री-युनियनचे काही प्रसंग. बहुतेक सगळे दरिद्री खेड्यांमधले. तिथे ‘श्रद्धा’चे कार्यकर्ते पेशंटला घेऊन जातात आणि अनेक वर्षांनी आलेला आपला आप्त पाहून घरात टाहो फोडला जातो. हे अश्रू जसे आनंदाचे तसे मधल्या काळात सोसलेल्या भोगांचेही असतात. आजूबाजूची माणसं जमून ते दृश्य पाहतात, हेलावतात. कोणी त्याला जवळ घेतो, कोणी डोक्यावरून हात फिरवतो. कोणी ‘श्रद्धा’च्या कार्यकर्त्यांच्या पाया पडतो. कोणी महिला हा धक्का सहन न होऊन बेशुद्ध होते. या री-युनियन्स अनेक राज्यांतल्या. त्यामुळे उडिया, कन्नड, हिंदी, मराठी, तुळू अशा अनेक भाषांमधले आवाज फिल्ममध्ये ऐकू येत राहतात. भाषा वेगवेगळ्या, पण सार्‍यांमधला आकांत मात्र एकच. अशाच कहाण्या दाखवत फिल्म संपते. संपूर्ण खोलीमध्ये जाणवेल अशी शांतता पसरते.
त्याच खोलीत बसून हळूहळू कार्यकर्त्यांशी बोलणं सुरू होतं. काही वर्षांपूर्वी जेव्हा एका रुग्णाची भाषा कोणालाच कळेना आणि त्या रुग्णालाही कोणाचंच बोलणं समजेना तेव्हा खूपच पंचाईत झाली होती. शेवटी त्याची भाषा बोलणारा माणूस सापडल्यावर संवाद सुरू झाला आणि त्या रुग्णाला त्याच्या गावी पोचवता आलं. त्यानंतर अनेक राज्यांमधल्या भाषा येणारे कार्यकर्ते ही संस्थेची गरज बनली. सध्या हिंदी, मराठी, उडिया, गुजराथी, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, बंगाली आणि सिंधी या भाषा अवगत असलेल्या कार्यकर्त्यांची फळी इथे आहे. यात जसे पुरुष कार्यकर्ते आहेत तशा महिलाही आहेत.
फिल्ममधले रुग्ण आणि त्यांच्या री-युनियन्स पाहताना एक प्रश्न पडला होता, की फक्त गरीब कुटुंबातीलच व्यक्तींना असे मानसिक आजार होतात का?
या प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असं आहे, हे पुढे बोलण्याच्या ओघात कळत गेलं.
एकदा मुंबईच्या रस्त्याच्या कडेला सापडलेल्या एका मनोरुग्णावर उपचार केल्यानंतर लक्षात आलं, की हा दिल्लीहून भरकटत इथे पोचला आहे. नंतर री-युनियनसाठी जेव्हा त्याला प्रत्यक्ष दिल्लीत नेलं, तेव्हा तो एक प्रथितयश डॉक्टर निघाला. त्याला इतक्या वर्षांनी पाहिल्यावर ज्याप्रमाणे सर्वजण ‘सलाम डॉक्टरसाब’ म्हणत होते त्यावरून तो बर्‍याच कुटुंबांशी जोडलेला आहे, हेही कळत होतं. अशीच कथा आसाममधल्या एका पत्रकाराची. तिथल्या एका कर्नलचा हा मुलगा. तो घरातून अचानक गायब झाला तेव्हा कर्नलने भगताला संपर्क केला. भगताने सांगितलं, की पन्नास कि.मी.च्या परिघातच तुमचा मुलगा सापडेल. कर्नलने आपल्या अधिकाराचा वापर करत सर्व लष्कर आणि पोलिस खात्याला कामाला लावलं. प्रत्यक्षात तो मुलगा दूर मुंबईत एका रस्त्याच्या कडेला आयुष्य कंठत होता. खरे नावाचे गृहस्थ तर एम.बी.ए. झालेले होते. ‘श्रद्धा’च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर उपचार करून बरं केल्यावर त्या व्यक्तीचा स्वतःचाही विश्वास बसेना की, बारा वर्षं आपण असे कसे रस्त्याच्या कडेला राहत होतो?

जर डॉक्टर, पत्रकार आणि एम.बी.ए.  झालेल्यांची ही कथा, तर अशिक्षित, अडाणी आणि निरक्षरांची अवस्था याहून किती भयंकर होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. कार्यकर्त्यांच्या मते हा आजार जाती, धर्म, भाषा, शिक्षणनिरपेक्ष आहे. वयाच्या बाबतीत एवढंच सांगता येतं, की साधारणपणे अठरा ते पस्तीस या वयोगटातल्या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. पण आजार का होतो याला नक्की असं एकही कारण नाही. मुळात हा एक आजार आहे हेच मुळी आपला समाज अजूनही मान्य करत नाही.
पण हे सारं मान्य केल्यानंतरही एक मूलभूत प्रश्न शिल्लक राहतो आणि तोच सर्वांत महत्त्वाचा आहे. चारचौघांप्रमाणे दिनक्रम असलेला साधासुधा माणूस एखाद्या आजारामुळे एकदम रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत कशामुळे येऊन पडत असेल? सामान्य जीवन ते रस्ता हा त्याचा प्रवास कसा होत असेल? या प्रवासाचा नेमका मार्ग काय असेल? त्यातले टप्पे कोणते असतील?
रस्त्याच्या कडेच्या मनोरुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे स्क्रिझोफ्रेनिक रुग्णांचं असतं. डिप्रेशनसारखे इतरही आजार असतात, पण त्यांचं प्रमाण तुलनेने कमी असतं. पण या सर्वच आजारांचं मुख्य कारण मेंदूमधल्या रसायनांचा समतोल बिघडणं हेच असतं. ज्या रसायनांमुळे आपण नॉर्मल विचार करू शकतो, त्यांचाच तोल बिघडतो आणि ती आजाराची सुरुवात असते. मग माणूस तंद्रीत राहतो, हवेत हातवारे करतो, खूप वेळ बडबडत राहतो, स्वतःशीच हसतो. पण या बाबतीत आपल्या समाजात अज्ञान खूप आहे. अशिक्षित मंडळी याला ‘देवीचा कोप’ मानतात किंवा कुणाची करणी मानतात. मग अंगारे-धुपारे, देवदेवस्की, बोकड कापणं किंवा झाड उतरवणं असे नाना प्रकार सुरू होतात.
या मार्गाने न जाणारेही फार शहाणपणाचं वर्तन करतात असं नाही. ही व्यक्ती मुद्दाम अशी वागते, इतरांना जाणूनबुजून त्रास देते, असा समज त्या करून घेतात. मग आरोप-प्रत्यारोप करणं, रागावणं, बोलणं टाकणं, पाणउतारा करणं, प्रसंगी मारहाण करणं, बांधून ठेवणं असे प्रकार सुरू होतात. त्यातून ती व्यक्ती इतरांपासून तुटते आणि तिचा आजार बळावत जातो. अशातच स्वतःच्या तंद्रीत अशी व्यक्ती घरातून बाहेर पडते, तेव्हा तिला स्वतःलाही कळत नाही की आपण काय करत आहोत. अशी व्यक्ती रेल्वेत चढली तर कुठे तरी कोपर्‍यात बसून राहते. अशा व्यक्तींना आपण कुठे चाललो हे ठाऊक नसतं, आपल्याला कुठे उतरायचं आहे याचं भान नसतं. मग रेल्वेच्या शेवटच्या स्थानकांवर अशा व्यक्ती पोचतात. त्यामध्ये मुंबई, कोलकता, चेन्नई किंवा हैद्राबाद अशा स्थानकांचा समावेश असतो. तिथे यार्डात गाडी पोचल्यावर सफाई कर्मचारी त्यांना गाडीतून हाकलतात आणि हे मनोरुग्ण महानगरांच्या रस्त्यांच्या कडेचा आधार घेतात.
रस्त्यावर आल्यावर मिळेल तशा अवस्थेत हे रुग्ण वर्षानुवर्षं राहतात. या काळात त्यांच्या मनात काय चालत असेल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. या बाबतीत नेमकं संशोधनही अजून झालेलं नाही. वरकरणीही त्यांची अवस्था बिकट असते. कपडे, अंघोळ, जेवण, झोप, भिजणं, खरचटणं अशा कशाचंच भान नसल्यामुळे त्यांची दैना दैना होते. वाईट म्हणजे या बिचार्‍यांकडे पाहून त्यांची चेष्टा करणारे, त्यांना ‘पागल’ म्हणणारे, त्यांना चोर समजून मारणारेही महाभाग आपल्या समाजात आहेत. आम्ही ‘श्रद्धा’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी अर्धा तास आधी दाखल झालेल्या एका मनोरुग्णाचा हातच आजूबाजूच्या लोकांनी तोडला होता. रात्रभर तळमळणारा हा मनोरुग्ण ‘श्रद्धा’च्या कार्यकर्त्यांनी उचलून आणला नसता तर त्याची काय अवस्था झाली असती!
‘श्रद्धा’मध्ये मनोरुग्ण आणल्यानंतर त्यांच्यावर करण्याच्या काही उपचारांच्या पद्धती निश्‍चित आहेत. पहिली गोष्ट त्यांची स्वच्छता करावी लागते. त्यांच्या डोक्याचे आणि दाढीचे सर्व केस काढून त्यांना स्वच्छ अंघोळ घालावी लागते. अनेक महिनेच काय, वर्षंसुद्धा नीट जेवण नसल्यामुळे आणि रस्त्यावरचं काहीही उचलून खाल्लेलं असल्यामुळे त्यांना एकदम नेहमीचं अन्न देऊन चालत नाही. त्याची रिअ‍ॅक्शन येऊ शकते. त्यांच्या मेंदूमधल्या रसायनांचा गेलेला तोल सावरण्यासाठी काही औषधं दिली जातात, तर शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी वेगळी औषधं असतात. त्यापूर्वी एच.आय.व्ही.सकट सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. दुसरीकडे त्यांच्या भाषेचा अंदाज घेऊन त्या भाषेतले कार्यकर्ते त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करतात. यासाठी कधी कधी महिनाभरही थांबावं लागतं. ते बोलू लागले की मग ते त्यांची घरची पार्श्वभूमी, शिक्षण, नातेवाईक वगैरे माहिती हळूहळू सांगू लागतात. त्याच्या आधारे ते कोणत्या राज्यातले, कोणत्या गावातले आहेत हे शोधलं जातं. त्यानंतर त्यांच्या आजारातून ते किती बरे झाले आहेत याचा अंदाज डॉक्टर घेतात. एकदा डॉक्टरांनी परवानगी दिली की त्या रुग्णाच्या री-युनियनची तयारी होते.
‘री-युनियन’ करण्याची स्वतःची अशी पद्धत ‘श्रद्धा’ने तयार केली आहे. एक तर मनोरुग्ण जेव्हा रस्त्यावर सापडतो तेव्हा रेकॉर्डसाठी त्याचे फोटो काढले जातात. नंतर त्याच्या तब्येतीमधल्या बदलांची नोंद ठेवली जाते. त्याला कोणत्या औषधांची भविष्यात गरज लागणार आहे याची यादी केली जाते. या सगळ्याची फाइल री-युनियन झाल्यावर त्याच्या नातेवाइकांना दिली जाते. सोबत एका महिन्याची औषधं दिली जातात. त्यानंतर दर महिन्याला ‘श्रद्धा’च्या केंद्रांमधून त्या व्यक्तीच्या नातेवाइकांना फोन केला जातो. गरजेप्रमाणे औषधं बदलून पाठवली जातात. अशा प्रकारे री-युनियन केलेल्या पंधराशे फाइल्स ‘श्रद्धा’मध्ये व्यवस्थितपणे पाहायला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे सर्व मनोरुग्णांना ही सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य पुरवली जाते.

री-युनियन्स करताना कार्यकर्त्यांना येणारे अनुभव अस्वस्थ करणारे असतात. अनेक मनोरुग्ण हे योग्य पत्ता सांगू शकत नसतात. महाराष्ट्राबाहेरच्या दूरवरच्या राज्यात पोचल्यावर कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत होते. लोकांचेही नाना प्रकारचे अनुभव वाट्याला येतात.
अशाच एका गावात पत्ता सापडत नव्हता. स्वतः मनोरुग्णसुद्धा गोंधळला होता. म्हणून कार्यकर्त्यांनी एका रिक्षावाल्याला तो मनोरुग्ण दाखवून पत्ता विचारला, तर तो रिक्षावाला म्हणाला, की या व्यक्तीला शोधून आणण्यासाठी काही तरी बक्षीस लावलेलं असणार, म्हणूनच तुम्ही मुंबईपासून इतके दूर आलात; नाही तर कोण अशा वेड्यांसाठी इतकं लांब प्रवासखर्च करून येईल? मला याचं घर माहिती आहे, पण बक्षिसातली अर्धी रक्कम देत असाल तरच मी सांगतो. कार्यकर्त्यांनी त्याला वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्या रिक्षावाल्याने नाही तर नाही सांगितला पत्ता. मग कार्यकर्त्यांना रात्री गावात मुक्काम करावा लागला. दुसर्‍या दिवशी दुपारनंतर घर सापडलं.
अनेकदा मनोरुग्ण दहा-दहा वर्षांनी गावात गेल्यावर असं कळतं की तोपर्यंत त्याचे आई-वडील वारलेले असतात. इतर भावांनी संपत्ती वाटून घेतलेली असते. त्यामुळे आता हा आलेला कोणालाच नको असतो. मग ते ‘श्रद्धा’च्या कार्यकर्त्यांवरच चिडतात. ‘बरा होता रस्त्यावरच भटकत होता, तुम्ही कशाला आणलात इथे?’ असा जाब विचारतात. या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं?
एकदा एका मनोरुग्णाला सोडायला गेल्यावर दिसलं की त्याचा भाऊ खूपच श्रीमंत होता. दारात गाड्यांचा ताफा होता. पण तो म्हणाला, “आता माझ्या व्यवसायाचा व्याप मोठा आहे. शिवाय मुलांकडेही लक्ष द्यावं लागतं. अशा स्थितीत माझ्याकडे याच्यासाठी वेळ नाही. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात याला जागा नाही. त्यापेक्षा तुम्ही याला परत घेऊन गेलात तर माझ्यावर उपकार होतील.” अशा वेळेला काय करायचं असतं?
निरुत्तरित करणारे असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांपुढे रोज उभे ठाकत असतात- आपल्या सभ्य आणि सुसंस्कृत समाजाचा खरा चेहरा दाखवत असतात. त्यांच्याकडून एकामागोमाग एक अनुभव ऐकताना अस्वस्थता वाढत होती. आपल्या समाजाचं हे दर्शन चक्रावून टाकणारं होतं. अर्थात जसे वाईट अनुभव येतात तसेच खूप चांगलेही येतात, असं कार्यकर्ते सांगत होते. काही कुटुंबांत ‘श्रद्धा’च्या कार्यकर्त्यांकडे लोक देवदूतासारखे पाहतात. आपला हरवलेला जिवलग परत आल्याच्या आनंदात ते कार्यकर्त्यांनाही सहभागी करून घेतात. कार्यकर्त्यांना तेव्हा कृतकृत्य वाटतं.


‘आता महिलांचा वॉर्ड पाहायला जाऊ’ अशी सूचना कोणी तरी केली. बाहेर पडलो आणि चालू लागलो. तेवढ्यात मोबाइल फोनमध्ये एसएमएस आला. तो घाऊक पद्धतीने शुभेच्छा पाठवणार्‍या एका कंपनीचा होता. ‘आज श्रावणाचा पहिला दिवस. आपलं आयुष्य हिरवंगार होवो,’ असा काहीसा संदेश होता. सभोवार पाहिलं, तर खरंच आजूबाजूचे डोंगर, रान, झाडं - सारं हिरवं दिसत होतं. पण ते पाहत असताना मन मात्र विषण्ण झालं होतं. असा भकास श्रावण प्रथमच अनुभवत होतो.
महिलांच्या वॉर्डाची रचना पुरुषांच्या वॉर्डाप्रमाणेच आहे. परिचारिका, मदतनीस आणि कार्यकर्त्या असा महिला कर्मचारीवर्गही आहे. पण इथले प्रश्न पुरुषांच्या वॉर्डापेक्षा अधिक गुंतागुंतीचे आहेत. महिलांच्या वॉर्डात प्रवेश केला तर डाव्या बाजूला एक महिला मनोरुग्ण आपलं बोचकं आवरून बसली होती. ‘मी आत्ता लगेच गावी चालले आहे’ असं म्हणाली. तिथल्या कार्यकर्त्याच्या मते गेला महिनाभर ती अशीच बसली आहे. आत येतच नाही. जरा पुढे गेेलो तर एक मध्यमवयीन महिला समोर आली आणि म्हणाली, “मला लगेच घरी सोडायला सांगा ना. माझा नवरा वाट पाहतो आहे.” प्रत्यक्षात तिला नवर्‍याने सोडलं होतं. जेव्हा री-युनियनसाठी तिच्या घरी नेलं तेव्हा कळलं, की मधल्या काळात नवर्‍याने दुसरं लग्न केलं आहे, तेही तिच्या सख्ख्या बहिणीशीच. त्यामुळे त्यांच्या संसारात ही ब्याद त्यांना आता नको आहे. आणखी एक मनोरुग्ण मुकी असल्यामुळे ती घरचा पत्ताच सांगू शकत नव्हती. अशा महिलांना संस्थेत ठेवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशा पाचजणी छोटी-मोठी कामं करून ‘श्रद्धा’मध्येच राहतात. कार्यकर्त्यांच्या मते रस्त्यावर राहणार्‍या मनोरुग्णांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण कमी आहे. कारण महिलांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांची संख्या मोठी आहे. अशा महिलांचीही काळजी या संस्थांतर्फे काही प्रमाणात घेतली जाते. त्यातूनही ज्या रस्त्यावर राहतात त्यांना समाज स्वीकारत नाही. ‘ती आता नासली आहे; आमच्याकडे नको’ अशी भाषा ते वापरतात. अशा महिलांना ‘श्रद्धा’सारखी संस्था आधार देते.
‘श्रद्धा’चा परिसर आपल्याला काही प्रमाणात दिलासा जरूर  देतो, पण मोठ्या प्रमाणावर हताश करतो. डॉ. वाटवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची निष्ठा आणि सातत्य या दोन्ही गोष्टी कौतुक करण्यासारख्याच आहेत, पण त्यांच्या कामाच्या निमित्ताने आपल्यासमोर उभे ठाकलेले प्रश्न किती भयंकर आहेत!
डॉक्टरांच्या मते हा आजार कधीच पूर्णपणे बरा होत नाही, पण खूप प्रमाणात नियंत्रणात येऊ शकतो. अगदी ‘श्रद्धा’मध्येसुद्धा मनोरुग्णावर उपचार सुरू केले की दोन आठवड्यांत त्याच्यामध्ये सुधारणा दिसू लागते. पुढे महिन्याभरात तर जवळजवळ ऐंशी टक्के फरक पडतो. परक्या व्यक्तीला ओळखताही येणार नाही की हा मनोरुग्ण आहे, इतकं त्याचं वर्तन नॉर्मल असतं. याचा साधा अर्थ असा की केवळ महिनाभर त्या व्यक्तीला उपचार देऊन त्याचा प्रश्न सुटणार असतो; पण तेवढंही करायला समाज तयार नसतो.
‘श्रद्धा’च्या फिल्ममध्ये या रुग्णांच्या रस्त्यावरच्या जगण्याची दृश्यं आहेत. ती पाहताना प्रश्न पडतो, की कसे जगत असतील ते रस्त्यावर वर्षानुवर्षं? मुंबईच्या मुसळधार पावसात ते कसे काढत असतील दिवस आणि रात्री? कशा प्रकारचं मिळत असेल त्यांना अन्न? घराघरांत दिवाळी चालू असताना या मंडळींच्या वाट्याला येणारा बेवारस चिखल ते कसा झेलत असतील?
प्रश्न जसे त्यांच्या जगण्याचे आहेत तसेच आपण त्यांना विसरण्याचेही आहेत. आपल्याला लक्षातच येत नाही, की यांचा आपण विचारच करत नाही. त्यांना न मोजताच आपली जनगणना पूर्ण होते. २०२०च्या महासत्तेकडे वाटचाल करण्याच्या नादात आपण यांना बरोबर घेण्याचं विसरूनच जातो. आपल्या देशात पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त, इतकंच काय पण भिकार्‍यांसाठीसुद्धा योजना आहेत, पण त्यात या रुग्णांचा उल्लेखदेखील नाही. केंद्र सरकारची नेहरू योजना म्हणते, की गरिबातल्या गरिबांसाठी अंदाजपत्रक बनवलं पाहिजे. पण जी माणसं अस्तित्वात असल्याची नोंदच नाही त्यांचं काय? डॉक्टर वाटवानींच्या मते रस्त्यावर फिरणार्‍या मनोरुग्णांची भारतातली संख्या किती तरी लाखांत आहे; पण आपला समाज त्यांचा विचारही करायला तयार नाही. ‘श्रद्धा’सारख्या अनेक संस्था निर्माण होतील तेव्हा मुंबईच्या रस्त्यांवरच्या रुग्णांचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. याचा अर्थ पूर्ण देशभरातला प्रश्न सोडवण्यासाठी किती संस्थांना किती काम करावं लागेल!
संध्याकाळी डॉक्टर वाटवानी राऊंडसाठी बोरिवलीहून आले. दर आठवड्यातून किमान तीन वेळा ते बोरिवलीहून कर्जतला येतात. कार्यकर्ते त्यांच्याविषयी खूप आदरानं बोलतात. कारण डॉक्टर या कामासाठी भरपूर वेळ देतातच, पण स्वतःच्या आणि पत्नीच्या प्रॅक्टिसमधून मिळवलेले पैसेही खर्च करत राहतात. स्वतःच्या संपर्काचा उपयोग करत दानशूर व्यक्तींकडून सतत पैसे उभे करण्याची जबाबदारीही पार पाडत असतात. ‘श्रद्धा’चं काम चालवत ठेवण्यासाठी येणारा खर्च खूप मोठा आहे. रस्त्यावर सापडलेल्या मनोरुग्णांसाठी कपडे, चपला, जेवण, औषधं, घरी पोचवण्याचा प्रवासखर्च, शिवाय कार्यकर्त्यांची मानधनं, त्यांच्या राहण्याची व्यवस्था अशासारखे किती तरी खर्च करत राहावे लागतात. पण डॉक्टर यातल्या कशाचाच बाऊ करत नाहीत. पैसे उभे करत राहतात. आठवड्यातून तीनदा न कंटाळता कर्जतला फेर्‍या मारतात. रस्त्यात कुठे पेशंट दिसला की उचलून आपल्या गाडीत बसवतात. हे असं चक्र चालूच राहतं.
डॉक्टरांचा दोन्ही वॉर्डांमधला राऊंड ही प्रत्यक्ष अनुभवण्यासारखी बाब आहे. साधारणपणे रुग्णाचा चेहरा बघून तो कितपत बरा आहे हे त्यांना लगेच कळतं. त्याप्रमाणे ते सहकारी डॉक्टरांना उपचारात करायच्या बदलांविषयी सूचना देतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वडिलांच्या मायेनं त्या रुग्णांना ते जवळ घेतात. वर्षानुवर्षं अशा स्पर्शाला पारख्या झालेल्या त्या रुग्णांच्या डोळ्यांत त्या वेळी दिसणारे भाव शब्दांत टिपणं केवळ अशक्य आहे.
आम्ही ‘श्रद्धा’त होतो तेव्हा त्या आठवड्यातल्या री-युनियन्सची तयारी सुरू होती. कोणी कर्नाटक, कोणी मध्य प्रदेश तर कोणी केरळ, अशा टीम्स ठरत होत्या. बोलता बोलता विक्रम शेलारांना म्हटलं, एखाद्या री-युनियनला आम्हाला येता येईल का? तर ते म्हणाले, “चला की. रविवारी सोलापूरला चाललोय.”

अ‍ॅम्ब्युलन्स सोलापूर शहरात शिरली तेव्हा मागे बसलेल्या दोघांची चुळबूळ जरा वाढली. किती वर्षांनी दोघं घरी जात होते माहीत नाही. घरी त्यांचं कसं स्वागत होणार होतं हेही माहीत नाही. पुढच्या तासाभरात त्यांच्या आयुष्याला कोणतंही वळण लागू शकणार होतं. आयुष्य किती अनिश्‍चित असू शकतं हे टोकावर उभं राहिल्याशिवाय कळत नाही, हेच खरं.
आधी रझाला सोडण्याचा निर्णय झाला. सोलापूर एस.टी.स्टँड, सिद्धेश्वर तलाव, विजापूर वेस असे पत्ते रझा सांगत होता. त्याप्रमाणे माग काढत अ‍ॅम्ब्युलन्स पुढे चालली होती. री-युनियनच्या ज्या क्षणाची उत्कंठा आणि धास्ती एकाच वेळी निर्माण झाली होती, तो क्षण अगदीच जवळ आला होता. एके ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्स थांबवायला रझाने सांगितलं. ‘यहाँ से अंदर है’ म्हणाला.
एका छोट्या बोळकांडातून आम्ही चालू लागलो. पुढे रझा, त्यामागे प्रभाकर, मग शेलार आणि महिंद्रभाई. दोन वळणं घेतल्यानंतर भाजीबाजार लागला. मेथीच्या पेंड्या पसरलेल्या एका हातगाडीसमोर जाऊन रझा उभा राहिला आणि हातगाडीवर भाजी विकणार्‍या बाई ‘अरे, ये देख मेरा इरफान लौट के आ गया’ म्हणून केवढ्यांदा तरी मोठ्यांदा ओरडल्या. आजूबाजूचे सगळेच भाजीविक्रेते आणि फळविक्रेते चपापून पाहू लागले. सर्वांची नावं पुकारून ती ‘आई’ सांगत होती, “अरे देख, मेरा इरफान लौट आ गया।” त्याच्या डोक्यावरून, अंगावरून ती मायेने हात फिरवत होती. अत्यानंदाने म्हणत होती, ‘या अल्ला, तेरा लाख लाख शुकर हैं। आज मेरा इरफान मेरे पास है!’
“अरे, पहले उसको घर ले चलो।” कोणी तरी सुचवलं. अगदीच समोरच्या बोळात गेल्यावर घर होतं. एका वेळी एकच माणूस जाऊ शकेल इतका अरुंद बोळ आणि त्याच्या दोन्ही बाजूंना घरं. आम्ही घराकडे जात असतानाच काही तरी घडल्याची चाहूल सगळ्यांना लागली. पुढच्या दोन मिनिटांत घर भरून गेलं आणि बायांचा आक्रोश सुरू झाला.
‘मैंने बोला था ना, रमझान शुरू होने के बाद आएगा? देख, आ गया!” गर्दीतून एक आवाज.
“अल्लानेही तेरे बेटेको घर लाके छोडा।” आणखी एक आवाज.
आतापर्यंत याने आपलं नाव रझा शब्बीर सय्यद सांगितलं होतं. मग हे ‘इरफान’ कुठून आलं हे कळत नव्हतं. तेवढ्यात एकानं खुलासा केला, “इसने रझा नाम कैसे बताया पता नहीं। इसका तो नाम इरफान मलंग बागवान है। इसकी शादी हुई है। दो बेटे भी हैं।” पण तो हे सारंच विसरला होता.
“आपके बेटे को कुछ नहीं हुआ है, सिर्फ मानसिक बीमारी है। हम दवाइयाँ देते हैं। वो रेग्युलर दिया तो कोई प्रॉब्लेम नहीं आएगा।” शेलार सर्व नातेवाइकांना आजाराचं स्वरूप आणि पुढचे उपचार समजून सांगतात. इरफानची पूर्ण फाइल त्यांच्याकडे सोपवतात. कुटुंबासमवेत इरफानचा फोटो काढतात.
इरफान साधारणपणे वर्षभर बेपत्ता होता. त्याच्या घरचे इंडी, विजापूर, कोल्हापूर, पुणे अशा अनेक गावांना जाऊन शोधून आले होते. या सगळ्या प्रकारात त्यांना पंधरा हजार रुपयांचं कर्ज झालं होतं. नुकतंच कोणी तरी त्यांना सांगितलं होतं, की पुण्याजवळ चिंचवडमध्ये तुमच्या मुलासारखा दिसणारा एकजण दाढी वाढवून फिरत असतो. वेडीपिशी झालेली त्याची आई कोणाकडून तरी पैसे उधार घेऊन चिंचवड गाठणार होती. इरफान मात्र मुंबईच्या रस्त्याच्या कडेला शून्यात नजर लावून बसला होता. मनात विचार आला, जर ‘श्रद्धा’च्या कार्यकर्त्यांनी याला इथे आणून सोडलं नसतं, तर इरफानच्या आयुष्याचं काय झालं असतं? आणि उरलेलं आयुष्य फक्त इरफानचा शोध घेत ती माउली कशी जगली असती? भारतामधल्या रस्त्यांवर असे लाखो इरफान फिरत आहेत, असं डॉक्टर सांगतात तेव्हा किती विदारक सत्य सांगत असतात ते!

इरफानच्या कुटुंबाचा निरोप घेतल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स प्रभाकरच्या घराकडे निघाली. रविवार पेठ, जोशी गल्ली. प्रभाकरनेही पत्ता बरोबर सांगितला होता. अगदी गरीब वस्ती होती ती. अ‍ॅम्ब्युलन्स पाहून गर्दी गोळा झाली. प्रभाकरला पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. “अरे, हा परत कसा आला?” कोणी तरी गर्दीतून म्हणालं. तेवढ्यात एकाने त्याच्या वडिलांना बोलावलं. रापलेला चेहरा, पांढरे केस, फाटलेलं जाळीचं बनियन आणि खुंट वाढलेली दाढी. पूर्वी अंगमेहनत करणारे हे गृहस्थ अपघातात एक हात गेल्यामुळे कामच करू शकत नव्हते. त्यांच्याकडे पाहताना पोटात कालवाकालव होत होती. ते म्हणाले, “या प्रभाकरच्या आईची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही.”
एका झोपडीच्या दारात गेलो. आत जाणं शक्य नव्हतं, कारण आत तेवढी जागाच नव्हती. अगदी सुतळीचा तुकडाही न उरलेलं ते घर होतं. त्याची आई पांगळी होती. दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती. आवाजावरून तिला आपला मुलगा आल्याचं कळलं. तिच्या दोन खाचांमधून अश्रू ओघळू लागले.
“ही आमची परिस्थिती आहे साहेब. तुम्ही याला बरा करून आणला, खूप उपकार झाले! पण याला पोसायला आता आमच्याकडे काही उरलं नाही.” आता वडिलांच्याही डोळ्यांत असहाय अश्रू होते.
प्रभाकरचंही पूर्वी लग्न झालं होतं. एका आजारात त्याचं मूल गेल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता, असं शेजारचे सांगत होते. त्यामुळे त्याची बायकोही त्याला सोडून गेली. पण तो हैद्राबादच्या रस्त्यावर कसा पोचला असेल हे कोणीच सांगू शकलं नव्हतं. त्याच्या घरच्यांच्या हातात फाइल आणि औषधं सुपूर्द करून त्यांचा निरोप घेतला.

परतीच्या प्रवासात शेलार आणि महेंद्रभाई त्यांचे कामातले अनुभव सांगत होते. त्यातून उभ्या राहणार्‍या प्रश्नांविषयी बोलत होते. दोघंही वयानं तरुण आहेत. आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण हेच काम करत राहणार, असा निर्धार ते व्यक्त करत होते. पुढच्या तीन-चार तासांत कामाच्या अनुषंगाने बरीच चर्चा झाली. बोलता बोलता रात्रीचे नऊ वाजून गेले होते.
पुण्याच्या हडपसर परिसराजवळून अ‍ॅम्ब्युलन्स चालली होती. अचानक ‘पेशंट, पेशंट’ असं महेंद्रभाई ओरडले. शेलारांनी अ‍ॅम्ब्युलन्स थांबवली. गाडीतून सारेच खाली उतरलो. फुटपाथवर स्वतःशीच हातवारे करत पंचविशीतला तरुण उभा होता. कळकट कपडे आणि वाढलेली दाढी असा अवतार.
“कुठे चालला रे? ” शेलारांनी विचारलं.
“चाललो जरा तिकडं.” त्याचं उत्तर.
“गाव कुठलं तुझं?” महेंद्रभाईंचा प्रश्न.
“भुललो.”
“आई-वडिलांचं नाव काय?” पुढचा प्रश्न.
“भुललो.”
“तुझं नाव काय?”
“प्रभाकर.” लगेच उत्तर.
या उत्तरानंतर महेंद्रभाई आणि शेलार एकमेकांकडे पाहतात आणि ‘चल, गाडीत बस’ म्हणतात. आश्‍चर्य म्हणजे तो लगेच गाडीत बसतो.
गाडी सुरू करताना शेलार सहजच म्हणतात, “एका प्रभाकरला सोलापूरला सोडून आलो आणि हा दुसरा प्रभाकर सापडला!” काही न कळल्यासारखा हा नवा प्रभाकर त्यांच्याकडे पाहत राहतो.
एका प्रभाकरपासून सुरू झालेला हा प्रवास या दुसर्‍या प्रभाकरपासून पुन्हा सुरू झाला होता.
हा प्रवास असा किती काळ चालू राहणार?

• आनंद अवधानी

• • • • • 

• अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या

  1. खूप मोठं काम आहे .या रस्त्यावरील बेवारस मोनोरंगन्नासाठी राज्य सरकारने धोरण तयार करावे लागेल .हे झाले बेवारस, रस्त्यावर चे पण जे असंख्य लोक घरात राहतात त्याचा देखील विचार करावा लागेल .त्यांच्या हक्काचा उपचाराचा .....संस्थेची भेट घेऊन पुढे काम देखील करू धन्यवाद .

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान, वाचनीय लेख लिहिला आहे.
    सर्वप्रथम मी "अनुभव"च्या संपादकांचे आभार मानतो, कारण त्यांनी हा लेख इंटरनेटवर वाचण्यासाठी उपलब्ध करून दिला.
    तसेच आनंद अवधानी यांचेही खूप आभार, कारण लेख केवळ माहिती न देता विचार करायला लावणारे 'अनुभव' सांगितलेला आहे.

    मानसिक आजारांमुळे माणूस काहीही निर्णय घेऊ शकतो. पण डॉक्टर वटवानी दाम्पत्यांनी त्याच्या पलीकडे मजल मारून तो मानसिक रुग्ण कितीही टोकाला गेला असला तरी त्याला केवळ रुळावर आणायचे नाही, तर त्याच्या कुटुंबामध्ये मिसळून द्यायचे हा जो ध्यास घेतला आहे त्यापुढे माझ्या बऱ्याच मानसिक खुळचट कल्पना आपोआप गाळून पडल्या. मानसिक आजाराची माणसे मी पहिली आहेत, मी सुद्धा त्यातलाच एक होतो (आणि आहे). पण मानसिकतेने आजारी असलेल्या माणसांना केवळ दूषणे देऊन, त्यांचा तिरस्कार करून समस्या कधीही सुटणार नाहीत हे मला डॉक्तरांच्या कार्यातून "प्रत्यक्ष" कळले. लेख वाचून तर ज्या-ज्यावेळी मनात काही व्यक्तींविषयी तिरस्कार व्यक्त करण्याचे विचार येतात तेव्हा हे डॉकटर, त्यांचे कार्य पाहून माझ्या "मनाला" त्यांच्यासारखेच रुळावर आणण्याचा प्रयत्न करतो.

    आपल्या समोर एकीकडे "विचार, सल्ले यांचा महासागर" आणि दुसरीकडे "प्रत्यक्ष कृतीतून सोडवले जीवनाचे एक अवघड गणित" असेल तर ते "प्रत्यक्ष सोडवले गणितच" जास्त परिणामकारक ठरते. कारण त्यातील प्रत्यक्ष केलेल्या कृती आणि कृतीचे, तपश्चर्येचे मिळणारे फळ पाहून आपले मन अशा समस्यांची कारणे सांगायचे सोडून आपोआप त्या समस्याच प्रत्यक्ष सोडवण्यास तयार होते.

    शेवटी डॉकटरांच्या आणि आमटे कुटुंबियांच्या कार्यापुढे बाकी काहीच शब्द सुचत नाहीत, म्हणून मी इथेच माझे मनोगत, प्रतिक्रिया संपवतो.
    धन्यवाद.
    राहुल दत्तात्रय कित्तुरे
    इचलकरंजी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८