सुभाष अवचट : अमूर्ताच्या शोधात चित्रकार - अन्वर हुसेन
सुभाष अवचट हे भारतीय कलाविश्वातलं महत्त्वाचं नाव. या प्रयोगशील चित्रकाराने नुकतीच वयाची सत्तरी गाठली. त्यानिमित्ताने, त्यांचे तरुण चित्रकार मित्र अन्वर हुसेन यांनी लिहिलेला लेख. अवचट यांचं हे पोर्ट्रेटही अन्वर यांनीच चितारलेलं.
त्या दिवशी संध्याकाळी मी आणि माझा मित्र ‘४, शाकुंतल’च्या दरवाज्यासमोर उभे होतो. बंद होता दरवाजा. एकदा बेल वाजवली.
दार उघडलं गेलं नाही. आत कुणी आहे-नाही काही कळत नव्हतं. थांबलो तसेच थोडा वेळ.
मनात खूप उत्सुकता वाटत होती त्या क्षणी. या बंद दरवाज्याच्या आत काय काय असेल?
कुठे कुठे पाहिलेली, वर्तमानपत्रात, मॅगझिन्समध्ये छापून आलेली ती चित्रं, इथेच आत असतील
ना? खूप मोठी चित्रं असतात त्यांची, असं
ऐकलेलं. ते मला प्रचंड आवडलेलं त्यांनी केलेलं पोर्ट्रेट- ते असेल का इथे?...
असंख्य विचार तरळून जात होते, पण दरवाजा बंदच.
दुसर्यांदा बेल दाबावी का? नको... मित्राने आणि मी विचार
केला. वळलो आणि जिना उतरून खाली आलो.
शेजारीच असलेल्या होस्टेलवर राहिलो होतो आम्ही.
डिप्लोमाचं वर्ष होतं. परीक्षेसाठी मुंबईला आलो होतो. आता काही दिवस इथेच राहावं
लागणार होतं. पहिल्याच दिवशी पलीकडेच ‘साहित्य सहवास’ आहे असं कळलं. खूप आनंद
झालेला ते कळल्यावर. आम्हाला साहित्य सहवासबद्दल कुतूहल असण्याचं कारण म्हणजे
अर्थातच चित्रकार सुभाष अवचटांचा स्टुडिओ तिथे असणं. आज नाही जमलं तरी इथे आहोत
तोपर्यंत त्यांच्या स्टुडिओत जाऊन यायचंच, असं म्हणत आम्ही
रूमवर परतलो. पण दुसर्या दिवसापासून सुरू झालेल्या परीक्षेच्या रूटीनने आणि जे.
जे. ते बांद्रा लोकल प्रवासाच्या आम्हाला कधीच कल्पना नसलेल्या दगदगीने शेजारी
असूनही अवचट सरांच्या स्टुडिओत जाणं राहून गेलं. नंतर जवळपास १७ वर्षांनी त्या ‘४,
शाकुंतल’समोर उभा होतो एके दुपारी. या वेळी मात्र दरवाजा नक्की
उघडला जाणार होता. कारण सरांनी स्वत:च बोलवलं होतं स्टुडिओवर.
अनिल अवचटांची पुस्तकं वाचायचा नाद लागला होता
कॉलेजमध्ये असताना. त्यातल्या बर्याच पुस्तकांवरची चित्रं खूप आवडायची, गुंगवून ठेवायची. त्या वेळी पहिल्यांदा अवचट सरांच्या चित्रांशी ओळख झाली.
अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठांवरची त्यांची चित्रं बघताक्षणी ओळखू यायची. मग ती
पुस्तकं हातात घेऊन वाचण्याआधी ती चित्रंच न्याहाळत बसायचो. इतर अनेक
मुखपृष्ठांच्या गर्दीत अवचट सरांच्या चित्रांचा दर्जा, रचना,
रेषेची क्वालिटी हे खूपच मोहून टाकणारं होतं. पुस्तक प्रदर्शनं
लागायची गावात, तेव्हा तिथे जाण्याचा एक हेतू पुस्तकांची
मुखपृष्ठं बघणं हा असायचा. तासन्तास बघत राहायचो. आर्ट स्कूलमध्ये शिकत होतो.
प्रत्यक्ष चित्रप्रदर्शनं वगैरे सगळं मोठमोठ्या शहरांतच होत असल्याने ते बघायला
मिळायची गोष्ट दूरच होती. त्यामुळे गावात पुस्तक प्रदर्शन लागलं की खूप आनंद
व्हायचा. पुस्तकं विकत क्वचितच घेता यायची. पण नवनव्या पुस्तकांवरची मुखपृष्ठं
बघायला मिळायची. ते माझ्यासाठी चित्रप्रदर्शनच असायचं एकाअर्थी. एकदा असंच
प्रदर्शनात पुस्तकं बघता बघता एका पुस्तकाने थांबवलं जागच्या जागी. एक अप्रतिम
चित्र मी बघत होतो. आर्ट स्कूलमध्ये दोन-तीन वर्षांपासून होतो मी. अनेक नामवंत
चित्रकारांची व्यक्तिचित्रं बघण्यात येत होती. खूप छान असायची. पण हे जे चित्र,
जे पोर्ट्रेट त्या मुखपृष्ठावर मी बघत होतो तसलं अफाट पोर्ट्रेट मी
कधीच पाहिलं नव्हतं. किती तरी वेळ ते पुस्तक हातात घेऊन बघत राहिलो. किती सहजता
दिसत होती चित्रात! चित्रातल्या व्यक्तीशी त्या चित्रकाराच्या फटकार्यांनी किती
एकरूपता साधलेली होती! त्या अतिशय बोल्ड फटकार्यांनी त्या चित्रकाराचं अखंड
व्यक्तिमत्त्वच माझ्या मनात उभं राहिलं आणि त्या फटकार्यांनी चित्रातल्या
व्यक्तीचंही व्यक्तिमत्त्व मला जाणवत राहिलं. चित्रातली व्यक्ती होती अनिल अवचट.
अनिल अवचटांच्या ‘स्वत:विषयी’ या पुस्तकाच्या कव्हरवरचं ते पोर्ट्रेट होतं- सुभाष
अवचटांनी केलेलं. माझ्यासाठी ते पोर्ट्रेट म्हणजे एक धडा बनून गेलं. त्या
कव्हरसाठी मी ते पुस्तक विकत घेतलं. यातून सुभाष अवचटांची चित्रं बघायची उत्सुकता
वाढली.
एका कॉलेजच्या लायब्ररीमध्ये अधून मधून जात असायचो.
प्रचंड पुस्तकं तिथे. चित्रकलेवरचीही काही. पुस्तकांच्या उंचच उंच रॅक्समधून फिरत
फिरत चित्रकलेबद्दल काही सापडतंय का बघत होतो. मराठी विभागात फिरत होतो. चौकोनी
आकाराचं छोटंसं पुस्तक दिसलं. आकार बघूनच खूष झालो. पटकन हातात घेतलं. ‘जीए : एक
पोट्रेट’ लेखक : सुभाष अवचट.. व्वा! हे काय तरी भन्नाट हाती लागलं. पुस्तक घेतलं
आणि तिथेच एका कोपर्यात बसलो वाचत. जी.एं.ची पुस्तकं वाचली होती दोन-तीन.
अवचटांनी त्यांच्या पुस्तकांची कव्हर केलेलीही पाहिली होती. पुस्तक वाचू लागलो तर
ही दोघं काय प्रकारची माणसं आहेत हे कळू लागलं. सुभाष अवचटांनी इथे जीएंबद्दल
लिहिलंय;
पण मी वाचत असताना त्यात अवचटांचंच पोर्ट्रेट शोधू लागलो, अणि वाचता वाचता माझ्यासमोर ते स्पष्टही होत गेलं. त्यांच्याबद्दल आधीच
उत्सुकता होती, हे पुस्तक वाचून त्यात भरच पडली. आर्ट
स्कूलमधे चित्रकाराची जी इमेज माझ्यासमोर होती, त्यापेक्षा
हा चित्रकार खूप वेगळा वाटू लागला. हा चित्रकार अप्रतिम लिहिणारा होता. ही नवी
ओळख. खूप मोकळेपणा त्यांच्या लिखाणात जाणवला... जसा त्यांच्या रंग लावण्यात
दिसलेला
‘त्या’ पोर्ट्रेटमधे.
*
पेपरमधे बातमी वाचली प्रदर्शनाविषयी. रात्रीच निघालो.
अजून गॅलरी उघडायची आहे. तिथेच बसून राहिलो वाट बघत. थोड्या वेळात उघडली गॅलरी.
शेवटी आज सुभाष अवचटांची चित्रं प्रत्यक्ष बघायला मिळणार.. जहांगीरमधल्या उजवीकडे
असणार्या त्या तिन्ही गॅलरीज एकत्र करून तिथे हे प्रदर्शन होतं. दार ढकलून आत
शिरलो,
चेहर्यांची शिल्पं समोर दिसत होती. मागे काळं कापड वरून सोडलेलं.
इथूनच आपण काही तरी वेगळं बघतोय असं जाणवलं. ‘काळा’ सर्व गॅलरीभर भरून राहिलेला.
पुढे गेलो. मोठ्ठाले कॅनव्हास. त्यात ती स्तब्ध उभी सामोरी आणि पाठमोरी माणसं. मी
नेहमी येतो ती हीच जहांगीर आर्ट गॅलरी आहे का? मी शांतपणे
त्या काळ्यामध्ये उतरत गेलो. काळ्या रंगाला किती मर्यादित करून टाकलंय आपण! इथे
आत्ता मी पाहतोय त्या काळ्या रंगाची अद्भुत किमया. त्या चित्रांमधल्या चेहर्यांवरचं
गूढ आता माझ्याआत उतरू लागलं होतं. ही चित्रकाराच्या प्रदेशातली माणसं होती. ती
तशी का उभी आहेत? एकाआड एक पाठमोरी का आहेत? मला काही शोधायचं नव्हतं. काय विषय आहे, मला त्यात
रस नाही वाटला. तिथल्या काळ्या रंगाने मला घेरून टाकलेलं. एक लय अंगात उतरली. त्या
काळ्या रंगाच्या अनोळखी प्रदेशात मी प्रवेश केला होता. चित्रातले चेहरे मला
पाहताहेत. काहींचे डोळे मिटलेले, काही तंद्रीत असल्यासारखे
मान खाली घालून त्यांच्यात नादात. अनेक चित्रं जोडून तयार झालेलं ते सलग प्रचंड
चित्र बघत किती वेळ त्याच्या समोरून हलू शकलो नाही. मी फिरत होतो त्या सगळ्या
चित्रांमधून आणि इन्स्टॉलेशन्समधून. तो प्रदेश ओळखीचा वाटू लागला हळूहळू.
जहांगीरच्या त्या सलग तीन गॅलर्यांच्या विस्तीर्ण अवकाशात अवचटांनी काळाचा तो एक
पट मांडलेला होता. सगळी चित्रं, चित्रांतली माणसं, चेहरे स्तब्ध भासत होते; पण त्या स्पेसमध्ये फिरताना
किती तरी प्रतिमा मनाच्या तळातून वर येऊ लागल्या.
पौडच्या एका जुन्या चॅपलमधून अवचट एकदा वेगळंच व्हायब्रेशन घेऊन बाहेर पडले
होते(तो संदर्भ पुढे येईलच), तसाच मी त्या दुपारी जहांगीरमधल्या
त्यांच्या प्रदर्शनातून वेगळीच व्हायब्रेशन घेऊन बाहेर पडलो. व्हायब्रेशनची
जातकुळी वेगळी असेल. पण नंतर खूप काळ मी ती अनुभवली.
बाहेर येऊन पायर्यांवर बसलो. थोड्या वेळाने कारमधून
उतरून पायर्या चढताना काळ्या कपड्यातली एक व्यक्ती दिसली. हे सुभाष अवचटच
असणार... नक्की! तेच होते; पण त्या वेळी मला त्यांना भेटावंसं
वाटलं नाही. मी त्या चित्रांच्या तंद्रीत बसूनच राहिलो.
बहुतांश चित्रांतली माणसं डोळे बंद केलेली दिसतायत
सरांच्या. डोळे मिटून काय करतायत ते? का प्रत्येक वेळे
डोळे मिटलेली माणसं काढतात अवचट? विचार करत राहिलो. डोळे
मिटून स्वत:मध्ये पाहतायत का? बाहेरचं सगळं टाळून आतमध्ये
काही शोध घेतायत? कशाचा शोध घेत असतील? आत्मशोध? अवचटांच्या या डोळे मिटलेल्या माणसांच्या
चित्रांकडे मी बघत राहतो. एक स्तब्धता जाणवते. शांत असा भाव मनात उमटतो. असं वाटत
राहतं की चित्रातला तो अगदी अंतर्मनातली नीरव शांतता अनुभवतोय. स्वत:ला जाणून
घ्यायचंय त्याला. त्यासाठीचा त्याचा हा प्रवास आहे. ‘स्व’चा शोध हा अवचटांच्या
चित्रांमधला धागा आहे. त्यांच्या अनेक चित्रांत या मानवाकृतींसोबत अमूर्त आकारही
दिसतात. ते आकार या त्यांच्या शोधाला आणखी गहिरं करत जातात. जे काही अमूर्तत्व आहे
त्याच्या शोधात निघालेला हा चित्रकार, असं मला अवचटांबद्दल
वाटत राहतं. त्यांची अशी चित्रं म्हणजे त्यांनी त्यांचाच घेतलेला शोध आहे असं वाटू
लागतं.
मग कधी तरी पुढे ‘स्टुडिओ’ हाती आलं. त्यात अवचट
सांगतात,
लहानपणापासूनच त्यांना संन्याशांचं आकर्षण वाटत आलंय. संन्याशासारखं
भटकत राहावं. डोंगरांतली देवळं, नदीकिनारी उतरत गेलेल्या
पायर्या यांचं असणारं आकर्षण. जीवनाचा अर्थ शोधणार्या परंपरा यांचं आकर्षण.
त्यांना अलिप्तपणे स्वत:कडेच पाहताना जाणवतं, की त्यांना
मुक्तपणे कशाचा तरी शोध घ्यायचा आहे. आणि ते म्हणतात, ‘तो
शोध मला चित्रांत सापडला असं वाटतं.’
*
एक मोठं चित्रं पाहतोय मी. चित्रावकाशात अमूर्त आकार.
ते अमूर्त आकार मला एखाद्या पर्वताप्रमाणे दिसतायत. पाषाण पर्वत... तोही सोनेरी.
ब्राउनिश,
येलोइश रंगात सबंध चित्र. माझं लक्ष त्या अमूर्त आकारांकडे लागून
राहिलंय. जवळ जाऊन पाहावंसं वाटतंय. या चित्रात टेक्श्चरची मजा अफलातून आहे,
जो चित्राला एक आदिम, प्राचीन असा मूड देतोय.
हजारो वर्षांपासून ते आकार तिथे आहेत. ते अमूर्त आकार त्यातल्या पोकळ्या, उभार... त्यांच्यात दडलाय एक मोठा काळ. अनेक कहाण्या त्यांच्या भवती
घडलेल्या आहेत. आणि थोडं मागे येतो मी, तर त्या उभ्या
आकारांपुढे विस्तीर्ण मोकळी जागा दिसतेय. आणि माझं लक्ष त्या मोकळ्या जागेमधून
चालत निघालेल्या त्या आकृतीकडे जातं. त्या क्षणी त्या चित्रांचा अर्थ बदलून जातो
किंवा नव्याने सापडतो. त्या प्रचंड स्पेसमध्ये चालत निघालेला तो जो कुणी आहे
त्याने त्या चित्राला एक वेगळंच डायमेन्शन दिलंय. कोण आहे तो? या पुरातन विस्तीर्ण अवकाशात तो कुठे निघालाय? कशाच्या
शोधात?
अवचट सरांची चित्रं जेव्हा समग्रपणे वगैरे मी बघतो, त्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य मला वाटतं, ते म्हणजे
ते कुठल्या विशिष्ट विषयामध्ये, एकाच शैलीत अडकलेले चित्रकार
नाहीत. माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. विशेषत: भारतीय चित्रकलेत
ठराविक पद्धतीने वर्षानुवर्षं चित्रं काढत राहिलेले मोठे चित्रकार बघितल्यावर.
कंटाळा येत नसेल का, वर्षांनुवर्षं तेच तेच, तसंच रंगवत राहायचं.. एकदा काही तरी गोष्ट, चित्रातले
काही घटक, आकार हाती लागले की त्याचा साचाच बनवला जातो. तो
साचा तोडून, ती चौकट मोडून पुन्हा नव्याने रचण्याचं धाडस फार
कमी चित्रकार करताना दिसतात. अवचट सरांनी असा साचा कधी बनू दिला नाही. ‘स्टुडिओ’मधे
ते म्हणतात, ‘रसाच्या गुर्हाळात डोळे बंद केलेला बैल असतो,
तो बैल मला व्हायचं नाही.’
त्यांना कंटाळा येतो...
चित्रातले तेच तेच विषय असोत
प्रेमात पडणं असो
दारू पिणं असो..
अगदी स्वत:चासुद्धा...
दररोज सकाळी माझ्यापुढे मीच...
हा कंटाळा दूर करण्याचं ठिकाण म्हणजे चित्रकला...
कॅनव्हासवर ते त्यांच्या मनाप्रमाणे नवं रचू शकतात, असं त्यांनी लिहिलंय.
अवचट सरांची चित्रं, फिगरेटिव्ह
चित्रं बघत असतो, तेव्हा त्या फिगर्समध्ये खास प्रकारचा डौल
असतो असं जाणवतं. चेहर्यांची ठेवण खास सुभाष अवचट शैलीची असते. त्यातून त्या चेहर्यांना
देखणेपण लाभलेलं असतं. याचा अर्थ त्यात एकसारखेपणा असतो असं नाही. तर जेव्हा येशू
कॅनव्हासवर असतो, तर तो थेट रेनेसाँ काळाची आठवण करून देतो.
वारकरी जेव्हा दिसतात ते इथल्या मातीतले अस्सल रांगडे दिसतात. सरांनी नटांची
चित्रं काढली होती, त्या चित्रांत तर फिगर्समधला तो डौल आणखी
परिणामकारक दिसतो. कदाचित सिनेमाविषयीचं आकर्षण आणि अनेक उत्तम अभिनेते यांच्या
सहवासातून हे घडलं असेल.
*
जहाँगीरमधे होणार्या माझ्या चित्रप्रदर्शनाची धांदल
सुरू होती. आठ दिवसांवर आलं होतं प्रदर्शन. प्रदर्शनाचा कॅटलॉग मित्रांना, चित्ररसिकांना, शिवाय काही चित्रकारांनाही पाठवला.
त्या दरम्यान मनात आलं... सुभाष अवचटांना पाठवू या का? तोपर्यंत
अवचट
फेसबुकवरून संपर्कात आले होते. मधेअधे काही पोस्ट
असायच्या त्यांच्या. पण त्यांच्याशी संवाद मात्र झालेला नव्हता कधी. ते कुठं असतात
नेमके याबद्दलही नक्की कुणाला काही कल्पना नसायची. मुंबईत क्वचितच असतात, परदेशात असतात, खंडाळ्याला असतात... असं काय काय
ऐकायला मिळायचं. त्यांनी माझी चित्रं बघावीत असं मला मनापासून वाटत होतं. माझ्या
अत्यंत आवडत्या चित्रकारांपैकी ते एक आहेत. हे शक्य आहे का पण? असा विचार मनात येत होता. म्हटलं, प्रयत्न तरी करू!
मग सरळ फेसबुकवर त्यांना माझा कॅटलॉग मेसेज केला. सोबत त्यांना विनंती केली,
की ‘तुम्ही माझी चित्रं बघावीत अशी माझी इच्छा आहे. तुम्ही याल का?’
मेसेज पाठवून मी विषय डोक्यातून काढून टाकला. आपल्याकडे सेलेब्रिटी
लोक मेसेजला, फेसबुकवरच्या पोस्टवर केलेल्या कॉमेंटला उत्तरं
देत नसतात ना. फक्त ओळखीच्यांचेच फोनकॉल होतात.
पण थोड्या वेळाने ङ्गोनवर मेसेज आलेला दिसला. चक्क
अवचटांचा रिप्लाय.. येईन. लव्ह युवर वर्क!
खूप आनंद वाटला. येतो म्हणाले याचा, आणि माझी चित्रं आवडली याचाही.
जहाँगीरमधलं प्रदर्शन चालू झालं. अनेकजण येत होते.
ज्यांनी यावं वाटलं होतं ते बहुतेक सगळे. सातातले पाच दिवस पार पडले. आता माझी
खात्री पटली, आता अवचट येणार नाहीत. सहाव्या दिवशी सकाळी
हॉटेलवरून आवरून गॅलरीकडे निघायच्या तयारीत मी. अवचटांचा मेसेज- ‘आम्ही येतोय
थोड्या वेळात.’ उत्साहात गॅलरीकडे आलो. अकराला गॅलरी उघडली. लोकांची वर्दळ आता
सुरू होईल. इतक्यात सुहास एकबोटे येताना दिसले आणि त्यांच्यासोबत सुभाष अवचट.. मग
प्रत्यक्ष ओळख पाळख वगैरे. एका क्षणात जाणवलं की या माणसाच्या दृष्टीने ओळख
असणं-नसणं, पहिल्यांदा भेटणं, वयाने
लहान-मोठं असली काय भानगडच नव्हती. आधीपासून ओळख असल्यासारखं मनमोकळं बोलणं,
सोबतच्यांशी दिलखुलास चेष्टा. भारतीय चित्रकलेतले एक प्रथितयश,
महत्त्वाचे चित्रकार वगैरे असूनही त्याबद्दलचा अहं म्हणा किंवा बाऊ
म्हणा, मला तरी त्यांच्या स्वभावात कुठेही जाणवला नाही. जगभर
हिंडून, सतत ग्लॅमरस जगात राहूनही त्यांनी आपली जमीन सोडलेली
नाही, हे जाणवत होतं.
ते गॅलरीमध्ये आल्यावर तिथे अक्षरश: चैतन्य पसरलं.
‘‘हं,
चल आता दाखव तुझी चित्रं..’’ अवचटांनी गॅलरीचा ताबाच घेतला. मी
चित्रं दाखवू लागलो. पुढे सरकत राहिलो. अवचट बारकाईने बघत होते. काही विचारत होते.
विषयांबद्दल. चित्रांमधला ‘लाईट’ त्यांना आवडला. चहाच्या टपरीची, केटलीची काही चित्रं होती. ते बघून म्हणाले, ‘‘अरे
तुझी केटली मी अमेरिकेत पाहिलीय. मी विचारलं सुद्धा प्रियाला. हा कोण चित्रकार
म्हणून. छान आहे ते चित्रं.’’ प्रिया म्हणजे ज्यांनी माझं चित्र विकत घेतलं त्या.
त्यांची आणि अवचटांची अनेक वर्षांपासूनची ओळख. अवचटांनी त्या चित्राचा उल्लेख
केलेला ऐकून खूपच आनंद झाला. प्रचंड काम केलेल्या, आपण
ज्यांच्याकडून काही शिकलोय अशा कलावंताने आपल्या चित्राची नोंद घ्यावी ही मनाला
सुखावणारी गोष्ट आहे.
मोजकेच कलाकार इतर चित्रकारांच्या कामांबद्दल अशी
आत्मियता दाखवताना दिसतात. पुढच्या पिढीतल्या चित्रकारांची कामं बघणं, त्याबद्दल बोलणं दुर्मीळच. आजही आमचा फोन होतो तेव्हा ते ‘नवं काय
चित्रं काढलंस ते व्हॉट्सअॅपवर पाठव बघू’, असं हक्काने
सांगत असतात.
तर त्यादिवशी त्यांनी प्रदर्शनातली चित्रं बघितली.
अगदी निवांत वेळ देऊन. बघून झाल्यावर म्हणाले ‘‘आवडली चित्रं. त्याबद्दल तुला जेवण
देणार मी.. त्यासाठी घरी यावं लागेल. प्रदर्शन संपल्यावर ये.’’ हे ऐकून तर अतिशय
आनंद झाला. चित्रं आवडली म्हणून अवचटांनी जेवायला बोलावलं याचा आनंद आणि या
निमित्ताने ‘४ शाकुंतल’ या त्यांच्या स्टुडिओत जाता येईल याचा आनंद. आर्ट स्कूलमधे
असताना जिथून मी दार बंद असल्याचं बघून परतलो होतो, तिथेच
येण्याचं आता बोलावणं आलं होतं. प्रदर्शन संपल्याच्या दुसर्या दिवशी अवचटांनी
बोलवल्याप्रमाणे गेलो साहित्य सहवासात. बेल वाजवली, स्वत:
अवचटांनी दार उघडलं. दारातून आत आलो. समोर अवचटांचं ते वारकरी मालिकेतलं अप्रतिम
पोट्रेट... त्यांच्याशी बोलायचं विसरून मी चित्रं बघत सुटलो. कित्येक वर्षांची
इच्छा आज पूर्ण झाली होती. ते प्रत्यक्ष काम करतात ती जागा पाहिली. मोठाले
कॅनव्हास. काही भिंतीवर, एक जमिनीवर अंथरलेला. त्यावर काम
चालू होतं. रंगाचे डबे, ट्युबा, मोठाले
ब्रश, रोलर्स, कॅनव्हासेस, गुंडाळ्या केलेले, स्ट्रेच केलेले. वेगवेगळ्या
मालिकांमधली चित्रं.. जी आजवर कुठं मॅगझिनमध्ये, कॅटलॉगमध्ये
किंवा इंटरनेटवर पाहिलेली ती आता प्रत्यक्ष पाहत होतो. मग लक्ष त्या खिडकीसमोरच्या
गादीवर गेलं. ऐसपैस बैठक. बघूनच निवांत ङ्गील येतो. खिडकीतून दिसणारे पाम्स,
बांबू.. ‘स्टुडिओ’त अवचटांनी केलेला उल्लेख आठवला. भिंतीला टेकवलेले
कॅनव्हास पुढे करून चित्रं बघू लागलो. एका कोपर्यात छोटीशी जिम पण होती त्यांच्या
स्टुडिओत.
अवचटांनी काहीतरी विचारलं आणि मी भानावर आलो. मग सुरू
झाल्या गप्पा.
थोड्या वेळाने जेवण. तेही अप्रतिम.
मग पुन्हा थोडा वेळ गप्पा. म्हणजे खरं तर अवचटांचं
बोलणं ऐकत बसलो. मुळातच मी खूप कमी बोलणारा माणूस. पण काही गोष्टी मला विचारायच्या
होत्या त्यांना. त्या मी विचारत होतो. दुपारी जवळपास दोन अडीच तास तिथं होतो. मग
निघालो..
त्या वेळच्या जहाँगीरच्या प्रदर्शनातली ही एक खास
आठवण.
*
हायवेवर मी थांबलोय, त्यांची वाट
बघत. तिथल्या एका टपरीमधल्या बाकड्यावर. पाऊस थोडा थांबलाय आता. थोड्याच वेळात
पुण्याकडून येणारी कार रस्त्यापलीकडे येऊन थांबली. अचवट सर, सुहास
एकबोटे उतरले गाडीतून. मी बसलेलो त्या टपरीत आम्ही चहा प्यायलो. सर अगदी
नेहमीप्रमाणे प्रचंड उत्साहात सळसळत असलेले. त्यात त्यांचा आवडता पावसाळा. पाऊस
चालू झाला की त्यांना खूप आनंद होतो. दरवेळी फोनवर पावसाबद्दल बोलणं चालू असतं. मग
त्यात महाबळेश्वर-पाचगणीच्या खूप आठवणी सांगतात. तर या मोसमातल्या पावसाचा छान
सूर लागल्याचं बघून महाबळेश्वरला जायचं ठरलंय. चहा पिऊन निघालो पुढे. थोड्याच
अंतरावर चित्रकार मित्र संजय यमगरचा स्टुडिओ. तिथे अर्थातच थांबलो. दुपारभर त्या
ठिकाणी गप्पा, खाणं चाललेलं. पाऊस येत-जात होता. वेगवेगळ्या
क्षेत्रांतले मित्र हा सरांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे असं जाणवतं. तर,
तिथून महाबळेश्वरच्या दिशेने निघालो. पाऊस होताच साथीला.
पण का जायचं होतं महाबळेश्वरला? काम काहीच नाही. पाऊस अनुभवणं एवढा एकच उद्देश. त्या प्रवासात सरांनी
त्यांच्या कित्येक आठवणी सांगितल्या. त्या ऐकताना किती तरी नव्या गोष्टी कळत
होत्या. पावसातली झाडं, दर्यांमध्ये पडणारा बेभान पाऊस,
रस्ते, खूप वर्षांपूर्वी तर्कतीर्थांसोबत ते
चालत फिरायचे तो रस्ता. आणि त्यांना आठवलं ते प्राचीन मंदिर.. मग ते मंदिर शोधत
त्या पावसात निघालो. पाऊस अफाट. समोरचं काहीच नीट दिसेना. अशा माहोलमध्ये एक
पुरातन मंदिर शोधत आम्ही निघालो. सर्वत्र फक्त पाऊस, दुसरं
काही दिसेनासं, निर्मनुष्य. आता पुढे जाता येणं शक्यच नाही
असं दिसू लागलं. परत फिरलो. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये गाडी एका ठिकाणी लावली.
तशा पावसात त्या रस्त्यांवरून भिजत फिरलो. आरपार चिंब भाजून त्या पावसाचा अनुभव
घेतला. सरांसोबतचा तो प्रवास, तो पाऊस कायमचा लक्षात राहील.
पावसाळ्यात महाबळेश्वरच्या दिना हॉटेलवर राहण्याचा
त्यांचा शिरस्ता आहे. तिथे मनसोक्त राहायचं, भटकायचं, पाऊस अनुभवायचा. मन भरलं की परत स्टुडिओकडे... कदाचित हाही स्वत:चा शोध
घेण्याचाच त्यांचा मार्ग असावा. जसा त्यांच्या चित्रातली माणसं स्वत:चा शोध
घेतात...
पावसाने का धरून आणल्या आठवणी
ज्या मनात ठेवल्या चार...
हे त्यांनीच लिहिलंय. कदाचित या आठवणींसाठीसुद्धा ते
पावसाकडे जात असतील.
त्या दिवशी संध्याकाळी त्या इमारतीच्या दहाव्या
मजल्यावरच्या टेरेसवर आम्ही उभे होतो. हलकासा पाऊस काही वेळापूर्वी पडून गेला
होता. नेहमीप्रमाणे सरांचं बोलणं ऐकत होतो. अनेक विषय. कवितेचा विषय निघाला होता.
सर कवितेबद्दल बोलता बोलता एक कविता म्हणू लागले. काय अप्रतिम प्रसंग होता तो! दूर
तिकडे डोंगरातले दिवे दिसतायत. दहाव्या मजल्यावरची शांतता... आणि ती कविता. कविता
कशी ऐकवावी त्याचं उदाहरण मी अनुभवत होतो. सरांना असं कधीच अनुभवलं नव्हतं. नेहमी
सतत बोलणारे, मनात येईल ते बोलून टाकणारे, स्वभावातला रांगडेपणा या सगळ्यापेक्षा त्यांचं हे कविता ऐकवणारं रूप खूप
वेगळं होतं. एरवी सर्वत्र बोकाळलेल्या कवींना बेधडक शिव्या घालणारे सर त्यांच्या
आवडत्या कवींच्या कित्येक कविता स्वत:मध्ये जपून आहेत.
*
मागे पाहिलेली काळ्या रंगातली चित्रं आणि आत्ता ही
समोर आहेत ही रंगांची उधळण केलेली चित्रं. किती बेधडकपणे रंग वापरलेत! मोठमोठे
चेहरे,
मोठाल्या कॅनव्हासवर केलेली वारकरी चित्रमालिका, विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन झालेले वारकरी या चित्रांमधली कम्पोजिशन
त्यांच्या इतर चित्रांपेक्षा खूप वेगळी आहेत. खूप आकारांनी चित्रं बनत जातात इथे.
एखादी गोधडी जशी तुकडे-तुकडे जोडून बनते तसं काहीसं वाटतं. रंगही तसेच रसरशीतपणे
वापरलेले. त्या तुकड्यांमध्येच गुंफलेला वारकर्याचा चेहरा. इथेही डोळे मिटलेले.
त्या तुकड्या- तुकड्यांमधून निर्माण झालेलं दृक्चैतन्य केवळ अलौकिक. चित्रातले ते
वारकरी याच चैतन्याचा शोधात मैलोन्मैल चालत निघालेत. शतकांपासून ही परंपरा चालत
आलीय. अचवट सरांनी त्या परंपरेचा शोध घेतलाय या चित्रांमधून. त्यांना गवसलेलं ते
चैतन्यरूप कॅनव्हासवर मांडलं. त्या कॅनव्हाससमोर उभं राहिल्यावर त्या वारकर्याच्या
मनात निर्माण होत असलेली स्पंदनं आपल्याही मनात निर्माण होऊ लागतात. आपण त्या
चित्ररचनेत तल्लीन होऊन जातो. सरांच्या खंडाळ्याच्या स्टुडिओच्या त्या भारलेल्या
अवकाशात मी असाच तल्लीन होऊन ती चित्रं बघत होतो.
अवचटांच्या मुंबईतल्या स्टुडिओत आज पुन्हा एकदा
गेलेलो. इथं आलो की मला अवचटांचा तो किस्सा आठवतो. चॅपल विकत घेण्याचा.
स्टुडिओसाठी जागा शोधताना पौडजवळचं चॅपल दिसलं. त्यानं भुरळ पाडली. मग एक दिवस
तिथून जाताना गाडी थांबवून जवळ गेले ते, जुनाट, जिथं कुणीही फिरकत नाही असं ते चॅपल, दार उघडून
अवचट आत शिरतात. समोर दगडी लादी. दोन्ही बाजूला उंच कमानीतली तावदानं, गोल खिडकीतून येणारा प्रकाश. उंचच उंच निमुळतं गॉथिक चर्च. त्यात ते एकच
बाकडं. अवचट बाकड्यावर बसतात. त्यांच्यासमोर एक छोटीशीच ‘स्पेस’. तिला सांभाळत हे
निमुळतं उंच गॉथिक चर्च. बसल्या बसल्या अचवट चित्रातल्या कल्पनेत जावं तसे त्या
‘स्पेस’मध्ये जातात.
चॅपलमध्ये मेणबत्त्या पेटवल्या आहेत. भिंतीवर
चित्रांमध्ये लांब लाकडी टेबल ठेवलंय. त्यावर वाइन बॉटल्स, ग्लासेस लाकडी प्लेट्समध्ये चित्र. मेणबत्त्यांच्या हलत्या प्रकाशात ते चॅपलही
गुणगुणत आहे. थोड्या वेळात त्या उंच दरवाजातून सारे मित्र आत येतील, ऑर्गनचे सूर पसरतील आणि माझ्या प्रदर्शनाची सुरुवात होईल.
आणि अवचट भानावर येतात. कल्पनाविलासातून बाहेर पडतात.
त्या समोरच्या ‘स्पेस’मध्ये एक ‘जुना वेळ’ अनुभवला त्यांनी. काहीतरी वेगळंच व्हायब्रेशन
घेऊन ते बाहेर पडले. मनात हे ठरवूनच की हे चॅपल विकत घ्यायचं. या त्यांच्या
निर्णयाला त्यांचे मित्र नेहमीप्रमाणे हसले होते. पण मला हसू अजिबात येत नाही या
गोष्टीचं. मीही अनेकदा अशा कल्पना करून बघितल्या आहेत. अशा काही जागा असतात तिथं
गेल्यावर मनात इच्छा निर्माण होते. इथं बसून चित्रं काढावीत. किंवा इथंच प्रदर्शन
भरवावं.
पण अवचटांचं चॅपल्सच आकर्षण त्यांच्या चित्रांमधूनही
दिसून आलेलं आहे. अनेक अप्रतिम चित्र त्यांनी चर्चेसची केली आहेत. अगदी या पौडच्या
चॅपल्च चित्रही यांनी या प्रसंगाची आठवण म्हणून केलं.
मागे त्यांच्या खंडाळ्याच्या स्टुडिओत गेलो होतो.
संध्याकाळी बाहेर पडलो चालत, तर स्टुडिओच्या अगदी जवळच एक
जुनं चर्च दिसलं. इथेही अवचटांनी चर्चच्या जवळच स्टुडिओ उभारलाय तर! आणि स्टुडिओत
एक लांब रुंद लाकडी भक्कम टेबल होतं. ते बघून त्यांनी त्या पौडच्या चॅपल्मध्ये
कल्पनेत बघितलेलं लांब लाकडी टेबल आठवलं. त्या लाकडी टेबलाशी बसलो. आसपास भिंतीवर
लटकलेली मोठमोठी चित्रं आणि त्या स्टुडिओतली ती ‘स्पेस’ मला दूर त्या पौडच्या
चॅपेलमध्ये घेऊन गेली.
अवचटांची चित्रंही अनुभूती देणारी चित्रं आहेत. उगीच
काहीतरी वैचारिक बौद्धिक आव त्यांच्या चित्रांत नसतो. ती भाव प्रकट करणारी चित्रं
वाटतात. नावीन्यासाठी चित्रांच्या घटकांमध्ये आकारांमध्ये, ङ्गिगर्समध्ये मोडतोड करण्याची त्यांना गरज वाटत नाही, असं दिसतंय. आकारांमधलं सौंेदर्यतत्त्व त्यांनी अखंड जपलेलं दिसतं. मग ते
अमूर्त आकार असोत, फीगरेटीव्ह चित्रं असोत किंवा
रेखाचित्रं. त्यांच्या चित्रात रंगाची जादू अनुभवायला मिळते. त्याबद्दल अवचट
सांगतात, ती ओतूर, जिथं त्यांचं बालपण
गेलं. तिथल्या काही गोष्टी नेणिवेत राहिल्या. त्यात रंग होते. डीप येलो
युरासनीच्या शेतांचा, मातीच्या ढेकळांचा व्हॅन डाईक ब्राऊन,
डोंगर टेकड्यांमधले अप्रतिम रंग, अल्ट्रामरिन
ब्ल्यू रंगाचे डोंगर, जंगलातले अनेक रंग. हे रंग सातत्याने
त्यांच्या चित्रांत येतात. चित्रातल्या मानवाकृतीच्या चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स
आणि त्या त्या मानवाकृतींची बॉडी लँग्वेज्, पोश्चर यातल्या
नेमकेपणातून त्यांना अपेक्षित तो आशय ते व्यक्त करू शकतात हे मला त्यांचं खूप मोठं
वैशिष्ट्य वाटतं. ह्यूमन ङ्गिगर्सच्या रेखांकनावर त्यांची हुकमत त्यावरून दिसते.
दुसरं म्हणजे त्यांच्या अनेक चित्रांत मानवाकृती आणि पूर्ण अमूर्त आकारांची रचना
यांचा एक सुसंवाद दिसतो. यांच्या एकत्रित परिणामातून चित्रात वेगळी मिती निर्माण
होते. त्यांच्या चित्रातला सोनेरी रंग- यासाठी ती चित्रं प्रत्यक्षच पाहिली
पाहिजेत. मगच त्या गोल्डन ग्लोची खरी झळाळी अनुभवता येईल. अशा रितीने गोल्डन कलर
क्वचितच कोणी वापरताना दिसतो.
मोठमोठे कॅनव्हास ज्या सहजतेने त्यांनी चितारलेत
त्यासाठी चित्रकलेच्या तांत्रिक बाबी तर महत्त्वाच्या ठरतातच. शिवाय त्या
चित्रकाराची शारीरिक तंदुरुस्तीही महत्त्वाची असते. अवचटांच्या स्टुडिओत जिम आणि
व्यायामाची असणारी साधनं बघून त्याचं महत्त्व पटतं. रोज सकाळी ठराविक वेळी त्यांचा
ट्रेनर येत असतो, मग पद्धतशीर व्यायाम वगैरे.
*
अवचट सरांची हमालांची काही चित्रं बघत होतो. अगदी
सुरुवातीच्या काळातली ही चित्रं. अलीकडची त्यांची चित्रं आणि ही चित्रं एकत्र
बघताना त्यांच्या कामात होत आलेला बदल स्पष्ट दिसतो. पुण्यात अगदी सुरुवातीच्या
काळात ते ज्या लोकांमध्ये वावरत होते, ते म्हणजे साधना
परिवारातले लोक. यदुनाथ थत्ते, ग. प्र. प्रधान, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी अशा सर्वांकडून त्यांना
खूप काही शिकायला मिळालं. शिवाय त्या वेळी पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या निमित्ताने
खूप वाचन व्हायचं. साहित्यिकांशी संबंध यायचा. साहित्यातही नवविचारांचं वारं वाहत
होतं. तेंडुलकर, ढसाळ, नारायण सुर्वे,
ग्रेस, जीए, दलित
साहित्य अशा अनेक प्रकारच्या नवीन बदलांशी संबंध आला. हे नव्या जाणिवांचं साहित्य
चित्रभाषेत मांडण्याचं आव्हान होतं. अशा सर्व लोकांच्या लिखाणाला न्याय देणार्या
दृक् प्रतिमा शोधणं गरजेचं होतं. या सर्वांचा परिणाम, त्या
काळात होत असलेल्या चळवळींचा प्रभाव, सिनेमांमध्ये होत
असलेले बदल, या सर्वांमधून अवचटांच्या चित्रांमधेही तो नवा अॅप्रोच
दिसू लागला. त्यांची चित्रंही त्यांच्या समकालीन लेखक, दिग्दर्शक,
कवी यांच्या अभिव्यक्तीला समांतर जाऊ लागली.
ज्या लोकांशी त्यांचा सतत संपर्क येत राहिला ते लोक
त्यांचं विश्व, त्यांचं जगणं अवचटांच्या चित्रात येऊ लागलं.
हमालांच्या त्यांच्या चित्रांची खूप चर्चा झाली. त्यापूर्वी कधीही असा विषय घेऊन
कुणी चित्रं काढली नव्हती. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्या वेळचे त्यांचे
चित्रविषय जरी बघितले तरी ही गोष्ट लक्षात येते. रेल्वे स्टेशनावरचे हमाल, मुळशीचे शेतकरी, प्रिंटिंग प्रेसशी त्यांचा सततचा
संपर्क होता तिथले कामगार, अशा वर्गाचं चित्रण कुणा
चित्रकाराला करावंसं वाटणं हे चित्रकलेत नवंच होतं.
हमालांचं ते चित्र मी पुन्हा पुन्हा पाहतो.
तुम्ही पाहिलंय का कधी?
रेल्वे स्टेशनावरच्या या हमालांकडे कधी पाहिलं नसेल, तर क्षणभर थांबून अवचवटांच्या चित्रांमधले हमाल बघा. तुम्हाला त्यांचं
जगणं कळेल.
ते बघा ते पाच-सहा जण.
नीट बघा त्यांच्याकडे.
ते सगळे उजवीकडे का बघतायत?
ते त्यांच्या चेहर्यावरचे भाव सांगतील तुम्हाला.
त्यांच्या डोळ्यांत बघाल तर वाचू शकाल सहजच.
रात्रीच्या भाकरीची चिंता.
चित्रात दिसत नाहीये, पण मला ऐकू
येतेय स्पष्ट
उजवीकडून स्टेशनात येणार्या रेल्वेची धडधड.
तुम्हालाही ऐकू येईल.
कितीजण उतरतील, किती ओझं असेल,
कुणाला उचलायला मिळेल...
आपल्याला ते ओझं उचलायला मिळेल का
याची आस प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसेल.
अवचटांच्या कॅनव्हासवर...
आपल्या सभोवतालच्या जगाचा शोध कलावंत घेतोच.
त्याचबरोबर समांतरपणे तो स्वत:च्या अंतर्मनाचाही शोध निरंतर घेत असतो. अवचटांच्या
चित्रांमध्ये पुढे बाह्य जगाच्या शोधाकडून त्यांच्या आतल्या आवाजाचा शोध येत
गेलेला दिसतो. त्यांच्या चित्रांमधल्या प्रतिमा बदलत गेल्या, पोत बदलले, रंग लावण्याची पद्धत बदलली. अधिकाधिक
अमूर्ततेकडे चित्रं झुकली.
*
गॅलरीमध्ये उभा आहे मी. सभोवती चित्रं मोठमोठी.
शांतपणे चित्रं बघत पुढे सरकतोय मी. रंग माझा ठाव घेतायत. रंगाच्या पारदर्शक
ठिपक्यांमधून उमटणार्या अमूर्त प्रतिमांमधे मला झाडांचा भास होतोय. त्या
कॅनव्हासच्या पृष्ठभागावर तो जो पोत माझ्या डोळ्यांनी मी महसूस करतोय, त्यातून माझ्या मनात गूढ निर्माण होतेय. जसंजसं चित्रं बघत पुढे सरकतोय,
मी खोल उतरत निघालोय त्या शांततेत. जसं एखाद्या जंगलात आत आत
शिरतोय. चकवा देतंय का काही माझ्या नजरेला? मी शोधत राहतो.
काय होतं ते? हरीण? की भास होता सोनेरी
हरणाचा... काही माणसंही त्या झाडांजवळ दिसतायत. ती माणसंही झाडांशी एकरूप झालेली
आहेत. विरघळून गेली आहेत जंगलात. त्यांचं अस्तित्व विसरून त्या जंगलाच्या प्रगाढ
शांत गर्भात. कदाचित त्यांना सापडलेलं दिसतंय, ज्या कशाच्या
शोधात इतक्या गर्द जंगलात ते आलेत. स्वत:चा शोध घ्यायचा तर जंगलाकडे जा, असं म्हटलं जातं. तो अनुभव या चित्रांमधून येतोय.
आणि जाणवत राहतं चित्रकार सुभाष अवचट शोध घेतायत
स्वत:चा. शोध घेत ते जंगलाकडे आलेत. या देवराईत त्यांना काही सापडलंय.
यापूर्वीच्या त्यांच्या ‘इन सर्च’ किंवा परंपरांचा शोध घेणार्या मालिकांचा हा
पुढचा भाग म्हणता येईल. मात्र, या चित्रांमधला आशय त्यांना
अमूर्ततेकडे घेऊन गेला आहे. त्या अमूर्ततेतून गॅलरीच्या अवकाशात पसरलेली आहे गूढ
शांतता. पुन्हा पुन्हा बघत राहितो ती चित्रं.
काही वेळाने बाहेर पडून मुंबईच्या गर्दीत सामावलो, पण मनात ती देवराई घुमत होती.
*
चित्रं होतात, एकामागे एक अनेक.
प्रदर्शनं होतात त्यांची मग.
लोक बघतात चित्रं. चर्चा होते, कौतुक होतं, जे काय व्हायचं ते होतं...
इकडे चित्रकाराला छळू लागतो असह्य रितेपणा..
ही जीवघेणी तगमग अटळ त्याच्यासाठी
तडफड होते अक्षरश:
पुन्हा एकदा स्वत:ला सावरून नव्याने शोध...
आधी सापडलेलं सगळं निदर्यपणे झटकून
नव्या वाटेवर नव्याने प्रवास...
ती वाट सापडणं त्या कलावंताच्या चिवटपणाची कसोटी
दरवेळी स्वत:ला विसर्जित करून नव्याने रचायचं...
घाबरतात काही, थकतात, जुन्याच वाटेवर घुटमळतात
धीर ठेवून शोध घेणार्यांना कधी तरी अचानक काही नवं
गवसतं.
उजळून जातं कलावंताचं मन, जश्न चालू होतो नवनिर्मितीचा...
चित्रकार म्हणतो, या वेळेपुरता तरी
सुटलो..
अन्वर हुसेन
९८५०९६५३८३
.
लहानपणापासून हा चित्रकार खूप उत्सुकता निर्माण करीत आला आहे.
उत्तर द्याहटवातुमच्या या लिहिण्याने त्यांना आणि त्यांच्या चित्रांना जवळून पाहिल्यासारखं वाटलं.
खूप सुंदर भावना आणि वातावरण निर्माण झालं. तुमचा जिव्हाळा वेडं करून जातो.
देवराई प्रदर्शन बघता आले. अप्रतिम मंत्रमुग्ध करणारे प्रदर्शन. खूप छान लेख लिहिलाय तुम्ही .
उत्तर द्याहटवाखूपच छान आठवणी सांगितल्या आहेत तुम्ही. मुख्यतः चित्रकाराचे व्यक्तित्व नेमकं टिपलंय.या चित्रकाराविषयी माझंही आकर्षण ग्रेसांच्या पुस्तकांची चित्रं पाहून आणि 'स्टुडिओ' वाचून.अत्यंत मनस्वी चित्रकार.
उत्तर द्याहटवालेखही फार आवडला. चित्र ताबडतोब दिसतं, लेख वाचल्याशिवाय दिसत नाही. व्हायब्रेशन, ब्राउनिश, स्पेस, जिम, डीप येलो ना मराठी शब्द नसावेत किंवा इंग्रजी शब्दांनी मराठी लेखांचं महत्व वाढत असावं. किंवा नेहमीच्या बोलण्यातले असल्यामुळे ते मराठीहून अगदी उचित वाटत असावेत. मात्र, मराठी वाचणाऱ्याना इंग्रजीचं शिक्षण असायला हवं या काळात!
उत्तर द्याहटवा