१२७ तासांची झुंज - गौरी कानेटकर । अनुभव जुलै २०१८
अॅरन रॅल्स्टन हा भटका गिरिप्रेमी एके दिवशी कल्पनातीत संकटात सापडतो आणि त्याच्यासमोर उभे ठाकतात काही जीवघेणे प्रश्न. अमेरिकेतल्या एका कॅनियनच्या घळीत १२७ तासांची एकाकी झुंज देत मृत्यूला भेटून आलेल्या अॅरनची गोष्ट ऐका-वाचायलाही हिंमत हवी.
कॅनियनलँड्स नॅशनल पार्क हे अमेरिकेतल्या अतिशय भव्य आणि सुंदर ठिकाणांपैकी एक मानलं जातं. शेकडो एकरांवर पसरलेली लालसर खडकांची जमीन आणि त्यात पाताळात घेऊन जाणार्या घळी. या घळींमध्ये उतरताना थोड्या वेळातच अॅरनची तंद्री लागते. सगळं जग मागे पडतं. आई-वडील, घर, काम, मित्र, थोड्या वेळापूर्वी भेटलेल्या भटक्या मुली.. सगळं सगळं. या एकतानतेच्या ओढीनेच तर तो दर्याखोर्यांमध्ये भटकत असतो.
घळ अतिशय निरुंद असते. एका वेळी दोन किंवा कधी कधी एखादाच माणूस मावेल एवढीच जागा. एके ठिकाणी अॅरनला बस टायरच्या आकाराचा एक भला मोठा दगड घळीत अडकून राहिलेला दिसतो. घळीच्या पायथ्याशी उतरण्यासाठी पायरी म्हणून वापर करायला हा दगड त्याला चांगला वाटतो. तो दगड डळमळीत नाही ना याची तो आधी चाचपणी करतो आणि खात्री पटल्यावर त्या दगडावर ओणवा होऊन एखाद्या छतावरून उतरल्यासारखा खाली उतरू लागतो.
तेवढ्यात ते घडतं.. अॅरन दगडावरून खाली जात असतानाच दगड जागचा हलतो आणि अॅरनसोबतच तो खाली कोसळू लागतो. काय होतंय ते कळल्यावर अॅरन प्रतिक्षिप्त क्रियेतून त्या दगडापासून दूर जायचा प्रयत्न करतो. त्यामुळे दगड त्याच्या डोक्यावर कोसळण्यापासून वाचतो खरा, पण अॅरनचा उजवा हात दगड आणि घळीच्या भिंतीमध्ये अडकतो.
या धक्क्यामुळे अॅरन पूर्ण बधिर होऊन जातो. त्याची पहिली प्रतिक्रिया जे झालं ते नाकारण्याची असते. ‘हे खरं नाही. असं घडणं शक्य नाही. हे नक्कीच एखादं वाईट स्वप्न असणार. पण तसं असेल तरी फारच वाईट आहे ते..’ पण जेव्हा त्याला कळतं की हे स्वप्न नाही, तेव्हा बधिरतेचं रूपांतर पॅनिकमध्ये होतं. त्याचं शरीर सगळा जोर लावून अडकलेला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं, पण हात जागचा हलत नाही. उलट, अॅरनच्या धडपडीमुळे दगड आणखी घट्ट बसतो. मनगटापासून डोक्यापर्यंत एकच कळ जाते. त्याच्या लक्षात येतं, की आपल्या वजनाच्या चौपट-पाचपट असणार्या या दगडाने आपल्याला पूर्ण अडकवून टाकलं आहे. कुणाच्या तरी मदतीशिवाय इथून हलणं अशक्य आहे. तरीही वेगवेगळ्या ठिकाणांहून जोर लावून दगड हलतो का किंवा दगडाच्या तावडीतून हात सोडवता येतो का हे बघण्याचा तो प्रयत्न करत राहतो, पण व्यर्थ. सुदैवाने त्याच्या हातातून रक्तस्राव होत नाही आणि आश्चर्य म्हणजे वेदनाही असह्य नसतात. कदाचित मानसिक धक्क्यामुळे त्याला त्या जाणवत नसतात.
दहा-पंधरा मिनिटांनी अॅरन या धक्क्यातून थोडा सावरतो. या अपघातात आणखी काय काय झालंय हे तो बघायला लागतो. त्याचा डावा पाय आणि डावा हात सोलवटून निघालेला असतो. डावा हात सुजायलाही लागलेला असतो. सगळं अंग घामाने निथळत असतं. पुढचा काहीही विचार करण्याआधी पाणी प्यायला हवं, अशा जाणिवेतून पाठीवर लटकणार्या पाण्याच्या पिशवीची नळी तो तोंडात घालतो, तर लक्षात येतं, या गोंधळात ती पिशवी फाटून सगळं पाणी सांडून गेलं आहे. सॅकमध्ये पाण्याची आणखी एक बाटली असते. पण एक हात अडकलेला असताना सॅक काढायची कशी? हातातलं बाकीचं सामान अॅरन दगडावर काढून ठेवतो आणि सॅकचे पट्टे सोडवून त्यातली पाण्याची बाटली बाहेर काढतो. आपण काय करतोय हे लक्षात येण्याआधी बाटलीतलं जवळपास निम्मं पाणी त्याने पिऊन टाकलेलं असतं. आपली सुटका कधी होईल माहिती नाही, तोवर आपल्याला आहे ते पाणी पुरवायला हवं, हे लक्षात आल्यावर तो स्वतःवरच चरफडतो. ‘अॅरन, हा काही साधासुधा अपघात नव्हे. तू अशा ठिकाणी अडकला आहेस की जिथे कोणीही इतक्यात कडमडेल अशी शक्यता नाहीये. तुझ्या जिवावर बेतलं आहे. लक्षात घे, जीवावर! जपून वाग..’ असं तो सतत स्वतःला सांगत राहतो.
त्याचं म्हणणं खरंच असतं. कॅनियनलँड्स पार्कमध्ये येणार्यांची संख्या तशी फारशी नसते. त्यातल्या नेमक्या ब्ल्यू जॉन कॅनियनमध्ये आणि त्यातूनही तो अडकलेल्या भागात कोणी येईल ही शक्यता फारच धूसर असते. एवढंच काय, त्याच्या लक्षात येतं, की आपण कुठे चाललो आहोत हे या वेळी आपण कुणालाच सांगितलेलं नाही. एकट्याने फिरायला जाण्याआधी आपल्या प्रवासाचे सगळे तपशील कुणा ना कुणाला सांगून जायला हवेत, हा मूलभूत नियम न पाळण्याची घोडचूक त्याने केलेली असते...
• • • • •
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा