दारूचं मृत्युतांडव - हेरंब कुलकर्णी । अनुभव जुलै २०१८













शहरी भागातील अनेकांना दारूबंदी हा व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडलेला मुद्दा वाटतो; पण गरीब कुटुंबांमध्ये दारू किती थैमान घालते याची त्यांना क्वचितच कल्पना असते. ग्रामीण भागात फिरताना दारूचं हे मृत्युतांडव पदोपदी सामोरं येतं आणि आपल्याला सुन्न करून जातं.

• नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये एस.टी.स्टँडला लागूनच एक दलित वस्ती आहे. एका बाजूला बौद्धांची घरं आहेत आणि दुसर्‍या बाजूला अण्णाभाऊ साठे नगरात मातंगांची २५० घरं आहेत. इथले बहुतेकजण जुन्या काळात आंध्र प्रदेशातून आलेले आहेत. या वस्तीत फक्त १० जणांकडे जमिनी आहेत, उरलेले भूमिहीन आहेत. भूमिहीनांपैकी किमान १०० जण शेतमजुरी करतात, पाचजण भाजीपाला विक्री करतात. कुणी सफाई कामगार आहेत. कुणी रोजमजुरीवर जगतात. इतकं कष्ट करणारी ही माणसं, पण त्यांच्या कष्टांना दारूचा शाप आहे.
दारूमुळे या दलित वस्तीत गेल्या १० वर्षांत एकूण ५४ लोकांचे मृत्यू झाले आहेत. वस्तीच्या मधोमध देशी दारूचं दुकान आहे. इतके मृत्यू होऊनही हे दुकान मात्र बंद झालेलं नाही. वस्तीतला एक कार्यकर्ता डॉ. अशोक बेलखोडे यांच्याकडे काम करतो. त्याने या सर्व मृतांच्या नीट नोंदी ठेवल्या आहेत. त्यातील बहुतेक मृत वयाने तरुण आहेत. त्यातील काहींच्या घरी गेलो. सगळ्यांची घरं अंधारी होती. घरात मोजकंच सामान. घरांतल्या लहान लहान मुलांना आपले वडील कशाने गेले हे नेमकं माहिती नव्हतं. त्यांच्या आयांच्या चेहर्‍यांवर एक करुण वेदना होती. त्या सर्व महिला आता मजुरीला जातात असं कळलं. त्या फार काही बोलत नव्हत्या. बहुतेकींचे नवरे शेवटी अनेक दिवस दवाखान्यात भरती होते. त्यांच्या उपचारांमुळे आता त्यांच्या डोक्यावर कर्ज झालेलं होतं. संसाराचा गाडा ओढत त्यांना ते कर्जही फेडायचं होतं. एक घर तर थेट त्या दारूच्या दुकानासमोर होतं. मला त्या दुकानाचा फोटो काढायचा होता. मी फोटो काढू लागताच बाई घाबरली. ज्या दुकानाने तिचा नवरा मारला होता त्या दुकानाविरुद्ध अजूनही तिच्या मनात भीतीच होती. या ५४ विधवा जरी दुकानावर चालून गेल्या असत्या तरी त्यांना ते दुकान बंद पाडता आलं असतं; पण हा लढा लढण्याचं धाडस कुणाकडेच नव्हतं. आम्ही गेलो तेव्हा दारूच्या व्यसनामुळेच १० जण गंभीर आजारी होते. त्यांच्यापैकी आज कितीजण जिवंत असतील...? दारूच्या महसुलाचं समर्थन करणारं सरकार आणि तथाकथित दारूप्रेमी व्यक्तिस्वातंत्र्यवादी एकदा या वस्तीला भेट देतील का?

राजकारण गावाला कसं दारूबाज बनवतं हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात बघितलं. या गावाने १९९२ साली दारूबंदी केली. गावात जो दारू पिताना सापडेल त्याच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचं गावकर्‍यांनी ठरवलं. गेली २५ वर्षं हे सुरू होतं. आजवर गावात जवळपास सहा लाख रुपये दंड जमा करण्यात आला आहे. त्या पैशांतून गावात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पण एकदा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांदरम्यान पुढार्‍यांनी गावच्या तरुण मुलांना दारू पाजायला सुरुवात केली. हळूहळू गावात दारू वाढली. निवडणूक संपली. आज गावात चार ठिकाणी दारू विकली जाते आहे. नेत्यांनीच दारू पाजायला सुरुवात केल्यामुळे आता तक्रार तरी कुणाकडे करायची? आता कुणी आधीसारखा दंडही भरत नाही. २५ वर्षांत गावाने जे कमावलं ते एका निवडणुकीने धुळीला मिळवलं.

...गरिबांची दारू आणि श्रीमंताची दारू दोन्ही वेगवेगळ्या आहेत. शेरोशायरीत येणारी दारू आणि दिवसभर दगड फोडून संध्याकाळी प्यायलेली दारू यांच्यात काहीही साम्य नाही. प्रेयसीसोबत प्यायलेली दारू आणि बायकोला लाथा घालणारी दारू यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही.

• • • • •
संपूर्ण लेख वाचा अनुभव जुलै २०१८ अंकात! 


• जुलै २०१८ ई-अंक - किंमत फक्त ₹३० • अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८