नैननची (चित्र)भाषा - मुकेश माचकर । अनुभव जुलै २०१८
















• नीतीश कुमारांनी बिहारमध्ये दारूबंदी जाहीर केली तेव्हाची गोष्ट. अजित नैनन (उच्चारी नायनन) यांनी या निर्णयावर भाष्य करणारं व्यंगचित्र तयार केलं आणि संपादक मंडळाकडे पाठवून दिलं. नैनन यांनी या व्यंगचित्रात एका पालखीसारख्या उच्चासनात बसून दारूच्या बाटल्या इतस्ततः फेकणारे नितीश कुमार चित्रित केले होते. ते पाहणारा एक माणूस दुसर्‍याला सांगत होता, ‘ही इज ड्रंक ऑन पॉवर...’ (यांना सत्तेची नशा चढली आहे).
हे व्यंगचित्र नितीश यांच्या दारूबंदीमागच्या सगळ्या तथाकथित उदात्त हेतूंना सुरुंग लावणारं होतं. ते संपादक मंडळाने नाकारलं. रात्री नऊ वाजता हा निर्णय समजल्यानंतर नैनन यांनी बराच विचार केला आणि दोन तासांनी त्या वाक्यात छोटासा बदल सुचवला, ‘ही इज हाय ऑन पॉवर...’ अर्थ तोच राहिला पण मजा निघून गेली. ‘ड्रंक’मधून जो थेट डंख मारला जात होता तो निघून गेला.
नैनन यांनी हे मान्य केलं.
ते संपादक मंडळाचा अधिकार मान्य करणारे व्यंगचित्रकार आहेत. व्यंगचित्रकारांनी एका अदृश्य लक्ष्मणरेषेच्या आत राहायचं असतं. त्यांची एखादी प्रक्षोभक कृती सगळ्याच व्यंगचित्रकारांवर परिणाम घडवून आणणारी असते असं ते मानतात. ही लक्ष्मणरेषा व्यंगचित्रकाराच्या मनात असतेच; पण आपल्या सदसद्विवेकबुद्धीलाच प्रमाण मानण्याचा बाणा ते दाखवत नाहीत. वर्तमानपत्राच्या व्यापक धोरणातला संपादक मंडळाचा किंवा संपादकाचा अधिकार त्यांना मान्य आहे.
...त्यांच्या बाबतीत ‘लक्ष्मण’रेषा या शब्दाला एक वेगळी छटाही प्राप्त होते. भारतीय व्यंगचित्रकलेचे भीष्म पितामह मानल्या जाणार्‍या आर. के. लक्ष्मण यांनी जिथे दीर्घकाळ कारकीर्द गाजवली त्या टाइम्स ऑफ इंडियाचे ते मुख्य रेखाटन सल्लागार आहेत. लक्ष्मण हे वादग्रस्तता टाळणारे, मवाळ आणि नेमस्त व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जात. नैननही समकालीन व्यंगचित्रकारांच्या मानाने अलीकडच्या पिढीतले असल्याने (आता त्यांचं वय ६३ असेल) त्या परंपरेची लक्ष्मणरेषा मानणारे व्यंगचित्रकार आहेत. आपलं वर्तमानपत्र आता अतिशय ‘मनी माइंडेड’ झालं आहे, असं ते मुलाखतीत सांगून टाकतात थेट. व्यंगचित्रकाराचं पहिल्या पानावरचं स्थान काढून घेण्यात आलं, कार्टून आत ढकललं गेलं, त्याची जागा कमी झाली याचं त्यांना वैषम्य वाटतं. ते तसं बोलूनही दाखवतात. मात्र, या मर्यादा उल्लंघून त्यांनी नव्या वाटा धुंडाळलेल्या नाहीत.
काही राष्ट्रीय प्रतीकं, नकाशा, संकल्पना, स्त्रिया, राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांची थट्टा उडवणारी व्यंगचित्रं काढू नयेत, असा एक संकेत व्यंगचित्रकारांमध्ये आहे आणि मी तो पाळतो, असं ते सांगतात. खासकरून सामाजिक विषयावर भाष्य करणारी व्यंगचित्रं काढताना ते अधिक काळजी घेतात. कधी कोणाच्या भावना दुखावतील ते सांगता येत नाही, हा धडा त्यांना अनुभवातूनच मिळाला आहे. एकदा त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना पोपच्या वेषात दाखवलं होतं आणि त्यांच्या काळ्या मेंढ्यांच्या कळपातून एक पांढरी मेंढी (विश्वनाथ प्रताप सिंग) कुंपणावरून उडी मारून बाहेर जात असल्याचं चित्र रेखाटलं होतं. पोपच्या अंगरख्यावरच्या क्रॉसच्या जागी काँग्रेसचा पंजा होता. एका ख्रिस्ती महिलेने भावना दुखावल्याची तक्रार केली.
नंतर त्यांनी देशभरात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे हे दाखवण्यासाठी देशाच्या नकाशाचं रूपांतर गणपतीच्या चेहर्‍यामध्ये केलं होतं. त्याची सोंड मोदकांऐवजी नोटांच्या थप्प्या उचलून तोंडात भरत होती. या वेळीही धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार झाली...
...दोन्ही वेळा नैनन यांना माफी मागावी लागली होती. तेव्हापासून त्यांनी कानाला खडा लावला असण्याची शक्यता आहे.

भारतातील सर्वाधिक आदरणीय राजकीय व्यंगचित्रकार आणि देशातल्या सर्वांत लोकप्रिय व्यंगचित्रकारांपैकी एक असलेल्या नैनन यांना ही अभिधानं कमावण्यासाठी अभिव्यक्तीला काही कुंपणं घालावी लागली आहेत. त्यांची व्यंगचित्रं त्यांच्या ‘विषयां’च्या डोक्यात सोटा हाणत नाहीत, गुदगुल्या करतात... त्यांनाही आणि वाचकांनाही. या गुदगुल्याही अस्वलाच्या, रक्त काढणार्‍या गुदगुल्या नाहीत.
नैनन यांचे काका अबू अब्राहम हे त्यांच्या काळातले एक गाजलेले व्यंगचित्रकार होते. राष्ट्रीय पातळीवर त्यांचा दबदबा होता. आणीबाणीच्या काळात ते खासदारही होते आणि सेन्सॉरशिपचा बोलबाला असताना त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती न्हाणीघरात अध्यादेशांच्या चळतीवर सह्या करतायत असं व्यंगचित्र काढलं होतं. नैनन हे हैदराबादेत जन्मलेले मूळ मल्याळी. अबू यांच्यामुळे त्यांना व्यंगचित्रकलेचा वारसा घराण्यातूनच मिळाला हे खरंच आहे; पण त्याला घरातून उत्तेजन नव्हतं. नैनन यांना हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये शिकतानाच रेखाटनाचा नाद लागला होता. शाळेच्या लायब्ररीत घुसून ते पंच आणि न्यूयॉर्करची कार्टून्स पाहायचे. जेम्स थर्बर आणि अरनॉल्ड रॉथ हे त्यांचे लाडके व्यंगचित्रकार. होस्टेलमध्ये राहताना त्यांनी अनेक अ‍ॅनिमेशन फिल्म्सही पाहिल्या. घरी गुपचूप स्केचबुकात मशिन आणि टर्बाइन्सची स्केचेस बनवण्याचा भरपूर सराव त्यांनी केला. ही स्केचेस उशीखाली दडवून ठेवायची आणि अबू अब्राहमकाका कधी घरी आले की त्यांना दाखवायची, हा नैनन यांचा शिरस्ता होता. या मशिन ड्रॉइंग्जमुळे ते मेकॅनिकल इंजिनियर बनतील अशी घरातल्यांना आशा होती. पण गणिताने दगा दिला आणि मशिन ड्रॉइंगची प्रॅक्टिस नैनन यांना डिटेक्टिव्ह मूछवाला या त्यांच्या अतिशय गाजलेल्या व्यक्तिरेखेसाठी आधुनिक गॅजेट्स रेखाटताना कामी आली.

• • • • •

संपूर्ण लेख वाचा अनुभव जुलै २०१८ अंकात! 


• जुलै २०१८ ई-अंक - किंमत फक्त ₹३० • अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८