ते गाव... - अन्वर हुसेन - कॅन्व्हासमागचे रंग । अनुभव ऑगस्ट २०१८




• या गावाला... गाव म्हणावं का शहर? तसं म्हणतात सगळे शहरच. पण शहर म्हटलं तर उगीचच थोडं दूरचं वाटतंय. गाव आपलं वाटतंय. तशी गर्दी वाढलीय. एकूण अवकाश विस्तारलंय. त्या अवकाशात नव्या आकारांची, रंगांची भर पडलीय. आकारांची गर्दी जाणवतेय; पण ते आकार या गावाच्या अवकाशाच्या परिघात माझं लक्ष वेधून घेत नाहीत. ते आकार काहीसे सपाट, नीरस वाटतात. ती नव्याने तयार झालेली दृश्यं इतर शेकडो शहरांतल्या दृश्यांसारखीच दिसतात. तरीही का येतो मी इथे पुन्हा पुन्हा?... का इतका गुंतलोय मी या गावात?... का इथली दृश्यं मला सतत आठवत राहतात? ... का इथल्या त्या रस्त्यांवरून मला उगीचच चालत फिरावंसं वाटतं?... का पुन्हा पुन्हा हे गाव माझ्या चित्रांत येतं? ... तर त्यामागे अनेक प्रतिमा, दृश्यं, आठवणी आहेत या गावात गुंतलेल्या... या सपाट बनत निघालेल्या शहरात एक पुरातन गाव अजूनही अस्तित्वात आहे. पुरातन गावं अनेक असतील; पण या गावच्या पुरातनपणाला अनेक चेहरे आहेत. इथल्या पुरातनपणाला स्वर आहे. वर्षानुवर्षं न बदललेली चव इथे आहे. एकसुरी दृश्यात्मकतेपासून दूर, मागे राहिलेल्या अनेक प्रतिमा आहेत. दर्ग्याच्या मधल्या आवारात निखार्‍यांवर चढवलेल्या लोबानचा दरवळ इथल्या हवेत आहे. तो संगीतरत्न इथल्याच मातीत ‘सुपुर्दे ख़ाक’ झालाय. त्याचा अलौकिक स्वर या गावातल्या हवेत अजूनही मी ऐकू शकतो. या गावात सडेफटिंग तरुण आहेत, दिवस-दिवस कबुतरांच्या नादात गुंगलेले. कसबी कारागीर आहेत.
या गावातल्या लोकांना गाण्यांचा नाद आहे खूप. दर्ग्यापासून मार्केटकडे जाताना अनेक दुकानं आहेत इलेक्ट्रॉनिक्सची. बैठी दुकानं, फळ्यांचे दरवाजे असलेली. गावातल्या प्रसिद्ध पेंटरने एनॅमल पेंटने रंगवलेला साइनबोर्ड. त्यावर जुन्या काळातल्या महान गायकाचं माइकसमोर गातानाचं रंगवलेलं चित्र. दुकानातून अखंडपणे बाहेर पडणारे कव्वालीचे किंवा जुन्या काळातल्या हिंदी गाण्यांचे आवाज. गाणं ऐकण्याचं एखादं बिघडलेलं उपकरण खोलून शांतपणे त्यातल्या किचकट, अमूर्त आकारातल्या सर्किटमधली चूक शोधून काढणारा तो मेकॅनिक. दुरुस्तीसाठी आलेल्या अशा अनेक उपकरणांची दुकानात लागलेली थप्पी. आणखी काही टेपरेकॉर्डरही इथे दिसतात. ते दुरुस्त होईस्तोवर त्यांचा जमाना मागे पडलाय. त्यांच्यावर धूळ साचलीय. साऊंड सिस्टीम, कर्णे, साऊंडशी संबंधित अनेक बारीकसारीक पार्ट्सनी दुकान भरून गेलेलं. अनेक आकारांचे स्टिरिओ बॉक्स, त्यांचे स्पीकर्स. दुकानात येणारी नादी पोरं... सडकछाप गाणी लावून तासन्तास साऊंड चेक करणारी, काय प्रयोग केल्यावर आणखी चांगला साऊंड ऐकू येईल याचा खोल अभ्यास केलेली. ते सगळे सूक्ष्म पार्ट्स, बारीक वायरी, लहान-मोठे स्पीकर्स, त्यांचे रेखीव निमुळते गोल कोन, स्टिरिओ साऊंड सिस्टीममधली ती किचकट अमूर्त रचना या सगळ्याचा एकमेकांशी सुसंवाद झाला की मग गाणं ऐकू येणार. मग ते भाव, त्या जज़्बात, तो दर्द, तो असर... त्याला समांतर हा पसारा... हे सगळं चाललेलं बघत राहावं वाटतं.
या गावातल्या लोकांना नाद आहे जुन्या-पुराण्या प्रतिमांमध्ये रमण्याचा. जुन्या काळातल्या ट्रॅजिडी किंगचं या गावात येणं-जाणं होतं. त्याचे अनेक चाहते इथे अजून दिसतात. त्यांनी जपून ठेवलेले ब्लॅक अँड व्हाइट फोटो अजून इथल्या दुकानांमध्ये, पानपट्टीमध्ये फ्रेम करून लावलेले दिसतात. मंडईच्या त्या देखण्या कमानीतून आत जातानाच आपण पुरातन काळात शिरतो. फिरत फिरत पुढे जातो. आणि एक क्षण येतो... समोर ती मधुबालाची बेहद्द खूबसुरत तसबीर येते. काळाचं भान विसरून जातो मी त्या कोलाहलात. अशा अनपेक्षित ठिकाणी ती प्रतिमा दिसल्यानंतर निर्माण होणारी संवेदना आणि नेहमीच्या सवयीच्या ठिकाणी ती प्रतिमा पाहिल्यावर होणार्‍या संवेदना यांत खूप फरक जाणवतो. तिथे ती प्रतिमा दिसल्यावर होणारा आनंद खूप वेगळ्या प्रकारचा वाटतो. या गावात असा आनंद खूप ठिकाणी मिळत राहतो. अशा अनेक प्रतिमा या गावातल्या लोकांनी जपलेल्या आहेत.
या गावाचा अवकाश अलौकिक स्वरांनी भारलेला आहे. एका प्रतिभावान कलावंताचे स्वर. उत्तरेतल्या कैराना नावाच्या गावातून तो या दिशेने आला होता, शतकभरापूर्वी कधी तरी. मिरासाहेबाशी त्याचं नातं जुळलं. राहिला मग इथेच. त्याचं गाणं बहरलं याच हवेत. दूरवर कीर्ती पोहोचली. अभिजात संगीतातलं एक घराणं त्याच्यापासून सुरू झालं. त्या सगळ्याला हे गाव साक्ष आहे. दर उरुसाच्या दुसर्‍या दिवशी दर्ग्याच्या आवारातल्या चिंचेच्या झाडाखाली बसून तो आपलं गाणं मिरासाहेबांसमोर पेश करत असे. आजही ती परंपरा त्याच्या शिष्यांनी मनापासून जपलीय. उरुसाच्या काळात कुठून कुठून आलेले गायक-वादक तीन अखंड रात्री त्याची याद ताजी करत राहतात. आवारातलं ते चिंचेचं झाड... ते नुसतं झाड कधी दिसतच नाही, तो गायक दिसतोच तिथे. आणि ‘पिया के मिलन की आस...’चे आर्त स्वर ऐकू येत राहतात आणि काळाचा अडसर ओलांडून मी त्याच्या सुरांमधलं कारुण्य मनात साठवून घेत राहतो.
या गावातले काही लोक सतारी बनवतात. कधी तरी सहा-सात पिढ्यांपूर्वी ही कला त्यांना अवगत झाली. यांच्या काही बुजुर्गांनी कारागिरीची उच्च पातळी गाठली होती. त्यांच्या सतारीची ख्याती दूरदूरच्या प्रदेशांत पसरली. आजही इथे अनेकजण या कलेत माहीर आहेत. या सतारी बनवताना बघत राहणं ही मनाला आनंद देणारी आणखी एक गोष्ट. त्या कारागिरांचं सगळं कसब त्या सतारीच्या सुरांमागे दिसतं. ती पिढ्यान्पिढ्या चालत आलेली देखणी हत्यारं. खास शोधून आणलेल्या लाकडातून कोरलेले सतारीचे एकेक भाग. अनेक नाजूक आकारांची जोडणी करून शेवटी सतारीचा तो आकार पूर्णत्वाकडे घेऊन जाणं. त्यावरचं ते नजाकतभरं नक्षीकाम... आहा...! त्यावर त्या नाजूक तारा... आणि एक दिवस त्या तारांमधून निघणारे स्वर... सलग अनेक दिवस चाललेला तो ‘बड़ा ख्याल’च.
या गावातल्या एका हलवायाला सापडलीय अस्सल चव- अनेक वर्षांपूर्वी. त्याच्या पुढच्या पिढीला त्याने ही चव सोपवली. माझी या गावाशी झालेली पहिली ओळख या चवीनेच करून दिली. या चवीशिवाय या गावाचं चित्र अपूर्ण वाटेल. सुंदर, रेखीव खाजा बनवतो तो हलवाई. घड्या घालून केलेला तो पदार्थ. दोन्ही बाजूंनी निमुळता. दोन्ही बाजूंनी दिसणार्‍या त्या आत आत गेलेल्या रेषा. ते एकेक पदर काढून सावकाशपणे खात खात मधल्या मऊ गाभ्यापर्यंत पोहोचेपर्यंत किती चित्रं मनामध्ये तरळून जात राहतात, किती आठवणी ताज्या होतात, किती प्रसंग आठवतात! लहानपणीची शनिवारची संध्याकाळ आठवते. सगळे मिळून आजोबांची वाट बघायचो ते आठवतं. सायकलच्या हँडलला शेलक्या पदार्थांनी भरलेली पिशवी अडकवून दुरून येतानाचे आजोबा दिसतात. त्या पिशवीत हा खाजा हमखास असायचा. तीच चव आताही असते. खाजा खात खात ही दृश्यांची मालिका मी पाहत राहतो, दरवेळी...
या गावातल्या लोकांना कव्वालीचा शौक आहे. उरुसाची संदल रात रंगलेली असते कव्वालांच्या बेहोश गाण्या-बजावण्यात. दर्ग्याच्या आवारात दरवळणारी लोबानची खुशबू. रोषणाईत उजळलेला तो सगळा परिसर. त्यात मिरासाहेबांसाठी गायले जाणारे कसीदे, ‘नैय्या पार’ करण्यासाठी केलेली आर्त आर्जवं.. बेभान होणं... ऐकणार्‍याला ट्रान्समध्ये पोहोचवतात... तो सगळा माहोल एका धूनमधे रंगत जातो. रात्र गहिरी होत जाईल तशी ही नशा वाढत जाते. या गाणा-बजावणार्‍यांचे बेभान आविर्भाव, त्या प्रतिमा किती तरी दिवस आठवत राहतात.
या गावात अजूनही टांगे आहेत.
आता या काळात कुठे असतात का असे टांगे?... महानगरातल्या आर्ट गॅलरीत माझ्या टांगेवाल्यांच्या चित्रांसमोर उभ्या एकाला प्रश्न पडला. हातातल्या स्मार्टफोनवरून एका क्षणात हवी तशी कॅब बुक करायच्या जमान्यात वावरणारा तो. त्याचं विचारणं चूक नव्हतं. त्याला म्हटलं, “आहेत मित्रा, ही चित्रं काल्पनिक नाहीत. हे वास्तवात आहेत अजूनही.”
एखादा परिसर, एखाद्या प्रदेशाचा एखादा तुकडा काळाच्या नियमित गतीतून निसटून मागे राहतो. त्यातले काही तुकडे या गावात मी बघत राहतो. हे टांगेवाले, त्यांचे टांगे, ते मरतुकडे घोडे त्याच तुकड्यांत अस्तित्वात आहेत. या गावातल्या त्या पुरातन इमारतीच्या मागच्या बाजूला ते सापडतील. जेव्हा जेव्हा मी या इमारतीच्या जवळपास पोहोचतो तेव्हा तेव्हा चालू काळाचा हात सुटत जातो. तो सारा परिसर मला त्याच्या प्रभावाखाली घेऊन जातो. तो उंच टॉवर, त्यावरची ती चहुदिशांना असलेली गोलाकार घड्याळं, उंच आकाराच्या चिंचोळ्या खिडक्या, त्या सुंदर कमानी, इमारतीचा पोत, उडालेल्या रंगांतून दिसणारे अमूर्त आकार, रंगांच्या जुन्या जुन्या होतं गेलेल्या छटा, त्यांतून ओघळणारा काळ. तिथली दुकानं, त्यांचे साइनबोर्ड. त्यावरची रंगांचे पापुद्रे उडालेली जुन्या जमान्यातल्या अभिनेत्यांची पोर्ट्रेट्स. टेलरच्या दुकानात हमेशा सुरू असणारी ट्रान्झिस्टरवरची गाणी. तिथे कायम बसून असलेले तिघं-चौघं. बिड्या शिलगावत, पेपर वाचत. तिथेच बाजूला हे पाच-सहा टांगेवाले गिर्‍हाइकांची वाट बघत थांबलेले असतात, त्या मरतुकड्या घोड्यांना चारा टाकून. टांग्यांचा आकारही नाइलाज म्हणूनच टिकून राहिलेला. त्याचा मूळचा स्कार्लेट रेडमध्ये थोडा यलो असा रंग. बहुतेकांचा रंग डल पडलेला. काही जागी माणसांच्या आणि सामानाच्या घासाघिशीने पार पुसट झालेला. तर ते लाइनमध्ये टांगे लावून उभे असतात. काही तरी एकमेकांशी बोलतात. मागच्या सीटवर बसून कुठला तरी लोकल पेपर वाचून काढतात. घोड्याला वैरण घालतात. बाजूच्या नालबंदाकडून घोड्याच्या खुराची नाल दुरुस्त करून घेतात, बदलून घेतात. काही नुसते बसून राहतात. कधी भाडं येतं एखादं. मार्केटमधली पोती भरून नेतात. भाड्यासाठी घासाघीस करतात. चित्रकार हे सगळं बघत राहतो. त्यांच्या आसपास फिरत राहतो. पूर्वी कधी तरी दुरून हे सगळं बघायचा तो. तेव्हाही त्याने टांग्याची चित्रं काढली होती. आता त्याला ती चित्रं खूप रोमँटिकली काढल्यासारखी वाटायची. आता तो खूप जवळून त्या टांगेवाल्यांना बघत असतो. त्याची आता काढलेली टांगेवाल्यांची चित्रं त्यालाच बदलल्यासारखी वाटताहेत....

• अन्वर हुसेन

• • • • • • •

• ऑगस्ट २०१८ ई-अंक - किंमत फक्त ₹३० • अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८