प्लास्टिक पुनःप्रक्रिया - समज आणि गैरसमज - गुरुदास नूलकर । अनुभव ऑगस्ट २०१८


प्लास्टिकचा पुनर्वापर वाटतो तितका सहज, सोपा आहे का? काय आहेत त्यामागची तथ्यं? प्लास्टिकबंदीनंतर उठलेल्या गदारोळात या मुद्द्यांकडे लक्ष वेधणं अधिक कळीचं बनलं आहे. अशा मुद्द्यांचा हा एक धांडोळा. या विषयावर अनेक मतं-मतांतरं असू शकतात. अशी मतं मांडणार्‍या लेखांचं स्वागत आहे. 
 

• प्लास्टिक बंदी आली काय, अंशतः शिथिल केली गेली काय- सामान्य नागरिक तर संभ्रमात आहेतच; परंतु प्रशासक, उत्पादक आणि दुकानदार यांनाही प्रश्‍न पडला आहे- कशाला परवानगी आहे, कशाला नाही, कोणते पर्याय आहेत, पर्यायी पिशव्यांचा अधिक खर्च कोणाच्या माथी पडणार, असलेल्या प्लास्टिकसाठ्याचं काय करायचं...? यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं स्पष्ट नाहीत. पण, प्लास्टिकचा अतिरेक झाला आहे आणि तो थांबलाच पाहिजे, हे सर्वांना सुदैवाने मान्य आहे. फेसबुक आणि ट्विटरसारख्या माध्यमातून प्लास्टिकचे दुष्परिणाम समाजातल्या सर्व स्तरांत पोहोचले आहेत. प्लास्टिकमुळे निसर्गाची आणि मानवी जीवनाची होणारी हानी बहुचर्चित आहे. समस्या कळलेलीच नाही असे आज कदाचित फारच थोडे असतील. असं असतानाही आपल्याकडे प्लास्टिक बंदीची सरसकट स्वीकृती झालेली दिसत नाही. ‘बंदी हवी’ आणि ‘बंदी नको’ असे गट तर आहेतच, पण काहीच प्रतिक्रिया नसलेलेही बरेच आहेत. या सावळ्या गोंधळात एका शब्दाचा भाव सध्या खूप वाढला आहे. ‘रीसायकलिंग’ म्हणजे ‘पुनःप्रक्रिया’ हा शब्द हल्ली वारंवार कानावर पडतो. आजवर रीसायकलिंगचे छोटे-मोठे अनेक व्यवसाय उभे राहिले आहेत. त्यांच्यामार्फत अधिकाधिक प्लास्टिक पुनःप्रक्रियेत जात असल्याचं दिसत आहे.
आजच्या परिस्थितीत प्लास्टिकच्या पुनःप्रक्रियेचा प्रसार होणं गरजेचं आहे यात शंका नाही; पण यातून प्लास्टिक प्रश्न सुटेल का? या प्रक्रियेपासून आपल्याला काही नुकसान आहे का? लोकांना याबाबतची संपूर्ण माहिती नसल्याने पुनःप्रक्रियेचा फारच गौरव होत आहे. किंबहुना, काहींना असंही वाटतं, की मी सर्व प्लास्टिक पुनःप्रक्रियेला पाठवतो किंवा पिशव्यांचा पुनर्वापर करतो म्हणजे माझा प्लास्टिक वापर ‘सेफ’ आहे. पण असं खरंच आहे का?
प्लास्टिक पुनःप्रक्रियेच्या काही मर्यादा आणि अडचणीही आहेत. पुनःप्रक्रियेची पहिली मर्यादा म्हणजे अनेक प्रकारच्या प्लास्टिक पाकिटांवर पुनःप्रक्रिया करताच येत नाही. यात मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिलं म्हणजे एक वेळ वापरासाठी असलेल्या वस्तूंची छोटी पाकिटं. इंग्रजीत यांना ‘सिंगल सर्व्ह सॅशे’ म्हणतात. अशी पाकिटं शाम्पू, गुटखा, सॉस, गोळ्या, च्युइंगम, टॉफी, टूथपेस्ट इत्यादी अनेक वस्तूंसाठी वापरली जातात. इतकंच नव्हे, तर सौंदर्यप्रसाधनंही अशा पाकिटांत मिळू लागली आहेत. दुकानात अशा छोट्या पाकिटांच्या माळा टांगलेल्या असतात. या ‘सिंगल सर्व्ह सॅशे’चा जन्म झाला तो ज्येष्ठ ‘मॅनेजमेंट गुरू’ सी. के. प्रल्हाद यांच्या ‘फॉर्च्युन अ‍ॅट दि बॉटम ऑफ दि पिरामिड’ या लेखामुळे. यात त्यांनी म्हटलं होतं, की ‘अत्यल्प आर्थिक उत्पन्न असलेल्या स्तराची (बॉटम ऑफ दि पिरामिड) संख्या इतकी मोठी आहे की ती भारतातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या समाजाला मध्यम आणि उच्चवर्गीयांची जीवनशैली हवी असते परंतु ती परवडत नाही. त्यामुळे, जर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी खास या वर्गासाठी वस्तू बनवल्या तर त्यांना या मोठ्या बाजारपेठेत शिरकाव मिळेल.’ हा विचार इतका प्रभावी ठरला, की जवळजवळ प्रत्येक बहुराष्ट्रीय कंपनीने गरीब वर्गासाठी आपली उत्पादनं ‘सिंगल सर्व्ह सॅशे’तून उपलब्ध केली. मग काय, त्यांचा खप इतका वाढला, की आज या बाजारपेठेची सर्वाधिक वाढ होत आहे. गरीब ग्राहकांना मोठ्या बाटल्या किंवा मोठ्या पाकिटांतील मोठ्या प्रमाणातल्या वस्तू एकदम विकत घेणं महाग जातं, पण एका वापराचं प्रमाण (सिंगल सर्व्ह) त्यांना परवडतं. त्यामुळे अशा पाकिटांत विकल्या जाणार्‍या वस्तूंचा खप प्रामुख्याने गरीब वस्ती, झोपडपट्टी आणि खेड्यापाड्यांतून होतो.
यांपैकी गुटखा, गोळ्या आणि च्युइंगम अशा वस्तू बहुतांश वेळा घराबाहेर वापरल्या जातात. झोपडपट्ट्यांमधून छोटी शाम्पूची पाकिटंही एकापरीने घराबाहेरच वापरली जातात. वापर झालेलं रिकामं पाकीट तिथल्या तिथे टाकून देण्याची आपली ख्याती आहेच. भारतात आज ही छोटी पाकिटं हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र दिसतात. भारतातील शहरी घनकचरा व्यवस्थापन अतिशय ढिसाळ आहे हे सांगायला नको; पण अनेक खेड्यापाड्यांतूनही याचं व्यवस्थापन होत नाही. मग ही पाकिटं अशीच पडून राहतात. टाकून दिलेली पाकिटं इतकी छोटी आणि विखुरलेली असतात की कचरा उचलणार्‍यांना ती जमवण्यात काहीच फायदा नसतो. दिवसभर ती गोळा केली तर एखादा किलो प्लास्टिक पण भरणार नाही, इतकी ती हलकी असतात. शिवाय शाम्पू आणि खाण्याच्या वस्तू काही प्रमाणात पाकिटात चिकटून बसलेल्या असतात. त्यामुळे अशी पाकिटं गोळा केली तरी पुनःप्रक्रियेत घेतली जात नाहीत. त्यामुळे ती पाकिटं उचलली जातच नाहीत किंवा पालापाचोळ्याबरोबर जाळून टाकली जातात.
हे दोन्ही प्रकार अत्यंत धोकादायक आहेत. जमिनीवर पडून राहिलेल्या पाकिटांतून शाम्पू अथवा इतर वस्तू आणि त्यांतली रसायनं मातीत आणि पावसापाण्यात मिसळतात. पाकिटं जाळली तर त्यांचा धूर होऊन ती रसायनं हवेत मिसळतात. प्लास्टिक जाळून अनेक विषारी घटक तयार होतात. यात डायऑक्सिन, फुरान, मर्क्युरी (पारा), बायफिनायल्स असे घटक आहेत. पी.व्ही.सी. जाळल्याने धोकादायक हॅलोजेन तयार होतो. यापैकी काही घटक पिकांमार्फत आपल्या अन्नात शिरतात किंवा पिण्याच्या पाण्यात मिसळतात. काही घटक प्राण्यांसाठी घातक असतात. डायऑक्सिन अत्यंत विषारी असतो आणि पर्यावरणात दीर्घकाळ सक्रिय राहतो. यामुळे त्याला ‘पर्सिस्टन्ट ऑर्गॅनिक पोल्युटर (पी.ओ.पी.)’ असं म्हणतात.
छोट्या पाकिटांचा असा धोका असण्याचं प्रमाण किती आहे ते पाहू. भारतात तयार होणार्‍या प्लास्टिक फिल्मपैकी ५४ टक्के प्लास्टिकचा वापर लवचिक पाकिटांसाठी (फ्लेक्सिबल पॅक) होतो. उर्वरित प्लास्टिक फिल्म इतर गोष्टींत वापरली जाते. या ५४ टक्के लवचिक प्लास्टिक पाकिटांत कोणत्या वस्तू पॅक होतात आणि त्यात किती वाढ होत आहे हे तक्ता क्र.१ मध्ये दिसेल.
कनफेक्शनरी, म्हणजे गोळ्या, टॉफी, च्युइंगम, बिस्किटं इत्यादी उत्पादनांत सर्वाधिक वाढ होत आहे. त्यानंतर वेफर्स आणि इतर खाऊच्या पाकिटांत वाढ होत आहे. या पाकिटांचा विषय सध्या जरा बाजूला ठेवू, कारण ही पाकिटं ‘मल्टीलेयर प्लास्टिक (एम.एल.पी.)’ म्हणजेच एकाहून अधिक स्तरांची असतात.
सौंदर्यप्रसाधनं आणि तंबाखूजन्य पदार्थ यांचा खप आणि उत्पादनवाढ साधारण एकसारखी आहे. प्लास्टिक, कागद व अल्युमिनियम फॉइल एकत्र करून बनलेल्या अशा पाकिटांवर पुनःप्रक्रिया होऊ शकत नाही. ती का, ते पुढे मांडलं आहे.
तक्ता क्र.२ मध्ये ही समस्या किती मोठी आहे हे कळतं...

(संपूर्ण लेख वाचा अनुभव ऑगस्ट २०१८ अंकात)
• • • • • •


• ऑगस्ट २०१८ ई-अंक - किंमत फक्त ₹३० • अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८