कीर्तीश भट : कॉमन मॅनचा कार्टूनिस्ट! - मुकेश माचकर । अनुभव ऑगस्ट २०१८
• आपलं सगळं जग कॉमिक्समधल्या जगासारखं असतं तर किती बरं झालं असतं! साधी आणि स्वच्छ, एकमेकांपासून योग्य अंतर राखून असलेली घरं; दृश्यात आवश्यक तेवढ्याच व्यक्तिरेखा, अजब-गजब गाड्या, गोलू-मोलूसारखे छोटे छोटे शेजारी; गब्बर, सांभा, घसीटा आणि ढक्कन यांच्यासारखे क्यूट गुंड-बदमाश... किती छान जग असेल ना ते?
बीबीसीचे तरुण व्यंगचित्रकार कीर्तीश भट यांची ही जगाविषयीची कल्पना जगाबरोबरच कीर्तीश यांच्याबद्दल बरंच काही सांगून जाते... लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत कॉमिक्समध्ये रमणार्या या मुलाचं सगळं जगच कॉमिक्समय होऊन जायचं... प्राण यांच्या कॉमिक्समधल्या व्यक्तिरेखा त्याच्या मनात राहायला यायच्या आणि तो त्यांच्यात राहायला जायचा... वाचनाच्या आणि कॉमिक्समध्ये रमण्याच्या आवडीतून भविष्यातला देशातला एक आघाडीचा व्यंगचित्रकार घडतो आहे हे कीर्तीश यांच्याही लक्षात आलं नाही आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ते समजलं नाही.
कीर्तीशचा जन्म ११ जून १९७५चा. मध्य प्रदेशातल्या झाबुआचं नाव फक्त जन्मस्थळ म्हणूनच उपयोगाचं. कारण, वडिलांची सरकारी नोकरी म्हणजे विंचवाचं बिर्हाड. साहजिकच कीर्तीश आणि भावंडांचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी तुकड्यातुकड्यांत झालं. इंदूरमध्ये स्थिरावल्यानंतर त्यांनी समाजशास्त्रात एमए केलं आणि मग मल्टिमीडियामध्ये डिप्लोमा. या मुलाचे पाय शाळेत असतानाच पाळण्यात दिसू लागले होते. लहानपणी आसपास भरपूर पुस्तकं-वर्तमानपत्रं होती आणि त्यांच्या वाचनाला उत्तेजन देणारं वातावरण घरात होतं. कीर्तीश चित्रं काढायचा. पण, वर्तमानपत्रांमध्ये लेखांपेक्षा जास्त आपल्याला व्यंगचित्रंच आकर्षित करून घेतात, त्यांचाच आपल्यावर परिणाम होतो हे कीर्तीशच्याही लक्षात आलं नसावं. ते कळलं एका वर्तमानपत्राने वाचकांकडून व्यंगचित्रं मागवली तेव्हा. शाळकरी कीर्तीशच्या डोक्यात एका व्यंगचित्राची कल्पना आली आणि ती त्याने ओबडधोबड स्वरूपात कागदावर उतरवून त्या वर्तमानपत्राकडे पाठवून दिली. गंमत म्हणजे हे व्यंगचित्र त्या वर्तमानपत्राने छापलं. त्यानंतर कीर्तीशला जणू चावीच बसली. दहावी-बारावीच्या वयातच त्याने झपाट्याने कार्टून काढायला सुरुवात केली आणि त्याच वर्तमानपत्रात नंतर ‘स्टाफ कार्टूनिस्ट’ बनण्यापर्यंत मजल मारली.
आपल्याला व्यंगचित्रं काढता येतात आणि काढायला आवडतात हे कळल्यावर कीर्तीश यांच्यासाठी जणू जादूची कांडीच फिरली. भविष्याचा मार्ग योग्य वयात खुला झाला. घरचं वातावरण बर्यापैकी सुधारकी असल्याने कार्टूनिंग हे ‘भिकेचे डोहाळे’ वगैरे ठरले नाहीत. या मुलाचं करियर याच क्षेत्रात असणार हे घरातल्यांनी स्वीकारलं. दोन मोठ्या भावांनी पाठबळ दिलं. शिवाय, बारावीपासूनच हा मुलगा ‘कमवा आणि शिका’ असं काम करत होता. कार्टूनिंग करता करता तो अभ्यास करून शिक्षण घेत होता नि नोकरीही करत होता.
या काळात व्यंगचित्रकलेच्या तंत्रात आमूलाग्र बदल होत होता. कुंचला, पेन, कागद यांची जागा कॉम्प्युटर घेऊ लागला होता. राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये कॉम्प्युटरच्या साह्याने साकारलेली व्यंगचित्रं प्रकाशित होऊ लागली होती. या क्षेत्रात पुढे जायचं तर आपल्याला आधुनिक तंत्र आत्मसात करून घ्यावं लागेल, हे लक्षात घेऊनच कीर्तीश यांनी ग्राफिक्स डिझायनिंग, इन्फोग्राफिक्स (म्हणजे वर्तमानपत्रांत, नियतकालिकांत लेखांसोबत आकडेवारी, अतिरिक्त माहिती आकर्षक चित्रांच्या-रेखाटनांच्या माध्यमातून नेमकेपणाने देणारी ग्राफिक्स), डिजिटल इलस्ट्रेशन्स यांचं शिक्षण घेतलं. त्याच आधारावर जाहिरात क्षेत्रात नोकरी मिळवली. तरीही मूळ पिंड व्यंगचित्रकाराचा. त्यात व्यंगचित्रं लहानपणापासून प्रकाशित झाल्यामुळे तोंडाला रंगही लागला होता आणि रक्तही लागलं होतं. त्यामुळे इंदूरच्या ‘नईदुनिया’ या वर्तमानपत्रात त्यांना ग्राफिक डिझायनर म्हणून संधी मिळताच त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या अर्जात कार्टूनिस्ट असल्याचा उल्लेख होता, त्यामुळे संपादकांनी व्यंगचित्रंही काढायला सांगितलं. थोड्याच दिवसांत ग्राफिक डिझायनर कीर्तीश हे नईदुनियाचे अधिकृत व्यंगचित्रकार बनले. अर्थात, वेळ मिळेल त्यानुसार त्यांना ग्राफिक्स आणि डिझाइनही पाहावं लागायचं. तिथून कीर्तीश बीबीसीच्या हिंदी सेवेत आले. त्यांची व्यंगचित्रं आता अन्य भाषांमध्येही भाषांतरित होऊ लागली आहेत, त्यामुळे जगभरात त्यांची ओळख प्रस्थापित होत चालली आहे. त्यात २००७ सालात नोकरी सुटल्याने काही काळ कुठेच व्यंगचित्रं छापून येणार नाहीत अशी परिस्थिती आली. तेव्हा व्यक्त होण्याच्या सुरसुरीतून सुरू झालेल्या ‘बामुलाहिजा’ या त्यांच्या व्यक्तिगत कार्टून ब्लॉगचाही त्यांच्या लोकप्रियतेत मोठा वाटा आहे. वर्तमानपत्रात किंवा वेबसाइटवर प्रकाशित झालेलं व्यंगचित्र एक दिवसानंतर या ब्लॉगवर प्रदर्शित होतं. त्यातून आपोआप व्यंगचित्रं संग्रहितही होत आहेत.
• •
..एका वृत्तवाहिनीच्या स्टुडिओत झालेल्या मारामारीच्या अनुषंगाने त्यांनी रेखाटलेल्या दोन व्यंगचित्रांमध्ये एकच सिच्युएशन चतुराईने दोन प्रकारांत मांडली आहे. एकीकडे कार्यक्रम सुरू करणारा अँकर दिसतो आणि हात दोरीने गुंडाळलेले ‘चर्चक’ दिसतात. दुसर्या चित्रात फक्त अँकरच दिसतोय आणि तो उशिरा आलेल्या चर्चकाला ‘दोन-चार थपडा आणि तीन-चार गुद्द्यांमध्ये आपली बाजू मांडायला’ सांगतो आहे. व्हॉट्सअॅपवरून अफवा पसरवल्यामुळे देशभरात बिनडोक जमाव निरपराध नागरिकांना ठेचून मारत सुटले आहेत, या वातावरणावरची त्यांची दोन व्यंगचित्रं पाहा. एका नि:शब्द चित्रात व्हॉट्सअॅपचा सिंबॉल बदलून त्यात कवटी आली आहे. दुसर्यात कारवाई कितीजणांवर आणि कशी करणार, ही अडचण एका बेडीत अडकवून घेण्यासाठी पुढे आलेल्या असंख्य हातांमधून समजून जाते. सध्याच्या जमावांच्या उन्मादाची पायाभरणी दोन वर्षांपूर्वी बीफ खाल्ल्याच्या संशयावरून देशभर गोगुंडांनी घातलेल्या धुमाकुळातून झाली होती. त्यावर कीर्तीश यांची टिप्पणी भेदक आहे. मुळात या देशातला सामान्य सर्वभक्षी नागरिक महागडी डाळ खाऊन प्रोटीन मिळवू शकत नाही आणि मांसाहार त्याला करू दिला जाणार नाही, ही पंचाईत करणारे ‘मेरा देश बदल रहा है’ असं म्हणतात, म्हणजे काय ते कीर्तीश यांच्या व्यंगचित्रातून दिसतं. जयंत सिन्हांसारखा मंत्री जमावगुंडांचा सत्कार करतो, यावर तिखट भाष्य करताना कीर्तीश लिंचिंगश्री आणि लिंचिंगभूषण अशा पदव्या जाहीर करण्याची सूचना करतात. करणी सेनेच्या सुपारीबाज गणंगांना त्यांच्या ‘शौर्या’बद्दल प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी व्हायला द्यावं, ही सूचनाही अशीच जळजळीत आहे. गुज्जर आंदोलनाच्या वेळी ‘आणखी काही रेल्वेमार्ग त्वरित मंजूर करा, म्हणजे हे आंदोलक ते उखडू शकतील’, अशी मागणी मांडली जाते, हेही भन्नाट आहे. राजस्थानात ‘पद्मावत’ प्रदर्शित न होऊ देण्याचा मूर्खपणा आजच्या इंटरनेटच्या काळात किती फोल आहे हे थिएटरात डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेल्या माणसाच्या व्यंगचित्रातून कीर्तीश दाखवून देतात.
बीफबंदी आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना कीर्तीश यांच्या चित्रातली गाय आपल्या मालकाला म्हणते, ‘तुला मारणारे आलेत की मला मारणारे आलेत ते पाहून ये.’ दुसरीकडे गोप्रेमाचं भरतं आलेल्या गोपुत्रबुद्धींना आपल्या या चार पायांच्या माता जागोजाग प्लॅस्टिक आणि असलं काहीबाही चघळून पोटं भरत असतात याची जाण नसते, याची आठवण करून दिली आहे...
• • • • •
संपूर्ण लेख वाचा अनुभव ऑगस्ट २०१८ अंकात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा