वार्यावरचं आयुष्य - हेरंब कुलकर्णी । अनुभव ऑगस्ट २०१८
अफवांना बळी पडून जमावाने पाच भटक्यांना अमानुषपणे जीवे मारण्याची घटना नुकतीच धुळ्यातल्या राईनपाडा इथे घडली. समाजमाध्यमांमधून पसरलेल्या अफवांपोटी हे कृत्य घडलं हे खरंच. पण स्थिर जगण्याची संधी न मिळालेल्या भटक्यांच्या नशिबी कोणत्या ना कोणत्या कारणांनी हा अत्याचार येतच असतो. महाराष्ट्रात फिरताना दिसलेल्या भटक्यांच्या जगण्याच्या या दशा..
• नागपूर जिल्ह्यात मोहगाव इथे दूर जंगलाजवळ दगडाच्या खाणी आहेत. त्या खाणींमध्ये आत भटक्यांची एक वस्ती आहे. हे मूळचे गुजराती असलेले भरवाड जमातीतले लोक. आपल्याकडे त्यांना लाल गाईवाले म्हणून ओळखलं जातं. पावसाळ्यात त्यांच्या वस्तीपर्यंत गाडी जाऊ शकत नाही. आम्ही गेलो तेव्हा उन्हाळा होता. तिथे एका उंचशा जागेवर आंब्याच्या झाडाखाली काही बाजा टाकल्या होत्या. तिथून पुढे लगेचच टेकडी आणि टेकडीवर जंगल होतं. खाली मैदानात पालासारख्या चार-पाच राहुट्या टाकलेल्या. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होती. त्यांचं जेवण म्हणजे मोठ्ठा गुळाचा खडा, पातेलं भरून ताक आणि रोटी. त्या दिवशी त्यांनी आमच्यासाठी म्हणून थोडी हिरवी भाजी केली होती. तिथल्या स्त्रियांनी चेहर्यावर पदर ओढून घेतलेला होता.
महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत हे भरवाड राहतात. गायी चरण्यासाठी पावसाळ्यात ते एका ठिकाणी वस्ती करतात. खूप पाऊस असेल तेव्हा बाजेवर पालं लावून त्यात झोपावं लागतं, असं त्यांच्याकडून कळलं. अशा वेळी चूलही पेटत नाही. कित्येक वेळा फक्त दूध पिऊन झोपावं लागतं. या लोकांकडे शेकड्याने गायी असतात. त्यामुळे दूधदुभतं विकून त्यांना चांगली कमाई होत असेल असं आपल्याला वाटतं; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. त्या मंडळींकडूनच आम्हाला त्यांच्याकडच्या गायींच्या दुधाचा हिशोब कळला. ३०० गायींपैकी एका वेळी फक्त ५० गायी दूध देणार्या असतात. भाकड गायी आणि गाभण गायींची संख्या बरीच जास्त असते. एक गाय पाच-सहा महिने रोज सुमारे दोन लिटर दूध देते. ‘हल्दीराम’चे लोक त्यांच्याकडे येऊन दूधसंकलन करतात. त्यातून मिळणार्या पैशांतून वस्तीतली १० कुटुंबं कशीबशी गुजराण करतात. त्यातही पैशांना सतत वाटा फुटत असतात. गायींना जंगलात चरायला नेलं की वन अधिकारी पैसे मागतात. कधी गावकर्यांसोबत कुरबूर होते आणि खिशाला गळती लागते. शिवाय गायी पाळणं हेदेखील खूप कष्टाचं काम असतं. दिवसभर गायींसोबत फिरावं लागतं. एका गायीला दिवसाला १०० लिटर पाणी लागतं. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी काढावं लागतं. पाणी शेंदताना हाताला घट्टे पडतात. बोलता बोलता ही मंडळी हाताला पडलेले वळ आणि घट्टे आम्हाला दाखवत होती.
या अल्पसंख्य समाजाला गावकर्यांच्या त्रासालाही तोंड द्यावं लागतं. हा समाज राहत होता त्या गायरान जमिनीवर गावच्या सरपंचाचा डोळा होता. ती जमीन रिकामी करून घेण्यासाठी त्याने या लोकांना मारहाण करून बुलडोझरने वस्ती उद्ध्वस्त केली, वर गायींचा चारा जप्त केला. तो सोडवून घेण्यासाठी त्याने २५ हजार रुपये मागितल्याचं इथे समजलं. भरवाडांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे गार्हाणं नेलं; पण काही उपयोग झाला नाही. उलट, बुलडोझरच्या पैशांची त्यांनी मागणी केली. एखाद्याला गोळी घालून त्याच्या कुटुंबीयांकडून बंदुकीची रक्कम मागण्याचाच तो प्रकार होता. हे लोक पैसे देईनात, तेव्हा सरपंचाने चारा पेटवून देण्याची धमकी दिली. चारा जळाला असता तर पावसाळ्यात भरवाडांच्या गायी उपाशी मेल्या असत्या. त्यामुळे शेवटी त्यांनी गयावया करून १० हजार रुपये भरून चारा सोडवून घेतला. आमच्यासोबतचे कार्यकर्ते दीनानाथ वाघमारे यांच्याकडून कळलं, की पुढे त्या जमिनीवर त्या सरपंचाने दगडांची खाण सुरू केली. वाघमारे या समाजाला मदत करण्यासाठी तिथे गेले असता त्यांनाही हुसकून लावण्यात आलं.
भटक्या विमुक्तांना गावात राहू द्यायचं नाही, त्यांना कायमचे रहिवासी होऊ द्यायचं नाही अशी गावकर्यांची सर्वसाधारण मानसिकता दिसते. मुख्यमंत्र्यांचा जिल्हादेखील त्याला कसा अपवाद असणार? अशा प्रकरणांमध्ये कुठलीही कारवाई केली जात नाही. हे भटके उपेक्षित ते उपेक्षितच राहतात.
आपलं राज्य सोडून आलेले हे लोक कष्ट करून जगतात. कुठे तरी दूर, गावाच्या बाहेर राहतात. बाहेरगावचे म्हणून स्थानिक प्रशासनही यांच्या मदतीला येत नाही. एकीकडे परप्रांतीयांना मुंबईतून हाकलायचं म्हटलं तर देशपातळीवर गदारोळ होतो आणि इथे विदर्भात दुर्गम भागातल्या परप्रांतीयांच्या विरोधातली दादागिरी ही लहानशा बातमीचाही विषय होत नाही. एकीकडे यांना गोपाळ, म्हणजे श्रीकृष्णाचे वंशज समजायचं आणि दुसरीकडे त्यांना अशी वागणूक द्यायची, ही आपली सांस्कृतिक दांभिकता नाही का?
•
भंडारा जिल्ह्यात चोरखमारी इथल्या गोपाळ वस्तीत गेलो. वस्ती गावाबाहेर खूप आडबाजूला आहे. वस्तीत फार तर पंधरा पालं आहेत. वस्तीतले काहीजण जवळच्या शेतात मजुरीला जातात, तर काहीजण शिंदीचे झाडू बनवतात. आम्ही गेलो तेव्हा झाडू तयार करण्याचं काम सुरूच होतं...
• • • • •
संपूर्ण लेख वाचा अनुभव ऑगस्ट २०१८ अंकात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा