भवताल - अन्वर हुसेन । कॅन्व्हासमागचे रंग । अनुभव सप्टेंबर २०१८



चित्रकार नाही रमू शकत काल्पनिक विश्वात. चित्रकार नाही होऊ शकत अमूर्तवादी... या घडीला तरी...
सुचतात त्याला जरी असंख्य कल्पना, दिसत राहतं अमूर्त काही...
त्याला नाही रंगवावंसं वाटत ते.
तो गुंतलाय त्याच्या भवतालात. तो रंगवतो चित्रं त्याच्या आसपासच्या असण्यातली. खूप उत्सुकतेने न्याहाळतो तो सगळं दिसणारं. शोधत राहतो सतत काही. गुंततो, गुंगतो. तटस्थपणेही बघत राहतो कधी. भटकतो रस्ते, गावांमधले. माळरानावरच्या पायवाटा शोधत फिरतो. नदीच्या ओढीने दूरपर्यंत जातो. झाडांच्या ओळखी करून घेत फिरतो. शेजारची गावं धुंडाळत दिवस घालवतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमधल्या टोकदार उन्हात आकाशाची निळाई बघून वेडा होतो. मग त्या निळ्याची भूल त्याला मैलोन्मैल घेऊन जाते.
पुरातन इमारतींच्या अवकाशात शोधत राहतो तो पूर्वजांच्या खाणाखुणा. त्या जुनाटपणात तो चित्रं शोधतो. त्याला दिसतात खूप माणसं त्याच्या अवतीभवती. रस्त्यावरची माणसं. कामात असलेली माणसं. कामात नसलेली माणसं. जवळची माणसं. खूप दूर दिसणारी माणसं. चारचौघांसारखी माणसं. चित्रविचित्र पेहरावांतली माणसं. वेगवेगळ्या बॉडी टोनची माणसं. बाजारात बसलेली माणसं. उरुसात फिरणारी माणसं. टपर्‍यांमध्ये पडून असलेली माणसं. गॅरेजमध्ये कामं करणारी माणसं. वाचनालयात सकाळ-संध्याकाळ पेपर वाचत वेळ काढणारी माणसं. एकटी राहणारी माणसं. रिकामटेकडी माणसं. दारूच्या गुत्त्यासमोर घोळ घालत बसलेली माणसं. उदास माणसं. नादी माणसं.
व्हर्च्युअल जगातच रमलेली माणसं.
बंद पडलेल्या लायब्ररीच्या दगडी पायर्‍यांवर तासन्तास गप्पा मारत बसलेली माणसं. मार्केटच्या दगडी कमानीशेजारी कट्ट्यावर उगीचच दात टोकरत बसून टाइमपास करणारी माणसं. मार्केटच्या अतिशय देखण्या कमानीखाली जमून काही तरी बोलत उभी माणसं. थिएटरबाहेरच्या पानपट्टीवर येणार्‍या-जाणार्‍याकडे बघत उभी माणसं.
सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, पहाट, ऊन, पाऊस, थंडी; माणसं, त्यांचं जगणं; रस्ते, झाडं, सायकली, ट्रक, गाड्या, तलाव, नदी, डोंगर, माळ, गुर्‍हाळ, टपर्‍या... सगळं सगळं नोंदलं जात राहतं चित्रकाराच्या मेंदूत.
या सगळ्याचं काय करायचं आता? मग तो कॅनव्हाससमोर येतो. स्वतःला मोकळं करत राहतो. स्केचबुकच्या पानांवर पेनने, पेन्सिलने माणसं रेखाटत राहतो. रस्ते, झाडं, इमारती नोंदवत राहतो. काही तरी लिहितोही. त्यांच्याबद्दल.
साध्यासुध्या गोष्टी मांडायच्या असतात त्याला, साध्यासुध्या शैलीत. खरं तर शैली वगैरे गोष्टींचा तो विचार तरी कुठे करतोय. या भवतालाला कुठे शैली असते? त्याला भवतालात मिसळून जायचं आहे. त्याला कुठलंही गूढ, अतिवास्तव, अमूर्त तत्त्व असं काही पकडायचं नसतं. कुणाला विस्मयचकित करायचं नसतं. कुठल्या इझममध्ये गुंतायचं नसतं. त्याची चित्रं मॉडर्न की पोस्टमॉडर्न की काहीच नाहीत, तो नाही विचार करत. या कप्प्यांमध्ये आपली चित्रं कुठे याची त्याला फिकीर नाही.
अनुभवलेल्या छोट्या छोट्या गोष्टी फक्त सांगत राहाव्या वाटतात त्याला, त्याच्या भवतालच्या.
• अन्वर हुसेन

• • • • • • •

• सप्टेंबर २०१८ ई-अंक - किंमत फक्त ₹३० • अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८