विनोदिनी पिटके-काळगी : आनंददायी शिक्षणाच्या वारकरी - नीलिमा कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८
शिक्षण म्हणजे माध्यम इंग्रजी आणि पद्धती स्पर्धेची अशी व्याख्या रूढ झालेली असताना नाशिकच्या ‘आनंदनिकेतन’ या मराठी शाळेने आनंददायी शिक्षणाच्या क्षेत्रात आपलं स्थान पक्कं केलं आहे. अवघ्या २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेच्या कर्त्याधर्त्या विनोदिनी पिटके-काळगी यांच्या कामाचा हा मागोवा.• सध्याच्या शहरी शाळाशिक्षणाकडे एक नजर टाकली तर एक विशिष्ट चित्र दिसून येतं. या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत एक चाकोरी तयार झालेली आहे- गरिबांसाठी सरकारी शाळा, मध्यमवर्गीयांसाठी अनुदानित खासगी शाळा, श्रीमंतांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि अतिश्रीमंतांसाठी इंटरनॅशनल शाळा. शालेय शिक्षणाशी संबंधित कोणताही शहरी समाज या चार प्रकारांमध्ये सरळ सरळ विभागलेला दिसतो.
मुलांना इंग्रजी शाळेतच घालण्याकडे अधिकाधिक पालकांचा कल दिसत असताना नाशिकमध्ये मात्र एका मराठी शाळेसमोर दरवर्षी प्रवेशासाठी रांगा लागतात. ‘प्रत्येक वर्गात फक्त चाळीस विद्यार्थी’ या शाळेच्या धोरणामुळे दरवर्षी अनेकांना प्रवेशाविनाच परतावं लागतं. वीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेत गणित, भाषा, विज्ञान या विषयांबद्दलचे काही नवीन दृष्टिकोन, पद्धती, साहित्य तयार करण्यात आलेलं आहे. इतर शाळांमधले शिक्षकही त्याचं प्रशिक्षण घेत आहेत. या मराठी शाळेचं नाव आहे ‘आनंदनिकेतन’.
या शाळेच्या प्रवर्तक आणि संस्थापक आहेत विनोदिनी पिटके-काळगी. त्या मूळच्या सातार्याच्या. त्यांनी १९८५ साली गणित विषयात एम.एस्सी. पूर्ण केलं आणि सातारा सैनिकी स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी करायला सुरुवात केली. सातार्यात असताना त्या अविनाश बी.जे. यांच्या नेतृत्वाखाली ‘सत्यशोध’ या सामाजिक संघटनेबरोबर काम करत असत. १९८८ साली याच संघटनेत कार्यरत असलेल्या राज काळगी यांच्याशी त्यांनी लग्न केलं. राज काळगी हे एस.टी.त कार्यकारी अभियंता आहेत. त्यांची बदली झाली म्हणून दोघंही १९९१ साली नाशिकला आले. विनोदिनी तिथे आर.वाय.के. कॉलेजला नोकरी करायला लागल्या. त्यांनी शिक्षक होण्याचं खूप आधीपासूनच ठरवलेलं होतं. त्यानुसार कॉलेजची नोकरी आणि जोडीला कोचिंग क्लास असं काम त्यांना सुरू ठेवता आलं असतं; पण त्यांचा पिंडच चळवळ्या असल्याने त्या समता आंदोलन, स्त्रीवादी चळवळ यांच्याशी जोडल्या गेल्या. ‘समता आंदोलन’ त्या वेळी झोपडपट्टीतील मुलांसाठी शाळा चालवत असे; पण या कामाला तसा निश्चित आकार नव्हता. विनोदिनीताईंना तर शिस्तबद्ध कामाची सवय होती. कोल्हापूरच्या शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांच्या कार्याचा व विचारांचा विनोदिनीताईंवर खूप प्रभाव आहे. लीलाताईंच्या सृजनआनंद शाळेने त्यांच्या मनात घर केलं होतं. तरी त्या टप्प्यावर नवीन शाळा काढण्याचा विचार त्यांच्या डोक्यात नव्हता.
त्यांची मुलगी मिताली शाळेत जाण्याच्या वयाची झाली आणि शाळाशिक्षणातला खेळखंडोबा त्यांना खर्या अर्थाने अनुभवास आला. आपल्याकडे शिक्षणक्षेत्रावर सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे. त्यामुळे सरकार बदललं की धोरण बदलतं. दर आठवड्याला परीक्षा, इथपासून ते आठवीपर्यंत परीक्षाच नको, अशी काहीही लहरी फरफट सुरू असते. सरकारने शिक्षणक्षेत्र हे अनुत्पादक क्षेत्र मानल्यामुळे त्यावर नेहमीच कमी खर्च करण्याचं धोरण सर्व सरकारांनी ठेवलं. खासगी क्षेत्राला यात मुक्तद्वार देण्यात आलं. शिक्षण कसलंच उत्तर देऊ शकत नाही. उलट, शिक्षण हाच एक प्रश्न बनला आहे. शिक्षणात प्रयोगशीलता नाही, नावीन्य नाही, बदल नाही, सामाजीकरण नाही, प्रश्न विचारायची परवानगी नाही. हे वास्तव विनोदिनीताईंना अस्वस्थ करत होतं. त्यांनी आपल्या मुलीसाठी मराठी माध्यमाची पण त्यातल्या त्यात वेगळ्या वाटेने जाणारी थोडी लांबची शाळा निवडली होती; पण या शाळेतही अभ्यास, शिस्त या नावाने रूढ वाटच चोखाळली जात होती. एकदा संस्थेच्या संस्थापकांच्या वाढदिवशी शाळेतल्या मुलांना वेठीस धरलेलं त्यांनी पाहिलं आणि ठिणगी पडली.
अशा वेळी एक तर परिस्थिती बदलण्यासाठी सरकारपुढे मागण्या करणं हा एक मार्ग असतो किंवा स्वत:च काही नवीन निर्माण करण्याचं आव्हान स्वीकारावं लागतं. विनोदिनीताईंनी दुसरा पर्याय निवडला आणि ‘आपणच शाळा काढू या’ असा प्रस्ताव आपल्या मित्रमंडळींपुढे मांडला. शाळा कशी असावी यासंबंधी विनोदिनीताईंच्या कल्पना स्पष्ट होत्या. त्यानुसार त्यांनी सुरुवातीलाच काही अटी घालून घेतल्या :
• सरकारी बंधनं नकोत म्हणून शाळा कधीही सरकारी अनुदान घेणार नाही.
• मुलांचं व शिक्षकांचं स्वातंत्र्य हा शाळेचा पाया असेल.
• शाळा पूर्ण मराठी माध्यमाची असेल.
• समाजातील सर्व जाती, धर्म, वर्ग, आर्थिक गटांतील मुलं शाळेत असतील.
• फी माफक असेल व प्रवेशासाठी देणगी घेण्यात येणार नाही.
• शारीरिक शिक्षा केली जाणार नाही.
• शिक्षण आनंददायी व सहभागशील असेल.
• प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त चाळीसच विद्यार्थी असतील.
• शिक्षण जीवनाशी जोडलेलं असेल.
• स्पर्धेपेक्षा सहकारावर भर असेल.
सर्वत्र इंग्रजी शाळांचं पेव फुटलेलं असताना मराठी शाळा सुरू करणं अनेकांना मूर्खपणाचं वाटत होतं; मात्र विनोदिनीताई त्या निर्णयावर ठाम होत्या. मूल ज्ञान मिळवतं म्हणजे ते स्वत:ला परिसराशी जोडत जातं. तेव्हा परिसर भाषा हे त्याचं नैसर्गिक ज्ञानप्राप्तीचं साधन असायला हवं, या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. आधीच समाजात मराठी शाळांविषयी उदासीनता; त्यात सरकारी मदत न घेता, सेमी-इंग्लिश माध्यमाचा पर्यायही नाकारून त्यांनी आव्हान अधिकच अवघड केलं होतं. पण त्यांच्या साथीला त्यांची काही समविचारी मित्रमंडळी होती. सर्वजण मिळून कामाला लागले. ‘आविष्कार शिक्षण संस्थे’ची नोंदणी झाली. लीलाताईं पाटील यांची पुस्तकं, तोत्तोचान, समरहिल, दिवास्वप्न, झकिया कुरियन यांची पुस्तकं अभ्यासायला सर्वांनी सुरुवात केली. प्रत्यक्ष शाळा काढायची वेळ येऊन ठेपली. विनोदताईंनीच शाळेचं नाव सुचवलं-आनंदनिकेतन. नाशिकच्या माणिकनगरमधला एक छोटा हॉल भाड्याने घेऊन १० जून १९९८ रोजी शाळा सुरू करण्याचं ठरलं; पण चर्चागटातील अनेकांना आपापली वेगळी कामं होती, त्यामुळे प्रत्यक्ष दैनंदिन कामाला विनोदिनीताई मैदानात एकट्याच उरल्या. पण आता माघारीला जागा नव्हती. त्यांच्यावर विश्वास टाकून १६ पालकांनी आपली मुलं त्यांच्या हवाली केली होती. त्या स्वत:, वर्षा हवालदार व स्वाती पाटील या बालवाडी शिक्षिका म्हणून उभ्या राहिल्या आणि ‘आनंदनिकेतन’ शाळा सुरू झाली.
बालवाडीत लिहायला शिकवलं जाणार नाही, फक्त लेखनाची पूर्वतयारी होईल, मुलांना गृहपाठ असणार नाही, पालकांनी मुलांवर कसलाही दबाव टाकू नये, अशा विनोदिनीताईंच्या स्पष्ट सूचना होत्या. आजही बालवाडीच्या प्रवेशांसाठी येणार्या पालकांना या सूचना सुरुवातीलाच दिल्या जातात...
• • • • • • •
संपूर्ण लेख वाचा अनुभव सप्टेंबर २०१८ अंकात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा