आसामी सरमिसळीचे रंग - मुकुंद कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुदा जाहीर झाल्यानंतर तब्बल ४० लाख लोकांवर निर्वासित होण्याची वेळ आल्याने एकच गदारोळ उठला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आसाममधल्या सरमिसळ संस्कृतीचे हे काही अनुभव.
• भुकेला सीमा नसते अन् रोजगाराला दिशा नसते, हेच खरं. आसाम आणि एकूणच ईशान्य भारतात मी भरपूर फिरलो. ध्येय, आदर्श, सामाजिक उत्थान किंवा सेवा वगैरेची कुठली जळमटं डोक्यात न ठेवता भटकलो. वस्त्यांमध्ये राहिलो, त्यांची नाच-गाणी, खान-पान या सगळ्यांत त्या लोकांमध्ये रमलो. आपणही त्यांच्यातील एक आहोत, अशीच भावना मनात झिरपत गेली. आसामच्या उंच-सखल अशा ‘असम’ प्रदेशाने आणि ब्रह्मपुत्रेच्या लहरी रपाट्याने या प्रदेशाला एक संथ स्वभाव दिला आहे. संघर्ष इथे परकीय वाटतो, म्हणून तो टिकत नाही. तीस-बत्तीस जिल्ह्यांच्या या राज्यात भन्नाट सरमिसळीचे लोक राहतात. त्यांच्या भाषा मोजाव्यात तर डोकं फिरेल. इथे केवळ अर्धेच लोक आसामी बोलतात. बोडो, बंगाली, सिल्हेटी, नेपाळी अशा अनेक भाषा इथे चांगलं बाळसं धरून आहेत. पण ही स्थिती आजची नव्हे. आधी ‘बंगाल प्रेसिडेन्सी’, नंतर ‘नेफा’ म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आज वेगवेगळ्या राज्यांची नावं लावत असला तरी त्याचा मूळ स्वभाव असाच ‘मिसळ’छापाचा आहे.
मूळ आसामी आणि बंगाली मुस्लिम यांच्यातील पहिली ठिणगी १९५२च्या सुमारासाच पडली होती. पण तेव्हाही संघर्ष, दुफळी हा समाजाचा स्वभाव नव्हता. पुढे १९८०-८४च्या ‘आसू’च्या आकांतातही तो दिसला नाही. १९८५ ला आसाम करार झाला. पण समाज तसाच राहिला. ‘आसू’ अन् ‘उल्फा’च्या आगडोंबी उठाठेवी अल्पजीवीच ठरल्या. प्रफुल्लकुमार महंतो यांच्या नेतृत्वात ‘आसू’नं आख्खा आसाम अस्वस्थ केला होता. लोक महंतोचा फोटो देवघरात ठेवून पूजा करताना मी बघितलं आहे. नंतर तो मुख्यमंत्री झाला. पण समाजात कटघरे उभे करू शकला नाही.
‘आतले’ आणि ‘बाहेरचे’ या खुनशी खेळात एका युवा चळवळीचा जीव गेला. आज तो खेळ नव्याने सुरू झाला आहे. कुणा-कुणाला बाहेर काढणार? ‘हिंदू’ आणि ‘मुसलमान’ हे निकष आसामात हास्यास्पद ठरतात. अख्खा नॉर्थ ईस्ट या वादाच्या समजेच्या पार आहे. नवरा मुसलमान म्हणून त्याला ‘बाहेर’ काढू म्हटलं, तर असंख्य तथाकथित हिंदू स्त्रियांचे संसार मोडतात. कारण शेतजमीन, आवार, ठेके सर्वकाही ‘स्थानिक’ स्त्रियांच्या नावावर आणि काम करतात बाहेरचे. बरं, हे ‘बाहेर’चे कित्येक दशकांपासून इथे आहेत. ते सारेच मुसलमान नाहीत. ‘हिंदू’ हा निकष लावायचं म्हटलं तर संपूर्ण नॉर्थ-ईस्टवर पाणीच सोडावं लागेल. रात्रीचा उपवास सोडण्यासाठी गोमांसाच्या स्टॉलवर भल्या पहाटेपासून गर्दी करणार्‍यांना कुठली ‘भगवी’ टोपी घालणार?
इथल्या समाजाची व्यामिश्रता अनुभवली की ‘बस, त्यांना जगू द्या’ असंच म्हणावंसं वाटतं. लाल, भगवा अन् हिरव्या खुळांनी त्यांना ग्रासून काही होणार नाही; कारण असं करणार्‍यांचा या प्रदेशाने नेहमीच ‘पोपट’ केला आहे. मदतच करायची असेल तर त्यांचे जगण्याचे प्रश्‍न अन् रोजगाराच्या समस्या थोड्या हलक्या करा; ‘बाहेर काढा’, ‘रजिस्टर भरा’ या वृत्तीच्या बोहारीने भ्रष्ट झालेल्या विचारांना तडीपार करा; पण ते होत नाही. बांगलादेशातून सिल्चरला येणार्‍यांना कुणीच रोखू शकत नाही. बनियन, आणि विड्यांचा कट्टा खोचलेली लुंगी गुंडाळून, नदी पार करून येणारी ही माणसं संपूर्ण ईशान्य भारतात शेतीची नाहीतर मजुरीची कामं करत गुडुप होतात. असे गुडुप होणारे फक्त मुसलमानच नाहीत; तर त्यांच्यात नेपाळी आहेत; बिहार, युपीचे जत्थेदेखील आहेत. इटानगरहून सापाच्या वेटोळ्यागत रस्त्याने झिरोला जाताना मधल्या खोबणीतील गावात गेल्या १०-१५ वर्षांपासून कच्ची सुपारी, चुना आणि पान बांधून देणारा माणूस म्हणाल तर ‘बाहेर’चा असतो; त्याला काढलं, तर त्याची ‘स्थानिक’ बायको आणि ‘अन्वय’ वगैरे नावाच्या पोरांचं काय करणार?
‘ये मधुमख्खी का छत्ता है बाबू, हात डालोगे तो पछताओगे!’ पन्नास वर्षांपासून ईशान्य भारतात अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांचा व्यापार करणारे, दिमापूरला जंगी घर बांधून राहणारे बाबुलाल खेतावत मला नेहमी म्हणायचे. असे असंख्य बाबुलाल, उस्मान, जगदंबीप्रसाद तिथे आहेत. त्यांना कोण अन् कसं काढणार?
सध्या जो ‘एनआरसी’ नावाचा खुळचटपणा सुरू आहे; (‘एनआरसी’ची खतावणी जाहीर करावी म्हणजे आसामच नव्हे तर अख्ख्या नॉर्थ ईस्टचं विश्‍वरूप दर्शन होईल.) त्याच्या गंमतीजमती वृत्तपत्रात वाचत असताना, मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्यात...


कुठल्याही क्षणी आभाळाला भोक पडेल असं दाटून आलं होतं. अस्वलीच्या काळ्या-केसाळ कातडीसारखा अंधार मामला होता. अशात तीन सेलच्या टॉर्चच्या प्रकाशात, अदमास घेत, उघडी जीप खडबडीत रस्त्यावरून रेटत आमचा प्रवास सुरू होता. नागालँडमधील दिनापूरहून आसामच्या दिब्रूगडला निघालो होतो. ‘आतल्या-बाहेर’च्या भडकावू उत्थानाचे ते दिवस होते. ‘आसू’चं आंदोलन ऐन भरात होतं. आसामची समस्या अन् परिस्थिती जाणून घेण्यासाठी वयाच्या २४व्या वर्षी अस्मादिक आगाऊपणे नागपुरातून निघून आसामात कढी पातळ करत फिरत होते.
शिवसागर या गावाजवळ होतो. अखमिया जनांच्या जीवनात अंधार आणणार्‍या ‘निर्वासितां’च्या विरोधात ‘ब्लॅक-आऊट आंदोलन’ सुरू होतं. दिवस-रात्र सारंच बंद. दिवसा दुकानं, व्यापार बंद; तर रात्री ‘प्रकाश बंद’. अगदी गाड्यांचे हेडलाईटदेखील. रस्ते सदैव बंद. खाण्या-पिण्याची मारामार. शिवसागरला थांबलो. म्हटलं बघावं काही गावतं का पोटात ढकलायला. जीपमध्ये आम्ही तीनजण. नौगावनजीक राहणारा कलिता मास्तर, जीपचा चालक नेपाळी गुरुंग आणि मी. कलिता गुवाहाटीला शाळेत शिकवायचा. ३०-३२ वर्षांचा हा ‘स्पिरीटेड’ अखमिया बांगलादेशी मुस्लिमांचा कट्टर विरोधक होता; ‘आसू’चा कर्मठ कार्यकर्ता होता. दोन-तीन वाक्यं हिंदीत बोलून नंतर थेट आसामीमध्ये डोळे फिरवत अन् थुंकी उडवत भाषण द्यायचा. गाडीचालक नेपाळी गुरुंग म्हणजे जाड सोलचे जोडे धरून जेमतेम पाच फुटांवर पोचलेला, गुवाहाटीमध्ये गाडी चालवायचा. तो काय, त्याचा बापसुद्धा आसामी वळणाचा होता. आसामी ‘गमोसा’ बांधून तो आपली ‘सपाट’ नेपाळी चेहरेपट्टी अर्धी झाकून पूर्णवेळ आसामी बोलायचा.
शिवसागर गाव असंख्य झेपावणार्‍या ढगांना भेदरून अंधारात रूतून झोपलं होतं. अकरा-साडेअकराचा सुमार असावा. उजाडायच्या आधी आम्हाला बराच पल्ला गाठायचा होता. सारा आसमंत चित्रागत स्तब्ध होता. जीपची घुरघुर थांबली अन् सुन्न करणारी शांतता कातडी चिरत अंगात घुसली. आसपास वस्ती होती, पण जाग निवली होती. कुजबुजत कलिताला म्हटलं, ‘चल, वस्तीत जाऊ, काहीतरी मिळेल, कुणी तरी जागं असेल.’ तो काही केल्या हलत नव्हता. शेवटी त्याचा हात धरून ओढत एका घराजवळ पोचलो. अर्धवर्तुळात चार दारं अन् त्यामागे कच्च्या बांधकामांचे, पण मोठ्या घराचे आकार जाणवत होते. अंगणातली झाडं आमच्याकडे बघत निश्‍चल उभी होती. आश्‍चर्य म्हणजे कुत्रीदेखील गपगार होती. तिकडे जीपमध्ये गुरूंग आडवा झाला होता. कलिता परत जाऊ म्हणत होता. मी त्याच्याकडे लक्ष न देता, दाराच्या कडीला हात घातला. ती वाजवणार तोच दरवाजा उघडला अन् ‘कौन?’ असा आवाज आला. मी काही उत्तर देण्याअगोदर ‘की असे?’ अशी आसामीत विचारणा झाली. आधीचा ‘कौन’ खास राष्ट्रभाषेतील होता. मी थेट ‘पानी मिलेगा’ असं हिंदीत विचारलं. हो, नाही काहीच उत्तर आलं नाही; त्याऐवजी आगपेटीवर आधी विडी पेटली अन् मग कंदिलाची वात प्रज्वलित झाली. त्या मिणमिणत्या प्रकाशात घरात बरीच मंडळी दाटीवाटीने झोपलेली दिसली. आत शिरायला जागा नव्हती.
तो ‘कौन?’ विचारणारा बाबा उठला आणि झोपलेल्यांना ओलांडत आमच्याकडे सरकू लागला. माझ्या मागे उभा असलेला कलिता मास्तर ‘मिया असे नाकी’ असं पुटपुटत फणकार्‍यात मागे फिरला. मी दारातून दूर झालो. आतला बाबा विडीसह बाहेर आला. त्याने दार लावत चौकशी केली. कलिता जीपपाशी पोचला होता. माझ्या नावावरून त्या बाबाला काही बोध झाला नसावा. पण ‘बंगाली आहेस का?’ असं त्याने विचारल्यावर ‘नाय, मोय बॉम्बेलगा मानु असे’ अशी मी ओळख दिली अन् बाबा एकदम सैलावला. अख्ख्या नॉर्थ-ईस्टमध्ये मुंबईची खाशी ओळख आहे. पण त्याचं श्रेय ‘मराठी माणसाला’ नाही, तर सिनेमावाल्यांना आहे. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये हिंदी सिनेमांसारखं दुसर्‍या कुणाचंच योगदान नाही!
टॉर्चच्या प्रकाशात खात्री पटली, की बाबा ‘मिया’ आहे. कलिता त्याच्या आसामी भयाण इंग्रजीत म्हणाला, लगेच निघू. गाडीवर लटकलेल्या ‘आसू’चा झेंडा ओळखून मियाबाबा देखील थबकला. गुरूंग उठून बसला. कलिता पुन्हा इंग्रजीत म्हणाला, ‘ही सगळी वस्ती मियांची दिसते. आपण निघूच.’ मी त्याला हाताने थांबवत मिया-बाबाला म्हटलं, ‘पानी मिलेगा?’ तो लगबगीने घराच्या ओसरीकडे वळला आणि तांब्यात पाणी घेऊन आला. मी पाणी घेतलं. कलिता तसाच उभा राहिला. वाटलं या बाबाशी बोलावं. म्हटलं, ‘बाबा, बिडी पिलाओ।’ त्याने यंत्रवत विडी आणि आगपेटी पुढे केली. ती तशीच हातात ठेवून त्याला मी कशासाठी, कुठे चाललो अन् कशासाठी आलो हे सांगितलं. तो आपला चुप्पच.
इकडे कलिताची चुळबुळ वाढली होती. मला पण वाटलं, निघावं आता. म्हटलं, ‘जाबो दे!’ मी वळणार तोच मियाबाबा ‘येतीया आमी कोठपरा जाबो दे? (आता आम्ही कुठे जावं?) असं म्हणून धबाधबा बोलू लागला- बापाचं बोट धरून बांगलादेशातून सिल्चरला आलो. तेथून भटकत-भटकत वेगवेगळी कामं करत इथे टेकलो. बोरठाकूर म्हणून मोठे शेतकरी होते. त्यांची जमीन बटाईत घेऊन माझा अबू इथेच खपला आणि मेला. या गोष्टीला आता २५-३० वर्षं झाली. तीच जमीन मग मी कसू लागलो. माझी बायको कमला, आसामी हिंदू आहे. मुलगा उस्मान. सुनेचं नाव शांती. ती शेजारच्या गावातल्या आसामी कुटुंबातील आहे. तिचा बाप नेपाळी आहे... मियांने चित्रगुप्ताची खतावणीच देणं सुरू केलं.
आमची बडबड वाढली असावी. कारण आसपासच्या पाच-सात घरांतील बायका-माणसं जमा झाली. आणि शिवसागरच्या त्या अंधार्‍या ढगाळ मध्यरात्री तिथे आमची ‘परिषद’ झाली. वस्ती मियांची होती का? म्हटलं तर हो; बघितलं तर नाही. तिथे एक ‘वर्किंग’ मानवतावाद गुण्यागोविंदाने नांदत होता. अर्ध्या-पाऊण तासाच्या गप्पांच्या ओघात ‘पिठा’(तांदुळापासून बनलेला चपटा, गोल, गोडसर आसामी पदार्थ) आला. झालमुडी (बचकाभर मिरची घातलेले मुरमुरे) आली. आणि चक्क चहा! कलिताने देखील लगबगीत तीन ‘पिठे’ उडवले. मी बघतो आहे हे बघून चौथ्यासाठी गेलेला हात त्याने मागे घेतला. म्हटलं, मास्तर नरम पडला. पक्क्या आसामींना फार काळ कुठलाच अभिनिवेश न मानवणारा. गुरूंग तर जणू या वस्तीत आपण खाण्यासाठीच बसलो आहोत असा भिडला होता. चहाचा कटोरा संपवत मी उठलो. अन् पुन्हा टॉर्चच्या प्रकाशात जीप रस्त्यावर रांगू लागली.


“ब्याह करीबो...?” (माझ्याशी लग्न करशील?)
या प्रश्‍नाने मी ताडमाड उडालो...

• • • • • • • 
संपूर्ण लेख वाचा अनुभव सप्टेंबर २०१८ अंकात!


• सप्टेंबर २०१८ ई-अंक - किंमत फक्त ₹३० • अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹६५० • अनुभव मासिक PDF अंक वार्षिक वर्गणी - ₹३००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८