इरफान खान : ‘गुस्ताखी माफ!’ - मुकेश माचकर । अनुभव सप्टेंबर २०१८
• शंकर हे आर. के. लक्ष्मणांच्या पिढीतले जबरदस्त व्यंगचित्रकार. ‘लक्ष्मण’ रेषा गुदगुल्या करायची, शंकर यांची रेषा बोचकारायची. तरीही पंडित नेहरूंनी त्यांना सांगितलं होतं, ‘डोन्ट स्पेअर मी’. आदरापोटी किंवा साक्षात पंतप्रधानांवर टीका कशी करायची, या कल्पनेने धास्तावून जाऊन शंकर यांनी आपल्याला बख्शू नये अशी नेहरूंची अपेक्षा होती... त्याच शंकर यांच्या एका व्यंगचित्रावर अखिल भारतीय महिला परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष राजकुमारी अमृत कौर यांनी आक्षेप घेतला होता. या व्यंगचित्रातून महिलांचा अवमान होतो असा त्यांचा दावा होता. त्यांनी ही तक्रार महात्मा गांधींकडे नेली आणि एक भलं मोठं आरोपपत्रच वाचून दाखवलं. शंकर यांनी आपल्या व्यंगचित्रांमध्ये असायच्या तेवढ्याच ओळींमध्ये त्रोटक खुलासा दिला आणि मग गांधींनी ते व्यंगचित्र पाहिलं. खो खो हसत ते म्हणाले, “शंकर, तुझी निर्दोष मुक्तता झाली रे!’
...आज महात्मा गांधी हयात असायला हवे होते असं अनेकांना अनेक कारणांनी वाटतं. व्यंगचित्रकार इरफान खान यांना या किश्शातल्या त्यांच्या परिपक्वतेमुळे त्यांची तीव्रतेने आठवण झाली असेल... कारण त्यांच्या एका व्यंगचित्रातून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश वाय. के. सभरवाल यांचा अवमान झाल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. ‘मिड डे’ या सायंदैनिकात प्रसिद्ध झालेल्या या व्यंगचित्रामुळे त्या सायंदैनिकाचे प्रकाशक, संपादक आणि निवासी संपादक यांनाही हीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. तो खटला अजून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे...
इरफान खान यांना व्यंगचित्रकार म्हणून ओळखणार्या कोणालाही हे वाचून धक्काच बसेल. व्यंगचित्रं तिखट असत नाहीत का?... असतात. व्यंगचित्रांमधून कशाचीही विटंबना होत नाही का?... होते. एखादं व्यंगचित्र एखाद्या व्यक्तीला झोंबून अवमानकारक वाटू शकत नाही का?... वाटू शकतंच. पण, इरफान खान यांचं व्यंगचित्र झोंबतं, अपमान करतं, यावर विश्वास बसणं अशक्य.
राष्ट्रीय पातळीवर दोन इरफान व्यंगचित्रकार म्हणून गाजले. इरफान खान आणि इरफान हुसैन. काही वर्षांपूर्वी इरफान हुसैन यांची संशयास्पद हत्या झाली. आता इरफान खान हे एकटेच इरफान या स्तरावर उरले आहेत. उत्तर भारतासारख्या अतिशय तीव्र धार्मिक ध्रुवीकरण झालेल्या भागामध्ये, ‘काऊ बेल्ट’ म्हणून ओळखल्या जाणार्या हिंदुत्ववादी पट्ट्यामध्ये इरफान हुसैन आणि इरफान खान यांनी निर्भीडपणे मुख्य प्रवाहात वावरणं आणि राजकारणातल्या, समाजकारणातल्या असंख्य मान्यवरांच्या टोप्या उडवणं आश्चर्यकारक आहे. इरफान खान लखनऊमध्ये १९९२च्या प्रज्वलंत कालखंडात नवभारत टाइम्समध्ये आले तेव्हा त्या शहरातली राजकीय व्यंगचित्रांची परंपराच बंद पडलेली होती. इरफान यांच्या व्यंगचित्रांना असा प्रतिसाद मिळाला, की काही महिन्यांतच बाकी सर्व वर्तमानपत्रांना पॉकेट कार्टून्स सुरू करावी लागली. ‘तू तुझ्या धर्माचं बघ, तू आमच्या धर्माबद्दल बोलू नको, आमच्या देवीदेवतांची-नेत्यांची विटंबना करण्याआधी पैगंबरांचं व्यंगचित्र काढून दाखव,’ अशा एकंदर बौद्धिक युक्तिवादाचा वकूब असलेल्या काळात वावरून (इरफान १९८२पासून व्यंगचित्रं काढतायत, म्हणजे बाबरी पतनपूर्व धुमाळी, बाबरी पतन, दंगली, स्फोट, धर्मवाद्यांचे उठाव या सगळ्यावर त्यांनी व्यंगचित्रं काढलीच असणार.) त्यांच्यावर कोणाही राजकीय नेत्याने किंवा त्यांच्या चेल्याचपाट्यांनी खटले भरल्याची नोंद नाही (फोनवरून मातृपितृकुलाची प्रेमळ विचारपूस झालीच नसेल असं काही ठामपणे सांगता येणार नाही). उलट, त्यांनी ज्यांची रेवडी उडवणारी व्यंगचित्रं काढली त्यांच्यापैकी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अनेक पक्षांच्या मांडवांखालून फिरणारे अमरसिंग आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव या महानुभावांनी वेळोवेळी इरफान यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनांची उद्घाटनं केली, त्यांच्या नियतकालिकाचं प्रकाशन केलं, त्यांच्या व्यंगचित्रांची तारीफही केली. मध्य प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांनी कधी मतदानविषयक जागृती मोहिमांसाठी, तर कधी ‘बेटी बचाओ’सारखे सामाजिक संदेश देण्यासाठी इरफान यांच्या व्यंगचित्रकलेची अधिकृतपणे मदत घेतली...
...आता या घुसळणीच्या काळात एक मुख्य प्रवाहातला, राष्ट्रीय स्तरावरचा, रोज राजकीय सामाजिक व्यंगचित्रं काढणारा व्यंगचित्रकार राजकीय मंडळींच्या रोषाचा कधी धनी झाला नाही, आणि त्याच्यावर न्यायालयाने रुष्ट व्हावं हे आश्चर्यकारक आहे... त्यामुळेच सर्व प्रसारमाध्यमांनी या शिक्षेचा आणि अतिसंवेदनशीलतेचा तेव्हा कडकडीत निषेध केला होता.
इरफान यांची चित्रकला आर. के. लक्ष्मण यांच्या जातकुळीतली. नखं आत खेचून निव्वळ पंज्यांनी समोरच्याला गुदगुल्या करणारी. लक्ष्मण यांचं जग प्रौढ आहे, रेषा पोक्त आहे, तिच्यातल्या स्केचेसमध्ये प्रमाणबद्ध सुघडता आहे, तपशील आहेत; इरफान यांची रेषा मात्र शैशवाच्या आसपास बागडणारी आहे. चित्रकलेत गती असलेल्या खट्याळ मुलाने बेफिकिरीने काढावीत तशी त्यांची व्यंगचित्रं आहेत. लहान मुलांच्या निष्पाप नजरेतून हा माणूस सगळ्या जगाकडे पाहतो आहे, ही भावना त्यांच्या सर्व व्यंगचित्रांमधून जागी होते.
हे भलतंच विस्मयकारक आहे. व्यंगचित्रकारही माणूस असतो. त्याच्यात आयुष्यातल्या टप्प्यांनुसार बदल होत जातात. तो प्रगल्भ होत जातो, त्याचप्रमाणे त्याला रोज एकच काम करून सृजनाचाही कंटाळा यायला लागतो. त्याच्या कल्पना साचीव व्हायला लागतात, त्याचप्रमाणे रेषा नकळत पोक्त होते, मांडणीत ठहराव येतो, खोली येते. हळूहळू व्यंगचित्रांचा पोत बदलतो आणि त्यांचं अवगाहन वाचकाच्या मनाकडून बुद्धीकडे सरकू लागतं... हे सगळं प्रगल्भता म्हणून लोभस आणि हवंहवंसं वाटलं तरी अनेकांची व्यंगचित्रकला त्यात हरवून जाते. ते भाष्यचित्रकार कधी बनून गेले ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. इरफान यांची व्यंगचित्रकलाही भाष्य करतेच, पण ती गंभीर भाष्यप्रधान बनलेली नाही. तिच्यामध्ये एक लहान मुलांना साजेसा उत्साह, रेषेत ते बागडणं आणि मांडणीत तो नवथर विस्कळीतपणा अजूनही कायम आहे आणि त्यामुळेच इरफान यांची व्यंगचित्रं काळानुसार बदललेली दिसत नाहीत. त्यांची लोकप्रियता याच गुणांच्या बळावर अनेक दशकं कायम आहे.
• •
‘गुस्ताख़ी माफ’ हे इरफान यांच्या एकंदर व्यंगचित्रकलेचं प्राणतत्त्व असल्याचं दिसतं. हा काही निव्वळ शब्दप्रयोग नाही. ही हिंदी भाषेची, समाजाची एक परंपरा आहे. ‘थोडासा गुन्हा करणार आहे, तो सहन करा’ असं सांगण्याची ही पद्धत आहे. तुम्हाला वाईट वाटेल, तुम्हाला रुचणार नाही, पण आधीच तुमची क्षमा मागून हे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे, असा हा पवित्रा आहे. इरफान यांच्या व्यंगचित्रकलेत सतत हा पवित्रा जाणवत राहतो. त्यांनी काढलेला चिमटा योग्य जागी कळ पोहोचवतोच, पण चेहरा हसरा ठेवायला गत्यंतर नसतं. कारण हा गुबगुबीत गोल चेहर्याचा, पन्नाशी उलटल्यानंतरही बालसुलभ उत्साही दिसणारा, अतिशय शांत स्वभावाचा आणि कायम आनंदी दिसणारा व्यंगचित्रकार पाहिल्यावर त्याच्यावर रागावण्याची इच्छाच होत नसावी...
• • • • • • •
संपूर्ण लेख वाचा अनुभव सप्टेंबर २०१८ अंकात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा