मेळघाटातील व्रतस्थ : डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे - मृणालिनी चितळे । अनुभव ऑक्टोबर २०१८
मेळघाटातल्या दुर्गम वस्त्यावाड्यांचं नाव आजवर उर्वरित महाराष्ट्रात ऐकू यायचं ते तिथल्या कुपोषणामुळे, मूलभूत सोईसुविधांपासून वंचित असलेल्या कोरकूंच्या दयनीय अवस्थेमुळे. पण गेल्या काही वर्षांमध्ये मेळघाटात काम करणार्या काही व्यक्ती आणि संस्थांमुळे ही परिस्थिती बदलाच्या मार्गावर आहे. अशा बदल पेरणार्या माणसांमध्ये डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांचं नाव अग्रगण्य म्हणावं लागेल.मेळघाट! सातपुडा पर्वताच्या दुर्गम भागातील घनदाट अरण्यप्रदेश. तेथील बैरागड म्हणजे जेमतेम दोन हजार वस्तीचं गाव. दारिद्य्राने पोखरलेलं, अज्ञानाने पिचलेलं आणि आजाराने ग्रासलेलं. १९८५ साली अशा गावात जाऊन झाडाखाली दवाखाना थाटण्याचा जगावेगळा प्रयोग करण्याचं डॉ. रवींद्र कोल्हे यांनी ठरवलं. त्यांनी पहिल्यांदा गावात प्रवेश केला तेव्हा जुजबी औषधं, चार-आठ दिवस पुरेल एवढी शिधासामग्री, वैद्यकीय पदवी आणि आपल्या ज्ञानावरचा विश्वास, एवढंच काय ते त्यांच्यापाशी होतं.
जडीबुटीवर विश्वास ठेवणारे तेथील आदिवासी आपल्याला स्वीकारतील की नाही याबद्दल खात्री नव्हती. परंतु पहिल्या दिवशी उलट्या-जुलाबांनी हैराण झालेल्या रुग्णाला त्यांनी औषध दिलं. रुग्ण वाचला. लोकांना हा चमत्कार वाटला. कारण आतापर्यंत उलट्या-जुलाब सुरू झाले की तेथील माणसांचं मरण अटळ असायचं. त्या दिवसापासून त्यांच्याकडे रुग्णांचा ओघ सुरू झाला. ते तिथे पोचल्यानंतर पंधराव्या दिवशी घडलेला प्रसंग. कैलास नावाचा एक वर्षाचा मुलगा त्यांच्या दवाखान्यात भरती झाला. त्याला मेनेंजेटिस झाला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्याजवळ पुरेशी औषधं नव्हती. चाळीस कि.मी. दूर असलेल्या गावात औषधं आणायला त्यांनी माणूस पाठवला. मुलाची तब्येत खालावत चाललेली पाहून डॉक्टरांविषयी सहानुभूती असलेल्या गावकर्यांनी मुलाला घरी पाठवून द्यायचा सल्ला दिला. कारण दवाखान्यात मुलाचं काही बरंवाईट झालं असतं तर डॉक्टरांबद्दलचा विश्वास उडाला असता. त्या वेळी डॉक्टरांनी विचार केला, इथे आपण कशासाठी आलो आहोत? व्यवसाय नीट चालावा म्हणून की लोकांवर उपचार करायचे आहेत म्हणून? रात्रभर जागून ते मुलावर उपचार करत राहिले. पहाटे पहाटे ते मूल गेलं तेव्हा काहीजण त्यांना मारायला धावले; परंतु डॉक्टरांची तळमळ ज्यांच्यापर्यंत पोचली होती त्या ग्रामस्थांनी त्यांना आवरलं. कैलासची आई आपल्या मुलाच्या मृतदेहाकडे पाहत रडत रडत म्हणाली, “अरे, मेरे लिये नहीं लेकिन इस डाक्तर के मेहनत के खातिर तुम्हें जिन्दा रहना था।” त्या क्षणी डॉक्टरांना वाटलं की आपल्याला मिळालेला हा सर्वांत मोठा पुरस्कार आहे.
इथून पुढे गावकर्यांचा त्यांच्यावरचा विश्वास दृढ होत गेला. हिवताप, घटसर्प, डांग्या खोकला, साथीचे आजार, क्षय अशा रुग्णांचा ओघ त्यांच्याकडे सुरू झाला. त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टर स्वतःची तहान-भूक तर विसरायचेच, शिवाय जन्मल्यापासून त्यांना असलेल्या हृदयविकाराच्या आजाराचाही त्यांना विसर पडायचा. जन्मतःच त्यांच्या ह्रदयाला छिद्र होतं. त्या आजारापायी शाळेत असताना त्यांना कधी मैदानावर जाऊन मनसोक्त खेळता आलं नव्हतं. शाळाही अनेकदा बुडायची. घरची सांपत्तिक स्थिती बरी नसली तरी वडील रेल्वेमध्ये नोकरीला असल्यामुळे सरकारी रुग्णालयात उपचार घेणं शक्य झालं होतं; परंतु उपयोग झाला नव्हता. अशा परिस्थितीत रडत-कुढत न बसता डॉक्टरांनी पुस्तकांशी मैत्री केली. महात्मा गांधी, विनोबा, गाडगेबाबा यांच्या साहित्याने त्यांच्या मनाची पकड घेतली. शारीरिक दुर्बलतेवर ते मात करू शकत नसले तरी मानसिक कणखरपणा त्यांना पुस्तकांच्या संगतीमध्ये कमावता आला. पुढे कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.
वैद्यकीय शिक्षण घेत असताना आयुष्यात आपल्याला काय करायला आवडेल याविषयीच्या कल्पना त्यांच्या मनात आकार घेऊ लागल्या. आतापर्यंतचं त्यांचं आयुष्य मृत्यूच्या छायेत व्यतीत झालं होतं. त्यांच्या आजारपणात अनेकांनी त्यांना मदत केली होती. आपणही आपलं आयुष्य दुसर्याचं जगणं सुसह्य आणि आनंददायी होण्यासाठी कारणी लावायचं त्यांनी ठरवलं. याच सुमारास डेव्हिड व्हर्नर यांचं ‘व्हेअर देअर इज नो डॉक्टर’ हे पुस्तकं वाचनात आलं, जे त्यांच्या आयुष्याला दिशा देणारं ठरलं. त्यांनीही ठरवून टाकलं, शिक्षण पूर्ण झालं की ज्या गावात डॉक्टर नाही अशा गावी जाऊन आपण काम करायचं. त्यासाठी बैरागड या गावाची निवड करण्यापूर्वी त्यांनी ३७ संस्थांना भेटी दिल्या, तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास केला. संस्थागत जीवनपद्धतीत आपण रुजणार नाही याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे एकट्याच्या बळावर आपलं काम सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं.
डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे |
आतापर्यंतचं आयुष्य शहरात गेलेल्या स्मिताताईंच्या वाट्याला लग्न झाल्या झाल्या सर्वस्वी अपरिचित जगणं आलं. झोपडीवजा कच्चं घर. चुलीवर स्वयंपाक. शेणाने घर सारवणं, विहिरीवरून पाणी आणणं. वीज नाही, फोन नाही. परंतु या कशाबद्दल त्यांची तक्रार नव्हती. त्यांना एकच खंत वाटू लागली, की त्यांना डॉक्टर म्हणून स्वीकारायला कुणी तयार नव्हतं. एक बाई डॉक्टर असू शकते ही गोष्ट गाववाल्यांच्या पचनी पडत नव्हती. त्यांच्या दृष्टीने त्या फक्त ‘नरस बाई’ होत्या. परंतु एकदा वाघाच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या तरुणाला घेऊन गावकरी त्यांच्या दवाखान्यात आले. त्या वेळी डॉक्टर गावात नव्हते. स्मिताताईंनी एकटीने चारशे टाके घालून त्या रुग्णाचे प्राण वाचवले. त्यानंतर डॉक्टरीणबाई म्हणून गावाने त्यांना स्वीकारलं. डॉक्टरांच्या बरोबरीने त्यांनी असंख्य रुग्णांवर उपचार केले....
(संपूर्ण लेख वाचा अनुभव ऑक्टोबर २०१८ अंकात)
• • • • •
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा