आदिवासी विद्यार्थ्यांची मराठीशी नाळ जोडण्यासाठी.. - आनंद अवधानी । अनुभव ऑक्टोबर २०१८
नानाविध बोलीभाषा असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची मराठीशी नाळ जुळावी यासाठी बालभारतीच्या पहिली ते तिसरीच्या पुस्तकांचा बोलीभाषांमध्ये अनुवाद करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या ‘आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे’तर्फे हाती घेण्यात आला आहे. त्यापैकी ११ बोलीभाषांमधील अनुवादाचा पहिला प्रायोगिक टप्पा नुकताच पार पडला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल.• गेल्या वर्षीची गोष्ट. धुळ्यातल्या काही आदिवासी आश्रमशाळांमध्ये फिरत होतो. मुलांशी बोलत होतो. लक्षात आलं, की इथल्या सातवी-आठवीतल्या मुलांनाही मराठीच्या पुस्तकातले धडे घडाघडा वाचता येत नव्हते. शिक्षकांना विचारलं, तर ते म्हणाले, ‘काय करणार? या मुलांची बोलीभाषा काही मराठी नाही. घरी ते मावची किंवा भिल्ली भाषा बोलतात. मराठीतून सगळे विषय शिकणं त्यांना इंग्रजी शिकण्याइतकंच अवघड जातं. त्या गोंधळात ना नीट विषय समजतात, ना मराठी भाषा पक्की होते. ही पोरं कुठे तरी मध्येच लटकतात झालं!’
महाराष्ट्रातल्या एखाद्या शाळेत मुलांची मातृभाषा मराठी नसेल याचा आपण शहरातली मध्यमवर्गीय मंडळी कदाचित विचारही करू शकणार नाही, पण वस्तुस्थिती तशी आहे खरी.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात फिरणार्या कार्यकर्त्यांना-अभ्यासकांना मात्र हा प्रश्न नवीन नाही. महाराष्ट्रात अकरा कोटींपैकी जवळपास नऊ टक्के, म्हणजे सुमारे एक कोटी लोकसंख्या आदिवासींची आहे. या आदिवासींपैकी कोणत्याच जमातीची बोलीभाषा मराठी नाही. विदर्भात गोंडी, माडिया, कोलामी, कोरकू; खानदेशात भिल्ली, मावची, पावरा, वारली; कोकणात कातकरी, पुण्यात महादेव कोळी अशा नाना आदिवासी जमाती त्यांच्या त्यांच्या बोलीभाषा बोलतात; पण शाळेत दाखल झाल्यावर मात्र अचानक आपली मातृभाषा मराठी असल्याचा शोध त्यांना लागतो. आई-वडील आणि बालपणाच्या परिसरापासून लांब आलेली मुलं आधीच भेदरलेली असतात, त्यात हातातली ‘बालभारती’ची पुस्तकं आणि शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेले त्यातले शब्द यांच्याशी त्यांना जुळवून घेता येत नाही. त्यामुळे पहिलीपासून पाचवी-सहावीपर्यंतच्या भाषेचा पाया कच्चा राहतो. बाकी सर्व विषयही मराठीतूनच शिकायचे असल्याने तेही कच्चे राहतात. परिणामी, पुढच्या इयत्तांमध्ये विद्यार्थी कसाबसा उत्तीर्ण होत गेला तरी शिकत मात्र नाही. त्यानंतर कधी तरी या विद्यार्थ्यांना नागरी भागातल्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागते, ज्यात त्यांचा टिकाव लागणं शक्य नसतं.
यातला आणखी एक प्रश्न असा, की आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षकही कधी आदिवासी समाजातले असतात तर कधी बिगर आदिवासी असतात. आदिवासी समाजातले असले तरी त्यांची आणि विद्यार्थ्यांची बोली एकच असेल असं नाही. म्हणजे विद्यार्थी भिल्ल बोली बोलत असतील तर शिक्षक वारली असतात, आणि दोघांना मिळून मराठी पुस्तकांशी सामना करायचा असतो. शिक्षक जर बिगर आदिवासी असतील तर काय, सगळा आनंदीआनंदच!
अर्थात हा प्रश्न काही आजचा नाही. शिक्षणतज्ज्ञांमध्ये यावर बरीच वर्षं चर्चा-मतमतांतरं सुरू आहेत. उदा. चाळीस वर्षांपूर्वी डॉ. अशोक केळकर यांनी असं लिहून ठेवलेलं आहे, की ‘शासक-समाजसेवक-शिक्षक आणि नागरिक यांनी एकत्र येऊन आदिवासी मुलांच्या शिक्षणाची नाळ मराठी भाषेशी जोडली पाहिजे.’ भाषातज्ज्ञ म्हणून डॉ. केळकर यांना पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळाले, पण त्यांच्या सूचनेप्रमाणे कृती केली गेली नाही. ही कृती करण्याच्या दृष्टीने चर्चिला गेलेला उपाय म्हणजे मराठी पाठ्यपुस्तकांचा त्या त्या बोलीभाषांमध्ये भावानुवाद करणं. काही आश्रमशाळांमध्ये उत्साही शिक्षकांनी तसे प्रयोग केलेलेही आहेत, पण सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर आजवर हा प्रयत्न झालेला नव्हता.
ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं, मराठी पाठ्यपुस्तकांचा आदिवासी बोलीभाषांमध्ये अनुवाद करण्याच्या पायलट प्रकल्पाची मुहूर्तमेढ नुकतीच सरकारी पातळीवर रचली गेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण’ संस्थेचे आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या विषयाला भिडण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात किमान काही भाषांमध्ये तरी अनुवादाचं काम सुरू करावं असं त्यांनी ठरवलं. हे काम प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सोपवली गेली पुण्याच्या ‘मितानिन फाउंडेशन’वर. ‘मितानिन’चे संचालक डॉ. मुकुंद कुलकर्णी हे आदिवासी भागांमध्ये भरपूर फिरलेले-आदिवासी समाजजीवनाचे अभ्यासक. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून पहिली ते तिसरीच्या मराठी आणि परिसर विज्ञानाच्या पुस्तकांचा अनुवाद प्रमुख आदिवासी बोलींमध्ये करण्याचा निर्णय झाला. पण अर्थातच प्रश्न होता, की पंचेचाळीस आदिवासी जमातींच्या साठ-सत्तर बोलींपैकी नेमक्या कोणत्या बोलींपासून या कामाला सुरुवात करायची?
महाराष्ट्रातल्या अकरा आदिवासी बोलींमध्ये सुमारे ऐंशी टक्क्यांहून अधिक विद्यार्थिसंख्या सामावलेली आहे. त्यामध्ये गडचिरोली परिसरात बोलल्या जाणार्या माडिया आणि गोंडी, अमरावतीमध्ये कोरकू, यवतमाळ-चंद्रपूरमध्ये कोलामी, ठाणे-पालघरमधली वारली आणि नंदुरबार-धुळे-नाशिक परिसरातल्या मावची, कोकणा, पावरी या बोली, तर भिलावू, वसावी आणि माथवाडी या भिल बोलीच्या उपबोलींचा समावेश होता. अशा अकरा बोलींमध्ये ‘बालभारती’च्या पुस्तकांचा अनुवाद करण्याचं ठरलं.
हे अनुवाद कोण करेल हा अर्थातच सर्वांत महत्त्वाचा प्रश्न होता. त्यासाठी आदिवासींच्या बोली आणि मराठी या दोन्ही बाबी व्यवस्थित अवगत असलेल्या अनुवादकांची गरज होती. आयुक्त कार्यालयातील कर्मचारी आणि ‘मितानिन’ची टीम यांच्यात यावर बरीच चर्चा झाली. आश्रमशाळांमध्ये शिकवणारे आणि त्या त्या बोलीभाषा बोलणारे शिक्षक हेच या कामासाठी सर्वोत्तम ठरतील यावर सगळ्यांचं एकमत झालं. शिवाय, हे शिक्षक मुलांना तोच अभ्यासक्रम शिकवत असल्यामुळे मुलांचे प्रश्न त्यांना चांगले माहिती होते आणि या अनुवाद प्रकल्पाचा मुलांना किती उपयोग होऊ शकतो याचीही त्यांना जाणीव होती. त्यामुळे आश्रमशाळेतील शिक्षकांकडूनच हे काम करवून घेण्याचा निर्णय चर्चेअंती झाला. त्यानंतर आयुक्त कार्यालयाकडून गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांमधल्या मराठी आणि संबंधित आदिवासी बोली अशा दोन्हींवर प्रभुत्व असलेल्या शिक्षकांचा शोध सुरू केला.
आश्रमशाळांनी शिफारस केलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कौशल्यांची तपासणी करण्यासाठी ‘मितानिन’च्या टीमने गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये दौरे केले. जवळजवळच्या तालुक्यांतील शिक्षकांना एका ठिकाणी बोलावून त्यांच्या चाचण्या घेतल्या गेल्या. त्यामध्ये त्यांचं भाषांचं ज्ञान, अनुवाद करण्याची क्षमता आणि आदिवासी बोलीतील शब्दसंग्रह या बाबींची खातरजमा केली गेली. या शिक्षकांची निवड योग्यप्रकारे होण्यावर प्रकल्पाची परिणामकारकता अवलंबून होती. त्यातून अकरा बोलींमधल्या मिळून पन्नास शिक्षकांची निवड झाली. हे पन्नास शिक्षक एकत्रित बसून काम करतील आणि प्रकल्प पूर्णत्वास नेतील असं नियोजन करण्यात आलं.
राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत आणि भागांत पसरलेले हे शिक्षक एकत्र आणण्यासाठी पुणे हे मध्यवर्ती ठिकाण सोयीचं ठरेल असं सर्वांचं मत पडलं. त्याप्रमाणे पुण्यात ही कार्यशाळा घ्यायचं नक्की झालं. ठरलेल्या दिवशी पन्नास आदिवासी शिक्षक पुण्यात दाखल झाले.
प्रत्येक बोलीभाषेचा गट अनुवादाचं हे आगळंवेगळं काम करण्यासाठी उत्सुक होता. काही गटांमध्ये सात-आठ शिक्षक होते, तर काही गटांमध्ये दोघं-तिघंच होते. भिल्ली भाषेतील एका उपबोलीच्या कामासाठी तर एकच शिक्षिका आल्या होत्या. मात्र, उत्साहाच्या बाबतीत कोणताही गट मागे नव्हता. प्रत्येक गटाकडे पहिली ते तिसरीची बालभारतीची आणि तिसरीचं परिसर विज्ञानाचं अशी चार पुस्तकं सोपवण्यात आली. अनेक वर्षं एका चाकोरीत काम करावं लागलेल्या शिक्षकांसाठी हा खूपच वेगळा अनुभव होता. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण काही तरी ठोस काम करणार आहोत याचा आनंद त्यांच्या चेहर्यांवर दिसत होता.
पहिला एक दिवस हे काम कसं करायचं, कोणत्या नियमाने करायचं यावर चर्चा करण्यात आणि शिक्षकांच्या शंका दूर करण्यात गेला, पण दुसर्या दिवशीपासून शिक्षक जे कामाला भिडले ते भिडलेच. दररोज सकाळी न्याहारी झाल्यावर काम सुरू व्हायचं ते जेवण आणि चहाचा वेळ सोडला तर संध्याकाळी सहा-सातपर्यंत नॉनस्टॉप चालू असायचं. प्रत्येक गट आपापल्या कामात पूर्ण बुडून गेलेला दिसायचा. कोणत्या शब्दासाठी आपल्या बोलीतला कोणता शब्द चपखल बसतो यावर चर्चा सुरू असायच्या. एखादा शब्द काही करून आठवत नाही म्हटल्यावर त्यांच्या जमातीतल्या जुन्याजाणत्या माणसांना फोन लावले जायचे. शब्दांच्या छटांबद्दल वादविवाद करून एक शब्द नक्की केला जायचा. कवितांचे अनुवाद करताना यमक जुळवण्यासाठी मशक्कत सुरू असायची. त्यात दिवस कसा संपायचा हे शिक्षकांना कळायचंही नाही. एवढंच काय, दिवसभराचं शिबिर संपल्यानंतर आणि रात्रीची जेवणं झाल्यावरही होस्टेलवर कामं सुरू व्हायची. कुठल्या तरी गटाची दिवसभरात अडलेल्या एखाद्या शब्दावर चर्चा झडायची. एखादा गट आज हा पाठ संपवायचाच असं म्हणत कामाला भिडलेला असायचा. असं मान मोडून काम करायची सवय राहिलेली नाही, अशी तक्रार ही मंडळी करायची, पण त्या तक्रारीत एक आनंदही लपलेला असायचा. काही तरी आव्हानात्मक काम करायला मिळण्याचा आनंद आणि आपल्या जमातीतल्या मुला-मुलींसाठी एक महत्त्वाचं काम आपल्या हातून घडतं आहे याचं समाधानही.
एकुणात, एका वेगळ्याच जोशात हे शिबिर पार पडलं. खरं तर चार पुस्तकांचा अनुवाद दहा दिवसांत पूर्ण करणं हे सोपं आव्हान नव्हतं; पण शिक्षकांनी अक्षरशः झपाटल्यासारखं काम करत ते पूर्ण केलं. दहाव्या दिवसाच्या सायंकाळी साडेचार हजार पानांचा ऐवज अनुवाद करून तयार होता. शिक्षकांच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी आयुक्तांच्या सहीने सर्व शिक्षकांना प्रशस्तिपत्र देण्यात आलं. त्या वेळी अनेक शिक्षकांनी या शिबिराबद्दलच्या आपल्या भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. आदिवासी मुलांचा मराठी भाषेशी अन् विविध विषयांशी सांधा जुळण्यासाठी या अनुवादाचा नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास प्रत्येक शिक्षक व्यक्त करत होता. आपल्या हातून काही तरी महत्त्वाचं काम पार पडल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यांवर ओसंडून वाहत होता. त्यांचे गहिवरलेले आवाज बरंच काही सांगून जात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत तळमळीने काम करणारे अनेक शिक्षक आजही आहेत याचा आणखी वेगळा पुरावा तो काय असणार?
हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी उपसंचालक हंसध्वज सोनावणे, आणि गौरी पुरंदरे, माधुरी यादवाडकर हे अधिकारी, तसंच संतोष सपकाळ आणि प्रकाश पायगुडे या कर्मचार्यांनी विशेष प्रयत्न केले. आयुक्त किरण कुलकर्णी आणि त्यांच्या या सहकार्यांसाठी हा त्यांच्या प्रयत्नांचं चीज झाल्याचं समाधान देणारा अनुभव होता. पण एवढ्यावर थांबणं मात्र त्यांना मंजूर नाही. हा प्रकल्प अद्याप परिपूर्ण नाही याची जाणीव सर्वांनाच आहे. अनुवादाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असला तरी हे काम दोन पातळ्यांवर पुढे चालू राहणार आहे. अनुवाद करताना अडलेले शब्द किंवा पूर्ण समाधान न झालेले मजकूर पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे शिक्षक प्रयत्न करत राहणार आहेत. दुसरीकडे या अनुवादाचा मुलांना शिकवताना कसा उपयोग होतो याची चाचपणीही हे शिक्षक प्रायोगिक पातळीवर करणार आहेत. तशी सुरुवातही या शिक्षकांनी आपापल्या ठिकाणी केली आहे. त्याचे परिणामही लगेचच दिसून येऊ लागले आहेत. या अनुवादाचा उपयोग करून शिकवताना येणार्या अडचणींचा विचार करून त्यात सुधारणा करत जाणं, ते अनुवाद परिपूर्ण करत जाणं हेही मोठं काम आहे. शिवाय उर्वरित भाषांमधल्या अनुवादाचं शिवधनुष्यही पेलायचं आहे.
पण या प्रकल्पाच्या निमित्ताने आदिवासी शिक्षण ‘मूल’केंद्री करण्याच्या दृष्टीने एक दमदार पाऊल टाकलं गेलं आहे, एवढं निश्चित म्हणता येईल.
• आनंद अवधानी
anand.awadhani@uniquefeatures.in
• • • • •
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा