पारंपरिक वाणांच्या जतनातूनच शेतकरी वाचेल - डॉ. देबाल देब | अनुभव जानेवारी २०१९
ओडिशास्थित डॉ. देबल देब यांचं नाव आज देशातील भाताच्या पारंपरिक वाणांची जोपासना करणार्यांमध्ये अग्रणी मानलं जातं. पारंपरिक बियाणं नामशेष होत जाण्याचा प्रवास आणि हरित क्रांतीचे दुष्परिणाम यांचा डॉ. देब यांनी केलेला अभ्यास देशातील शेती मोडकळीस येण्यामागच्या कारणांवर प्रकाश टाकतो. पारंपरिक वाण संपत गेल्याने शेती परावलंबी तर बनलीच, पण देशात पोषण विषमता तयार झाली, असं मांडणार्या डॉ. देब यांच्याशी त्यांच्या कामाच्या अनुषंगाने गुरुदास नूलकर यांनी साधलेला संवाद.
खादीचा सदरा, पाठीवर एक सॅक, गळ्यात शबनम, पायात चप्पल आणि हातात बियाणांची मोठ्ठी पिशवी. साठीच्या घरातला कणखर बांध्याचा हा माणूस प्रथमदर्शनी एखाद्या संस्थेचा कार्यकर्ता वाटतो. खरोखरच डॉ. देबाल देब हे जसे पट्टीचे संशोधक आहेत तसेच हाडाचे कार्यकर्तेदेखील.
शेतीशास्त्राचं शिक्षण नसताना किंवा शेती कुटुंबात वाढलेले नसतानाही भातशेती आणि पारंपरिक वाणांच्या संशोधनाकडे आपण कसे वळलात?
पदवी वनस्पतिशास्त्राची असली तरी माझी डॉक्टेरेट जनुकीय विविधता (जेनेटिक डायव्हर्सिटी) यातली आहे. डॉक्टरेट झाल्यावर मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये दोन वर्षं पोस्ट-डॉक्टरेट अभ्यास केला. ते संपवून मी जेव्हा कोलकत्याला परत आलो तेव्हा भातशेतीतले प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. आर. एच. रिचारिया यांच्या कामाबद्दल माझ्या वाचण्यात आलं. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं, की हरित क्रांती होण्याआधी जगात दोन लाख प्रकारच्या भातांचे वाण होते. काही समनामांचे वाण काढले तरी सुमारे एक लाख दहा हजार वाण तर नक्कीच होते. हरित क्रांतीच्या संशोधनासाठी नेमलेल्या फिलिपिन्स आणि मेक्सिकोमधील दोन संस्थांनी सुरुवातीला बाजारात भाताचे संकरित वाण आणि आज जेनेटिकली मॉडिफाइड (जी.एम.) म्हणून ओळखली जाणारी बियाणं आणली. या वाणांना ‘हाय यिल्ड व्हरायटी’ म्हणजे ‘अधिक उत्पन्नाच्या जाती’ असं संबोधलं गेलं. एखादं बियाणं ‘अधिक उत्पन्न’ देणारं आहे असं म्हटलं की इतर बियाणं कमी उत्पन्न देणारं असणार, असा समज साहजिकच शेतकर्यांमध्ये पसरला. अनिश्चित हवामान, बाजारभावाचे चढ-उतार आणि वाढत्या महागाईने ग्रासलेले शेतकरी या वाणांकडे आकर्षित झाले. अनेक देशांमध्ये तिथल्या सरकारनेही हरित क्रांतीला पाठिंबा देत या वाणांचा प्रचार केला. यामुळे हरित क्रांतीच्या जेमतेम पन्नास वर्षांत भाताच्या सुमारे ९० टक्के पारंपरिक जाती नाहीशा झाल्या आणि संकरित वाणांची लागवड सर्वत्र सुरू झाली. भारतही त्याला अपवाद नव्हता.
डॉ. रिचारियांच्या अभ्यासातली ही आकडेवारी ऐकून मला मोठा धक्का बसला. बियाणांचे हे संकरित वाण आपल्या देशाला कितपत योग्य आहेत, त्यांचं पोषणमूल्य किती आहे, आपले पारंपरिक वाण खरोखरच या वाणांपेक्षा कमी प्रतीचे आहेत का, असे अनेक प्रश्न मला पडले. त्या काळी भारतातील अनेक संस्था संकरित वाणांचा अभ्यास करत होत्या, पण पारंपरिक वाणांकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष होत होतं. आपली शेती आणि शेतकरी वाचवायचा असेल तर देशातील भौगोलिक विविधतेतून आणि हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून घडलेले पारंपरिक वाण वाचवणं आणि त्यांचा सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, असं माझ्या लक्षात आलं. माझ्या जनुकीय अभ्यासाचा इथे उपयोग करून घेता येऊ शकेल असंही मला वाटलं.
त्यानंतर वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडची नोकरी सोडून मी ओडिशामध्ये भाताच्या वाणांचे प्रयोग करण्यासाठी एक शेत घेतलं. शेतकर्यांना भेटून मी भाताचे पारंपरिक वाण जमवायला लागलो. या भटकंतीत माझ्या असं लक्षात आलं, की दिवसेंदिवस या पारंपरिक वाणांची लागवड कमी होत चालली होती आणि शेतकर्यांच्या येणार्या पिढ्या संकरित जातींकडे वळत होत्या. काही वर्षांतच उरलेसुरले वाणही गायब होणार हे उघड होतं. त्यामुळेच या वाणांचं जतन करण्यासाठी काम करण्याचं मी ठरवलं. तेव्हापासून ओडिशामधील रायगडा जिल्ह्यात माझे हे प्रयोग चालू आहेत. या प्रकल्पाचं नाव आहे ‘बसुधा’.
तुमचं काम प्रामुख्याने बंगाल आणि ओडिशा येथील भातांच्या जातींवर आहे. या प्रदेशातील भातशेतीत तुम्हाला काय आढळलं?
बंगालमधील भाताच्या पारंपरिक वाणांची दप्तरी नोंद आहे का याचा शोध मी घेऊ लागलो तेव्हा मला तसं कोणतंही रेकॉर्ड मिळालं नाही. शेवटी मी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी केली. या इन्स्टिट्यूटमध्ये १९६५ साली बंगालमधून भाताचे ४५६० वाण संशोधनासाठी आले होते. यावरून या संस्थेने बंगालमध्ये त्या काळी ५५०० वाण असतील असा अंदाज लावला. मग मी बंगालमधील शेतकर्यांमध्ये शोध घ्यायचं ठरवलं. पहिल्या वर्षी मला फक्त ३०० पारंपरिक वाण मिळाले. हे काम गेली पंचवीस वर्षं सुरू आहे. त्या काळात आम्हाला फक्त ४५० वाणांचा शोध लागला आहे. ४५० वाणांचा हा बंगालमधला सर्वांत मोठा संग्रह आमच्या ‘बसुधा’ संस्थेमध्ये आहे. यावरून आपल्याकडेही हरित क्रांतीच्या काळात ९० टक्के वाण नाहीसे झाले, असा अंदाज बांधता येतो. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आय.सी.ए.आर.) अंदाजाने संपूर्ण भारतात एक लाख दहा हजार जातींपैकी आज भाताच्या फक्त ७००० जाती शिल्लक असतील.
त्याही वेळी आपल्या देशात वाघ, गेंडा, माळढोक अशा नजरेत येणार्या प्रजातींच्या रक्षणासाठी मोठा लढा चालू होता, परंतु भाताच्या जनुकीय विविधतेचा किती मोठ्या प्रमाणात नाश होत आहे याबाबत मात्र कमालीची अनास्था होती. सामान्य नागरिक तर सोडाच, पण शास्त्रज्ञांमध्येही याबाबत जागृती नव्हती. त्यामुळे देशातील भातवाणांच्या विविधतेच्या रक्षणासाठी हा लढा आम्ही चालू केला.
पण हरित क्रांतीतून आपण शेतीत स्वयंपूर्ण झालो. संकरित वाणांनी व तंत्रज्ञानाने आपल्याला अन्नसुरक्षा मिळाली याची दाखल घ्यायला नको का? पारंपरिक वाणाने हे शक्य होतं का?
पहिली गोष्ट अशी, की आपण शेतीत स्वयंपूर्ण आहोत हा समज साफ चुकीचा आहे. आपल्याला मोन्सँटो, सिंजेन्टा आणि केमचायना अशा अमेरिकन आणि चायनीज कंपन्या बियाणं पुरवतात. बायर, बी.ए.एस.एफ. डाव, द्यूपोंत अशा जर्मन, अमेरिकन आणि जपानी कंपन्यांच्या तंत्रज्ञानाने खतं आणि कीटकनाशकं तयार होतात. देशात पाण्याचे पंप जपानी, ब्रिटिश आणि जर्मन कंपन्यांशी सहकार्य करून आले. आजही त्यात के.एस.बी. आणि सिमेन्ससारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. यामुळे झालं काय, तर आपल्या शेतकर्यांनी बिया साठवण करण्याच्या पारंपरिक पद्धती सोडून दिल्या. शेतीची अवजारं बनवण्याची कला संपून गेली. सेंद्रिय शेती मागे पडली आणि पारंपरिक शेती पद्धती सोडून संपूर्ण देश एकसुरी लागवडीच्या मागे लागला. फक्त आठ ते दहा कंपन्या मिळून जगातील शेतीचा सर्व कच्चा माल बनवतात. आपली शेती पूर्णपणे या कंपन्यांवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत आपली शेती स्वायत्त किंवा स्वयंपूर्ण आहे, असं कसं म्हणता येईल?
दुसरं म्हणजे आपल्या देशात अन्नसुरक्षा आहे का, हा प्रश्न. आज हजारो टन अन्न गोदामात पडून आहे, वाया जात असतं, हे आपण वाचतो. तरीही भूक बळी आहेतच ना? खुद्द शेतकर्यांना स्वतःसाठी अन्नधान्य विकत घ्यावं लागतं. कर्जबाजारी शेतकरी तेही घेऊ शकत नाहीत. याचा अर्थ अन्नसाठा म्हणजे अन्नसुरक्षा नव्हे. अन्नाचं वितरण चुकीचं होत असल्याने अन्नसाठे वाया जात आहेत. त्याहून महत्त्वाचं म्हणजे आज देशात फार मोठ्या प्रमाणात पोषण विषमता आहे. पोट भरणं आणि पोषण मिळणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. गरीबवर्गाचं पोट भरत असेल, पण कमकुवत पोषणामुळे त्यांच्यात आजार आणि साथी वारंवार येत राहतात. त्याचा खर्च वाढतो. उदा. हरित क्रांतीनंतर आपण पाम तेलाची आयात सुरू केली. हे तेल साता समुद्रापलीकडून आणलं तरी स्वस्त पडतं. त्यामुळे याचा वापर वाढत गेला. खाद्यतेलामध्ये पाम तेलाचं मूल्य अगदी खालच्या स्तराचं असतं; पण ते गरीब वर्गाला परवडत असल्यामुळे त्याचा वापर वाढला आणि पारंपरिक तेलाचा वापर कमी होत गेला.
आणखी एक मुद्दा असा, की आज शेतकरी पिकांची निवड बाजारभावावर करतात. खपली गहू, गोविंदभोग, ज्वारी, बाजरी, नाचणी अशी उत्तम पोषणमूल्यं असणारी पिकं घेण्याऐवजी ऊस, सोयाबीन, मका, बासमती, इंद्रायणी अशी पिकं फायदेशीर ठरतात. त्यामुळे पोषणसमता अधिक बिकट होत चालली आहे. एकुणातच, देशातील शेतीवर आणि खाद्यसंस्कृतीवर हरित क्रांतीचा प्रामुख्याने दुष्परिणाम होत गेला आहे. त्यामुळे आज आपला देश अन्नाच्या बाबतीत ना स्वयंपूर्ण आहे, ना सुरक्षित, ना हे अन्न पोषक आहे, अशी परिस्थिती झाली आहे.
भाताच्या पारंपरिक जातींमध्ये पोषणक्षमता अधिक आहे, असं आपलं म्हणणं आहे का?
हा केवळ मानण्याचा मुद्दा नव्हे. गेली पंचवीस वर्षं शेतकर्यांबरोबर काम करत आम्ही ते सिद्ध केलं आहे. पूर्वी वेगवेगळे भाताचे वाण वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जात. उदा. भाताचे काही विशिष्ट वाण आदिवासी जमातींमध्ये गरोदर महिलांना खायला देतात. त्यामागे नक्कीच पारंपरिक ज्ञान असणार अशी माझी खात्री होती. पण हे सिद्ध करण्यासाठी एक सुसज्ज प्रयोगशाळा हवी होती. ओडिशामध्ये तशी प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने मी स्वतः एक प्रयोगशाळा चालू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आमचे मित्र अविक साहा यांनी त्यासाठी सगळी आर्थिक मदत केली आणि कोलकत्यामध्ये जागाही देऊ केली. २०१४ साली ही प्रयोगशाळा सुरू झाली. इथे आम्ही तांदळाची बायो-केमिकल आणि मॉलिक्युलर चिकित्सा करतो. तांदळातील क्षार, खनिजं आणि पोषणक्षमता यांचा शोध घेतो. बियाणातील विशिष्ट घटकांची नोंद केली जाते आणि त्या बियाणांचं संकलनही केलं जातं. आपल्या पारंपरिक वाणांचं पेटंट कोणा परदेशी शास्त्रज्ञांनी घेऊ नये यासाठी आम्ही हे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित करत असतो आणि ती माहिती शेतकर्यांपर्यंतही पोहोचवत असतो.
ही प्रयोगशाळा सुरू झाल्याने आम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा झाला. आम्हाला भाताचे ८५ वाण मिळाले, ज्यात जी.एम. बियाणांहून २५ पट जास्त लोह आहे. मोन्सान्टोच्या एका जातीत ८.९ मायक्रोग्राम लोह आहे, तर आपल्या काही देशी जातींमध्ये १४२ मायक्रोग्राम इतकं लोह आहे. असे अजून शेकडो वाण असतील, जे आमच्या प्रयोगशाळेत पोहोचलेलेच नाहीत. तसंच, कोणत्याही जी.एम. बियाणात बी-४ जीवनसत्त्व नाही, पण आपल्या सुमारे दोनशे जातींमध्ये उपयुक्त प्रमाणात बी-४ आढळतं. बंगालमध्ये एक प्रकारचा तांदूळ पोटाच्या विकारांवर जालीम उपाय म्हणून दिला जातो. त्या जातीत आम्हाला मॉलिक्युलर चांदी मिळाली. आज नॅनो-सिल्व्हरचा वापर जंत मारण्यासाठी होतो हे आपल्याला माहिती आहेच. कबीरज साल नावाचा एक तांदूळ आजारपणातून बाहेर येणार्या रुग्णांना दिला जातो. यात आम्हाला एक विशिष्ट प्रकारचे स्टार्च मिळाले, ज्याचंं अमिनो अॅसिड तयार होतं. त्यामुळे प्रथिनं पचायला सोपी जातात आणि आजारी माणसाला पोषण मिळतं. अशा प्रकारे आम्ही प्रयोगशाळेच्या माध्यमातून पारंपरिक वाणांचे गुणधर्म शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
पोषणक्षमता ग्राहकांना उपयुक्त आहे, पण पारंपरिक वाणाची शेती शेतकर्यांसाठी फायदेशीर आहे का?
(संपूर्ण मुलाखत वाचा अनुभव जानेवारी २०१९ अंकात)
• छापील तसेच PDF अंकाची वर्गणी भरण्यासाठी संपर्क: मंगेश दखने - ९९२२४३३६१४
• अनुभवची वर्गणी भरा आता एका क्लिकवर - https://www.instamojo.com/anubhavmasik
• अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹८००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा