दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९
साहित्य हे त्या त्या काळाचं प्रतिबिंब असतं असं म्हणतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग मानले जाणारे दिवाळी अंक चाळले तर काय दिसतं?
कुठलाही उपक्रम, संस्था, व्यवस्था जेव्हा पन्नास, शंभर, सव्वाशे वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालू राहते, तेव्हा तिच्याबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी बोलता/लिहिता येतं, आणि तेही तार्किक, सांस्कृतिक, व्यावहारिक अशा पातळीवर आणि अर्थातच तो उपक्रम, संस्था आणि व्यवस्था यांच्या कामानुसार. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग मानल्या जाणार्या दिवाळी अंकांविषयीही तसं बोलता येईलच. ‘मासिक मनोरंजन’चा आणि मराठीतला पहिला दिवाळी अंक १९०९ साली प्रकाशित झाला असं रूढार्थाने मानलं जातं. म्हणजे दरवर्षी प्रकाशित होणार्या दिवाळी अंकांच्या उपक्रमाला यंदा १०९ वर्षं झाली. महाराष्ट्राचा एकंदर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांचा इतिहास पाहिला तर असं दिसतं, की देदीप्यमान अशी किंवा वैभवशाली दीड-दोन शतकांची परंपरा असलेल्या आणि तरीही कालसुसंगत आणि पूर्वीच्याच जोमाने कार्यरत असलेल्या संस्था-संघटना फारशा दिसत नाहीत. जवळपास नाहीतच. हेच व्यवस्था किंवा उपक्रम यांच्या बाबतीतही आहे. हे उपक्रम, संस्था जशा शंभरीच्या आसपास पोहोचतात तसे त्यांचे चिरे ढासळायला लागतात. त्यांचा चिरेबंदीपणा उणावायला लागतो. सुरुवातीच्या काळातलं काम आणि सद्यकाळातलं महत्त्व या निकषांवर त्या उपक्रमाचं किंवा संस्थेचं महत्त्व नजरेआड करता येत नाही हे खरं. पण सुरुवातीच्या काळातलं काम आता वर्धिष्णू होण्याऐवजी पठारावस्थेला तरी आलेलं असतं किंवा ‘संथ वाहते कृष्णामाई’ वळणावर तरी पोहोचलेलं असतं. म्हणजे महत्त्व, गरज, निकड या निकषांवर नितांत आवश्यकता, पण काम-वेग-दूरदृष्टी या आघाडीवर साचलेपण, असा तिढा होऊन बसलेला असतो.
याला मराठीतले दिवाळी अंकही अपवाद नाहीत. पण तरीही मराठीत प्रकाशित होणार्या दिवाळी अंकांच्या संख्येत दरवर्षी चार-दहा नव्या नावांची भर पडतेच. (आणि एखाद-दुसरं नाव गायबही होतं.) चार-सहा महिने या दिवाळी अंकांच्या निमित्ताने मराठीतील साहित्यिक वातावरण उत्फुल्ल, चैतन्यदायी आणि रसरशीत झालेलं असतं. लेखक, प्रकाशक, संपादक, मुद्रक, डीटीपीवाले, मुद्रितशोधक, चित्रकार, बाइंडर, विक्रेते, वितरक, जाहिरातदार यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला बहर येतो. काहींना रोजगार मिळतो, काहींना जास्तीचे पैसे कमावण्याची संधी मिळते. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वाचकांना, वाचू इच्छिणार्यांना, नेहमीच वाचणार्यांना आणि वेळ घालवण्यासाठी वाचणार्यांना ‘वाचना’ची पर्वणी दिवाळी अंकांच्या निमित्ताने मिळते.
शंभराहून अधिक वर्षं उलटली असली तरी मराठीत नेमके किती दिवाळी अंक प्रकाशित होतात याची खात्रीशीर आकडेवारी अजूनही उपलब्ध होत नाही. आमच्याकडे आहे, असं सांगणार्यांकडेही ती अर्धवटच असते. तरीही किमान ३००हून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात असं साधारणपणे म्हणता येतं. निखळ साहित्यविषयक (प्रौढ, बाल, महिला इत्यादी सर्व विषयांवरील); नियतकालिकं, वेगवेगळ्या चळवळींची मुखपत्रं, दैनिकं, साप्ताहिकं-पाक्षिकं-मासिकं (अर्थकारणापासून ते अध्यात्मापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरची), याशिवाय महिला, पाककला, पर्यटन, उद्योग-व्यापार, चित्रपट-खेळ, गुन्हेगारी-रहस्यकथा, आरोग्य, जोतिष-धार्मिक-आध्यात्मिक, संगीत, कला-संस्कृती अशा विविध विषयांवर हे अंक प्रकाशित होतात. त्या सर्व अंकांविषयी या लेखात लिहिता येणं शक्य नाही आणि ते या लेखाचं प्रयोजनही नाही. इथे फक्त ज्या अंकांमध्ये सर्जनशील व वैचारिक साहित्य प्रकाशित होतं, ज्या अंकांमध्ये राजकारण-समाजकारण, कला-संस्कृती यांविषयीचं लेखन प्रकाशित होतं, त्यांतील काही निवडक अंकांविषयी काही निरीक्षणं नोंदवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
मराठी साहित्याचं प्रतिबिंब दिवाळी अंकांमधून पडतंच, पण ते फक्त दिवाळी अंकांमधूनच पडतं असं नाही. ते वर्तमानपत्रं, विशेषत: वाङ्मयीन नियतकालिकांमधूनही पडतं. पण दिवाळी अंकांमधून साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होतं ही खरीच गोष्ट आहे. कारण एरवी महिन्याला ६४ पानांचं साप्ताहिक किंवा मासिक स्वरूपात निघणारं नियतकालिकही दिवाळी अंक मात्र दोन-अडीचशे पानांचा काढतं. त्यामुळे त्यातून साहित्य प्रकाशित होण्याचा परीघ विस्तारतोच. म्हणून दिवाळी अंक हे साहित्य मोठ्या प्रमाणावर वाचकांपर्यंत पोहोचवणारं एक प्रस्थापित माध्यम आहे, ही खरी गोष्ट असली तरी ते ‘ताजं’ साहित्यही मोठ्या प्रमाणावर पोहोचवणारं माध्यम मात्र फारसं नाही. तसं राहूही शकत नाही. कारण कुठल्याही दिवाळी अंकात निदान तीन-चार पिढ्यांचे लेखक एकाच वेळी लिहीत असतात. त्यात नामांकित लेखक असतात तसेच लोकप्रिय लेखकही असतात. प्रस्थापित लेखक असतात तसे नवखे लेखकही असतात. बुजुर्ग असतात तसे तरुणही असतात. मधल्या फळीतले असतात तसे त्या फळीच्या अलीकडचे-पलीकडचेही असतात. त्यामुळे अनेकदा असं होतं, की प्रस्थापित लेखकाचं तुलनेने सामान्य लेखन आणि नवोदित लेखकाचं तुलनेने चांगलं लेखन एकाच अंकात वाचायला मिळतं. यंदाच्याच नव्हे तर याआधीच्या आणि यापुढच्याही दिवाळी अंकांमध्ये अशी पाच-पंचवीस तरी उदाहरणं सापडतीलच. यात गैर काहीच नाही. काही प्रस्थापित लेखकांना लिहिण्याशिवाय जगता येत नाही, काही संपादक त्यांना तगाद्याशिवाय राहू देत नाहीत आणि त्या लेखकांचे काही वाचकही त्यांना विसरत नाहीत. त्यामुळे केवळ प्रस्थापित लेखकांच्या तुलनेने सामान्य लेखनाला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. कारण जोवर लेखन छापून येतं, मागवून प्रसंगी आग्रहाने मागवून छापलं जातं, तोवर कुठलाही लिहिता लेखक फार तटस्थपणे त्याकडे पाहू शकत नाही. आणि स्वत:च स्वत:च्या लेखनाकडे तटस्थपणे पाहून त्याचं मूल्यमापन करण्याची परंपरा मराठी साहित्यिकांमध्ये तशीही फारशी दिसत नाही. परिणामी, ही मंडळी २५ वर्षांपूर्वी जसं आणि ज्या वकुबाचं लिहीत होती, तसंच आणि तेच, किंबहुना त्यापेक्षा थोडंसं डावं लेखन आजही करतात. यंदाच्या दिवाळी अंकांतलं प्रस्थापित लेखकांचं लेखनही याला थोड्याफार फरकाने फारसं अपवाद ठरत नाही. हे अगदी नावानिशीही सांगता येईल; पण सर्जनशील साहित्याबाबत, त्याच्या आवडीनिवडीबाबत मतैक्यापेक्षा मतभेदच जास्त असतात, त्यामुळे उदाहरणांचा सोस जाणीवपूर्वकच टाळला आहे. दुसरी गोष्ट अशी, की अशा प्रकारच्या लेखात चार-दोनच नावं उदाहरणादाखल दिली जाऊ शकतात; पण ती नावं मुद्दा स्पष्ट करण्यासाठी दिलेली असतात हे विसरून लोक त्या नावांचीच अनावश्यक चर्चा करून त्या लेखकांच्या एकंदर लेखनावरच शिक्का मारतात, किंवा नावं घेणार्यांवर.
दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही देशातली साहित्यनिर्मिती ही प्रामुख्याने कथा, कादंबरी आणि कविता यांतच होत असते. कादंबरीलेखन हा दीर्घ दमसासाचा प्रकार असल्याने या वाङ्मयप्रकारातलं लेखन तसं कमीच होतं. मराठी साहित्यही याला अपवाद नव्हतं, नाही. कथा-कविता हे वाङ्मयप्रकार कादंबरीच्या तुलनेत कमी अभ्यासाची आणि वेळेची मागणी करणारे असल्याने या प्रकारातलं लेखन जास्त होतं. पण अलीकडच्या काळात मराठीत कथालेखनालाही काहीशी ओहोटी लागली आहे असं दिसतं. कवितालेखन मात्र मराठीत उदंड प्रमाणात होतं. यंदाच्या दिवाळी अंकांतही नव्या-जुन्या कवींच्या कविता दिसतातच. ‘मौज’ हा दिवाळी अंक सुरुवातीपासूनच कवितांना विशेष प्राधान्य देतो. ‘मौज’मध्ये तीन-चार पिढ्यांतल्या कवींची चांगली कविता एकाच वेळी वाचायला मिळते. यंदाचा अंकही त्याला अपवाद नाहीच. त्यानंतर खास उल्लेख करायला हवा तो ‘कवितारती’ या फक्त कवितेलाच वाहिलेल्या द्वैमासिकाच्या दिवाळी अंकाचा. हा अंक ‘कविता विशेषांक’ आहे. आणि यात फक्त गेल्या पाच-सात वर्षांत सातत्याने कविता लिहिणार्या आणि एखादाच कवितासंग्रह प्रकाशित झालेल्या विनायक येवले, सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत, अविनाश उषा वसंत, महेश लोंढे, सारिका उबाळे-परळकर, इग्नेशियस डायस, बालाजी सुतार, संदीप जगदाळे, स्वप्नील शेळके, फेलिक्स डिसोझा, श्रीकांत ढेरेंगे, अजित अभंग, प्रणव सखदेव, योजना यादव, अनिल साबळे, सुदाम राठोड, प्रिया जामकर, विनोद नरेंद्र कुलकर्णी, कविता ननवरे, मेघराज मेश्राम, सागर जाधव-जोपुळकर, सुनीता रामचंद्र आणि शिल्पा देशपांडे या २३ कवींच्या प्रत्येकी तीन ते पाच कविता आहेत. हे सगळे तरुण कवी आहेत. काहींची कविता पहिल्यांदाच प्रकाशित होते आहे. त्यामुळे या कवितांबाबत फार काटेकोरपणे विधान करण्यात धोका आहे. पण या बहुसंख्य कवितांची अभिव्यक्ती मात्र धीट आणि बंडखोरपणाची आहे.
या दोन अंकांव्यतिरिक्त ‘वाघूर’ या दिवाळी अंकातल्या कवितांचा उल्लेख करावासा वाटतो. या अंकात ‘नदी’ या विषयावरील सत्तरेक कवींच्या कविता आहेत. त्यातील काही कविता या हिंदी, उर्दू आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादित केलेल्या आहेत. इथेही दोन-तीन पिढ्यांतल्या कवींच्या कविता एकाच विषयावर असल्याने त्यातील विविधता नजरेत भरणारी आहे. पण भाषा, अभिव्यक्ती, शैली, आविष्कार या निकषांवर मात्र त्यांची वर्गवारी करून मगच त्यांच्याबाबत मत नोंदवता येऊ शकेल. तरीही ढोबळ विधान करायचं तर असं म्हणता येईल, की या कविता एकत्रितपणे बहारदार वाटत असल्या तरी सुट्या सुट्या वाचल्या तर त्यांची अभिव्यक्ती व आविष्कार फार पकडून ठेवत नाही.
दिवाळी अंकांमधून नवीन लेखक तयार होतात, पण ते काही प्रमाणात. बर्याचदा असं दिसतं, की एखादा नवीन लेखक दैनिकांच्या साप्ताहिक पुरवण्या किंवा वाङ्मयीन मासिकांतून बर्यापैकी दिसायला लागला की मग तो सुरुवातीला एखाद-दुसर्या अंकामध्ये दिसायला लागतो. त्याचं लेखनसातत्य चांगलं असेल तर चार-दोन वर्षांत ही संख्या दुप्पट-तिप्पट होते. नवोदित कविमंडळींना प्रस्थापित दिवाळी अंकात स्थान मिळायला जरा वेळच लागतो; आणि ते ठीकच आहे. जे कथाकार व कवी असे दोन्ही असतात त्यांच्या बाबतीत दिवाळी अंकांची संख्या अजून वाढते. जे फक्त कथाकार असतात त्यांची उपस्थितीही चार-दोन दिवाळी अंकांपुरतीच असते. उदाहरणच द्यायचं झालं तर ऋषिकेश गुप्ते या कथाकार-कादंबरीकाराचं नाव तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत दोन-चार दिवाळी अंकांत दिसायचं. यंदा मात्र गुप्ते यांच्या ‘मौज’, ‘दीपावली’ आणि ‘अक्षर’ या तिन्ही अंकांत दीर्घकथा आहेत. याचा अर्थ असा आहे, की गुप्ते हे आता प्रस्थापित दिवाळी अंकांचे मान्यवर लेखक झालेले आहेत.
नवे लेखक नेमकं कुणाला म्हणायचं याचा फार काथ्याकूट न करता जे नुकतेच लिहायला लागले आहेत अशा लेखकांना नवे लेखक म्हटलं तर कवितेच्या बाबतीतली नवी नावं वर येऊन गेलेली आहेत. कथेच्या बाबतीत अलीकडे प्रणव सखदेव हे नाव दिसतं. किरण गुरव, जयंत पवार, गणेश मतकरी ही आधीच्या पिढीतली नावं दिसतात. हे तुलनेने कमी लिहितात. याशिवाय आणखी एक नाव गतवर्षीपासून दिवाळी अंकांत दिसू लागलंय. माझ्या पाहण्यात चूक होत नसेल तर हे नाव फक्त ‘इत्यादी’ या एकाच दिवाळी अंकात दिसतंय. ते म्हणजे पंकज भोसले. त्याला खर्या अर्थाने ‘आजचा कथाकार’ म्हणता येईल. अभिव्यक्ती, आविष्कार आणि शैली या निकषांवर पंकज भोसले हा खरोखरच ‘आजचा कथाकार’ आहे. ‘गर्लफ्रेण्ड एक्सपीरियन्स’ ही त्याची ‘इत्यादी’मधील कथा खास त्याच्या काळाची कथा आहे. आपला काळ असा समर्थप्रकारे इतर कुणा कथाकाराला मराठीत मांडता येतोय असं निदान मला तरी दिसत नाही.
नव्या लेखकांचं लेखन हे नवथर असतं, त्यामुळे ते दर्जेदार असतंच असं नाही. मात्र, या लेखकांकडून दर्जेदार लेखनाच्या अपेक्षा करता येतील याची काही प्रसादचिन्हं त्यांच्या लेखनातून दिसतात. त्यामुळे एखाद्या नव्या लेखकाच्या यंदाच्या दिवाळी अंकांतल्या पाच-सहा कथा सलग एकत्र वाचल्या तर त्यातील एखाद-दुसरीच उत्तम म्हणावी अशी सापडते. बाकीच्यांच्या बाबतीत ‘ठीक’, ‘बरी’ अशीच विशेषणं वापरावी लागतात. त्यामुळे नव्या लेखकांकडून दर्जेदारपणाचा मुद्दा फार काटेकोरपणे अपेक्षिला जाऊ शकत नाही. पण अभिव्यक्ती, आविष्कार, शैली, प्रगल्भता, अनुभव आणि प्रतिभा यांबाबत हा लेखक किती पाण्यात आहे याचा मात्र त्याच्या लेखनावरून अंदाज येतो. मराठीतल्या नव्या लेखकांचं यंदाच्या दिवाळी अंकांतून जे साहित्य (कविता, कथा, लेख) आलं आहे त्यात कवींची संख्या सर्वाधिक आहे. कविता हा अतिशय आत्मनिष्ठ प्रकार असल्याने एखाद-दुसर्या चांगल्या कवितेवरून त्या कवीचं मूल्यमापन जसं करता येत नाही, तसंच त्याने आता वाईट कविता लिहिलीय म्हणून तो पुढेही तशीच लिहील असंही म्हणता येत नाही. मात्र, अभिव्यक्तीची धिटाई आणि बंडखोर शैली वगळता नव्या कवितेतून फार काही हाती लागत नाही. कवितालेखनात फार शैलीप्रयोग होऊ शकत नाहीत, पण विषयप्रयोग होऊ शकतात. उदा. प्रेम हाच विषय घेऊन ‘स्त्री मेरे भीतर’सारखा कवितासंग्रह लिहिणारा हिंदीतला पवण करण हा कवी. पण असे प्रयोग मराठी कवितेत फारसे दिसत नाहीत. प्रियकर-प्रेयशी, शेतकरीव्यथा, आत्मानुभव, स्त्री-पुरुष संबंध, यांसारख्या रूढ विषयांवरच बव्हंशी नवी कविता लिहिली जाते. याच विषयांचा पवण करणसारखा नव्या दृष्टिकोनातून किंवा नव्या परिप्रेक्ष्यातून विचार करता येऊ शकतो; पण तसं होताना दिसत नाही.
कथा या वाङ्मयप्रकारात ऋषिकेश गुप्ते, जयंत पवार, गणेश मतकरी, पंकज भोसले, प्रणव सखदेव हे कथालेखक नवनवे प्रयोग करून पाहताहेत. त्यात जयंत पवार आणि पंकज भोसले यांना अधिक यश मिळतंय असं दिसतं. जयंत पवार यांची कथा काही आजच्या काळाची नाही; पण ती मानवी मूल्यांच्या मुळाला भिडू पाहणारी, मानवी जगणं त्यातील ताण्याबाण्यांसह कवेत घेऊ पाहणारी मात्र नक्कीच आहे.
पण हे तितकंच खरं आहे, की समकालीन विषय मात्र मराठी कविता-कथा-कादंबरी या वाङ्मयप्रकारात फारसे दमदारपणे येताहेत असं दिसत नाही. १९९०नंतर आर्थिक उदारीकरणाने आणि पर्यायी जागतिकीकरणाने जी राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक उलथापालथ घडवून आणलीय, तिचा आवाका आणि गाभा मराठी सर्जनशील लेखकांना फारसा समजलेलाच नाही. कारण त्यांचा ‘डावा विचार’. म्हणजे वैचारिक पातळीवर ते विचाराने डाव्या पक्षाचे नसतात, पण आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांबाबतची त्यांची मतं मात्र डाव्यांसारखीच एकांगी आणि टोकाची नकारात्मक म्हणावी अशी असतात. दुसरी गोष्ट म्हणजे या काळात जी उलथापालथ घडून आलीय ती नीट समजून न घेतल्याने तिचं एकाच बाजूचं चित्र कथा-कवितेतून पाहायला मिळतं.
ललितेतर लिखाणातही फारसं काही नवं दिसत नाही. उदाहरणादाखल आरक्षणाचा प्रश्न पाहू. गेल्या काही वर्षांत आरक्षणाविषयी उलटसुलट चर्चा होताना दिसते. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून ही चर्चा जास्त अहमहमिकेने होताना दिसते. नेमका हाच विषय घेऊन ‘वास्तव’ हा संपूर्ण अंक ‘आरक्षण- भूमिका, धोरण, प्रवास’ या विषयावर आहे. या अंकात तब्बल पंचवीस लेख आहेत. डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. हरी नरके, योगेंद्र यादव, विनोद शिरसाट, हर्ष जगझाप, विवेक घोटाळे, श्रावण देवरे, लक्ष्मीकांत देशमुख, किरण मोघे, जावेद पाशा कुरेशी, बाबा भांड अशा नामवंतांपासून कलीम अजीम, सतीश देशपांडे, गणपत धुमाळे यांसारख्या तरुणांच्या लेखांचा समावेश आहे. हा एकाच विषयावरील अंक म्हणून चांगला आहे; पण या अंकामागचं मराठा आरक्षणाचं प्रयोजन काढून केवळ ‘आरक्षण’ या विषयावरील साधक-बाधक चर्चा म्हणून या अंकाकडे पाहिलं तर गेल्या पंचवीस वर्षांत आरक्षणाचा प्रश्न सतत अहमहमिकेने चर्चेत का राहिला आहे, त्यामागे काय कारणं आहेत याचं पुरेसं चित्र या लेखांतून स्पष्ट होत नाही. एकूण, आरक्षण असावं की नसावं, मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं की दिलं जाऊ नये, धनगर-लिंगायत-मुस्लिम-स्त्रिया यांच्या आरक्षणाचं राजकारण याची चर्चा अंकात आहे; पण जागतिकीकरणाच्या गेल्या २५ वर्षांच्या काळात आरक्षण आणि मध्यमवर्ग हे विषय सतत चर्चेत का राहिले आहेत, यामागची कारणमीमांसा या अंकातून फारशी कुणी केलेली नाही. आता आर्थिक उदारीकरण, आरक्षण आणि मध्यमवर्ग हा त्रिकोण समजून घेतल्याशिवाय आरक्षणाच्या स्फोटक राजकारणामागचं इंगित समजून घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण ती लक्षात न घेताच बहुतेकांनी आरक्षणाच्या धोरणाची चर्चा केली आहे. बदलत्या काळानुसार कुठल्याही धोरणाची नव्याने चर्चा करावी लागते; पण इतका साधा मुद्दा या अंकात जवळपास सर्वांनीच दुर्लक्षित केल्यासारखा दिसतो.
‘पुरुष उवाच’ या दिवाळी अंकातल्या ८४ लेख-कथा-मुलाखती आणि ३४ कवितांमधून वाढत्या हिंसेमागची आणि त्यावरील उपाय यांचा ऊहापोह केला आहे. यातल्या कविता एखाद-दुसरा अपवाद वगळता सामान्य आहेत. लेखांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे; पण त्यात प्रगल्भता, विषयाचा आवाका यांचा बराच अभाव दिसतो. त्यामुळे हा जवळपास ३५० पानांचा अंक वाचूनही हाती फारसं काही लागत नाही.
‘साप्ताहिक सकाळ’च्या अंकाची मुख्य थीम ‘आज’ ही आहे. त्यानुसार लेख, कथा, कविता, प्रवासानुभव यांची मांडणी केली आहे. पण ही थीम नसती आणि हेच सर्व लेखन असतं तर? विशेष काहीच फरक पडला नसता. म्हणजे लेखनाचं पॅकेजिंग करून दाखवण्याचा अट्टहास सोडला तर अंक ‘वाचनीय’ या सदरातच मोडणारा आहे. कारण ‘आज’ या थीममधून ज्या विषयांच्या चर्चेची अपेक्षा आहे तो हा अंक पूर्ण करत नाही.
असाच काहीसा प्रकार ‘अक्षर’ या दिवाळी अंकातल्या ‘मी टू’ या परिसंवादाचा झाला आहे. विषय अतिशय ताजा, आजचा आणि चर्चेतला; पण या परिसंवादातल्या लेखांमधून या विषयाचा परीघही समजत नाही आणि चर्चेचा केंद्रबिंदूही. कारण काही लेख अतिशय वैयक्तिक अनुभव सांगणारे आहेत, तर काही विषयाची जनरल चर्चा करणारे आहेत- तेही घाई झाल्यासारखी. त्यामुळे अपेक्षा ठेवून परिसंवाद वाचावा तर पदरी निराशा येते, आणि कुठलीच अपेक्षा न ठेवणार्यांच्याही हाती सामान्य माहितीपलीकडे फारसं काही लागत नाही.
या तुलनेत ‘दीपावली’तला ‘अस्मितेचा रंग आणि बेरंग’ हा परिसंवाद चांगला झाला आहे. कारण या परिसंवादाचे संयोजक ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी नेमक्या आणि नेटक्या पद्धतीने लेखक व विषयांची निवड केली आहे, आणि लेखकांनी आपापल्या विषयांच्या परिघातच मांडणी केली आहे.
आता ‘मौज’मधला ‘विज्ञानाचे वारकरी’ हा परिसंवाद पाहू. या अंकात जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, सुरेश नाईक, डी. बालसुब्रमण्यम आणि बाळ फोंडके या मान्यवरांचे लेख आहेत. त्यामुळे हा परिसंवाद चांगला असणारच असंच कुणाचंही मत होईल. तसा तो नक्कीच आहे. पण या लेखकांचं थोडंफार लेखन ज्यांनी वाचलं आहे, त्यांना चार-दोन नव्या तपशिलांपलीकडे या लेखांतून नवं काहीही मिळणार नाही. कारण या लेखकांनी या ना त्या कारणांनी यातील मांडणी यापूर्वी आपल्या पुस्तकांतून-लेखांतून केली आहे. त्यामुळे नावंही चांगली, लेखही चांगले, पण नवं काही नाही, अशी या परिसंवादाची तर्हा झाली आहे.
वैचारिक लेखनाला अजूनही दिवाळी अंकांतून कथा-कविता-ललित लेख-अनुभव यांच्या तुलनेत कमीच जागा दिली जाते. एखाद-दुसरा वैचारिक लेख किंवा एखादा परिसंवाद, असंच बहुतेक दिवाळी अंकांचं वैचारिक लेखनाबाबतचं धोरण असतं. साप्ताहिक साधना, साप्ताहिक युगांतर, परिवर्तनाचा वाटसरू, शाश्वत आंदोलन यांसारखी चळवळीची मुखपत्रं असलेल्या नियतकालिकांचे दिवाळी अंक रूढार्थाने वैचारिक साहित्याला थोडी जास्त जागा देतात, पण त्यात दीर्घ लेख आणि सविस्तर मांडणी फक्त ‘साधना’च्याच दिवाळी अंकात पाहायला मिळते. ‘वसा’, ‘मुक्त शब्द’ यांसारख्या पुरोगामी विचारधारा प्रमाण मानणार्या अंकातील वैचारिक साहित्य हे ‘वैचारिकते’पेक्षा आपली भूमिकाच जोरकसपणे मांडणारं वाटतं. त्यात ‘वैचारिक’ या संज्ञेला पात्र ठरतील असे लेख आहेत, पण त्यांची मांडणी अनावश्यक आग्रही, इतरांचा प्रतिवाद करणारी आणि शहाला काटशह या थाटाची जास्त वाटते. त्यामुळे ते लेख एखाद्या चळवळीच्या प्रचारासारखे अनावश्यकरीत्या प्रतिपाद्य विषयाचा हिरिरीने पुरस्कार करत असल्यासारखे वाटतात.
पण काही विषयांची मराठीमध्ये गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे, त्यावर विचार झाला पाहिजे, असे विषय मराठी दिवाळी अंकांमध्ये अभावानेच दिसतात. यंदाच्या दिवाळी अंकांतही ते दिसतंच. उदा. ‘मी टू’, ‘मोदी सरकार’ हे या वर्षातले सर्वाधिक चर्चेचे व कळीचे ठरलेले विषय; पण या विषयांवरची सम्यक्, समतोल, नि:पक्ष आणि अभ्यासपूर्ण चर्चा कुठल्याही एका अंकात सविस्तरपणे दिसत नाही. ‘आपली संतप्त सार्वजनिक संस्कृती’ हा प्रा. सुहास पळशीकरांचा ‘अनुभव’मधला किंवा ‘राजकारणाची अपुरी मराठी समज’ हा प्रा. राजेश्वरी देशपांडे यांचा ‘लोकसत्ता’मधला लेख किंवा याच अंकातला महेश सरलष्करचा ‘काश्मीर : आरपारची लढाई’ हा रिपोर्ताज, असे काही मोजके लेख समकालीन प्रश्नांची अतिशय बिनतोड चर्चा करतात.
उदाहरणांना मर्यादा असते. ती भाराभर दिली काय अन् मोजकी दिली काय, यापेक्षा त्या निमित्ताने काय सांगायचंय हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे उदाहरणांची मालिका आवरती घेणंच श्रेयस्कर.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे दरवर्षीच्या दिवाळी अंकांबद्दल जसं चांगलं आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे बोलता येईल, तसंच याही वर्षीच्या दिवाळी अंकांबद्दलही येईलच. पण हे खरं, की ज्यांचा खप जास्त आहे अशा वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांतील लेखांची लांबी त्यांच्या रविवार पुरवणीच्या मजकुरापेक्षा जास्त असते, यापलीकडे त्यात फार काही नावीन्य नसतं. पानाआड जाहिरात, हा मुद्दा बाजूला सोडला तरी हे अंक शक्य असूनही नवे विषय, नवे लेखक शोधण्याचे प्रयत्न का करत नाहीत? ज्यांचा वाचकवर्ग मोठा आहे, ज्यांचा दिवाळी अंक काढण्याचा शिरस्ताही पाच-पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त आहे, अशा या वर्तमानपत्रांच्या अंकांना प्रयोग करण्याची, नवे नवे विषय धुंडाळण्याची जोखीम पत्कारावीशी का वाटत नाही? हेच थोड्याफार फरकाने मौज, दीपावली, ललित, अक्षर, अंतर्नाद या अंकांबाबतही म्हणता येईल. साधना साप्ताहिकाने अलीकडच्या काळात सात-आठ दीर्घ लेखांचाच दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आहे. असे किंवा यांसारखे वेगवेगळे प्रयोग मौज, दीपावली, ललित, अक्षर, अंतर्नाद यांना का करता येऊ नयेत?
यंदाच्या ‘विनोद’ या विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकांबाबत न बोललेलंच बरं. एके काळी अतिशय नावाजला गेलेला आणि पाटकरांचा ‘आवाज’ म्हणून ओळखला जाणारा दिवाळी अंक सामान्य आहे. त्यातील खिडकी चित्रांची जागा यंदा (माहीत नाही, याआधीहीपासूनही असेल कदाचित) उपर्या साइडफ्लॅप चित्रांनी घेतली आहे. ही चित्रं अतिशय सामान्य वकुबाची आहेत. त्यात मिश्किली, टवाळी, खुमासदारपणा नसून उत्तानपणाच जास्त दिसतो आणि मजकुरामध्ये विनोद कमी आणि गांभीर्यच जास्त दिसतं. त्या तुलनेत ‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन पोर्टलचा वर्षीचा ‘इनोद इशेष अंक’ उल्लेखनीय आहे. बाकी दिवाळी अंकांबद्दल न बोलणं हेच बोलणं मानायला हरकत नाही.
एकाच विषयावर संपूर्ण दिवाळी अंक काढण्याची पद्धत तशी पूर्वीपासूनची आहे. यंदा ‘प्रतिभा’चा ‘वाचनसंस्कृती’, ‘वाघूर’चा ‘नदी’, ‘पुण्यभूषण’चा ‘पुणे शहर’, ‘रंगवाचा’चा ‘हॅम्लेट’, ‘ऋतुरंग’चा ‘बीज अंकुरे अंकुरे’, ‘भवताल’चा ‘पाणी’, ‘मिळून सार्याजणी’चा ‘नग्नता : जनातली, मनातली आणि मुळातली’; ‘उद्याचा मराठवाडा’चा ‘शिक्षणपर्व’, ‘शब्दालय’चा ‘खेळ’ असे काही विशेषांक वाचनीय आहेत. विशेषत: ‘वाघूर’चा अंक विशेष उल्लेखनीय आहे. ‘उद्याचा मराठवाडा’ आणि ‘मिळून सार्याजणी’चे विशेषांक समकालीन अशा शिक्षण व नग्नता या प्रश्नांची चर्चा करणारे आहेत. ‘शब्दालय’चा ‘खेळ’ हा अंकही विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. ‘मेहता मराठी ग्रंथजगत’चा ‘पत्र विशेषांक’ मात्र निराशाजनक आहे.
‘आज’चा प्रामुख्याने विचार करणार्या ‘अक्षरलिपी’, ‘लोकमत दीपोत्सव’ या दोन्ही अंकांतल्या तरुण पत्रकारांच्या रिपोर्ताजचे व लेखांचे विषय अतिशय कल्पक, तरुण आणि ‘आज’चे आहेत. ‘अंतर्नाद’चा वार्षिक स्वरूपातला यंदाचा पहिलाच दिवाळी अंक, पण तो नेहमीच्या ‘किमान वाचनीय’ या बिरुदापलीकडे जात नाही. ‘झी मराठी’चा यंदाचा दिवाळी अंक गेल्या वर्षीच्या सामान्य अंकाच्या तुलनेत बराच बरा म्हणावा लागेल, पण तो वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांसारखाच ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’चा विचार करूनच काढल्यासारखा वाटतो. ‘साधना’चे ‘बालकुमार’ आणि ‘युवा’ हे विशेषांक नावीन्यपूर्ण आहेत. ‘पुणे पोस्ट’मधील डॉ. अभय बंग, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या मुलाखती अनुक्रमे उत्तम, चांगली, चांगली म्हणाव्या अशा आहेत. ‘मीडिया वॉच’मधील ‘मुला व महिलांच्या लैंगिक फँटसी’ या परिसंवादातलं तरुण पत्रकार-लेखिकांचं लेखन नवथर आहे, तर याच अंकातील नसिरुद्दिन शहा व नागराज मंजुळे यांच्याविषयीचे लेख आधी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलंच पुन्हा सांगतात. ‘पद्मगंधा’चा अंक नेहमीप्रमाणे वैविध्यपूर्ण आहे खरा, पण ‘वाङ्मयीन समीक्षा’ थाटाच्या लेखांनी जास्त भरला आहे. ‘शब्दमल्हार’मधील कादंबरीकार श्याम मनोहर आणि पं. बिरजू महाराज यांच्या मुलाखती मस्त आहेत. ‘इत्यादी’मधील वेब सिरीज व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवरील लेख कुतूहल काही प्रमाणात शमवतात तसं वाढवतातही. ‘चौफेर समाचार’मधील मिलिंद बोकील यांचा ‘कुलपे नसणारा देश’ आणि सुनील तांबे यांचा ‘अफूचं महानगर’ हे दोन्ही लेख अनोखे आहेत. ‘कालनिर्णय’चा दिवाळी अंक पूर्वनियोजित विषय लेखकांकडून लिहून घेऊन काढला जातो. त्यामुळे त्यातील विषय वेगवेगळे आणि माहितीपूर्ण असतातच. यंदाच्या अंकातल्या एकाच लेखाचा उल्लेख करायचा झाला तर तो प्रा. मनीषा टिकेकर यांच्या ‘अॅरिस्टॉटलच्या नगरीत आणि वसुंधरेच्या नाभीत’चा उल्लेख करावा लागेल.
बाकी, ‘मौज’पासून ‘अक्षर’पर्यंत आणि ‘अनुभव’पासून ‘श्रीदीपलक्ष्मी’पर्यंत प्रत्येक अंकातल्या एक-दोन उत्तम लेखांची यादी करायची म्हटली तरी ती बरीच मोठी होईल. त्यामुळे तो मोह जाणीवपूर्वक टाळून शेवटाकडे वळू या.
हा धावता आढावा पाहिल्यावर काय दिसतं? परिस्थिती खूप समाधानकारक नसली तरी खूप निराशाजनकही नाही. महाराष्ट्रातलं साहित्य, चळवळी, कलाव्यवहार, राजकारण, शिक्षण, सगळंच संक्रमणावस्थेत म्हणावं अशाच दुविधेत आहे. त्याचंच प्रतिबिंब दिवाळी अंकांमध्येही दिसतं. आर्थिक उदारीकरणाच्या गेल्या २५ वर्षांतल्या उलथापालथीमधून बाहेर येऊन ना साहित्याला आपला हमरस्ता सापडला आहे, ना सामाजिक चळवळींना. महाराष्ट्रातलं राजकारण हे दिल्लीतल्या राजकारणाचं शेपूट धरून होत असल्याने जे दिल्लीत घडतं तेच गल्लीतही घडतं. थोड्याफार फरकाने. शिवाय, जात, धर्म, अस्मिता, राष्ट्रवाद, स्वार्थ, महत्त्वाकांक्षा यांच्याशिवाय केवळ विधायक राजकारण भारतातच फारसं होताना दिसत नाही ते महाराष्ट्रात कुठून होणार? निदान सध्याच्या परिस्थितीत तरी ते नक्कीच होताना दिसत नाही. त्यामुळे त्याचंही प्रतिबिंब साहित्यात पडतंच. विधायक जनमानस घडवणार्या चळवळींचा आवाज क्षीण झालाय. कंठशोष आणि ऊरबडवेपणा वाढलाय. अस्मिता व राष्ट्रवाद उन्मादी होत चालला आहे... असं बरंच काय काय सांगता येईल. शेतीचा प्रश्न आहे, रोजगाराची समस्या आहे, पत्रकारितेची निबरावस्था आहे, साहित्यसंस्थांचं घेटोकरण आहे, इतिहासाचं विकृतीकरण आणि सोयीस्करणही आहे.
असा काळ खरं तर लेखक-कलावंतांसाठी सर्वाधिक चांगला असतो. दर्जेदार निर्मितीसाठी सुखा-समाधानापेक्षा संक्रमणाचा, संकटांचा काळ ही जास्त सुपीक भूमी असते, असं अनेक धुरीण सांगतात. ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ असं केशवसुतांनी सांगून ठेवलंय. आजचा महाराष्ट्र, त्यातील लेखक-कलावंत ते जितकं मनावर घेतील तेवढी कोंडी फुटायला मदत होईल. तसं होईल तेव्हा मराठी साहित्याचा स्तर आजच्यापेक्षा अजून थोडा उंचावेल. आणि तो उंचावला की मराठीतले दिवाळी अंक ‘मागील पानावरून पुढे चालू’ यापलीकडे जातील.
- राम जगताप
• छापील तसेच PDF अंकाची वर्गणी भरण्यासाठी संपर्क: मंगेश दखने - ९९२२४३३६१४
• अनुभवची वर्गणी भरा आता एका क्लिकवर - https://www.instamojo.com/anubhavmasik
• अनुभव मासिक छापील अंक वार्षिक वर्गणी - ₹८००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा