अनुभव मासिक - फेब्रुवारी २०१९
इल्से कोहलर-रोलेफसन : उंटाच्या प्रेमात पडलेली स्त्री
क्षितिजापल्याड काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच आपल्याला जगाच्या कानाकोपर्यांचं ज्ञान होत आलं आहे. आजही असेच अनेक भटके आपला सुखासमाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत असतात. आपलं जगणं समृद्ध करणार्या अशा अवलियांवर निरंजन घाटे यांनी लिहिलेलं ‘हटके भटके’ हे पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे.
या पुस्तकातल्या एका अवलिया महिलेची ही गोष्ट.
‘संगीत रणदुदुंभी’ या जुन्या काळातल्या नाटकात एक गाणं होतं- ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा ।’ त्या गाण्यात माणसाला लागू शकणार्या अनेक वेडांची यादी होती- कनक, कामिनी, राजसत्ता, देशभक्ती, असे कैक प्रकार. ही सर्व वेडं पुरुषांना लागतात, असं त्या गाण्यात ध्वनित होतं; पण स्त्रियांनाही अशी वेडं लागू शकतात याचीही अनेक उदाहरणं आहेत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे इल्से कोहलर-रोलेफसन.
इल्सेला उंटांनी वेड लावलं. तिने उंटावरच्या संशोधनाच्या कामी स्वतःला वाहून घेतलं. तिचं संशोधनकार्य विशेषतः भारतातल्या उंटांवर आधारलेलं आहे. त्या अनुभवांवर तिने नंतर एक पुस्तक लिहिलं- ‘कॅमल कर्मा- ट्वेंटी इयर्स अमंग इंडियाज कॅमल नोमॅड्स’. या पुस्तकाला जोधपूरचे महाराज दुसरे गणराजसिंह यांची प्रस्तावना आहे. इ. स. 2014 मध्ये प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध आहे.
या पुस्तकाची सुरुवात एका पुराणकथेने होते. ही कथा अशी- पार्वतीने एकदा गंमत म्हणून मातीचा एक प्राणी तयार केला. तो ओबडधोबड होता. त्याला पाच पाय होते. हा प्राणी जिवंत कर, असा हट्ट पार्वतीने शंकराकडे धरला. शंकराने आधी या गोष्टीला नकार दिला. असला विद्रूप प्राणी जगात टिकाव धरू शकणार नाही असं शंकराला वाटत होतं; पण पार्वतीने आपला हट्ट सोडला नाही. अखेर शंकराने नमतं घेतलं. मात्र, त्या प्राण्यात प्राण फुंकण्यापूर्वी शंकराने त्याचा पाचवा पाय मुडपून त्याची पाठीवर वशिंड म्हणून स्थापना केली. त्यानंतर त्याने त्या प्राण्याला ‘ऊठ’ अशी आज्ञा दिली. त्यामुळे त्या प्राण्याचं नाव ‘उंट’ असं पडलं. त्या विचित्र प्राण्याची काळजी कोण घेणार, हा प्रश्नच होता. तेव्हा शंकराने स्वतःच्या त्वचेचा काही भाग सोलून त्यापासून माणूस बनवला. तो पहिला ‘रायका’. तेव्हापासून उंट आणि रायका हे एकमेकांच्या सहवासात राहू लागले.
भारतीय पुराणकथांमधले उंटांचे संदर्भ अभ्यासण्याइतकी इल्से उंटांच्या विश्वाशी एकरूप झालेली होती, हे यावरून ध्यानात येऊ शकतं. वास्तविक इल्से ही मूळची एक जर्मन प्राणी उपचारतज्ज्ञ. ती एका खेड्यात ‘गुरांची डॉक्टर’ म्हणून काम करत होती. तिचा उंट या प्राण्याशी किंवा रायकाशी संबंध यायचं कुठलंही कारण नव्हतं. पण, आपल्याकडे ‘पूर्वसंचित’ नावाची एक कल्पना आहे. इल्से आपल्या पुस्तकात म्हणते, ‘या संकल्पनेत काही तथ्य असावं असं मला आता वाटू लागलंय.’
सलग दहा-बारा वर्षं प्राण्यांवरच्या उपचारांचं काम केल्यावर इल्सेला काही तरी बदल हवा होता. म्हणून तिने उत्तर जॉर्डनमधल्या वाळवंटातल्या एका पुरातत्त्वीय उत्खननात प्राण्यांचे अवशेष ओळखण्याची नोकरी स्वीकारली. प्राण्यांच्या शरीरशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे तिला ही नोकरी मिळाली होती. त्या कामात ती लगेचच खुलली. कारण तिथे रोज नवीन आव्हानं समोर येत होती. पगार नगण्य होता, कामाचे तास सूर्योदय ते रात्री उशिरापर्यंत केव्हाही असे होते; पण कामाचा आनंद जास्त होता. त्यांचा तळ जॉर्डन नदीच्या खोर्याच्या सुरुवातीच्या भागात होता. त्या नदीच्या उगमाजवळ 7000 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मानवी वस्तीची शहानिशा करण्यासाठी ते उत्खनन चालू होतं.
उत्खननाच्या मुख्य तळाजवळ एका ओयॅसिस होतं. तिथे भरपूर झाडी होती, पाण्याचा साठा होता. एक दिवस इल्से सकाळी उत्खननाच्या दिशेने चाललेली असताना वाडीच्या पलीकडे तिला कसली तरी हालचाल जाणवली. वाडीच्या पलीकडे डोंगराचा कडा होता. त्यावरून एकामागोमाग एक असे अनेक उंट वाडीच्या दिशेने उतरत होते. त्यांच्या बरोबर काही माणसंही होती. इल्से थांबून तिकडे लक्षपूर्वक बघू लागली. उंटांची संख्या शंभराच्या आसपास तरी होती. ते सारे अत्यंत शिस्तीत एकामागोमाग एक उतरत होते. बहुतेक सर्व माद्याच होत्या. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची केसाळ आणि गुबगुबीत पिल्लं चालत होती. ती पिल्लं अजिबात मस्ती करत नव्हती. त्या कळपातला नर उंट मात्र रुबाब करत होता, माद्यांभोवती चकरा मारत होता, मधूनच गुळण्या केल्यासारखे आवाज काढत होता. त्याच्या तोंडाच्या एका बाजूने त्याची जीभ बाहेर आली होती. या कळपाबरोबर पायघोळ तपकिरी अंगरखा आणि तांबड्या चौकटी असलेला कुफिया (अरबी पद्धतीचं डोक्यावरचं आवरण) घातलेला एक माणूस होता.
उंट पाण्याजवळ आले तेव्हा इल्सेला एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं. त्या उंटांनी पाण्याजवळ गर्दी न करता आणि अजिबात ढकलाढकली न करता एका वेळेस पाच अशा पद्धतीने पाणी प्यायला सुरुवात केली. आधीच्या गटाचं पाणी पिऊन होईपर्यंत मागचे सर्व उंट शांतपणे वाट बघत उभे होते. आधीचे उंट बाजूला झाले की तो बेदू उंटपाळ पुढच्या उंटांना पाणी प्यायला सांगायचा. तोपर्यंत ते जागचे हलत नसत. इल्से म्हणते, ‘हा देखावा माझ्या दृष्टीने हृदयस्पर्शी ठरला.’ ती शिस्त, एवढ्या मोठ्या कळपाचं नियंत्रण करणारा तो एकमेव माणूस, ती हवीहवीशी वाटणारी उंटाची गुबगुबीत पिल्लं, उंटांचा समजूतदारपणा यामुळे हा सर्व पौर्वात्य जादूभर्या वातावरणाचा परिणाम असावा, असं इल्सेला वाटून गेलं.
इल्से ती उभ्या असलेल्या टेकडीवरून उतरून त्या बेदूला भेटायला पुढे गेली. ती म्हणते, ‘कुठल्या तरी अनामिक आकर्षणाने मी तिकडे खेचली गेले.’ तिला अरबी भाषेतले दहा-बारा शब्दच माहीत होते, तरीही तिने त्या बेदूशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्या प्राण्याबद्दल आपल्याला कुतूहल वाटतंय, असा आश्चर्यकारक प्राणी अजूनपर्यंत आपण बघितलेला नाही, वगैरे सांगायचा ती प्रयत्न करत होती. त्या माणसाने कुठलीही विस्मयाची भावना चेहर्यावर न आणता तिला आपल्या तंबूत येण्याचं निमंत्रण दिलं. त्याच्या पत्नीचे आणि इल्सेचे सूर जुळले. तिचं नाव उम्म जुमा असं होतं. त्यांची अस्वच्छ पण गुटगुटीत मुलं तिथेच खेळत होती. तो तंबू, काही गालिचे, फोमची गादी, स्वयंपाकाची काही भांडी ही त्यांची ऐहिक संपत्ती. हो, तो उंटांचा कळप हा त्यांच्या संपत्तीचा ठेवा होता. कुटुंब आनंदी होतं. हसत-खेळत दैनंदिन उद्योग सुरू ठेवून त्यांनी तिला चहाचे अनेक कप प्यायला दिले.
त्यानंतर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इल्से त्या उंटांचं निरीक्षण करण्याकरता त्या कळपाभोवती फिरू लागली. वसंत ऋतूची सुरुवात होती. अनेक प्रकारच्या खुरट्या वनस्पती फुलल्या होत्या. गवत वाढलेलं होतं. त्या उंटमाद्या वाकून आपल्याला हवं तेवढं गवत खाण्यात मग्न असायच्या. त्यांची वशिंडं पुन्हा जोमाने वाढू लागली होती. ते दृश्य इल्सेला भारून टाकत होतं. उंटांची पिल्लं आपल्या आयांभोवती खेळत असायची. त्यांच्या लुटुपुटूच्या मारामार्या, पळापळ आणि मधूनच दूध प्यायला आईजवळ धाव घेणं, या गोष्टींचं निरीक्षण करण्यात वेळ कसा निघून जातो हे इल्सेला कळत नव्हतं. ते करताना तिला एक आत्मिक सौख्य लाभत होतं.
एक दिवस अचानक ते कुटुंब आपल्या उंटांसकट नाहीसं झालं. त्यानंतर जॉर्डनच्या वास्तव्यात इल्सेला पुन्हा उंटाचं दर्शन झालं नाही. त्या उत्खननाचं काम संपल्यानंतर ती घरी परतली. तिचा व्यवसाय परत सुरू झाला, तरीही तिचं उंटाबद्दलचं कुतूहल शमलं नव्हतं. तिने उंटाबद्दल मिळेल तिथून माहिती मिळवायला सुरुवात केली. अरबस्तानात पूर्वीच्या काळी भटकंती केलेल्या युरोपी प्रवाशांच्या हकीगती आणि प्रवासवर्णनं तिने अधाशासारखी वाचून काढली. बेदुईंच्या जीवनातलं उंटाचं महत्त्व हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं. बेदुईंचं सामाजिक आणि आर्थिक जीवन उंटाभोवती उभं होतं, त्यांचं खाणं-पिणं उंटावर अवलंबून होतं. परमेश्वराने उंट त्यांच्यासाठीच निर्माण केले आहेत हा समज त्यांच्यात दृढ होता, कारण त्यांचं अस्तित्वच उंटावर अवलंबून होतं.
उंटाला अरबी भाषेत ‘जमाल’ म्हणतात. (या शब्दाचा दुसरा अर्थ ‘अत्यंत सुंदर’ असाही आहे.) मात्र, केवळ अरबस्तानच्या वाळवंटातच उंटाचा आणि संस्कृतीचा परस्परसंबंध आहे असं नाही, तर उत्तर आफ्रिकेतील तुआरेगांच्या संस्कृतीचा आधारही उंट हाच आहे. त्यांच्या संस्कृतीत उंट म्हणजे जिव्हाळा, उंट म्हणजे प्रेम, उंट म्हणजे सुबत्ता. इथिओपियाच्या आफार जमातीत ‘मूल मेलं तर चालेल, पण उंट मरता कामा नये’ अशा अर्थाची म्हण आहे. केन्यामधल्या रेंडिल आणि गाब्रा जमातीच्या सर्व परंपरा आणि धार्मिक कर्मकांडं उंटकेंद्रित असतात. या सर्वांपेक्षाही उंटाला अधिक जवळचा मानणारी संस्कृती म्हणजे सोमाली. त्यांचं महाकाव्य म्हणजे उष्ट्रपालनाचा माहितीकोश असून त्यात उंटाची जन्मापासून मृत्यूपर्यंत कशी देखभाल केली तर ऐहिक सुखात कशी भर पडते याची माहिती मिळते.
ज्यांचा वाळवंटाशी संबंध नसतो अशा प्रदेशातील लोकांना उंटाचं महत्त्व कळत नाही. मग ते उंटांबद्दल तुच्छतेने बोलतात. संस्कृत साहित्यातही उंटाची कुरूप म्हणून अवहेलना करण्यात आली आहे. युरोपी मंडळीसुद्धा उंटाला तुच्छ लेखण्यात मागे नव्हती, असं इल्सेला अनुभवायला मिळालं. सुदैवाने सर्वच युरोपी या मताचे नव्हते. ज्यांचा वाळवंटी भूप्रदेशाशी प्रत्यक्ष संबंध आला होता त्यांना उंटाचं महत्त्व पटलं होतं. अशा लोकांनी वाळवंटी प्रदेशातील लोकांचे आणि उंटांचे परस्परसंबंध आणि या वाळवंटी जहाजाचे गुण यांच्याबद्दल खूप लिहिलं होतं. विल्फ्रेड ब्लंट, विल्फ्रेड थेसिजर यांनी आपल्या वाळवंटी प्रवासाच्या यशाचं सर्व श्रेय उंटांना दिलं होतं. त्यांच्या मते ज्या माणसांना वाळवंटात आयुष्य कंठायचं असतं त्यांच्यावर उंट निर्माण करून देवाने अनंत उपकार करून ठेवले आहेत. जर उंट हा प्राणी नसता तर वाळवंटात माणूस जगूच शकला नसता. वाळवंटी लोकही त्यामुळे उंटाला देवाची देणगीच मानतात. उंट वाळवंटातील काटेरी झुडुपं काट्यांसकट खाऊन जगतो. या क्षारयुक्त आणि निरुपयोगी वाटणार्या वनस्पतींचं तो सकस अन्नात रूपांतर करतो आणि त्यांच्यापासून ऊर्जा मिळवतो. या वनस्पतींवर जगणार्या उंटमाद्या वर्षभर अतिशय दर्जेदार आणि शक्तिवर्धक दूध देतात. वाळवंटातल्या माणसांचं ते वर्षातील बराच काळ प्रमुख अन्न असतं. काही वेळा या माणसांना तेवढंच अन्न उपलब्ध असतं. याशिवाय उंटाचं मांस, उंटाची लोकर आणि उंटाचं शेण हे वाळवंटातील जगणार्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आणि उपयुक्त पदार्थ असतात.
वाळवंटी परिस्थितीचा अभ्यास करणार्या परिस्थितिकी तज्ज्ञांनी उंटावर स्तुतिसुमनांचा वर्षावच केलाय. त्यांच्या मते उंट ही निसर्गाची कमाल आहे. वाळवंटात जगणारं ते एक आश्चर्यजनक यंत्र आहे. उंट परिसराच्या तापमानानुसार आपलं शारीरिक तापमान बदलू शकतो. त्यामुळे त्याला कमीत कमी घाम गाळावा लागतो आणि तो पाण्याची बचत करू शकतो. मुख्य म्हणजे उंटाच्या तांबड्या पेशींची पाणी साठवण्याची क्षमता अफाट असते. उंट जेव्हा पाणी पितो तेव्हा या पेशी आपल्या मूळ आकाराच्या 240 पट फुगू शकतात. बाकी कुठल्याही प्राण्याला ही किमया साध्य नाही. इल्से उंटांमुळे अधिकाधिक प्रभावित होत गेली. तिने उंट आणि पुरातत्त्व हे दोन्ही विषय एकत्रित करून अभ्यास करण्याचं ठरवलं. आपल्या डॉक्टरेटसाठी तिने ‘उंट कसा आणि केव्हा माणसाळला?’ हा विषय निश्चित केला.
आजच्या पाळीव प्राण्यांचे पूर्वज एके काळी वन्य प्राणी होते. तसं बघायला गेलं तर माणूसही एके काळी वन्य जीवच होता. तो वस्ती करून राहायला लागल्यावर हळूहळू त्याला कळत गेलं, की काही प्राणी आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. मानवी वस्तीजवळ राहून अन्न आणि संरक्षण या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होतात, हे काही प्राण्यांनाही हळूहळू लक्षात येऊ लागलं. वन्य प्राण्यांचे पाळीव प्राणी होताना हळूहळू त्यांच्यात काही सूक्ष्म असे बदल घडत गेले. माणसाने त्या प्राण्यांचं नियंत्रित प्रजनन केलं. त्यामुळे त्यांच्या दुधाची-लोकरीची प्रतवारी, आक्रमकपणा आणि असेच इतरही गुणधर्म कालांतराने बदलत गेले. ज्या लोकांनी आणि जनसमूहांनी आपल्या परिसरातल्या प्राण्यांना माणसाळवलं, त्या समाजाच्या सामूहिक चालीरीती आणि परंपरांमध्ये ते प्राणी सामावून घेतले गेले. आपल्याकडे गायीच्या बाबतीत हे घडून आलं, तर वाळवंटात उंटाच्या बाबतीत ते घडलं.
उंट, घोडा आणि शिडाची जहाजं यांच्यामुळे माणूस पृथ्वीवर सर्वदूर पसरला. चीनपासून निघणारा रेशीम मार्ग (सिल्क रोड), दक्षिण अरबस्तान आणि भूमध्य सागराभोवतालचे प्रदेश यांच्यातील ‘सुगंधी मार्ग’ (इसेन्स रोड) आणि भारतातून युरोपात मसाले नेणारे मार्ग, तसंच सहाराच्या भूप्रदेशात उंट नसते तर माणूस कधीच पोचला नसता. वाळवंटी युद्ध आणि वाळवंटातून होणारा व्यापार, तसंच अरबांमार्फत पूर्वेचं ज्ञान पश्चिमेत पोचण्यामागे उंटांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
उंट माणसाळल्यामुळे उंटाचं प्रजनन करणार्या जनसमूहाची एक नवी संस्कृती उदयास आली. जगाच्या वेगवेगळ्या भागांतल्या उंटकेंद्रित जमातींमध्ये एक मूलभूत साम्य आहे. एक म्हणजे या सर्व जमाती भटक्या आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंटांचा जननदर इतर बर्याच पाळीव प्राण्यांच्या मानाने खूप मंदगती असल्याने या जमातींनीही आपला जननदर कमी करण्याचे काही मार्ग शोधलेले आहेत. जर या जमातींनी कुटुंब नियोजनाचे मार्ग शोधले नसते तर त्यांच्या संख्येला आवश्यक तेवढे उंट उपलब्ध झाले नसते आणि त्यांना वाळवंटात जगणं अवघड झालं असतं.
इल्सेचा अभ्यास सुरू झाला. उंटाच्या रानटी अवस्थेतून पाळीव अवस्थेत येण्याचे पहिले टप्पे अज्ञातच होते, असं तिच्या लक्षात आलं. याचं कारण वाळवंटात म्हणावं तितकं पुरातत्त्वीय संशोधन झालेलं नाही. त्यामुळे याबद्दलचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. मग इल्सेने वाळवंटी उत्खननांचे यापूर्वीचे सर्व अहवाल शोधून त्यात काही पुरावे दडले आहेत का, हे शोधणं सुरू केलं. उंटांची हाडं, उंटांच्या मूर्ती, उंटांसंबंधी भित्तिचित्रं, गुहांमधली चित्रं, मुलांच्या खेळण्यांच्या अवशेषांमधली उंटकेंद्री खेळणी, मडक्यांच्या खापरांवरील चित्रं आणि अशाच आणखी काही गोष्टींचा शोध तिने घेतला. यामुळे अगदी प्रागैतिहासिक काळापासून उंट आणि माणूस यांचा परस्परसंबंध कसा होता हे स्पष्ट होण्यास मदत झाली. त्यावरून इल्सेने जे अंदाज बांधले त्यानुसार इ.स.पूर्व तीन हजारच्या आसपास म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी कधी तरी उंट (म्हणजे ड्रोमडेरी, अर्थात एका वशिंडाचा उंट) मानवाचा साथी बनला. साधारणपणे त्याच सुमारास बॅक्ट्रियन कॅमल म्हणजे दोन वशिंडांचा उंट उत्तर इराण आणि तुर्कमेनिस्तानमध्ये माणसाचा साथी बनला.
यथावकाश इल्सेला पीएच डी मिळाली. त्यानंतर पुढे काय, हा प्रश्न तिच्यासमोर होताच. त्याच वेळी तिला जॉर्डनमधल्या बेदूंच्या आणि उंटांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली; पण तिला जॉर्डन सरकारने संशोधनासाठी आवश्यक ती परवानगी नाकारली. त्यासाठी दिलं गेलेलं कारण तसं विचित्रच होतं. अधिकृत माहितीनुसार जॉर्डनमध्ये कुठेही तंबूत राहणारे बेदू अस्तित्वात नव्हते; कुठलेही बेदू किंवा अरब उंटांवर अवलंबून नव्हते किंवा उंट वापरतसुद्धा नव्हते. हे खरं तर धादांत असत्य होतं; पण ते मान्य करणं इल्सेला भाग होतं. मग तिने पुन्हा पुरातत्त्वीय संशोधनात भाग घ्यायला सुरुवात केली. याच सुमारास गॅरी रोलेफसन हा मानवशास्त्रज्ञ तिच्या जीवनात आला. त्यांचा प्रेमविवाह झाला. नंतर वर्षभरातच तिला जुळं झालं. त्या वेळी ती अम्मानमध्ये होती. तिच्या आयुष्यातून उंट हद्दपार झाल्यातच जमा होते. हे जोडपं मग कॅलिफोर्नियामध्ये सॅन डिएगोला वास्तव्यास गेलं. तिथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये गॅरी मानवशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला, तर इल्से पुरातत्व शिकवू लागली.
असा बराच काळ लोटला. खार्टुम विद्यापीठातल्या प्राणिवैद्यक विभागातील एका प्राध्यापकाने इल्सेला बोलवून घेतलं. त्याची आणि इल्सेची जुनी ओळख होती. सुदानमधल्या पूर्व सहारातील उंटांवर संशोधन करण्यासाठी इल्सेला शिष्यवृत्ती मिळेल अशी त्याने व्यवस्था केली होती. सुदानमध्ये उंटांना अजूनही महत्त्व होतं. इल्सेला शिष्यवृत्ती देणारे प्राध्यापक म्हणजे जागतिक कीर्तीचे उंटतज्ज्ञ होते. उंटांवरचं संशोधन कसं असावं याचे त्यांनी ठरवून दिलेले मापदंड जगन्मान्य होते. त्यांना एक उंट संशोधन केंद्र प्रस्थापित करायची इच्छा होती; पण उंटांवर जीवन अवलंबून असलेली जगातली कुठलीही जमात कधीच एका जागी फार काळ मुक्कामास नसते, हे पाहता संशोधन केंद्र नेमकं कुठे प्रस्थापित करावं याबद्दल त्यांचा निर्णय होत नव्हता. मात्र, इल्सेचा आणि त्यांचा अभ्यास परस्परपूरक असल्याचं दिसल्यावर बक्री, त्यांचा साहाय्यक डॉ. मुहम्मद फादी आणि इल्से यांनी सुदानच्या हद्दीतल्या सहारात जीपमधून शेकडो कि.मी.चा प्रवास केला. त्या भागात त्यांना रशैद बेदूंच्या टोळ्या भेटल्या. त्यांच्याशी बोलण्यातून त्यांना उंटांच्या कळपांची रचना कशी असते, ते कुठल्या वनस्पतींवर जगतात, त्यांच्या प्रजजनातल्या पद्धती आणि अडचणी, त्यांचे विविध आजार आणि त्यांवरचे पारंपरिक उपचार, इत्यादी विषयींची माहिती मिळाली.
रशैद बेदू एकोणिसाव्या शतकात सौदी अरेबियातून सुदानमध्ये आले. त्यांनी निरनिराळ्या कामासाठी उंटांचे वेगवेगळे प्रकार आपलेसे केले. त्यांनी अरबस्तानामधून येताना आणलेले उंट आकाराने छोटे, काटक आणि भरपूर दूध देणारे होते. याशिवाय ते स्थानिक मातकट तपकिरी रंगाच्या उंटांची पैदास करू लागले. या उंटांच्या मांसाला (हलीम) इस्लामी जगात खूप मागणी असल्यामुळे हे उंट ते कैरोला कत्तलखान्यात पाठवत असत. याशिवाय ते शर्यतीच्या उंटांचीही पैदास करत होते. इल्सेचा हा अभ्यास चालू असतानाच सुदानमध्ये बंड झालं. सर्वच परकीयांचे रहिवास परवाने रद्द झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तेव्हा तिला अमेरिकेत परतावं लागलं.
परतल्यानंतर इल्सेने एका शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. संशोधनासाठी तिने ‘उंटांच्या सामाजिक, आर्थिक प्रभावाचे आणि उंटपालनाच्या व्यवस्थापनाचे संशोधन’ असा विषय निवडला होता. या विषयावर तोपर्यंत फारसं संशोधन झालेलं नव्हतं. तिने मिळवलेल्या उंटविषयक माहितीत तिला दिसून आलं, की उंटपालनात जगात भारत आघाडीवर होता. भारतात केवळ भटक्या जमातीच उंटपालन करत होत्या असं नाही, तर शेतीला जोडधंदा म्हणूनही उंट पाळले जात होते. भारतातल्या उंटांची संख्या दहा लाखांहून अधिक होती. तिथे ‘नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल्स’ या संस्थेमार्फत उंटांवर संशोधनही सुरू होतं. इथल्या अभ्यासाचा फायदा आफ्रिकी देशांमधील उंटपालनाला होऊ शकला असता.
इल्सेचा हा प्रस्ताव मान्य झाला. त्याच वेळेस तिच्या पतीला- गॅरीला फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली. तो पुण्याला डेक्कन कॉलेजात रुजू झाला. त्यांच्या मुलांना पुण्यातच शाळेमध्ये प्रवेश मिळाला आणि इल्सेचं कुटुंब पुण्यात राहायला लागलं. कामानिमित्त पुण्यातून राजस्थानात ये-जा करण्याचं तिने ठरवलं. बारमेर इथल्या उंट संशोधन केंद्राशी ती आधीपासूनच संपर्कात होती. तिथून तिला भारतीय उंटांबद्दल जी माहिती मिळाली त्यानुसार सोमालिया आणि सुदान या देशांनंतर भारतात जगातील सर्वाधिक उंट होते. इतके उंट असलेल्या देशात उंटांचं प्रजनन, उंटपालन आणि उंटांवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे अशा जमाती यांबद्दल कुठेही, कसलेही लेखी अहवाल उपलब्ध नव्हते. नाही म्हणायला 1908 साली प्रसिद्ध झालेल्या राजपुताना गॅझेटियरमध्ये एक नोंद होती- ‘आखाडमध्ये रेबारी, ज्यांना रायका असंही म्हटलं जातं, त्यांची संख्या सुमारे 3.5% आहे. हे उंटपालनावर जगतात.’ त्या नोंदीत शंकर-पार्वतीच्या कथेचाही उल्लेख होता. मात्र, याव्यतिरिक्त राष्ट्रीय उंटसंशोधन केंद्राच्या वार्षिक अहवालात किंवा अलीकडच्या काळातल्या उंटांवरच्या शोधनिबंधांमध्येसुद्धा उंटपालन, उंटप्रजनन यांचा इतिहास हाती लागत नव्हता. भारतात उंटपालन कधी, केव्हा आणि कसं सुरू झालं; उंट कसे माणसाळवण्यात आले, त्या काळात त्यांचा कसा आणि कशासाठी वापर केला गेला, त्यांच्या प्रजननपद्धतीत काही सुधारणा केल्या गेल्या का, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच होते.
इल्से हे सारे प्रश्न घेऊन बिकानेरच्या ‘नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल’ इथे दाखल झाली. हे संशोधन केंद्र बिकानेरच्या एका बाह्य उपनगरात आहे. इथे एक उंटपालन केंद्र आहे. त्यात भारतातल्या विविध प्रजातींचे उंट आहेत. कानावर लांब केस असलेले बिकानेरी उंट, मंदगतीने हालचाली करणारे कच्छी उंट, चपळ व लांब पायांचे जैसलमेरी उंट, इत्यादी. यातले कच्छी उंट सर्वाधिक दूध देतात, तर बिकानेरी उंट ओझं वाहण्यासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त ठरतात. याशिवाय तिथे अरबस्तानातून भेट म्हणून आलेले उंटही होते. हे सगळे उंट सुदृढ होते. त्यांची व्यवस्थित देखभाल होत असल्याचं त्यांच्या सुस्थितीवरून जाणवत होतं. हे उंट वेगवेगळ्या प्रयोगांसाठी वापरले जात होते. कृत्रिम रेतन पद्धतीने गर्भधारणा करण्याचं तंत्र उंटांच्या बाबतीत यशस्वीपणे राबवलं जात होतं. त्याशिवाय ‘गर्भ कलमा’चं तंत्र पूर्णत्वास नेण्याचे प्रयोगही या ठिकाणी सुरू होते.
इल्सेला उंटपालांना, त्यातही रायकांना भेटण्याची इच्छा होती. केंद्राचे संचालक डॉ. खन्ना यांनी तिची ही विनंती मान्य केली आणि इल्से प्रथमच एका रायकाला भेटली. त्या वेळी इल्सेला कुठल्याही भारतीय भाषेचा गंध नव्हता. त्यामुळे केंद्रातील कुणी तरी दुभाष्याचं काम करत असे. त्या रायकाचं नाव काणाराम असं होतं. “तुमचे उंट कुठे आहेत?” तिने काणारामला पहिला प्रश्न विचारला. “असतील तिकडे कुठे तरी.” पश्चिमेच्या दिशेने हात करत तो म्हणाला. त्या पहिल्या उत्तरानेच इल्सेवर थक्क व्हायची पाळी आली होती. तिच्या चेहर्यावरील विस्मय पाहून तो दुभाष्या म्हणाला- “त्याचे उंट इथेच कुठे तरी वीस-पंचवीस किलोमीटरच्या परिसरात चरत असतील. इथलं उंटपालन याचप्रकारे चालतं. फक्त पावसाळ्यात शेतं पिकल्यानंतर उंटांना एकत्र करून गावात आणलं जातं. उंट दिवसाआड पाण्यासाठी गावात परत येतात. इथे उंटांची शिकार करणारे प्राणी नाहीत. या भागात कुणी उंट चोरतही नाही. शिवाय प्रत्येक उंटाच्या पुठ्ठ्यावर त्याच्या गावाची निशाणी उमटवलेली असतेच. समजा, एखादा उंट भरकटलाच, तर त्याची बातमी त्या निशाणीवरून गावकर्यांना कळवली जाते, किंवा कुणी तरी त्या उंटाला गावात आणून सोडतो. शिवाय रायका त्या उंटाच्या पावलांच्या ठशांवरून त्याचा माग काढू शकतात. ते त्यासाठी प्रसिद्ध आहेत. ही कला ज्यांना अवगत आहे त्यांना ‘पगरी’ म्हणतात. ‘पग’ म्हणजे तळपायाचा ठसा. एवढंच नाही, तर उंटीण गाभण आहे की नाही हेसुद्धा त्यांना पायाच्या ठशावरून कळतं.”
ही नवी माहिती पचवणं इल्सेला जरा कठीण गेलं. तिने मग दुभाष्यामार्फत पुढचा प्रश्न विचारला- “तुझ्याकडे किती उंट आहेत?”
“आम्ही तिघं भाऊ आहोत. आमच्या कुटुंबाकडे तीनशे उंट आहेत.”
त्यावर इल्सेनं विचारलं, “तीनशे उंट बाळगायचे तर त्यांचा काही उपयोग होत असणार?”
“हो. यातले 80% उंट माद्या आहेत. त्यांना पिल्लं आहेत. आम्ही ती पिल्लं पुष्करच्या जत्रेच्या वेळी उंटांच्या बाजारात विकतो.”
“या उंटांचा इतर काही गोष्टींसाठी तुम्ही वापर करता का? म्हणजे त्यांचं दूध काढणे वगैरे?” इल्सेने विचारलं.
यावर नकारार्थी मान हलवत काणाराम म्हणाला, “ते कसं शक्य आहे? ते तर दूरवर हिंडत असतात ना! आमच्याकडे एक म्हैस आहे. गायही आहे. त्यांचं दूध आम्ही घरात वापरतो. त्यातून उरतं ते मग विकतो.”
“आणि उंटाचं मांस- ते तुम्ही खाता का?” हा प्रश्न इल्सेने विचारताच दुभाष्यानेच मान नकारार्थी हलवत म्हटलं, “हा प्रश्न विचारणं म्हणजे रायकांचा अपमान करण्यासारखं आहे. ते हिंदू आहेत आणि ते शाकाहारी आहेत. या प्रश्नाचा त्यांना धक्का बसेल. तेव्हा पुन्हा ही बाब इथे कुणासमोरही बोलू नका.”
यावर इल्सेने त्या दुभाष्याची माफी मागत तो विषयच बदलला. याच संभाषणात तिला उंटाचा आणखी एक व्यावहारिक उपयोग समजला. रायकांच्या लग्नात उंटांचा हुंडा म्हणून वापर केला जातो. काणारामला लग्नात एक नर उंट आणि 21 माद्या उंट हुंडा म्हणून मिळाल्या होत्या. त्या घटनेला बराच काळ होऊन गेला होता. अलीकडे उंटांचा हुंडा म्हणून वापर बंद झाला होता. त्या वेळी या गावात दोन हजार उंट होते. बदलत्या काळाबरोबर रायकांच्या तरुण पिढीचं उंटप्रेम ओसरू लागलं होतं.
एवढे उंट बाळगूनही उंटिणीचं दूध अगदी क्वचित पिण्यासाठी वापरलं जातं. त्याची विक्री केली जात नाही. त्यापासून चीज किंवा दहीही बनवलं जात नाही. ते उंटांच्या पिल्लांसाठीच ठेवलं जातं. उंटांच्या केसांपासून गालिचे आणि उबदार पांघरुणं बनवली जातात. त्यांच्या दोर्या वळून चारपाईची नवार म्हणून वापरल्या जातात. उंटांची लीद वाळू आणि मातीत मिसळून ती भिंती उभारण्यासाठी आणि भिंतीचा गिलावा म्हणून वापरली जाते. मेलेल्या उंटांची हाडं कुटून खत करतात. त्यांच्या कातड्यांपासून पिशव्या बनवल्या जातात. नर उंटांना अंगमेहनतीची कामं करावी लागतात. ओझी वाहणं, गाडे ओढणं, मोटेने पाणी काढणं, वगैरे. तसंच, सीमा सुरक्षा दल सीमेवर पहारा करण्यासाठी उंटांचा वापर करतं. रायकांचं काम उंटपालन करणं आणि ज्यांना उंटांची गरज असते त्यांना उंट विकणं. राजस्थानी दंतकथांमधून, पारंपरिक प्रेमकथांमधूनही उंटाला फार महत्त्वाचं स्थान होतं.
रायकांशिवाय इतर जमातीही उंट पाळतात. तेव्हा दुभाष्यामार्फत इल्सेने त्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. तिला कुठेच वेगळी माहिती मिळेना. अनेक गावांना तिने भेटी दिल्या. अखेरीस नोखा नावाच्या गावातल्या रायकांनी तिला ‘आपले पूर्वज जैसलमेरच्या महाराजांच्या उंटाची देखभाल करायचे’ अशी माहिती दिली. इतर उंटपालांमध्ये मुस्लिमांचा समावेश होता. ते मात्र उंटांचं दूध प्यायचे. त्यांच्या मते हे दूध खूप पौष्टिक असतं. ते दिवसातून तीन वेळा उंटिणींचं दूध काढत होते. दररोज प्रत्येक उंटीण आठ ते दहा लिटर दूध देते. ही मुस्लिम उंटपाल मंडळी उंटांच्या शर्यतीसुद्धा आयोजित करतात; तर काहीजण उंटांना नाचायला आणि इतर कसरती करायला शिकवतात. उंटाचं मांस मात्र इथेही खाल्लं जात नव्हतं.
राजस्थान पिंजून काढताना इल्सेला माहिती मिळाली, की बिकानेरच्या महाराजांनी 1889 मध्ये एक उंटांची सैन्य तुकडी उभारली होती. त्या तुकडीत 500 उंटस्वारांचा समावेश होता. महाराज गंगासिंहांच्या या सैनिकी तुकडीचं नाव ‘गंगा रिसाला’ असं होतं. ही तुकडी ब्रिटिशांनी चीन, इजिप्त, सोमालीलँड (सोमालिया) आणि अफगाणिस्तानात युद्ध आणि गस्तीच्या कामासाठी वापरली होती. गंगासिंहांच्या राजवाड्याचं आता पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर झालेलं होतं. जे कागदपत्र उरले होते, त्यांना हात लावताच त्यांचे तुकडे होत होते. ती कागदपत्रं खूप काळजीपूर्वक हाताळून इल्सेला पुढील माहिती मिळाली- ‘या संस्थानात फार पूर्वीपासून उंटांच्या टोळ्या पाळण्याची प्रथा आहे. या भागात दळवळणाचं दुसरं साधन नसल्यामुळे ही प्रथा पडली. ब्रिटिशांच्या काळात मांडलिक बनल्यानंतर या तुकड्यांसाठी काही कायदे बनवले गेले. रायकांना संस्थानाच्या भूमीत उंट चारायची परवानगी हवी असेल तर प्रत्येक कळपाबरोबर 50 सरकारी उंटांचा समावेश करावा लागेल, अशी अट त्यात होती. रायका याचा गैरफायदा घेतात, असं महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ही उंट तुकडीच बरखास्त केली.’
ही माहिती मिळूनही इल्सेचं समाधान झालं नव्हतं. रायकांचे आणि उंटांचे परस्परसंबंध कसे निर्माण झाले याचं कोडं सुटण्यासाठी हवी असलेली माहिती काही तिला मिळत नव्हती. तिने उंटांचा कळपही बघितला नव्हता. गावकर्यांकडचे उंट तिला दिसत, पण चरायला सोडलेल्या कळपांचं दर्शन होत नव्हतंच. त्यात हा भाग भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ होता, शिवाय ती परदेशी. त्यामुळे तिला वाळवंटात हिंडून उंटांचे कळप शोधणं किंवा त्यांचं निरीक्षण करणं शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत डॉ. देवराम देवासी या तरुणाशी तिची ओळख झाली. त्याने नुकतीच बिकानेर विद्यापीठामधून प्राणिवैद्यकाची पदवी मिळवली होती. विद्यापीठाची पदवी मिळवणार्या मोजक्या रायकांपैकी तो एक होता.
डॉ. देवरामची ओळख झाल्यानंतर खर्या अर्थाने इल्सेच्या संशोधनाला दिशा मिळाली. इल्से 1991मध्ये प्रथम या भागात आली. नंतर पाच-सहा वर्षं ती पुण्याहून ये-जा करून रायकांचा अभ्यास करत होती. दरम्यान, तिच्या पतीची इथल्या शिष्यवृत्तीची मुदत संपली आणि तो अमेरिकेत निघून गेला. नंतर शालेय शिक्षण संपवून मुलंही गेली. इल्सेला मात्र उंट आणि रायकांनी पछाडलं होतं. तिने पुण्याहून आपला मुक्काम हलवला. आता ती साद्री, जैसलमेर आणि जोधपूर इथे राहू लागली. तिच्या कुटुंबाशी हळूहळू तिचा संपर्क कमी कमी होऊ लागला आणि अखेर संपला. ती उंटांमध्ये अधिकाधिक गुंतत गेली. नंतर ती हिंदी बोलू लागली.
राजस्थानातच राहू लागल्यावर तिने उंटांचा अधिक अभ्यास सुरू केला. राजस्थानामधील उंटांमध्ये एक रहस्यमय आजाराची साथ आली. त्यामुळे रायकांचं जीवन विस्कळीत होऊ लागलं. रायकांची नवी पिढी उंटांना दुरावू लागली, तेव्हा इल्सेने त्या रोगाचा छडा लावायचा निश्चय केला. त्या रोगाचं मूळ कारण शोधून त्यावर औषधोपचार केले.
राजस्थानातले उंट मांसासाठी चोरून बांगला देशमध्ये नेले जात होते. त्या चोरट्या मार्गाचाही तिने शोध घेतला. अधिकृतरीत्या बांगलादेशी हे नाकारत होते. त्याच सुमारास भारताच्या सीमा सुरक्षा दलाने हा चोरटा व्यापार करणार्यांना पकडलं. त्या काळात बांगलादेशी सैनिकांनी गोळीबारही केला. या बातम्या मग वृत्तपत्रांत झळकल्या आणि हा चोरटा व्यापार चव्हाट्यावर आला.
इल्सेने आपलं आयुष्यच आता भारतीय उंट आणि रायका यांच्या सेवेस वाहून घेतलं आहे. एक जर्मन पशुवैद्य सुरक्षित आणि आरामाचं जीवन सोडून पुरातत्त्व उत्खननात भाग घ्यायला जाते, तिथे प्रथमच उंट बघते, मग उंटांच्या प्रेमाने झपाटून दुर्गम वाळवंटांमध्ये वावरू लागते, हे सगळंच अगम्य आणि अद्भुत वाटतं. हॅट्स ऑफ टु यू, इल्से!
- निरंजन घाटे
020-24483726
हटके भटके
निरंजन घाटे
समकालीन प्रकाशन
किंम ः 250
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा