कोंड्याचा मांडा आणि अन्नाची नासाडी
प्रीति छत्रे
अन्नाची नासाडी म्हटलं की आपल्याला लग्नकार्यातल्या जेवणावळी किंवा हॉटेलांमधली उष्ट्या अन्नाने ओसंडून वाहणारी टेबलं आठवतात; पण अन्नाच्या नासाडीचा आवाका त्यापलीकडेही बराच मोठा आहे.
मध्यंतरी वर्तमानपत्रात आतल्या कुठल्या तरी पानावर एक छोटंसं वृत्त प्रकाशित झालं होतं. ‘कचराकुंड्यांची पाहणी करून वाचवले 1.2 कोटी रुपये’- अशा साधारण अर्थाचा तो मथळा होता. त्यात जे दिलेलं होतं ते चमकवणारं होतं.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर खानपान-सेवा पुरवणार्या एका कंपनीचे एक उच्चपदस्थ अधिकारी त्या दिवशी विमानतळावर आपल्या विमानाची वाट पाहत थांबलेले होते. त्यांच्या कंपनीच्या ‘फुड लाऊंज’ची एक मोठी, आधुनिक ‘टपरी’ तिथे होतीच. त्यांना दिसलं, की टपरीच्या आसपास ठेवलेल्या कचराकुंड्या भरून वाहत होत्या. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांचं विमान जरा लेट झालं आणि त्यांना त्यावर विचार करण्यास थोडी उसंत मिळाली. त्यांनी काय केलं? सरळ दोन हॅण्डग्लोव्ह्ज चढवले आणि एका कचराकुंडीची पाहणी करायला सुरुवात केली. ती इतकी भरून का वाहत होती, लोकांना तिथे मिळणार्या अन्नाची चव आवडत नव्हती का, ते त्यांना तपासायचं होतं. एका कचराकुंडीची पाहणी करून त्यांना त्यामागचं कारण लक्षात आलं. त्यांनी आपल्या कंपनीला पुढचे तीन दिवस तशा प्रकारे पाहणी करण्याचे आदेश दिले. त्या पाहणीअंती त्यांनी काढलेल्या निष्कर्षाला पुष्टीच मिळाली. पाहणीत असं दिसलं, की प्रश्न त्या पदार्थांच्या चवीचा नव्हता, तर तिथे एका वेळी किती अन्न वाढलं जात होतं त्याचा होता. म्हणजे एका डोशाची ऑर्डर दिली, तर सोबत सांबार-चटणी-भाजी किती दिली जात होती; एका सँडविचची ऑर्डर म्हणजे त्यात किती आणि केवढे ब्रेडचे स्लाइस वापरले जात होते, इत्यादी. पाहणीत विशेषतः हे दिसून आलं, की गिर्हाइकं गोड पदार्थ विकत घेऊन त्यांतले थोडेसेच खाऊन बाकीचे टाकून देत होते, कारण गोड पदार्थांच्या एका ‘सर्व्हिग’चा ऐवज खूप होता. त्या अधिकार्याने प्रयोग म्हणून हा ऐवज कमी करायचं ठरवलं; लगेच त्याची अंमलबजावणी सुरू केली; आणि पुढच्या एका महिन्यात त्यायोगे 1.2 कोटी रुपयांची बचत केली. थोडक्यात, त्यांनी अन्नाची नासाडी कमी केली.
अन्नाची नासाडी म्हटलं की बहुतेकांना लग्नकार्यातल्या जेवणावळी आठवतील. तिथे कसे भारंभार पदार्थ वाढून घेतले जातात किंवा आग्रह करकरून वाढले जातात, मग ते पानात कसे टाकले जातात, मग ते अन्न कसं वाया जातं, वगैरे. ती शिजवलेल्या अन्नाची (प्रोसेस्ड फुड) नासाडी असते नक्कीच; मात्र ‘अन्नाची नासाडी’ ही गोष्ट याहून किती तरी व्यापक आहे.
शेतात पिकणार्या भाज्या, फळं आणि धान्य हे मनुष्याचं आद्य अन्न. संयुक्त राष्ट्रांच्या ‘फुड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’ने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि उत्तर अमेरिका या देशांमधल्या अन्नपुरवठा साखळीची विस्तृत पाहणी केली व त्यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार काही निष्कर्ष जाहीर केले. त्या निष्कर्षांनुसार जगभरात दरवर्षी तब्बल 2.9 ट्रिलियन पाऊंड (2 लाख 90 हजार कोटी पाऊंड) वजनाच्या भाज्या आणि फळं (एकूण उत्पादनाच्या एक तृतीयांश हिस्सा) माणसांच्या ताटापर्यंत पोहोचतच नाहीत.
या नासाडीची विभागणी पाहू या :
शेतातली कापणी आणि प्रतवारी यादरम्यान होणारी नासाडी 20%
साठवणूक आणि वाहतूक यादरम्यान होणारी नासाडी 3%
प्रक्रियेदरम्यान होणारी नासाडी 2%
घाऊक व्यापार्यांकडून आणि सुपरमार्केट्समध्ये नाकारल्या गेलेल्या मालापायी होणारी नासाडी 9%
घरोघरी वाया जाणार्या अथवा टाकून दिल्या जाणार्या भाज्या-फळं 19%
या सगळ्याची बेरीज होते 53%. म्हणजे 47% भाज्या आणि फळंच अंतिमतः प्रत्यक्ष आहारात वापरली जातात. हा पाहणी अभ्यास या चार देशांतल्या आकडेवारीवरच आधारलेला असला तरी त्यावरून जगभरातल्या चित्राची कल्पना येऊ शकते.
विकसित देशांमध्ये कापणी-प्रतवारी, साठवणूक-वाहतूक आणि प्रक्रियेदरम्यान वाया जाणार्या अन्नाचं प्रमाण कमी आहे. कारण या कामांसाठीच्या अद्ययावत यंत्रणा तिथे उपलब्ध असतात. (साठवणुकीच्या सोयी, जलद वाहतुकीची उत्तम साधनं, बहुतांश रस्त्यांचा उत्तम दर्जा, प्रक्रिया केलेलं अन्न दीर्घकाळ टिकावं यासाठी केल्या जाणार्या उपाययोजना, या सर्वांसंदर्भातील कायद्यांची तुलनात्मक कडक अंमलबजावणी, इत्यादी) तुलनेने तिथे अन्नपुरवठा साखळीतल्या अंतिम टप्प्यावर, म्हणजे ग्राहकांद्वारे होणारी अन्नाची नासाडी अधिक आढळते. विकसनशील देशांमध्ये पहिल्या तीन टप्प्यांमध्ये होणारी नासाडी अधिक आहे; मात्र त्या देशांमधले ग्राहक तुलनेने नासाडी कमी करतात.
जगभरातली 80 कोटी माणसं रोज उपासमारीला तोंड देतात, हे पाहता या वाया जाणार्या एक-तृतीयांश अन्नामार्फत त्यांना दोन वेळा भरपेट जेवण देता येऊ शकतं. आकडेवारी समोर ठेवली तरच हे शक्य असल्याची खात्री पटवून देता येऊ शकते. मात्र, तसं घडत नसल्याने जगभरातल्या सर्व ग्राहकांना हे एकाच वेळी पटवून देणं अवघड जातं आणि दर ग्राहकामागे होणारी अन्नाची नासाडी या ना त्या प्रकारे सुरूच राहते.
-----
ग्राहकांद्वारे होणार्या नासाडीमागची कारणं
तुम्ही-आम्ही सर्वच अन्नपुरवठा साखळीच्या अंतिम टप्प्यावरचे घटक. त्यामुळे या घटकाकडून होणार्या नासाडीची कारणं जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
दुकानांमध्ये निव्वळ काही ‘ऑफर्स’ आहेत म्हणून किंवा समोर दिसलं, घ्यावंसं वाटलं, म्हणून विकत घेतलेले अनावश्यक अन्नपदार्थ (इम्पल्सिव्ह बाइंग).
आवश्यकतेपेक्षा अधिक ताज्या भाज्या, फळं विकत घेणं.
घरी आणलेल्या अन्नपदार्थांपैकी नाशवंत पदार्थ आधी न संपवणं.
अन्नपदार्थांचं बाह्यरूप बदलल्याने (फळं अति पिकणं, भाज्या शिळ्या होणं) ते खावेसे न वाटणं आणि म्हणून ते फेकून देणं.
स्वयंपाकघराची आवराआवरी आणि साफसफाई यादरम्यान टाकून दिला जाणारा कच्चा माल.
एकूणच, अन्नपदार्थांची भारंभार खरेदी (यात नाशवंत पदार्थांचं प्रमाण अधिक असेल तर नासाडीही अधिक होते).
गरजेपेक्षा अधिक पदार्थ शिजवणं.
पदार्थ मनासारखा जमला नाही म्हणून टाकून देणं.
यातली बरीचशी कारणं शहरी विभागातल्या ग्राहकांनाच लागू होतात; पण अन्नाची नासाडी ही शहरी विभागातच अधिक होते, हे तथ्य आहे.
यामागे काही समाज-मानसशास्त्रीय कारणंही आहेतच. आधी म्हटलं तसं, ग्राहक म्हणजे अन्नपुरवठा साखळीतला अंतिम टप्पा. ग्राहकाने पैसे घेऊन ते अन्न विकत घेतलेलं असतं. तिथून पुढे त्या अन्नाचं काय होतं यावर नियंत्रण ठेवण्याची कोणतीही यंत्रणा नसते. कुणाची तशी अपेक्षाही नसते. एकदा एखाद्या गोष्टीसाठी पैसे मोजले की त्या गोष्टीवर आपली मालकी प्रस्थापित होते, त्या गोष्टीचं पुढे आपण काहीही केलं तरी इतरांना त्याचं स्पष्टीकरण देण्यास आपण बांधील नाही, असा एक सर्वसाधारण समज दिसतो. उत्तरदायित्वाच्या अशा अभावामुळे एकूणच नैसर्गिक संसाधनांच्या नासाडीचं प्रमाण वाढीस लागतं. भांडवलवादी, उपभोगवादी जगाच्या अंधार्या कोपर्यांपैकी हा एक कोपरा, असं म्हणता येईल.
-----
अन्नाचा पुनर्वापर आणि नवे विचार
अन्नाची नासाडी आणि उपासमारी यांचा अगदी जवळचा संबंध आहे, हे कुणीही सांगू शकेल. मुख्य प्रश्न असतो तो वाया जाणार्या अन्नाचा पुनर्वापर करण्याचा. जगभरात यावर कोणते नवनवे मार्ग शोधले जात आहेत हे बघणं रोचक आहे.
2014 साली दिल्लीतल्या सहा तरुणांनी मिळून बेघरांना खायला मिळावं यासाठीची मोहीम सुरू केली. बेघरांसाठीचं अन्न ते कुठून आणणार होते? अर्थातच, अन्य अशा ठिकाणांहून, जिथे ते वाया जाऊ शकतं. सर्वप्रथम त्यांनी शहरातली हॉटेल्स गाठली, तिथे तयार असलेले पण विक्री न झालेले खाद्यपदार्थ गोळा केले आणि बेघरांना दान केले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात शंभर बेघरांना जेवायला मिळालं होतं. सोशल मीडियामार्फत या तरुणांच्या मोहिमेला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आज त्यांची ‘रॉबिन हुड आर्मी’ भारतातल्या तेरा शहरांमध्ये ही मोहीम यशस्वीरीत्या राबवत आहे. या आर्मीत पाचशे स्वयंसेवक कार्यरत आहेत. आता तर ही मोहीम पाकिस्तानमध्येही पोहोचली आहे.
कोची शहरात एक ‘फुड जॉइंट’ चालवणारी मिनू पॉलिन ही तरुणी. अन्नाची नासाडी आणि उपासमारी यांचं दुष्टचक्र तिलाही अस्वस्थ करत होतं. तिने काय केलं, तर तिच्या फुड जॉइंटच्या बाहेर एक मोठाच्या मोठा फ्रिज आणून ठेवला आणि स्थानिकांना आवाहन केलं, की त्यांनी आपल्या घरचं अतिरिक्त अन्न वाया जाण्यापूर्वी त्या फ्रिजमध्ये आणून ठेवावं. तिच्या हॉटेलमध्ये येणार्या गिर्हाइकांनाही तिने विनंती केली, की त्यांनी ऑर्डर केलेलं अतिरिक्त अन्न त्यांनी फ्रिजमध्ये ठेवावं. भुकेलेल्यांना हवं तेव्हा फ्रिजमधून अन्न काढून नेण्याची तिने मुभा दिली. या फ्रिजला तिने ‘ट्री ऑफ गुडनेस’ असं नाव दिलं आहे. तिच्या काही सहायकांचा एक चमू या दान म्हणून मिळालेल्या अन्नाच्या दर्जाकडे लक्ष देणं, त्या अन्नाची सुटसुटीत पाकिटं तयार करणं, या गोष्टींकडे लक्ष देतो.
चीनमध्ये जिनान शहराच्या बाहेर एका शेतकी तंत्रज्ञान कंपनीमार्फत एका मोठ्या प्लान्टमध्ये कोट्यवधी झुरळं पाळली गेली आहेत. या झुरळांना दररोज 50 टन वाया गेलेलं अन्न खाद्य म्हणून पुरवलं जातं. पुढे ही झुरळं डुकरांचं खाद्य बनतात. आफ्रिकन स्वाइन फीवरच्या साथीमुळे वाया गेलेलं अन्न थेट डुकरांना खाऊ घालण्यावर चीनमध्ये निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे तंत्रज्ञांनी हा मार्ग शोधला. यामुळे डुकरांना अतिरिक्त प्रोटीन्सचाही पुरवठा होतो, हा आणखी एक फायदा. असे आणखी तीन प्लान्ट्स उभी करण्याचा कंपनीचा विचार आहे, ज्यायोगे जिनान शहरातल्या वाया जाणार्या एक-तृतीयांश अन्नाचा चांगला उपयोग केला जाईल.
ट्रिस्ट्राम स्टुअर्ट हा इंग्लंडमधला तरुण लहानपणापासून वडिलोपार्जित शेतीकामात घरच्या कोंबड्या आणि डुकरांची देखभाल करायचा; मांस, अंडी यांची स्थानिकांमध्ये विक्रीही करायचा. या प्राण्यांसाठीचं तयार खाद्य खूप महाग होतं. म्हणून त्याने आसपासच्या दुकानांमधून आणि त्याच्या शाळेच्या भटारखान्यातून वापरण्यायोग्य नाहीत म्हणून टाकून दिले जाणारे बटाटे, शिळे केक्स गोळा करायला सुरुवात केली. आपल्या गावात दररोज किती अन्न टाकून दिलं जातं हे त्याला हळूहळू दिसायला लागलं. हे थांबवायला हवं, या विचाराने त्याचा कब्जा घेतला. त्याविरोधात त्याने जमेल तशी जनजागृती सुरू केली. पुढे अन्नाच्या नासाडीवरच आधारित असलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्री निर्मितीत तो सहभागी झाला. जगभरातून या विषयावरचे त्याचे सल्ले, मतं इत्यादींची विचारणा होऊ लागली. दरम्यान, एकीकडे त्याने अन्नाच्या नासाडीचे स्रोत आणि कारणं याबद्दलचा भरपूर तपशील, आकडेवारी जमा केली होती. या सार्यातून त्याने ‘वेस्ट : अनकव्हरिंग द ग्लोबल वेस्ट स्कँडल’ हे पुस्तक लिहिलं. समीक्षकांनी पुस्तकाचं कौतुक केलं. मात्र, पुस्तकात आकडेवारीचा भरणा अधिक असल्याने अनेकजण हे पुस्तक वाचायचा कंटाळा करतील हे स्टुअर्टने ताडलं. लोकांपर्यंत अधिक थेटपणे पोहोचण्यासाठी त्याने 2009 मध्ये ‘फीडिंग द फाइव्ह थाउजंड’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत किमान 5 हजार लोकांची जेवणाची सोय व्हावी, हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून अन्नछत्र चालवलं जातं. अट एकच, अन्नछत्रात वाढले जाणारे पदार्थ टाकून दिलेल्या पण खाण्यायोग्य कच्च्या मालापासून बनलेले असावेत. जगभरातून स्टुअर्टच्या अशा अन्नछत्रासाठीची मागणी वाढते आहे.
-----
फ्रीगॅनिझम
स्टुअर्टने शेतावर डुकरांसाठी गोळा केलेल्या शिळ्या केक्समध्ये एका विशिष्ट प्रकारचा केक वारंवार दिसून यायचा. बर्याच विचारांती त्याने एक दिवस त्यातला एक तुकडा खाऊन पाहिला. त्याची चव वगैरे काहीही बिघडलेली नव्हती; तो खाल्ल्याने त्याला काही त्रासही झाला नाही. तरी तो टाकून दिला जात असे, या विचाराने तो व्यथित झाला. हे होऊ नये म्हणून त्याने ‘फ्रीगॅनिझम’ ही चळवळ सुरू केली. ‘अन्नपदार्थ टाकून द्यावेत का’ असा विचार करण्यापेक्षा ‘ते खाता येतील का’ हा विचार या चळवळीत महत्त्वाचा मानला जातो.
आपण भाजी विकत घेतो तेव्हा विशेषतः वेड्यावाकड्या आकाराची कंदमुळं न घेण्याकडेच आपला कल असतो. त्यामुळे दुकानदार असा मागे राहिलेला माल टाकूनच देतात. मोठाली सुपरमार्केट्स तर घाऊक व्यापार्यांकडून असं ‘नजरेला खुपणारं’ अन्न (अग्ली फुड) मुळात स्वीकारतच नाहीत. अमेरिकेत दरवर्षी साधारण 600 कोटी पाऊंड वजनाच्या भाज्या आणि फळं केवळ नजरेला खुपतात म्हणून टाकून दिली जातात. आणखी एक उदाहरण ब्रेडचं. घरी आणलेल्या ब्रेडच्या दोन्ही कडांचे स्लायसेस बहुतेक वेळा टाकूनच दिले जातात. आपण बाहेरून मागवलेले वडे-सामोसे फस्त करतो; मात्र सोबत मिळालेल्या चटण्या, तळलेल्या मिरच्या संपवतोच असं नाही. बर्याचदा या गोष्टी टाकूनच दिल्या जातात. ‘फ्रीगॅनिझम’ सांगतं, की कुठलाही पदार्थ टाकून देण्यापूर्वी त्याचा खाण्यात वापर करता येईल का याचा आधी विचार करावा.
-----
‘कोंड्याचा मांडा करणे’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. त्याकडे गरिबीचा एक निर्देशक म्हणून पाहिलं जातं. मात्र, अन्नाच्या नासाडीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातून बराच बोध घेता येतो. बदलत्या काळात आपल्या सर्वांनाच आपला दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता नाही का? अन्नपदार्थांनी ओसंडून वाहणारे घरोघरीचे फ्रिज, कपाटं, शहरांमधली सुपरमार्केट्स हे संपन्नतेचं लक्षण मानायचं की प्रत्येक नागरिकाला भरल्यापोटी सुखाची झोप मिळणं हे खरं समृद्धीचं द्योतक असायला हवं? प्रत्येक नागरिकाच्या व्यवहारात हा विचार झिरपला तर वाया जाणारं अन्न आणि उपासमार यांचं दुष्टचक्र भेदता येईल.
प्रीति छत्रे
9920738787
preeti.chhatre@uniquefeatures.in
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा