स्वत: पलीकडे

-वृषाली जोगळेकर








नंदिनी जाधव :  

“स्त्रियांचं वैचारिक सौंदर्य वाढवण्याचं काम मला जास्त मौल्यवान वाटतं. त्या कामातून मिळणारं समाधान शब्दातीत आहे. स्त्रियांचं बाह्यसौंदर्य खुलवण्याचं काम मी अनेक वर्षं करत होते. हडपसरला माझं प्रशस्त, अद्ययावत ब्यूटी पार्लर होतं. दीड लाखाच्या घरात उत्पन्न मिळत होतं. मेकअप डिझायनर म्हणून प्रसिद्धी मिळालेली होती. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडले गेले आणि एका झटक्यात या सगळ्यावर पाणी सोडलं.” नंदिनी जाधव सांगत होत्या. जटनिर्मूलनाच्या कामात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या नंदिनीताई सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष आहेत.    

प्रसिद्धी आणि पैसा इतक्या सहजासहजी सोडून देणं हे क्वचित काहीजणांनाच जमू शकतं. कारण ते मिळवण्यासाठी त्यांनी अपार मेहनत केलेली असते, बुद्धीची जोड देऊन अंगभूत कौशल्य विकसित केलेलं असतं. त्यामुळेच त्याकडे पाठ फिरवून समाजकार्याला वाहून घेणारे विरळाच. नंदिनीताई त्यांपैकीच एक असल्या तरी त्यांचं काम खूपच वेगळं, धाडसी आणि आव्हानात्मकही आहे.     

2012 सालापासून नंदिनीताई अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडल्या गेल्या होत्या. 2013मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली. त्या घटनेने सारा देशच हादरला. पण त्या सुन्न अवस्थेत असतानाच नंदिनीताईंनी आता पूर्णवेळ याच कामासाठी देण्याचा निर्णय पक्का केला आणि ब्यूटी पार्लरला टाळं ठोकलं. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे याच दरम्यान महिलांच्या डोक्यातल्या जटेविषयीची एक केस आली. नंदिनीताईंना आपल्या कामाचा मार्ग त्यात लख्खपणे दिसला. इतर कार्यकर्त्यांबरोबर त्या जटवाल्या महिलेच्या घरी गेल्या. त्या महिलेचं, तिच्या घरातल्यांचं, गावकर्‍यांचं समुपदेशन त्यांनी केलं आणि तिची जट कापून काढली. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरात नंदिनीताईंनी 107 महिलांच्या जटा कापलेल्या आहेत. त्यातल्या शंभरच्या आसपास केसेस पुणे आणि परिसरातील आहेत. विद्येचं माहेरघर म्हणवणार्‍या पुण्यात ही परिस्थिती असावी हे दुर्दैवी आहे.      


जटा कापणं हे काम जितकं कौशल्याचं आणि जिकिरीचं आहे त्याहून जास्त अवघड काम आहे ते जटा कापण्यासाठी त्या महिलेची आणि तिच्या कुटुंबियांची मानसिक तयारी करणं. जट येणं याचा संबंध स्वच्छतेशी न लावता देवाधर्माशी लावला जातो. जट कापणं हे पाप मानलं जातं. जट कापली तर देवीचा कोप होईल आणि ती शाप देईल; जट कापली तर त्या महिलेच्या घरातील नवरा, मुलं मरतील, अशांसारख्या समजुती समाजात त्या जटेइतक्याच घट्ट रुजलेल्या आहेत. त्या दूर करणं हे नंदिनीताईंसाठी खरं आव्हान असतं. त्या महिलेचं, तिच्या कुटुंबीयांचं आणि गावकर्‍यांचं समुपदेशन करताना अनेकदा वादावादीचे, भांडणाचे प्रसंग येतात. वातावरण तणावपूर्ण होतं. बर्‍याचदा ती बाई जट कापून घ्यायला तयार असते, पण घरातले विरोध करतात. जट असलेल्या महिलेच्या घरातील लोक त्यांना विचारतात, “त्या बाईला जटेचा त्रास नाही, आम्हाला नाही; तर तुम्हाला काय त्या जटेचा त्रास आहे?” नंदिनीताई त्यांना सांगतात, “तुमच्या केसांना एक छोटा दगड दिवसभर बांधून बघा, म्हणजे काय त्रास आहे ते कळेल.’ वर्षानुवर्षं ती जट बाळगल्यामुळे त्या महिलेच्या हालचालींना मर्यादा येतात, त्यामुळे खांदे, मान आणि पाठ प्रचंड दुखते. शिवाय जटेमध्ये उवांचं साम्राज्य पसरतं ते वेगळंच. जटेमुळे त्या महिलेच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न कसे निर्माण होतात हे नंदिनीताई कुटुंबीयांना-संबंधितांना पटवून देतात. सगळी परिस्थिती त्या शांतपणे आणि संयमाने हाताळतात, सगळ्यांना समजावून सांगतात आणि जट कापूनच परत येतात. आश्चर्याची गोष्ट अशी, की तुलनेने प्रमाण कमी असलं तरी काही सुशिक्षित घरांमध्येसुद्धा जटेविषयी अंधश्रद्धा आहेत.

ब्यूटी पार्लरच्या कामाचा अनुभव असल्याने जट काढताना चांगले केस कसे ठेवता येतील, त्या बाईच्या चेहर्‍याला साजेशी केशरचना कशी करता येईल याचा नंदिनीताईंना नेमका अंदाज असतो. त्यामुळे पूर्ण केस काढून न टाकता, चेहरा विद्रूप दिसणार नाही याची काळजी घेत त्या आपलं काम करतात. अनेक वर्षं जट तशीच राहिल्याने केसांच्या जटेमध्ये उवा, लिखा प्रचंड असतात. काही वेळा तर अळ्या, झुरळांची पिल्लंसुद्धा त्यात वास्तव्य करतात. त्यामुळे त्या बाईच्या डोक्यावर लहान-मोठ्या जखमा झालेल्या असतात. जट कापली की या सगळ्याची स्वच्छता करावीच लागते. जखमा छोट्या असतील तर तात्पुरते औषधोपचारही करावे लागतात. मोठ्या जखमांसाठी बळजबरीने डॉक्टरांकडे पाठवावं लागतं. हे सगळं केल्यानंतर त्या महिलेच्या चेहर्‍यावर उमटलेलं हसू आणि तिला जटेच्या त्रासातून मिळालेली मुक्ती ही नंदिनीताईंना पार्लरच्या लाखो रुपयांच्या कमाईपेक्षा कित्येक पट अधिक समाधान देते.

जटनिर्मूलन हे नंदिनीताईंनी आपलं मुख्य काम मानलं असलं तरी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. जादूटोणा कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नंदिनीताईंनी 27 जिल्ह्यांचा दौरा केलेला आहे. बुवाबाजी, भानामती, करणी अशी अनेक प्रकरणं स्वत: हाताळली आहेत. अंधश्रद्धेच्या विरोधात प्रात्यक्षिकांसह दोन हजारांहून जास्त व्याख्यानं दिलेली आहेत. करणीच्या नावाखाली झाडांना मारलेले खिळे, दाभण आणि लटकवलेल्या काळ्या बाहुल्या काढून टाकण्यात त्यांचा पुढाकार असतो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी नंदिनीताई विशेष प्रयत्न करत असतात. ‘पाणी फाउंडेशन’च्या ‘वॉटरकप’ स्पर्धेसाठी सासवड तालुक्यातील उदाची वाडी या गावातल्या गावकर्‍यांचं संघटन करून नंदिनीताईंनी स्वत: तिथे 40 दिवस श्रमदान केलेलं आहे. 

विधवा महिलांनादेखील सन्मान मिळावा या हेतूने नंदिनीताईंनी विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. आजूबाजूच्या गरजू महिलांना तसंच अंध, अपंग, अनाथ मुलांना कलाकुसरीच्या वस्तू बनवायला त्या मोफत शिकवतात. 150 प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू नंदिनीताईंना बनवता येतात. त्याचं प्रशिक्षण त्या मोफत देतात. 

नंदिनीताई क्रीडापटू आहेत. भालाफेक या खेळात त्यांनी राष्ट्रीय विक्रम नोंदवलेला आहे, तर व्हॉलिबॉलच्या त्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. कदाचित या पार्श्वभूमीमुळेच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी आवश्यक असलेला संयम, जिद्द, चिवटपणा आणि धाडस त्यांच्याकडे पुरेपूर आहे. एकाही महिलेच्या डोक्यात जट दिसू नये यासाठी सध्या नंदिनीताईंनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलेलं आहे.  



नंदिनी जाधव : 9422305929

अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० । PDF अंक वार्षिक - ₹ ३००
• वर्गणी भरण्यासाठी संपर्क - ९९२२४ ३३६१४
• वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik
To connect with us follow-
Instagram- @unique_features3
Twitter- https://twitter.com/UniqueFeatures
Blogpost- anubhavmasik.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८