आजचा बिहार- जिगसॉचे काही तुकडे



-सुरज महाजन, अजय नेमाणे





युनिक स्कूल ऑफ जर्नालिझमशी संबंधित विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या काळात भटकंती करून लिहिलेले हा लेख. एक बिहारमध्ये पंधरा दिवसांचा मुक्काम ठोकून घेतलेल्या अनुभवांवर आधारित, तर दुसरा पुण्याच्या शेजारच्या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या दुर्गम भागांमध्ये फेरफटका मारून लिहिलेला.  

आजचा बिहार- जिगसॉचे काही तुकडे

बिहार. सामाजिक बदलांची देशातील एक महत्त्वाची प्रयोगशाळा. अभ्यासकांना कोड्यात टाकणारा प्रांत. प्रचंड लोकसंख्या- गरिबी-बेकारी-बकाली-गुंडागर्दी-मागासलेपण-जातीपातींची घट्ट समीकरणं अशा अनेक कारणांसाठी देशभर प्रसिद्ध पावलेला. पण गेल्या काही काळात ही परिस्थिती बदलू पाहते आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारिता शिकणारे काही विद्यार्थी लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने बिहारमध्ये जाऊन थडकले. तेव्हा त्यांना काय दिसतं? पंधरा दिवसांच्या मुक्कामात दिसलेले आजच्या बिहारचे हे काही तुकडे. बिहार नावाचं जिगसॉ पझल जोडण्यासाठी मदत करणारे

आम्ही पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटचे पत्रकारितेचे विद्यार्थी. आमची परीक्षा नुकतीच आटोपली होती. त्याच वेळेस लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली होती. महाराष्ट्राबाहेर जाऊन निवडणुका समजून घ्याव्यात असं आम्हा मित्रांच्या मनात घोळत होतं. आम्ही बिहारला जायचं ठरवलं. विद्यापीठात शिकत असताना राजकारणात गेलेल्या कन्हैया कुमारच्या उमेदवारीमुळे प्रसिद्धीस आलेल्या बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात जावं असं ठरवलं. रेल्वेची तिकिटं काढली आणि जाऊन पोहोचलो बेगुसरायला. हा मतदारसंघ गंगा नदीच्या किनारी पाटण्याच्या जवळ आहे. पंधरा दिवस या भागात मुक्काम ठोकल्यावर निडणुकीबद्दलच नव्हे, तर इथल्या माणसांच्या जगण्याबद्दलही बरंच काही हाती लागलं. त्यातलं थोडं इथे.


 दानापूर एक्सप्रेस : रेल्वेमधला बिहार

रात्रीचे पावणेनऊ वाजले होते. बिहारला जाणार्या दानापूर एक्सप्रेसच्या आमचं रिझर्व्हेशन असलेल्या बोगीत कसाबसा प्रवेश मिळवला आणि आमच्या सीटपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करू लागलो; पण कोणीच सरकायला तयार नाही की पुढे जाण्यासाठी जागा द्यायला तयार नाही. जागा देणार तरी कशी? डब्यात मुंगी शिरायला जागा नव्हती. 72 आसनांची क्षमता असलेल्या या बोगीत त्या वेळी किमान 200-250 लोक तरी भरलेले असावेत. टॉयलेटमध्येही सात-आठ माणसं कोंबून बसली होती म्हणजे बघा! त्यात प्रवाशांच्या मोठाल्या बॅगा, कमरेएवढे मोठे कॅन्स असं बरंच काही. वीस-पंचवीस मिनिटांच्या धडपडीनंतर आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो.

आपल्याकडेही रेल्वेत गर्दी असते, पण ती सहसा जनरलच्या डब्यात. राखीव डब्यांमध्ये एवढा गदारोळ आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. त्यामुळे आमची पहिली प्रतिक्रिया म्हणून या गर्दीचा फोटो-व्हिडिओ काढून तो थेट रेल्वे मंत्रालयाला ट्विट केला. पुढच्याच स्टेशनला रेल्वे अधिकार्याला सोबत घेऊन दोन पोलिस आम्हाला शोधत आले. त्यांनी टॉयलेटमध्ये बसलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं, त्यांच्याकडून दंड वसूल केला, आमच्याकडून कारवाई झाल्याबद्दलचा अभिप्राय लिहून घेतला आणि ते निघून गेले. थोड्याच वेळात रेल्वेच्या या कर्तव्यतत्पर कारवाईची माहिती त्यांच्या ट्विटरवर झळकली आणि इकडे डब्यात मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. खरं तर प्रवाशांकडून रेल्वेला दंड मिळवून देणं हा काही आमचा हेतू नव्हता, पण प्रत्यक्षात साध्य मात्र तेवढंच झालं.

हा गोंधळ संपल्यावर हळूहळू त्या गर्दीतले चेहरे आम्हाला दिसू लागले. आमच्या जवळच बसलेला एक तरुण आमच्याकडे बघून हसत होता. आमचं त्याच्याकडे लक्ष गेल्यावर तो म्हणाला, “इसमें हमारी कोई गलती नहीं। हमारे पूर्वज सहीको चुने नहीं ओर जिनको चुने उनसे सवाल भी नहीं पूछे।नंतर बोलण्यातून समजलं की तो सीआरपीएफचा जवान होता. इंद्रजित पासवान त्याचं नाव. सध्या त्याची पोस्टिंग पुण्यातच होती आणि लोकसभेसाठी बायकोचा अर्ज भरायला तो बिहारला चालला होता. ‘काँग्रेस और भाजप दोनों एक जैसेही हैं। कोई तिसरा ऑप्शन खड़ा होना चाहिए’, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून स्वतःच्या बायकोलाच त्याने निवडणुकीला उभं राहण्यासाठी राजी केलं होतं. तिने काँग्रेस व भाजपाविरोधात केलेले काही ट्विट्स त्याने आम्हाला अभिमानाने दाखवले. काही दिवसांनंतर बायकोचे अर्ज भरतानाचे फोटोही त्याने आम्हाला व्हॉट्सॅपवरून पाठवले.

गाडीतली गर्दी ही कामगारांची होती. निस्तेज चेहर्याने ते आली परिस्थिती सहन करत होते. बायका जवळपास नव्हत्याच. एक पंधरा-सोळा वर्षांचं पोरगं आमच्या पायात बसलं होतं. तीनजणांच्या सिटांवर सात-आठ जण बसलेले होते. धुसफूस-बाचाबाची-तडजोडी सुरू होत्या. मध्यरात्री अचानक भांडणाच्या आवाजाने जाग आली. शब्दाने शब्द वाढत जाऊन लोक मारामारीवर आले. तिघांनी मिळून एका माणसाला धोपटायला सुरुवात केली. आणि जो मार खात होता त्याचं रिझर्व्हेशन होतं. तो म्हणत होता, “ही माझी राखीव सीट आहे. मला झोपायला थोडी तरी जागा द्या. माझ्या अंगावर झोपू नका. एका सीटवर चौघांना कसं झोपता येईल?” त्या तिघांचं म्हणणं होतं, “सगळे अॅडजस्ट करताहेत. तुलाच एकट्याला काय प्रॉब्लेम आहे?” सकाळी बघितलं तर ज्याला मारलं तो गायब झालेला होता. तो कुठे गेला कोण जाणे! रात्री जो बराच वेळ उभा होता तो माणूस आणि आदल्या रात्रीच्या भांडणातले तिघे सीटवर निवांत बसले होते.   

सकाळी उठल्यावर आसपासच्या लोकांशी आणखी थोड्या गप्पा झाल्या. त्यातली काही माणसं मतदानासाठीच आपापल्या गावी चालली होती. त्यामुळे आपसूकच विषय राजकारणाकडे वळला. बिहारमध्ये कोण जास्त जागा जिंकेल, असं विचारल्यावर बहुतेकांचं उत्तर एनडीए असंच होतं. आम्ही कारण विचारल्यावर त्यांचं म्हणणं पडलं, ‘महागठबंधनने उपेंद्र कुशवाह, मुकेश सहानी, जतिनराम मांझी यांच्या खूप छोट्या पक्षांना जास्त जागा दिल्या आहेत. त्याचा त्यांना तोटा होईल आणि नितीश कुमारांच्या मतांचा भाजपाला फायदा होईल.’ काल ज्यांचे चेहरे आम्हाला निस्तेज वाटत होते ते लोक आता राजकारणावर भरभरून बोलत होते. त्यांना बिहारमधल्या घडामोडींची बिनचूक माहिती होती, याचं आम्हाला काहीसं आश्चर्यच वाटलं.

नंतर चर्चा बिहारमध्ये रोजगार का नाहीत, जगण्यासाठी महाराष्ट्रात काय यावं लागतं इकडे वळली. त्यांच्याशी बोलताना लक्षात आलं की घरी चार-पाच एकर शेती असणारेदेखील पुण्यात बिगारीकाम करत होते. म्हणाले, “खेतमें सिर्फ खानेका अनाज उगता है। उसमें गुजारा कैसे होगा?” आम्ही त्यांना विचारलं, “बिहारमें ज्यादा इंडस्ट्री क्यूँ नहीं है।त्यावरपोलिटिकल विल नहीं हैअसं उत्तर मिळालं. दोघा-तिघा तरुणांनी सांगितलं, “समझो अगर आज हम चार-पाच लोग मिलकर कोई छोटा-मोटा कारोबार शुरू किये, तो कलसे हप्तावसुली शुरू हो जाती है। तो हमारा उद्योग चलेगा कैसे बताओ!”

आम्ही तरी त्यांना काय सांगणार होतो? उलट, बिहारला पोहोचल्यावर यातली आणखी गुंतागुंत आम्हाला दिसू लागली. 




ये बिहार है! यहाँ एक तो कटना पडता है या काटना पडता है!

एकदा संजीव नावाच्या स्थानिक तरुणासोबत बाइकवरून बेगुसरायमधल्या पेन्सल्ला गावी चाललो होतो. बिहारमधल्या मुसहरी गावचा संजीव बोले तो एकदमगँग्ज ऑफ वासेपुरमधल्या फैझल खानसारखं व्यक्तिमत्त्व. अंगाने कडका, पण रोब मात्र जबरदस्त. त्याचं मुसहरी गाव ओलांडून आमची गाडी शेतातल्या अरुंद रस्त्याला लागली. आसपास दूरदूरवर पसरलेली पांढर्या मातीची शेतं. आसपास एकही वस्ती नाही. नुकतीच गव्हाची कापणी झाल्यामुळे शेतात एकही माणूस नव्हतं. पेन्सल्ला गावाकडे जाणारा रस्ता कोणता हे विचारण्यासाठी आसपास कोणी दिसतंय का हे बघताना आम्हाला झाडाखाली बसून ताडी पीत असलेले पाच-सहा तरुण दिसले.

संजीवने गाडीवरूनच तिथल्या ठेठी भाषेत त्यांना पेन्सल्ला गावाकडे जायचा रस्ता विचारला. ताडीप्राशनामुळे त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागलेली होती. त्यातले दोघं म्हणाले, “तुम्ही खूपच चुकीच्या दिशेला आलात. दोन किलोमीटर पाठीमागे जा आणि मग येईल पेन्सल्लाचा फाटा.” संजीवला शंका आल्यामुळे त्याने खात्री करून घेण्यासाठी दोन-तीन वेळा विचारलं; पण उत्तर तेच. पाठीमागे फिरण्यासाठी आम्ही गाडी वळवू लागलो, तेवढ्यात त्यांच्यातला एकजण धावत आमच्याकडे आला आणि म्हणाला, “तुम्ही बरोबर चाललाय. सरळ पुढे जा, पेन्सल्ला लागेलच.” खरं तर इथे गोष्ट संपायला हरकत नव्हती. पण आता संजीवमधलाफैजलजागा झाला. त्याचा स्वाभिमान डिवचला गेला होता. तो त्या तरुणांना थोड्या गुर्मीतच म्हणाला, “इधर आओ। हमें पेन्सल्ला छोड़ के आओ।आता ते चौघंही जागेवरून उठले आणि शिव्या देत आमच्याकडे चालत येऊ लागले.
सुरज महाजन

 8830032408

अजय नेमाणे
 9130268388


वाचकांसाठी लेखाचा संपादित अंश येथे देत आहोत. संपूर्ण लेख वाचण्यासाठी अनुभव मासिकाचा जून महिन्याचा अंक नक्की विकत घ्या. हा अंक PDF स्वरूपातही उपलब्ध आहे. अधिक तपशील -

अनुभव मासिकाच्या वर्गणीचे दर
वार्षिक - ₹ ८०० । द्वैवार्षिक - ₹ १५०० । त्रैवार्षिक - ₹ २२०० । PDF अंक वार्षिक - ₹ ३००
• वर्गणी भरण्यासाठी संपर्क - ९९२२४ ३३६१४
• वर्गणी भरण्यासाठी लिंक - https://www.instamojo.com/anubhavmasik

To connect with us follow-
Instagram- @unique_features3
Twitter- https://twitter.com/UniqueFeatures
Blogpost- anubhavmasik.blogspot.com










     







   





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८