लॉकडाऊन : नोंदी घुसमटीच्या - अन्वर हुसेन






विषाणू कसला तरी सापडलाय. तिकडे दूरच्या देशात. एक एक करत माणसं त्याच्या विळख्यात सापडतायत. आजारी पडतायत. काहींना जीव गमवावा लागलाय, अशा बातम्या येत होत्या. असेल काहीतरी आधीच्या साथींसारखीच ही एक साथ.. खूप लांब आहे ती आपल्यापासून...मनानं काहीसं दुर्लक्षचं केलं..
पण बातम्या वाढू लागल्या..

व्हायरस वेगाने संक्रमित होऊ लागल्याच्या, माणसं मरू लागल्याच्या..
व्हायरस देशांच्या सीमा ओलांडून त्याची दहशत फैलावू लागला..जग हडबडून गेलं. हा कुठला नवाच व्हायरस, याला अटकाव कसा करावा कुणापाशीच याची तोड नव्हती. गोंधळले सगळे इथून तिथपर्यंतचे देश.
व्हायरस पसरत गेला. त्याला माणसांच्या तथाकथित सीमा मान्य नव्हत्या.. त्याला धर्मजातवंशवर्ण याच्याशी देणं घेणं नव्हतं. तो पसरत निघाला...
हळूहळू जवळ येत होता..
एक दिवस गावातच आला..
आता मात्र धडकी भरली..
गावं शहरं महानगरं देशच्या देश ग्रासले त्यानं..
एकमेकांच्या संपर्कात येणं बंद केलं पाहिजे असा उपाय शोधला गेला..
झालं, लोकांना त्यांच्या त्यांच्या घरात लॉकडाऊन केलं गेलं..
सगळं बंद..
जवळजवळ सारं जग लॉकडाऊन केलं गेलं..
अभूतपूर्व काही तरी संकट आलंय याची मनात जाणीव होऊ लागली..आजवर कधीच असा प्रकार अनुभवला नव्हता.


सगळं बंद कामधंदे, बाहेर पडणं, मोकळेपणाने फिरणं, वाटेल तिथं जाणं, मनाला येईल तिथं जाऊन खाणं पिणं.. कुणाला भेटणं..
सुरुवातीला वाटलं, काही दिवसात हे संपेल..पण तशी काही चिन्हं दिसेनात. या लॉकडाऊन मध्ये लोक सुरुवातीला खूप निवांत पणे अनेक गोष्टींचा आनंद घेऊ लागले. व्हाट्सॅपचे स्टेटस आणि फेसबुकवरच्या पोस्ट बघून वाटू लागलं.
नेटफ्लिक्स, अमेजॉन प्राईम, युट्यूब वाचायची राहून गेलेली पुस्तकं यात कोंडून घेतलं स्वतःला..


किती काळ..
किती काळपर्यंत
एकसारखं काहीतरी करत राहू शकतो कोणी
आतलाही लॉकडाऊन मग दाटू लागला
पोकळी वाढू लागली
बाहेर सर्वत्र पसरलेली भीती
त्यात मिसळलेले विद्वेषाचे रंग..
गर्द गर्द गहिरे सगळे
काळपटले
गुदमरले..
हजार दोन हजार किलोमीटर
अक्षरशः
कोणी चालत जाण्याचा विचार करू शकतो?
हादरवून टाकणारी गोष्ट रोज त्या स्क्रीनवर दिसत होती
अगतिकता
असंवेदनशीलता
क्रूर थट्टा..
युज अँड थ्रो सारखं काहीतरी...
सॅनिटाइझ केले पाहिजेत आपापले मेंदूही..
अचानक समोर येऊन आदळलेला हा व्हायरस
होलपटून टाकतोय
सगळी व्यवस्था



आणि चित्रकार पकडू पाहतोय ही सगळी घुसमट सगळा आशय त्याच्या रेषातून....
दमछाक होतेय त्याची...
आणि मित्र सल्ला देतायत, अरे पॉझिटिव्ह बघ काहीतरी..
कसली चित्रं काढतोयस
आधीच कावलेत वैतागलेत लोक..
लॉकडाऊन संपेपर्यंत वेडा होशील अशानं...



चित्रं व लेखन- अन्वर हुसेन
९८५०९६५३८३ 
anwarhusain02@gmail.com


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८