अभूतपूर्व काळाच्या नोंदी



गेले दोन महिने आपण सारे अभूतपूर्व असा काळ अनुभवतो आहोत. दोन महिने जग पूर्ण ठप्प होऊन पडल्याचा अनुभव आपल्यातल्या कोणीही यापूर्वी घेतलेला नाही, की कोरोनासारखा झपाट्याने जगभर पसरलेला विषाणूही कधी पाहिलेला नाही.

कोरोनासंसर्गामुळे झालेल्या जागतिक बळींच्या तुलनेत भारतातल्या कोरोनाबळींचा आकडा कमी असला, तरी आपल्या आरोग्यव्यवस्थेवर त्याचा मोठा ताण पडला आहे. पण आपल्या देशाला त्याहून मोठा फटका बसला आहे आणि बसणार आहे तो लॉकडाऊनचा. या टाळेबंदीचे परिणाम पुढचा बराच काळ आपल्याला भोगावे लागणार आहेत. आपल्या आर्थिक विकासाची घडी विस्कटली आहे, बेरोजगारी कमालीची वाढते आहे आणि कष्टकरी, स्थलांतरित मजूर, असंघटित कामगार अशा सार्‍यांना या लॉकडाऊनने अक्षरशः देशोधडीला लावलं आहे.

हा काळ आपल्या सार्‍यांसाठीच अवघड गेला असला तरी या कष्टकर्‍यांसाठी हा काळ म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरते आहे. जॉर्ज ऑरवेल असं म्हणाला होता, की ‘ऑल अ‍ॅनिमल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल.’ त्याच चालीवर आपल्याकडे हा कष्टकरी समाज आजवर कायमच अधिक दुर्दैवी, अधिक पिचला-नाडला जाणारा समाज ठरला आहे. लॉकडाऊनने तर आजवरच्या सर्व संकटांवर कहर केला आहे. फाळणीनंतरची आपल्या देशातली ही सर्वांत मोठी आपत्ती आणि शोकांतिका आहे, असं आता अभ्यासक म्हणू लागले आहेत. कमी-अधिक फरकाने आपल्या सत्ताधार्‍यांना आणि समाज म्हणून आपल्यालाही या वर्गाच्या जगण्याची, त्याच्या श्रमाची, त्याच्या आत्मसन्मानाची किंमत नाही हे या लॉकडाऊनने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या लोकांची जी परवड झाली त्याबद्दल सत्ताधार्‍यांनी खेद व्यक्त करण्यापलीकडे काही केलेलं नाही आणि आपण चुकचुकण्याशिवाय.

लॉकडाऊनने दुसरा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे, तो आपल्या लोकशाहीबद्दलचा. लॉकडाऊन जाहीर करताना सरकारने ना त्याबाबत कोणाची मतं जाणून घेतली, ना त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम भोगावा लागणार्‍यांना तयारीसाठी संधी दिली गेली. ज्या उद्देशाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला, तो दोन महिन्यांनंतर पूर्ण झाला नाही हे स्पष्ट दिसत असूनही त्यावरही सरकारकडून काही खुलासा केला गेलेला नाही. ‘लॉकडाऊन हा कोरोनावरचा उपाय नाही. आपल्याला या विषाणूसोबतच जगावं लागणार आहे. उलट कोरोनामुळे होईल त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक नुकसान लॉकडाऊनमुळे होईल’, असा इशारा देशातले आणि जगातले अनेक तज्ज्ञ अभ्यासक देत होते. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. उलट लॉकडाऊन यशस्वी झाला असून आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकत आलो आहोत, असंच एकतर्फी जाहीर केलं गेलं.

दुसरीकडे हे सगळं घडत असताना आपला सुस्थितीतील सुशिक्षित मध्यमवर्ग मात्र आपापल्या घरामध्ये लॉकडाऊन एन्जॉय करण्यात मश्गुल झालेला दिसत होता. आपल्या आसपासच्या गरजूंना आपणहून मदत करणारे काही अपवाद वगळता त्यातल्या बहुतेकांना ना कष्टकर्‍यांची फिकीर होती, ना देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याची. खाण-पिणं आणि लॉकडाऊनमुळे घराला कसं घरपण मिळालं याचा आनंद सेलिब्रेट करणं यात तो खूष होता.

गेल्या दोन महिन्यांच्या लॉकडाऊनला हे असे अनेक कंगोरे आहेत. त्याबद्दल अनेक मतं मतांतरं आहेत. त्यांची नोंद घेण्यासाठी आम्ही ‘अनुभव’चा हा लॉकडाऊन ई-विशेषांक काढत आहोत. या काळाला प्रतिसाद देणारी चित्रं आमचे सहयोगी संपादक आणि चित्रकार अन्वर हुसेन यांनी काढली आहेत. त्यातलंच एक चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर घेतलेलं आहे.

एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांचे ‘अनुभव’चे अंक आम्ही काढू शकलेलो नाही. पण अनुभवच्या वाचकांनी आम्हाला या अडचणीच्या काळात भक्कम पाठिंबा दिला. ‘अंक येत राहतील, पण तुम्ही सर्वजण काळजी घ्या’, असं म्हणणारे वाचकांचे फोन आम्हाला सतत येत होते. या प्रेमाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार. लवकरच अनुभवचा छापील अंक आपल्याकडे येऊ लागेल आणि आपल्याशी पुन्हा पूर्वीसारखा संवाद सुरू होईल, अशी खात्री आहे.

जे वाचक आमचे वर्गणीदार नाहीत, त्यांनाही या निमित्ताने आमच्या वाचक-परिवारात सामील होण्याचं आमंत्रण देत आहोत. या अंकात वर्गणी भरण्याबाबतचे सर्व पर्याय आहेतच. पण ते न सापडल्यास फक्त ९९२२४३३६१४ या क्रमांकावर फोन करून आपण विनासायास ‘अनुभव’चे वर्गणीदार होऊ शकता. 

- संपादक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८