हम साथ साथ हैं : विषाणू आणि मानव यांच्या सहअस्तित्वाचा प्रवास - शंतनू अभ्यंकर



कोरोना विषाणूचा प्रसार, लोकांच्या मनातील भीती, त्याच्या संसर्गाबद्दलचे समज-गैरसमज 
या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्मजीव आणि मानव यांच्या हजारो वर्षांपासून चालत 
आलेल्या सहजीवनावर टाकलेला एक दृष्टीक्षेप.

वेगवेगळे विषाणू, जिवाणू; दर काही वर्षांनी एक नवीन साथ, एक नवीन नाव आणि एक नवीन हाहा:कार ऐकायला मिळतो. नवीन नवीन रोगजंतू येतात तरी कुठून? तुम्हाला वाटेल आपला माल खपवण्यासाठी औषध कंपन्याच हे करत असतील. ही जैविक युद्धातली अस्त्रंच आहेत असंही तुम्हाला वाटू शकेल. कॉलेजमध्ये शिकताना तर परीक्षेत प्रश्न विचारायला सोयीचं जावं म्हणूनच हे नवे भुंगे निर्माण होतात, असं मला वाटायचं!  
पण खरंतर माणूस आणि जंतू असं द्वैत कधी नव्हतंच. आपण आणि जंतू एकमेकांच्या साथीने उत्क्रांत झालेले आहोत.

इतिहासपूर्व काळामध्ये माणूस झाडावरून जमिनीवर उतरला. सवानाच्या गवताळ प्रदेशात शिकार करून, भटकत, कंदमुळं खात जगत राहिला. या वनवासी, भटक्या माणसाच्या वाट्याला काही आजार येतच होते. इतरही प्राण्यांच्या वाट्याला येत होते. तेव्हा माणसाचा इतर प्राणिमात्रांशी संबंध निव्वळ भक्ष्य किंवा भक्षक एवढाच होता. पण मग माणूस नावाच्या पशूने एक अपाशवी कृत्य केलं. त्याने शेतीचा शोध लावला, प्राणी पाळायला सुरुवात केली आणि घोटाळा झाला. कुत्री, गुरं, डुकरं, गाढवं, घोडे, शेळ्या, मेंढया, कोंबड्या यांच्यामुळे होणारे आजार त्याला जडायला सुरुवात झाली. पुढे माणसं गाव-खेड्यातून एकत्र राहायला लागली आणि मग तर ब्रम्हघोटाळाच झाला. आजारांचा पोतच बदलला. साथीचे आजार नावाचा नवाच प्रकार सुरू झाला. बहुतेक साथीचे आजार हे मूलतः पाळीव प्राण्यांची देणगी आहेत.   

सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी माणूस पंचक्रोशीतून बाहेर पडला. व्यापार वाढला, लढाया वाढल्या. माणूस इकडून तिकडे जायला लागला. कोसो मैल दूर. आता इकडच्या माणसांना झालेले आजार तिकडच्या माणसांना होऊ लागले.

मग युरोपीय लोकांनी जग धुंडाळण्याचा कालखंड आला. नवी क्षितिजं माणसाला खुणावत राहिली. साहसी प्रवासी पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला लागले. या लोकांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका असे त्यांना तोपर्यंत अज्ञात असलेले खंड शोधून काढले आणि त्यांच्याबरोबर आजारही एका खंडातून दुसऱ्या खंडात पसरू लागले. नवं जग जिंकायला युरोपीय लोकांना या आजारांची नकळत पण भलतीच मदत झाली. अमेरिकेतील लोकांनी या युरोपीय जंतूंचा सामना कधी केला नव्हता. अशा जंतूंविरूद्ध त्यांच्यात प्रतिकारशक्ती कुठून येणार? त्यामुळे पहिल्या युरोपियन वसाहती स्थापन होताच प्लेग, देवी, गोवर अशा साथींनी अमेरिकी मूळनिवासींची पार वाताहात केली. अमेरिकेत युरोपीय वसाहती शक्य झाल्या त्या पोलाद, बंदुका, घोडे आणि युरोपीय तंत्रज्ञानामुळे. पण याबरोबरच नव्या आजारांनी तिथे नरमेध मांडला होता हेही खरं. साथीच्या डाकिणींनी तिथली मूळ जनताच फस्त करायला सुरवात केली, तिथली   व्यवस्था जणू बरखास्त करून टाकली आणि युरोपीय प्रवेश सहज झाला.

आता तर काय जागतिकीकरण, शहरीकरण हे मनुष्यप्राण्याचं व्यवच्छेदक लक्षण झालंय. त्यामुळे एके ठिकाणी आजाराची ठिणगी पडली की त्याचा वणवा होऊन तो जगभर पसरायला फारसा वेळ लागत नाही. 
पण मग वसाहतींच्या काळात अमेरिकेतील मूळ लोकांचे आजार युरोपीय लोकांना का बरं झाले नाहीत? (क्षय आणि उपदंश म्हणजेच सिफिलिस हे आजार अमेरिकेतले, असं म्हणतात.)

याचं उत्तर साथीच्या रोगांच्या वैशिष्ट्यपूर्ण जंतू विज्ञानात आहे. आपण पाहिलं, की बरेचसे साथीचे आजार पाळीव प्राण्यांपासून उद्भवलेले आहेत आणि त्या काळात संपूर्ण अमेरिका खंडात पाळीव म्हणावा असा प्राणीच नव्हता!! तिथे इन्का, अझ्टेक अशा संस्कृति नांदत होत्या, पण तिथे असणारे प्राणी माणसाळवण्यासारखे नव्हते. ही एक मोठीच भौगोलिक आणि जीवशास्त्रीय उणीव होती. ही मर्यादाच त्यांना भोवली. ॅण्डीज पर्वतरांगातील इन्का लोकांनी लामा, अल्पाका वगैरे प्राणी पाळले होते. पण ना त्यांना गाडीला जुंपता यायचं, ना ते ओझी वाहू शकायचे. शेतीसाठी, दुधासाठीही ते कामी यायचे नाहीत. लोकर, मांस एवढाच त्यांचा उपयोग होता. त्यामुळे हा प्राणी पाळला तरी, अंगणात त्यांचा गोठा, त्यात कपिला नावाची लामीण, तिला ओवाळणं, असला मामला नव्हता. उलट युरोप, आफ्रिका आणि आशियात पाळीव प्राणी घरादाराची, संस्कृतीची शान मानले जायचे. कोंबड्या, डुकरं, करडं आणि घरातली चिल्लीपिल्ली अंगणा-परसात एकत्रच बागडायची, चरत असायची. इतक्या घनिष्ठ संबंधामुळेच इकडे साथीचे आजार फोफावले आणि अमेरिकेत ते निर्माणच होऊ शकले नाहीत.

आजारांच्या या भूगोलात आणखीही बारकावे आहेत. समशीतोष्ण प्रदेशात घोडे, गाईगुरं, मेंढया, डुकरं यांची अगदी रेलचेल. त्यामुळे तिथे पाळीव प्राण्यांपासूनचे आजार अधिक. या प्रदेशातील महत्वाच्या पंधरा संसर्गजन्य आजारांपैकी आठ (घटसर्प, इनफ्ल्यूएन्झा , गोवर, गालगुंड, डांग्याखोकला, देवी, क्षय आणि रोटाव्हायरस) पाळीव प्राण्यांतून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत.

उष्ण कटिबंधात कीटक बक्कळ सापडतात. त्यामुळे किटकांपासून पसरणारे आजार बक्कळ असतात. इथे वानर प्रजातीही भरपूर. त्यामुळे वानर-नर संपर्कातून पसरणारे आजार भरपूर. त्यातही आफ्रिकी आणि आशियाई माकडांशी आपली जनुकीय जवळीक जास्त. अमेरिकन माकडं तुलनेने दुप्पट जनुकीय अंतरावर आहेत. त्यामुळे आशिया-आफ्रिकेपेक्षा अमेरिकेत असा संसर्ग कमी झाला.

आज माणसाला आजारी पाडणारे जवळपास १४०० रोगजंतू आपल्याला माहीत आहेत. यातील ६०% जंतू मूलतः प्राण्यांत वास करून होते आणि त्यांच्या सहवासाने ते माणसात उतरले आहेत. काही रोगजंतू तर इतके माणसाळले आहेत की आता ते त्या त्या मूळ  प्राण्यात आढळतच नाहीत, फक्त मनुष्यप्राण्यात आढळतात.
फक्त प्राण्यांत ते फक्त माणसांत, अशा संक्रमणाच्या काही अवस्था असतात. म्हणजे रेबीजसारखा आजार प्राण्यांना होतो. माणसाला अगदी क्वचित होतो. त्यामुळे हा आपला कधीमधी येणारा पाहुणा. इबोलाची वेगळीच तऱ्हा. चिंपांझी आणि गोरीलातल्या या आजाराची शिकारी मंडळींमार्फत इतरांना लागण होते. काही काळ साथ टिकते आणि मग आपोआप ओसरते. डेंग्यू माकडातून डासात आणि मग डासातून माणसांमाणसांत पसरतो. साथीच्या लाटा येत रहातात. आपल्या कपी बांधवांकडून आलेला एड्ससारखा आजार आपल्या कच्छपी लागला आहे. तो काही आपली साथ सोडायला तयार नाही. माणसांमध्ये एड्स पसरायला आता वानरांची गरज उरलेली नाही.

प्राण्यांतून मनुष्यप्राण्यांत उडी मारणं सूक्ष्मजंतूंनादेखील सोपं नाही. अनेक अडथळे पार करून हे जंतू मनुष्याच्या शरीरात प्रविष्ट होतात. बरेचसे जंतू त्या त्या विशिष्ट प्रजातीतच टिकू शकतात. त्यातही जवळच्या प्रजातीतले जंतू जरा सहज इकडून तिकडे जाऊ शकतात. लांबलांबच्या प्रजातीत हे जरा मुश्किलीने होतं. म्हणजे माकडं आपली सख्खी चुलत भावंडं. त्यामुळे मर्कट आणि माणूस असे संसर्ग खूप दिसतात. पक्ष्यांत आणि आपल्यात जीवशास्त्रीय अंतर जास्त आहे. त्यामुळे द्विजगणांकडून गणांकडे, अशी लागण क्वचित होते. एका जातीतून दुसऱ्या जातीत संसर्ग व्हायचा तर जंतूंमध्ये काही खास गुणधर्म असावे लागतात. उदा: प्रथिनांची काही विशिष्ट रचना. जंतूंना असे गुणधर्म काही विचारपूर्वक निर्माण करता येत नाहीत. ते उत्क्रांत व्हावे लागतात. एकूणच हा सगळा कर्मधर्मसंयोगाचा मामला आहे. शिवाय माणसांना प्रतिकारशक्ती असते. तिचा मर्मभेद करणारे जंतूच तगतात.

संसर्गाचा आणि आजाराचा काही विशिष्ट व्यूह निर्माण झाला असेल, काही अटीशर्ती पाळल्या जात असतील, तरच साथ येते. म्हणजे असं, की जंतूची लागण होताच तो माणूस जर तात्काळ गतप्राण झाला, तर जंतूंचा प्रसारही थांबणार. मग साथ कशी पसरणार?  त्यामुळे प्रसाराला अवधी मिळत असेल, प्रसार सहजसाध्य असेल, रोग्यात प्रतिकारशक्ती उशिरा, जेमतेम आणि तात्पुरती तयार होत असेल तर असे जंतू साथीला उत्तम. त्यामुळे पटापट माणसांचा घास घेणाऱ्या आजारांपेक्षा सर्दीचा विषाणूअधिक यशस्वीम्हणायचा. बाकी करोना-बिरोना या निकषावर फुटकळ! सर्दी सगळ्यांना होते, पण सर्दीपडशाला कोणीबळीपडत नाही. याविरुद्धची प्रतिकारशक्तीही जेमतेम आणि तात्कालिक असते. शिवाय हा विषाणूही आपलं रूप बदलत रहातो. त्यामुळे एकच माणूस अनेकदासर्दावतो’. कोणत्याही वेळी जगभर सर्दीने त्रस्त झालेली माणसं असतातच असतात. सर्दी झाली तरी माणसं हिंडती फिरती असतात आणि इतरांना लागण होत राहते. विषाणूही सतत हिंडता फिरता राहतो. हा खरा परिवाज्रक!  

जंतू वैशिष्ट्यांसारखी काही जनवैशिष्ट्यंही आहेत. कुठल्याही जंतूजन्य आजाराची साथ यायची असेल तर मुळात लोकसंख्या भरपूर हवी आणि ती एकमेकांजवळ राहणारी हवी. तर ते जंतू इकडून तिकडे पसरतील. काही लाख लोक एकत्र नांदत असतील तरच साथ  पसरते, असं गणित आहे.

इतके सारे लोक एकत्र नांदू लागले ते शेतीचा शोध लागल्यानंतर. सुमारे दहा ते अकरा हजार वर्षापूर्वी. या पूर्वीचे, भटक्यांचे आजार जरा वेगळे होते. एखाद्याला जखम झाली, जखमेत स्ट्रेप्टोकोकससारख्या जंतुंमुळे पू झाला, पुढे गळू झाला, तरीही लागण त्या त्या व्यक्तिपुरती मर्यादित रहायची. टोळीपुरत्या साथीही यायच्या, पण त्या महामारी म्हणाव्यात अशा नसायच्या. कशा असणार? कारण मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला आसपास मोठ्या प्रमाणावर माणसंच नसायची. शिवाय उपलब्ध माणसंहीजंतू-नवखीहवीत. म्हणजे असं, की समजा गावातली माणसं रंग खेळणार आहेत. सकाळी सगळेच परीटघडीच्या स्वच्छ कपड्यांत आहेत. एकदा कपडे रंगलेल्याला रंग लावायचा नाही असा नियम आहे. या नियमाने खेळ सुरू झाल्यावर दिवस चढत जाईल तसतसे स्वच्छ कपडेवाले संपत जातील. गावात सकाळी जल्लोषात सुरू झालेला खेळ संध्याकाळपर्यंत संपून जाईल. साथीच्या आजारांचं असंच काहीसं होतं. आजाराची एकदा लागण झाली, की तात्पुरती प्रतिकारशक्ती तरी येते किंवा तो माणूस तरी मरतो. ठराविक प्रमाणात माणसं जंतूबाधित झाली, की उरलेल्या जंतू-नवख्यांना आपोआपच अभय मिळतं. हीच ती बहुचर्चितहर्ड इम्युनिटी’ (संघशक्ती). त्यामुळे साथ ओसरते. साथ ओसरण्याला इतरही कारणं असू शकतात. कधीकधी रंग संपतो म्हणून साथ ओसरते. उदाहरणार्थ, दूषित पाण्याचा नळ वापरणं बंद केलं, तर जुलाबाच्या साथीचा मूळ स्त्रोतच बंद होतो. ते असो. 

ही संघशक्ती (हर्ड इम्युनिटी) बराच काळ टिकते. हळूहळू लोकांचे कपडे स्वच्छ होतात, म्हणजेच त्यांची प्रतिकारशक्ती कमीकमी  होते. गावात नवे जन्म होतात, नवे लोक येतात. पुन्हा एकदा जंतू-नवख्यांची रेलचेल होते. पुन्हा एकदा स्वच्छ कपड्यांची गर्दी वाढते. साथीला पोषक वातावरण निर्माण होतं.

पूर्वी माणसं म्हणायची, ‘आला बरं का, मरीआईचा फेरा आला. गावातून गाडा फिरवायला हवा, कोंबडं बकरं कापायला हवं.’ आपल्या हाताशी भारीभारी अँटिबायोटिक आली, लशी आल्या आणि मरीआईचा गाडा अडगळीत गेला. देवी निर्मूलनादरम्यानचे आश्वस्त करणारे अनुभव लक्षात घेत काही काळ असं वाटून गेलं, की आता रोगजंतूंमुळे होणारे आजार इतिहासजमा होणार. निदान साथीचे आजार तरी आटोक्यात आणता येतील. पण असं काही झालं नाही. उलट हे आजार कायमचे आपल्या साथीला आहेत, ही जाणीव पक्की झाली. 

शिवाय साथीचे रोग पसरण्यासाठी दरवेळी काही प्राण्यातून मनुष्यप्राण्यात संक्रमण होण्याची गरज नाही. आपले नेहमीचे रोगजंतू नेहमीच्या प्रतिजैविकांना दाद देईनासे झाले की आपल्याला तापदायक ठरतात. जंतू कितीतरी वेगाने बदलत राहतात. अशा बदललेल्या जंतूंच्याही साथी येतात. उदा: टी.बी.सारखा आजार आता नेहमीच्या औषधांना दाद देत नाही. अशा निर्ढावलेल्या टीबीची साथ आहे सध्या. त्यामुळे त्यांच्याशी दोन हात करायला आपल्याला देखील सातत्याने नवनवीन शस्त्रास्त्रं निर्माण करावी लागतात. अशा रेझीस्टंट जंतूंना मारतील अशी प्रतिजैविकं सतत तयार करावी लागतात. हे काम इतकं खर्चिक, बेभरवशाचं आणि इतकं किचकट आहे की नवी नवी प्रतिजैविकं शोधण्यात औषध कंपन्यासुद्धा फारसा रस घेत नाहीत. त्यातली गुंतवणूक आणि नफा याचं गणित किफायतशीर नाही असं त्यांचं म्हणणं.

इवले इवले जंतू हे, माणसाचं जिणं हराम करून टाकतात. ल्युएनहोएक या डच माणसाने पहिल्यांदा हे जीव सूक्ष्मदर्शकाखाली बघितले. १६७७ साली त्याने रॉयल सोसायटीला या प्राणुल्यांचं वर्णन कळवलं. हो, त्यानेप्राणुले’ (ॅनिमिक्युल्स) असाच शब्द वापरला होता. पण सुरवातीला त्याच्यावर कुणाचा म्हणजे कुणाचाच विश्वास बसला नाही. सूक्ष्मदर्शकाखालील हे अधोविश्व अविश्वसनीयच होतं. पाण्यात जीव, सांडपाण्यात जीव, विष्ठेत जीव आणि वीर्यातही जीव. त्याच्या थोडाच काळ आधी (१६०९) गॅलिलिओने आपली दुर्बिण ऊर्ध्व दिशेला रोखली होती. ग्रहमालेचं केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे हे स्पष्ट झालं होतं. सारं आकाश जणू माणसाच्या कवेत आलं होतं. सूक्ष्म पिंडांपासून ब्रम्हांडापर्यंतचा हा अनुभव युरोपातल्या धीमंतांना अस्वस्थ करत होता.

आजही कितीही सूक्ष्मात शिरलो तरी हे सूक्ष्मजीव आपल्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाहीत. एकेक प्राणी म्हणजे खरंतर एकेक प्राणीसृष्टी असते! ज्या त्या प्राण्याच्या अंगाखांद्यावर असंख्यमैत्र जिवांचेवस्तीला असतात. गाय काय किंवा गोरीला काय, घोडा काय अथवा अथवा माणूस काय; या सार्यांच्या त्वचेवर, नाकातोंडात, श्वासात, मलमूत्रात असंख्य जिवाणू/विषाणू/परोपजीवी सुखेनैव रहात असतात. एकेका प्रजातीशी तादात्म्य पावलेलं हे सहजीवन असतं. इतकंच कशाला, पण प्रत्येक प्राण्याने, प्रत्येक माणसानेसुद्धा एकमेवाद्वितीय अशी सूक्ष्मसृष्टी अंतर्बाह्य पांघरलेली असते. त्यामुळे एखाद्या जंतुमुळे आली साथ तरी त्यांचा दुःस्वास करायचं कारण नाही. हे आपले साथीच आहेत.

डॉ. शंतनू अभ्यंकर
९८२२०१०३४९
shantanusabhyankar@hotmail.com


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८