दावे म्हणजे औषध नव्हे! - डॉ. सचिन लांडगे
वृत्तवाहिन्या कुठलाही उपाय किंवा कुठलीही गोष्ट ‘औषध सापडलं’ म्हणून
दाखवू शकतात. पण वाहिन्यांवर दाखवलंय किंवा अनेकजण घेत आहेत, म्हणून
ते ‘औषध’ होत नसतं!
उपाय, उपचार, लस आणि औषध म्हणजे नेमकं काय?
१. एखादा रोग किंवा विकार आपल्या शरीरात आल्यावर कसा वागेल, काय
परिणाम करेल, तो कधी जाईल याचा अभ्यास करणार्या मॉडर्न मेडिसिनच्या (अॅलोपॅथीला आता
मॉडर्न मेडिसिन म्हटलं जातं.) शाखेला ‘पॅथॉलॉजी’ म्हणतात आणि आपल्या शरीरात इन्फेक्शन/रोग
गेल्यावर किंवा विकार झाल्यावर तो शरीरात जो धुमाकूळ माजवतो, त्याचा
‘नॅचरल कोर्स’ कसा असतो, त्याला ‘पॅथॉजेनेसिस’ म्हणतात.
‘कोविड-१९’ हा विषाणू ८० ते ८५ टक्के लोकांमध्ये काहीच लक्षणं दाखवत नाही.
१० ते १५ टक्के लोकांमध्ये सौम्य ते मध्यम लक्षणं दिसतात. ७ ते १० टक्के लोक आयसीयूत
जातात, तर तीन ते पाच टक्के लोक मरण पावतात, असा आतापर्यंतचा
अभ्यास आहे.
त्यामुळे आमचं औषध घेतलेल्या लोकांना कोरोनाचा काहीच त्रास झाला नाही,
कोणी
दावा केला तर ते बरोबर नाही. कारण ८० टक्के लोकांना त्याचा तसाही काही त्रास होत नाही.
त्यांनी निवडलेले लोक नेमके याच ऐंशी टक्क्यांमधले असू शकतात. औषधाचा खरा परिणाम तपासायचा
असेल तर पन्नास-शंभर रुग्णांवर नव्हे, तर हजारो रुग्णांवर प्रयोग झाले पाहिजेत.
तेही वेगवेगळ्या स्टेजमधल्या.
२. पॅथॉजेनेसिसच्या कुठल्या टप्प्यावर कुठलं औषध उपयुक्त आहे,
हे वेगवेगळं
असतं. उदाहरणार्थ, काही अँटिबायोटिक्स बॅक्टेरिओस्टॅटिक असतात, (ती बॅक्टेरियाचं
मल्टिप्लिकेशन थांबवतात) तर काही अँटिबायोटिक्स बॅक्टेरिओसायडल असतात. (ती शरीरातले
बॅक्टेरिया मारून टाकतात), तर काही दोन्ही प्रकारची असतात. अँटिव्हायरल
ड्रगचंही तसंच असतं. एकच अँटिबायोटिक सगळ्या बॅक्टेरियांवर चालत नाही. ठराविक अँटिबायोटिक्सच
त्या बॅक्टेरियांचं पेशीआवरण भेदू शकतात किंवा इतर पद्धतीने मारा करू शकतात.
म्हणून एखादं इन्फेक्शन झालं, तर त्या आजारात अमुक
अँटिबायोटिक ९९ टक्के परिणामकारक असतं, दुसरं एखादं ९० टक्के परिणामकारक,
तर आणखी
एखादं ५० टक्के परिणामकारक असतं, तर एखादं शून्य उपयोगाचं असू शकतं.
म्हणून, गेल्या वेळी आजारी (इन्फेक्शन) पडलो तेव्हा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या
पुन्हा आजारी पडल्यावर परस्पर खाणं बहुतेक वेळा बरोबर नसतं.
३. बॅक्टेरिया/व्हायरस म्युटेट होऊन स्वतःचं रूप/फॉर्म बदलतो. त्याच्या
वेगवेगळ्या आकारांना (फॉर्म्सना) स्ट्रेन्स म्हणतात. म्युटेशन म्हणजे जीन्सच्या स्तरावर
घडलेला सूक्ष्म बदल.
समजा, एखाद्या गोर्या युरोपियन व्यक्तीला आफ्रिकेत कडक उन्हात राहावं लागू
लागलं तर तिच्या त्वचेवरचं मेलानिन वाढू लागतं, त्वचा काळी (डार्क)
व्हायला लागते. काही पिढ्यांनंतर तर जन्मतःच मूल डार्क व्हायला लागतं. म्हणजे तो बदल
जीन्समध्येच होतो. दुसरं उदाहरण बघा. डीडीटी हे कीटकनाशक सुरुवातीला जितकं परिणामकारक
होतं तितकं आता उरलं नाही. म्हणजे त्या रोगाच्या जंतूंमध्ये काही पिढ्यांनंतर डीडीटीसोबत
लढायची ताकद तयार झाली आहे.
समजा, तुम्ही क्षयरोगाच्या औषधाचे डोस सतत चुकवले किंवा मध्येच उपचार सोडले,
तर ते
क्षयाचे जंतू औषधांना प्रतिसाद द्यायचं कमी किंवा चक्क बंद करतात. त्याला ‘एमडीआर टीबी’
म्हणतात. अशा वेळी दुसरी औषधं वापरावी लागतात किंवा कधीकधी कुठल्याच औषधाचा उपयोग होत
नाही.
म्हणजे म्युटेशन ही त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसची जगण्यासाठीची धडपड
असते, होस्टसोबत जुळवून घेण्यासाठीचा त्याने केलेला प्रयत्न असतो. एचआयव्ही
विषाणूचेदेखील दोन स्ट्रेन्स सापडले आहेत.
या वेगवेगळ्या स्ट्रेन्समुळे तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया शरीरात कसा
वागेल हे बदलतं. हे तपासणारी चाचणी किट्स बदलतात. याची लक्षणं, कोर्स,
घातकता
बदलते आणि यावरची लस आणि औषधंही बदलतात.
पूर्वी आलेले मेर्स आणि सार्स हे विषाणूही कोरोना कुटुंबातीलच आहेत. सध्या धुमाकूळ घालणार्या कोव्हिड-१९ या कोरोना कुटुंबातल्या विषाणूचेही आतापर्यंत वेगवेगळ्या देशांतून सहा स्ट्रेन्स समोर आले आहेत. त्यातले तीन प्रकार सर्वत्र दिसणारे आहेत. सध्याची चाचणी किट्स सर्वांत आधी माहिती झालेल्या स्ट्रेनला शोधू शकतात. पण बाकीच्या स्ट्रेन्सचा शोध घेणं अजूनही अवघड असल्याने भ्रामक आणि नकारात्मक निकाल येऊ शकतात. ‘कोविड-१९’च्या या म्युटेशनमुळेच लस बनवायलाही उशीर होत आहे.
४. चाचणी किट्सची अचूकता आणि संवेदनशीलता : अचूकता म्हणजे नेमका तोच व्हायरस
शोधण्याची करण्याची क्षमता, तर संवेदनशीलता म्हणजे तपासणीसाठी दिलेल्या
नमुन्यातील (सॅम्पल) अत्यल्प प्रमाणही शोधून काढण्याची क्षमता.
जितकी अचूकता जास्त तितकं फॉल्स पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण कमी आणि जितकी
संवेदनशीलता जास्त, तितकं फॉल्स निगेटिव्ह येण्याचं प्रमाण कमी असतं. ही अचूकता आणि संवेदनशीलता
चाचणीच्या प्रकारानुसार आणि टेस्टिंग किट्सच्या प्रकारांनुसारदेखील बदलते.
कोविड-१९ साठीचे सध्याचे जे ‘आरटीपीसीआर’ आहेत त्यांची अचूकता ९० टक्के
आहे. म्हणजे टेस्ट्सचे निकाल नक्की करण्यासाठी कमीत कमी दोन टेस्ट्स करायला लागतात.
दोन टेस्ट्सनंतर भ्रामक आणि नकारात्मक प्रमाण १ टक्का इतकं उरतं आणि तीन टेस्ट्सनंतर
ते ०.१ टक्का होतं.
५. आता थोडं रोगावरचा प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकणार्या लशीबद्दल. उपाय
आणि उपचार यातही फरक असतो. उपाय हे साह्यकारी असतात, तर उपचार हे नेमके
असतात. वेदना कमी करण्याचे उपाय, लक्षणांवरचे उपाय आणि प्रतिबंधात्मक उपाय,
हे उपचारांचा
भाग असतात.
डोकेदुखीवर अमृतांजन लावणं हा ‘उपाय’ झाला, ‘उपचार’ नाही. ती
डोकेदुखी ताणतणाव किंवा इतर तात्पुरत्या कारणांनी असेल तर उपायांवर भागतं, पण तसं
नसेल तर मात्र एमआरआयसारख्या तपासण्या करून योग्य निदान आणि त्यावर उपचार करावे लागतात.
पण अमृतांजन हाच डोकेदुखीचा उपचार आहे, असा प्रसार कोणी करू लागला तर ते शास्त्रीय
दृष्टिकोनातून तितकंसं बरोबर ठरत नाही..
लस ही रोग व्हायच्या आधी घ्यायची असते. लस हा अतिशय स्पेसिफिक उपाय आहे.
त्या त्या रोगाच्या (मेलेल्या किंवा निष्प्रभ केलेल्या) व्हायरसपासूनच ती बनवली जाते.
लस टोचल्यानंतर शरीरात त्या ठराविक व्हायरसविरुद्ध प्रतिपिंडं तयार होतात. म्हणून घाऊक
प्रमाणात इम्युनिटी वाढवणारी लस शोधल्याचा दावा करणं आणि कोणी त्यावर विश्वास ठेवणं
हा तर अज्ञानाचा कळस आहे.
६. औषध म्हणजे तरी काय असतं? ते रसायन, म्हणजे केमिकलच असतं.
एखादा मोलेक्युल किंवा मिक्श्चर असतं. मग ते प्रयोगशाळेत बनवलेलं असो किंवा जडीबुटीतून
काढलेलं असो, ते केमिकलच असतं.
आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन) हे फार फार तर १५०-२०० वर्षांपासून आपली
पाळंमुळं घट्ट करत आलं आहे. ते काही आकाशातून पडलेलं नाही. वनस्पती, खडक,
बुरशी
आणि इतरही अनेक नैसर्गिक स्रोतांपासून आपल्या रोगावर नेमका परिणाम करणारा मोलेक्युल
आधुनिक पद्धतीने प्रयोगशाळेत वेगळा केला जातो. जसजसे विज्ञानात निरनिराळे शोध लागत
गेले तसा त्यांचा वापर या आधुनिक वैद्यकाने करून घेतला आणि अनेक रोगांवर नैसर्गिक मॉलेक्युल,
सेमी-सिंथेटिक
आणि पूर्णपणे सिंथेटिक मॉलेक्युल शोधले. प्रयोगशाळेत आणि वैद्यकीय चाचण्या वापरून आणि
पुराव्यांच्या आधारे अभ्यास करून जास्तीत जास्त परिणामकतेच्या जवळ जायचा प्रयत्न केला.
इतर परिणाम कमी कसे होतील हेही पाहिलं. निरनिराळे विषाणू आणि जिवाणू यांचा अभ्यास करून
त्यांच्या जीवनचक्रात नेमका कुठे व कसा आपण औषधांचा वापर करू शकतो हे शोधलं. त्यांच्यावर
लसी शोधल्या.
उदाहरणार्थ, सर्पगंधा या वनस्पतीपासून रक्तदाबावरचं
औषध बनवलेलं आहे. या झाडापासून आपल्याला मिळते ती अफू. त्याचा प्रयोगशाळेमधून शुद्ध
मॉलेक्युल मिळवला तर त्याला मॉर्फिन म्हणतात. मॉर्फिनच्या अणुरचनेतून काही अणू बदलून
आपण डाय मार्फिन आणि बुरप्रेनॉर्फिन मिळवतो, ज्यात मॉर्फिनचे
साइड इफेक्ट बरेच कमी केलेले आहेत. तशीच संरचना असलेलं पण वेगळं असं ‘फेंटानाइल’ हे
अत्यंत भारी पेनकिलर आपण पूर्णपणे प्रयोगशाळेत शोधलं आहे. ते मॉर्फिनपेक्षा कैक पटींनी
उपयोगी आणि सुरक्षितही आहे.
म्हणजे अफू झाली हर्बल ड्रग, मॉर्फिन झालं नॅचरल ड्रग, बुरप्रेनॉर्फिन
झालं सेमी-सिंथेटिक ड्रग, तर फेंटाइल झालं सिंथेटिक ड्रग. म्हणून
हर्बल म्हणजे चांगलं आणि सिंथेटिक म्हणजे वाईटच, हा आपला समज चुकीचा
आहे. उलट सिंथेटिक मॉलेक्युल नेमका परिणाम करण्यासाठीच शोधला गेलेला असतो आणि चाचण्या
करून स्पर्धेमध्ये टिकलेलाही असतो.
७. कुठलंही औषध, मग ते नैसर्गिक असो वा सिंथेटिक,
त्याचं
फार्माकोडायनामिक्स ठरलेलं असतं. म्हणजे ते तोंडावाटे दिलं तर किती शोषलं जाईल,
स्नायूंत
इंजेक्शन दिलं तर किती, सलाइनमधून दिलं तर किती, वगैरे. दिलेल्यापैकी किती टक्के औषध
‘टार्गेट’पर्यंत पोहोचेल, शरीरात किती काळ त्याचा जास्तीत जास्त परिणाम
राहील, किती वेळानंतर डोस पुन्हा द्यावा लागेल, शरीरात आवश्यक तो
परिणाम केल्यावर त्याचं चयापचय कसं होईल, शरीरातून ते बाहेर कसं पडेल, या सगळ्याचा
अभ्यास करून त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक औषधासाठी त्याची काम करण्याची क्षमता किती
आणि परिणामकारकता किती हे माहिती असणं खूप आवश्यक असतं. समजा एखादं औषध कॅन्सरवर खूपच
परिणामकारक आहे, पण फक्त पाच टक्के लोकांवरच त्याचा परिणाम दिसत असेल तर ते पास होऊन बाजारात
येऊ शकत नाही. चाचणी पास व्हायला ९० टक्क्यांवर परिणामकारकता ५० टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये
दिसली पाहिजे. याला त्या औषधाचा ‘ईडी ५० इंडेक्स’ म्हणतात. डबल ब्लाइन्ड स्टडीमध्ये
डमी औषध वापरून आपण परिणामकारकता किती आणि प्लासीबो इफेक्ट किती ते तपासू शकतो..
उदाहरण सांगतो. क्रोसिन तापावर का चालतं? कारण ते ८० टक्के
लोकांमध्ये जास्तीत जास्त परिणाम (साधारण नव्वद टक्के) करतं. तुम्ही उरलेल्या वीस टक्क्यांंत
असाल तर तुम्ही म्हणता, “अरे, या डॉक्टरचा गुण
नाही आला, डॉक्टर बदलून बघू.” खरं तर तेव्हा औषध बदलायची गरज असते.
उद्या समजा, जर शरीरातील हॉर्मोनल बदलांमुळे,
इम्युनिटीतील
किंवा जीन्समधील बदलामुळे क्रोसिनला रिस्पॉन्स द्यायची आपली क्षमता कमी झाली,
तर त्याला
पर्याय म्हणून दुसरा मॉलेक्युल शोधायची गरज आहे, क्रोसिनला कवटाळून
बसण्यात काहीच अर्थ नाही. सतत बदलत, अपडेट करत राहिलं तरच ती उपचारपद्धती (पॅथी)
टिकते. काहीही फीडबॅक न घेता किंवा चाचण्या न घेता तेच तेच औषध चालू ठेवलं,
तर तुमच्या
उपचारांची परिणामकारकता आणि उपचारपद्धती दोन्हीही काळाच्या कसोटीवर मागे मागे जाऊ लागतात.
त्यासाठी सतत संशोधनाची गरज असते, क्लिनिकल ट्रायल्सची
गरज असते, फीडबॅकच्या नोंदींची गरज असते. म्हणून पोकळ दावे करून काही उपयोग नाही,
रिझल्ट्स
मिळाले पाहिजेत, आणि त्यात सातत्यही राहिलं पाहिजे.
उत्क्रांतीत प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांत बदल होत असतात. पिढ्या दर
पिढ्या रोगप्रतिकारशक्तीत बदल घडतो. एकाच वेळेस समाजाची प्रतिकारक्षमता (हर्ड इम्युनिटी)
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीगणिकही प्रभाव कमी-जास्त होऊ शकतो.
प्रत्येकाचं जेनेटिक मेकअप वेगळं असल्याने औषधाचं फार्माकोडायनामिक्स बदलतं. (दारू
प्रत्येकाला वेगळी चढते, तसं काहीसं.) सामाजिक, आर्थिक,
पर्यावरणीय
घटकही औषधांच्या फार्माकोडायनामिक्सवर प्रभाव टाकत असतात. त्याचा सतत अभ्यास करून नोंदी
ठेवाव्या लागतात. ‘सब घोडे बारा टक्के’ असं सायन्समध्ये नसतं.
८. औषधं हे केमिकलच असतं हे आपण पाहिलंय. जे आपण अन्न म्हणून खातो,
ते दुसर्या
एखाद्या प्राण्यासाठी विषदेखील असू शकतं. सडलेलं मांस खाल्लं तर आपण कदाचित मरू,
पण गिधाडं
ते सहज पचवू शकतात. त्यांचं तेच अन्न असतं. कारण ते पचवायची विकरं त्यांच्याकडे असतात.
विंचवाच्या विषाने भिंतीवरच्या पालीला काही होत नाही, कारण ते केमिकल पचवायची/त्याला
निष्प्रभ करायची किंवा त्याचा परिणाम न होऊ द्यायची सिस्टीम पालीत विकसित झालेली असते.
तसंच माणसातही काहींना विंचू चढतो, तर काहींना नाही.
सापाच्या किंवा विंचवाच्या विषाचा एखाद्यावर कमी परिणाम झाला (किंवा परिणामच
झाला नाही) तर त्याचं क्रेडिट नेमकं त्या वेळी त्याला खायला दिलेल्या एखाद्या झाडपाल्याला
किंवा कुठल्या मंत्रतंत्राला आपण देणार असू तर ते निव्वळ अज्ञान.
९. जेव्हा कोणतीही गोष्ट औषध म्हणून शोधली जाते किंवा तसा दावा करण्यात
येतो, तेव्हा त्याच्या शास्त्रशुद्ध (सायंटिफिक) ट्रायल्स घ्याव्या लागतात.
एखाद्याने कोरोनावर उपाय म्हणून ‘माती’ शोधली तरी हरकत नाही. पण त्या
मातीच्या घटकांचे मोलेक्युल प्रमाणित करणं, त्याची आधी प्राण्यांमध्ये
चाचणी घेणं, मग मानवी स्वयंसेवकांमध्ये चाचणी करून त्याचा परिणाम नोंदवणं आणि मग मोठ्या
प्रमाणावर त्याच्या मानवी चाचण्या घेणं आणि मग औषध प्राधिकरणाकडून संमती घेणं,
अशी
चाचण्यांची जगमान्य पद्धत आहे. ती तशीच पार केली पाहिजे. औषधांच्याच बाबतीत नव्हे,
तर संशोधनाच्या
इतर शाखांतदेखील चाचण्यांची अशीच पद्धत असते. म्हणून ‘आमच्या पॅथीची औषधं तुमच्या चाचण्या
लावून कशी तपासता येतील?’ असं म्हणणारा निव्वळ अज्ञानी असतो.
रोगावरचे कोणतेही उपाय हे औषध नसतात, ते फक्त उपाय असतात.
उपयुक्तता चाचणीतून गेल्याशिवाय आणि औषध प्राधिकरणाची मान्यता असल्याशिवाय कोणताही
उपाय ‘औषध’ होत नाही. कोणाच्या भावनांना किंवा वैयक्तिक अनुभवांना तिथे स्थान नसतं.
‘बाप दाखव; नाही तर श्राद्ध कर’ असा मामला असतो. आमच्या पुस्तकात लिहिलंय,
ही गोष्ट
सबब म्हणून चालून जाईल पण ते शास्त्रीय होत नाही.
१०. औषधाचं प्रमाणीकरणही तितकंच महत्त्वाचं असतं. एका मिलिग्रॅममध्ये
किती अॅक्टिव्ह मॉलेक्युल असावेत, एक डोस किती मिलिग्रॅमचा असावा याला प्रमाणीकरण
म्हणतात. समजा, एखादी कॅप्सुल लहान आतड्यात विरघळणारी बनवायची असते. कारण तिथे त्या औषधाचं
शोषलं जाण्याचं प्रमाण जास्त असतं. पण ती जठरातच विरघळून गेली तर उपयोग होत नाही,
अपेक्षित
परिणाम मिळत नाही.
घरगुती बनवल्या जाणार्या औषधांची किंवा औषध प्राधिकरणाचं काहीही नियंत्रण
नसलेल्या औषधांची प्रमाणीकरणाची शाश्वती असेलच असं नाही.
११. रोग आणि विकार यातही फरक आहे. रोग म्हणजे डिसीज आणि विकार म्हणजे
डिसऑर्डर. नेहमीच्या गोष्टी (ऑर्डर) बिघडल्याने होणारे आजार म्हणजे विकार. डायबेटिस
हा विकार आहे, तो रोग नाही. तसेच काही आजार हे मनोकायिक असतात. मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक.
आपल्याला जालीम औषध मिळालंय, किंवा आपल्याला चांगला डॉक्टर भेटलाय,
या विचारांनीसुद्धा
रुग्णाच्या लक्षणांमध्ये फरक पडायला लागतो. ‘डॉक्टरने दोन शब्द गोड बोलले तरी निम्मा
आजार पळून जातो’ हे आपल्याकडे म्हटलं जातं ते यामुळेच. पण याचाच फायदा बर्याच पॅथी
घेतात. पॅथीचं सोडा, याचा फायदा बाबा, बुवा, हकीम यांनादेखील
होतो. मंत्रतंत्र, गंडादोरा यांनी होणार्या काहीशा मनोकायिक परिणामांमुळे त्यांचं फावतं
अन् त्यांचीच प्रसिद्धी जास्त होते; पण ज्यांना काही फरक पडला नाही ते लोक मात्र
गप्प बसतात अन् उपचारांचा मार्ग बदलतात.
खूप लोकांना आपल्याकडे आजाराचा ‘स्वीकार’ करता येत नाही. आपल्याला आजार
झालाय किंवा आपला आजार बरा होणारा नाही, याला सामोरं जाता येत नाही. आजाराविरुद्ध
लढण्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद कमी असल्यास माणूस चमत्कारांच्या आणि भोंदूंच्या मागे लागतो. मग हे भोंदू लोक देवाधर्माच्या आधाराने किंवा सिद्धी
प्राप्त असल्याचा बहाणा करत अनेक तंत्रमंत्र, तोडगे, झाडपाला,
जडीबुटी
विकतात आणि श्रीमंत होतात. घेणार्याला पण आजारासाठी काही तरी केल्याचं समाधान मिळतं.
पण हा उपचार नसतो. त्याने तुम्ही आर्थिक आणि भावनिक दुष्टचक्रात सापडता.
‘इससे सुबह-शाम खाने से डायबेटिस, ब्लडप्रेशर तथा हृदयरोग
जैसी बीमारियाँ नष्ट होगी’, म्हणणारी औषधं, एक महिन्यात वजन
उतरवून शरीर पिळदार करणार्या गोळ्या, स्तन सुडौल करणारी क्रीम्स आणि भूक वाढवते,
इम्युनिटी
वाढवते म्हणत जाहिरातबाजीतून हातोहात खपणारी टॉनिकं ही सगळी याच कॅटेगरीतली.
मॉडर्न मेडिसिनमधली पूर्वी शोधलेली किती तरी औषधं आज निरुपयोगी आहेत.
त्यांच्यापेक्षा अधिक परिणामकारक औषधांचा शोध लागला आहे आणि अजून तो सुरूच आहे. एखादं
औषध प्रमाणित झालं, पुस्तकात छापलं म्हणजे ते आता कायमचं झालं असं होत नाही. त्याचा फीडबॅक
घेणं चालूच असतं. म्हणून २०० किंवा २००० वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात दिलं आहे
म्हणून आपण त्याच त्या औषधांची भलावण करत असू, (आणि त्यामुळे ट्रायल्सना
सामोरे जात नसू) तर त्याच्या परिणामकारकतेची विश्वासार्हता कमी होते. जे आपल्याच उपचारपद्धतीसाठी
घातक असतं. समजा, आज जर कोणी डॉक्टरला म्हणालं, की ‘पेनिसिलिनचा
वापर अलीकडे अजिबात सुरक्षित नाही’, तर बोलणार्याच्या अंगावर धावून जाणारा
अलोपॅथिक डॉक्टर मी तरी अजून पाहिलेला नाही. किंवा एकेकाळच्या लाडक्या निमस्युलाइडवर
बंदी घातल्यावर अमेरिकेतील औषध प्राधिकरणाला कोणी शिवीगाळ केल्याचंही ऐकिवात नाही.
मला सांगा, औषधं आपल्यासाठी असतात की आपण औषधांसाठी
असतो? उपचारपद्धती आपल्यासाठी असतात की आपण उपचारपद्धतींसाठी असतो? मग कुठल्याही
औषधावर किंवा एखाद्या उपचारपद्धतीवर कोणी शंका उपस्थित केली तर आपल्याला राग का येतो?
जर औषधं
आपल्यासाठीच असतात तर त्यांच्या परिणामकारकतेवर कोणी शंका घेतली तर त्याला अधिकृत अभ्यास
दाखवणं, नसतील तर तो कसा होईल (किंवा होतील) त्याचा पाठपुरावा करणं, हे करण्यापेक्षा
आपण जर समोरच्याला दूषणं देत असू, त्याची लायकी काढत असू तर मग आपण ‘सायन्स’चे
विद्यार्थी कसे?
सतत प्रश्न उपस्थित करत राहणं आणि कुठल्याही नव्या बदलाची तयारी ठेवणं,
हे
‘सायन्स’च्या विद्यार्थ्यांचं पहिलं लक्षण आहे. एकदा का तुमच्यात पोथीनिष्ठता किंवा
ग्रंथप्रामाण्य आलं की तुमची प्रगती खुंटलीच म्हणून समजा.
आज मॉडर्न मेडिसिनने जी प्रगती केली आहे त्याचं कारण त्याची विश्वासार्ह
परिणामकारकता हेच आहे. आपली स्वतःचीच चूक सुधारायची संधी जिथे असते ती गोष्ट जास्तीत
जास्त परफेक्शनकडे जात असते. (ही गोष्ट व्यवहारातदेखील लागू पडते). उदाहरण सांगायचं
झालं, तर सोलापूरच्या डॉ. सुमन सरदेसाई यांनी प्री-इक्लेमशियासाठीच्या औषधाला
आव्हान दिलं आणि अत्यल्प उत्पन्न गटातील भारतीय महिलांसाठी नवं औषध शोधून काढलं,
त्याच्या
क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या, अभ्यास केला. त्याचे फीडबॅक घेतले,
त्याचे
संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले. तिथून मान्यता घेतली. त्याला आता
‘सोलापूर रिजीम’ असं नावही दिलं. मग ते क्रमिक पुस्तकामध्ये आलं. आता हे क्रमिक पुस्तकामध्ये
किती दिवस राहणार? जोपर्यंत त्याला पुन्हा कोणी आव्हान देत नाही आणि नवा अभ्यास प्रसिद्ध
करत नाही तोपर्यंत! अजून पन्नास-शंभर वर्षांनी समजा राहणीमानातले बदल, पर्यावरण,
आहार,
प्रतिकारक्षमता
यातल्या बदलांमुळे कोणी तरी दाखवून देईल, की सोलापूर रिजीम तितकंसं परिणामकारक उरलं
नाहीये. त्यावेळेचे डॉक्टर त्या नवीन अभ्यास प्रसिद्ध करणार्याच्या डोक्यात दगड घालणार
नाहीत, तर ते त्याचे निकाल तपासतील, त्याची अधिकृतता तपासतील आणि त्या नवीन
अभ्यासाला मान्यता देतील. मॉडर्न मेडिसिनचं पुराव्याच्या आधारावर विकसित होत जाणंच
त्याला विश्वासार्हता देतं.
आपली पॅथी टिकवायची असेल तर ती जास्तीत परिणामकारक आणि विश्वासार्ह होण्यासाठी
आपण प्रयत्न केले पाहिजेत. औषधांच्या सत्यासत्यतेवर कोणी शंका घेतली, की नाराज
न होता त्यांनी काय संदर्भ घेतलेत, त्यांचा डेटा बेस काय आहे, सॅम्पल
साइज किती निवडला आहे, बायस रूलआऊट केलेत का, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत,
तरच
आपण सायन्सचे विद्यार्थी. आपण ‘औषध की तरफ से’ नव्हे; तर ‘सायन्स की तरफ
से’ असलं पाहिजे.
आपल्याला आयुर्वेद, अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी माहिती असते; पण जगात मान्यता असलेल्या-नसलेल्या मिळून शंभरेक तरी उपचारपद्धती असतील. कोणत्याही एखाद्या उपचारपद्धतीच्या परिणामकारकतेविषयी बोललं, की तुम्हाला ज्यातलं ज्ञान नाही त्याविषयी बोलता कशाला, असं प्रत्येकजणच म्हणतो. वास्तविक हा तर्कदोष आहे. प्रत्येक वेळी अनुभव घेतल्याशिवाय बोलूच नये असं नसतं. त्या त्या विषयासंबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर केलेल्या अभ्यासावरून आणि चर्चेतून आपल्याला निष्कर्ष काढता येतो..
एखाद्या औषधाविषयी किंवा पॅथीविषयी बोललं की त्या पॅथीचे लोक ते स्वतःवरच
का घेतात? आपल्या पॅथीवर खूप प्रेम आहे म्हणून? तसं गृहीत धरलं तर
त्या पॅथीच्या प्रगतीसाठी आपण काय प्रयत्न करतो? त्या पॅथीची आपली
निवड ऐच्छिक होती का? आताही त्या पॅथीचेच उपचार देण्यासाठी आपण किती कटिबद्ध आहोत किंवा स्वतःसाठी
घेण्यासाठी किती प्रयत्नशील आहोत? आपल्या पुढच्या पिढीलाही त्या पॅथीचं शिक्षण
घेण्यासाठी आपण किती आग्रही आहोत? अशा प्रश्नांची उत्तरं ज्यांची त्यांनीच
शोधायची आहेत.
कोणत्याही औषधांबद्दल किंवा उपायांबद्दल जे अवास्तव दावे करत आहेत,
त्यांना
करू देत. ज्यांना घ्यायचंय ते घेतील, ज्यांचा विश्वास नाही ते नाही घेणार,
असं
आपल्याकडे सर्रास म्हणलं जातं. या कोव्हिडकाळात
तर जास्तच. पण त्यामुळेच ‘काही तोटा नसेल तर करून बघायला काय हरकत आहे’, अशा
मानसिकतेचाच फायदा लोक उठवतात. आपल्या विश्वासावर आणि भावनांवर त्यांचा बाजार मांडतात
आणि सुरक्षित, परिणामकारक आणि प्रमाणित वगैरेंचे प्रोटोकॉल न पाळलेले कसलेही उपाय ‘औषध’
म्हणून आपल्या माथी मारू शकतात. ही फसवणूक नव्हे तर काय आहे? त्यामुळे
एखाद्याच्या जिवावरदेखील बेतू शकतं.
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगायचं झाल्यास, अशी
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नसलेली आणि भोंदू औषधं घेणार्याने अति आत्मविश्वासाने
जाऊन मास्क, सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत
तर त्याची सजा सगळ्यांनाच भोगावी लागणार आहे.
डॉ. सचिन लांडगे
drsachinlandge@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा