आजच्या संकटात महात्मा गांधींनी काय केलं असतं - डॉ. अभय बंग


 

कोरोनासाथीच्या या संकटकाळात काय केलं जायला हवं होतं आणि आणखी काय करता येऊ शकतं याबद्दल असंख्य मतमतांतरं आहेत. या संकटात महात्मा गांधींनी काय केलं असतं, हाही विचार अशा वेळी मनात आल्यावाचून राहत नाही. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी तो विचारप्रयोग करून पाहिला..

आजचं वैश्विक संकट तिहेरी आहे. कोविद रोगाची महामारी, व्यापक व खोल आर्थिक मंदी आणि मानवीय अस्तित्वालाच धोक्यात टाकणारे पर्यावरणीय बदल. या शिवाय, अशा स्थितीत मार्ग दाखविणार्या राजकीय व नैतिक नेतृत्वाचा आज जगभरात अभाव आहे. त्यामुळे उत्तर अन्यत्र शोधायला हवं. महात्मा गांधींसमोर आजचं आव्हान उभं असतं तर त्यांनी काय केलं असतं? त्यांचं उत्तर कुठे शोधायचं? ते त्यांनी स्वत:च सांगून ठेवलं आहे, ‘माझं जीवनच माझा संदेश आहे.’ आपल्याला गांधींचं उत्तर त्यांच्या जीवनात शोधावं लागेल.

त्यांच्या उत्तरांमधे काही वैशिष्ट्यं समान असतील. एक, ते दुसर्यांना उपदेश करण्याऐवजी प्रथम स्वत: कृतीत उतरवतील. म्हणूनच आत्मस्तुती वाटावं अशा तर्हेचं वाक्य - माझं जीवनच माझा संदेश आहे - ते बोलू शकले. आपण बोलू शकतो का? बोलून बघा. जीभ रेटत नाही. दुसरं, ते कोणतीही कृती प्रथम स्थानिक पातळीवर सुरू करतील. जग बदलायला त्यामागे जगभर धावणार नाहीत. मातीच्या एका कणामधे पृथ्वी बघू शकण्याची दृष्टी त्यांच्या जवळ होती. मी जिथे आहे ती जागा माझास्व-देशआहे. माझी कृती इथेच सुरू होणार. कारण मी फक्त इथेच कृती करू शकतो. तिसरं, त्यांची कृती सुरवातीला तरी क्षुल्लक व बालिश वाटेल; उदाहरणार्थ, मूठभर मीठ उचलणे किंवा सूत कातणे. पण थोडं थांबा; त्यामुळे इतिहास बदलेल.

 तुम्ही आज काय केलं असतं?’ असा प्रश्न गांधींना टाकण्याचाविचार-प्रयोगमी करून पाहिला तेव्हा नऊ कलमी कार्यक्रम प्राप्त झाला. तो असा -

) भयमुक्ती

आज विषाणूपेक्षा जास्त भयाणूचेपॅनडेमिकआहे. व्हायरसची भीती ही व्हायरसपेक्षा फार व्यापक पसरली आहे. ती सर्वांना भयग्रस्त व शक्तीहीन करते आहे. गांधी सर्वात प्रथम आपल्याला सांगतील, ‘निर्भय व्हा.’ भीती ही माणसाला बलहीन करणारी, घातक भावना आहे. दुसरं, वास्तविकरीत्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यूची भीती लोकसंख्येमधील प्रत्येकाला अत्यंत अल्प आहे. सर्वात अधिक थैमान घातलेल्या अमेरिकेतही लोकसंख्येत कोविद मृत्यूचे प्रमाण केवळ ०.०३ टक्का आहे. तिचा बागुलबुवा करू नका. त्यांचा अंतिम तर्क राहील - मृत्यूची भीती कशाला? कुणाला? शरीर मेले तरी आत्मा अमर आहे. त्याला मृत्यू नाही.

भय हे काल्पनिक, असत्य असल्याने ते आपोआप विरघळून नाहीसं व्हायला लागेल. एखाद्या गुहेतला हजारो वर्षांचा अंधार दूर करायला फार काही करावं लागत नाही, केवळ प्रकाशाचा एक किरण लागतो. अंधार तर आपोआप दूर होतो. आपल्या मनातील भीतीचा अंधार तसाच दूर व्हायला लागेल.

) रुग्णसेवा

रोग्यांची सेवा ही गांधींची स्वाभाविक वृत्ती होती. बोअर युद्धात, पहिल्या महायुद्धात, भारतातील महामारी दरम्यान व आश्रमातील रोग्यांची शुश्रूषा करण्यात ती वेळोवेळी प्रकट झाली. कुष्ठरोग झालेल्या विकलांग परचुरे शास्त्रींना आपल्या कुटीशेजारी ठेवून त्यांनी स्वत: केलेली शुश्रूषा हे त्याचंच उदाहरण. कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी घ्यायला गांधी स्वत: सुरवात करतील. ती करताना स्वच्छता, हात धुणे, मुखपट्टी वापरणे या सर्व वैज्ञानिक सूचनांचे काटेकोर पालन करत ते प्रत्यक्ष रुग्णसेवा करतील.

गांधी शरीराच्या रोगप्रतिकाराच्या नैसर्गिक शक्तीवर विश्वास ठेवतील. त्याला ते निसर्गोपचार म्हणायचे. आणि सध्या तरी कोरोना विरुद्ध वैज्ञानिकरीत्या प्रभावी सिद्ध झालेले कोणतेच औषध वैद्यकशास्त्राकडे नसल्याने त्यांची पद्धत अवैज्ञानिक म्हणता येणार नाही. ‘निसर्गाला वाव द्याअसं ते म्हणाले असते. आणि कोरोनाचा जंतुदोष झालेल्यांपैकी बहुसंख्य रुग्ण आपोआपच दुरुस्त होत असल्याने त्यांची पद्धत उचितच ठरली असती.

स्वतंत्र होऊ घातलेल्या भारतासाठी योग्य उपचार पद्धती व आरोग्य व्यवस्थेच्या शोधात ते पुण्याजवळ उरळी कांचन या गावात राहून १९४६ मधे प्रयोग करायला लागले. तेव्हा डॉक्टर, व औषधं यावरील खर्चिक अवलंबनापेक्षा लोकांना स्वावलंबी व आरोग्य-स्वातंत्र्य देणारी नैसर्गिक व सोपी पद्धत ते शोधत होते. आजही ते तशीच पद्धत वापरतील. अतिगंभीर रुग्ण सोडले तर आजही कोविद रोगासाठी हीच पद्धत योग्य आहे.

कोविद रोगाच्या साथीमुळे रुग्णालयात इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना जागा मिळणं अवघड झालं आहे. सेवेचा पुरवठा करण्यास वैद्यकीय व्यवस्था अपुरी सिद्ध होते आहे. अशा स्थितीत गांधींचा निरोगी जीवनशैलीचा आग्रह, स्वत:चे आरोग्य स्वत: सांभाळण्याची क्षमता आणि शक्यतो स्वत:च्या ग्रामसमूहामध्येच उपचाराची सोय - अशा आरोग्य व्यवस्थेला आपणआरोग्य-स्वराज्यम्हणू शकतो. कोविदच्या साथीवर आरोग्य-स्वराज्य हे उत्तम उत्तर आहे. आणि तरी, अतिगंभीर निवडक रोग्यांना गांधींनी रुग्णालयात पाठवलं असतं.

व्यसनांना त्यांचा विरोध जगजाहीर आहे. कोविद साथीच्या प्रतिबंधासाठी भारत सरकार व भारतीय वैद्यक अनुसंधान परिषद (आयसीएमआर) यांनी देखील दारूची विक्री व तंबाखूच्या सेवनावर प्रतिबंध सांगितला आहे. तंबाखू खाऊन माणूस थुंकतो व थुंकीतून कोरोना पसरतो. आणि तसंही, भारतात दरवर्षी दारूमुळे पाच लक्ष व तंबाखूमुळे दहा लक्ष लोक मरतात. (जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार) कोरोनामुळे आतापर्यंत आठ हजार मृत पावले आहेत. गांधींची निर्व्यसनी जीवनपद्धती कोरोना विरुद्ध प्रभावी उपाय आहे, शिवाय ती इतर रोग व मृत्यूही कमी करेल.

) दुसरी दांडीयात्रा

कर्तव्य-बोधासाठी गांधींनी दिलेली जादूची कांडी (तलिस्मन) जगप्रसिद्ध आहे. ‘तुम्ही आजवर पाहिलेला सर्वात दु:खी, निर्बल माणूस आठवा. तो तुमचं कर्तव्य आहे.’ ही एक अप्रतिम कसोटी आहे. ती तत्काळ उत्तर देते. नेमकं उत्तर देते. माझ्यासाठी योग्य असं माझं कर्तव्य मला दाखवते. आज गांधी असते तर त्यांनी कोणालातलिस्मनम्हणून निवडलं असतं? फार शोधावं लागत नाही. कोरोनामुळे लादलेल्या सार्वत्रिक बंदीमुळे जे शहरात बेकार व नकोसे झाले व परत आपल्या गावाकडे जायला बाध्य झाले, पण ज्यांची परतीची साधने देखील शासनाने बंद केली, त्यामुळे जे माणसांचे लोंढे हजार किलोमीटर पायी निघाले, ते उपाशी, थकलेले, तहानलेले, चालणारे मजूर हेच गांधींचेतलिस्मनझाले असते.

ही जवळपास एक कोटी दुर्दैवी माणसं, दुहेरी विस्थापित, दुहेरी अस्पृश्य! प्रथम आपल्या गावात खालच्या जातीची म्हणून अस्पृश्य. कामाच्या शोधात विस्थापित होऊन शहरात आली. आता पुन्हा विस्थापित होऊन परत निघाली. कोणी मुलगी जखमी बापाला सायकलवर बसवून पंधराशे किलोमीटर निघाली. कोणी पोचले, कोणी रस्त्यातच मरून पडले. घरी शेवटचा फोन करून म्हणाले, ‘आ सकते हो तो लेने आ जाओ.’ मग फोन कायमचा शांत. जे मेले त्यांच्या प्रेतांचे ढीग खड्ड्यात फेकण्यात आले. जे पोचले त्यांना घरच्या लोकांनी नाकारलं, शासनाने पुन्हा अस्पृश्य ठरवलं व क्वारंटाईनमधे टाकलं. भारताच्या फाळणीच्या वेळी घडलेल्या महाशोकांत स्थलांतरानंतर हे पहिलेच तसे स्थलांतर. गांधीच्या कर्तव्यबुद्धीला हाच माणूस सर्वप्रथम दिसला असता.

आज गांधी असते तर ते दिल्ली सोडून या स्थलांतरितांमधे गेले असते. त्यांना अन्न, औषध व निवारा देण्याची व्यवस्था केली असती. पण त्याहून महत्वाचं, त्यांचा आत्मसन्मान व आशा त्यांनी जिवंत ठेवली असती. त्यांना रोजगार म्हणून त्यांनी चरखा दिला असता, आणि शहरातल्या सुस्थितीतील लोकांना खादी वापरून विस्थापितांच्या चरख्याला काम देण्याचं आवाहन त्यांनी केलं असतं. मला खात्री आहे की या विस्थापित मजुरांप्रती सह-अनुभूती व्यक्त करायला व शासनाच्या निर्दय बेजबाबदारीचा निषेध व्यक्त करायला गांधी आज त्या विस्थापितांसोबत चालत असते, दुसरी दांडी यात्रा.

) धार्मिक व सामाजिक एकता

गांधींच्या जीवनातील हे शेवटचं; पण अपुरं राहिलेलं कार्य आहे. भारतातील हिंदू व मुस्लीम यांच्यातील परस्पर द्वेष व हिंसेमुळे ते मरणप्राय दु:खी झाले होते. धर्म-द्वेषामुळे झालेले भारताचं विभाजन त्यांना बघावं लागलं होतं. आता देखील कोरोना व्हायरस जेव्हा भारताच्या दारावर येऊन ठाकला तेव्हा भारतातील काही नेते धर्मद्वेष पेटवण्यात मग्न होते. दिल्लीमध्ये हिंदू-मुस्लिम दंगे सुरू होते. जणू पुन्हा फाळणीपूर्व अवस्था. पुन्हा नवी फाळणी. हा द्वेष इतका आंधळा झाला की भारतात कोरोनाच्या प्रसाराचे खापर एका विशिष्ट धार्मिक पंथाने केलेल्या चुकीवर फोडण्याचा प्रयत्न केला गेला. चूक तर प्रत्येकाने केली. ३० जानेवारीला कोरोना भारतात पोचल्यावर जवळपास एक महिन्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंपच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये लाखभर माणसांची गर्दी गोळा करण्यात आली होती. पण चुकांमध्ये देखील धार्मिक भेदभाव केला गेला. भारतीय समाजाचे शतखंड करण्यात नेते यश मानत होते. अशा स्थितीत गांधींनी काय केलं असतं?

गांधींनी ही समस्या व्हायरस इतक्याच प्राथमिकतेने घेतली असती. आपला सर्व-धर्म-समभाव व उपनिषदांमधलीईशावास्यं इदं सर्वम्’ - सर्वत्रच ईश्वर वसलेला आहे - ही खरी भारतीय निष्ठा त्यांनी प्रत्यक्ष वर्तनातून प्रकट केली असती. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, आदिवासी, शिख, जैन यांच्यात कोणताच भेद न करता त्यांच्यामध्ये जाऊन राहिले असते. त्यांची सेवा केली असती. त्यांना एकमेकांच्या वस्तीत सेवा करायला पाठवलं असतं. प्रार्थना करायला एकत्र आणलं असतं. सर्वांचा ईश्वर एकच आहे. ईश्वर-अल्ला तेरे नाम. हे करतांना पुन्हा एकदा त्यांचा खून होण्याचा धोका पत्करूनही त्यांनी सर्वांना एकत्र आणलं असतं. आजच्या शतखंडित समाजातून पुन्हा एक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता.

) माझा शेजारी ही माझी जबाबदारी

कोरोनाच्या भितीमुळे व कठोर लॉकडाऊनमुळे प्रत्येकाने आपले दरवाजे घट्ट बंद करून शेजार्याशी देखील संपर्क तोडला आहे. गांधींनी हे अस्वीकार केलं असतं. म्हणाले असते - माझा शेजारी ही माझी जबाबदारी आहे, माझा स्वधर्म आहे. विशेषत: या कठीण काळात तर मी त्याला सेवा, प्रेम व आधार द्यायलाच हवा.

आज कोरोनाने प्रत्येकालाच एकटं करून टाकलं आहे. सगळेच एकमेकांच्या संपर्काला घाबरत आहेत, टाळत आहेत. संपर्काशिवाय शेजार कसा? आणि शेजार नसेल तर सामूहिकता कशी, समाज कसा? मला तर अशी शक्यता वाटते की गांधींनी सध्याचे शासकीय व मानसिक कोंडवाडे मान्य करणं नाकारलं असतं. शेजार्याची काळजी घेणं हा माझा धर्म आहे, असा सत्याग्रह केला असता. घट्ट स्थानिक बंध असल्याखेरीज राष्ट्र बनू शकत नाही - ते म्हणाले असते.  अशी नैतिक भूमिका घ्यायला एखादा गांधी लागतो. रोग प्रसार टाळण्याची पूर्ण काळजी घेत त्यांनी शेजार्याची काळजी घ्यायला सुरवात केली असती. तेव्हा अचानक भ्रमाचे पडदे उठायला लागले असते. आपल्याला स्वच्छ दिसू लागलं असतं की महामारीची भीती व शासनाची नीती यामुळे माणसाने माणसाला दूर केल्याने कोरोनाचा प्रसार थांबला नाही. उलट प्रत्येकाला अस्पृश्य करून टाकलं आहे!

) हिमालयाएवढी घोडचूक

गांधीजी जनतेशी खरं बोलले असते. आपली चूक झाली हे नि:संकोच स्वीकार करण्यास ते कायम तयार असायचे. चौरीचौराची हिंसक घटना घडल्यावरभारतीय जनता अहिंसक लढ्याला सिद्ध आहे असं मानून राष्ट्रीय आंदोलन सुरू करण्यात मी हिमालयाएवढी घोडचूक केलीअसं जाहीर करून ते आंदोलन परत घेण्याचं साहस त्यांनी दाखवलं, सर्व जग विरुद्ध जाण्याचा धोका पत्करून!

कोरोनाच्या साथीला तोंड देतांना आजच्या नेतृत्वाने अनेक चुका केल्या. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये चाळीस लाख विमान प्रवाशांना विदेशातून भारतात येऊ दिलं. त्यापैकी फक्त अडतीस हजारांची कोरोनासाठी टेस्ट करण्यात आली. यामुळे कोरोना भारतात शिरला. या चाळीस लाखांना आवश्यक संस्थात्मक क्वारंटाईन करण्याऐवजी १३४ कोटींना लॉकडाऊनची शिक्षा दिली. कोरोना विरुद्धच्या युद्धात जागतिक व राष्ट्रीय नेतृत्वाने आपलं घोषित ध्येय वारंवार बदललं - ‘विषाणू प्रवेश नको, मग कंटेनमेंट, मग रोगीसंख्या दुप्पट होण्याची वेळ लांबवणं (डबलिंग टाईम), मग मृत्यूची संख्या मर्यादित ठेवणं व आता कोरोनासोबत जगायला शिका.’ अपयश आलं की ध्येयच बदलून पुढच्या यशाचा दावा सुरू.

एका नव्या रोगाविषयी पुरेसं ज्ञान व उपाय नसल्याने निर्णयात चुका होणं स्वाभाविक आहे. तो गुन्हा नाही. पण आय.सी.एम.आरच्या सिरो-प्रिव्हलन्स

सर्वेक्षणानुसार भारतात संसर्ग झालेल्या व्यक्ती केवळ चार लक्ष नाही तर एक कोटी आहेत. कुठल्याही नेत्याने किंवा तज्ज्ञाने या ढळढळीत तथ्याची जाहीर दखल घेतली नाही. ‘आमचा उपाय साफ चुकलाही प्रामाणिक कबुली कुठे आहे?

गांधींनी ते सत्य जाहीर केलं असतं. माझी हिमालयाएवढी चूक झाली अशी जबाबदारी घेतली असती. आणि आश्चर्य म्हणजे, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावर आणखी जास्त विश्वास ठेवला असता.

) स्थानिक स्वराज्य

गेल्या बारा वर्षात आपण दोनदा, २००८ च्या जागतिक मंदीत व २०२० च्या कोविद महामारीसोबत आलेल्या आर्थिक मंदीत, पाहिलं की जागतिकीकरणावर आधारित अर्थव्यवस्था किती तकलादू आहे, कशी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. अमेरिकेत बँक आणि घरांचा स्थानिक घोटाळा झाला आणि २००८ मध्ये संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धराशायी झाली. आता वुहान मध्ये एक विषाणू जन्मला आणि जागतिक अर्थ-व्यवस्था पुन्हा धोक्यात. अजस्त्र अर्थव्यवस्थेने आपल्याला दगा दिला आहे. गांधी आपल्याला स्मरण करून देतील की स्थानिक उत्पादन, स्थानिक उपयोग व परस्पर संबंधांचे स्थानिक छोटे समूह हे अधिक स्थिर व मानवीय प्रारूप आहे. त्याला ते ग्राम-स्वराज म्हणायचे. अमेरिका व चीनच्या उत्पादनावर अवलंबून राहिल्याने त्यांनी आपलं नाक-तोंड दाबण्याचा कायम धोका संभवतो. तेच आपण नेपाळच्या बाबत काही वर्षांपूर्वी केलं होतं. परावलंबन आलं की स्वातंत्र्य धोक्यात येतं. गांधी आपल्याला स्थानिक, शक्यतो स्वयंपूर्ण, अशी अर्थरचना सुचवतील.

अर्थरचनेत महाकाय ऐवजी स्थानिक असा बदल आला तर त्यासोबत राजकीय व प्रशासकीय सत्ता देखील विकेंद्रित होईल. जागतिकीकरणामधून सर्वत्र हुकुमशाही प्रवृत्तीचे राजकीय नेते उदयाला आले आहेत. भांडवलशाही व उदारवादाने आश्वासन दिलेल्या स्वातंत्र्याऐवजी या नेत्यांनी लोकांना तुरुंगात बंद केलं आहे. नागरी स्वातंत्र्य व माध्यम-स्वातंत्र्य आक्रसून लोकांना भयग्रस्त केलं आहे. कोविदच्या महामारीने ही जागतिक सत्ता-व्यवस्था किंवा अव्यवस्था प्रश्नांकित केली आहे. कोणतीच केंद्रित सत्ता आपल्याला वाचवू शकत नाही, ती केवळ खोटे दावे करते हे लोकांनी अनेक देशांमध्ये अनुभवलं आहे. गांधी आपल्याला अहिंसकपणे, हळुवारपणे या महाकाय, राक्षसी अर्थ-राजकीय व्यवस्थेपासून छोट्या-छोट्या स्थानिक समुहांच्या मानवीय व्यवस्थेकडे घेऊन जातील. खरी नाती व खरी लोकशाही बिनचेहर्याच्या वैश्विक व्यवस्थेपेक्षा एकमेकांना ओळखणार्या स्थानिक माणसांच्या समुदायांमध्येच फुलू शकते.

) पृथ्वीतलावर आवश्यकतेपुरते आहे.

पण मग आमच्या गरजांचे काय? आधुनिक समाजातल्या महोत्पादनाचे काही उपभोक्ता नक्कीच विचारतील. गांधी त्यांना समजावतील -  कधीही तृप्त न होणारी उपभोगाची  इच्छा, इंद्रियांना चोवीस तास उत्तेजित करून सुखाचा आभास भोगण्याची मागणी ही तुमची नैसर्गिक गरज नसून तुमच्या मध्ये कृत्रिमरीत्या रोवलेली अनैसर्गिक सवय आहे. महाकाय उत्पादन व्यवस्था व बाजार यांच्या वाढीसाठी तुम्ही अनिवार उपभोग करणे आवश्यक आहे. तसे तुम्हालाप्रोग्रामकरण्यात आले आहे. वस्तुत: तुम्ही उपभोग करत नाही, तुम्ही उपभोगले जाता. क्षणभर थांबून शांतपणे आत डोकावून बघा. या पैकी किती उपभोग हे तुमच्या शरीर, मन, बुद्धीला निरोगी व सक्रीय ठेवायला आवश्यक आहेत? आणि किती कृत्रिम सवयी? लोभ? 

या पृथ्वीतलावर सर्वांच्या आवश्यकतांसाठी पुरेसे आहे, लोभाला पृथ्वी अपुरी पडेल, असं गांधी म्हणाले होते. आवश्यकता व लोभ यात विवेक करण्याची शक्ती, प्रत्येकाच्या आवश्यकता पूर्ण करणारी पण लोभाला नियंत्रणात ठेवणारी समाज व्यवस्था व नैतिकता या दिशेने गांधी आपल्याला घेऊन जातील. स्वराज्याची व्याख्याच त्यांनी अशी केली कीस्वत:चे राज्य नव्हे, स्वत:वर राज्य’. ही विलक्षण अर्थगर्भ अशी टिप्पणी आहे. माझ्या चंचल, लोभी मनाच्या मागण्या पूर्ण करणे विनाशी आहे. मन हा घातक मालक आहे त्याला मोकाट सोडू नका, संयमात ठेवा.

जेव्हा आपण विवेकाने आपल्या गरजा मर्यादित करू, अफाट उत्पादन व अनावश्यक उपभोग कमी करू, निव्वळ चंगळ म्हणून प्रवास व वेड्यासारखी वाहनं कमी करू तेव्हा धूर व धूळ कमी व्हायला लागतील. अवतीभवतीचे कर्कश भोंगे व चित्कार शांत होतील. पक्ष्यांची किलबिल व लहान मुलांचे खळखळून हसणे आपल्याला ऐकू यायला लागेल. नद्या व आकाश पुन्हा स्वच्छ निळे दिसायला लागतील. आपल्याला अनुभवाला येईल की आधुनिक समाजातील अनेक अतिरेकांविना आपण आनंदाने जगू शकतो. कोविद काळातील लॉकडाऊनच्या दरम्यान आपण याची थोडीशी झलक पाहिली आहे. आणि आश्चर्य! त्या बरोबर ग्लोबल वार्मिंगदेखील कमी व्हायला लागेल.

) प्रार्थना

शेवटची कृती जी गांधीजी स्वत: करतील व आपल्याला करायला सुचवतील, ती म्हणजे - प्रार्थना. रोज दिवसाच्या अंती, आपले सर्वोत्तम प्रयत्न करून, सर्व शक्ती व शक्यता वापरून झाल्यावर आता थोडा वेळ शांत बसा. अंतर्मुख व्हा, नम्र व्हा आणि शरण जा. कुणाला शरण जा? ते तुमच्या मर्जीवर आहे - ईश्वराला, निसर्गाला, जीवनाला, सत्याला, काळाला - तुम्हाला जे भावेल त्याला शरण जा. किमान गांधी तरी असंच करतील. जे जे शक्य आहे ते सर्व प्रयत्न तुम्ही केले आहेत. आता या पुढे ते ओझे आपल्या पाठीवर वाहू नका. तसे केल्यास तुम्ही केवळ ओझेवाहू गाढव बनाल. माणसाला कर्तृत्वाचे व अपेक्षांचे निरर्थक व घातक ओझे आपल्या पाठीवरून उतरून स्वतंत्र होता आलं पाहिजे. यालाच गांधी शरण जाणे व प्रार्थना म्हणतात. विश्वाच्या अनंत पसार्यात आपल्या अहंकाराची व प्रयत्नांची क्षुद्रता लक्षात घ्या आणि आता त्याच्या मर्जीने होऊ द्या - म्हणजेच शेवटी जे होईल ते स्वीकार करा. दाय विल बी डन. इन्शाअल्ला. हे राम!

गांधी परत येण्याची वाट न बघता, त्यांनी परत येऊन जे केलं असतं ते आपण सुरू केलं पाहिजे.

 

डॉ. अभय बंग

search.gad@gmail.com

 (‘द लॅन्सेटमध्ये प्रकाशित मूळ लेखाचा मराठी विस्तार)

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८