ते दहाजण - फे. सीन. एजाझ, अनुवाद - सुकुमार शिदोरे



ते दहाजण होते.

बिहारच्या मधुबनीपासून पायी प्रवास सुरू करून निदान चार दिवस लोटले होते. ते सुमारे दोनशे किलोमीटर चालत येऊन पोहोचले होते एका छोट्या स्टेशनच्या पाणपोईवर. त्यांनी आपापल्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतलं आणि सगळे प्लॅटफॉर्मवर बसले. जरा दम खाल्ला आणि सोबत आणलेली ग्लुकोज बिस्किटं खात ते पाणी पिऊ लागले.

थकलेले भागलेले ते कष्टकरी एकमेकांच्या तोंडांकडे पाहत होते.

शंकर बोलला, “ना बस सुरू आहे ना ट्रेन. साला, दुसरा लॉकडाउनही आज खतम झाला.”

राजेश म्हणाला, “मजुरी करणं म्हणजे किती कमनशिबी आहे! आपण हरएक जण महिन्याला बारा-पंधरा हजार रुपये कमावतो, पण शिल्लक काय राहतं?”

सुलेमान मानेला झटका देत म्हणाला, “लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी आपण काही ना काही करून बरद्वानला परत गेलो असतो तर चांगलं झालं असतं.”

तोच भौमिक जोरात शिंकला, तसा एक साथी म्हणाला, “अरे, मास्क नाही तर तोंडावर रुमाल बांधून घे.”

भौमिकने दोस्ताच्या आज्ञेचं पालन केलं- तोंडावर रुमाल चढवला.

सोमेन डोक्यावर हात ठेवून आखडून बसला होता. सगळे विचारात बुडून गेले होते. शान अलीने बोटांच्या हालचालींनी हिशेब करत म्हटलं, “शंकरदा, लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला म्हणालो होतो, की काही तरी करून आत्ताच्या आत्ता निघू या- वेळ न दवडता. तेव्हा आपल्याजवळ सगळ्यांचे धरून तीस हजार रुपये होते- तीस हजार! आणि आज शिल्लक राहिले आहेत एकशे पंचाहत्तर! एक पैसा जादा नाही. बरद्वान अजून साडेतीनशे किलोमीटर दूर आहे. तिथे आपण काही आज-उद्या पोचणार नाही आहोत.”

बातचीत होत असताना शंकरची नजर एका रेल्वे पोलिसावर गेली. तो एका तळहातावर दुसर्‍या हाताने खैनी रगडत त्यांच्याचकडे येत होता. तोंडावर मास्क लावलेला होता. तो नजीक आला तसा शान अली म्हणाला, “साहेब, खैनी जरा जास्तीची असली तर दोन चिमूट आम्हालाही द्या ना.”

पोलिसांनी मास्क खाली सरकवून खैनी आपल्या खालच्या ओठाच्या आत टाकली. मास्क पुन्हा वर चढवून त्याने पँटच्या खिशातून प्लॅस्टिकची डबी काढली आणि शान अलीला हात पुढे करायला खुणेने सांगितलं. “एकदम दुरून घ्या.” शानच्या तळहातावर खैनी आणि चुना जराजरासा झटकून पोलिस म्हणाला, “तुम्ही खैनी तर मागून घेतली- पण कोरोनाकाळात कोणी कोणाला दिलेलं- घेतलेलं खाता कामा नये.”

“अरे बाबूसाहेब” शंकरने जबाब दिला, “आता आम्हाला कशाचीही भीती नाहीय. आम्ही मरणाच्या वाटेनेच निघालो आहोत.”

“आं! काय झालं?”

त्या सगळ्यांनी शिपायाला आपली दुःखद कथा सांगितली. त्याने दूर उभं राहून त्यांची कहाणी सहानुभूतिपूर्वक ऐकली आणि म्हटलं, “हं, तर तुम्हाला बंगालमध्ये जायचं आहे. कुठे जायचं आहे म्हणालात- बरद्वान? सगळे मजूर आहात- एकाच भागातले. जवळपास राहणारे आहात. तर मग असं करा - आणखी पंधरा मिनिटांनी दरभंगाहून एक मालगाडी येईल आणि इथे थांबेल. एखाद्या खुल्या डब्यात चढा. पुढे राणीगंज किंवा बरद्वानलाच ती थांबेल. तिथे उतरा. बास , हाच एक मार्ग होऊ शकतो. तसं सध्या विचारणारं कोणीही नाही.”

वाताहत झालेल्या त्या दहाजणांच्या डोळ्यांत आशेचे किरण चमकले.

पोलिसवाला पुढे निघून गेला. मालगाडी आली आणि ते सगळे एका खुल्या छपराच्या रिकाम्या डब्यात चढले. 

काही मिनिटांनंतर गाडी रुळांवरून वेगाने धावू लागली. त्या नादाच्या ठेक्यावर त्यांनी हिंदी-बंगाली गाणी म्हणणं सुरू केलं-

“हम होंगे कामयाब / हम होंगे कामयाब / हाँ पूरा है विश्वास / पूरा है विश्वास / हम होंगे कामयाब एक दिन...”

अचानक राजेश बोलला, “अरे, हे काय- मला काही कळत नाहीय. ही ट्रेन कुठे चालली आहे पाहिलं का शंकरदा?”

सगळेच एकदम चकित झाले. शंकर आणि शान एकाच वेळी उद्गारले, “राजेशचं म्हणणं बरोबर आहे. ही गाडी पुढे नाही, मागे चालली आहे.”

शानने आपला मोबाइल फोन काढून वेळ पाहिली. तीनशे साठ किलोमीटरच्या प्रवासासाठी डायरेक्ट ट्रेनला सहा तासांहून जास्त वेळ तर लागायला नको. ट्रेन सकाळी आठ वाजता निघाली होती. आत्ता दुपारचे चार वाजले होते. त्या अतिशहाण्या खैनीबहाद्दराने आपल्याला या कोणत्या गाडीत बसवलं? आणि गाडी वाटेत कुठे थांबलीदेखील नाही.

“आपल्यापैकी कोणीच कसं डब्याबाहेर चौकसपणे पाहिलं नाही? कोणालाच काहीच कसं कळलं नाही की आपण कुठून कुठून जातो आहोत?” एक साथी विचारता झाला. तो खिन्न होता- साहजिकच.

संध्याकाळी सहा वाजता गाडी एका स्टेशनवर थांबली. ते उतरले तसं त्यांना जाणवलं की ते नेपाळच्या सीमेजवळील रक्सोल स्टेशनवर उभे होते. त्यांच्यातला प्रत्येकजण नोहाकालीन तुफानानंतर नावेत परत आलेल्या पक्ष्यांसारखं माना वळवून वळवून अचंबितपणे त्या लंब्याचौड्या पण सुनसान प्लॅटफॉर्मकडे पाहत होता.

त्यांनी आपापल्या थैल्यांमधून बिस्किटं आणि चिवडा काढला, प्लॅटफॉर्मवर पाणी शोधलं आणि मुकाट्याने एकमेकांच्या चेहर्‍यांकडे पाहत ते खाद्यपदार्थ घशात उतरवू लागले. त्यांना पाहणारं प्लॅटफॉर्मवर कोणीही नव्हतं. बाका प्रसंग आहे हे ओळखून त्यांनी प्लग पॉइंटवर आपले फोन चार्ज करून घेतले. सारं स्टेशन झोपलेलं होतं.

शानजवळ नवा स्मार्ट फोन होता. त्याला समजलं, की आपण आपल्या गावापासून ६५० किलोमीटर दूर आहोत. रक्सोलहून कोणतीही मालगाडी कुठेही जाणार नव्हती!

सूर्यास्त होता होता ते प्लॅटफॉर्मवर इतस्ततः विखुरलेल्या अवजड सामानांच्या अधेमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत मिळेल त्या जागी झोपले.

सकाळी भल्या पहाटे त्यांनी तोंडावर मास्क लावले आणि- आणि रेल्वे रुळांच्या साथीने चालायला सुरुवात केली. 

ते दाहीच्या दाही विस्थापित तरूण होते. वयाने तीस-बत्तिशीचे. विस्थापित या शब्दाचा अर्थ काटेकोरपणे पाहता खरं म्हणजे ते तसे नव्हते. आपल्याच देशात कोणी विस्थापित किंवा निर्वासित होऊ शकतो का? बिहारमधील मधुबनीनजीकच्या एका गावाच्या पाटबंधारे प्रकल्पातील कंत्राटी काम करायला ते आले होते. हे गाव वेगाने प्रगती करत होतं. २५ मार्चच्या पहिल्या लॉकडाऊनसह मात्र अकस्मातपणे त्यांच्या ट्रॅजडीला सुरुवात झाली.

आता रेल्वे रुळांचं जाळं हीच त्यांची भाग्यरेखा बनली होती. कमरेवर आपापली वजनदार बॅग लादून ते केवळ बुद्धी आणि अनुमान यांच्या बळावर बंगालकडे चालत निघाले होते. रुळांची दिशा सोडून चालणं त्यांना परवडणारं नव्हतं. वाट चुकण्याचा धोका होता. कोणाचं लक्ष जाऊन पकडले जाण्याची धास्ती तर होतीच. तसं होताच त्यांना क्वारंटाइनमध्ये पाठवलं गेलं असतं. असं दोन दिवस चालणं झालं आणि त्यांना अचानक पावसाने गाठलं. दाट वृक्षांखाली आडोसा घेणं त्यांना भाग पडलं. बॅगांमधले प्लास्टिक शीट किंवा छत्र्या बाहेर काढून पावसापासून बचाव करण्याचा ते प्रयत्न करू लागले. सुदैवाने अर्ध्या तासात पाऊस थांबला.

उलट्या दिशेला आल्यामुळे त्यांचं मार्गक्रमण आणखी लांब आणि जीवघेणं झालं होतं. त्यात दहाजणांपैकी चौघांना जरासा ताप आला होता. तरीही ते चालत राहिले होते. दिवसभरात ते कुठेही थांबायचे नाहीत. रात्री ते कोणत्या ना कोणत्या सुनसान स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मुक्काम करायचे. उठून प्रातर्विधी आटोपायचे. पाण्यासह बिस्किटं, चुरमुरे, चिवडा- जे ज्याच्याजवळ असेल ते तो खाऊन घ्यायचा. शक्य असलं तर मोबाइल चार्जिंग करून घ्यायचं आणि दिवस फटफटायला लागताच आगेकूच करायची.

कुठे आसर्‍यासाठी एखाद्या वस्तीच्या किंवा कसब्याच्या सीमेवर मुक्काम करण्याचा प्रयत्न केला तरी लोक त्यांना हिडीसफिडीस करायचे- हाकलून द्यायचे. एका ढाबेवाल्याला काही वेळ राहू द्यायची विनंती केली, तर तिथून त्यांना दगड मारून पळवून लावलं गेलं. कोणी तरी म्हणालं, “कशावरून तुम्ही कोरोनाचे रोगी नाही! निघा इथून- नाही तर आम्ही तुम्हा सर्वांना पोलिसांच्या ताब्यात देऊ.”

ते युवा कष्टकरी आपल्या घरच्यांशी फोनवर बोलले. त्यांनी घरच्यांना हालहवाल सांगितला, तसे ते लोक फार काळजीत पडले आणि घाबरून गेले. पण एवढ्या दुरून कोणीही त्यांना मदत करू शकत नव्हतं. आणि कोणत्याही खात्याला कोणीही खबर दिल्यास त्यांचं संकट आणखी वाढू शकलं असतं. त्यांना कुठेही पकडून क्वारंटाइनमध्ये पाठवलं जाऊ शकत होतं. तर्‍हेतर्‍हेच्या विचारांनी ते चिंताग्रस्त होते. हे वास्तव झेलावं लागेल, असा विचार डोक्यात ठेवून ते मधुबनीतून आपल्या बंगालमधील घराकडे जायला निघाले नव्हते.

रुळांच्या सोबतीने चालत असताना जी लहान-मोठी स्टेशनं लागत होती त्यांची नावं त्यांना परिचित नव्हती. दिवसा पावलांसमोरच्या रुळांवर नजर पडली की ते उन्हाच्या तेजाने उजळून निघालेले दिसायचे. त्यांचे जोडे आणि चपलांवर धूळ साचली होती. कोणाच्या जोड्याच्या तळाला भोक पडलं, तर कोणाच्या पायांना सूज आली. कोणी थांबत थांबत आणि जोडे हातात घेऊन चालत होत. खडकाळ वाटेने चालण्याची त्यांना धास्ती वाटू लागली.

शानने पुढच्या स्टेशनवर आपल्या मोबाइलवर गुगलच्या मदतीने ठिकाण आणि रस्ता यांची माहिती मिळवली. स्टेशन जरा मोठं होतं. प्लॅटफॉर्मवर रेल्वे पोलिसांची एक रूम होती. शंकर आणि शान तिथे गेले. एक ऑफिसर खुर्चीवर बसून पेंगत होता. या दोघांची चाहूल लागल्याने तो जागा झाला. दोघांनी बिचकत बिचकत आपल्या हालअपेष्टा सांगितल्या. ऑफिसर सौम्य प्रवृत्तीचा दिसून आला. या दोघांनी नाकातोंडावर मोठे रुमाल बांधले होते. त्यांनी ऑफिसरकडे विनंती केली, की साहेब, आपली परवानगी असेल तर आम्ही स्टेशनवर रात्र काढू शकतो का? ऑफिसरने एक मिनिट विचार केला आणि मग हाताने खुणा करत तो म्हणाला, “तुम्ही असं करा- माझ्या ऑफिसच्या मागे एक हॉल आहे तिथे जाऊन पडा. पण दूर दूर बसा व दूर दूर झोपा. तुम्हाला माहिती आहे ना?...” त्याने तंबी दिली.

“माहीत आहे.” शंकर म्हणाला.

शान दोन्ही हात जोडून व डोळ्यांत पाणी आणत म्हणाला, “साहेब, कैक दिवस जेवलेलो नाही. बिस्किटं आणि पाण्याशिवाय काही खाल्लेलं नाही. साहेब, आपल्या मेहरबानीने एक वेळचं जेवण मिळालं तर... काहीही असो हलकंसं... आमचे पाय आता चालायला नाही म्हणताहेत. घरी पोचता पोचता प्राणच जाईल की काय असं वाटतं. पण आपण विश्वास ठेवा, आम्ही सकाळीच इथून निघू.”

ऑफिसरला जाणवलं, की त्यांच्या डोळ्यांमध्ये भूक आक्रन्दत होती. तो म्हणाला, “त्या हॉलच्या बाजूला शंभर पावलांवर तुम्हाला एक तलाव दिसेल. त्याला लागूनच एक मक्याचं शेत आहे. सध्या खूप चांगली कणसं आली आहेत त्यात. तलावाच्या दुसर्‍या बाजूला एक पेरूचं झाड आहे. काही कणसं आणि पेरू तिथून तोडून आणा. तुमची पोटं भरतील. याहून जास्त सध्या तरी काही नाही.”

पण लगेच ऑफिसरने त्याच्या टेबलावरच्या मोठ्या थर्मासकडे खूण करत म्हटलं, “आणि एका तासानंतर या. तुम्हाला चहा आणि खायला काही तरी हलकंसं मिळून जाईल. आणि हे पहा, हॉलच्या जवळच न्हाणीघर आहे. वाटलं तर पाळीपाळीने तुम्ही तिथे अंघोळ करू शकता.” ऑफिसर स्वतः उठला आणि त्या दहाजणांना मागील मोठ्या रिकाम्या हॉलपर्यंत पोचवून आला. तिथूनच दुरून त्याने हाताची खूण करून सांगितलं, “ते आहे मक्याचं शेत आणि ते पहा पेरूचं झाड. शेत माझ्या नातेवाइकाचंच आहे.”

सगळ्यांनी आळीपाळीने अंघोळी सुरू केल्या. दरम्यान पाल आणि दास यांनी शेतातून बरीचशी कणसं तसेच पेरूही तोडून आणले.

अंघोळी उरकल्यावर ते सर्वजण हॉलमध्ये बसून ऑफिसातून कागदी कपांमधून पाठवलेल्या चहाचा आणि डबलरोटीच्या तुकड्यांचा आस्वाद घेत होते. शान अली बोलला, “आपल्याला देवदूतच भेटला! या ऑफिसरसाठी आपण दुवा करायला पाहिजे.”

काही वेळानंतर ऑफिसरच्या रूममधील टीव्हीवरून बातम्या सुरू झाल्या... सरकारने कर्नाटकात अडकलेल्या विस्थापित कष्टकर्‍यांना बस आणि ट्रेन्सनी त्यांच्या घरी परतण्याची परवानगी दिली आहे. रेल्वे आणि बसच्या स्टेशनांवर हजारो अधीर प्रवाशांची भाऊगर्दी उसळल्यामुळे प्रशासनापुढे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लोक मर्यादित संख्येनेच प्रवास करू शकतील. बहुतांश प्रवाशांजवळ जेवणखाणासाठीसुद्धा पैसे नाहीत, आणि तरीही त्यांच्याकडून डबल भाडं मागितलं जात आहे. सर्वत्र धावपळ सुरू आहे. हरेक भुकेला विस्थापित घरी परतण्यासाठी व्याकूळ आहे. पण अनेक राज्य सरकारं कोरोनाप्रतिबंधक उपायांचा भाग म्हणून परतणार्‍या विस्थापितांना आपल्या राज्यात घ्यायला तयार नाहीत. लोक मोफत प्रवासाच्या सुविधेची मागणी करत आहेत.

बातम्यांचं प्रक्षेपण बंद झालं तसा राजेश खालच्या स्वरात म्हणाला, “परदेशांत अडकलेल्या भारतीयांना सरकार विमानांनी परत आणणार आहे आणि असहाय्य गरिबांना अशी वागणूक दिली जात आहे. शंकरदा, आपण चांगलेच अडकलो आहोत. घरी केव्हा आणि कसे पोचणार आहोत? पोचणार की नाही? कधी कधी भीती वाटते, की आपल्यापैकी कोणाला कोरोना...”

“नाही!” शंकर किंचाळला.

“पोचावं लागेल. आपण घरी पोचणारच.” भौमिक आश्वासक सुरात म्हणाला. तिसरा साथी नरमपणे म्हणाला, “का नाही पोचणार? ईद येते आहे. ईदच्या चाँदला शान अलीची शादी होणार आहे ना!”

“अबे चूप! उल्लू का पठ्ठा!” शान अली संतापाने म्हणाला. “साला माझी शादी करवणार- थाळ्या वाजवणार की टाळ्या वाजवणार? का माझ्या पुठ्ठ्यावर मेणबत्ती पेटवणार? अबे, शादी तर पालचीही होणार आहे.”

“हो, शादी त्याचीही व्हायची आहे, पण त्याला अजून तीन महिने आहेत.” शंकर म्हणाला. “पालच्या शादीत आपण लोक नमस्ते ट्रम्प करू. हा बेटा दिसतोही साहेबासारखा. एकदम गोरापान! त्याच्यासाठी नमस्ते ट्रम्पच ठीक राहील.”

राजेश त्यांचं बोलणं मध्ये तोडत म्हणाला, “बंधूंनो, कालचा दिवस आणि कालची रात्र खूप त्रासात गेली. आज पोलिसबाबूच्या मेहरबानीने पोटात दाणा पडला असं म्हटलं पाहिजे. असो. आता भल्या पहाटे पुन्हा रेल्वे रूळ पकडून गावाकडे जायचं आहे.”

ते सर्वजण डोळे मिटून पहुडले.

राजेश आढ्याकडे पाहत पडल्या पडल्याच म्हणाला : “सुलेमान, काल रात्री तू झोपेत काय बडबडत होतास रे? पहिल्यांदा भुतासारखे आवाज काढलेस आणि मग जोरात हसलास आणि दोन्ही हातांनी टाळी वाजवलीस आणि मग कुशीवर वळून झोपून गेलास.”

“हां, ते म्हणतोस? रात्री एक अजब स्वप्न पडलं.”

“वा, उपाशी पोटीसुद्धा तू स्वप्नं पाहतोस? काय, पाहिलंस काय?”

“पाहिलं की समस्तीपूर एक्सप्रेस वॉशिंग्टनला पोहोचली.”

“आं! आणि मग?”

“मग अनेक मैल लंबंचौडं एक कब्रस्तान दिसलं. वर लखलखतं आकाश आणि खाली हजारो नव्याने वसलेल्या ताज्या कबरी. दोन कबरी अजून रिकाम्या होत्या आणि दोन्हींच्या मध्ये एक लाकडाचा रिकामा ताबूत ठेवलेला होता. निळा सूट आणि टायवाला एक गोरा तंदुरुस्त माणूस उभं राहून माझं स्वागत करत होता. मी विचारलं, “तू कोण आहेस भाई?” म्हणाला, “मी इथला कबर खोदणारा आहे.” मी म्हटलं, “तू थट्टा करतो आहेस. तुझा चेहरा तर ट्रम्पसारखा वाटतो आहे.” तो म्हणाला, “बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. एक ताबूत शिल्लक आहे. तुला हवं असेल तर लवकर त्यात आडवा हो. नंतर कबर मिळणार नाही.” मी म्हटलं, “मी इथे कोरोना व्हायरसच्या लशीच्या शोधात आलो आहे आणि तू मला कबरीत जिवंत आडवा व्हायला सांगतो आहेस? तू आम्हाला आता ना व्हिसा देत ना लस देत. आम्ही तुला ताजमहाल आणि अहमदाबादची सहल करवली. तू आमच्याकडून परत गेलास तेव्हापासून आमच्याकडे व्हायरस पसरला.”

राजेश सुलेमानच्या स्वप्नाचं वर्णन आवडीने ऐकत होता. त्याने विचारलं, “मग, पुढे?”

“मग तो जो कोणी होता त्याने माझा हात पकडला आणि म्हटलं, “व्हिसाशिवाय आलेला आहेस. वायफळ बाता नको मारूस. असाच कबरीत उतर. तू जिवंत असतानाच मी कुदळीने तुझ्यावर माती टाकणार आहे. इथले दुसरे खोदणारे स्वतःच व्हायरसने मरून गेले आहेत.” मी पाहिलं, की त्या माणसाने खूप आदरातिथ्य दाखवत मला दफन करून टाकलं आणि चार सफेद अमेरिकी गुलाबांनी माझी कबर सुशोभित केली. बस, त्यानंतर मग माझे डोळे उघडले. त्याच वेळी मी टाळी वाजवली असावी.”

शंकर उठून बसला व म्हणाला, “ए दास, दोन थपडा लगाव त्याला. हा नालायक अमेरिकेत गेला आणि दफन होऊन रिकाम्या हातांनी परत आला. लस नाही आणली तर निदान कबरीवरचे चार गुलाब तरी आणले असते!”

शान अली सुलेमानला म्हणाला, “आज रात्री सूरा फातिहा, चारही कुल, आयत-उल कुर्सी आणि दरदद शरीफ पढून झोपी जा आणि पुन्हा स्वप्नात अमेरिकेला जायची चूक करू नकोस. पुढच्या वेळी चीनला जा आणि चीनच्या अध्यक्षाकडून लस घेऊन परत ये. सांग त्याला, तुम्हीने दर्द दिया है, तुम्ही दवा देना. पण सावध राहा- त्याने स्वप्नात तुला काही खायला दिलं तर अजिबात खाऊ नकोस. सांगून टाक त्याला, की माझा तुमच्याकडे मरण्याचा बिलकूल इरादा नाही.”

सगळे जोरजोरात हसले.

सुलेमान एकाएकी गंभीर झाला. खालच्या स्वरात म्हणाला, “यार, चेष्टा का करता आहात? आपणा गरिबांजवळ स्वप्नंच तर आहेत- जी आपल्याला मुक्कामापर्यंत घेऊन जात आहेत. खुदा करो आणि मनुष्याच्या स्वप्नांना कोरोनाची बाधा ना होवो.”

“सुलेमान बरोबर सांगतो आहे.” भौमिक बोलला, “आपल्या दहाजणांपैकी तीन मजूर जवळपास ग्रॅज्युएट आहेत. या सुलेमानने तर एम.ए. केलं आहे.”

गप्पा मारता मारता त्यांचा डोळा लागला.

रात्री सुमारे दोन वाजता दासचं कण्हणं ऐकू आल्याने शंकर जागा झाला. “काय झालं दास?”

“माझी स्लिपर काल पेरूच्या झाडावर एका फांदीत अडकली होती. पायावर मोठा ओरखडा आला-रक्त आलं.”

“आग होते आहे?”

“हो- खूप दुखतं आहे.”

“ठीक. जरा थांब.”

शंकरने लँपपोस्टच्या खाली जाऊन आपल्या बॅगेतून एक सुती कापड काढलं. त्यातून मोठा तुकडा फाडून तो आपल्या सिगरेट लायटरने जाळला. त्याची राख दासच्या जखमेवर ठेवून त्याने एक पट्टी बांधली आणि औषधाची एक गोळी दासला पाण्याबरोबर घ्यायला सांगितली. आणि मग ते झोपी गेले.

सकाळी चार वाजल्यानंतर त्यांचा तांडा धुरळा उडवत पुढे रवाना झाला.

“जखम कशी आहे?” शंकरने दासला विचारलं.

“जरा बरी आहे.”

चौथ्या रात्री ते कोणत्या तरी स्टेशनच्या निःस्तब्ध प्लॅटफॉर्मवर बसून पेरू आणि बिस्किटं खात होते.

“माझ्याजवळ एक मोठं कणीस शिल्लक आहे. मी तर ते खाणार- ताजं आणि गोड.” पालने आपलं शेवटचं कणीस चावायला सुरुवात केली.

सोमेन म्हणाला, “पाल, तू तुझ्या होणार्‍या बायकोचा फोटो मोबाइल वॉलपेपरला लावला आहेस. तिचे केस तुझ्या कणसाच्या केसांसारखेच सोनेरी आहेत.”

“तर मग काय?” पाल

“तर असं, की हे तुझं शेवटचं कणीस आहे. घरी पोहोचेपर्यंत त्याचे केस तुझ्या बॅगमध्ये सांभाळून ठेव.”

“तुझं काय म्हणणं आहे? पहिल्या रात्री पालने आपल्या नव्या नवरीला गिफ्ट म्हणून कणसाचे केस द्यावेत?”

ते बोलणं तसंच राहिलं. तेवढ्यात-

“अरे, हे पहा, हे पहा...” सोमेन मोबाइलवर ताज्या बातम्या ऐकत असताना उद्गारला. कोरोनाशी लढणार्‍या डॉक्टरांच्या आणि शिवाय तिन्ही सैन्यदलांच्या सन्मानार्थ केरळ, मद्रास आणि इतर किनार्‍यांवर जहाजांना रात्री दिवे लावून नव्या नवरीसारखं सजवलं आहे. न्यूजरीडर किती शानदार देखावे दाखवते आहे! रंगीत दिव्यांच्या माळांनी सारा परिसर किती सुरेखपणे सजवला आहे! दुपारी आकाशात हवाई दलाची विमानं किती शानदार उड्डाणं करत होती तेही पाहून घ्या. २६ जानेवारीच्या देखाव्यांपेक्षा जास्त खूबसूरत ही दृश्यं आहेत. देशातली मोठी मोठी सरकारी हॉस्पिटल्स आणि एम्सवरती हेलिकॉप्टर्सनी फुलांच्या पाकळ्यांची बरसात केली जात आहे. त्याद्वारे कोरोनाशी लढणारे डॉक्टर, नर्सेस व पोलिसांच्या सेवेला काय जबरदस्त आदरांजली दिली जात आहे! देशातल्या लोकांना हे देखावे पाहून नक्कीच खूप अभिमान वाटत असेल.”

“वा! असं तर जगात कुठेच झालं नसेल.” सुबोध म्हणाला. “हे खूपच मोठं काम आहे. हे फक्त आपणच करू शकतो. कदाचित ज्या हॉस्पिटलवाल्यांचा दोन-दोन, तीन-तीन महिन्यांचा पगार झालेला नाही तो आता त्यांना मिळून जाईल.”

“सुबोध, अरे तू तर एरवी मुक्यासारखा असतोस. आज तू तुझ्या तोंडाचं लॉकडाऊन तोडलंस?” शंकर न राहवून म्हणाला, “सुबोध, तू चांगलं गाणंही म्हणतोस असं ऐकलं आहे. चल, ऐकव ना एक गाणं.”

यावर सगळे साथी हो हो म्हणत आग्रह करू लागले, तेव्हा सुबोधने घसा साफ केला आणि जरा संकोचत गाणं सुरू केलं- “मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरेमोती, मेरे देश की धरती...”

गाणं संपताच खूप टाळ्या वाजल्या. शान अली म्हणाला, “अरे वाह रे मनोजकुमार- आत्तापर्यंत कुठे लपून बसला होतास?”

“शान अली, आता तू एक गाणं ऐकव. तू तर खूप चांगलं गातोस.” आलमगीर बोलला.

“ठीक आहे. पण ऐक.” शान अली म्हणाला, “आधी तू एक काम कर. तो लाकडाचा फट्टा पडलेला आहे ना, तो उचलून घे आणि त्याच्यावर चालत्या गाडीसारखा ताल दे. गट गठा, गट गठा... हां वाजव- हां वाजव.

घरकी बत्ती बुझा

मोमबत्ती जला

थालियाँ खडखडा

और ताली बजा

घरमें खानेको चाहे तेरे कुछ ना हो

फिर भी लोगोंको भरपेट खाना खिला

लॉकडाउनके कानून को तोडकर

जमघटा मत लगा

कोरोना व्हायरससे मुक्ति दिला- मुक्ती दिला.....”

टाळ्या वाजल्या पण शान अलीचं गीत संपलेलं नव्हतं. तेव्हढ्यात त्याचा फोन वाजला.

“हॅलो, शान अली?”

“हो...” मी शान अली.

“हॅलो... आम्ही कोलकत्याच्या एका इंग्रजी वर्तमानपत्रातून बोलतो आहोत. तुमच्या नातेवाइकांनी बरद्वानहून आम्हाला फोन करून कळवलं आहे, की तुम्ही तुमच्या अनेक साथीदारांसह बिहारहून आठ दिवसांपूर्वीच बरद्वानला येण्यासाठी पायी चालत निघाला होतात, पण अजून घरी पोहोचला नाहीत. तेव्हा आम्हाला सांगा, की तुम्ही आणि तुमचे साथीदार कोठे आहात? आणि तुम्ही कसे आहात?”

“आम्ही सगळे ठीकठाक आहोत आणि एकमेकांच्या सोबत आहोत. कुठे आहोत हे आम्हाला माहीत नाही आणि पुढच्या एक तासात कुठे असू हेही सांगता येणं शक्य नाही. हो- पण घरापासून आता फार दूर नाही आहोत. दोनशे किलोमीटरवर असू. आम्हाला आशा आहे की चार-पाच दिवसांत आम्ही घरी पोहोचू.”

“हॅलो, तुमच्या घरातल्या कुणीही तुमच्याबद्दल काहीच सांगितलेलं नाही, पण तुमच्या एका चुलत भावाने चार दिवसांपूर्वी तुमच्याविषयी पोलिसांना सांगितलं आहे. पोलिसांना काहीही खबर काढता आलेली नाही. सध्या एका राज्यातनं दुसर्‍या राज्यात जायला परवानगी नाही. म्हणून कोणत्याही खात्याला अशा केसची दखल घेण्याची परवानगी नव्हती. पण काल एका नव्या नियमानुसार विस्थापितांना आपल्या स्वगृही परत जाण्याची परवानगी मिळाली आहे. तुम्ही आमचा नंबर सेव्ह करून ठेवा. काही गरज लागली तर केव्हाही या नंबरवर फोन करू शकता. माझं नाव प्रकाश आहे.”

शान अलीने प्रकाशचे आभार मानले आणि विनंती केली, की “या दहाजणांच्या गटाविषयी तुम्ही कोणालाही काहीही सांगू नये. आम्हाला काहीही अडचण असली, तरी आमची अशी बिलकूल इच्छा नाही की त्याबद्दल कुणालातरी सांगून एखाद्या मोठ्या संकटात सापडावं. गरज वाटलास आम्ही स्वतःच तुम्हाला फोन करू.”

सकाळची वेळ होती. प्रवास सुरू करून एक तास झाला असावा. दोन्ही बाजूंना लहान-मोठे तलाव, उंच सुरेख टेकड्या व अधूनमधून कुरणं दिसत होती. समोर दूरवर कुठे कुठे सफेद धुकं वाफेसारखं दिसत होतं. मनाला लुभावणार्‍या अशा दृश्यांमुळे काही वेळ त्यांचा थकवा दूर झाला. तेवढ्यात अलार्मच्या आवाजासह डाव्या-उजव्या दिशांकडचं पादचार्‍यांसाठी असलेलं एक लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यात आलं. वर दिसणारा हिरवा सिग्नल पाहून ते सर्व दचकले. एक किलोमीटर अंतरावर एक वेगाने येणारी मालगाडी दृष्टीस पडली. काही तांत्रिक कारणांनी तिथला रेल्वे मार्गाचा सिंगल ट्रॅकच सुरू होता. उजवीकडे मोठा खड्डा खोदलेला होता. त्या सर्वांनी गोंधळून जाऊन त्या खड्ड्यात उड्या मारल्या.

लांबलचक गाडी धुरळा उडवत पुढे निघून गेली. ते सगळे युवा मजूर श्वास रोखून खोल खड्ड्यात पडून राहिले. शरीरातून झिणझिण्या दौडत गेल्या. ट्रेन निघून गेल्यावर खड्ड्यातून कसेबसे बाहेर येऊन त्यांनी आपल्या पाय आणि कंबर ताणले आणि ते पुढची वाटचाल करू लागले.

दुपारी रूळ गरम झाले होते तेव्हा आणखी एक लेव्हल क्रॉसिंग आलं. त्यापुढे पूल होता. क्रॉसिंगच्या आधी उंचवट्यावर हिरवा झेंडा घेऊन उभा असलेला एक गार्ड त्यांना पाहून जोरात किंचाळला, “अरे, बाजूला व्हा, बाजूला व्हा! तुमच्या मागे हावडा अप गुड्स ट्रेन येते आहे.”

त्यांनी मागे वळून पाहिलं. ट्रेन साधारण पाचशे मीटर दूर होती. त्यांनी चपळाईने एकसाथ उजव्या प्लॅटफॉर्मवर विजेच्या वेगाने उड्या मारत स्वतःला वाचवलं. त्यांची छातीची धडधड अति जलद झाली होती.

पुढे एका नदीवरचा मोडक्या-तोडक्या फळ्यांचा पूल पार करून एका मोठ्याशा गोडाऊनच्या शेडमध्ये त्यांनी स्वतःची शरीरं झोकून दिली. त्यांना प्रचंड थकवा आला होता. सगळेजण अतोनात श्रांत झाले होते. आपापसांत बोलताना म्हणत होते : आज दोनदा जीव वाचला. दिवसाच्या तळपत्या उन्हात सिग्नलचा हिरवा लाइट नीट ओळखतासुद्धा येत नाही. आपला चुकीचा समज होतो. आता यापुढे खरोखरच चालवत नाही. खायचंही काही शिल्लक राहिलं नाही. आता जरा अंधार होईल तेव्हा झाडांवरनं केळी, पेरू- काही तरी तोडता येईल. आता खाऊन-पिऊन इथेच पडून राहावं हे बरं. उद्या पुढे जाऊ. जान है तो जहान है.

संध्याकाळच्या अंधारलेल्या वातावरणात संधी साधून त्यांनी बरेचसे पेरू आणि केळी तोडून आणली. दरम्यान सोमेनने भौमिकच्या निदर्शनास आणलं : पहा, इथे वटवाघळं उडताहेत. काही काळजी करू नकोस. वटवाघळांचीच वेळ आहे. आजकाल तर ती दिवसाही आंधळी होत नाहीत. यांच्याचमुळे तर आपण इथे पोहोचलो आहोत.

दुसर्‍या दिवशी दहाच्या सुमारास त्यांना अंदाज आला, की आता आपली पावलं मेन ट्रॅकवर पडताहेत. ही लाइन दिल्लीहून येऊन इथे मिळाली आहे. आता छोट्या-मोठ्या स्टेशनांची नावं ओळखीची वाटू लागली आहेत. प्रथमच त्यांना थोडेसे आशेचे किरण दिसायला लागले. पायांत काहीशी ताकद आली आहे असं वाटायला लागलं. पण त्यांना अधिक ताज्या दमाने पुढे जाणं आवश्यक होतं. त्यांच्यातल्या काहीजणांचं अवसान पार गळालं होतं.

दहावा दिवस होता. सकाळी उजाडल्यानंतर त्यांना एका नितळ तलावात डुबक्या मारण्याचा मोह झाला. आधी स्वच्छ पाण्यात डोकावून पाहिलं आणि सगळे स्वतःचेच चेहरे पाहून दचकले. सगळ्यांच्या चेहर्‍यावर दाढी आणि भीती दिसून येत होती. सर्वजण आपापलं रूप पाहून हसू लागले. अरे, आपण सगळे म्हातारे झालोत? तलावात डुबक्या मारल्या आणि ते ताजेतवाने झाले. तोडलेले किंवा चोरलेले पेरू आणि केळी उरली होती. ती फळं खाता खाता शान, सुलेमान आणि आलमगीर यांनी आपापसात म्हटलं, आज रमजानचा दुसरा जुम्मा आहे. रमजानमध्ये रोजे पाळता आले नाहीत, पण पुढच्या मुक्कामात आपण जुम्म्याच्या नमाजाचं पठण करू आणि दुवा मागू. आपल्याकरिता, आपल्या साथीदारांकरिता, आपले घरचे आणि तमाम संकटग्रस्तांकरिता.

दुपारनंतर ते एका वैराण स्टेशनच्या शेडमध्ये शुक्रवारचा नमाज पढत होते. त्याच वेळी त्यांचे साथीदार काही अंतरावर एका वृक्षाच्या शांत सावलीत हात जोडून, डोळे मिटून एकाग्रतेने प्रार्थना करण्यात मग्न होते.

सगळं झाल्यावर पाल म्हणाला, “इथली हवा किती छान आहे! पुढे जावंसं वाटत नाही.”

नजीकच्या गुलमोहोराच्या झाडावर खारींनी एकच उच्छाद मांडला होता. त्याच वेळी प्लॅटफॉर्मवरच्या एका चहाच्या बंद स्टॉलच्या आडोशामागून करडा कुर्ता, सफेद धोतर परिधान केलेला आणि पुजार्‍यासारखा दिसणारा एक हट्टाकट्टा माणूस बाहेर आला व त्यांच्याजवळ येऊन पोहोचला. आपले जाडजूड ओठ विस्फारून हसत हसत म्हणाला, “क्या बात है- कुठलीच गाडी येणार नाहीय आत्ता. तुम्ही लोक पायी पायीच कुठे निघाला आहात का? तुम्ही संकटात सापडलेले दिसताहात. तुमचं जेवणही झालं नसावं असं वाटतं आहे. साधेसुधे लोक फारशी चिंता न करता साध्या रोटीच्या मागे जात असतात, तसे तुम्हीही निघाला आहात.”

ते सर्वजण नजरा झुकवून त्या पंडिताच्या समोर गुपचूप उभे राहिले. उकाड्यामुळे पंडिताच्या गंध लावलेल्या कपाळावर आणि कानांजवळ घर्मबिंदू दिसू लागले. त्याने खांद्यावरच्या झोळीतून काही तरी बाहेर काढलं आणि त्या लोकांच्या हाती देत तो म्हणाला, “सातूचे हे सहा पॅकेट्स माझ्यापाशी आहेत, हे घ्या.”

शान आणि शंकर सातूची मोठी मोठी पॅकेट्स हातात धरून एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. दरम्यान तो मनुष्य कसा, कुठे गायब झाला कुणीच पाहिलं नाही.

सर्वजण आश्चर्यचकित झाले होते, की हे काय झालं? हे अकल्पितपणे काय घडलं? तो काय आभाळातून आला का?

पुढील संध्याकाळी असनसोलच्या अलीकडच्या एका छोट्याशा स्टेशनवर ते सगळे बैठक मारून विचार करत होते, की आपण जर परिस्थितीवर सगळं सोडून दिलं असतं तर परतीच्या सरकारी बंदोबस्ताची वाट पाहत आपण आत्ताही बिहारमध्ये अडकलो असतो आणि भुकेने कदाचित मरूनही गेलो असतो.

खैर, उद्या आम्ही लॉकडाऊनचा खुळखुळा वाजवत वाजवत आपापल्या गावी पोहोचू. -इति शंकर. हे किती बरं आहे, नाही का? हेही बरं आहे, की आपल्यापैकी काहींची गावात आपापली शेती आणि थोडी जमीनही आहे. सगळ्यांजवळ सरकारी जॉबकार्डही आहे. गावात रोजगार योजनेवाल्या नोकरीची आशा करायला हरकत नाही.

“कोणत्या कार्डाबद्दल बोलतो आहेस? सरकारच्या वचनांवर जगण्याची आपल्याला सवय झाली आहे. आणि याच गैरसमजात आपण मरून जातो.” सोमेनने शंकरचं बोलणं काटलं.

“ठीक आहे. पण चला, हे ही ठरवू या की आपण घरी कसं पोचायचं आहे.” शान अलीने मुद्दा उपस्थित केला. “आपण सर्वजण एकाच भागात राहणारे आहोत ही अर्थातच चांगली गोष्ट आहे. दहा-बारा किलोमीटरच्या आत-बाहेर सगळ्यांची घरं आहेत. आपण जर स्वास्थ्य विभागाकडे गेलो तर आधी आपल्याला शहरात जावं लागेल, जिथे हेल्थ सेन्टर असेल. ते आपली कशा प्रकारे टेस्ट करतील काहीच माहीत नाही. पैसे तर आता आपल्याजवळ नाहीत असं म्हटलं तरी चालेल. टेस्ट झाल्याशिवाय घरी जाणं कदाचित आपल्या घरच्यांसाठीही योग्य नाही. आपल्यामुळे आपल्या भागात समस्या निर्माण व्हायला नको. त्यांनी आपल्याला गावामध्ये किंवा आपल्या घरच्यांनीच आपल्याला घरात यायला मनाई केली तर? तर काय होईल?”

“त्या पत्रकार प्रकाशला फोन करायचा का?” सोमेनने सुचवलं. प्रकाशला शानने फोन केला. प्रकाशने संबंधित खात्याशी संपर्क साधल्यानंतर त्या दहाजणांना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला गेला.

दुसर्‍या दिवशी ते सगळे त्यांच्या जिल्ह्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचले. पोलिसांची त्रासदायक, वेळखाऊ तपासणी आणि खूपसे तपशील पुरवल्यानंतर हे लोक हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाले. प्राथमिक स्क्रीनिंगच्या पश्चात रीतसर आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली.

हॉस्पिटलचा माहोल आरामशीर नव्हता. सद्य:स्थिती पाहता सरकारने कोविड वॉर्ड तातडीने आणि तात्पुरत्या स्वरूपाचे बनवले होते. सुरुवातीच्या तपासणीसाठी त्यांना एकाच हॉलमध्ये पाच-पाच फूट अंतरावरचे बिछाने देण्यात आले. त्यांचे रक्ताचे आणि स्वॅब वगैरेंचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर रिपोर्टची वाट पाहत असताना ते भयानक धास्तीने पछाडलेले होते. वॉर्डमध्ये आढ्यापासून लांब दांड्यांनी लटकलेले पाच पंखे होते. त्यातला एक मृतवत लटकत होता. दोन पंखे अतिशय सावकाश फिरत होते, तर एक अतिशय जलद फिरत होता. फक्त एका पंख्याची प्रकृती ठीकठाक होती. रात्रीच्या शांततेत चार पंख्यांची हवा जलद फिरणार्‍या पंख्याच्या घरघराटासह वॉर्डमधले दहा रुग्ण आपापसांत समान प्रमाणात वाटून घेत होते. सीधेसाधे लोक राजकारणी लोकांची विवेकशून्य वागणूक सहन करतात तसाच काहीसा हा प्रकार होता.

हॉस्पिटलमधील पाचव्या रात्री दोनच्या सुमारास शंकर आपल्या बिछान्यावर उठून बसला. आलमगीर डोळे मिटून पडला होता. मंद प्रकाशात त्याने शंकरला उठून बसलेलं पाहिलं तसा तोही उठून बसला. “काय झालं शंकरदा?” त्याने हलक्या आवाजात पृच्छा केली.

“झोप नाही येत, आलमगीर. किती दिवस आपण पैदल चाललोय! रेल्वे रुळांप्रमाणे जमीन आणि तिचे प्रकार बदलत राहिले. जंगलांत आणि गावांमध्ये रात्री घालवल्या. प्राण्यांचे आवाज ऐकले. पावसात भिजलो. काजवे चमकताना पहिले. आकाशातल्या चांदण्या मोजल्या. आता मात्र इथे श्वास कोंडतो आहे. तू- तू हा पंख बंद कर. डोक्यावर तो हातोड्याचे घाव घालतो आहे. आणि तुझ्या उशाशी असलेली खिडकी उघडून टाकशील का? जरा आकाशातले तारे नजरेस पडू देत. काजव्यांचं संगीत ऐकायला येऊ दे. नाही तर... जाऊ दे, तुला त्रास होईल.”

“नाही- नाही दादा. त्रास कशाने होईल? जंगलात पंख्याचा वारा कुठे खात होतो आपण?” आलमगीरने पाहिलं- चहूकडे सन्नाटा होता; त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. त्याने खिडकीची दारं हळूच उघडली आणि तो आपल्या बिछान्यावर येऊन बसला.

ताज्या वार्‍याच्या झुळका वॉर्डमध्ये येऊ लागल्या.

“आलमगीर, तू इतका गप्प गप्प का असतोस रे? तुला इतकं सीरियस पाहून तुझ्याशी लगेच कोणी बोलत नाही.”

“दादा, एक गोष्ट सांग. आपण मजूर का पैदा झालोत?” आलमगीरने विचारलं.

“आपलं डोकं-मन-रोटीवर झुकलेलं राहावं म्हणून.”

“रोटीवर नाही, रोटीसाठी” आलमगीर कापर्‍या आवाजात म्हणाला. तो हळवा झाला होता.

“भैया, काय झालं? असा का उखडलायस?”

“शंकरदा, काय सांगू? बरद्वानला परत जाताना खूप चिंतेत आहे. माझ्या आईचा एक गुडघा निकामी झाला आहे. तो बदलावा लागेल. दीड लाखाचा खर्च तर होईलच. बरद्वानला असताना एका मित्राला मी पंचाहत्तर हजार रुपये दिले होते. त्याच्याबरोबर मी व्यापार सुरु करणार होतो. पहिला लॉकडाऊन सुरू झाल्यावर कोरोनाने त्याचा मृत्यू झाल्याची खबर आली. तो मुंबईला गेला होता. तिथेच तो मरण पावला. तेव्हापासून माझं सगळं अवसान गळालं.”

“अरे, हे तर फार वाईट झालं. च्...च्... बरं भैया, तू धीर धर. परिस्थिती सुधारेल. पैसाअडका परत मिळेल. हां, आईकडे लक्ष दे. आमच्याकडनं जे शक्य होईल ते आम्ही करू तुझ्यासाठी. धीर धर.”

शंकर गप्प होऊन पुन्हा बिछान्यावर पहुडला. आलमगीर कूस बदलून खिडकीबाहेर बघू लागला.

प्रातःकालीन तारा त्याला नेत्रसुख देत होता. त्याला भास झाला, की जंगलातले काजवे त्या तार्‍याला लपेटून टीव्हीवर दाखवल्या जाणार्‍या कोरोना व्हायरसचं चेंडूसारखं सुरेख स्वरूप धारण करत आहेत. चंद्र दिसेनासा होण्याआधी आलमगीरला झोपेने गाठलं.

हॉस्पिटलमधला सहावा दिवस होता. सकाळी नऊ वाजता तीन डॉक्टर आणि नर्सेस पी पी किट घालून त्यांच्या वॉर्डमध्ये दाखल झाले. चेहर्‍यांवर मास्क होते त्यामुळे कोणालाही ओळखणं शक्य नव्हतं. अखेर मोठ्या डॉक्टरांनी मास्क खाली करून सांगितलं, “अरे भाई, महत्वाची गोष्ट, तुम्हा सगळ्यांचे रिपोर्ट आले आहेत. तुम्ही सगळे कोरोना निगेटिव्ह आहात. तुमच्यापैकी कोणातही या रोगाची लक्षणं नाहीत. दोन वेळा चेकिंग झालं आहे. तुम्ही आता आपापल्या घरी जाऊ शकता. पण घरात चौदा दिवस इतरांपासून एकदम वेगळं राहावं लागेल. यात कोणतीही चूक होता कामा नये.”

दुपारनंतर ते आपापल्या डिस्चार्ज सर्टिफिकेटसह खाली उतरले. प्रत्येकाच्या घरून त्यांना घ्यायला कोणी तरी आलं होतं.

काउंटरवरच्या रिसेप्शनिस्ट महिलेजवळ त्यांनी चौकशी केली, की प्राइम मिनिस्टर केअर्स फंडमध्ये इथे पैसे जमा करता येतात का आणि कमीत कमी किती रक्कम स्वीकारली जाते? माहिती मिळाली, की फंडासाठी पैसे घेतले जातात, आणि ज्याला जितकी रक्कम द्यायची असेल तितकी तो देऊ शकतो. ऑफिसची रिसीट मिळेल.

शंकर आणि शान अलीने पहिल्यापासूनच एक रक्कम तयार करून ठेवली होती. काउंटरवर बसलेल्या महिलेला एकशे पंचाहत्तर रुपये देताना ते हात जोडून म्हणाले, “दीदी, आम्ही गरीब लोक आठशे किलोमीटर उन्हातान्हात पायी चालत इथे पोहोचलो आहोत. ही रक्कम म्हणजे आम्हा दहा विस्थापित मजुरांच्या पायाची धूळदेखील नाही. ही प्रधानमंत्री रिलीफ फंडासाठी कृपया स्वीकारावी. आपले उपकार होतील. आम्हाला कोरोनाला हरवायचं आहे.”

रिसेप्शनिस्टने त्यांना न्याहाळून पाहिलं. कॉम्प्युटरमधून निघालेली रिसीट त्यांना देताना तिचे डोळे पाणावले. तिने आपला मास्क पापण्यांपर्यंत वर चढवला; पण तोपर्यंत रिसीटवर दोन अश्रू पडले होते.

 

मूळ उर्दू कथा - फे. सीन. एजाझ

अनुवादसुकुमार शिदोरे

९४२२५२६६४८

sukumarshidore@gmail.com

 (फे. सीन. एजाझ यांची ही उर्दू कथा (वह दस)

 ‘माहनामा इन्शा’ च्या मे-जून २०२० च्या 

अंकात प्रकाशित झाली आहे. 

या अनुवादाला संमती दिल्याबद्दल लेखकाचे आभार.)

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८