कोरोना आणि स्पर्शाची भाषा - वंदना कुलकर्णी




आपल्या त्वचेखाली अनेक संवेदी चेतातंतूंची टोकंअसतात. त्यांच्यामार्फत स्पर्शातून निर्माण होणाऱ्या संवेदना मेंदूपर्यंत पोचतात. त्यातून परस्परांमध्ये भावबंध निर्माण होऊन सोबतीमधून मिळणारी भावनिक सुरक्षितता माणसाच्या निवांत-आश्वासक जगण्यासाठी फार महत्वाची ठरते. स्पर्शाच्या आकलनातून माणूस स्वतःला जगण्यातील सर्व पातळ्यांवरच्या स्वसुरक्षेची हमी देऊ शकतो.


आपल्या देशात पहिला लॉकडाऊन सुरू झाला आणि आमच्या योग शिक्षिका अंजूताई यांच्या आईला दवाखान्यात अ‍ॅडमिट करावं लागलं. कोरोनामुळे सगळे भयभीत झालेले. इच्छा असूनही आम्ही कुणीच मदत करण्याचं धाडस दाखवू शकलो नाही. तरी दोन शिलेदार जीवावर उदार होऊन तयार झाले. त्यांना हाताशी घेऊन अंजूताईंनी दहा-बारा दिवस किल्ला लढवला; तोही स्वतःची तब्येत ठीक नसताना. मात्र एक दिवस त्यांचा फोन आला, “वंदनाआई गेली गं!” त्यांच्या आवाजातला कंपवेदनारितेपणा मला त्या एका वाक्यातही स्पष्ट जाणवला. चार महिन्यांपूर्वीच त्यांचे वडील गेले होते आणि दोन महिन्यांपूर्वी त्यांचे योगगुरू! अतिशय संवेदनशीलहळव्याऋजू स्वभावाच्या अंजूताई आतून अगदी तुटल्या होत्या.

फोनवर काय बोलावं मला सुचेना. अशावेळी मला स्पर्शाची भाषा खूप जवळची वाटते. वाटलं, त्यांना भेटावं, त्यांचा हात हातात घ्यावा, त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांच सांत्वन करावं. पण कोरोनाचे नियम या सगळ्याच्या आड आले. फोनवरून बोलणं, समजावणं खूप उपरं, दूरस्थ वाटलं. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यातल्या मर्यादा जाणवत राहिल्या. त्या बोलत होत्या, तरी खर्‍या अर्थाने त्यांच मन मोकळं होतंय असं वाटेना... मनात आलं स्पर्शाचं महत्त्व उमगायला कोरोनासारखा विषाणू अवतरावा लागावा?

आपल्या भारतीय समाजात स्पर्श या गोष्टीकडे नकारात्मक भावनेनेच पाहिलं गेलं आहे. बाहेरच्या अनेक देशांत हस्तांदोलन, आलिंगन, कपाळावरती चुंबन अशा अभिवादनाच्या, परस्परभेटीचा आनंद व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यामध्ये कमालीची सहजता आहे. तिथे समोरची व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हा विचारही मनात नसतो. एका माणसाने दुसर्‍या माणसाजवळ केलेली आपल्या भावनेची अभिव्यक्ती एवढंच अभिप्रेत असतं. तिकडे मुलं हे बघतच मोठी होत असल्याने त्यात त्यांना काही वावगं वाटत नाही.

भारतातही मूल जन्माला आलं की स्पर्शाने किती श्रीमंत होत वाढतं! तान्ह्या बाळाची साधी आंघोळच बघा ना. इतका कोवळा जीव, पण तेलाचा मसाज किती छान करून घेतो. त्यावर बाळगुटी, आंघोळ घालताना हळद-वेखंड...त्या हाताच्या स्पर्शाला अगदी सुगंधी करून टाकतात. अंघोळीनंतर बाळाची मुलायम कांती किती तुकतुकीत दिसते आणि त्याच्या जावळाचाही प्राजक्ताच्या फुलांसारखा मऊ मुलायम स्पर्श! कितीतरी वर्षं एकत्र कुटुंबात वाढणारी मुलं घरातील किती जणांचा स्पर्श अनुभवत असतात- अगदी मोठ्या भावंडांच्या उत्सुक, प्रेमळ तर कधीकधी बालसुलभ हेव्याच्या स्पर्शापासून, आजी पणजीच्या मऊ हातांच्या अनुभवी स्पर्शापर्यंत! आईचा मायेने ओथंबलेला प्रेमभरला स्पर्श, तर बाबांच्या खरखरीत हातांचा पितृछाया धरणारा आश्वासक स्पर्श. अगदी घरातल्या गडीमाणसांच्या हक्काच्या स्पर्शापासून इतर अनेक नातेवाईकांच्या भावपूर्ण स्पर्शाची केवढी विविधता...

बाळ मोठं होत जातं, कारभार-हट्ट करायला लागतं, ऐकेनासं होतं, की मग हेच मृदू स्पर्श ‘वळण लावण्याच्या’ नावाखाली कधीकधी कठोर होतात. मुलांचं घराबाहेरचं जग विस्तारत जातं, तशी स्पर्शातील वैविध्यता समजायला लागते. तरुण वयात चोरट्या पण हव्याहव्याशा वाटणार्‍या स्पर्शाची ओळख होते. त्यातून अगणित नात्यांची गुंफण निर्माण होते. कुणी मित्र-मैत्रीण, तर कुणी सखा-सखी. प्रेमात पडल्यावर प्रियकर-प्रेयसीचं नातं सफल झालं तर पती-पत्नीच्या नात्याचा अनुभव! या सर्व काळात हवेसे स्पर्श, नकोसे स्पर्श...या सगळ्या स्पर्शांची ओळख होते; त्यातून माणूस ‘समजण्याची’ जाण निर्माण होते.

परंतु या समजून घेण्याच्या प्रक्रियेला समाजातून मनमोकळी संमती क्वचितच मिळते. सतत पहारा आणि सतत नकार. जणू सर्व स्पर्श वाईटच असतात... स्पर्शातून सुरू होणारी प्रेमाची भाषा पुढे जाऊन कोणालातरी फसवण्यासाठीच असते. पती-पत्नीच्या कायदेशीर, हक्काच्या नात्यातही बाहेर फिरताना सहज धरावासा वाटणारा हात म्हणजे केवळ प्रेमाचं प्रदर्शन! ’आपापल्या घरात बसून करा तुमच्या प्रेमाचे ‘चाळे’. चारचौघात वावरताना, वागताना काही लाजशरम आहे की नाही?’ ही वाक्य सर्रास कानी पडतात.

निसर्गनियमांचा विचार केला तर स्पर्शाचा संबंध आपल्या त्वचेशी असतो. त्वचा, कातडी, म्हणजे आपल्या पंचेंद्रियांपैकी एक. ही पंचेंद्रियंच बाहेरच्या जगाला आपल्या आत आणतात आणि सकारात्मक-नकारात्मक अशा अनेकविध भावना आपल्यामध्ये निर्माण करतात. नीट विचार केला तर लक्षात येईल की गंधाची जाणीव करून देणारं एक नाक, बाह्य जगाचं दर्शन घडवणारे दोन डोळे, ध्वनी आणि शब्द आपल्यापर्यंत पोहोचवणारे दोन कान आणि रुचीवैविध्याचा अनुभव देणारी एक जीभ हे सर्व आपल्या चेहर्‍यात सामावलेले आहेत. त्वचा मात्र अंगभर पसरलेली आहे! का बरं असेल असं?

माणसाचा मेंदू उत्क्रांतीमध्ये उन्नत होत गेला आणि भावनांसोबत विचारांच्या मेंदूची (प्रि-फ्रंटल कॉर्टेक्स) मानवाला मोठीच देणगी मिळाली. मानव ‘सामाजिक प्राणी’ बनला. विचार आणि भावनांच्या देवाणघेवाणीतून वैचारिक-भावनिक बंध निर्माण होऊन त्याची साहचर्याची आणि सोबतीची गरज पूर्ण झाली. टोळ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास कुटुंबव्यवस्थेपर्यंत चालू राहिला आणि त्याची सुरक्षिततेची भावनिक गरज पूर्ण झाली. शब्द निर्माण झाले नव्हते तेव्हा स्पर्शच भावनिक नात्याचा गाभा होता.

आपल्या त्वचेखाली अनेक संवेदी चेतातंतूंची टोकं (रिसेप्टर्स) असतात. त्यांच्यामार्फत स्पर्शातून निर्माण होणार्‍या संवेदना मेंदूपर्यंत पोचतात. त्यातून परस्परांमध्ये भावबंध निर्माण होऊन सोबतीमधून मिळणारी भावनिक सुरक्षितता माणसाच्या निवांत-आश्वासक जगण्यासाठी फार महत्त्वाची ठरते. तसंच, विविध स्पर्शाच्या आकलनातून माणूस स्वतःला जगण्यातील सर्व पातळ्यांवरच्या स्वसुरक्षेची हमी देऊ शकतो. म्हणूनच निसर्गाने मानवाला अंगभर त्वचेचं सुरक्षाकवच दिलं. स्पर्शाचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे.

स्पर्शाचे विविध प्रकार अनुभवावे तितके कमीच आहेत. स्पर्शानुरूप माणसामाणसांमध्ये अनेक प्रकारची नाती निर्माण होताना दिसतात. स्पर्श आणि वासना यात फारच सूक्ष्म भेद आहे आणि तो आपल्याला ओळखायला नकळत शिकवला जातो. पण तेव्हाच त्याचा अधिक साकल्याने विचार करायला शिकवला तर...तर पुढे येणारं भावनिक उणेपण, रितेपण कधीच येणार नाही. मग त्या स्पर्शात स्वरांचा स्पर्श, जाणिवेचा स्पर्श, सहवेदनेचा स्पर्श आधाराला मिळाला तर काय बहार येईल.

एकदा आमच्या संस्थेचं पथनाट्य होतं. आमच्या संघातील एकाचा अभिनय बघून रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका जख्ख वृद्ध आजीने त्याला जवळ बोलावलं आणि आपला हात त्याच्या गालावरून फिरवत ती प्रेमाने म्हणाली, ‘किती छान काम केलं रे तू पोरा... खूप मोठा होशील!’ तो म्हणाला, ‘त्या म्हातारीच्या खरखरीत हाताचा कौतुकभरला प्रेमस्पर्श मी आजही विसरू शकत नाही. नंतर मिळालेल्या कुठल्याच पारितोषिकाने तो आनंद, ते समाधान दिलं नाही.’

आमचा एक मित्र त्याच्या मुलाला अंघोळ घालण्याचं काम मन लावून करायचा. बाबा आपल्याला अंघोळ घालण्याचं काम उरकत नाही हे त्या छोट्या मुलालाही कळायचं. पुढे बाबा त्याच्या कामात व्यग्र झाला, त्याचा प्रवास वाढला. त्याला विमान पकडायला बरेचदा पहाटेच घर सोडायला लागायचं. आज आपल्याला अंघोळ न घालता बाबा गेला हे कळलं की मुलगा खट्टू व्हायचा. त्याने शेवटी बाबाला सांगितलं, ‘तू निघण्यापूर्वी अंघोळ करतोसच ना? मग तेव्हा मलाही उठवून आंघोळ घालत जा. शाळेत जाण्यासाठी आई उठवेपर्यंत मी अंघोळ करून परत झोपी जाईन.’ अंघोळ घालतानाचा बाबाचा स्पर्श त्या मुलाची दिवसभर सोबत करायचा. बाबा आपल्या जवळ आहे असं त्याला वाटायचं.

आपण लहान बाळाचे गालगुच्चे का घेतो? कारण त्या मऊमऊ, गुबगुबीत गालांचा निष्पाप, निर्व्याज स्पर्श आपल्याला अगदी हवासा वाटतो. माणसं पाळीव प्राणी तरी का पाळतात? ते उभयता एकमेकांच्या स्पर्शासाठी आसुसलेले असतात.

कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता कोण विसरेल? पुरामध्ये सर्व काही वाहून गेल्यावरही, न खचता पुनःश्च उभ राहण्याची ताकद, ऊर्जा मिळवण्यासाठी एक आदिवासी कुसुमाग्रजांना भेटायला आला. त्याची कहाणी ऐकून मदतीसाठी कुसुमाग्रजांचा हात खिशाशी जाताच तो म्हणाला, ‘काही नको सर, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा.’ त्याने केलेली ही विनंती आश्वासक, बळ देणार्‍या स्पर्शाचं महत्व किती सहज अधोरेखित करते! गुरूंचा अस्पर्शित स्पर्शही असाच आश्वासक, निर्भय, निःशंक बनवणार असतो. तर परमेश्वराच्या चरण स्पर्शात शरणभाव अनुस्यूत आहे.

खूप भयभीत झालेली व्यक्ती आधारासाठी आपला हात धरते तेव्हा त्या व्यक्तीचा भयकंप आपल्याही अणुरेणुपर्यंत झिरपत जातो आणि आपल्यालाही त्या थरकापाची अनुभूती देतो.

तनामनाची ही अनुभूती निसर्गही देत असतो. निळ्याशार आकाशाला, पौर्णिमेच्या चंद्राला, लुकलुकणार्‍या चांदण्यांना आपण स्पर्श करू शकत नाही. वारा-पाणी मात्र पुढे वाहत जातात ते त्यांचा स्पर्श आपल्या अंगाअंगावर मागे ठेवूनच! निसर्गाच्या कुशीत स्पर्शाची ऊब न मिळती तर आपण परत परत त्याच्याकडे कसे बरं ओढले गेलो असतो? रंगीबेरंगी, सुवासिक फुलं-पानं बघून डोळे, नाक तृप्त होत असले तरी त्या आनंदाची पूर्तता स्पर्शाने तर होते!

जवळची व्यक्ती आजारी असते तेव्हा तिला आपण डॉक्टरकडे नेऊ, औषध देऊ, विश्रांती देऊ, ताजा-हलका-गरम आहार देऊ; पण एवढंच पुरेसं असतं का? शरीराबरोबर मनही दुखरं झालेलं असतं त्या व्यक्तीचं. अशावेळी त्या व्यक्तीच्या जवळ बसून त्याच्या कपाळावरून, डोक्यावरून, केसांतून हलकेच हात फिरवला तर त्याचं अर्ध दुखणं पळून जातं! प्रेमाच्या, आपलेपणाच्या, आस्थेच्या एका स्पर्शात हजार शब्दांचा ऐवज असतो असं म्हणतात, ते खोटं नाहीये. वयोपरत्वे फारसे घराबाहेर पडू न शकणार्‍या किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये वृद्धाश्रमात राहायला लागणार्‍या वृद्ध जीवांना तरी आपल्या माणसांच्या भेटीशिवाय दुसरी कसली ओढ असते? आपल्या मायेच्या एका स्पर्शाने त्यांचे थकलेले डोळे पाणावतात, हात थरथरतात. माझा एक मित्र अंथरुणाची कायमस्वरूपी सोबत झालेल्या आपल्या आईला भेटायला जायचा तेव्हा ती त्याचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवायची. बोलायची काहीच नाही. निरोपाच्या वेळी तिच्या हातातून आपले हात सोडवताना त्याचं मन विद्ध व्हायचं.

मृत्यू आपल्या हातात नाही. त्याची वेळ माहीत नाही. पण तुकोबांना लागलेली परमेश्वर भेटीची आस- ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’ श्रीनिवास खळ्यांच्या चालीवर लताबाई आर्ततेने गातात तेव्हा आपलं हृदय पिळवटून निघाल्याशिवाय राहत नाही. निर्गुण स्पर्शाची ही आस काय वर्णावी आणि कोणत्या शब्दांत?

पाठीवर पडलेली कौतुकाची थाप माणसं आयुष्यभर विसरत नाहीत. तसंच, विरहाची वेदना मागे ठेवून एखादं नातं संपून किंवा विरून जातं तेव्हाही त्या नात्यातले स्पर्श कधीच विसरता येत नाहीत... धरलेल्या आणि अगदी सोडलेल्या हातांचे सुद्धा!

प्रेमात पडलेल्या माणसांचा आपण सर्वजण हेवा करतो, कारण सुरुवातीची भीड चेपून परस्परांमध्ये विश्वास निर्माण झाल्यानंतर केलेला स्पर्श दोघांनाही हवाहवासा असतो. कधीकधी तो छातीचे ठोके वाढवतो तर कधी कधी नकळत डोळे पाझरवतो. पावसातला स्पर्श अंगावर शिरशिरी उमटवतो, तर उन्हातला स्पर्श गारव्याची एक लहर अंगभर पसरवत नेतो. अंगावर मोरपिस फिरवल्यासारखा रोमांचकारी स्पर्श दुसर्‍याच्या मनातील आपल्या प्रतीच्या भावनांना किती बोलका करतो!

भावनांची नेमकी अभिव्यक्ती स्पर्शाइतकी कशातूनच होत नाही. त्याला डोळ्यांतील भाव आणि योग्य देहबोली यांची जोड मिळाली तर ती भावनांच्या अभिव्यक्तीची पूर्तीच म्हणायला हवी! हवेसे, नकोसे स्पर्श यातूनच तर ठरतात. ‘सिक्स्थ सेन्स’मध्ये या संपूर्णतेचा अंतर्भाव असतो.

हल्ली माझी ८७ वर्षांची आई काही दिवस माझ्याकडे राहायला आली आहे. सकाळी आम्ही दोघी मिळून व्यायाम करतो. तो करताना बरेचदा तिची मान किंचित वर उचललेली राहते. तिला सांगून पाहिलं, पण तिच्या लक्षात येईना. एक दिवस दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरला आणि मान सरळ कशी ठेवायची ते करून दाखवलं, तर लक्षात आलं की तिच्या गालांच्या तुकतुकीत कातडीचा स्पर्श इतका मऊसर आणि छान होता! वाटलं इतक्या वर्षांत आपण आपल्याच आईच्या गालांना कधीच कसा हात लावला नाही? त्या स्पर्शातून तिचं प्रेम माझ्या शरीरभर झिरपलं. अगदी हरखून गेले मी! असं जवळचं सोडून आपण लांबचंच काहीतरी शोधत असतो का? असे साधे सरळ स्पर्श आपण सहजच का बरं करू शकत नाही?

‘हळूवार’ हा शब्द आपण इतक्या वेळा बोलतो, पण अनुभवत का नाही?

माझा भाचा लहान असताना माझ्या घरी यायचा तेव्हा बाहेरच्या फाटकापासून घराच्या दारापर्यंत दुतर्फा लावलेल्या प्रत्येक झाडाला अतिशय हळूवार स्पर्श करत यायचा. फॉक्स टेल या रोपट्याच्या कोवळ्या पानांच्या लांबलचक शेपट्या अलवार कुरवाळत बसायचा. मगच घरात यायचा. झाडांना आपल्या स्पर्शाची भाषा कळते हे तर आपण सर्वच जाणतो. मी शाळेत असताना माझ्या वर्गातील एका मैत्रिणीकडे तिच्या वडिलांनी लावलेली, वाढवलेली गुलाबाची रोपं होती. त्यातील एक गुलाब त्यांचा फारच लाडका. आम्ही गेलो की त्याची फुलं ते आम्हाला कौतुकाने दाखवायचे आणि म्हणायचे, हा दुरंगी गुलाब नेहमी असाच बहरलेला असतो बरं का. त्याचं नाव डबल डीलाइट. तिचे वडील अगदी आकस्मिकपणे वारले. त्यांच्या प्रेमाच्या स्पर्शाला पारखं झालेलं ते गुलाबाचं झाड लगोलग मरून गेलं.

आमच्या समुपदेशनाच्या क्षेत्रात स्पर्शाला विशेष महत्त्व आहे. समोरची व्यक्ती मणामणाचं चिंतेचं ओझं नि अपार दुःख घेऊन तुम्हाला भेटायला येते आणि हळूहळू हुंदके देत आपलं मन मोकळं करते. ती हृदय पिळवटून टाकणारी वेदना आपल्यापर्यंत पोचली की समोरच्या व्यक्तीचं वय, लिंग, सामाजिक-आर्थिक स्तर या पलीकडे जाणारी ती मानवी मनाची पिडा तुम्हाला आरपार भिडते. तुमच्याही नकळत तुम्ही उठता. तुमची पावलं तुम्हाला त्या व्यक्तीजवळ नेतात आणि तुमचा हात आपसूक त्या व्यक्तीच्या पाठीवरून फिरायला लागतो. तुमच्या प्रत्येक थोपटण्याबरोबर अश्रूंचे बांध फुटतात; पुरुषही हमसून हमसून रडतात. ’याआधी मन असं कधी मोकळं झालंच नव्हतं’, असं म्हणतात. याला समुपदेशनातील ‘रापो बिल्डींग’ असं म्हणत असले तरी या दोन शब्दांपलीकडे भावनांचा अथांग समुद्र पसरलेला असतो. तुमचा स्पर्श सागर आणि किनारा यांचं नातं अतूट बनवतो. स्पर्श म्हणजे नाती निर्माण करणारं, त्यातील प्रेमाचे बंध वृद्धिंगत करत ते नातं अतूट बनवणारं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. ‘हृदयस्पर्शी’ हा शब्दच यादृष्टीने पुरेसा बोलका आहे. मर्मबंधातील ठेव, या हृदयीचे त्या हृदयी घातले या शब्दांना स्पर्शाशिवाय अर्थच निर्माण होऊ शकत नाही.

‘तीच मी राधिका तोच हा श्रीहरी, हृदय माझे कसे मीच हृदयी धरू’ या ओळी तर नात्यातील स्पर्शाची, प्रेमाची अध्यात्मिक उंची गाठतात. पती-पत्नीच्या वैवाहिक नात्यात अशी उंची किती जोडप्यांमध्ये गाठली जात असेल? मुळात संसार करण्याच्या जगरहाटीच्या प्रेरणेने एकत्र आलेले हे स्त्री-पुरुष नर-मादीच्या आदिम नैसर्गिक प्रेरणेकडे डोळसपणे बघतील तर स्पर्शाची कितीतरी विविध रूपं, रंग, आयाम, विभ्रम समरसून अनुभवू शकतील. नात्यातील अतीतरल संवेदनशीलता आणि स्पर्श या खरंतर एकाच नाण्याच्या दोन बाजू नव्हेत का? दिग्दर्शिका सई परांजपे आणि नसिरुद्दीन शाह-शबाना आझमीने ‘स्पर्श’ चित्रपटात त्या किती उत्कटपणे उलगडल्या आहेत! तसंच ’प्रेमपत्र’ चित्रपटातील ‘सावन की रातों में ऐसा भी होता है’, या गाण्यातील काही दृश्यांनी नात्यातील तो अर्थवाही स्पर्श नेमका टिपला आहे. ‘आँधी’ चित्रपटातील संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या केवळ भावमुद्रा परस्परांना स्पर्शही न करता स्पर्शाच्या पलीकडचं बरंच काही बोलतात. ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही’ या गाण्यातील त्यांचा अभिनय आपल्या मनात वेदनेची कळ उठवतो. तर मेघना गुलजार यांच्या ‘राझी’ या चित्रपटात लग्नाच्या पहिल्या रात्री ती आपल्या पतीकडे थोडा वेळ मागते. तिच्या विनंतीचा आदर करत तो वेगळा झोपतो तेव्हा त्याची अबोल, कमालीची संयत आणि समजूतदार देहबोली आपल्या मनाला स्पर्शून जाते. त्याच्या प्रगल्भ, समतोल आणि सहिष्णू व्यक्तिमत्त्वाची ओळखही आपल्याला करून देते.

‘तसे काही मनात नव्हते फक्त हाती हात होते...’ या ओळींमधून अबोल मन स्पर्शामधूनच तर बोलतं... दीर्घकाळच्या विरहानंतर स्पर्शासाठी आसुसलेले, अतिशय विपरित परिस्थितीतून गेल्यानंतर एकमेकांना भेटणारे दोघंजण जेव्हा एका आवेगाने एकमेकांना मिठी मारतात तेव्हा त्या दोघांच्या स्पर्शाची भाषा आपल्याला थेट भिडते. मिस्टर अँड मिसेस अय्यर, रोजा, डोर... असे काही चित्रपट आठवा. खरं तर नातं कुठलंही असो, त्याला उदात्ततेचा स्पर्श झाला की ते अलौकिकच बनतं. हा स्पर्श द्वैत आणि अद्वैत यांतील सीमारेषा नव्हे का? पण स्पर्शाच्या या संकल्पनेला आपण भारतीयांनी नेहमी उपेक्षेने का मारलं न कळे. मानवाच्या आदिम प्रेरणांचा शोध घेऊन त्यांचा पुरुषार्थ सांगणार्‍या संस्कृतीमधून महर्षी वात्स्यायन या भारतभूमीतच निर्माण झाले. काम हा त्यातील एक पुरुषार्थ. त्यांचा वैश्विक आणि सार्वकालिक श्रेष्ठ असा कामसूत्र हा ग्रंथ सिद्ध झाला. त्यात लैंगिक नात्यातील स्पर्शाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे; पण सेक्सला टॅबू समजण्याचं पतन भारतीय समाजात कसं आणि कधी झालं कोण जाणे. सेक्सच जिथे शरमेचा, संकोचाचा विषय झाला तिथे स्पर्श हा विषय तरी त्यातून कसा सुटणार होता? त्यामुळे स्पर्श हे सशक्त, निरोगी, निर्मळ, निर्हेतुक आणि संवेदनशीलही असू शकतात हे आपल्या समाजाने कधी समजूनच घेतलं नाही. स्त्री-पुरुषांचं कुठलंही नातं असो, त्याकडे नेहमी नर आणि मादी असंच बघितलं गेलं. भाऊ-बहीणही तारुण्यात पदार्पण करते झाले की अंतर राखून वागू लागतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींच्या अतिशय सशक्त खेळकर नात्यातही एकमेकांना उत्स्फूर्त टाळी देणं, शाबासकी देणं, खांद्यावर सहज हात टाकणं हेही अनेकदा आक्षेपार्ह ठरतं, तिथे हातात हात देणं-घेणं वगैरे तर फारच पुढच्या, जवळपास अशक्यच पायर्‍या.

मात्र काळाबरोबर या स्पर्शाची परिभाषा, त्याची अभिव्यक्ती हे सारं बदलत गेलं. माणसं धीट होत गेली की बनचुकी हे ठरवणं कठीण आहे. स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक वैविध्यात समानतेचा सुंदर धागा गुंफून माणसांची नाती स्पर्शामधून उन्नत, उदात्त होण्याऐवजी त्यांचा दर्जा अनेक पातळ्यांवर घसरत गेला. खाजगी स्पर्श उघडेवाघडे झाले; निःसंकोचपणाऐवजी त्याच्या आक्रमक, काहीशा निर्लज्ज प्रदर्शनाकडे गेले. स्पर्श करताना स्थल-काल-भवताल याचं भान सुटत गेलं. पहिल्या स्पर्शातील गोडवा, सलज्जता, आसुसलेपण, शिगेला पोहोचलेली उत्सुकता, तोपर्यंत बाळगलेला संयम, बुजरेपण, नवखेपण, निरागसता हे सारं हळूहळू लोप पावत त्या स्पर्शात एक उथळपणा, भडकपणा येत गेला. जुन्या गाण्यांतील स्पर्शाने उमलून आलेल्या भावनांची वर्णनं भावुक, बाळबोध वाटू लागली. मनोभावे होणार्‍या स्पर्शातून उच्च दर्जाचं गुणात्मक नातं, सहजीवन ध्वनित होण्याऐवजी, प्रेयसीवर कधी एकदा अधिकार मिळवतोय, तिला स्पर्श करतोय, ही भावना दृग्गोचर होऊ लागली. प्रियकराच्या स्पर्शाने लाजणार्‍या बावरणार्‍या, आनंदाने मोहरून जाणार्‍या ऐन यौवनामधील प्रेमिका काळाच्या पडद्याआड जात गेल्या तशा प्रणयातील नवख्या स्पर्शाने रोमांचित झालेल्या त्या प्रणयी जोड्याही कालबाह्य होत गेल्या.

या सगळ्यात भर म्हणून स्त्रीची कांती सुंदर करण्यार्‍या, काया मृदू, चमकती करणार्‍या वेगवेगळ्या क्रीम्स आणि लोशनच्या जाहिरातींनी स्पर्शाच्या आदिम संकल्पनेवर सौंदर्याचं, देखणेपणाचं रोपण केलं. ‘असणं’ यापेक्षा ‘दिसणं’ वरचढ झालं. कायेचं सौंदर्य, सुगंध याने एकमेकांना आकर्षित करणारं प्रेम मानवी नातेसंबंधांच्या दृष्टीने उथळ होत गेलं.

आता तर या कोरोनाच्या अतिसूक्ष्म विषाणूने सगळ्याच स्पर्शावर बंधनं काय, बंदीच आणली! आपलेच हात साबण लावून वीस सेकंद धुतल्याशिवाय जिथे स्वतःच्या चेहर्‍याला सुद्धा लावायचे नाहीत, तिथे दुसर्‍याच्या चेहर्‍याला स्पर्श करण्याचा प्रश्नच नाही! म्हणजे आधी लज्जेने, समाजाच्या तिरकस नजरेने, धाकाने संकोचलेला स्पर्श आता भयाच्या आवरणाखाली दबून जाणार. नात्यांना नवनवे अर्थ-आयाम देणार्‍या, आधार देणार्‍या, आस्था दाखवणार्‍या, माया करणार्‍या, प्रेम व्यक्त करणार्‍या, कितीतरी सुंदर - हव्याहव्याशा वाटणार्‍या स्पर्शांना माणसामाणसांमधील कित्येक नाती आता पारखी होणार...

पण वस्तू दुर्लभ झाली की तीच हवीहवीशी वाटते, नाही का? या वंचित होण्यातूनच कदाचित स्पर्शाचं मोल, हवंहवंपण माणसांना नव्याने उमगेल. माणूस अधिक सहृदयी बनेल. या निसर्गनिर्मित स्पर्शाला मग थेट एक अध्यात्मिक उंची लाभेल....

‘तुझ्या स्वरात माझी भरून आस आहे

तुला न भेटता तुझाच स्पर्शभास आहे

तुझ्या लयीत माझी गुंफली स्पंदनेही

असा तुझा नि माझा हा एक श्वास आहे....’

 

वंदना सुधीर कुलकर्णी

vankulk57@gmail.com

 


टिप्पण्या

  1. फारच छान.वंदना तू स्पर्शाचे वेगवेगळे प्रकार समजावुन सांगताना जी वेगवेगळी उदाहरणे दिलीस त्यावरून तुझ्या चौफेर वाचनाची व अनुभवांची कल्पना आली. तुझ्या लेखाबद्दल खास अभिनंदन व कौतुक करतो. आप्पाकाका

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८