रत्नाकर मतकरी : समाजाला न झेपलेला लेखक - आनंद अवधानी

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या व्यक्तित्वाचे विविधांगी पैलू उलगडणारा लेख.

थोडा विचार करा- मनुष्यस्वभावात मूलभूत असलेला हा अहंकार सकारात्मक करता नाही का येणार? माझं काम पहिल्या दर्जाचंच असेल! माझ्या माणसांना मी सर्व सोयी मिळवून देईनच! कोणालाही दिलेला शब्द पाळल्याशिवाय मी राहणारच नाही... मला कोणी भ्रष्ट करू शकणार नाही! मी प्रामाणिकपणासाठीच प्रसिद्ध होईन!... असा अहंकार का ठेवू नये? फार लांबची गोष्ट नाही. अगदी तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत अनेक नामांकित व्यक्ती असं ब्रीद पाळायच्या. याचा अर्थ ते अशक्य नव्हतं. असे अहंकार पुन्हा बाळगता येतील का?

आत्मनेपदीया अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या पुस्तकात रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेले हे विचार आहेत. मानवी अहंकारावर मात कशी करावी यावर सर्वकालीन आणि सर्वदूर चर्चा चालू असते; पण मतकरी मात्र त्याच अहंकाराला कवेत घेऊन नवं काही घडवण्याची भाषा करताना दिसतात. अशी भाषा मतकरी करू शकले, कारण तसा अधिकार त्यांना होता. पासष्ट वर्षांच्या कसदार लेखनसातत्यामधून त्यांनी तो कमावला होता. हजारो दंड-बैठका मारून एखाद्या पैलवानाने शरीर कमवावं तसा मतकरींनी कमावलेला अहंकार पिळदार आणि गोटीबंद होता. मतकरींच्या निधनामुळे असाअहंकारीलेखक आणि माणूस आपण गमावला आहे. मतकरी अनेक अर्थांनी इतरांपेक्षा वेगळे होते. विशेष म्हणजे त्यांचं हे वेगळेपण अगदी पहिल्या भेटीपासूनच जाणवायला सुरुवात झाली.

मतकरींची पहिली ओळख अर्थातच शाळा-कॉलेजच्या वयातच झाली होती. त्यांच्या कोणत्या तरी पुस्तकातला एक उतारा शाळेत धडा म्हणून होता. तेव्हा त्यांचं लेखक म्हणून पहिल्यांदा नाव कळलं. पुढे एका कथाकथन स्पर्धेसाठी ग्रंथालयात बसून कथा शोधत होतो. ‘तुमची गोष्टनावाची मतकरींची कथा वाचायला सुरुवात केली आणि हरखून वाचतच राहिलो. मग ती गोष्ट स्पर्धेत सांगितली आणि बक्षीसही मिळालं. त्यानंतर कथाकथन स्पर्धेत बक्षीस मिळवायचं असेल तर मतकरींची कथा निवडायची आणि शक्यतो गूढ कथा निवडायची असं सूत्रच जणू तयार झालं. नंतरच्या काळात महाविद्यालयात एकांकिका स्पर्धांसाठी एकांकिका निश्चित करतानाही मतकरींच्या लिखाणाकडे हुकुमाचा एक्का म्हणून पाहिलं जायचं. उघड गुपित सांगायचं, तर हा प्रकार त्या काळी महाराष्ट्रातल्या अनेक शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रचलित होता. मतकरींच्या लेखनाशी जवळीक वाढण्यामागे हे असं कारण होतं. असो. तर त्यांच्या पहिल्या भेटीविषयी सांगत होतो.

१९८९-९० साल चालू होतं. ‘मनोहरया पाक्षिकासाठी मतकरींची मुलाखत घ्यायची होती. ‘मराठी कथा, कादंबरी, कविता आणि ललित साहित्य असे सगळेच साहित्यप्रकार कुंठित अवस्थेत आले आहेत का?’ याविषयीमनोहरमध्ये विशेष विभाग करायचा होता. त्यापैकी कथा या साहित्यप्रकाराविषयी मतकरींना बोलतं करायचं होतं. दादरच्या खोदादाद सर्कलजवळराधा निवासया इमारतीत मतकरींचं घर होतं. त्यांच्या इमारतीपर्यंत पोचताना का कोणास ठाऊक पणपावसातला पाहुणाकिंवाखेकडासारख्या कथा आठवत होत्या. त्या कथांसोबत पाठराखीण म्हणून असलेली भीतीही मनाला घाबरवत होती. त्यांचं घर पहिल्या मजल्यावर होतं. याचा अर्थ फक्त दहा-बारा पायर्या चढायच्या होत्या. पण आज इतक्या वर्षांनीसुद्धा मला स्पष्ट आठवतंय, की तेवढ्या पायर्या चढणंही मला सोपं गेलं नव्हतं. एखादा लेखक आपल्या वाचकाच्या मनाचा कब्जा कसा आणि किती घेतो याचा अनुभव मी घेत होतो.

पण एका क्षणात सगळं बदलून जावं तसं झालं. स्वत: मतकरींनी हसत हसत दार उघडलं आणिया बसाम्हणत छान स्वागतही केलं. पुण्याहून किती वाजता निघालात, वगैरे चौकशी केली. तेवढ्यात त्यांच्या पत्नी प्रतिभाताईंनी पाणी आणून दिलं. त्यांचीही ओळख झाली. मग मी मुलाखत घेण्यामागचा हेतू सांगितला. एके काळी खूप सकस आणि दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक मराठीत होते, पण नंतरच्या काळामध्ये (मतकरींसारखे काही अपवाद वगळता) चांगल्या साहित्यिकांची संख्या कमी झाली आहे का, असा विषय होता. ती कमी झाली असेल तर कशामुळे कमी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न होता. मतकरींनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर आज तीस वर्षांनंतरही माझ्या लक्षात आहे. नुसतं लक्षातच आहे असं नाही, तर त्या उत्तराने निराश अवस्थांमध्ये मला धीर देण्याचं कामही केलं आहे.               

तुमच्या प्रश्नामागच्या विचारामध्ये थोडी गफलत आहे असं मला वाटतं.” मतकरी सांगत होते, “आपण अनेकदा काळाची सरमिसळ करतो. म्हणजे तुम्ही गेल्या शंभर वर्षांतले सगळे चांगले साहित्यिक एकत्र केलेत. त्यांना एका पारड्यात टाकलंत. अर्थातच ते पारडं खूप आशयसंपन्न आणि जड झालं. मग दुसऱ्या पारड्यात तुम्ही सध्याच्या काळातले चांगले साहित्यिक टाकलेत. साहजिकच त्यांची संख्या कमी असल्यामुळे ते पारडं हलकं ठरलं. मगमराठी साहित्य कुंठित झालं आहेपासूनलयाला चाललं आहेपर्यंत निष्कर्ष काढणं ओघानेच आलं. माझ्या मते या समजुतीमध्येच गफलत आहे. कारण स्वतंत्रपणे आपण शंभर, पन्नास किंवा पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर लक्षात येतं, की त्या त्या काळात चांगलं लेखन करणार्यांची संख्या कमीच होती. प्रत्येक काळात ती साधारणपणे तेवढीच असते. पण हा संदर्भ सुटला की मग भूतकाळ वाजवीपेक्षा उज्ज्वल दिसायला लागतो. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या काळात केवढी अधोगती-अवनती झाली आहे, असं रुदन सुरू होतं. भविष्याची काळजी तीव्र होते. पण सर्व काळांत चांगलं, साधारण आणि वाईट लिहिणाऱ्यांचं प्रमाण तितपतच असतं.” एवढं बोलून मतकरींनी आपल्या नाटकातल्या पात्रासारखा पॉज घेतला आणि ते म्हणाले, “त्यामुळे मराठी कथा कुंठित झाली आहे का, या चर्चेपेक्षा सध्याच्या काळातली मराठी कथा आणि तिच्या पोटातले वेगवेगळे प्रवाह यावर आपण बोलू.”

त्यानंतर साधारणपणे तासभर तरी बोलणं झालं. म्हणजे तासभर मतकरी बोलले. लिहिण्याच्या दृष्टीने पुरेसा ऐवज तयार झाला. पण त्या निमित्ताने मतकरींनी मांडलेला वेगळा दृष्टिकोन मात्र पुढे माझी साथ करत राहिला. कारण त्यानंतर निराशेचे प्रसंग अनेकदा आले. अजूनही येत राहतात. कधी वाटतं, मराठीत चांगले लेखक उरले नाहीत. कधी वाटतं, झोकून देऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते खूप कमी आहेत. तर कधी वाटतं, ध्येयवादी शिक्षकांची वानवा आहे. पण अशा प्रत्येक उदास वळणावर मतकरींचे ते शब्द पुन्हा ऐकू येतात. काही प्रमाणात का होईना, निराशा कमी होते. मतकरींचं लेखक आणि माणूस म्हणून असलेलं वेगळेपण पहिल्याच भेटीत जाणवलं ते अशाप्रकारे.

यानंतर काहीच दिवसांत आम्ही मित्रांनी मिळूनयुनिक फीचर्सनावाची संस्था सुरू केली. त्याच दरम्यान एका दिवाळी अंकासाठी मुलाखत घेण्यासाठी मी आणि सुहास (कुलकर्णी) मतकरींकडे गेलो होतो. त्या काळात ते लेखन करण्यासाठी माहीमला एका परिचितांच्या घरी बसत असत. आम्हाला भेटीसाठी त्यांनी तिथेच बोलावलं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे मराठी नाटकाशी संबंधित विषय होता. आधीच्या भेटीप्रमाणेच मतकरी सविस्तर बोलले. त्या भेटीत सुहासने आणि मी त्यांनायुनिक फीचर्ससुरू करण्यामागचा विचार सांगितला. महाराष्ट्रभर पसरलेल्या जिल्हा  वृत्तपत्रांसाठी संपादकीय काम करण्याची कल्पना सांगितली. ती कल्पना आणि आमचा उत्साह पाहून मतकरी खूष झाले. ते प्रोत्साहनपर चार शब्द बोलले. ही कल्पना यशस्वी होईल म्हणाले. आम्हाला अर्थातच खूप आनंद झाला. मतकरी आणियुनिकयांच्या नात्याचा गोफ विणला जाण्याची ती नुसती सुरुवात होती.

त्या काळी म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये मराठीतील नामवंत लेखकांचं लेखन पुण्या-मुंबईतल्या प्रमुख वृत्तपत्रांपलीकडे पोचत नव्हतं. शिवाय त्याही वृत्तपत्रांच्या आतासारख्या राज्यभर आवृत्त्या नव्हत्या. त्यामुळे गावखेड्यांमध्ये पसरलेल्या वाचकाला हे साहित्य वाचायला मिळत नव्हतं. नेमकी हीच बाब हेरून आम्हीयुनिकच्या माध्यमातून वाचक आणि लेखकांमध्ये सेतू बांधण्याचा प्रयत्न करत होतो. त्यासाठी मुंबईतल्या अनेक नामवंत लेखकांशी चर्चा सुरू होत्या. मतकरी अर्थातच त्या लेखकांच्या मांदियाळीमध्ये होते. जिल्हा पत्रांसाठी त्यांनी स्वतंत्र सदर लिहावं अशी विनंती आम्ही त्यांना करत होतो. त्यांच्या वेळापत्रकात मतकरींना ते शक्य होत नव्हतं. पण प्रत्येक अडचणीवर तोडगा काढण्याचा त्यांचा स्वभाव स्वस्थ बसत नव्हता. त्यांनी नामी उपाय शोधला. त्या काळी मुंबईत गाजत असलेल्यामहानगरया सायंदैनिकांत त्यांचं साप्ताहिक सदर चालू होतं. ‘महानगरचा प्रसार मुंबईपुरता मर्यादित होता. त्यामुळे मुंबईबाहेरच्या अनेक दैनिकांना तेच सदर देण्याची कल्पना त्यांनी मांडली. आम्हालाही ते सोयीचं होतं. मानधनाविषयी बोलणं झालं आणि त्या लेखमालेपासून मतकरींचा आणि आमचा संस्थात्मक नात्याचा प्रवास सुरू झाला. त्याच काळातबेरीज वजाबाकीया नावाची त्यांची मालिका दूरदर्शनवर चालू होती. मालिकेचं लिखाण-दिग्दर्शन-निर्मिती मतकरींचीच होती, तर दिलीप प्रभावळकर आणि सविता प्रभुणे त्यात अभिनय करत होते. या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी मतकरींनी एक कल्पना मांडली. दर आठवड्याचा मालिकेचा भाग दूरदर्शनवर प्रसारित होण्याआधी त्या भागाचा गोषवारा दैनिकांत प्रसिद्ध व्हावा असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे दैनिकांनाआगामी आकर्षणया सदरात फोटोसह मतकरींचा मजकूर मिळणार होता आणि मतकरींच्या मालिकेला प्रसिद्धी मिळणार होती. या मालिकेचा अशा स्वरूपाचा मजकूर आम्ही काही काळ जिल्हा पत्रांना दिला होता.

या सगळ्यातून झालेला एक लाभ म्हणजे मतकरींशी वारंवार भेटी होऊ लागल्या. त्यांना सविस्तर चर्चा करण्याची आणि गप्पा मारण्याची आवड होती. त्यामुळे बहुतेक भेटी या दोन-तीन तासांपर्यंत चालत. त्यांच्या लिखाणाचं वैविध्य हे मला नेहमीच चकित करत असे. कारण कथा, नाटक, एकांकिका, बालनाट्य, रेडिओसाठी श्रुतिका, टीव्हीसाठी मालिका आणि ललित लेखन हे साहित्यप्रकार त्यांनी आलटून-पालटून हाताळले. जमिनीचा कस वाढण्यासाठी आलटून-पालटून पिकं घेण्याची भारतीय परंपरा आहे. मतकरींनासुद्धा वेगवेगळ्या लेखनप्रकारांत मुशाफिरी केल्यामुळे त्यांच्या साहित्याचा कस वाढण्यासाठी मदत झाली असणार. शिवाय या मुख्य लेखनप्रकारांच्या पोटामध्ये गूढकथा, सामाजिक कथा, विनोदी नाटक, गंभीर नाटक असे उपप्रकारही होतेच. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या सर्व साहित्यप्रकारांवर त्यांची पूर्ण हुकुमत होती. त्यांच्या लिखाणाच्या पद्धतीविषयी त्यांनी एकदा मला सांगितलं होतं. ते म्हणाले, “ज्या वेळेला मला बालनाट्य लिहायचं असतं त्या काळात मी शक्यतो मुलांच्या विश्वात वावरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मुलांच्या फिल्म्स पाहतो, कॉमिक्स वाचतो किंवा मुलांशी गप्पा मारायचा प्रयत्न करतो. पण ते लिखाण चालू असताना गूढकथा किंवा मोठ्यांसाठीचं लिखाण माझ्या डोक्यात नसतं. असं केल्यामुळे मला त्या त्या साहित्यप्रकाराला न्याय देणं शक्य होतं.”

एवढं सारं लिखाण सातत्याने करत असताना त्यांनी मालिका, नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. ‘महाद्वार’, ‘सूत्रधार’, आणिबालनाट्यसारख्या संस्था काढून त्यांमार्फत कलाकृतींची निर्मिती केली. बालनाट्यं मुलांपर्यंत पोचावीत म्हणून शाळांपासून ते सुधारगृहांपर्यंत जाऊन त्या नाटकांचे प्रयोग केले. ‘लोककथा-७८सारखं दलित आणि महिला अत्याचारावरचं नाटक केवळ पुण्या-मुंबईत पोचून भागणार नाही म्हणून मराठवाड्यात अगदी पारा-पारावर जाऊन त्याचे प्रयोग केले. ठाण्यामधल्या गरीब वस्त्यांमध्ये जाऊनवंचितांचा रंगमंचही कल्पना प्रत्यक्षात आणली. ती नीट रुजावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. हे सगळं ऐकताना किंवा वाचताना सहजच प्रश्न पडतो, की एवढं सारं या माणसाने कसं जमवलं असेल? आपल्यासारखेच त्यांच्याही दिवसाला चोवीसच तास असताना सर्जनशील लिखाण करता करता या सगळ्याला त्यांनी कुठून वेळ काढला असेल?

‘लोककथा-७८’सारखं दलित आणि महिला अत्याचारावरचं नाटक केवळ पुण्या-मुंबईत पोचून भागणार नाही म्हणून मतकरींनी मराठवाड्यात अगदी पारा-पारावर जाऊन त्याचे प्रयोग केले. 

या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. पहिलं उत्तर त्यांची कामावरची अविचल निष्ठा हे आहे. कारण कोणतीही गोष्ट करायची असं त्यांनी ठरवलं की त्यांच्यासाठी तो वज्रनिर्धार असायचा. ती गोष्ट ठरलेल्या पद्धतीने आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत. अतिशयोक्तीने सांगायचं, तर त्यासाठी ते आकाश-पाताळ एक करत पण कोणत्याही तडजोडीशिवाय ते ठरलेली गोष्ट तडीस नेत. त्यांच्या कामावरच्या निष्ठेइतकाच त्यांच्यातला व्यवस्थितपणासुद्धा लक्षणीय होता. शिस्त, नीटनेटकेपणा, काटेकोरपणा आणि वक्तशीरपणा या बाबी त्यांच्या अंगात जणू मुरलेल्या होत्या. एक उदाहरण पहा. लेखनाप्रमाणेच मतकरींना चित्रकलेतही रुची आणि गती होती. लेखक झाले नसते तर ते चित्रकार म्हणून नावारूपाला आले असते. पण लेखन की चित्रकला यातलं एक काही तरी निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी लेखनाच्या बाजूने कौल दिला. पण चित्रकलेचं सामान बांधून ठेवताना ते इतकं व्यवस्थित ठेवलं, की पुढे बावीस वर्षांनी सुप्रियाने म्हणजे त्यांच्या मुलीने चित्रकला शिक्षणाचा निर्णय घेतला, तेव्हा तिला ते तसंच्या तसं वापरता आलं. मतकरींच्या या व्यवस्थितपणामुळेच वर्तमानपत्रांसाठी लेखन करताना कधी त्यांना डेडलाइनचा त्रास झाला नाही. तसं पाहता सलग दोन-तीनशे आठवडे डेडलाइनन चुकवतानियमितपणे लिहिणं ही सोपी बाब नाही; पण अपवाद म्हणूनही त्यांच्याकडून कधी खंड पडला नाही. एकदा तर ते हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांच्या उजव्या हातालाच सलाइन लावलेलं होतं. त्याच हाताने त्यांनी मजकूर लिहून दिला पण सदराच्या लिखाणात खंड पडू दिला नाही. खरं तर तोपर्यंत ते नामवंत लेखक झाले होते. प्रकृतीच्या कारणामुळे एखाद्या आठवड्यात मजकूर न दिल्याने दैनिकाचे संपादक काही म्हणणार नव्हते. पण प्रश्न संपादकांचा नव्हताच मुळी. प्रश्न मतकरींनी स्वत:ला दिलेल्या शब्दाचा होता. स्वत:ला दिलेल्या शब्दाला जागण्याचं काम मतकरींमधल्या माणसाने आणि लेखकाने अखेरच्या श्वासापर्यंत केलं.

-साहित्य संमेलनांच्या निमित्ताने आम्हाला झालेलं मतकरींचं दर्शन ही तर विशेष बाब होती. २०१० साल चालू होतं. दिवाळी नुकतीच संपली होती आणि सालाबादाप्रमाणेअखिल भारतीय साहित्य संमेलनाची चर्चा सुरू होती. चर्चा म्हणजे वादविवाद आणि वितंडवाद हे ओघाने आलंच. अशा वादविवादाशिवायचं साहित्य संमेलन इंटरनेटवर भरवावं अशी कल्पनायुनिक फीचर्सच्या टीमच्या डोक्यात आली. हे संमेलन इंटरनेटवर भरणार असल्यामुळे संमेलनाचा मांडव, जेवणावळी, त्यासाठीचा खर्च आणि त्यावरून होणारी मारामारी या सगळ्याला आपोआपच फाटा मिळणार होता. खर्या अर्थाने साहित्यकेंद्री संमेलन करायचं असल्यामुळे अध्यक्षीय भाषण, परिसंवाद आणि कवी संमेलन हे सगळं मात्र आवर्जून असणार होतं. मुख्य म्हणजे निवडणुकीशिवाय अध्यक्ष ठरवायचा होता. ज्या साहित्यिकांनी आपल्या सर्जनाने मोठं योगदान दिलं आहे पण तेअखिल भारतीय संमेलनापासून दूर राहिले अशांच्या प्रति आदर व्यक्त करण्याची संधी घ्यावी असं सर्वानुमते ठरलं. त्यात पहिलं नाव अर्थातच मतकरींचं होतं. पण या प्रस्तावाला मतकरी होकार देतील का, हा प्रश्न मात्र सर्वांच्याच मनात होता.

खरं सांगायचं तर मी भीत भीतच मतकरींना फोन केला. भीती वाटण्यामागे तसं कारणही होतं. अनेक साहित्यबाह्य वादांमुळेसाहित्य संमेलनहा प्रकारच मराठीत बदनाम झाला होता. त्यामुळे मतकरी, तेंडुलकर, नेमाडे किंवा ग्रेस यांच्यासारखे साहित्यिक हे नेहमीच

संमेलनापासून दूर राहिले होते. ‘युनिकच्या मनात असलेलं संमेलन हे खूप वेगळ्या प्रकारचं असलं तरीसाहित्य संमेलनहे शब्द त्यात होतेच. त्यामुळे मतकरी कसा प्रतिसाद देतील हे कळत नव्हतं. पण माझी भीती खोटी ठरवण्याचं काम मतकरींनी त्याच फोनमध्ये केलं. आधी त्यांनी पूर्ण कल्पना ऐकून घेतली. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपण नेमकं काय करायचं आहे हे समजून घेतलं. कल्पना ऐकताक्षणीच त्यांना आवडली. ‘युनिक फीचर्सच्या (तोपर्यंतसमकालीन प्रकाशनही सुरू झालं होतं.) प्रयत्नांच्या सच्चेपणावर त्यांचा विश्वास होता. नव्या कल्पना उचलून धरण्याचा तर त्यांचा स्वभावधर्मच होता. त्यांच्या होकारानंतर मला अर्थातच बळ मिळालं. ते बळ एकवटून मी आणखी दोन विनंत्या केल्या. एक म्हणजे त्यांचं लेखी अध्यक्षीय भाषण चार-पाच दिवसांत हवं होतं. दुसरं म्हणजे संमेलनाच्या उद्घाटनवजा पत्रकार परिषदेसाठी त्यांनी पुण्याला येणं अपेक्षित होतं.

पहिल्या विनंतीला मान देत त्यांनी सविस्तरपणे अध्यक्षीय भाषण लिहून पाठवलं. त्यांच्याकायमचे प्रश्नया पुस्तकात पुढे ते समाविष्ट करण्यात आलं आहे. दुसऱ्या विनंतीला प्रतिसाद म्हणून ते प्रतिभाताईंसह पुण्याला आलेे. पुण्याच्या पत्रकार संघामध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. पुण्यातले माध्यम प्रतिनिधी आणि काही मान्यवर उपस्थित होते. मतकरींनी भाषण आटोपशीर केलं पण नंतर उपस्थितांशी संवाद साधण्यासाठी मात्र पुरेसा वेळ दिला.

त्याचवर्षीअनुभवमध्ये महाराष्ट्र राज्याच्या पन्नाशीविषयी सुहासचा (कुलकर्णी) लेख प्रसिद्ध झाला होता. तो लेख मतकरींना इतका आवडला होता, की त्यांनी आपल्या एका पुस्तकाला तो प्रस्तावना म्हणून वापरण्याची इच्छा व्यक्त केली. पुढे सुहासने त्या पुस्तकासाठी स्वतंत्र प्रस्तावना लिहून दिली. तसं पाहता सुहासच्या आणि मतकरींच्या वयात तीसेक वर्षांचं अंतर होतं; पण एकूण लेखनप्रवासात आपल्या पुढच्या पिढीला जोडून घेण्याची मतकरींची ताकद अजब होती. ताकद हा शब्द आवर्जून वापरला. कारण वयाने लहान असणाऱ्यांचं मोठेपण मान्य करायला ताकदच लागते. ती मतकरींकडे असल्याने अनेक तरुण लेखक, संपादक, दिग्दर्शक, कलावंत आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा नियमित संपर्क होता. कदाचित त्यामुळेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कालसुसंगत राहणं मतकरींना जमलं असावं. त्यांच्या या क्षमतेमुळेच ते रेडिओवरच्या श्रुतिकांपासून ते वेबसिरीजपर्यंत सर्वच माध्यमांशी नातं जोडू शकले.

पुढच्या पिढीशी जोडून घेताना मतकरी अनेक तरुणांसोबत एकरूप झालेले पाहायला मिळत. ते नव्या पिढीच्या कल्पनांविषयी, उपक्रमांविषयी आणि धडपडीविषयी खूपच जागरूक होते. नव्या पिढीला आवर्जून मदत करण्याचं काम तर त्यांनी अनेकदा केलं आहे.  कीर्ती शिलेदार यांच्यानिमित्ताने त्याचं दर्शन घडलं. पुण्यातलं शिलेदार कुटुंब हे अक्षरश: रंगभूमीला वाहिलेलं आहे. ‘संगीत स्वरसम्राज्ञीहे त्यांचं गाजलेलं नाटक; पण कीर्ती शिलेदारांना प्रकृतीमुळे जास्त काळ उभं राहणं शक्य नसल्यामुळे त्याचे प्रयोग बंद झाले होते. ही बाब मतकरींना कळल्यावर त्यांनी कीर्ती शिलेदारांशी संपर्क साधला. तीन तास उभं राहणं शक्य नसेल तर बसून नाटक करण्याचा पर्याय सुचवला. जशीबैठकीची लावणीअसते तसंबैठकीचं नाटककरावं अशी कल्पना मांडली. नुसती कल्पना मांडून न थांबता त्यांनी पाठपुरावा केला. त्यासाठी आवश्यक ती सगळी मदत केली. त्यातूनसंगीत स्वरसम्राज्ञीहे मराठीतलं पहिलंबैठकीचं नाटकप्रत्यक्षात आलं. रंगभूमीला नवा नाट्यप्रकार मिळाला आणि शिलेदारांना नवी उमेद मिळाली.

शिलेदारांप्रमाणेच अनेकांना त्यांनी अनेक गोष्टींसाठी मदत केली. आमच्याअनुभवमासिकबाबतही असंच सांगता येईल. ‘अनुभवच्या अगदी सुरुवातीच्या अंकापासून ते मासिकाचे वाचक होते. संपादकीयदृष्ट्या त्यांना अंक खूपच आवडत होता. त्याचबरोबर अंकाचा प्रसार करण्यासाठी केली जाणारी धडपड हाही त्यांच्यासाठी कौतुकाचा विषय होता. पण एखाद्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करताना त्या उपक्रमाला शक्य ती मदत करण्याकडे त्यांचा कल असायचा. त्याप्रमाणेअनुभवआणखी वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकतील अशी दोन नावं त्यांनी सुचवली होती. त्यांनी सुचवलेल्या दोन्ही व्यक्ती कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थ होत्या. विशेष म्हणजे मतकरींनी फक्त नावंच सुचवली नाहीत, तर त्या दोन्ही व्यक्तींशीअनुभवच्या उपक्रमाविषयी ते आत्मीयतेने बोलले. परिणामी, आम्ही संपर्क केल्यावर त्या दोन्ही व्यक्तींनीअनुभवसाठी शक्य ती मदत केली. आमच्यासाठी हा अनुभव खूप सुखद होता. कारण अंकाचं कौतुक अनेकजण करतात, पण अंक वाढावा आणि त्याचा आणखी प्रसार व्हावा म्हणून कृतिशील मदत करणारे फार थोडे असतात. या थोड्या व्यक्तींमध्ये मतकरींचं नाव आवर्जून नोंदवावं लागेल. यापलीकडे जाऊन लेख आणि कथांच्या माध्यमातून तर त्यांनी सातत्यानेअनुभवमध्ये लेखन केलं. अगदी २०१९च्या दिवाळी अंकाची सुरुवातही त्यांच्याच कथेने झाली होती.

पुढच्या पिढीला जोडून घेण्याची  मतकरींची ताकद अजब होती. अनेक तरुण लेखक, संपादक, दिग्दर्शक, कलावंत आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा नियमित  संपर्क होता. कदाचित त्यामुळेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कालसुसंगत राहणं मतकरींना जमलं असावं.

समाजासाठी धडपड करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविषयी मतकरी जसे हळवे होत तसे समाजविरोधक बाबींविषयी प्रसंगी ते कठोरही होत असत. ‘नर्मदा बचाव आंदोलनकिंवानिर्भय बनोसारख्या आंदोलनांच्या बाबतीत ते केवळ काठावर न राहता थेट कृतिशील बनले. प्रस्थापित आणि सत्ताधारी वर्गाच्या विरोधात अशी उघड भूमिका घेणं हे आपल्या समाजात दुर्मिळ आहे. अनेक लेखक, कलावंत किंवा खेळाडू सहसा कोणत्याच बाबतीत रोखठोक भूमिका घेत नाहीत. कारण त्यांना सरकारी रोष नको असतो आणि सरकारी लाभ सोडायचे नसतात. मतकरी मात्र या दोन्हींमध्ये अडकले नाहीत. या बाबतीतलं एक उदाहरण तर नजरेत भरणारं आहे.

२००६ सालात घडलेली गोष्ट आहे. इचलकरंजीला एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मतकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख एकत्र होते. आपल्या भाषणात थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून मतकरी म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय, आपण जसे वेळात वेळ काढून सांस्कृतिक कार्यक्रमांना हजर राहता, तसेच नर्मदा खोर्यातल्या खेड्यापाड्यांत जाऊन पुनर्वसनाची खरी परिस्थिती पाहून आलाच असाल. मग असं सांगा, की पुनर्वसन समाधानकारक झाल्याचं जाहीर करत धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्र मान्यता देतोय ते कुणाच्या दडपणाखाली? या प्रश्नासाठी मेधा पाटकर यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. त्यांचा आवाज दडपणं सोपं आहे. पण महाराष्ट्र राज्याचे रक्षक म्हणून तुम्हाला असं वाटत नाही का, की सत्य सांगू पाहणार्या आंदोलकांची अशी मुस्कटदाबी करण्यापेक्षा खरोखर न्यायाचा मार्ग, मग तो कितीही कठीण असला तरी, आपण पत्करावा?” मतकरी हे जाहीरपणे बोलू शकले, कारण त्यासाठी लेखक आणि माणूस म्हणून आवश्यक असलेलाअहंकारत्यांनी कमावलेला होता. तो अहंकार शाबूत ठेवण्यासाठी लागेल ती किंमत चुकवायला ते तयार होते. मागच्या पन्नास वर्षांचा विचार केला तर लेखक म्हणून असा पीळ असलेल्यांची संख्या खूपच कमी भरेल.

मला अनेकदा वाटतं, की रूढार्थाने मतकरी एक्याऐंशी वर्षं जगले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी दुप्पट वर्षांचं काम केलं आहे. पासष्ट वर्षांचं अविरत लेखन, सर्व साहित्यप्रकारात मुशाफिरी, विषयांचं वैविध्य आणि पराकोटीची लेखननिष्ठा लक्षात घेतली तर त्यांच्याशी तुलना करायला फारशी नावं मराठी साहित्यात मिळणार नाहीत. अशा मतकरींच्या आपल्यातून जाण्यामुळे आपण समाज म्हणून काय काय गमावलं आहे, याचा विचार केला तर ठळकपणे काही बाबी समोर येतात.

ज्या मोजक्या गोष्टींमुळे भारतात महाराष्ट्राचं वेगळेपण टिकून आहे त्यात मराठी रंगभूमीचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. आधुनिक भारतीय रंगभूमीचा विचार करताना तर मराठी रंगभूमीचा उल्लेख खूप गौरवाने केला जातो. त्याचं श्रेय अर्थातच पाच महत्त्वाच्या नाटककारांकडे जातं. विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, वसंत कानेटकर आणि महेश एलकुंचवार या पाच नाटककारांच्या लिखाणामुळेच मराठी नाटकाला आशयसंपन्न रूप लाभलं. या वैभवशाली पंचकोनांमधला मतकरी एक महत्त्वाचा कोन होते. त्यांच्या जाण्याने मराठी रंगमंचावरचा एक झगमगीत कोपरा पुन्हा कधी न उजळण्यासाठी अंधारला आहे.

हट्टीपणा हा मतकरींच्या व्यक्तिमत्त्वाचा फार महत्त्वाचा हिस्सा होता. स्वत:च्या लिखाणाच्या बाबतीत तर हे हट्टी होतेच, पण सादरीकरणाबाबतही कमालीचे आग्रही होते. नाटक असेल तर दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, इतकंच काय पण नाटकाच्या जाहिरातींविषयीही त्यांची ठाम मतं असायची. तीच गोष्ट टेलिव्हिजन मालिका, चित्रपट आणि त्यांच्या पुस्तकांनाही लागू होती. पण मतकरींचे हट्ट इथेच संपत नव्हते. नाटक असेल तर त्याचे भरपूर आणि सर्वदूर प्रयोग व्हावेत म्हणून ते सतत नवनव्या कल्पना काढत आणि त्यासाठी निर्मात्याकडे पाठपुरावा करत. पुस्तक असेल तर त्याची विक्रीव्यवस्था, त्यातलं नावीन्य, त्याचा प्रसार, जाहिराती, त्यावर वाचकांमध्ये चर्चा घडणं आणि समीक्षकांनी त्या पुस्तकाची दखल घेणं या सगळ्याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असायचं. ते स्वत: ज्या शिस्तीत काम करत त्याच शिस्तीने आणि सातत्याने त्यांच्या नाटकांच्या निर्मात्यांनी, वर्तमानपत्रांच्या संपादकांनी आणि पुस्तकांच्या प्रकाशकांनी काम करावं अशी त्यांची अपेक्षा होती. ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी ते न थकता पाठपुरावा करत. त्यांच्या मनासारखं होत नसेल तर नाराज होत; पण आशा सोडत नसत, प्रयत्न थांबवत नसत. मतकरींच्या जाण्याने एक अखंड पाझरणारा कल्पनांचा, नावीन्याचा आणि उत्साहाचा झरा आटला आहे.

मतकरींची नाना रूपं पाहिली की वाटतं, हा माणूस आपल्या समाजाला झेपला नाही. ‘चलता हैमनोवृत्ती असलेल्या लोकांना इतका कडक माणूस हजम होत नाही. माणसाने कोणत्या प्रकारचेअहंकारजोपासावेत याविषयी त्यांची मतं या लेखाच्या सुरुवातीला दिली आहेत. आता प्रश्न असा आहे, की ते सगळे अहंकार मतकरींसोबतच लोपणार का? की त्या अहंकारांचे वारसदार आज आपल्यामध्ये आहेत? आज नसतील तर भविष्यात तरी निर्माण होतील का?

असे काही प्रश्न मागे ठेवून मतकरी आपल्यातून गेले आहेत. त्यांच्या बेरीज-वजाबाकी या मालिकेचं त्यांनीच लिहिलेलं शीर्षकगीत त्या काळी टीव्हीवर गाजलं होतं-

जीवन म्हणजे एकसारखी बेरीज आणिक वजाबाकी

सुख अधिकावे दु:ख उणावे हीच रोजची धकाधकी

ही रोजची धकाधकी मतकरींपुरती कायमसाठी थांबली आहे.

आनंद अवधानी

anand.awadhani@uniquefeatures.in

 

 


टिप्पण्या

  1. अप्रतिम लेख! मी स्वत: मतकरींच्या गूढकथांची चाहती आहे. पण नाटक, तसंच सामाजिक मुद्दे यांच्या बद्दल त्यांनी निर्भीडपणे घेतलेल्या कृतिशील भूमिका आणि जोपासलेला विधायक अहंकार या बाबत इतकी नेटकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  2. फारच सुंदर. मतकरींची हुकलेली भेट झाल्यासारखं वाटलं. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  3. फारच सुंदर. मतकरींची हुकलेली भेट झाल्यासारखं वाटलं. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम लेख. धन्यवाद! लेख फेसबुकवर टाकल्यामुळे वाचनात आला.

    उत्तर द्याहटवा
  5. फार सुंदर लेख. खरोखरच त्यांना समजण्यासाठी या लेखाची मदत झाली. त्यांचे लिखाण वाचण्याची ऊर्मी मिळाली..
    खूप छान.. keep it up..
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८