कायदे-भन्जक - उर्दू लेखक - बलराज बख्शी : अनुवाद - सुकुमार शिदोरे

स्थळ : कोर्टरूम

चोपदार : बॉम्ब तज्ज्ञ हाजीर हो (बॉम्बचा तज्ज्ञ साक्षीदाराच्या कठड्यामागे येऊन उभा राहतो.)

वकील : तुम्ही बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडमध्ये आहात?

बॉम्ब- तज्ज्ञ : होय जनाब.

वकील : बॉम्ब डिस्पोजल स्क्वाडचं काम काय असतं?

बॉम्ब- तज्ज्ञ : जिथे बॉम्ब पडलेला असतो, आम्ही तिथे जाऊन बॉम्ब डिफ्यूज करतो. म्हणजे तो निकामी करतो.

वकील : मग त्याचा स्फोट नाही होत?

बॉम्ब- तज्ज्ञ : निकामी झाल्यावर नाही होत- स्फोट नाही होत.

वकील : आणि तुम्ही पोहोचताच बॉम्बचा स्फोट झाला तर?

बॉम्ब- तज्ज्ञ : आम्ही पुरेपूर काळजी घेतो. पण अनेकदा स्फोट होऊही शकतो.

वकील : तुम्ही या आधी कधी बॉम्ब डिफ्यूज केला आहे?

बॉम्ब- तज्ज्ञ : किती तरी वेळा... जनाब.

वकील : स्वतःच्या जिवाचा धोका पत्करून?

बॉम्ब- तज्ज्ञ : आता... हे तर आमचं कामच आहे सर!

वकील : आणि हे खतरनाक काम करताना जर का स्फोट झाला...आणि तुमचा मृत्यू झाला... तर मग?

बॉम्ब- तज्ज्ञ : तर मग काय जनाब, माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी काही बंदुकांच्या फायरिंगनी मला सलामी दिली जाईल. टीव्हीवर सीरियल पाहून पाहून कंटाळलेल्या माझ्या

मोहल्लेवाल्यांचा मूड बंदुकांचं फायरिंग पाहून सुधारेल आणि असे देखावे पुन्हा पुन्हा पाहायला मिळावेत असं त्यांना वाटू लागेल आणि या एका दिवसाच्या सन्मानामुळे  माझ्या घरवाल्यांनाही आनंद होईल. त्या आठवणी काढून ते मनातल्या मनात म्हणत राहतील, की अशा गोष्टी वारंवार झाल्या तर! आणि मग माझ्या घरवाल्यांना एक्स ग्रेशिया ग्रांट म्हणून वीस हजार रुपये; माझ्या बायकोला शिलाईमशीन आणि घरवाल्यांना एक मेडल मिळेल. शिलाई-मशीननी माझी बायको जुने, फाटके कपडे ठीकठाक करून स्वतः खूप काहीतरी करते आहे असं मानेल आणि वीस वर्षांनंतर... मेडल दाखवून माझ्या मुलांना नोकरी मिळणं कदाचित सोपं जाईल.      

वकील : (जोर देत) नोकरी मिळणं कदाचित सोपं जाईल. युअर ऑनर... पाहिलंत आपण? एका बाजूला हा बहादूर, हा शूरवीर आहे; जो वीस वर्षांनंतर मुलांना कदाचित मिळणार्या नोकरीकरिता ... हे शब्द नोट केले जावेत, युअर ऑनर... कदाचित मिळणार असलेली नोकरी ... आणि या कदाचित मिळणार असणार्या नोकरीच्या पुसटशा आशेवर हा आपल्या जिवाचा धोका पत्करतो आहे. (तज्ज्ञाला उद्देशून) हे कर्तव्यनिष्ठ शूरवीरा- मी तुला सलाम करतो. (जजला संबोधत) आणि युअर ऑनर, दुसरीकडे हा स्वार्थी माणूस (आरोपी) आहे जो लोकांच्या जिवाला धोका निर्माण करतो आहे. (बॉम्बतज्ज्ञाला उद्देशून) तुम्ही या माणसाला (आरोपीला) पहिल्यांदा केव्हा आणि कुठे पाहिलं?

बॉम्ब- तज्ज्ञ : मी या माणसाला पहिल्यांदा रेल्वेच्या एका डब्यात पाहिलं. म्हणजे झालं असं की, आमच्या ऑफिसमध्ये पोलिसांचा फोन आला की रेल्वेच्या डब्यात बहुतेक एक बॉम्ब आहे. आम्ही ताबडतोब तिथे पोहोचलो.  रेल्वेचा डबा रिकामा होता. सगळे प्रवासी उतरून गेले होते. आम्ही खूप सावधगिरी बाळगत आस्ते आस्ते डब्यात शिरलो तर आम्हाला दिसलं, की हा माणूस एका सीटवर बसून काहीतरी लिहितो आहे. 

जज : डबा रिकामा होता?

बॉम्ब- तज्ज्ञ : होय सर, डब्यात याच्याशिवाय कोणी नव्हतं. मी त्याला विचारलं, ‘बॉम्ब कुठे आहे?’ त्याने खुणेने सीटखाली दाखवलं आणि लिहू लागला... मी सीटखाली पाहिलं - तिथे एक गाठोडं पडलं होतं. मी त्याला विचारलं, कीयाच्यात बॉम्ब आहे का?’ तर तो म्हणाला, कीमला काय माहीत, तुम्ही स्वतःच पाहा.’ असो, मी गाठोडं खूप सावधपणे चेक केलं, पण त्याच्यात काहीच नव्हतं. काही बॉम्ब-बिम्ब नव्हता. मी आरोपीला विचारलं, ‘तू काय लिहितो आहेस?’ तर म्हणाला, ‘मी शायरी करतो आहे...’ (लगेच

कोर्टरूममध्ये कोणाच्यातरी हुंदक्यांचा आवाज घुमू लागतो. सगळेजण आवाज कुठून येतो आहे ते माना वळवून पाहू लागतात. जजही इकडे-तिकडे बघू लागतो.) 

जज : कोर्टात कोण रडतं आहे?

वकील : ती एक तरुण मुलगी रडते आहे... युअर ऑनर.

जज : (मुलीला) तू का रडते आहेस?

मुलगी : मी किती कमनशिबी आहे. हा माझ्यासाठी शायरी करत होता आणि मी - मी मात्र त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली.

जज : कायद्यात भावनांना काही स्थान नसतं. अशा प्रकारचं भावनात्मक बोलून न्याययंत्रणेची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नाबद्दल तुझ्याविरुद्धही कारवाई केली जाऊ शकते- म्हणून काळजीपूर्वक वाग. कामकाज पुढे चालू  करा.

वकील : तर गाठोड्यात बॉम्ब नव्हता.

बॉम्ब- तज्ज्ञ : नव्हता...

वकील : पण असू शकला असता... 

बॉम्ब- तज्ज्ञ : हो. असू शकला असता.

वकील : बरोबर...  गाठोड्यात बॉम्ब असू शकला असता. 

जज : (वकिलाला उद्देशून) आरोपीने पोलिसांना खबर दिली होती का?

वकील : नाही, युअर ऑनर.

जज : तर मग पोलिसांना माहिती कोणी दिली?

वकील : कोणी दुसराच असावा, युअर ऑनर.

जज : तो माहिती देणारा जो कोणी होता, खात्रीने तो एक जबाबदार नागरिक होता. कुठे आहे तो? त्याला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे.

वकील : मला वाटतं तो जबाबदार नागरिक नव्हता, युअर ऑनर, पण- हो - तो शहाणासुरता नक्कीच होता. म्हणूनच बॉम्ब सापडत नाही असं कळताच कुठेतरी जाऊन लपला. कारण, पोलिसांचा मौल्यवान वेळ वाया घालवल्याबद्दल त्याच्यावर खटला भरता आला असता. जर खरोखरच तो जबाबदार नागरिक असता तर शेवटपर्यंत तिथेच उभा राहून स्वतःवर केस करण्यात त्याने पोलिसांना सहकार्य केलं असतं.

जज : ते असू द्या, पण ही चांगली गोष्ट आहे ना की, आपल्या देशात शहाण्या नागरिकांची संख्या वाढते आहे.

वकील : येस, युअर ऑनर! त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. आणि आश्चर्यकारक तथ्यं उघडकीस आली. आरोपी म्हणाला, की त्याने काय म्हणून गाठोड्याच्या

मालकाचा शोध घेत हिंडावं? आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांवर नजर ठेवणं हे त्याचं काम नाही - पोलिसांचं काम आहे. 

जज : (आरोपीला) का? तू असं म्हटलं होतंस?

आरोपी : अर्थात. ते पोलिसांचंच काम आहे. मी माझी बेकारी, महागाई, घर, लग्न अशा जीवनाच्या

समस्यांवर उपाय शोधू की सरकारी संकटांचे उपाय शोधत फिरू?

जज : सरकारी संकटं? तुला काय म्हणायचं आहे?

आरोपी : पूर, वादळ, दुष्काळ, भूकंप इ. ही नैसर्गिक अरिष्ट आहेत, युअर ऑनर आणि त्या आपत्तींचा मुकाबला आपण सर्वजण मिळून करतो. परंतु- ही महागाई, बेकारी, लाच-लुचपत, काळा बाजार, कत्तली व लुटालूट ... दहशतवाद... ही सगळी संकटं सत्ताधार्यांनी- सरकारांनी पैदा केलेली असतात. यांच्यावरचे उपाय सरकारांजवळ असतात. मी काय करू शकतो?

जज : पण, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपल्या आजूबाजूला ठेवलेल्या सामानाची पडताळणी करावी की ते कोणाचं आहे - म्हणजे जर का त्याच्यात बॉम्ब असला तर वेळेवर कारवाई करून त्याचे व इतरही अनेक लोकांचे प्राण वाचवता यावेत. हे सगळ्या नागरिकांचं कायदेशीर कर्तव्य आहे.

आरोपी : नाही... सामान्य नागरिकाचं हे कर्तव्य नाही. सामान्य नागरिकाचं कर्तव्य आहे, की तो जे काही कमावतो त्याच्यावर सरकारला टॅक्स दिला पाहिजे. मी इन्कम टॅक्स देऊ शकत नाही कारण, युअर ऑनर, मी बेरोजगार   आहे. पण बेकार असलो तरी कुठून ना कुठून उधार घेऊन बाकीचे सगळे टॅक्स देत आहे. सेल्स टॅक्स, एक्साईझ टॅक्स, रोड टॅक्स, हा टॅक्स, तो टॅक्स आणि इकडनं - तिकडनं उधार घेऊन मी हे टॅक्स अशाकरिता देतो की सरकारने  माझं संरक्षण करावं. पण टॅक्स देऊनही बॉम्ब किंवा बेकायदेशीर हत्यारं जर मलाच शोधून काढायची असतील, तर मग सरकार काय करतं आहे?

जज : परंतु सामान्य नागरिक जर सावध राहिला नाही, तर तो आणि तू आणि इतर अनेक लोक बॉम्बस्फोटात मरूसुद्धा शकतात.

आरोपी : मग मी काय करू? रस्त्यावरनं चालताना बॉम्ब शोधत राहू? पाहावं तिथे लिहिलेलं आहे की, आसपासच्या सामानाच्या मालकांना शोधा ... रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला उचलायचं नाही, तो बॉम्ब असू शकतो. ... कडेला चहा जरी प्यायचा असला तरी आजूबाजूला पाहत राहू की कोणी इसम एके ४७ घेऊन तर उभा नाही! हे काय माझं काम आहे? (ओरडून) या-या-बेकारी आणि उपासमारीमध्ये मला मनःशांती मिळवण्याचाही अधिकार नाही का? मला ही मोफतची सरकारी कामं उपासमार होत असतानाही करावी लागणार का? (कोर्टात दीर्घकाळ स्तब्धता). 

जज : आणि या बेपर्वाईमुळे तू स्वतः जर मरून गेलास तर ...

आरोपी : तर, जनाब--वाला, तशीही मी वाचण्याची गॅरंटी काय आहे ? माझं मरणं तर तसंही नक्की झालेलं आहे. युरिया आणि साबणाने बनवलेल्या दुधाचा चहा पितो आहे. गुरांच्या इंजेक्शनांनी पिकवलेल्या भाज्या खातो आहे. महागडी आणि नकली औषधं रिचवतो आहे. सदोष बांधकामामुळे कोसळणार्या सरकारी इमारतींच्या ढिगार्यात आपली कबर बनवतो आहे. रस्ते अपघातात गाडीखाली कुत्र्यासारखं मरण पत्करतो आहे. किंवा गल्लीतल्या गुंडांच्या गोळ्या खाऊन, लॉकअपमध्ये पोलिसांच्या टॉर्चरमुळे नाहीतर क्रॉस-फायरिंगमध्ये रोज मारला जातो आहे. नकली एन्काउंटरमध्ये मरतो आहे. दंग्यांमध्ये कापला जातो आहे.

यास्तव, युअर ऑनर, एखाद्या बस-स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये, पब्लिक

टॉयलेटमध्ये कधीही - कुठेही जर एखादा स्फोट झाला, मी अचानक प्रेत बनलो आणि माझ्या फोटोवर प्लॅस्टिकच्या फुलांचा हार जरी चढला, तरी त्यात वाईट ते काय आहे? चांगलंच होईल. उपासमारीमुळे रडत-कुढत मरण्याची तरी वेळ येणार नाही.

जज : तू अँग्री यंग मॅन आहेस की काय ?

आरोपी : नाही - माझ्या अँग्री यंग मॅन बनण्याने या मुर्दाड समाजाला काहीही फायदा होऊ शकत नाही. त्याने माझं ब्लडप्रेशर तेवढं वाढू शकेल. माझ्या मेंदूतल्या शिरा फुटू शकतील. मला मरण येऊ शकेल.

वकील : पण - पण बेरोजगार असूनही शायरी करण्याची चैनबाजी तू करू शकतोस. एवढंच नव्हे; तर वस्तुतः स्वातंत्र्याच्या बदल्यात तुला जी मूलभूत कर्तव्यं निभावायची आहेत, ती बजावायला चक्क नकार देऊन आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात टाकून तू देशाविरुद्ध आणि समाजाविरुद्ध द्रोह करतो आहेस. तर मग युवर ऑनर, आपण पाहिलं की, आरोपी हा एक निर्ढावलेला कायदे मोडणारा इसम किंवा कायदा-भन्जक तर आहेच आहे; शिवाय त्याची सामाजिक वर्तणूक समाजासाठी किती खतरनाक आहे! या कारणांस्तव कोर्टाला माझी विनंती आहे की समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे अत्यावश्यक आहे, की अशा लोकांना कठोरात कठोर सजा ठोठावण्यात यावी, जेणेकरून इतरांना धडा मिळेल. दॅट इज ऑल, युअर ऑनर! (जज फायली उलट-सुलट करतात. लोक आपापसांत गप्पा मारू लागतात. काही वेळ तसाच जातो.)

जज : ऑर्डर... ऑर्डर...! या खटल्यातील  सगळे साक्षी-पुरावे तपासल्यानंतर कोर्टाचा असा निष्कर्ष आहे की, आरोपी हा फक्त सरावलेला कायदे-भन्जक नसून जीवनाप्रती त्याची विचारधारा ही आत्मघातकी आणि विघातक आहे. त्याला ना स्वतःच्या आयुष्याची पर्वा आहे ना सामान्य नागरिकांच्या जीवनाची फिकीर आहे. त्याचा हा दृष्टिकोन समाजाकरिता अत्यंत घातक आहे. म्हणून हे कोर्ट आरोपीला निर्विवादपणे गुन्हेगार ठरवत आहे. आता शिक्षेबद्दल... गुन्हेगाराला शिक्षा देण्याची दोन उद्दिष्टं असतात. एक हे की, शिक्षेपासून इतरांना धडा मिळावा. दुसरं उद्दिष्ट म्हणजे खुद्द गुन्हेगाराला पश्चात्ताप व्हावा. आपल्या कृत्यांमुळे किंवा

नाकर्तेपणामुळे आपण समाजातील इतर लोकांना किती मोठा धोका निर्माण केला आहे, त्यांच्याविरुद्ध किती प्रचंड गुन्हा केला आहे, हे त्याच्यावर बिंबावं. तथापि प्रस्तुत गुन्हेगाराचा विचार करता हे स्पष्ट आहे, की त्याला आपण केलेल्या किंवा न केलेल्या कृत्यांबद्दल बिलकुल दुःख नाही. त्याला चांगलं काय नि वाईट काय याची जाणीवदेखील नाही. याच्यावरून कळतं, की प्रस्तुत गुन्हेगार हा स्वतःची शुद्ध हरपलेला इसम आहे, अथवा मानसिक रुग्ण आहे. तरीही अर्थातच गुन्हेगाराला सजा देण्यात येईल. परंतु जे लोक गुन्हेगाराच्या या मानसिक अवस्थेसाठी वा आजारासाठी जबाबदार आहेत, त्यांना सर्वप्रथम सजा मिळायला हवी. पोलिसांनी गुन्हेगाराच्या आईबापाला नक्कीच अटक केलं असेल, कारण त्यांच्या चुकीच्या संगोपनामुळे व शिकवणुकीमुळेच गुन्हेगार त्याच्या सध्याच्या अवस्थेप्रत पोहोचला आहे. आईबापांनी गफलत केली नसती आणि सरकारला वेळीच माहिती पुरवली असती तर या गुन्हेगारावर उपचार होऊ शकले असते. त्याला एक कार्यक्षम आणि सुविद्य नागरिक बनवता आलं असतं.

वकील : युअर ऑनर, मी कोर्टाला खात्रीपूर्वक सांगतो की, पोलिसांनी गुन्हेगाराच्या आई-वडिलांना गिरफ्तार करण्याची पुरेपूर कोशिश केली, पण... पण 

जज : पण काय?

वकील : ते कायद्याच्या लांब हातांपलिकडे निघून गेले. अत्यंत खेदपूर्वक मी हे तथ्य कोर्टापुढे नमूद करतो आहे.

जज : (संतापाने) ते लपून बसले आहेत का? तसं असेल तर हे कोर्ट या गुन्हेगारी गफलतीसाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध कडक कारवाई करेल. असं तर नाही झालं ना की, ज्या देशांसोबत फरार झालेल्या गुन्हेगारांना परत आणण्याचे आपले करार नाहीत अशा एखाद्या देशात ते आईबाप पळून गेले?

वकील : नाही युअर ऑनर, त्याहून पुढे जाऊन, कायद्याला धोका देऊन आपल्या गुन्ह्यांची सजा भोगण्याच्या आधीच ते मरून गेले आहेत.

जज : मरून गेले आहेत? कसे?

वकील : ते नदी पार करत होते. अचानक पूर आला. त्यात ते वाहून गेले.

जज : दोघं?

वकील : येस युअर ऑनर...

जज : नदीमध्ये वाहून गेले? च् च् च् (अवाक होतात. पुष्कळ वेळ दुःखाने डोकं हलवत राहतात.)

जज : कमाल आहे... कायद्यापासून वाचण्यासाठी लोक काय-काय पद्धती शोधून काढतात... बरं ते असो ... कोणत्याही माणसाच्या जडणघडणीमागे केवळ त्याचे आईबाप असतात असं नाही, तर त्याचे मित्र, त्याचे मोहल्लेवाले, शाळेतले शिक्षक या सर्वांचाच काही ना काही सहभाग असतो. हे सगळेच काही ना काही प्रमाणात जबाबदारी निभावण्यात कमी पडल्याबद्दल दोषी आहेत आणि हा इसम गुन्हेगार म्हणून आज आपल्यासमोर उभा असेल तर त्या सगळ्या लोकांचा कोणत्या ना कोणत्या प्रमाणात यात हात असल्याचं   निश्चित होतं. तर मग त्या लोकांपैकी कोणाला गिरफ्तार करण्यात आलं आहे का?

वकील : युअर ऑनर... या आरोपीची एक खास बात ही आहे की, हा आपल्या प्रत्येक कायदेभंगाच्या कारवाईनंतर मीडियाचं लक्ष आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. हा मीडियाला आपल्या सोबत घेऊनच पुढे जातो. बसची घटना, पार्कमध्ये फुलं तोडण्याचं प्रकरण, चहाच्या दुकानाची बाब असो की, रेल्वेच्या डब्यात बॉम्बचा शोध घेणं असो, या गुन्हेगाराने जेव्हा जेव्हा कायदेभंग केला, कोणतं तरी कृत्य तडीस नेलं, तेव्हा तेव्हा मीडियाचं लक्ष वेधून घेण्यात तो यशस्वी झाला. अशीच त्याची ही केस एवढी मशहूर झाली आहे! आता कोर्टरूममधली ही गर्दीच पहा ना, आज दीर्घ काळानंतर कोर्टाच्या बाहेर मीडियावाल्यांचीही झुंड पाहायला मिळते आहे, युअर ऑनर! 

जज : पण केसची इतकी पब्लिसिटी का होऊ दिली? पोलिसांनी सावधगिरी का नाही बाळगली?

वकील : पोलिसांची काही चूक नाही, युअर ऑनर... वर्तमानपत्रांत करप्शन, स्कँडल्स आणि वांशिक दंग्यांच्या बातम्या वाचून वाचून लोक बोअर झाले आहेत. बातम्या शोधणार्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची तर अशी हालत आहे की, अपघातात जखमी झालेल्याला स्ट्रेचरवरून नेत असतानाही अँकर विचारतो की आता तुम्हाला कसं वाटतं आहे, अथवा पोलिस स्टेशनवर रेपची तक्रार नोंदवायला आलेल्या रडणार्या महिलेसमोर माईक धरून विचारलं जातं की रेप होत असताना तुम्हाला कसं वाटत होतं, तुम्ही रेप एन्जॉय केला का? देशभरात काही बातम्याच शिल्लक नाही राहिल्यात, युअर ऑनर. पूर्वी ज्यांना बातम्या मानलं जायचं त्या आता नित्यनेमाच्या गोष्टी बनल्या आहेत. म्हणूनच ही केस एवढी मशहूर झाली आहे. मी कोर्टाला खात्रीपूर्वक सांगतो,  की गुन्हेगाराच्या आईबापाच्या मरणाची बातमी मिळताच तात्काळ पोलिसांनी सर्वांच्या घरांवर छापे मारले, पण शिक्षेच्या भीतीमुळे ते सगळे लोक आपापली घरं सोडून किंवा मिळेल त्या किमतीला विकून फरार झाले आहेत. 

जज : (उपहासाने) किंवा पोलिसांनी पैसे घेऊन त्यांना फरार होऊ दिलं आहे! पोलिसांच्या बेजबाबदार वागणुकीची तीव्र दखल घेत हे कोर्ट त्या समस्त लोकांना फरार घोषित करत आहे, आणि त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी करताना पोलिसांनाही वॉर्निंग देत आहे की, सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कोर्टापुढे पेश करण्यात यावं, जेणेकरून गुन्हेगार या अवस्थेपर्यंत पोहोचण्यामागे ही माणसं कसकशी जबाबदार आहेत हे निश्चित करण्यात यावं आणि त्यानुसार त्यांना सजा ठोठावण्यात याव्यात. यायोगे बाकी समाजाला धडा मिळेल की, कायद्याकडे दुर्लक्ष करणं व कायद्याचं उल्लंघन करणं हा गंभीर गुन्हा आहे. वस्तुतः कर्तव्याप्रती बेजबाबदारीने व बेपर्वा वागण्याने अशा प्रकारच्या गुन्हेगारांची वाढ होते जी नंतर

समाजाला धोकादायक ठरते. कोर्ट हुकूम देत आहे की, या गुन्हेगाराला सक्त बंदोबस्ताच्या कोठडीत ठेवण्यात यावं. कोर्ट बरखास्त करण्यात येत आहे.

मुलगी : (ओरडून) हा जुलूम आहे. या निरपराध माणसाला सोडून द्या..सोडून द्या. हा जुलूम आहे.. जुलूम आहे.

जज : नाही. हा कायदा आहे आणि कायदे-भन्जन कदापि खपवून घेतलं जाणार नाही... (गुन्हेगाराला हातकड्या घालून बाहेर नेण्यात येतं. मुलगी हुंदके देऊ लागते व गुन्हेगाराच्या मागे मागे चालू लागते.)

 

सुकुमार शिदोरे

९४२२५२६६४८

                                                               sukumarshidore@gmail.com 

(उर्दू लेखक बलराज बख्शी (उधमपूर) यांचेकानून शिकननामक लघुनाट्यइन्शाया द्वैमासिकात तीन भागात प्रकाशित झालं. तिसरा भागइन्शाच्या नोव्हेंबर- डिसेंबर २०१९ च्या अंकात प्रसिद्ध झाला. त्या भागाचा हा अनुवाद. या अनुवादासाठी अनुमती दिल्याबद्दल लेखक वइन्शायांचे आभार

अनुवादक : सुकुमार शिदोरे)

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८