कोरोना से डरो ना - स्वाती दाते
मार्चपासूनच आम्ही कोरोनाची लागण होऊ नये म्हणून घरी योग्य ती सगळी काळजी घेत होतो. एक तास नियमित व्यायाम आणि प्राणायाम करत होतो. तरीही जूनच्या अखेरीस एक दिवस माझ्या मुलीला ताप आला. फॅमिली डॉक्टरांच्या औषधाने दोन दिवसांत ती बरी पण झाली. आणखी दोन दिवसांनी मुलाला ताप आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी नवरा आजारी पडला. दोघांनाही चव आणि वास कळत नव्हता. त्यामुळे आमच्या डॉक्टरांनी कोविडची तपासणी करायला सांगितली. त्यांनीच तपासणीची सगळी व्यवस्था केली. लॅबचा माणूस घरी येऊन स्वॅब घेऊन गेला. दुसर्या दिवशी रिपोर्ट्स आले- दोघंही पॉझिटिव्ह होते.
या सगळ्यादरम्यान मी
कायम मास्क लावूनच घरात वावरत होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही दीनानाथ
हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे कोविड-१९ होम
क्वारंटाइन रुग्णांसाठी वेगळा विभाग तयार केलेला होता. तिथे आधी
एका ज्युनिअर डॉक्टरने दोघांना तपासलं. बीपी आणि ऑक्सिजन लेवल
बघितली. नंतर तीन मिनिटं बाहेर चालायला सांगून परत ऑक्सिजन लेवल
तपासली. आणि मग सिनियर डॉक्टरकडे पाठवलं. त्या डॉक्टरनी सगळे रिपोर्ट्स पाहून ताप कधीपासून येतोय, सर्दी-खोकला आहे का, दम लागतो का,
इ. माहिती विचारली. नंतर
होम क्वारंटाइनसाठी काय करावं लागतं ते समजावून सांगितलं.
त्यांनी आम्हाला एक
किट दिलं.
त्यात मास्क, हॅन्ड ग्लोव्ह्ज, ऑक्सिमीटर, थरमॉमीटर आणि आयसोक्लोरीनच्या गोळ्या होत्या.
दर आठ तासांनी मास्क बदलायचा, आयसोक्लोरीनच्या
तीन गोळ्या एक लिटर पाण्यात टाकून मिश्रण बनवून ठेवायचं (हे मिश्रण
पुढे ४८ तास वापरू शकतो), या मिश्रणाने रोज खोलीची फरशी,
दाराच्या कड्या, दिव्या-पंख्याची
बटणं, नळ इ. पुसून घ्यायचं, पण हे करताना हॅन्ड ग्लोव्ह्ज न विसरता घालायचे, असं
सांगितलं. वापरलेले मास्क, हॅन्ड ग्लोव्ह्ज
या मिश्रणात ४५ मि. बुडवून ठेवायचे, त्यानंतर
पिळून घेऊन मगच कचर्यात टाकायचे, असंही
सांगितलं. दोघांनाही ताप आला तर क्रोसीन किंवा कॉम्बिफ्लॅम घ्यायची
होती. ताप उतरला नसता किंवा श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला
असता किंवा ऑक्सिजन लेवल ९३ पेक्षा कमी झाली असती तर मात्र लगेच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होणं गरजेचं होतं. त्याशिवाय फक्त मल्टिव्हिटॅमिनच्या
गोळ्या घ्यायच्या होत्या. या सर्व सूचना देऊन त्यांनी दोघांना
१७ दिवस होम क्वारंटाइनची परवानगी दिली.
डॉक्टरांनी घरातल्या
बाकीच्यांची पण कोविड टेस्ट करायला सांगितली होती. त्याप्रमाणे घरी आल्यावर मी,
माझी मुलगी आणि माझा भाचा यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला. दोन दिवसांनी त्याचे रिपोर्ट्स आले. मुलगी आणि भाचा निगेटिव्ह
होते; मी मात्र पॉझिटिव्ह! परत दीनानाथची
वारी झाली. सगळे सोपस्कार पूर्ण करून मलाही मुलगी आणि भाच्याच्या
जीवावर होम क्वारंटाइनची परवानगी मिळाली. पण मुलगी आणि भाचा यांनीही
घराबाहेर पडू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला. मला थोडं टेन्शन
आलं होतं, कारण आम्हा तिघांना खोलीतून बाहेर जायचं नव्हतं.
पण माझ्या लेकीने आणि भाच्याने सगळं व्यवस्थित सांभाळलं- ब्रेकफास्ट, दोन्ही वेळची जेवणं, साफसफाई, भांडी, सगळं!
आम्ही सुरुवातीलाच रीतसर
आमच्या सोसायटीला कळवलं होतं. सोसायटीतली आमची पहिलीच कोव्हिड पॉझिटिव्ह
केस होती. पण सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली. आमचे शेजारपाजारी, पुण्यातले नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी अधूनमधून जेवणाचा डबा पाठवला. त्यामुळे
मुलीवरचा ताण थोडा कमी झाला.
मला आणि मुलाला कोणतीही
लक्षणं नव्हती,
तर नवर्याला काही किरकोळ लक्षणं होती.
त्या १७ दिवसांत मुलगा ऑनलाईन क्लास, शाळा यात
व्यग्र होता. नवरा ऑफिसच्या कामांत गर्क होता. मला मात्र वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्न होता. सुरुवातीला
खूप अवघड गेलं, पण नंतर मी मोबाईलवर अनेक कार्यक्रम बघायला सुरुवात
केली. कधी आम्ही तिघं पत्ते, ल्यूडो,
सापशिडी खेळायचो. मुख्य म्हणजे नवरा आणि मुलाचा
क्वारंटाइनचा काळ माझ्या आधी आठ दिवस संपला होता, तरी ते दोघं
माझं क्वारंटाइन संपेपर्यंत सतत माझ्याबरोबर होते. त्यामुळे मला
एकटेपणा अजिबात आला नाही.
यादरम्यान आमच्या डॉक्टर आमच्याशी कायम संपर्कात होत्या. आम्ही दर सहा तासांनी टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेव्हल पाहून त्यांना पाठवत होतो. इतरही अनेक लोकांचे रोज फोन यायचे- पंतप्रधान कार्यालय, पुणे कॉर्पोरेशनची माणसं, डॉक्टर, क्षेत्रीय कार्यालय, पोलीस स्टेशन... सगळे विचारपूस करायचे, काही त्रास नाही ना याची चौकशी करायचे. कॉर्पोरेशनच्या माणसांनी सगळं घर सॅनिटाइझ करून दिलं. त्यांनी आमच्या शेजाऱ्यांचंही टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेवलची तपासणी केली. आमचा कचरा न्यायला रोज कॉर्पोरेशनची गाडी यायची. आमच्या फॅमिली डॉक्टरनी तर आमची फार काळजी घेतली. या सगळ्यांच्या मदतीमुळे आम्ही आता करोनामुक्त झालोय.
या अनुभवातून गेल्यावर
मला इतकंच सांगायचंय, की या आजारात वास, चव नसणं हे
मुख्य लक्षण आहे. तसं दिसल्यास लगेच तपासणी करून घ्या.
लवकर निदान होणं केव्हाही चांगलंच. आणि रिपोर्ट
पॉझिटिव्ह आला तरी न लपवता त्याबद्दल सोसायटीला आणि जवळच्या लोकांना सांगा.
त्यांची मदतच होते. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन
भेटा. डायबिटीस, हृदयविकार, ब्लडप्रेशर असा एखादा विकार असेल किंवा वय ६५ च्या पुढे असेल तर थोडी अधिक
काळजी घेण्याची गरज आहे. बाकीच्यांना इतकंच सांगेन- कोरोना से डरो ना!
स्वाती दाते
पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा