जगाला हात धुवायला शिकवणारा ‘डॉक्टर’ डॉ. ईगनाज सेमेलवाईस - शंतनू अभ्यंकर

जगभरात कोरोनाचा प्रसार वाढायला लागला तसं हात धुण्याचं महत्व सर्वांवर नव्याने बिंबवलं जातंय. पण हातांची स्वच्छता आजारी माणसाच्या जीवनमरणाच्या दृष्टीने कळीची ठरू शकते, याचा शोध फार जुना नाही. अलीकडेच, म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी हंगेरीच्या डॉक्टरला हा शोध लागलात्या शोधाची ही कथा.

अंगणवाडीत मुलांना एकहात धुण्याचं गाणंशिकवतात. मुलं तर्हेतर्हेने हातावर हात घासत ते गाणं म्हणतात-

हातात ख्येळतो पैसा

पाण्यात पवतो मासा

बाळ चोखतो अंगठा

एक घास चिऊचा 

एक घास काऊचा...

हात कसे धुवावेत हे शिकवणारं हे अॅक्शन पॅक्ड गाणं मी ऐकलं आणि माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्याच.    

किती साधा संदेश. घडत्या वयात मेंदूत कोरून काढला की आयुष्य निरामय करणारा. साबणाने छानपैकी हात धुवा. कोणत्याही साबणाने. स्पेशल, पीएच बॅलंस्ड, कोमलांगी साबणाने धुवा अथवा जंतुनाशक मर्दानी साबणाने धुवा, कशानीही धुवा, पण हात धुवा म्हणजे झालं. या एवढ्याशा कृतीने आजवर कितीतरी विकृती दूर केल्या आहेत. अन्न शिजवून खाण्याखालोखाल माणसाच्या इतिहासातील ही सर्वात आरोग्यदायी कृती म्हणता येईल. निव्वळ हात धुण्याने लोकांच्या जीवनात क्रांती झाली आहे. एक निःशब्द, अदृश्य क्रांती.

सध्या कोरोनाच्या साथीने सगळ्यांनाच वारंवार हात धुण्यास सांगितलं जात आहे, पण एके काळी डॉक्टरांनी हात धुणं हेही अत्यंत क्रांतीकारी पाऊल ठरलं होतं. त्याला कसून विरोध झाला होता.

हात धुवा असं सर्वप्रथम सांगणारा होता हंगेरीचा डॉ. ईगनाज सेमेलवाईस. तो पेस्ट (बुडापेस्ट या जुळ्या शहरातील पेस्ट)  येथील कॉलेजातून डॉक्टर झाला. आणि व्हिएन्नातल्या सरकारी दवाखान्यात प्रॅक्टिस करायला लागला. तेव्हा बाळंतमृत्यूंचं प्रमाण खूप होतं. अर्थात दवाखान्यात बाळंतपण हा प्रकार त्या काळात फारसा नव्हताच. अगदी गरीब, अडल्यानडल्या बायकाच तिथे यायच्या, बाळंत व्हायच्या आणि त्यातल्या सुमारे २५ टक्के आपले प्राण गमवायच्या. विसातल्या पाच बायका मरणार म्हणजे भयंकरच प्रकार होता. आज महाराष्ट्रात दहा हजारांत पाच बाळंतमृत्यू घडतात आणि हे प्रमाणही आणखी खूप कमी करता येण्यासारखं आहे. पण त्या काळीहे देवघरचे नेणेअसंच सगळ्यांना वाटायचं. ईश्वरेच्छेपुढे इलाज नाही असं समजून सगळे गप्प बसायचे. बायका जायच्या त्या बहुतेक बाळंतज्वराने. म्हणजे प्रसूतिनंतर काही दिवसांत त्यांना फणफणून ताप चढायचा, जननमार्गातून विशिष्ट दर्प असलेला पू वाहायला लागायचा आणि ग्लानी येऊन त्यांचं शरीर थंड पडायचं ते कायमचं. अशा मृत्यूची कारणं, म्हणजे पंचमहाभूतं किंवा हवेतील अदृश्य रोगकारक शक्ती, अशी समजूत तेव्हा प्रचलित होती. या मायावी शक्तीला नाव होतं, मायझम. (बोलीभाषेत या तापालावैद्याचा तापअसंही एक नाव होतं.)

सेमेलवाईसच्या लक्षात आलं, की या मृत्यूंमध्ये काही साम्यं आहेत. दवाखान्यात एका विभागात बायका जास्त मरत होत्या. तिथे वैद्यकीय विद्यार्थी काम करायचे. तिथे सगळं पुरुष राज्य होतं. दुसर्या विभागात मात्र मृत्यूची संख्या कमी होती. तिथे दाया सगळं उरकायच्या. दोन्हीत नेमकं वेगळं काय केलं जातंय याचा सेमेलवाईसने सूक्ष्म अभ्यास केला. हवा, पाणी, अन्न, उजेड, कपडेलत्ते, येणारेजाणारे अशा बर्याच गोष्टींचा विचार केला. बसून बाळंत होणं, पाठीवर झोपून होणं, कुशीवर झोपून होणं, उकिडवं बसून होणं, याने काही फरक दिसतो का तेही तपासलं. दाया बायकांना कुशीवर झोपवून बाळंत होऊ देत, असं त्याच्या लक्षात आलं. मग त्याने सगळ्यांना कुशीवर झोपवून प्रसूती केली. पण मृत्यूंच्या संख्येत शून्य फरक पडला. मृत्यूशैय्येशी घंटानाद करत, बायबल वाचणार्या पाद्रयामुळे, बाकीच्या बायका हाय खातात, ज्वर-जर्जर होतात आणि प्राण सोडतात, अशीही एक थिअरी होती. पण पाद्रयाला लांब उभं करून, घंटानाद बंद करूनही काही फरक पडेना. पुरुष डॉक्टरने प्रसूती केल्यामुळे लाजेने चूर होऊन बायकांना ताप चढत असावा अशा समजुतीच्या दृष्टीनेही निरीक्षणं केली गेली.

अखेरीस त्याला एक विशेष फरक सापडला. त्याच्या असं लक्षात आलं, की वैद्यकीय विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचा भाग म्हणून शवविच्छेदन करत आणि दरम्यान कोणी बाळंतीण आली तर तिलाही सोडवत. हे दोन्ही विभाग शेजारीशेजारीच होते. शवविच्छेदन करणारे हात जेव्हा प्रसूतीसाठी सरसावतात तेव्हा त्या बायकांनाकाहीतरीभोवत असणार, हे त्याने ताडलं. शेजारच्या वॉर्डात दाया सगळा कारभार सांभाळायच्या. तिथे शवविच्छेदन नव्हतं आणि तिथे मृत्यूदर अत्यल्प होता. 

त्याच दरम्यान त्याच्या एका सहकारी डॉक्टरचा मृत्यू झाला. तो सहकारी एका बाळंतज्वराने गेलेल्या बाईचं शवविच्छेदन करत असताना त्याच्या हाताला कापलं, जखम चिघळली आणि त्याच्या संसर्गाने त्याचा मृत्यू झाला. जखम चिघळल्यावर त्याला ताप, थंडी, विशिष्ट वासाचा पू, अशी सारी सारी लक्षणं उद्भवली. पुरुषात बाळंतज्वर? सेमेलवाईस विचारात पडला. म्हणजे त्या जखमी हातात त्या मृतदेहातूनचकाहीतरीशिरलं असणार.

मृत शरीरातीलकाहीतरीइकडून तिकडे जातंय असं त्याच्या मनाने घेतलं. मनाने घेतलं असंच म्हणायला हवं. कारण तेव्हा कुणालाच हेकाहीतरीम्हणजे काय याचा काहीही थांगपत्ता नव्हता. जंतू ठाऊक होते, पण जंतूंमुळे आजार होतात वगैरे गोष्टी तेव्हा कुणाच्या कल्पनेतही नव्हत्या.

याकाहीतरीसाठी त्यानीशव-कण’ (कॅडव्हेरस पार्टिकल्स) असा शब्द वापरला. त्याचा हा अंदाज मात्र बरोबर होता.  हेशव-कणइकडून तिकडे जाऊ नयेत म्हणून त्याने सर्वांनी प्रसूतीपूर्वी हात धुवावेत असं फर्मान काढलं. हेशव-कणनीट धुतले जावेत म्हणून ब्लीचींग पावडरचं पाणी वापरावं असंही सांगितलं. साबणाने हात धुतले तरी वास पूर्ण जायचा  नाही, म्हणून ब्लीचींग पावडरचं पाणी बरं, अशी त्याची कल्पना. झालं असं की यामुळे मृत्यूचं प्रमाण झपकन खाली आलं- 25 ट्टक्क्यांऐवजी केवळ एक टक्का! मार्च आणि एप्रिल १८४८ मध्ये तर एकही स्त्री-रुग्ण दगावली नाही.

१५ मे १८५० यादिवशी सेमेलवाईसने व्हिएन्नाच्या डॉक्टरांपुढे आपली निरीक्षणं मांडली. त्याने सुचवलेली कारणं आणि उपाय कुणालाच पटेनात. तो मात्र इरेला पेटलेला होता. पुरावे तपासण्याची मागणी, प्रतिप्रश्न म्हणजे जणू शत्रुत्व असा त्याचा आव होता. आपली आकडेवारी, युक्तिवाद सुसंगतपणे प्रसिद्ध करायला तो तयार नव्हता. त्याने विरोधकांना जाहीर पत्र लिहून त्यात उपमर्द, उपहास, अपमान, चेष्टा अशी सारी आयुधं परजली. ‘इतक्या सगळ्या बायका मारण्यात डॉक्टरांचाच हात आहे आणि यःकश्चित दायांचा कारभार डॉक्टरांपेक्षा सरस आहेअसे कर्कश्श आरोप केले. अर्थात ते आरोप फेटाळण्याकडेच बाकीच्यांचा कल होता. पेशंटस्नी मात्र हे समीकरण मनोमन मानलं होतं.    

सेमेलवाईसची आकडेवारी खणखणीत असली तरी वरिष्ठांची खात्री पटेना. तो सांगत होता ते जरा जगावेगळं होतं, सहज पटण्यासारखं नव्हतं. अदृश्य शक्ती असतात इथवर ठीक होतं, पण त्या शक्ती स्पर्शाने, आणि ते सुद्धा उदात्त भावनेने डॉक्टरने केलेल्या दैवी स्पर्शाने, इथून तिथे संक्रमित होतात हे पचणं जरा मुश्किल होतं. ‘मायझमसारखा अपशकुन हात धुण्याने फिटेल हे सहज पटणारं नव्हतंच. शिवाय हात धुण्याचंकर्मकांड’, ही काही सहज जमणारी गोष्ट नव्हती. त्यासाठी जागेवर तस्त किंवा मोरी हवी, ब्लीचिंग पावडर हवी, पाणी हवं. ते कुणीतरी भरायला हवं. ते हातावर घालणारा माणूस हवा. ते अति थंड पाणी हातावर घ्यायची शिक्षा भोगायला डॉक्टर तयार हवेत. एकूण सेमेलवाईसचं म्हणणं कुणी ऐकायला तयार नव्हतं. भरीस भर म्हणून तो १८४८ सालच्या काही राजकीय भानगडीतही पुढे होता. आता तर तो वरिष्ठांच्या मनातून पूर्णच उतरला. त्याची नोकरी गेली. त्याने पुन्हा प्रयत्न केल्यावर काही जाचक अटींवर ती दिली गेली. अपमानित सेमेलवाईस तडक व्हिएन्ना सोडून पेस्टला गेला. तिथेही त्याने आपली हात धुण्याची नवी पद्धत अंमलात आणली आणि तिथलाही मृत्यूदर एक टक्याहूनही कमी आला. आता त्याच्याही आयुष्याला जरा स्थैर्य आलं. संसार चांगलाच फुलला. पाच मुलं झाली त्याला.

बर्याच आग्रहानंतर त्याने १८६१ सालीसूतिका-ज्वराची कारणे आणि प्रतिबंधअसा ग्रंथही लिहिला. पण ग्रंथाची मांडणी अगदीच अघळपघळ होती. त्यात कोणतीही शास्त्रीय शिस्त नव्हती. त्याच्या बोलण्याप्रमाणेच लिहीण्यातही सगळी उर्मट आयुधं होतीच. त्यामुळे पुस्तकाच्या वाट्याला दुर्लक्ष आणि याच्या वाट्याला उपेक्षा तेवढी आली. त्याचं म्हणणं फारसं कोणीच मनावर घेतलं नाही.

यामुळे तो खचलाच. या उपेक्षेने का कशाने कुणास ठाऊक, पण त्याला वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं लागलं. त्याआधी त्याने कुठल्याशा पेशंटचं ऑपरेशन केलं होतं. ते करताना त्याच्या हाताला कापलं होतं. ती जखम चिघळली आणि त्यातच तो गेला. ही गोष्ट आहे १८६५ सालची.

पुढे दोनच वर्षांनी जोसेफ लिस्टरने कार्बोलीक अॅसिड वापरून निर्जंतुकीकरणाचा प्रभाव सिद्ध केला. लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉख यांनी जंतूबाधेचा सविस्तर अभ्यास मांडला आणि सेमेलवाईसच्या मृत्यूनंतर सुमारे दोन दशकांनी  ऑपरेशनपूर्वी हस्तप्रक्षालन हे कर्मकांड न रहाता नित्यकर्म झालं. वेडा ईगनाज सेमेलवाईस द्रष्टा ठरला. आता तर त्याच्या सन्मानार्थ गुगलने डूडल बनवलं आहे. ऑस्ट्रियाने तिकीट काढलं आहे. बुडापेस्ट विद्यापीठाचं नाव आतासेमेलवाईस विद्यापीठअसं आहे. आता सेमेलवाईस हीरो आहे.

हात धुण्याइतकी साधी गोष्ट लोकांना तेव्हा कशी काय बुवा पटत नव्हती, हा आपल्याला बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. पण खरं सांगायचं तर ही सगळी पश्चातबुद्धी म्हणायची. सेमेलवाईसच्या गोष्टीतून अनेक धडे शिकण्यासारखे आहेत. तो हीरो असला तरी त्या काळातले इतर सगळे झीरो नव्हते, बायका मरत असताना फिडल वाजवत बसलेले निरोही नव्हते. ऑलिव्हर वेंडेल होम्स, जेम्स सिमसन प्रभृतींनी १८४३ च्या सुमाराला जंतुबाधेची अंधुक शंका वर्तवली होती. पण उपलब्ध ज्ञान आणि तंत्रज्ञान पाहता त्यांची गाडी शंकेपुढे सरकत नव्हती.

सेमेलवाईसच्या विरोधकांचाही विरोध आंधळा नव्हता. त्यांचेही युक्तिवाद होते आणि अहंमन्य सेमेलवाईसला ते खोडता येत नव्हते. त्याला त्याच्या युक्तीमागील कार्यकारणभाव सांगता आला नाही. पण कार्यकारणभाव कळला नाही तरी उपाय लगेच निरुपयोगी ठरत नाही. हात धुण्याचा शोध त्याला अंदाजपंचेच लागला. अंदाजाने, अपघातानेही शोध लागू शकतात. लागले आहेत. पण कोणतीही शक्यता स्वीकारण्यापूर्वी अथवा नाकारण्यापूर्वी अभ्यास आणि आकडेवारी खूप महत्वाची आहे. मात्र त्याच्याकडे सबळ पुरावा असूनही आपला क्रांतिकारी शोध त्याला अंमलात आणता आला नाही. त्याला नीट जर्मन येत नव्हतं, तो ज्यू होता, तो भांडकुदळ होता, तापट होता, हेकेखोर होता, एककल्ली होता, स्थानिक राजकारणाचा बळी होता. कारणं काहीही असोत; शोध आणि व्यवस्थेमध्ये त्याची अंमलबजावणी ही वेगवेगळी कौशल्यं आहेत हेच खरं.

आज तर हात धुण्याला अनन्यसाधारण महत्व आलं आहे. अंगणवाडीत हात धुवायला शिकवतात तसं सर्जरीच्या पहिल्या पोस्टिंगलाही शिकवतात. हात धुवून चड्डीला पुसले तर अंगणवाडीत पुन्हा हात धुवायला लावतात तसं सर्जरीच्या पोस्टिंगलाही करतात. पद्धत तीच, फक्त गाणं म्हणायला लावत नाहीत एवढंच.


डॉ शंतनू अभ्यंकर

९८२२०१०३४९

                                                                                                                         shantanusabhyankar@hotmail.com

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८