वाढत्या ‘पॉझिटिव्ह’ संख्येकडे नव्हे, गंभीर रुग्णांकडे लक्ष हवं : कोव्हिडच्या आकड्यांचा खरा अर्थ सांगणारा लेख - मिलिंद वाटवे


कोव्हिड-१९ चा संसर्ग महाराष्ट्रात वाढत चालला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीची भावना तयार होतेय. त्या पार्श्वभूमीवर कोव्हिडच्या आकड्यांचा खरा अर्थ काय, हे समजावून सांगणारा लेख.

कोव्हिड रुग्णांची संख्या एकूण किती वाढली याने घाबरून जाण्याची गरज नाही. त्याऐवजी गंभीर रुग्णांची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं सांगणारा.

जॉन अॅलन पावलॅास या लेखकानी १९८८ साली इनन्युमरसी नावाचं एक पुस्तक लिहिलं. इनन्युमरसी हा शब्द तो इललिटरसीला समांतर शब्द म्हणून वापरतो. त्याचं म्हणणं असं की सामान्य माणूस शिकून साक्षर पटकन होतो, म्हणजे त्याला अक्षरं, शब्द आणि त्यांचे अर्थ चांगले समजतात. पण आकडे वाचता आले तरी आकड्यांचे अर्थ मात्र बहुतेकांना समजत नाहीत. आज कोव्हिडच्या साथीच्या संदर्भात पावलॅासच्या म्हणण्याचा पावलोपावली प्रत्यय येतो आहे. सर्व प्रकारच्या माध्यमातून आकडे नुसते फेकले जात आहेत आणि त्याचे अर्थ न कळल्यामुळेच सामान्य माणूस गोंधळलेला आणि धास्तावलेला आहे.

वास्तविक मोजमाप आणि आकडे विज्ञानात खूप महत्त्वाचे असतात. पण आकडेवारी हे दुधारी शस्त्र आहे. समजले तर फारच उपयुक्त, नाही समजले तर गोंधळ वाढवणारेच नव्हे, तर पूर्णपणे चुकीच्या मार्गाला लावणारेही. वास्तविक आकडे समजण्यासाठी जे ज्ञान लागतं ते आपण शाळेतच शिकतो. त्यापेक्षा अधिक गणित शिकण्याची गरज नसते. आकड्यांना काही सांगायचं असतं आणि ते आपण खुल्या मनाने ऐकलं तर सहज ऐकू येतं. पण हे खुलं मन दुर्मिळ आहे. आकडेवारी वापरणार्या बहुतेकांनी आकडे पाहण्याच्या आधीच स्वतःचं

मत बनवलेलं असतं किंवा कुठला निष्कर्ष काढला असता स्वतःचा फायदा आहे ते ठरवलेलं असतं. आणि मग आकड्यांना काय सांगायचंय ते न ऐकता आपल्या जे सांगायचंय ते आकड्यांमार्फत कसं वदवता येईल असं ते पाहत असतात. कोव्हिडच्या साथीचे आकडे स्वतः काय म्हणताहेत ते पाहूया. साथीच्या रोगाच्या प्रसाराचं गणित चक्रवाढ व्याजाच्या गणितासारखं असतं. आज नव्याने संसर्ग झालेली माणसं संसर्ग पसरवणार्यांच्या मुद्दलात मिळवली जातात आणि संसर्ग आणखी पसरतो. मात्र मृत्यूंमुळे किंवा बरे झाल्यामुळे या मुद्दलात दुसरीकडे घटही होत असते. जर नव्याने संसर्ग होणार्यांचं प्रमाण घट होणार्यांच्या प्रमाणापेक्षा जास्ती असेल तरच साथ पसरते. पण जेव्हा पसरते तेव्हा दिवसेंदिवस रोग्यांची संख्या चक्रवाढीने वाढतच असते. आपण जेव्हा काही प्रतिबंधात्मक उपाय वापरतो, तेव्हा या चक्रवाढीच्या गणितातला व्याजाचा दर कमी होतो. म्हणजे रुग्णांचा आकडा वाढण्याचा दर कमी होतो. आकडा तरीही वाढत राहू शकतोच. म्हणूनच आपण योजलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा काही उपयोग झाला की नाही हे आपण रोग पसरण्याचा दर कमी झाला की नाही यावरून ओळखायचं, रुग्णांच्या संख्येवरून नाही. मार्चच्या मध्यापासून ते मेअखेरपर्यंत आपण लॅाकडाऊन पाळला आणि एक जूनपासून बंधनं उठवायला सुरुवात केली. बंधनं उठवल्यावर रोग पुन्हा अधिक वेगाने पसरू लागला का? तर भारतामधल्या, महाराष्ट्रामधल्या आणि पुण्यामधल्या आलेखांकडे पाहा. दररोज किती नवे करोना पॉझिटिव्ह सापडले त्याची पाच पाच दिवसांची धावती सरासरी यात तारखेनुसार दिली आहे. फक्त त्यासाठी घातांक गणित किंवा लॅागॅरिदम वापरलं आहे. त्यामुळे ही सरासरीची आळी ज्या चढावाने वर चढते तो चढाव रोग पसरण्याचा दर दाखवतो.

आपल्याला असं दिसेल की लॅाकडाऊन उठल्यानंतर हा चढाव वाढलेला तर नाहीच, उलट भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आलेखात तो कमीच झाला आहे, तर पुण्याच्या आलेखात तो थोडा कमी होऊन परत पहिल्याइतका झाला आहे. म्हणजे लॅाकडाउन उठल्यावर रोग अधिक वेगाने पसरू लागला म्हणून आता रुग्णांचे आकडे वाढताहेत हे म्हणणं एकतर आकडे न समजण्याचं लक्षण आहे किंवा जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. अर्थातच परत लॅाकडाऊन लादणं हेही तितकंच तर्कदुष्ट आहे हे सांगायला नकोच.

पण दुसरीकडे प्रत्यक्ष रुग्णांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे वैद्यकीय सेवांवर ताण येतो आहे ही समस्याही खरीच आहे. या प्रश्नाच्या संदर्भात साथीच्या संसर्गाचा दर महत्त्वाचा नसून प्रत्यक्ष रुग्णसंख्या महत्त्वाची आहे. पण पुन्हा लॅाकडाऊन लादण्याने हा प्रश्न सुटूच शकत नाही. संसर्गाचा दर मारे कमी झाला तरी ही संख्या वाढणारच, आज ना उद्या रुग्णालये कमी पडणारच. साथीच्या सुरुवातीला लॅाकडाऊन आणण्याचा हेतू हा होता की एकदम मोठी साथ झेलायला आपल्या वैद्यकीय व्यवस्थेची तयारी नव्हती. ती करायला काही अवधी मिळायला हवा होता. लॅाकडाऊन फार काळ चालणं परवडण्यासारखंच नाही कारण लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. साथीच्या सुरुवातीपासून साथ काय वेगाने पसरू शकेल याची गणितं मांडली जात होती आणि ती प्रसिद्धही होत होती. या गणितांची दखल घेऊन वैद्यकीय सुविधा किती वाढवाव्या लागणार आहेत ते ठरवून नियोजन करता आलं असतं. प्रत्यक्षात या गणितांच्या होर्यापेक्षा कितीतरी कमी दराने संसर्ग वाढला आहे. आणि तरीही आता वैद्यकीय सुविधा अपुर्या पडत असतील तर प्रशासनाला गणित समजत नाही, याचंच ते द्योतक आहे.

पण परिस्थिती इतकी वाईट नाही हे सुद्धा आपल्याला आकडेच सांगताहेत. सर्व जगात कोव्हिडमुळे होणार्या मृत्यूचं प्रमाण सातत्याने कमी होत आहे. अनेक देशांत मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला संसर्ग झालेल्यांपैकी पाच, दहा किंवा त्याहून अधिक टक्के लोक मरत होते. काही देशात १७ % मृत्यू सुद्धा नोंदले गेले आहेत. पण एप्रिल मध्यापासून सगळीकडेच मृत्युदर कमी होत गेल्याचं दिसून आलं आहे. ते मान आता दोन टक्क्यांवर आलं आहे. भारतात हा दर चार टक्क्यांच्या वर कधीच गेला नाही पण तोही आता दोनच्या खाली आला आहे. संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी होत नाही. जर लक्षणं दिसू लागली तर चाचणी करून घेण्याची शक्यता खूपच वाढते. त्यामुळे संसर्ग झालेल्या, पण चाचणी न झालेल्या बहुतेक व्यक्ती लक्षणं न दाखवणार्या असतात. हे सर्वच देशांमधे कमी अधिक प्रमाणात खरं आहे. याचा हिशेब विचारात घेऊन काळजीपूर्वक मृत्यूदर काढणारे अभ्यासही आता प्रसिद्ध झाले आहेत. नेचर साप्ताहिकातल्या एका शोधनिबंधाने अशा अनेक अभ्यासांना एकत्र करून प्रत्यक्षात मृत्युदर ०.५ ते १% एवढाच आहे असा निष्कर्ष काढला होता. भारतात चाचणी न झालेले कोव्हिड पॉजिटिव्ह किती असतील हे नक्की सांगता येत नाही. पण त्यांचा समावेश केला तर भारतातला मृत्युदर ०.५ % हूनही बराच कमी निघू शकतो.

म्हणजे कोव्हिडची घातकता आधी वाटलं होतं त्याच्या एक दशांश एवढीच आहे. म्हणजे फार काळजी करण्याचं कारण नाही. मात्र याचा अर्थ काळजी घेण्यात हयगय करावी, असाही नाही. आधी वाटलं त्यापेक्षा कमी घातक असला तरी हा दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. वैद्यकशास्त्राचं एक तत्त्व असं आहे की प्रत्येक रोगाचा मुकाबला केलाच पाहिजे. मग रोगी चार असोत वा चार हजार, तरुण असोत वा वृद्ध, गरीब असोत वा श्रीमंत. पण आपण आकड्यांचे खरे अर्थ ओळखत असलो तर त्याप्रमाणे धोरणं बदलायला हवीत. घरात बिबट्या घुसला तर करण्याचे उपाय वेगळे असतात आणि ढेकूण झाले तर करण्याचे वेगळे असतात एवढा तरी विवेक असायलाच हवा.

पण आपल्याकडे आकड्यांचं हे बोलणं न ऐकताच अनेक धोरणं आखली आणि राबवली गेली आहेत. ही गोष्ट भारतापुरती मर्यादित नाही हे आवर्जून सांगितलं पाहिजे. सगळ्या जगातच आकड्यांचा अडाणीपणा भरपूर प्रत्ययाला आला आहे. आपण इथे प्रामुख्याने आपल्या देशाचाच विचार करणं नैसर्गिक आहे. कोव्हिडचं स्वरूप सुरुवातीला वाटलं होतं त्यापेक्षा खूपच कमी घातक आहे आणि दिवसेंदिवस त्याची घातकता आणखी आणखी कमी होत आहे याची आकडेवारी आता सर्वांसाठी खुली आहे. जर रोग भयंकर असला तर उपाय कितीही त्रासदायक असला तरी तो करावाच लागतो. प्रत्यक्षात तो वाटलं त्यापेक्षा एक दशांशानेच घातक आहे. त्यामुळे आता या रोगाविषयीची आपली धोरणं बदलायला हवीत. लॉकडाऊनचा उपाय हा पोटावर बसलेल्या माशीला तलवारीने मारण्यासारखा आहे. जोवर कॅन्सरला आळा घालण्यासाठी तंबाखू आणि सिगरेटबंदी होत नाही, तोवर सरकारने कोव्हिडला आळा घालण्याच्या उदात्त हेतूने पुनश्च लॉकडाऊन केलं यावर कुणी दूधखुळाही विश्वास ठेवणार नाही.

आकड्यांना विज्ञानात महत्त्व असलं तरी सगळ्याच गोष्टी आकड्यांमधे पकडता येत नाहीत. विज्ञानात कुठलीही गोष्ट वस्तुनिष्ठ पद्धतीने दाखवता आणि मोजता येण्याला फार महत्त्व आहे. पण प्रत्यक्षात महत्त्वाच्या असलेल्या सगळ्याच गोष्टी मोजता येण्यासारख्या नसतात. खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी मोजता येत नसतील तर ज्या गोष्टी मोजता येतात त्यांना महत्त्वाचं मानायचं, असा एक मोह वैज्ञानिकांना होतो. त्यामुळे काही गोष्टी महत्त्वाच्या असूनही त्याविषयी गरजेपेक्षा कमी बोललं जातं. अशी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपचार करणार्या डॉक्टरांचा अनुभव. किती चाचण्या झाल्या आणि किती पॉजिटिव्ह आल्या एवढंच बोलून चालणार नाही, तर प्रत्यक्ष त्यावर काम करणार्यांना काय दिसतं आहे त्याचीही दखल घ्यायला हवी. कोव्हिडच्या साथीमधे लक्षणे न दाखवणार्यांचं प्रमाण नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं अनेक अभ्यास सुचवतात. हे प्रमाण आणखी वाढेल असं सुचवणारीही काही लक्षणं दिसताहेत. तेव्हा टेस्ट पॉझिटिव्ह येते का नाही, किती जणांच्या पॉझिटिव्ह आल्या या आकडेवारीला यापुढे फार महत्त्व राहणार नाही. देण्याची आवश्यकताही नाही. सर्दी कोणाला होते याची आपण राष्ट्रीय पातळीवर नोंद ठेवतो का? जर ९५ % लोकांसाठी कोव्हिड सर्दीसारखाच असेल तर त्या प्रत्येकाची चिंता का करायची? सर्दीपेक्षा कोव्हिड खूपच जास्त घातक आहे पण तो फक्त काही टक्के लोकांसाठी. त्यामुळे पॉजिटिव्ह किती आले यापेक्षा नक्की धोकादायक लक्षणं कोणती? ती लवकर कशी ओळखायची? रुग्णालयात दाखल करणं कधी अत्यावश्यक आहे? कधी घरीच काळजी घेऊन चालेल? या गोष्टींवर अनुभवी डॉक्टरांनी अधिक संशोधन, चर्चा आणि प्रबोधन करणं आवश्यक आहे. ज्याला दाखल करण्याची आवश्यकता आहे अशा कुठल्याही कानाकोपर्यातील व्यक्तीला सुद्धा काही मिनिटांमधे अॅम्ब्युलन्स मिळेल की नाही? कुठे दाखल व्हायचं, कसं व्हायचं हे समाजातल्या प्रत्येकाला नीट माहिती आहे की नाही? यावर आता सगळा फोकस असायला हवा. संसर्ग होणार्यांपैकी अगदी कमी टक्क्यांवर घातक परिणाम दिसतात. ही टक्केवारी दिवसेंदिवस घटतही आहे. पण जोवर ती आहे तोवर अशा रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्यावर आणि त्याना वाचवण्यावर भर दिला पाहिजे. जर त्यांच्यातला मृत्युदर खाली आणण्यात आपण यश मिळवू शकलो तर बाकी लोकांत विषाणू हवा तितका बागडेना का!

आपल्या डोळ्यासमोर कॉलरा, गॅस्ट्रोसारखी उदाहरणं आहेत. एकेकाळी यांनी माणसं, विशेषतः लहान मुलं पटापट मरत होती. या रोगांचा नायनाट मुळीच झालेला नाही. याच्या जंतूंचा संसर्ग होणं मुळीच थांबलेलं नाही. पण आता मृत्यूदर एकदम कमी झाला आहे कारण याची लक्षणं दिसली तर लगेच काय करावं याविषयी योग्य प्रबोधन झालं आहे. आणि ते देशाच्या कानाकोपर्यातल्या आरोग्यसेवकांपर्यंत अगदी व्यवस्थित पोचलं आहे. म्हणजे सर्वार्थाने नसली तरी बर्याच अंशी आपण कॉलरा, गॅस्ट्रोची लढाई जिंकली आहे.

कोव्हिड पसरण्याचा वेग पाहता आपल्याला संसर्ग थांबवता येईल अशी शक्यता आता दिसत नाही. पहिल्या लॅाकडाऊनच्या काळात तो प्रयोग करून झाला. त्याने काही काळ संसर्गाचा दर कमी झाला असेल कदाचित. तो झाला असं दाखवणारा पुरावा नाही. झाला अशी आपण श्रद्धा ठेवू हवं तर; पण व्हायरसचा निःपात करणं साधलं नाही हे नक्की. हा कुणाचा दोष नाही. भारतासारख्या गर्दीच्या देशात हे मुळात अवघडच होतं. पण तोही प्रयत्न आपण करून पाहिला. आणि काही नाठाळ वगळता बहुतेक लोकांनी त्याला मनापासून साथही दिली. आता रोगाची साथ त्यापलीकडे गेली आहे. तेव्हा संसर्ग थांबवण्यापेक्षा मृत्युदर आणखी कमी करण्यावर सर्व लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एकीकडे हे प्रयत्न चालू आहेतच. पण दुसरीकडे आज किती पॉझिटिव्ह निघाले त्याचे आकडे दाखवून लोकांना निष्कारण घाबरवलं जात आहे. आता लोकांनीच आकड्यांचे अर्थ नीट ओळखून त्याला महत्त्व देणं आणि निष्कारण घाबरणं बंद केलं पाहिजे. प्रत्यक्षात कुठलीही लक्षणं न दाखवता पॉझिटिव्ह निघणार्यांचं प्रमाण वाढत आहे हे चांगलंच लक्षण आहे. वाईट नाही. कारण असे लोकच समाजाला हर्ड इम्युनिटीकडे अधिक लवकर पोचवतील. क्वचित केव्हातरी अशा लोकांकडून एखाद्या वृद्ध व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो हे अशक्य नाही. पण आज तरी अशा संसर्गाचं प्रमाण फार असल्याचं दिसत नाही. तसं असतं तर एव्हाना मृत्यूने देशभर थैमान घातलं असतं. प्रत्यक्षात भारतात दररोज २५००० च्या वर मृत्यू होतात. त्यावर दिवसाला ७०० कोव्हिडचे. म्हणजे कोव्हिडने सुमारे २  टक्क्याने देशातला मृत्युदर वाढवला आहे. हे घाबरून जाण्यासारखं नक्कीच नाही. अर्थात हे दोन टक्के सुद्धा कमी करण्याचं ध्येय आपण ठेवलं पाहिजे पण त्यासाठी अख्ख्या समाजाला ओलीस ठेवणं समजण्यासारखं नाही.

थोडक्यात संसर्ग वेगाने वाढणं ही चिंता करण्याची गोष्ट नाही. चिंता करण्याची गोष्ट ही की समाजातील ज्या व्यक्तींना कोव्हिड घातक ठरण्याची शक्यता आहे अशा वृद्ध, मधुमेही, हृदयरोगी व्यक्तींची काळजी कशी घ्यायची. म्हणजे आता आपली धोरणं साथ पसरण्याला आळा घालण्यापेक्षा जास्त धोका असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याकडे वळली पाहिजेत.

बदललेल्या धोरणातलं पहिलं म्हणजे लॅाकडाऊनची आता कुठेच आवश्यकता नाही आणि त्याचा उपयोग होतो असा पुरावाही नाही. आता सर्व लोकांना आपला रोजगार परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. क्वारंटाइन ही गोष्ट लॅाकडाऊनपेक्षा वेगळी आहे. त्याची आवश्यकता नक्कीच आहे आणि अजून काही काळ राहील. पण आता कोव्हिड पॉझिटिव्ह लोकांची संख्या एवढी वाढली आहे की प्रत्येकाला क्वारंटाइनची सुविधा पुरवणं शक्य नाही. होम क्वारंटाइनची पद्धत सुरू झाली आहेच. पण तिथेही लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यावर, त्यासाठी पुरेसं प्रबोधन करण्यावर भर दिला गेला पाहिजे. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह निघते तेव्हा तिला जर लक्षणं नसतील, तर काही व्यक्तींमध्ये ती कधीच दिसणार नाहीत, काहींमध्ये थोडया दिवसात दिसू लागतील, त्यापैकी काहींमध्येच ती गंभीर होतील. तेव्हा गंभीर केस लवकर कशी ओळखायची आणि तिला योग्य ते साहाय्य तातडीने कसं उपलब्ध करून द्यायचं हा नजीकच्या भविष्यातला कळीचा मुद्दा असणार आहे. गंभीर केसला एकीकडे चांगले उपचार आणि दुसरीकडे काटेकोर क्वारंटाइन अशा दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे.

एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत, तर एखाद्या व्यक्तीची लक्षणं गंभीर वळण घेतात, यामागे दोन कारणं असू शकतात. एक तर व्यक्तीव्यक्तींच्या प्रतिकारक्षमतेतला फरक आणि दुसरं म्हणजे विषाणूमधलाच फरक. विषाणूंमधे सतत म्युटेशन, सतत बदल होत असतात. त्यामुळे त्यांची घातकताही कमी अधिक होत असते. एका बिनलक्षणी व्यक्तीमध्ये या दोनापैकी कोणतं कारण काम करत आहे हे सांगता येत नाही. पण समाजातल्या काहींमध्ये हे, तर काहींमध्ये ते कारण असणार हे तर्काला धरून आहे. आता आपण सर्व गंभीर केसेसना काटेकोरपणे क्वारंटाइन करत राहिलो आणि बिनलक्षणी केसेस मधून विषाणू अधिक पसरत राहिला तर कमी घातक विषाणूचा अधिक प्रसार होईल असं उत्क्रांतीचं गणित सांगतं. गेल्या तीन महिन्यात सातत्याने कमी होणारा मृत्युदर या गणिताला पुष्टीही देतो. त्यामुळे गंभीर केसेसना काटेकोरपणे क्वारंटाइन करत राहिलो तर विषाणूची घातकता दिवसेंदिवस कमी होत जाईल. सर्व केसेसना क्वारंटाइन करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नजीकच्या भविष्यात ते व्यवहार्य राहणार नाही. पण हा चिंतेचा विषय मुळीच नाही. किंबहुना बिनलक्षणी व्यक्तींनी खुशाल लोकांमधे मिसळणं दीर्घकालीन फायद्याचंच ठरेल अशी शक्यता आहे. खुशाल खेळायला हरकत नाही असा हा जुगार आहे. कारण झाला तर फायदाच, आणि तो न खेळण्याचा पर्याय आपल्या हातात राहण्याची शक्यता एवितेवी दिसतच नाही. मग तो न खेळण्याचं नाटक तरी का करायचं?

असं व्यवहार्य तत्त्वज्ञान स्वीकारलं तर अनेक गोष्टी पूर्ववत होतील आणि तशा होण्यातच समाजाचं हित आहे. आता शिक्षण बंद ठेवण्याचं बदललेल्या परिस्थितीत काहीच प्रयोजन दिसत नाही. तरुण वयात कोव्हिडचा संसर्ग झाला तरी गंभीर लक्षणं दिसण्याचं प्रमाण मुळातच कमी आहे. आणि शिक्षण ही दारूच्या दुकानांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट नक्कीच आहे. त्यामुळे किमान महाविद्यालयं आणि माध्यमिक शाळा पूर्ववत न करण्याचं काही तर्कशुद्ध कारण दिसत नाही.

आता लॅाकडाउन आणि कंटेनमेंटची अंमलबजावणी करण्यात वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा लोकांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यावर भर द्यायला हवा. रस्त्यात थुंकणं आणि तत्सम अस्वच्छ सवयींना दंड करण्याचं प्रमाण वाढायला हवं. कोट्यवधी लोकांना थोड्या जरी स्वच्छतेच्या सवयी लागल्या तर काही हजार लोकांचं बलिदान वाया गेलं नाही, असं म्हणता येईल. कोव्हिडवर प्रभावी लस या वर्षात तरी येण्याची शक्यता नाही. विषाणूचा नायनाट करणं दाट लोकवस्तीच्या देशात शक्य नाही. हर्ड इम्युनिटी सव्वाशे कोटींच्या लोकसंख्येला यायला हवी असेल तर दोन पाच वर्षं तरी लागतील किंवा आपण होऊन प्रयत्नपूर्वक संसर्गाचा वेग वाढवावा तरी लागेल. म्हणजे हे तिन्ही उपाय साधणारे नाहीत. आता आपण या विषाणूला स्वीकारणं, त्याच्यासह पुन्हा जोमाने कामाला लागणं आणि गंभीर बनू शकणार्या आजार्यांची शक्य तितकी काळजी घेणं हाच सर्वात चांगला उपाय आहे. दाट शक्यता अशी आहे की काही काळातच कोव्हिड-१९ इतर सर्दी, खोकला, तापासारखाच एक होऊन जाईल.

 

मिलिंद वाटवे

                                                                                                                                https://milindwatve.home.blog/

(www.aksharnama.com या वेबपोर्टलवरून साभार)

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८