मुद्दा दोषारोपांचा नाही, जीवरक्षणाचा आहे! - प्रशांत खुंटे
ओळखीतल्या कुणाला ना कुणाला कोव्हिड-१९ झाल्याची बातमी आता रोज ऐकू येतेय. काही जण फारसा त्रास न होता त्यातून बाहेर पडलेत, तर काहींना दुर्दैवाने कोरोनाचा किंवा गलथाअन व्यवस्थेचा फटका बसला आहे. कुठे कोरोना पूर्वसूचना न देता समोर उभा ठाकलाय, तर कुठे इतरांसाठी काम करणार्या कोव्हिड योद्ध्यांना त्याची लागण झाली आहे. कुठे लागण होण्याची भीती न बाळगता ही मंडळी काम करताहेत. त्यापैकी काहींचे हे अनुभव.
“सुमितची कोव्हिड चाचणी करावी लागेल.
डॉक्टरांनी सांगिलंय...” माझ्या भावाने हे वाक्य
उच्चारल्यावर माझी प्रतिक्रिया अगदीच सामान्य होती. कोरोना पॅनडेमिक
सुरू झाल्यापासूनच मी घरच्यांना सांगत होतो, ‘आज ना उद्या आपल्या
अवतीभवतीच्या लोकांना कोरोनाची लागण होणार. आपल्यालाही होऊ शकते.
घाबरायची गरज नाही.’
दरम्यान, आमच्या
परिसरात कोरोनाने काही मृत्यू झाले. या मृत्यूंबद्दल लोक खासगी
आवाजात बोलत. तो स्वर मला विचित्र वाटायचा. मी स्वत: लॉकडाऊनमुळे आपत्ती ओढवलेल्यांच्या मुलाखती
घेतोय. त्यांचे प्रश्न समजून घेतोय.
त्यानिमित्ताने लोकांना भेटतोय. त्यामुळे असेल
कदाचित, भावाच्या मुलाची कोव्हिड चाचणी करायचीय याचा धक्का बसला
नाही. मी नेहमी ज्या लॅबमधून चाचण्या करतो तिथे फोन लावला.
कोरोना आता इतका स्थिरावलाय की सहज मदत मिळेल, अशी माझी समजूत होती. पण या फोननंतर जे सुरू झालं,
त्याची मला सुतराम कल्पना नव्हती.
शनिवारी ११ जुलैच्या
दुपारी मी लॅबमध्ये फोन लावला. तिकडून उत्तर आलं, ‘आमच्याकडे कोव्हिड टेस्ट होत नाही.’ मी विचारलं,
‘मग कुठे होते?’ ते म्हणाले, “ते आम्हाला माहीत नाही.” मी पुन्हा विचारलं,
“तुमच्या लॅबच्या बाजूलाच मी सरकारी स्वॅब चाचणी केंद्र असल्याचा बॅनर
पाहिल्यासारखं वाटतंय. तिथे होते का चाचणी?” या बॅनरवर नगरसेवकाचा मोठ्ठा फोटो आहे. त्यामुळे असेल
कदाचित, मी तो फ्लेक्स नीटसा पाहिला नव्हता. पण लॅबवाले म्हणाले, “आम्हाला त्याबद्दल काहीच माहीत
नाही.” या लॅबवाल्यांना कोविड चाचणी कुठे होते, याचीही कल्पना नसावी? मला आश्चर्य
वाटलं. पण म्हटलं, ठीकाय.
आता ससून किंवा नायडू
हॉस्पिटलचे पर्याय मनात आले. तरीही मी गुगलवर सर्च केलं. एका हेल्पलाईनचा नंबर मिळाला. हेल्पलाईनवरून एक साईट
कळली. ‘एसआरएल डायग्नॉस्टिक्स’ या साईटवर
मी क्लिक केलं. हे लोक घरी येऊन स्वॅब नेतील अशी अपेक्षा होती.
झळकलेल्या अर्जावर माहिती भरून पाठवली. पाचच मिनिटात
त्यांची इ-मेल आली. मला हुरूप आला.
मी कुटुंबीयांना दिलासा दिला. दहाव्या मिनिटाला
त्यांचा फोनही आला. पण त्यांचं म्हणणं होतं, ‘आम्ही पुण्यात सेवा देत नाही. तुम्ही पुण्यातील लॅबची
माहिती मिळवा.’ मी पुन्हा गुगल केलं. आता
मला दोन लिंक्स मिळाल्या. फक्त या दोनच लॅबना पुण्यात स्वॅब घेण्याची
परवानगी असल्याचं समजलं. त्यापैकी एका लिंकवर मी माझा मोबाईल
नंबर दिला. लगेच त्यांचा व्हॉटसॅप मेसेज आला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पेशंटचे रिपोर्टस् पाठवले. तर उत्तर आलं, ‘डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर स्टँप नाही.
आणि डॉक्टरने असं लिहून द्यायला हवं की, मी माझ्या
अखत्यारित या पेशंटला होम क्वारंटाईनचा सल्ला देईन. तसं डॉक्टरचं
हमीपत्र व्हाटसॅप करा.’ मी आमच्या परिसरातील जनरल फिजिशियनला
फोन केला. त्यांनीच सुमितवर आधी तापासाठी उपचार दिलेले.
त्याचा एक्स-रे पाहून कोव्हिडची शंकाही त्यांनीच
व्यक्त केलेली. पण ते डॉक्टर होते बी.ए.एम्.एस.. ते म्हणाले, ‘असं ते लॅबवाले कसं सांगू शकतात? मी आत्ता क्लिनिकवर
नाही. त्यामुळे स्टँप देऊ शकत नाही. आणि
माझ्याकडे तशी ऑथरिटीही नाही.’ मी विचारलं, ‘मग आता?’ ते म्हणाले, ‘ससून किंवा
नायडूला जा!’ म्हणजे ‘घरी येऊन स्वॅब घेतात’
ही माझी समजूत संपुष्टात आली. आता मीही थोडा अस्वस्थ
होऊ लागलो होतो.
डॉक्टरांनी सांगितलेलं, ‘पाच
वाजेपर्यंत तिथे स्वॅब घेतात.’ चार वाजलेच होते. मी लगबगीने सुमितला मोटरसायकलवर बसवून नायडू हॉस्पिटल गाठलं. गुगलवर एक-दोन खासगी दवाखान्यांचीही नोंद होती.
पण मी सरकारी यंत्रणेवर भरवसा ठेवून आधी तिथे गेलो. नायडूमध्ये रांग होती. एक्स-रे
पाहताच तिथल्या डॉक्टरांनी नाव नोंदणी करायला दुसर्या टेबलकडे
पाठवलं. त्या टेबलवरचा गृहस्थ पत्ता पाहून म्हणाला, ‘तुमच्या एरियातल्या सेंटरला जा!’ त्याने दाखवलेल्या सेंटरच्या
फोन नंबरवर मी कॉल केला. कारण आता पावणेपाच वाजले होते.
सेंटर बंद होण्याआधी पूर्वसूचना देणं बरं, असं
वाटलं. पण फोन उचलला गेला नाही. म्हणून
मी फोनचा नाद सोडला. लगबगीने सेंटरवर पोचलो. इथे पुन्हा रांगा. एका रांगेत नंबर आल्यावर दुसर्या टेबलकडे पाठवलं गेलं. नाव नोंदणीसाठी. तिथे गेल्यावर उत्तर मिळालं, ‘आता पाच वाजले.
उद्या सुट्टी आहे. सोमवारी सकाळी या!’ सुमितची चाचणी होणं आता मला फारच आवश्यक वाटू लागलेलं. कारण हा जर पॉझिटिव्ह असला, तर क्वारंटाईन करावं लागणार,
किमान त्याच्यावर तातडीने उपचार सुरू होणं गरजेचं होतं. शिवाय सुमितचे वडील, माझा थोरला भाऊ डायलेसिसवर आहे.
आई वृद्ध आहे. अशा हाय-रिस्क
असलेल्या माणसांच्या संपर्कात ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण असणं मला योग्य वाटेना.
आता चान्स घ्यावा म्हणून
मी जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथेही कोव्हिड चाचणीची सुविधा नव्हती.
दरम्यान एकीकडे डॉक्टरांशी फोनाफोनी सुरूच होती. सुमितच्या एका डॉक्टर मित्राशीही बोलत होतो. आता ससूनला
जाण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. तरीही सुमितच्या मित्राच्या
सल्ल्यावरून मी एका खासगी दवाखान्यात गेलो. हॉस्पिटलवाले लगेच
याला दाखल करून घेतील, असा माझा समज होता. पण हॉस्पिटलने आधी पाचशे रुपयांची नोंदणी फी घेतली. मग
त्यांच्याकडे बेड उपलब्ध नसल्याचं सांगितलं. कॉम्प्युटर स्क्रिनवर
सरकारी डॅशबोर्डही दाखवला. त्यावर पुण्यातील कुठल्या दवाखान्यात
बेडस् आहेत याची माहिती होती. त्यानुसार पिंपरी, कात्रज व ससून या तीनच ठिकाणच्या दवाखान्यात बेड्स उपलब्ध असल्याचं दिसलं.
मी ‘ससून’ हा जवळचा पर्याय
निवडला.
पण ससूनला पोहोचल्यावर
जे समोर आलं ते आणखी भीषण होतं.
ससूनच्या कॅज्युअल्टी
वॉर्डमध्ये प्रवेश करताच अनागोंदीचं दर्शन झालं. वॉर्डच्या दारातून आत जाताच टेबल,
त्याभोवती पेशंट व नातेवाईकांचा गराडा. त्या गराड्यात
बसलेले दोन डॉक्टर्स. त्यांच्यापुढे ‘ही’
रांग. रांगेतून टेबलापाशी येऊन लक्षणं सांगायची
आणि मग केसपेपर मिळणार, अशी व्यवस्था. फिजीकल
डिस्टन्सिंगवगैरे काहीच नाही. वॉचमनने रांगेतून त्या वॉर्डमध्ये
जाण्याआधी मला चपला काढायला सांगितल्या. आजूबाजूला कोव्हिडचे
रुग्ण आहेत, हे स्पष्ट होतं. डॉक्टर-नर्स पीपीई किटमध्ये दिसत होते. अशा वातावरणात अनवाणी
पायांनी जाणं मला कसंसंच वाटलं. पण नाइलाजाने मी रांगेत उभा राहिलो.
माझ्यासोबत सुमितही रांगेतच उभा राहिला. तिथेच
श्वास घ्यायला त्रास होत असलेले रुग्णही होते. त्यांना धड ना उभं राहता येत होतं, ना बसता येत होतं.
तिथे बसायला जागाही नव्हती. उभ्या उभ्याच अस्वस्थपणे
त्यांची उठबस सुरू होती. ते बघून मी सुमितला बाहेर जाऊन थांबायला
सांगितलं. सुमित अजून केवळ ‘सस्पेक्टेड’
होता. पण त्याला ताप होता. संक्रमण होता कामा नये म्हणून मी त्याला बाहेर पाठवलं. मी रांगेत उभारून अवती-भवती पाहू लागलो.
वॉर्डमध्ये दीड-दोन
फुटांवर खाटा टाकलेल्या. एका खाटेवर दोन म्हातारे रुग्ण पडलेले.
त्यांच्या डोळ्यात भीती होती. नाकातोंडाला ऑक्सिजन
मास्क होता. मी या संक्रमित वृद्धांपासून दोन फुटांवर होतो.
रांग पुढे सरकत नव्हती. एका खाटेवरच्या स्त्रीला
तिचे नातेवाईक जेवू घालायचा प्रयत्न करत होते. ती खात नव्हती.
तिला भरवणारी बाई म्हणत होती- ‘तुझ्या लेकरांना
डोळ्यांपुढे आण आणि खा.’
हा कसला कोव्हिड वॉर्ड? विलगीकरणाचं नामोनिशाण नाही? प्रत्येक खाटेजवळ रुग्णाचे नातेवाईक बसलेले. काही रुग्ण मलूल पडलेले. त्यांची शुद्ध जवळपास हरपली असावी. एक बाई धाप लागल्याने खाटेवर उठून बसलेली. ती कधी मास्क काढायची, कधी लावायची. जोरजोरात श्वास घ्यायचा प्रयत्न करायची. पलीकडच्या खाटेवरील एका स्त्रीला फिट आल्यासारखा झटका आला. तिचे हात पिरगाळल्यासारखे वळले. मान टाकून ती बेशुद्ध झाली. नर्सने तिच्या नातेवाईकांना खाटेचा मानेकडील भाग वर घ्यायला सांगितला. मग ते दृश्य पडद्याच्या पार्टीशनआड गेलं. रांग अजून पुढे सरकत नव्हती. एक कोव्हिड रुग्ण अस्वस्थ अवस्थेत वॉर्डमध्येच फिरत होता. रांगेला बाजूला हटवत वॉर्डबाहेर ये-जा करत होता. त्याला कुणीही हटकत नव्हतं.
माझा मास्क सावरत मी
रांग सरकायची वाट पाहत होतो. सगळा वॉर्ड रुग्णांनी खचाखच भरलेला.
त्या गर्दीतच एका रुग्ण महिलेला व्हीलचेअरवर बसवलेलं. तीही माझ्याप्रमाणेच रांगेत नंबरची वाट पाहणारी होती. त्या बाईला काही सुचतच नव्हतं. ती व्हीलचेअरवरून सारखी
उठतबसत होती. कधी मास्क ओढून काढत होती. तिला काही बोलता सांगताही येत नव्हतं. धाप लागल्याने
ती प्रचंड बैचेन झालेली. पण तिच्या सोबतची बाई सारखी तिला धरून
बसवायचा प्रयत्न करत होती. माझ्याप्रमाणेच या बाईचा नंबर आल्यावर
उपचारांची प्रक्रिया सुरू होणार होती. एका क्षणाला ती सारं बळ
एकवटून खुर्चीतून उठली नि खाटेवरच्या रुग्णांना खेचू लागली. कदाचित
तिला खाटेवर झोपावसं वाटत असावं. तिच्या सोबतची बाई तिला आवरण्याचा
निष्फळ प्रयत्न करत होती.
इतक्यात त्या बाईकडे
पाहणारा एकजण रांगेत माझ्यापुढे येऊन हळूच नंबर मिळवू लागला. मी
त्याला म्हणालो, ‘तुम्ही रांगेत आहात का? माझ्यापुढे कसेकाय घुसताय?’ तो म्हणाला, ‘मी मगापासून इथेच आहे.’ तेवढ्यात माझ्या पुढचा एकजण म्हणाला,
‘तुम्ही रांगेत नाही. मागे जा!’ तो मुकाटपणे सर्वात शेवटी जाऊन उभारला.
मग माझ्या लक्षात आलं, हा मुलगा त्या व्हीलचेअरवरच्या
बाईचा नातलग होता. त्याला आधी नंबर मिळू द्यायला हवा होता का?
मला कळेना. माझं डोकं बधिर होत चाललेलं.
तोवर एका नर्स की डॉक्टरने रांगेतल्या लोकांना अंतर राखून उभं राहण्यासाठी
बजावलं. वॉचमनने आम्हाला दटावून अंतर तयार केलं.
रांगेत अंतर झाल्याने
मी वॉर्डच्या दाराजवळ आलो. आता आतल्या टेबलवरून माझी नजर व्हरांड्यात
फिरू लागली. व्हरांड्यात काही स्ट्रेचर होते. त्यावर एकजण पहुडलेला. तो कुणातरी रुग्णाचा नातेवाईक
असावा. एका डॉक्टरने त्याला दरडावून त्या स्ट्रेचरवरून उठायला
भाग पाडलं. रुग्णांच्या नातेवाईकांना बसायची तिथे व्यवस्थाच नव्हती.
बाहेरच्या व्हरांड्यातील बाकड्यांना दोर्या बांधून
ठेवलेल्या. त्यामुळे तिथे बसता येत नव्हतं. एका बाकड्यावर सुमितने बसायचा प्रयत्न केला तर वॉचमनने त्याला हाकललं.
मी रांग सोडून तिकडे गेलो. ‘अहो याला ताप आहे,
बसूद्या’ म्हंटलं. तरी तो
ऐकेना. सुमित बाहेर लावलेल्या मोटरसायकलवर बुड टेकून बसला.
मी पुन्हा रांगेत आलो. आता समोरच्या स्ट्रेचरकडे माझी नजर गेली. या स्ट्रेचरला हिरव्या कापडाचं पार्टीशन होतं. पण तरी स्ट्रेचरवरची बाई मला दिसत होती. तिची हिरवी साडी, हातातल्या बांगड्या नि पायाची बोटं मला दिसत होती. या बाईला कुणी का उठवत नाही? माझी नजर तिथेच खिळली. तिची छाती हलत नव्हती. कसलीही हालचाल नव्हती. म्हणजे ते प्रेत असावं का? मी एका प्रेतापासून चार फुटांवर रांगेत उभा होतो? अंगावर काटा आला.
जवळपास नऊ वाजता माझा
नंबर आला.
दोन तास मी या अनागोंदीच्या वातावरणात होतो. फिजीकल
डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा विसर पडलेला.
माझ्या बॅगेत सॅनिटायझरची
छोटी बाटली होती.
पण एका मर्यादेनंतर ही काळजी घेणं निरर्थकच वाटू लागलेलं. समोरच्या टेबलवर एकाची डॉक्टरांशी वादावादी झाली. डॉक्टरांनी
त्याला पोलिसांचा दम भरला. तो माणूस हताश होऊन निघून गेला.
त्याच्यासोबतची रुग्ण बाईही मागेमागे गेली. एकजण
सारखा टेबलजवळ येऊन ‘आमचा रिपोर्ट हरवलाय कधी मिळेल’ असं डॉक्टरांना विचारत होता. दुसर्या एका नातलगाच्या रुग्णाचा स्वॅब घेतला गेला होता. ‘रिपोर्ट दुसर्या दिवशी दुपारनंतर मिळेल’ असं सांगितलं गेलं. एक मुस्लिम टोपी घातलेला गृहस्थ बारामतीवरून
आलेला. ‘हा रुग्णाला घेऊन जवळपास ७० कि.मी.हून का आला असावा? याला तिकडे
उपचार का मिळाले नसतील?’ मला हे प्रश्न
तेव्हा पडले नाहीत. कारण मी डॉक्टरांकडे डोळे लावून होतो.
आता माझा नंबर जवळ आला. इतक्यात डॉक्टर त्या टोपीवाल्याला
कशावरून तरी ओरडू लागले. तो विनम्रपणे सांगत होता, “सर, हळू आवाजात बोला. लोकांना वाटेल
मी तुमच्याशी भांडतोय.”
कशाचा कशाला पायपोस
नव्हता.
अखेर माझा नंबर आला. मी
रिपोर्ट दाखवले. त्यांना न पाहताच डॉक्टर म्हणाले, “तुम्ही पेशंट आहात का? पेशंटला बोलवा.” मी धावत जाऊन सुमितला बोलवून आणलं. डॉक्टरांनी लक्षणं
ऐकली. माझ्यापुढे एक कागद धरला. म्हणाले,
“हा केसपेपर भरा. पेशंटचं स्वॅब घेतल्यावर रिपोर्ट
येईपर्यंत इथेच थांबायचं!” मी म्हणालो, “तुम्ही सँपल घ्या. मी पेशंटला घरी घेऊन जातो.
त्याला ताप आहे, या वातावरणात कुठे त्याला थांबवू?”
डॉक्टर म्हणाले, “बाहेरच थांबायचं. इथे सगळ्यांनाच ताप आहे.” म्हणजे दुसर्या दिवशी दुपारपर्यंत या अनागोंदीच्या वातावरणात ताटकळत उभं रहायचं?
मला कल्पनाही करवेना. मी तो कागद हातात धरून बाहेर
आलो. आता माझा बांध तुटला. रडू अगदी डोळ्यांच्या
कडांवर आलं. पण सुमित सोबत होता. मी स्वत:ला सावरलं. सुमितला एके ठिकाणी उभा ठेवून पुन्हा फोनाफोनी
सुरू केली. तेवढ्यात, व्हरांड्यात माझ्यासमोरच
एक पेशंट कोसळला. कोव्हिडचाच पेशंट. तो
माणूस हाताने नाकाजवळ वारा घ्यायचा प्रयत्न करत होता. त्याच्या
तोंडून शब्द येत नव्हता. व्हरांड्यात पडलेल्या त्या पेशंटकडे
सगळे दुरून पाहत होते. पाच दहा मिनिटांत त्या पेशंटला आत नेलं
गेलं.
मित्रांशी फोनाफोनी
करून मी सुमितला कात्रजच्या भारती हॉस्पिटलला न्यायचा निर्णय घेतला. रात्र
झाली होती. न्युमोनिया असलेल्या सुमितला मोटरसायकलवर बसवून दहा-बारा कि.मी. दवाखान्यात नेणं मला
योग्य वाटेना. सलीम या माझ्या रिक्शा ड्रायव्हर मित्राने आधी
आमच्या आसपासच्या रिक्षावाल्यांना फोन करून पाहिला. पण कुणीच
तयार न झाल्याने तो स्वत:च दहा कि.मी.
हून रिक्शा घेऊन आला. इकडे माझी डॉक्टर मित्रांशी
फोनाफोनी सुरूच होती. डॉ. सुधीर या माझ्या
मित्राने खूप दिलासा दिला. ससूनच्या मेडिकल स्टोअरमधून काही औषधं
घेऊन ती सुमितला द्यायला सांगितली. पण सुमित उपाशी होता.
त्याला अस्वस्थ वाटत असावं. त्याने औेषधं घेतली
नाहीत. डॉ. सुधीरने लक्षणं ऐकून
‘सुमित केवळ न्युमोनियाचा पेशंट आहे. कोव्हिडचा
नाही.’ असं सांगितलेलं. तरी त्याला कुठेतरी
डॉक्टरांच्या हवाली करावं असं वाटत होतं. पुण्यात कुठेच बेड मिळत
नव्हते. भारती हॉस्पीटलमध्ये काही बेड असल्याचं सरकारी डॅशबोर्डवर
पाहिलेलं. म्हणून मी हिय्या करून ते हॉस्पिटल गाठलं.
ससूनच्या तुलनेत या
दवाखान्यात बरीच चांगली व्यवस्था होती. त्यांनी सुमितला रिक्शात बसवून
बोटाला यंत्र लावून ऑक्सिजन लेव्हल तपासली. मग ‘बेड नाहीत’ असं सांगितलं. मी म्हटलं
‘डॅशबोर्डवर दिसतय की!’ तर तिथल्या व्हरांड्यातच
उभारून डॉक्टर म्हणाले, ‘ते अपडेट केलेलं नाही.’ आता पुन्हा फोनाफोनी सुरू. सुमितच्या डॉक्टर मित्राने
काहीतरी ओळख काढून त्याच्या परिचयातील डॉक्टरांचे नंबर दिले. बर्याच वेळाने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला.
तोवर रात्रीचे बारा वाजून गेले होते. त्या डॉक्टरांचं
बोलणं झाल्यानंतर सुमितला कॅज्युअल्टी वॉर्डात घेतलं गेलं. इसीजी
काढण्यासाठी बेडवर ठेवलं गेलं. इतक्या प्रतीक्षेनंतर याला बेडवर
पहुडण्याचं समाधान मिळालं. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली,
या कल्पनेने मी सुखावलो. आता जवळपास तास-दीड तास माझ्याकडे होता. ईसीजी झाल्यावर मला सुमितला
घरी घेऊन जायचं होतं. मी सलीमचे आभार मानले नि त्यांना रिक्षा
घेऊन जायला सांगितलं. रिक्शा गेली.
आता मला लघवीची भावना
झाली.
मी वॉचमनला करंगळी दाखवून ‘टॉयलेट कुठाय़?’
विचारलं. तर वॉचमन म्हणाला, ‘रस्त्यावर कुठंही जाऊन करा!’ मी पाहतच राहिलो.
काय बोलावं सुचेचना. ‘तुमचा पेशंट अॅडमिट करत नाहीत तोवर तुम्ही हॉस्पिटलच्या आत जाऊ शकत नाही. कुणालाही आत सोडायचं नाही अशा आम्हाला सूचना आहेत.’ वॉचमन
त्याची बाजू मांडत होता. माझ्याजागी कुणी स्त्री असती तर?
आणि तिथे दर दहा मिनिटाला रुग्ण येतच होते. त्यात
स्त्रियाही होत्याच.
त्या रात्री मी सुमितला
घरी घेऊन आलो.
घरच्यांना दिलासा दिला. होम क्वारंटाईन करायचं
म्हणजे काय ते समजावलं. त्याला एका खोलीत ठेवलं. दुसरा दिवस रविवारचा असल्याने त्याची तपासणी होऊ शकणं अशक्य होतं. पण रविवारी संध्याकाळी सुमितला दम लागू लागला. मी डॉ.
सुधीरला फोन केला. त्याने लक्षणं ऐकून जवळच्या
हॉस्पिटलमध्ये न्यायचा सल्ला दिला. पण सुमित घाबरलेला.
तो खोलीबाहेर यायलाच तयार नव्हता. त्याला पुन्हा
ससूनला जाण्याची भीती वाटत होती. मी कशीबशी त्याची समजूत काढली.
जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं. तिथे
पुन्हा तेच. ‘बेड अॅव्हेलेबल नाहीत!’
पण तिथल्या कॅज्युअल्टीत सुमितला ऑक्सिजन सुरू झालं. त्यामुळे तो स्थिर झाला. मग मी बेड मिळवण्यासाठी फोनाफोनी
सुरू केली. पुन्हा पुन्हा मी व्हाटसॅपवर आलेल्या एका लिंकवरून
कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेड आहेत ते पाहत होतो. हॉस्पिटल्सचे नंबर
मिळवायचा प्रयत्न करत होतो. प्रत्येक ठिकाणाहून निराशाच हाती
येत होती. हेल्पलाईनचे नंबर लागत नव्हते. एका परिचिताने एका ओळखीतून एक नंबर सांगितला. ‘पैसे भरून
अॅडमिट करायची तयारी असेल तरच बेड मिळू शकेल’ या बोलीवरच तो संपर्क मिळाला होता. मी त्या मोबाईलला
संपर्क केला. ट्रू कॉलररून हे डॉक्टर असून मोठ्या हॉस्पिटलचं
नाव दिसत होतं. मला वाटलं हे काहीतरी नक्की करतील. ते डॉक्टर म्हणत होते, ‘तुम्ही मला फोन करत रहा.
मी नक्की तुमची व्यवस्था कुठे ना कुठे करतो.’ मी
दर अर्ध्या तासाने त्यांना फोन करत होतो. दरम्यान अन्य ठिकाणीही
कॉल सुरू होते. कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये चार तासांहून अधिक काळ
ठेवता येत नाही. त्यामुळे इथले नर्स व डॉक्टर ‘पेशंटला कधी नेताय’ म्हणून मागे लागलेले. आता मला एक लक्षात आलं होतं. पैसे भरण्याची तयार दाखवली
तर बेड मिळू शकतो. पेशंट गरीब वर्गातला असेल तर बोळवण केली जाते.
ससूनला जायचा सल्ला दिला जातो. मी ससूनचा पर्याय
बाद केलाच होता. सुमितच्या तब्येतीपुढे पैशांची पर्वा नव्हती.
पण सुमितची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं
तर गरजेचं होते. ते बेड मिळवून देणारे डॉक्टर आता मला
‘फिशींग ट्रॅपनेटचे’चे प्रतिनिधी वाटू लागले.
ते माझी अगतिकता पाहत असावेत. मी जितका अगतिक होईन
तितकं त्यांचं महत्त्व वाढणार होतं. तरीही मी थोड्या थोड्या वेळाने
त्यांना फोन लावत होतो. अन्यही नातेवाईक काही काही नंबर देत होते.
अखेर एका हॉस्पिटलमध्ये बेड असल्याचं समजलं. सुमितला
ठेवलं होतं, त्या हॉस्पिटलमधील नर्सनेच तिथे फोन करून डॉक्टरांशी
बोलणी केली.
हे हॉस्पिटल सात-आठ कि.मी. वर होतं. पण अॅम्ब्यूलन्सवाल्याने पंचवीसशे रुपये मागितले. मी तयारी
दाखवली. हॉस्पिटलमधील कुणातरी रुग्णाचा कुणीतरी नातेवाईक त्या
अॅम्ब्यूलन्सवाल्याला सांगू लागला, ‘अहो
पैसे कमवायच्या आणखीही संधी येतील पुढे, आत्ता कशाला एवढे पैसे
उकळताय?’ पण अॅम्ब्यूलन्सवाला रकमेवर कायम
होता. मी घासाघीस केली नाही. शेवटी सुमितला
एका दवाखान्यात दाखल केलं. तिथले डॉक्टर पूर्ण पीपीई किटमध्ये
झाकलेल्या अवस्थेत सामोरे आले. म्हणाले, ‘या पेशंटचा कोव्हिड रिपोर्ट नाही, आमच्या हॉस्पिटलमध्ये
कोव्हिड वॉर्डमध्ये आयसीयूचा एकच बेड आहे. हा कोव्हिड पॉझिटिव्ह
नसेलही. मग याला कोविडच्या वॉर्डमध्ये का अॅडमिट करता?’ ज्या डॉक्टरांच्या सुचनेने सुमितला इथे
आणलं होतं. त्यांच्याशी फोन लावला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार
‘कोव्हिड सस्पेक्टेड’ म्हणून सुमितवर उपचार सुरू
झाले. न्युमोनियाच्या पेशंटना दवाखान्यात घेतलंच जात नाहीये.
त्यांना कोव्हिडचेच पेशंट मानलं जातंय. मग करणार
काय? प्रश्न दोषारोपांचा नाही;
जीवरक्षणाचा आहे. या आयसीयू बेडसाठी दिवसाला पस्तीस
हजार रुपयांचं एस्टिमेट हॉस्पिटलने सांगितलं.
मेडिक्लेम असल्याने
सुमितवर या हॉस्पिटलमध्ये दहा दिवस उपचार झाले. जवळपास अडीच लाखांचं बिल झालं.
अॅडमिट करताना पीपीई किटसाठी चार हजार रुपये घेतले
गेले. औषधांवरही काही खर्च झाला. या दरम्यान
मी त्या हॉस्पिटलमध्ये असे कोव्हिड सस्पेक्टेड अनेकजण पाहिले. शासनाने ‘कोव्हिड क्रिटिकल केअर’ साठी नेमलेल्या हॉस्पिटलपैकी हे नाही. इथे केवळ
‘स्टेबल’ रुग्णांवर इलाज होत आहेत. म्हणजे इथे
न्युमोनिया व तत्सम
उपचार होत असल्याचं लक्षात आलं. न्युमोनियाच्या उपचारांसाठी अडीच लाख?
ज्यांचा मेडीक्लेम नाही त्यांनी काय करावं? माझ्या
कुटुंबातील चौघांची चाचणी पॉझिटिव्ह आली. डायलेसिसवर असलेल्या
माझ्या भावाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्याच्यासाठीही बेड मिळवण्यासाठी
अशीच यातायात करावी लागली. केवळ मेडिक्लेम होता म्हणून त्यालाही
उपचार मिळू शकले. बाकी दोघे आयसोलेशन सेंटरमध्ये आहेत.
महाराष्ट्र शासनाने
कोव्हिड रूग्णांवर मोफत उपचार होतील असं ‘महात्मा जोतिबा फुले जीवनदायी
आरोग्य’ योजनेतून जाहीर केलंय. पण ही जीवनदायी
योजना आहे. म्हणजे रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज पडली तर या योजनेतून
मोफत उपचार मिळणार. तेही योजनेत ठराविक रुग्णालयातच. त्यामुळे कोरोनाची सामान्य लक्षणं असलेल्या रुग्णांना मोफत उपचार वगैरे मला
तरी धूळफेकच वाटली. एक मात्र वाटलं, कोरोनामुळे
घाबरून जायची खरंच गरज नाहीये. पण हॉस्पिटलमध्ये बेडच मिळत नसल्याने
घबराट होतेय. घाबरून गेल्याने, वेळेत उपचार
सुरू न झाल्याने मृत्यू होतायत. सरकारी दवाखान्यांतलं चित्रं
विदारक नि खासगी दवाखान्यांची अडवणूक यामुळे रुग्णांची ससेहोलपट होतेय. सामान्य उपचारांची गरज आहे अशांना किफायतशीर व्यवस्थेत दिलासा हवाय.
अत्यवस्थ रुग्णांना तातडीने मदत हवी आहे आणि जे कोव्हिडने मृत्यू पावले
त्यांना सन्मानाने निरोपाची व्यवस्था हवीय, एवढंही आपण करू शकत
नाही, याला नाकर्तेपण नाही तर काय म्हणायचं?
प्रशांत खुंटे
९७६४४३२३२८
prkhunte@gmail.com
(ठाकूर फाउंडेशन, यु.एस.ए. कडून इनव्हेस्टिगेटिव्ह
रिपोर्टिंग इन पब्लिक
हेल्थ या शिष्यवृत्तीअंतर्गत
लेखकाने केलेलं स्वानुभव
कथन)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा