वीर दास : द आउटसायडर - मुकेश माचकर


ब्र उच्चारणारी माणसं!

सध्याचा काळबरंउच्चारणाऱ्या माणसांचा आहे. उच्चारस्वातंत्र्य जयघोषांपुरतंच वापरणार्यांचा आणि द्वेषभक्तीलाच देशभक्ती मानणाऱ्यांचा सुकाळ आहे. अशांच्या भाऊगर्दीतब्रउच्चारण्याचं धाडस करणारी माणसं म्हणूनच महत्त्वाची ठरतातस्टँड अप कॉमेडियन्सम्हणून ओळखली जाणारी मंडळी निव्वळ राजकीय व्यवस्थेसमोरच नाही, तर संस्कृती, परंपरा आणि मूल्यांच्या नावाखाली मध्ययुगीन कालबाह्य समजुतींचे वरवंटे फिरवू पाहणाऱ्या सगळ्याच व्यवस्थांसमोर निधड्या छातीने उभी राहतात.

वीर दास हा एक आउटसायडर आहे.

तो भारतीय आहे, पण त्याचं उच्चशिक्षण परदेशात झालेलं आहे. तो शुद्ध इंग्लिशमध्ये कॉमेडी करतो, साहजिकच त्याचा टार्गेट ऑडियन्स उच्चभ्रू किंवा किमान उच्चशिक्षित वर्ग आहे. तो स्टँड अप कॉमेडीचा एक महत्त्वाचा प्रवर्तक (अनेकांसाठी स्टँड अपच्या आताच्या स्वरूपाचा पायोनियर) असूनही आम भारतीय प्रेक्षकासाठी आउटसायडर आहे

तो नेटफ्लिक्सवर स्वत:चा आंतरराष्ट्रीय शो असलेला एकमेव भारतीय कॉमेडियन आहे. त्याची कॉमेडी अर्थातच भारत, भारताविषयीचे जगाचे समज-गैरसमज यांच्याभोवती फिरणारी आहे, पण तो त्या शोमध्ये सतत सांगतो त्याप्रमाणे तो एकब्राउन मॅन विथ अ बियर्ड’ (गोऱ्यांची मुस्लिमांविषयीची स्टीरिओटिपिकल संकल्पना) आहे, म्हणजे गोऱ्यांसाठी आउटसायडर आहे

वीर दास हे आउटसायडर असणं सार्थकी लावतो. तो तटस्थ नजरेतून स्वत:ला, स्वत:च्या भारतीयत्वाला, भारताच्या व्यामिश्र संस्कृतीला सतत जोखत राहतो, पारखत राहतो, आपल्यातल्या उणिवांवर सडकून टीका करतो, आपल्यातल्या उत्तमतेचं कौतुकही करतो... मात्र, जे काही करू ते भारतीयत्वाचं सेलिब्रेशन असेल, हे पथ्य चोख पाळतो. स्वत:कडे, स्वत:च्या धर्माकडे, वंशाकडे, जातीकडे चिकित्सक नजरेने पाहणं तर सोडाच, यांची कुणी हलकीफुलकी मस्करी केलेलीही चालत नाही, अशा काळात वीर आंतरराष्ट्रीय स्तरावर हे करतो आहे आणि त्याला जगभरातून प्रतिसाद मिळतो आहे, हे महत्त्वाचं.

वीरने सुरुवातीच्या काळात स्टँडर्ड इंग्लिश स्टँड अप कॉमेडी खूप केली आहे. म्हणजे, जॉनी लिव्हर आणि राजू श्रीवास्तव यांचं चकचकीत आणि पाचकळ इंग्लिश व्हर्जन. काही स्टिरिओटाइप्स घ्यायचे किंवा बनवायचे आणि त्यांच्यावर विनोद करायचे. तापदायक आंट्या, डोक्याला वात आणणारे अंकल लोक, कॅब ड्रायव्हर, साउथ बॉम्बेचं पब्लिक आणि सेक्स असे काही ठरलेले विषय, त्यात कंबरेखालच्या ग्राफिक विनोदाला प्रचंड स्कोप हा आपल्याकडच्या उच्चभ्रूंचा आणि आंग्लविद्याविभूषितांचा एक मजेशीर गंड आहे. जे शब्द किंवा विषय मातृभाषेत किंवा हिंदीत कानावर पडले तर अश्लील, असंस्कृत, वाह्यात वगैरे वाटतात, ते इंग्लिशमध्ये ऐकणं आणि पाहणं कूल असतं; दबलेल्या भावनांचं हे बोल्ड विरेचन असतं.

वीर दासच्या आधीच्या टप्प्यातल्या अनेक शोजमध्ये अशा प्रकारचीफु ऑलकॉमेडी पाहायला मिळते. त्यात तो बुद्धिगामी विनोद करतच नव्हता का? तर, करत होताच. तो समकालीन विषयांवर भाष्य करतानाही दिसायचाच. पण, ते प्रसंगोत्पात आल्यासारखं. आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाल्यावर आपण भारताशी अजिबात परिचय नसलेल्या किंवा जुजबी परिचय असलेल्या माणसांच्या मनात भारताची एक प्रतिमा निर्माण करतो आहोत, देशाचे अघोषित सांस्कृतिक राजदूत आहोत, याचं भान राखून तो कॉमेडी करताना दिसतो, अर्थात पाश्चिमात्यांच्या परिचयाच्या कॉमेडीचे सगळे बॉक्स टिक करूनच.

उदाहरणार्थ, तो एका शोमध्ये अमेरिकनांना आवाहन करतो की जगभरात उसळलेल्या धार्मिक संघर्षांवर फक्त आणि फक्त अमेरिकाच उपाययोजना करू शकते. तुम्ही जगभरातून तुमच्याकडे येणार्या खाद्यपदार्थांचं कसं भ्रष्ट अमेरिकनायझेशन करता, तसं बाहेरून आलेल्या धर्मांचंही अमेरिकनायझेशन करा. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म यांची सांगड घालून एक नवा शांतीधर्म सुरू करा. इथे लोक चर्चला किंवा मॉस्कला (मशिदीत) जाणार नाहीत, चॉस्कला जातील, तिथे दोन्ही प्रकारच्या प्रार्थनांचा समन्वय साधता येईल, तुम्ही चॉकलेटचे बकरे कापून ईदस्टर साजरा करा, शुक्रिया गिव्हिंगचा सण साजरा करा, सगळ्यात छान सण असेल हलालोविन... इथे तो ख्रिश्चनांची हालेलुया ही प्रसिद्ध धार्मिक हाळी गातो आणि तिचं नंतर रूपांतर करतो. अजानच्या सुरांमध्ये शेवटी पंच मारतो, ‘आता सोनू निगम जागा होईल.’

आणखी एका स्किटमध्ये तो म्हणतो, तुमचे आमचे सगळे धर्मग्रंथ म्हणजे मोठ्यांची कॉमिक बुक्स आहेत. कोणाचा देव बॅटमॅन आहे, कोणाचा सुपरमॅन, आम्हा हिंदूंकडे मात्र अॅव्हेंजर्सची फौज आहे!

ओल्ड मंक या सुप्रसिद्ध भारतीय रमच्या गुणगौरवपर स्किटमध्ये तो सांगतो की भारतात ओल्ड मंकची विक्री १९५४ साली सुरू झाली. ओल्ड मंक मुरायला सात वर्षं लागतात, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळताच, १९४७ साली ती मुरायला ठेवली गेली असणार. यानंतर तो पंडित नेहरू, महात्मा गांधी, बॅ. जिना, माउंटबॅटन यांचा समावेश असलेल्या एका खानपान पार्टीची कल्पना करतो आणि त्यात सगळे नेते कसं पेयपान करतील ते सांगतो. आता, भारतातला कॉमेडी सीन इतर सार्वजनिक कलांच्या तुलनेत फारच मोकळा, खुला आणि अनसेन्सॉर्ड असला, तरी या प्रकारची मांडणी त्यालाही झेपणारी नाही. तिचा एआयबी रोस्ट होण्याची शक्यता प्रचंड आहे.

इतकी थेट धारदार कॉमेडी वीर आंतरराष्ट्रीय मंचावरच करू शकतो आणि ती वीरच करू शकतो. कारण तो निव्वळ स्टँड अप कॉमेडियन नाही, तो प्रशिक्षित अभिनेता आहे, गायक आहे, कवी आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि विचारी माणूस आहे. त्याची कॉमेडी हा आखीव एकपात्री प्रयोगाचा आविष्कार असतो. प्रत्येक स्टँड अप कॉमेडी हा रूढार्थाने एकपात्री प्रयोगच असतो पण, ९० टक्के कॉमिक्स हे मंचावर येऊनगप्पा मारल्याचाफॉर्म वापरतात. म्हणजे ते काय बोलणार आहेत ते ठरलेलं असतं, पण ते पाठ केलेलं किंवा घटवलेलं नसतं. अनेकजण तर जाणीवपूर्वक फक्त विषयांची यादी घेऊन येतात आणि बरंचसं उत्स्फूर्तपणे बोलतात. वीर दासचं तसं नसतं. तो बोलतो ती प्रत्येक ओळ त्याने एखाद्या नाटकातल्या भूमिकेच्या संवादासारखी पाठ केलेली असते, दोनपाच टक्के उत्स्फूर्तता असेलही, पण स्किट पक्कं घटवलेलं असतं. त्यामुळे तो कमाल वेगाने, एकही शब्द इकडचा तिकडे होऊ न देता लांब वातीच्या फटाक्यासारखा विनोद फुरफुरवत नेतो. तो कुठे चाललाय याचा काही अंदाज पटकन येत नाही आणि तो एकदम अनपेक्षितपणे शेवटी फटाका फोडतो तेव्हा त्याच्या त्या रचनाकौशल्याची आणि सादरीकरणामागच्या मेहनतीची, प्रिसिजनची स्तिमित करणारी जाणीव होते.

उदाहरणार्थ, तो जंगलबुक या कथेच्या भारतीय कार्टूनआविष्काराबद्दल बोलायला सुरुवात करतोजंगल जंगल बात चली है, पता चला है- चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला हैया लोकप्रिय शीर्षकगीताचा अनुवाद करून त्यातल्या अॅब्सर्डिटीचा समाचार घेतो. मग तो म्हणतो, इथे हाथी एका देशाचा, बघिरा वेगळ्या देशाचा, भालू तिसरीकडचाच, इतकी सैल इमिग्रेशन पॉलिसी असलेलं हे जंगल आहे की गुगलच्या ऑफिसबाहेरचा बगीचा... मग तो म्हणतो, हाथी, भालू, बघिरा हे सगळे हिंदी शब्द आहेत, भारतीय नावं आहेत, पण मोगली नावाचा कोणी मनुष्य माझ्या पाहण्यात नाही, तुमच्या माहितीत आहे का कोणी मोगली? मोगली सिन्हा, मोगली शर्मा, मोगली सिंग किंवा नरेंद्र मोगली... जिकडे तिकडे जाऊन कोणालाही मिठ्या मारणारा, गळ्यात पडून कानात सांगणारा की मी अजिबात रडत नाहीये, ही पीआरची ऑपॉर्च्युनिटी आहे ती साधतोय... हाऊडी मोगली! हा मोगली भाषण करताना म्हणतो, जानवरोंऽऽऽ (चाल अर्थातचमित्रोंऽऽऽची) ही समोरची झाडं आजपासून अवैध ठरली आहेत. हे आहेत तुमचे गृहमंत्री शेर खान!!

... आता हा आर्क अकल्पनीय आहे. सुरू कुठे होतो आणि संपतो कुठे!

याची तुलना अमेरिकेतल्या इलिनॉयच्या नॉक्स कॉलेजमध्ये गंभीरपणे थिएटर शिकणारा मुलगा आता कॉमेडीच्या जगातला एकमेव भारतीय आंतरराष्ट्रीय तारा बनला आहे किंवा सौरभ पंत या अन्य एका लोकप्रिय कॉमेडियनच्या शब्दांत सांगायचं तरप्रियांका चोपडा ऑफ इंडियन कॉमेडीबनला आहे, यातल्या अकल्पनीयतेशीच होऊ शकते...

नॉक्समध्ये अभ्यासक्रमात एकदा प्रत्येकाने स्वतंत्रपणे गंभीरपणे लेखन करून ते सादर करण्याचा एक्सरसाइझ करताना वीरला गंभीर मांडणी सुचलीच नाही, त्यानेब्राऊन मेन कान्ट हम्पअसं एक वाह्यात स्किट लिहिलं. त्यात पाच टक्के कॉमेडी होती आणि ९५ टक्के शिवीगाळच होती, असं तोच सांगतो. ते तिथल्या हारबॅच थिएटरमध्ये सादर झालं, तेव्हा त्याच्या आयुष्याची दिशा ठरली.

डेहराडूनमध्ये जन्मलेल्या वीरच्या पायावर जन्मजात चक्र असणार. त्याची फिरस्ती जन्मानंतर लगेचच सुरू झाली. त्याचं प्राथमिक शिक्षण नायजेरियात लागोसमध्ये झालं, नंतर दिल्लीच्या लॉरेन्स स्कूलमध्ये शिकून तो अर्थशास्त्र आणि नाट्यप्रशिक्षणाची पदवी मिळवण्यासाठी नॉक्स कॉलेजला गेला. तिथे त्याने रिश्टर स्कॉलरशिपही पटकावली आणि अभिनयातील असामान्य कामगिरीसाठी कोल्टन परफॉर्मन्स अवॉर्डही मिळवलं. तिथे काही काळ टीचिंग असिस्टंट म्हणून काम केल्यावर त्याने हार्वर्डमधून मेथड अॅक्टिंगचं प्रशिक्षण घेतलं. मग, स्तानिस्लावस्की प्रोग्रामअंतर्गत तो मॉस्को आर्ट्स थिएटरला पोहोचला आणि तिथे त्याने आठ नाटकं केली.

२००३ साली वीर भारतात परतला आणि त्याने इंडिया हॅबिटाट सेंटरमध्येब्राउन मेन कान्ट हंपचा शो लावला. त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याने कॉमेडीचा धडाकाच सुरू केला... लेखक, दिग्दर्शक, सादरकर्ता या सगळ्या भूमिका तोच पार पाडत होता... ‘नॉट फॉर मेंबर्स ओन्ली’, ‘बोअर्ड ऑफ द थिंग्ज’, ‘हू लेट द दास आऊट?’, ‘सन ऑफ अ स्विचआणिविराग्राया स्किट्सचे देशातल्या सर्व प्रमुख शहरांत त्याने १०० शोज केले.

पाठोपाठ टेलिव्हिजनवर त्याचा धुडगूस सुरू झाला. झूम चॅनेलवर इस रूट की सभी लाइनें मस्त है, एक रहिन वीर, स्टार वर्ल्डवर टॉप ड्राइव्ह, गेटअवे, झी स्पोर्ट्सवर क्रिकेट फर्स्ट, सब टीव्हीवर लो कर लो बात, ग्रेट इंडियन कॉमेडी शो, सीएनबीसी १८ वर नाऊ नॉट शोइंग, न्यूज ऑन द लूझ अशी त्याची चौफेर फटकेबाजी सुरू होती. स्टेजवर वॉकिंग ब्रोकन दास, बॅटल ऑफ दा सेक्सेस आणि हिस्टरी ऑफ इंडिया विरिटन हे कार्यक्रम तो सादर करत होता. एलियन चटनी हा कॉमेडी रॉक बँड त्याने सुरू केला. २०१२ साली मॉरिशियन चटनी या आल्बममधल्या मॅनबुब या ट्रॅकने त्याने संगीतक्षेत्रात गायक म्हणून पदार्पण केलं.

याचदरम्यान, नमस्ते लंडन या सिनेमातल्या पाहुण्या भूमिकेतून त्याने रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि पाठोपाठ मुंबई सालसा, शादी के साइड इफेक्ट्स, रिव्हॉल्वर रानी, अमित साहनी की लिस्ट, मस्तीजादे, बदमाश कंपनी या सिनेमांमध्ये त्याने कधी प्रमुख तर कधी सहाय्यक भूमिका केल्या. पण, सिनेमात त्याची ओळख दोन सिनेमांनीच निर्माण केली, एक होता अभिनय देवचा देल्ही बेली आणि दुसरा गो गोवा गॉन! या सिनेमांसह व्हिस्की कॅव्हेलियर या आंतरराष्ट्रीय वेब सिरीजमध्ये अभिनय, ३५ नाटकं, १०० स्टँड अप शोज, आठ टीव्ही शोज, सहा कॉमेडी स्पेशल्समध्ये काम करता करता वीरने फेमिना, मॅक्झिम, एक्झॉटिका, डीएनए, तहलका या प्रकाशनांमध्ये स्तंभलेखनही केलं आहे. यानंतर आताचा टप्पा आहे नेटफ्लिक्सद्वारे जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा...

यातल्या काही कार्यक्रमांमध्ये तो उत्स्फूर्त विनोद करतो, काहींमध्ये एकाहून अधिक व्यक्तिरेखा साकारतो, जेस्टिनेशन अननोनसारख्या कार्यक्रमात इतर दोन कॉमेडियन्सना सोबत घेऊन देशातल्या प्रमुख शहरांमध्ये जायचं, तिथल्या लोकांशी बोलायचं, एकमेकांशी बोलायचं आणि त्या सगळ्या ताज्या मालावर आधारलेला कार्यक्रम तिथे एखाद्या व्हेन्यूवर सादर करायचा, अशी अफलातून संकल्पना त्याने सादर केली होती...

...वीरच्या कारकीर्दीची निव्वळ यादी वाचूनही दम लागतो. इतकं संपृक्त आयुष्य कसं काय जगू शकतो हा मनुष्य?...

त्याचं उत्तर फर्मास आहे.

तो म्हणतो, रोज सकाळी मला १० नव्या कल्पना सुचतात. त्या मी डोक्यातून काढल्या नाहीत, तर दुसर्या दिवशी सकाळी २० कल्पना होतील, तिसऱ्या दिवशी ३० होतील. एवढ्या कल्पना डोक्यात ठेवून मी वेडा होईन. त्यापेक्षा रोज ज्या सुचतात त्या कल्पना निकाली काढणं बेस्ट आहे.

वीरचे सगळेजोक्सकाही तो लिहीत नाही. वियर्डअॅस ही त्याची कंपनी आहे, तिच्यात पगारी लेखक आहेत. आज कॉमेडियन म्हणून नावारूपाला आलेले सौरभ पंतसारखे अनेक कॉमेडियन कधीकाळी वीरसाठी विनोद लिहिण्याचं काम करत होते. कधी लेखकांच्या कल्पना असतात, कधी वीरच्या डोक्यात एखादी कल्पना असते, ती वीरच्या पद्धतीने खुलवण्याचं काम लेखकांचं असतं. इथे वीरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य समजतं. विनोद एकदा फायनल झाला की वीर तो अशा प्रकारे आत्मसात करतो की तो त्याचाच होऊन जातो. तो दुसऱ्या कोणी लिहिलेल्या ओळी बोलतोय, असं वाटतच नाही

वीर हा एक व्यावसायिक कॉमेडियन आहे. कोणत्याही राजकीय विचारसरणीशी तो जोडलेला नाही, चळवळीशी जोडलेला नाही. त्यामुळे तो अंबानींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांच्यासमोर त्यांचीच थट्टा उडवतो, भाजपवाल्यांची मस्करी करतो, तसाच काँग्रेसजनांच्याही टोप्या उडवतो. तो म्हणतो, जो खर्या अर्थाने पॉवरफुल असतो तो विनोदांना घाबरत नाही. मोठी माणसं त्यांच्यावर केलेल्या विनोदांवरही हसतात. भावना दुखावतात त्या मोठ्या माणसांच्या छोट्या चाहत्यांच्या.

अतिसंवेदनशील वातावरणात जोक सेन्सॉर करण्याची वेळ येत नाही का, यावर तो म्हणतो, मी फक्त जोक लोकांना हसवतो की नाही, एवढाच विचार करतो. माझा जोक एखाद्याला हसवणारच नसेल, तर तो करण्यात पॉइंट काय? पण, दुसर्या कुणी सांगितलं म्हणून मी जोक पातळ करत नाही किंवा बाजूलाही ठेवत नाही. कारण, पॅरडीइतकं डेमोक्रॅटिक आणि पेट्रिऑटिक दुसरं काहीच नाही, ही माझी धारणा आहे. पण, मी सोलो कलाकार आहे, कलेक्टिव्ह नाही. माझा माझा एक नैतिक विचार आहे, त्याची चौकट मी मानतो. उदाहरणार्थ, मी आजारी माणसांची, लहान मुलांची किंवा दुर्बल घटकांची थट्टा करत नाही. कॉमेडीचं आणखी एक पथ्य तो सांगतो. आपली एखाद्या विषयावर एकाच बाजूची भूमिका पक्की असेल तर तेच अंतिम सत्य आहे, अशा थाटात ते मांडू नये, असं मला वाटतं. आपण मांडतोय ते फक्त आपलं मत आहे, हे सांगण्याचा प्रांजळपणाही असला पाहिजे.

तो म्हणतो, माझ्या लाइव्ह शोला डावे, उजवे, कॉलेजयुवक, युवती, मध्यमवयीन लोक, त्यांची मुलं, मुली, असे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतले सर्व प्रकारचे लोक प्रेक्षक म्हणून येतात. त्यांच्यात मिनिस्कर्ट घातलेल्या मुलीही असतात आणि सलवार कमीज घातलेल्याही असतात. यातल्या सगळ्यांना सगळं एकसमान आवडू शकत नाही. एखादा जोक आवडतो, एखादा आवडत नाही, एखादा अस्वस्थ करतो. लोकांना कशाचा राग येईल, हे सांगता येत नाही. भारत एक संयुक्त कुटुंब आहे, एकाच मोठ्या प्लेटमधून जेवणारं. यातल्या एखाद्या अंकलला भेंडी नाही आवडली तर काय करणार? (या अंकल मंडळींवर त्याचा भयंकर राग आहे. तरुणांचा हा देश अंकल चालवतात, सगळं जगच अंकल लोक चालवतात, याने तो जाम पकतो. तो सांगतो, आमच्या भारतात मोठ्या माणसांचा निव्वळ वयाने वाढलेत म्हणून आदर बाळगण्याची एक तापदायक प्रथा आहे. हे अंकल लोक कुटुंबासोबत चायनीज रेस्तराँमध्ये जातात आणि म्हणतात, मैं ऑमलेट खाऊंगा. कुणीतरी त्यांना सांगतं की हे चायनीज हॉटेल आहे. ते म्हणतात, असू दे, मी ऑमलेटच खाणार. तसे काही अंकल म्हणतात, आय विल हॅव हेट्रेड. लोक सांगतात, आपला देश बहुसांस्कृतिक आहे, किती छान मेळ बनू शकतो सगळ्यांचा. पण ते म्हणतात, असू दे. मी द्वेषच करणार.)

वीर म्हणतो, मी एखाद्या गोष्टीवर विनोद करण्याचं स्वातंत्र्य उपभोगतोय, तर तो विनोद न आवडण्याचं स्वातंत्र्य लोकांना आहे की. त्यांना ते उपभोगू द्या. लोक आपल्यावर भडकले तर आपण फक्त एकच करू शकतो... कॉमेडी... तीच करत राहायची.

अभिनय आणि स्टँडअप यांच्यातला फरक स्पष्ट करताना तो म्हणतो, अभिनय ही एक ओळ २५ पद्धतींनी म्हणण्याची कला आहे. स्टँडअप ही ५०० ओळी सलग बोलण्याची कला आहे. अभिनयात अनेकांची साथ असते. स्टँड अप एकट्याने केला जातो, तो अंतर्मुख होऊन करायचा असतो. तो विनम्र करणारा, आपलं विमान जमिनीवर आणणारा आणि आत्यंतिक लोकशाहीवादी कलाप्रकार आहे. अभिनय सृजनशील, कलात्मक आणि लाड पुरवणारा असतो. स्टँड अपमध्ये लाड होत नाहीत, बाप दाखवला नाही, तर श्राद्धाची तयारी ठेवावी लागते.

यू हॅव नेव्हर मेट अॅन इंडियन ब्लोक, यू हॅव नेव्हर हर्ड अॅन इंडियन जोक, सो विल यू अंडरस्टँड?’ या गाण्याच्या ओळींनी सुरू होणार्या त्याच्या आंतरराष्ट्रीय शोच्या माध्यमातून तो वंश, भाषा, ॅक्सेंट आणि कॉमेडीच्या मर्यादा ओलांडू लागला आहे. १९० देशांमध्ये पोहोचलेला त्याचा शो आज टॉपच्या शोंमध्ये गणला जातो. त्याला इंग्रजीभाषकांबरोबरच पोर्तुगीज, जपानी, फ्रेंच प्रेक्षक मिळाले आहेत. त्याने सातआठ महिने वर्ल्ड टूरही केली, २८ देशांची. आंतरराष्ट्रीय ऑडियन्ससमोर तो भारतीय परिप्रेक्ष्यातून वेगवेगळ्या विषयांची मांडणी करतो. गोरेपणाचा हव्यास, वंशभेद, बंदूकबाजी, वसाहतवाद, समलैंगिकता, बॉलिवुड, पार्ले जी, ओल्ड मंक, च्यवनप्राश, लहान मुलांना मोठ्यांकडून पडणारा मार, वेद, अयोध्या, मोदी, हे सगळे विषय त्यात येतात.

कधी कधी तो व्यक्तिगत जीवनातले अनुभव सांगतो... २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा वीरच्या एका कार्यक्रमाचं शूटिंग सुरू होतं. हल्ल्यात वीरवर अतिशय प्रेम आणि प्रभाव असलेली एक शिक्षिका ठार मारली गेली होती. वीर सुन्न झाला होता. त्याचा बाबू नावाचा स्पॉटबॉय त्याला शॉटसाठी बोलावायला आला. वीर म्हणाला, मुंबईत काय चाललंय तुला माहिती आहे ना? तो म्हणाला, माहिती आहे, पण ही मुंबई आहे. इथे कुणी कुणासाठी थांबत नाही. शॉट द्यायला चल. वीर म्हणाला, बाबू, माझी आयुष्यभराची कमाई आज बुडाली आहे, मी खंक झालो आहे. बाबू म्हणाला, माझ्याकडे तर बचत करण्याइतकी कमाईच नाही. पण तुला पोट आहे, मला पोट आहे. दोघांनाही उद्या जेवायचंय, त्यासाठी आज काम करायलाच लागेल. वीर म्हणतो, ‘हा स्पॉटबॉय दहा वर्षं माझ्याबरोबर काम करतोय, मला त्याचं बाबू हेच नाव माहिती होतं, त्याचं खरं नाव कबीर मोहम्मद हुसेनी आहे हे मला नंतर कळलं. विचार करा, काही मुसलमान तरुण जेव्हा माझ्या शहरात इस्लामच्या नावाखाली गोळ्या झाडत निरपराधांना मारत फिरत होते, तेव्हा तिथून काही किलोमीटर अंतरावर एक मुसलमान तरुण मला मुंबईचं स्पिरिट सांगत होता, जगण्याचा अर्थ समजावून सांगत होता. काय कुणी मुंबईवर बोडक्याचा हल्ला करणार आणि काय आमची ठासणार?... अरे आम्ही पहिल्यापासून ठासले गेलेलेच आहोत.’

आंतरराष्ट्रीय शोच्या एका सेग्मेंटमध्ये तो एका तामीळ माणसाची कहाणी सांगतो. वीर काही परदेशी माणसांसोबत तामीळनाडूमध्ये गेला होता. काही गोरे होते, मार्स नावाचा कृष्णवर्णीय माणूसही होता. एका गावात एका तामीळ माणसाने यांना पाहिलं आणि तो मार्सला पाहून चीत्कारला, ‘यू ब्लॅकी!’ घरातल्या दोन मुलांना बोलावून सांगितलं, ‘हा पाहा ब्लॅकी.’ वीर म्हणतो, तामीळनाडूतला तो माणूस आणि त्याची मुलं या कृष्णवर्णीयापेक्षा १० पटींनी काळी होती. ब्लॅकी हा शब्द केवळ निरागस अज्ञानातून आला होता, त्याला मार्सचा अधिक्षेप करायचा नव्हता, त्याने मार्सला प्रेमाने जवळ बोलावून घेतलं, मुलांनी त्याला हात लावून पाहिलं, अतिशय प्रेमाने त्याच्याशी आपल्या भाषेत गप्पा मारण्याचा प्रयत्न केला. इथे वीर म्हणतो, आपल्यात फरक आहेत, ते समजून घेण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न होता. आपण आता पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी मानव तितुका एक छापाचा सरधोपटपणा करतो आणि मग कसोटीच्या वेळी आपल्यांतले भेद भळभळू लागतात. त्यापेक्षा हे छान आहे. आपण वेगळे आहोत हे समजा आणि त्या वेगळेपणासकट एकमेकांबरोबर एकत्र जगा.

इथेही तो सुरू कुठून होतो आणि कुठे पोहोचतो ते पाहा!

आता सगळं जग लॉकडाऊनमध्ये अडकलेलं असताना त्यातही तो स्वस्थ बसला नव्हता. ‘ऑन द ब्राइट साइडहा शो त्याने त्याच्या बिछान्यातून केला होता. लॉकडाऊन झाला, आता काय? लॉकडाऊन वाढला, आता काय? आता जागतिक मंदी येणार, आपलं कसं होणार? यासारख्या प्रश्नांचीब्राइट साइडतो दाखवत होता. त्याचं म्हणणं साधं होतं. हे सगळे गंभीर प्रश्न आहेत, अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत, त्यांच्यासह मी तुम्हाला एका इतक्या वेडपट ठिकाणी घेऊन जातो की तुम्हालाही त्यांची सोनेरी किनार दिसू लागेल.

वीरचे दोन परदेशी चाहते एका वेबचॅनेलवर म्हणाले, हा नुसती कॉमेडी करत नाही, इनसाइटफुल कॉमेडी करतो. त्याच्या बोलण्यातटेड टॉक्सचं वजन आहे. अमेरिकेत अॅडम सँडलर जसा वरवर पाहता अतिशय पाचकळपणा करत एकदम तत्त्वचिंतनाच्या पातळीवर पोहोचतो, तशातला हा प्रकार आहे...

..वीर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर फार काळ आउटसायडर राहणार नाही, याची ही खूण मानायला हवी.

 

मुकेश माचकर

९३२६४७३३४४

                                                                        mamanji@gmail.com

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंक : मागील पानावरून पुढे | राम जगताप | अनुभव - जानेवारी २०१९

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८