भटक्यांमधले टॉपर्स - प्रशांत खुंटे

 


दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा उपेक्षित नाथजोगी समाजातून प्रथमच अनेक विद्यार्थी पहिल्या श्रेणीत पास झालेत. पंच्चावन्न वर्षात प्रथमच घडत असलेल्या या स्थित्यंतराची दखल..

‘‘एक दिवस आम्ही सगळ्या जणी शाळेत जात होतो. नदीला पूर आलेला.’’ जमुना सांगत होती. कुणी मोठा माणूस सोबत असला तर पोरांनाही पूर पार करणं मुश्कील नसतं. म्हणून ती एका माणसाला म्हणाली, ‘‘काका, आम्हाला पलीकडं सोडा ना!’’ तो माणूस पावसात शाळेला निघालेल्या या मुलींवर खेकसत म्हणाला, ‘‘का गं, जा ना घरीच र्‍हा, कशाला जावू ़र्‍हायल्या? एवढा पूर आला नदीला? न् तुम्ही कुठं शिकू र्‍हायल्या? मुलींनी घरीच बसावं, कशासाठी शिकावं मुलींनी?’’

दुसरं कुणी असतं, तर उड्या मारत घरी गेलं असतं. पण जमुना नाराज झाली.

या नाराजीचं मूळ तिच्या महत्त्वाकांक्षेत आहे. कुडाच्या झोपडीत राहणार्‍या जमुनाचं एक स्वप्नं आहे. ती म्हणते, ‘मला आयएएस व्हायचंय!’ गावातील कुणीतरी तिच्या गरीब वडलांकडे लाच मागितली. ‘झोपडी नावे करून देतो, पाच हजार द्या!’ जमुनाचे वडील भावलाल यांची ही मागणी पुरी करण्याची ऐपत नाही. मोलमजुरी करणार्‍या आपल्या वडलांची ही कुचंबणा जमुनाला अस्वस्थ करते. म्हणूनच लाचखोरांना धडा शिकवण्यासाठी तिला आयएएस व्हायचंय. त्यासाठी ती शिकतेय.

जमुनाला थोरल्या दोन बहिणी. एक रूक्मा. तिचं आताचं वय चोवीस. ही कधीच शाळेत गेली नाही. दुसरी निना. ही बावीस वर्षांची. ती पाचवीपर्यंत शिकली. दोघींचीही लग्न झालीत. रुक्माला दोन मुलं झालीत. निनानेही नुकताच मुलीला जन्म दिलाय. या दोघीही लग्नापूर्वी मोलमजुरी करत. आता सासरीही तेच करतात. जमुनाचा भाऊ देवलालही मजुरीच करतो. देवलालने नववीत शाळा सोडली. जमुना सर्वात धाकटी. कुटुंबात दहाव्या इयत्तेपर्यंत पोचलेली ही पहिलीच मुलगी.

दहावीच्या वर्षात सुरुवातीलाच घडलेले प्रसंग जमुना सांगते, ‘‘एक दिवस गावातली एक काकूही मला खूप बोलली. ती म्हणाली, ‘तू कशासाठी शिकते गं, तुझ्या बहिणी नाय शिकल्या, तू काहून शिकू र्‍हायली? शिकूनशानी तुला का नौकरी लागणारे का? घरी कोण्चा एवढा पैसाय. तुझे बाबा त् नाय लावत पैशे तुले. मंग कशासाठी शिकू र्‍हायली तु?’ त्या काकूशी मी बोलली नाही. मी तिथून चालली गेली...’’ जमुनाला घरी, गावात नि शाळेत हेच कानांवर पडत होतं.

जमुना म्हणते, ‘‘त्या काकांनी आम्हाला नदीपार केली नाही. त्यामुळं शाळा बुडली. मग सरांनी कल्ला केला.’’ जमुनाच्या भाषेत ‘कल्ला केला’ म्हणजे सर रागावले! का रागावले? या प्रश्‍नावर ती म्हणते, ‘‘सरांनी आमचं गाव नाही ना पाहिलेलं. सरांना आम्ही खोटं बोलू र्‍हायलो असं वाटलं. त्यांनी आम्हाला वर्गाबाहेर उभं केलं. मग मी घरी येऊन बाबाला सांगितलं. बाबा म्हणला, ‘तुमच्या अडचणी येतच र्‍हातात. र्‍हावूदे. नको जावू शाळेत. कामाला जात जा.’ मी खूप रडली त्या दिवशी. आईला सांगितलं, ‘बाबांना सांग ना, बाबा असं बोलू र्‍हायले.’ आई बाबाला म्हणाली, ‘तुम्ही तिला पैसा पण नाय लावू र्‍हायले, ती स्वत:हून मजुरीला जावूनशनी शिकू र्‍हायली. तुम्ही कशासाठी तिला बोलता?’ मग बाबा शांत बसले...’’  

नुकताच जमुनाचा निकाल जाहीर झालाय. तिने बोर्डाच्या परिक्षेत ७९.६०% गुण मिळवलेत. बुलढाण्यातील नावखुर्द हे जमुनाचं गाव. साधारणत: चाळीस कुटुंबांची वस्ती असलेल्या या गावातून प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण झालेली ही पहिलीच मुलगी. किंबहुना दहावी उत्तीर्ण झालेली ही पहिलीच. नावखुर्द ही नाथजोगी समाजाची वस्ती. वस्तीपासून जवळच मोहिदेपूर हे गावही नाथजोगी समाजाचंच. पण जरा मोठं. या गावातही क्वचितच एखाद्या मुलीच्या नशीबी दहावीपर्यंत शाळा आलीय. 

अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी गावातही अशीच घटना घडलीय. साधारणत: सहाशे लोकवस्तीचं हे गाव. गावात मुख्यत: बंजारा आणि नाथजोगी समाजातली घरं आहेत. या गावातील आशिष बाबर या विद्यार्थ्याने ९६.४०% गुण मिळवलेत. आशिष आणि जमुना हे दोघेही नाथजोगी समाजात जन्मलेले टॉपर!

यंदा दहावीच्या निकालात या समाजातील शेकडो विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण मिळवलेत. ‘विमुक्त जाती भटक्या जमाती एसबीसी महासंघ’ या संघटनेचे महाराष्ट्र संघटक भाऊलाल बाबर हे पेशाने प्राथमिक शिक्षक आहेत. ते सांगतात, ‘‘आम्ही जेमतेम काठावर पास झालो. पण यावर्षी आमच्या समाजातल्या पोरांनी इतिहास घडवलाय. पहिल्यांदाच आमच्या पोरांना इतके मार्क्स मिळालेले आम्ही पाहतोय.’’ १९६६ पासून महाराष्ट्रात एसएससी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. गेल्या पंच्चावन्न वर्षात प्रथमच या समाजातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवलीय. या अपूर्व घडामोडीची नोंद घ्यायला हवी.

ज्ञानप्रकाश विद्यालय, पिंजर या शाळेत आशिष पहिला आणि महात्मा ङ्गुले नगरपरिषद विद्यालय, जळगाव जामोद या शाळेतून जमुना तिसरी आलीय. लॉकडाऊनच्या काळात हे निकाल जाहीर झाले. त्यामुळे या मुलांचं फारसं कौतुकच झालं नाही. आशिषला विचारलं, ‘तुझा सत्कार वगैरे झाला का?’ तो म्हणतो, ‘‘नाही. लॉकडाऊनमुळं शाळाच बंद होत्या. आम्ही मोबाईलवर रिझल्ट बघितला. सगळी दुकानं बंद होती. मी एका मिठाईवाल्याला विनंती केली, त्यांनी दुकान उघडलं. मग मी पेढे घेऊन ट्यूशनच्या मॅडमकडं गेलो. मॅडमनी माझं अभिनंदन केलं.’’ आशिषला शैक्षणिक वर्तुळातून मिळालेली हीच काय ती प्रशस्ती. पण त्याला खरी दाद मिळाली त्याच्या आजीकडून. तो म्हणतो, ‘‘माझा निकाल बघून आज्जी रडायला लागली.’’ आजीचे आनंदाश्रू हेच या पोराला सर्वात मोठं बक्षीस वाटतंय. आशिषची आजी गुँफाबाई. त्यांचं वय साठीच्या आसपास. आशिष म्हणतो, ‘‘आजीला गावात मान आहे. कारण तिला वाचता येतं.’’ काय वाचते आजी? या प्रश्‍नावर आशिष सांगतो, ‘‘आजीला कॅलेंडर कळतं. आजी अमावस्या-पौर्णिमा-चतुर्थी कधीय ते कॅलेंडरवर वाचून गावातल्यांना सांगते...’’ आजीचं कौतुक नातवाला नि नातवाचं कौतुक आजीला!

खरंतर कौतुक-प्रशस्ती या भावनेपासून डवरी-गोसावी-नाथजोगी हा समाज उपेक्षितच. समाजाचं राहूदे, पण बापाला पोराचं कौतुक असतंच ना! तसं साईनाथ यांना आशिषचं कौतुक आहे. साईनाथ यांना दहावीतच शाळा सोडावी लागली. परीक्षेच्या काळात ते वडलांसोबत परगावी भटकत होते. परिणामी परीक्षा बुडली. आता आपल्या मुलाने शिकावं यासाठीच त्यांनी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलंय. ‘या पदवीचा उपयोग काय?’ या प्रश्‍नावर ते म्हणतात, ‘‘तेवढाच अभिमान वाटतो. माझा बाप ग्रॅज्युएट आहे असं पोरगा सांगू शकेल.’’ आपल्या मुलाबद्दल ते म्हणतात, ‘‘याची आई २००५ मध्ये कॅन्सरने मेली. हा तेव्हा ७-८ महिन्यांचा होता. तेव्हापासून आजीनं याला सांभाळलंय.’’ आशिष अभ्यासात हुशार आहे. त्यामुळे याला शिकवण्याचा विचार बाबर कुटुंबाने पक्का केला. साईनाथ यांना दोन भाऊ आणि तीन बहिणी. बहिणी आपापल्या सासरी. दोघे भाऊ मिळून आशिषच्या शिक्षणासाठी झटताहेत. साईनाथ सांगतात, ‘‘माझा एक भाऊ सातवीपर्यंत शिकला. तो कुकर, गॅस शेगडी दुरूस्तीचं काम करतो. त्यासाठी खेड्यापाड्यात फिरतो. मधला भाऊ बी.ए.पर्यंत शिकला. पण त्याला नोकरी मिळाली नाही. तो देवदेवता आणि नटनट्यांचे फोटो विकायचं काम करतो. या पोराचा कपडालत्ता, वह्या पुस्तकं याचा खर्च आम्ही सगळे मिळून करतो...’’ साईनाथ स्वत: भविष्य सांगण्याचा व्यवसाय करतात. त्यांचे वडील वामनराव वयाच्या साठीतही खेड्यापाड्यात ङ्गिरून भविष्य सांगतात.

बहुरूपी होऊन पोलिसांचं सोंग आणणं, जागरण गोंधळ घालणं, साधूचा वेष करून मच्छिंद्रनाथांची गाणी गात भिक्षा मागणं यासारख्या नाना युक्त्यांनी भिक्षा मागून नाथजोगी-डवरी-गोसावी समाज आपली गुजराण करतो. ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ बेगिंग अ‍ॅक्ट-१०६०’ नुसार भविष्यवाणी करून दान मिळवणं हा गुन्हा आहे. अशा व्यवसायातील समुदायांचं पुनर्वसन व्हायला हवं. पण साईनाथ आणि त्यांचे वडील पिढीजात उदरनिर्वाहासाठी हा ‘गुन्हा’ करत आलेत. इंदिरा आवास योजनेतून त्यांना एक घर मिळालंय, पंतप्रधान उज्वला योजनेतून गॅसही मिळतोय, शिवाय स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळतं. ‘पण त्यातनं भागतं का?’ असं विचारल्यावर साईनाथ म्हणतात, ‘‘कसं भागेल? पण मी एकदा दुग्धव्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडं कर्जासाठी अर्ज केला. तो मंजूरही झाला. पण बँकेने कर्ज नाकारलं. ‘तुमच्या लोकांना आम्ही कर्ज देऊ शकत नाही’, असं बँकेच्या अधिकार्‍याने सांगितलं. मग मी तो नाद सोडला.’’

भविष्यवाणीच्या धंद्यातून मुलाला उच्च शिक्षण देण्याची त्यांची कुवत नाही. आपल्या व्यवसायाला आलेल्या अवकळेबद्दल ते म्हणतात, ‘‘आता लोक भोळे राहिले नाहीत. भिक्षा देत नाहीत. तुम्हाला तुमचं भविष्य माहीत नाही, आमचं काय सांगणार, असं लोक म्हणतात. एकदा माझे बाबा धंद्यासाठी शेगावला गेलेले. लोकांनी त्यांना चोर समजून मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी केली म्हणून जीव वाचला.’’ असा प्रसंग त्यांनी स्वतःही अनुभवलाय. ‘‘एकदा मी गुजरातच्या बॉर्डरला होतो. रात्र झाली म्हणून मी एका टेम्पोला हात दाखवला. पुढच्या गावापर्यंत ड्रायव्हर सोडेल असं वाटलेलं. पण तो ड्रायव्हर प्यायलेला होता. मी हातच का दाखवला, म्हणून त्याने मारहाण सुरू केली. मी पळत पोलिस स्टेशन गाठलं म्हणून वाचलो...’’ अशी जोखीम असली तरी उदरनिर्वाहाचे अन्य पर्याय नसल्याने साईनाथ परंपरागत व्यवसाय सोडू शकत नाहीयेत. 

पिढ्यानपिढ्या ते हेच करत आलेत. त्यासाठी वर्षातले आठ महिने भटकंती करतात आणि चार महिने स्वेच्छेने बेरोजगार राहतात. गुजरात, राजस्थान, दिल्ली, बंगाल, बिहार, एम.पी., यु.पी. अशा विविध राज्यांत ते ङ्गिरतात. एखाद्या देवळात पथारी टाकायची किंवा जमलंच तर स्वस्तातल्या लॉजवर मुक्काम करायचा. आठ महिन्यांच्या भटकंतीतून ते साधारणत: ४० ते ५० हजारांची बेगमी करू शकतात. आपल्या मुलाला डॉक्टर करण्याचं त्यांचं स्वप्नं आहे. ‘ते पूर्ण कसं होणार?’ या प्रश्‍नावर साईनाथ म्हणतात, ‘‘डोंगर तर ङ्गार मोठा दिसतोय साहेब, आमच्यानं नाही झेपवणार!’’

आशिषला मात्र आयएएस व्हायचंय. कुठून आली ही प्रेरणा? आशिष म्हणतो, ‘‘मी सातवीत होतो. तेव्हा परीक्षेत वर्गातल्या एका पोराचा पेपर कॉपी करायचो. त्याने सुरुवातीला मदत केली. पण नंतर तो म्हणाला, तुझ्यामुळे माझे मार्क कमी होतील. माझी कॉपी करू नको.’’ सगळ्या वर्गाने हे ऐकलं. या अपमानामुळे आशिषने स्वबळावर परीक्षा द्यायला सुरुवात केली. अभ्यासात लक्ष केंद्रित केलं. गावात बर्‍याचदा वीज नसते. पण त्याने रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला. साईनाथ म्हणतात, ‘‘या महिन्यात दहा हजाराचं लाईट बिल आलंय. एक टिव्ही. तो बंदच असतो. एक पंखा आणि तीन एलईडी बल्ब आम्ही जाळतो. एवढ्याचं बिल दहा हजार? कसं भरणार मी बिल?’’ हे सर्व फोनवरून सांगताना साईनाथ जवळच्या आठवडी बाजारात आलेले. मुलाचं कौतुक करायला पाहुणे घरी येऊ लागलेत. त्यामुळे घरी चहासाठी साखर घ्यायला ते आले होते. या खरेदीसाठीही त्यांनी कर्ज घेतलंय. कारण लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय पूर्ण थांबलाय.

आशिषकडून साईनाथ खूपच अपेक्षा बाळगून आहेत. ‘तुला का शिकावं वाटतं?’ या प्रश्‍नावर आशिष म्हणतो, ‘‘माझ्या समाजातल्या मुलांपुढं मला आदर्श ठेवायचाय. माझ्या लेव्हलची पोरं भीक मागतात. आमच्या लोकांना राईनपाड्यात लोकांनी ठेचून मारलं. असं पुन्हा घडू नये, लोकांच्या हाताला काम मिळावं म्हणून मला अधिकारी व्हायचंय.’’ २०१८ मध्ये धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावात डवरी गोसावी समाजातील पाच व्यक्तींची हत्या झाली. त्या घटनेच्या कटू स्मृती या सोळा वर्षांच्या पोराच्या मनावर आहेत. आशिषने शाळेच्या स्नेहसंमेलनात ग्रुप डान्समध्ये आपली कला दाखवलीय. क्रिकेट आणि धावण्याच्या स्पर्धातही त्याने विशेष प्राविण्य दाखवलंय. सिनेमे पाहायलाही त्याला आवडतं. टायगर श्रॉफ हा त्याचा आवडता हिरो आहे.

जमुनानेही आपली चुणूक दाखवलीय. २०१९ मधील ‘जल शक्ती अभियाना’च्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत तिने ट्रॉफी मिळवलीय. जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनात तिने सेंद्रीय खतांवर केलेल्या प्रोजेक्टला तिसर्‍या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय. धावण्याच्या स्पर्धेतही तिने दुसरा नंबर पटकावलाय. पण तिच्या यशाचं कौतुक करायला आसपास कुणी नाही. जमुनाचे एक काका सतत तिचं लग्न लावण्याच्या प्रयत्नात आहेत. वडलांनाही या मुलीच्या लग्नाची घाई आहे. त्यावरून घरात वारंवार खटके उडतात.

अल्पवयातच मुलींची लग्नं लावण्याची प्रथा नाथजोगी समाजातून अजून हद्दपार झालेली नाही. अलीकडे या समाजात व्हाटसॅप ग्रुपवरून वधूवरसूचक मंडळंही कार्यरत झालीत. अशाच एका व्हाटसॅप ग्रुपवर विधवा, घटस्फोटीत आणि परित्यक्ता मुलींच्या पुनर्विवाहांच्या नोंदणीसाठी आवाहन करण्यात आलं. केवळ आठच दिवसांत तिथे १२६ मुलींची नोंदणी झालीय. समाजातील मुलींची ही अवस्था जमुना पाहत असावी. त्यामुळे तिला इतक्यात लग्न करायचं नाहीय. सातत्याने येणार्‍या दबावाचा ती कसाबसा सामना करतीये. या लेखनासाठी मुलाखत सुरू असताना जमुनाचे वडील भावलाल अचानक रडू लागले. आपल्या मुलीची कुणीतरी मुलाखत घेतंय याचं त्यांना अप्रूप वाटलं. अगदी लहान मुलासारखं मुसमुसत ते म्हणू लागले, ‘‘साहेब, मी पोरीला शिकवतो. पण मी मोलमजुरी करून जगणारा, मला कसं झेपणार तिचं शिक्षण?’’

भावलाल यांची परिस्थिती हलाखीची असली तरी जमुना आपल्या शिक्षणाबाबत ठाम आहे. दहावीच्या वर्षात या मुलीने मोलमजुरीतून आपला खर्च भागवलाय. ती सांगते, ‘‘तेराशे रुपयांची पुस्तकं घेतली. पाचशे रुपयाचा ड्रेस झाला. शाळेत येण्याजाण्यासाठी फकून तीस आन् तिकून तीस रुपये लागतात.’’ म्हणजे रोजचे साठ रुपये या मुलीला गाडीभाडं लागतं. हा खर्च भरून काढण्यासाठी जमुना पंचवीस रुपये तासाने शेतात कामाला जात होती. त्यासाठी ती पहाटेच उठायची. चार ते पाच अभ्यास करायची. आई-वडील आणि भाऊही सकाळीच मजुरीला जात. ही त्यांच्या डब्यासाठी स्वयंपाक करायची, मग त्यांचे डबे घेऊन स्वतःदेखील मजुरीला जायची. नऊ वाजेपर्यंत काम करून मग ती शाळेला निघायची. दिवसाकाठी मिळालं तर चार-पाच तासांचं काम मिळायचं. त्यातून तिला शंभर-सव्वाशे रुपये मजुरी मिळत होती. अर्थात रोज काम मिळत नसे. पण आपल्या बचतीतून तिने दहावीच्या वर्षासाठी खास ट्यूशन लावली. त्यासाठी तीन हजार रुपये जमवले. इतके पैसे जमवण्यासाठी या मुलीला किती राबावं लागलं असेल? ती म्हणते, ‘‘मी शाळेतून घरी आल्यावरही कामाला जायची!’’

जमुनाच्या निर्धाराला अधोरेखित करणारे दोन प्रसंग सांगण्यासारखे आहेत. २०१२ पासून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं यासाठी राज्यात ‘मानव विकास योजना’ राबवली जाते. या योजनेंतर्गत शालेय मुलींसाठी मोङ्गत एस.टी. गाड्यांची सोय आहे. पण ही गाडी सकाळी अकराला गावात यायची. जमुनाला आपल्या गावापासून १३ कि.मी. दूर असलेल्या शाळेजवळील ट्यूशनमध्ये पोचण्यासाठी सकाळी साडेनऊलाच घर सोडावं लागायचं. त्यामुळे मानव विकासची गाडी लवकर सोडावी यासाठी

जमुनाने गावातल्या मुलींचा एक अर्ज तयार केला. तो एस.टी. महामंडळाच्या अधिकार्‍यांना दिला. एक दिवस गाडी लवकर आलीदेखील. पण या गाड्या अन्य गावांवरून सुटत होत्या. त्यामुळे समस्या सुटलीच नाही. परिणामी जमुना आणि तिच्या मैत्रिणींना गाडीभाडं खर्चून शाळेत जाणं भाग पडलं. एकदा अशीच एक घटना घडली. जमुना सांगते, ‘‘पळशीची बस लागलेली. आम्ही बसमध्ये चढलो. पण एका मुलानं माझ्या सोबतच्या मुलीची ओढणी ओढली. तुम्ही आमच्या बसमध्ये यायचं नाय म्हणाला. तुम्ही मोहिदेपूरच्या मुली, बाहेर व्हा तुम्ही..असं तो मुलगा म्हणू लागला. सगळी पोरं कल्ला करू लागली.’’

मोहिदेपूर हे नाथजोगी समाजाचं गाव. ‘या समाजाच्या मुलींनी आमच्या बसमध्ये चढू नये’ असं त्या शाळकरी मुलाला वाटत होतं. पण जातीवरून हिणवलं गेलं तरी जमुना मागे हटली नाही. तिने त्याला धडा शिकवला. ती म्हणते, ‘‘मी त्या मुलाला एक चापट मारली. आणि बसस्टँडच्या सरांकडे घेवून गेले. मग बसमधले कंडक्टर त्या मुलांना म्हणले, ही बस सर्वांसाठी आहे. तुम्ही कशासाठी भांडणं करता?’’

‘‘एन.टी. प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश मिळायला हवा.’’ असं डॉ. नारायण भोसले म्हणतात. डॉ. भोसले हे नाथजोगी समाजातून पीएच डी झालेले पहिलेच. ते म्हणतात, ‘‘नाथजोगी समाजात हल्ली काही लोक तुम्हाला पोलिस खात्यात आढळतील. स्थिर नोकर्‍यांमध्ये तुरळक तरुण दिसतात. शिकलेल्या मुली तर बोटांवर मोजण्याइतपतच आहेत. माझी बहीण मीरा भोसले ही पहिली ग्रॅज्युएट. तिने भिक्षा मागूनच आपलं शिक्षण केलं. माझ्या माहितीतील शालन चव्हाण नावाच्या एक आहेत. त्यांनी एम.लिब. केलं. हीच काय ती उच्चशिक्षित मुलींची तुरळक उदाहरणं.’’ डॉ. भोसले सांगतात, ‘‘आता नाथजोगी समाजात जागृती होत आहे. यावर्षी मुलांनी मिळवलेले मार्क्स पाहून समाजातील व्हाटसॅप ग्रुपवर आवाहनं सुरू झाली. त्यातून समाजातील लोकांनी या विद्यार्थ्यांसाठी मदतनिधी जमवायला सुरुवात केलीय. पण या मुलांची खरी कसोटी पुढेच आहे. मराठी माध्यमात शिकलेल्या या मुलांना उच्च माध्यमिक शिक्षणात अचानक इंग्रजीला सामोरं जावं लागतं. त्यात खर्च परवडत नाही. त्यामुळे खरंतर या दोन वर्षांसाठी मुलांचं पालकत्व कुणीतरी स्वीकारायला हवं.’’ ते म्हणतात, ‘‘मराठा, कुणबी आणि शेतीआधारित समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने ‘सारथी’ ही संस्था स्थापन केलीय. एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘बारटी’ ही संस्था कार्यरत आहे. पण एन.टी. प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अशी योजना नाही.’’

*

दहावीच्या निकालात मिळणार्‍या टक्केवारीवर एक टीकाही केली जाते. हे गुण बेस्ट फाईव्हच्या टक्केवारीतून काढले जातात. त्यामुळे मुलं आणि त्यांचे पालक हुरळून जातात. पुढे या विद्यार्थ्यांचा कल न पाहता सायन्स किंवा इंजिनियरिंगकडे पाठवलं जातं. तिथे हे विद्यार्थी टिकत नाहीत. हा युक्तीवाद कदाचित नाथजोगी समाजातील विद्यार्थी-पालकांच्या आनंदावर विरजण घालणारा ठरू शकेल. पण तरिही यंदा शेकडो गुणी विद्यार्थ्यांची यादी या समाजाच्या व्हाटसॅप ग्रुपवरून संकलित होत आहे. हा समाज स्वबळावर आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करेलच. पण इतर समाजातून या पोरांना ‘लढ’ म्हणणारं कुणी पुढे येईल का?

 

प्रशांत खुंटे

९७६४४३२३२८

prkhunte@gmail.com

... 

जमुना सोळंके

९३२२३६६८९०

...

साईनाथ बाबर

९४२०१०४३६२

 

 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संघातले दिवस : रवींद्र कुलकर्णी

शिक्षणाची यत्ता कंची? - हेरंब कुलकर्णी । अनुभव सप्टेंबर २०१८